अजूनकाही
चित्रपट या माध्यमाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी व्हावा की, समाज प्रबोधनासाठी हा सिनेमाध्यमाच्या उदयासोबतच उदयाला आलेला प्रश्न आहे आणि आज या माध्यमाचा जन्म होऊन १०० वर्षं उलटून गेल्यानंतरही या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळालेलं नाही. चित्रपट बनवणाऱ्या सगळ्याच देशांमध्ये गहिरा सामाजिक आशय असलेल्या अनेक अजोड कलाकृती जन्माला आल्या, त्याचप्रमाणे निव्वळ मनोरंजन करणारे चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. दोन्ही प्रकारच्या सिनेमांचा प्रेक्षकवर्ग वेगळा, त्यांच्या गरजा वेगळ्या. त्यामुळे अमूकच एक चित्रप्रकार चांगला आणि दुसरा वाईट हा हटवादीपणा झाला. परंतु, सर्व प्रकारची व्यवधानं बाळगून निव्वळ करमणूक करणारा, तीदेखील अतिशय निर्विष, निर्भेळ, निर्मळ अशी करमणूक करणारा चित्रपट बनवणं हे येरागबाळ्याचं काम नाही. सामाजिक आशयाचा, एखाद्या समस्येवर आधारित गंभीर चित्रपट त्या विषयाचा अभ्यास करून आणि चित्रपट बनवण्याची क्राफ्ट अवगत असेल तर उत्तम दर्जाचा बनवता येतो; पण कुठलाही अभिनिवेष न बाळगता, फार काही थोर सांगायचंय असा आव न आणता केवळ प्रेक्षकांचं स्वच्छ मनोरंजन हे एकच उद्दिष्ट ठेवून साफसुथरा चित्रपट बनवणं ही लईच अवघड कला असते आणि ती फार कमी लोकांना अवगत असते. दुर्दैवाने अशा कलाकृतींचं फारसं कौतुक होत नाही आणि क्लासिक्समध्येही त्यांची गणना होत नाही.
असाच एक चित्रपट आहे ‘हाय अँझायटी’. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता मेल ब्रुक्स याचा हा चित्रपट म्हणजे आल्फ्रेड हिचकॉकच्या गाजलेल्या चित्रपटांची भन्नाट पॅरडी आहे. ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’, ‘व्हर्टिगो’, ‘सायको’, ‘द बर्ड्स’, ‘डायल एम फॉर मर्डर’, ‘द 39 स्टेप्स’, ‘मरीन’, ‘फॉरेन करस्पाँडंट’, ‘रीअर विंडो’, ‘रेबेका’, ‘स्पेलबाउंड’ अशा हिचकॉकच्या असंख्य गाजलेल्या, चित्रपटकलेत मापदंड ठरलेल्या चित्रपटांवर आधारित ही पॅरडी आहे. पॅरडी म्हणजे खरं म्हणजे टोपी उडवणं, खिल्ली उडवणं. पण या खिल्ली उडवण्यात कुठलाही विखार नाही, हिचकॉकला कमी लेखण्याचा हेतू नाही. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ब्रुक्स सदर चित्रपट रहस्याचा बादशाह आल्फ्रेड हिचकॉक याला अर्पण करण्यात येत असल्याची पाटी दाखवून आपले इरादे स्पष्ट करतो.
चित्रपटाला फार काही गांभीर्याने घ्यावी अशी कथा नाही, कारण हा चित्रपटच मुळात फार काही गंभीर सांगायचंय, यासाठी बनवण्यात आलेला नाही. ‘द सायको-न्यूरॉटिक इन्स्टिट्यूट फॉर द व्हेरी व्हेरी नर्व्हस’ अशा विचित्र नावाच्या संस्था कम रुग्णालयाच्या प्रमुखपदी डॉ. रिचर्ड थॉरनडाइक (ब्रुक्स) या प्रख्यात, नोबेलविजेत्या मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती झाली आहे. नोबेलही कशात? तर ‘सिव्हिअर सायकॉसीसमध्ये केमोथेरपीचा वापर’ या विषयात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याचं या संस्थेत आगमन होतं. इथे काहीतरी विचित्र सुरू असल्याचा अंदाज प्रेक्षकांना सुरुवातीलाच येतो. संस्थेचे आधीचे डीन डॉ. अॅशली यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. डॉ. थॉरनडाइक आपल्या रूममध्ये आपलं सगळं सामान व्यवस्थित लावत असतानाच खिडकीची काच फोडून एक मोठा दगड आतमध्ये येऊन पडतो. दगडाला ‘वेलकम’ असं लिहिलेली चिठ्ठी आहे. रात्री जेवणाच्या टेबलवर डॉ. थॉरनडाइक आपल्या सहकाऱ्यांशी बोलत असतानादेखील अशीच अचानक खिडकीची काच फुटते. संस्थेची नर्स डिझेल हिचं दिसणं आणि वागणं विचित्र आहे (‘रिबेका’मधल्या मिसेस डॅनव्हर या व्यक्तिरेखेवर ही व्यक्तिरेखा बेतली आहे). पहिलेछूटच खलपात्र म्हणून ती आणि तिचा सहकारी डॉ. चार्ल्स माँटेग्यू समोर येतात. डॉ. थॉरनडाइक यांच्या आगमनानंतर काही दिवसांनीच संस्थेतील अन्य एक डॉक्टर फिलिप वेंटवर्थ याचा गाडी चालवता चालवता संशयास्पद पद्धतीने मृत्यू होतो. प्रख्यात उद्योजक आर्थर ब्रिस्बेन यांच्यावर या संस्थेत उपचार सुरू असल्याचं डॉ. थॉरनडाइकना सांगितलं जातं. ते ब्रिस्बेनची भेट घेतात, पण ब्रिस्बेन फारच शोचनीय परिस्थितीत असतात. स्वत:ला ते कुत्रा समजत असतात. काही दिवसांनी डॉ. थॉरनडाइक एका परिषदेत भाग घेण्यासाठी म्हणून सॅन फ्रॅन्सिस्कोला जातात. तिथं ब्रिस्बेनची मुलगी व्हिक्टोरिया त्यांना भेटते. तिच्याशी बोलण्याच्या ओघात त्यांना कळतं की, ते संस्थेत ज्या ब्रिब्सेनला भेटले, ते व्हिक्टोरियाचे वडील नव्हतेच. सॅनफ्रॅन्सिस्कोला नर्स डिझेलचा एक माणूस या दोघांवर पाळत ठेवून आहे. तो डॉ. थॉरनडाइकच्या चेहऱ्याचा मास्क घालून हॉटेलच्या लॉबीतच सगळ्यांसमोर एकाचा गोळ्या झाडून खून करतो आणि शांतपणे तिथून निघून जाताना लिफ्टमधून बाहेर येणाऱ्या आणि खाली काय घडलंय याची काहीच कल्पना नसणाऱ्या डॉ. थॉरनडाइकच्या हाती पिस्तुल देऊन निघून जातो. डॉ. थॉरनडाइक खुनाच्या प्रकरणात अडकतात आणि मग ते यातून कसे सुटतात, हे पुढे पाहायला मिळतं.
कथा वाचल्यानंतर तिच्यात फारसा दम नाही, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. पण मुळात या चित्रपटासाठी कथेचं फारसं महत्त्वच नाहीय. पटकथेत मेल ब्रुक्सने हिचकॉकच्या चित्रपटांचे पैलू ज्या बेमालूमपणे मिसळलेत, तो या चित्रपटाचा आत्मा आहे. हिचकॉकच्या चित्रपटातील गाजलेल्या प्रसंगांची आठवण करून देणारे आणि त्यातून विनोदनिर्मिती असंख्य क्षण या चित्रपटात आहेत आणि अत्यंत हुशारीने त्यांची पटकथेत गुंफण केली आहे. डॉ. वेंटवर्थच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. थॉरनडाइक वैद्यकीय परिषदेसाठी सॅनफ्रॅन्सिस्कोला निघून येतात. मात्र, वेंटवर्थच्या मृत्यूविषयी अधिक तपशील जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असते. त्यामुळे ते हॉटेलमधल्या बेलबॉयला सारखं त्या दिवशीचं वर्तमानपत्र आणायला सांगत असतात. बेलबॉय वैतागून निघून जातो. डॉ. थॉरनडाइक बाथरूममध्ये शॉवर घेत असताना अचानक पडद्यामागे हालचाल जाणवते, पडदा बाजूला सरतो आणि बेलबॉय हातात पेपरची सुरळी घेऊन जोरजोरात थॉरनडाइकवर वार करू लागतो. ‘हा घे पेपर, हा घे! तुला पेपर हवा होता ना? घे, आता खूश आहेस? खूश आहेस?’ असं म्हणत तो थॉरनडाइकवर वार करत राहतो आणि शेवटी त्याच्या अंगावर पेपर फेकून तिथून निघून जातो. हिचकॉकच्या गाजलेल्या ‘सायको’मधील चित्रपट इतिहासात कोरल्या गेलेल्या शॉवर सीनशी हुबेहूब मेळ खाणारा हा प्रसंग मेल ब्रुक्सने त्याच शैलीत चित्रित केलाय. डॉ. थॉरनडाइकच्या चेहऱ्यावरील भय, त्यावर सपासप वार करणारा हात, शॉवरमधून बरसणारं पाणी, थॉरनडाइकच्या चेहऱ्याचा टाइट क्लोजअप, खाली पडल्यानंतर स्वत:ला सावरण्यासाठी पडदा घट्ट धरल्यानंतर पडद्याचे हुक्स तुटून पडदा निखळणं, मूळ प्रसंगात रक्ताचा पाण्यासोबत निचरा होतो, तसाच वर्तमानपत्राच्या शाईचा निचरा होणं…
हे निव्वळ एक उदाहरण झालं. असे असंख्य प्रसंग आहेत, पण ते प्रत्यक्ष अनुभवले पाहिजेत. या ठिकाणी ते सविस्तर सांगून त्यांची गंमत घालवण्यात हशील नाही. हिचकॉकच्या चित्रपटांच्या चाहत्यांना ‘हाय अँझायटी’ पाहताना लगेचंच मूळ चित्रपटांचे संदर्भ लक्षात येतील.
हिचकॉकच्या चित्रपटांची पॅरडी करण्याचा विचार मनात येणं आणि त्यानंतर असा चित्रपट प्रत्यक्षात आणण्याचं शिवधनुष्य उचलणं, हे धाडसाचं काम आहे, विशेषत: हिचकॉकचा दबदबा कायम असतानाच्या काळात. परंतु, मेल ब्रुक्सने ते धाडस दाखवलं आणि त्यात तो प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. दस्तुरखुद्द हिचकॉकला त्याचा हा प्रयत्न भलताच आवडला. या चित्रपटाच्या पटकथेसाठी स्वत: हिचकॉकने ब्रुक्सला मदत केल्याचं सांगितलं जातं.
असा उमेदपणा भारतात क्वचितच आढळून येतो. मागे ऑल इंडिया बकचोद अर्थात ‘एआयबी’ या यूट्यूब चॅनलने यश राज फिल्म्सच्या ‘धूम ३’ या चित्रपटाची पॅरडी करणारी एक वेबफिल्म यूट्यूबवर प्रदर्शित केली असता आदित्य चोप्राने ती यूट्यूबवरून काढायला लावली होती. स्वत:वर हसणं हा अतिशय दुर्मीळ गुण आहे. तो हिचकॉककडे होता आणि आदित्य चोप्राकडे नाही. याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे असुरक्षिततेचं भय. हिचकॉककडे व्यावसायिक धोका पत्करण्याची तयारी होती. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले, पण मुळात ते बनवत असताना हिचकॉक ट्रीटमेंटच्या, कथेच्या पातळीवर अनेक धोके पत्करत असे. उदाहरणार्थ – ‘शॅडो ऑफ अ डाउट’मध्ये ज्याच्यावर सुरुवातीपासून संशय आहे, तोच खरा खलपुरुष म्हणून समोर येऊनही भ्रमनिरास होत नाही. वास्तविक रहस्यमय चित्रपटात ज्याच्यावर संशय असल्याचं दाखवलं जातं, त्याच्यापेक्षा वेगळा कोणीतरी गुन्हेगार म्हणून पुढे येणं, हे धक्कातंत्रच रहस्यमय चित्रपटाचा आत्मा असतो. पण हिचकॉकने अनेकदा हे तत्त्व निर्दयपणे पायदळी तुडवलं. कारण त्याचा त्याच्या कौशल्यावर विश्वास होता आणि म्हणूनच धोका पत्करण्याची त्याची तयारी होती.
स्वतःवरच्या या विश्वासामुळेच मेल ब्रुक्सने पॅरडीच्या माध्यमातून हिचकॉकच्या चित्रपटांना आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिचकॉकने बिल्कूल आडकाठी आणली नाही, त्याला विरोधबिरोध केला नाही. उलट आशीर्वाद दिले, सक्रिय मदत केली आणि चित्रपट बघितल्यानंतर आवडल्याची पावती म्हणून जगभरातील उत्तमोत्तम आणि महागड्या वाइन्सच्या बाटल्यांचा एक गिफ्ट बॉक्स ब्रुक्सला भेटीदाखल दिला. शिवाय सोबत ‘कुठलीही अँझायटी न बाळगता तू. भेटीचा स्वीकार कर’ अशी टिपिकल हिचकॉकियन ह्यूमर असलेली चिठ्ठीही जोडली.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी झाला. समीक्षकांमध्ये मात्र या चित्रपटाविषयी मतभेद होते. अनेकांना तो आवडला, पण रॉजर एबर्टसारख्या नामांकित समीक्षकाने मात्र मुळात हिचकॉकच्या चित्रपटांची पॅरडी करावीच का, असा आक्षेप घेतला. त्याचा मुख्य आक्षेप होता तो यासाठी की, हिचकॉक स्वत:च आपल्या चित्रपटांमधून स्वत:चीच रेवडी उडवत असतो. त्यामुळे अशा चित्रपटांची पॅरडी करण्यात काही अर्थ नसतो. उलट गांभीर्याचा आव आणून बनवलेले चित्रपट पॅरडी बनवण्यासाठी अधिक योग्य असतात.
एबर्टचा मुद्दा योग्य की अयोग्य या फंदात आपण पडायचं कारण नाही. कारण मुळात मेल ब्रुक्सने गांभीर्याचा आव आणून ‘हाय अँझायटी’ बनवलेला नाही. दोन घटका निखळ मनोरंजन करतानाच हिचकॉकच्या चित्रपटांना आदरांजली वाहणं हा त्याचा हेतू आहे आणि त्यात तो पूर्णपणे यशस्वी झालाय. विशुद्ध करमणूक अतिदुर्मीळ असलेल्या आजच्या काळात आपण तरी नसती खुस्पटं काढून रंगाचा बेरंग का करून घ्यावा?
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
chintamani bhide
Sun , 12 March 2017
धन्यवाद उपेंद्र साळवी
upendra salvi
Sun , 12 March 2017
खूपच छान, चित्रपटांची पॅरेडी करणे आज जरी ओके वाटत असले तरी त्या काळात हिचकॉक हयात असताना त्याच्या चित्रपटा ची करणे हे खरच धाडसाचे काम आणि त्याला हिचकॉक ची शाबासकी मिळणे म्हणजे simply great. मी नक्कीच हा चित्रपट पाहीन