सुशील धसकटे कादंबरीकार, प्रकाशक म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच उत्तम ललित, वैचारिक लेखक म्हणूनही ख्यात आहेत. त्यांनी गेल्या १५ वर्षांत काही ना काही निमित्तानं लिहिलेल्या लेखांचं संकलन नुकतंच ‘जे आहे ते’ या शीर्षकानिशी प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात एकूण पाच विभाग आहेत – ‘लेख’, ‘भाषण’, ‘प्रकाशकीय’, ‘पुस्तकांबद्दल’, ‘रोजनिशीतील नोंदी’. यातील सर्व लेखांत अतिशय मुद्देसूद आणि तार्किक मांडणी दिसते. धसकटे आपल्या विवेचनाच्या पुष्ट्यर्थ अनेक लेखक, विचारवंत यांच्या ग्रंथांतील समर्पक अवतरणं देतात. त्यांनी दिलेली अवतरणं वाचून मूळ पुस्तक वाचण्याची असोशी निर्माण व्हावी इतकी ती नेमकी, मर्मभेदी असतात. काही लेखांच्या अखेरीस संदर्भग्रंथांची यादी दिली आहे, आवश्यक तिथं टिपाही दिल्या आहेत. पुस्तकाच्या शेवटी ‘ग्रंथ आणि ग्रंथकार सूची’ दिली आहे. अभ्यासकांना तिचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
पहिल्या ‘लेख’ या विभागात एकूण सहा लेख आहेत. ‘सत्याला सत्य म्हणून...’ या लेखात २०१६ साली झालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची सद्य:स्थिती आणि पूर्वेइतिहास अशा दोन्ही अंगानं भाष्य केलं आहे. हा मोर्चा हे या लेखाचं केवळ निमित्त आहे. धसकटे मराठा समाजाची वैचारिक पातळीवर दिशाभूल करून त्यांना आपल्या कच्छपी लावणाऱ्या चलाख हिंदुत्ववादी शक्तींवर जसे कोरडे ओढतात, तसंच ते या मोर्चाकडे आणि एकूणच जातिप्रश्नाकडे आपापल्या मर्यादित दृष्टीकोनातून, विचारांची झापडं न हटवता पाहणाऱ्या डाव्या-पुरोगामी नेतृत्वावर आणि ते चालवत असलेल्या संकुचित चळवळींवरही खरपूस टीका करतात.
या मुद्द्यांच्या विवेचनार्थ ते जे संदर्भ, ग्रंथांतील अवतरणं देतात, त्यामुळे त्यांच्या वैचारिक मांडणीतील जोरकसपणा आणि ठामपणा ठळक होतो. पुरोगामी संघटनांची वैचारिकता आणि कृती यांत, ते घेत असलेल्या भूमिकांत अनुस्यूत असणाऱ्या उणिवा, त्यांच्याकडून यापूर्वीही या प्रश्नांसंबंधी भूमिका घेताना झालेल्या अक्षम्य चुका, यांबाबत ते सोदाहरण टीका करतात. स्वातंत्र्यानंतरच्या मराठा समाजाच्या राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा विविध पातळ्यांवरील वाटचालीचा आढावा घेतात. या सगळ्या स्तरांवर मराठा समाजाची ‘उलट्या दिशेनं’ वाटचाल सुरू असल्याचं निरीक्षण ते मांडतात. काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असल्या तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे, असंही मत नोंदवतात.
या लेखातील वेगळा मुद्दा आहे तो मराठा समाजातील तरुण वर्गात तयार होणाऱ्या न्यूनगंडाचा. इतर जातींकडून ‘पाटील-सरंजामदार’ वगैरे विशेषणं लावून कुत्सितपणे हिणवलं जात असल्यामुळे त्याचा मानसिक स्तरावर कोणता परिणाम होत असेल, याचीही चर्चा धसकटे या लेखात करतात. अशा प्रकारे न्यूनगंडाची शिकार होणाऱ्या तरुणांना उद्देशून ते लिहितात, “मराठा-कुणबी समाजातील तरुणांनी ‘पुरोगामी न्यूनगंड... गिल्ट’ मनात अजिबात बाळगू नये. ‘बरा कुणबी केलो...’ या वचनाची आठवण ठेवत दंभाच्या विरोधात उभे राहावे. त्यासाठी गौतम बुद्ध-अशोक-ज्ञानेश्वर-तुकाराम-फुले-शिंदे-शाहू-सयाजीराव-गांधी-आंबेडकर-साने गुरुजी-शरद् पाटील अशी ही देदीप्यमान विचारपरंपरा समोर ठेवावी.”
‘गांधी आणि भाऊराव’ या लेखात महात्मा गांधी आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोहोंच्या शिक्षणविषयक विचारांत असलेल्या साम्याची ओळख करून दिली आहे. महात्मा गांधी यांच्या ‘नयी तालीम’ची तत्त्वं कोणती होती, भाऊरावांवर कोणकोणत्या महनीय व्यक्तींचा प्रभाव होता, हे धसकटे सुरुवातीला सविस्तर सांगतात. त्यांच्यावर गांधींच्या विचार आणि व्यक्तित्वाचा प्रभाव पडलेला होता. पण गांधींनी ‘नयी तालीम’ची मांडणी केली त्याच्या १७ वर्षे आधीच भाऊरावांनी या ‘नयी तालीम’चे बुनियादी प्रात्यक्षिक सांगली-सातारा जिल्ह्यांच्या खेड्यापाड्यांत प्रत्यक्षात करायला सुरुवात केली होती, या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक सत्याची नोंद धसकटे करतात.
स्वतः गांधीच भाऊरावांच्या शिक्षणविषयक कार्यानं प्रभावित होऊन त्यांना एकदा म्हणाले होते, की “जे साबरमती आश्रमात मला शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलंत.” भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला सुरुवात करताना कोणती ध्येयं मनात ठेवली होती, या संस्थेचा उपयोग व्यक्तिगत लाभ मिळवण्यासाठी न करता सेवाकार्य करण्यासाठी कसा करून घेता येईल, यासाठी त्यांनी कोणती धोरणं आखली, या सगळ्याची धसकटे चर्चा करतात.
आणि या उदात्त, देदीप्यमान विचार आणि आचार यांच्या पार्श्वभूमीवर सद्यकाळातील शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शैक्षणिक धोरणं आणि त्यांची अंमलबजावणी, यांबाबत असलेली गोंधळसदृश स्थिती, शिक्षण क्षेत्र भांडवलदारी आणि बाजारी व्यवस्थेच्या दावणीला बांधल्यामुळे शिक्षणाच्या कक्षेतून बाहेर फेकल्या गेलेल्या गोरगरीब जनतेच्या जगण्यावर होणारे त्याचे परिणाम यांचाही आढावा घेतलेला आहे.
या विभागातील इतर चार लेख हे व्यक्तिविषयक आहेत. ‘शतकावर ठसा उमटवणारा लेखक’ हा लेख भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अभ्यासपूर्वक आढावा घेणारा आहे. नेमाडे यांच्या कादंबऱ्या, कविता, समीक्षा लेखन, देशीवाद, त्यांची साहित्य संमेलनाविषयीची भूमिका, ग्रामीण व दलित साहित्याबद्दलची परखड मतं, साने गुरुजींचं मोठेपण यांची निःपक्षपातीपणे, सविस्तर, मर्मज्ञपणे चर्चा केली आहे. त्यांच्या समीक्षा लेखनातील अवतरणं देऊन त्यांची विधानं वाचकाला ‘न्यूनगंड न देता विचारप्रवृत्त करतात’ असं धसकटे लिहितात. नेमाडे हे जातीच्या प्रश्नाकडे ‘अस्मिते’च्या अंगानं न पाहता ‘उत्पादनपद्धती’च्या अंगानं पाहतात आणि ‘परंपरा आणि देशी आधुनिकता’ यांचा आत्मविश्वासपूर्वक योग्य मेळ घालतात, असे निष्कर्ष धसकटे आपल्या विवेचनाअंती काढतात.
नेमाडे यांच्या मराठी साहित्यातील कामगिरीचा मराठी समाज आणि लेखक यांच्यावर पडलेला प्रभाव कशा पद्धतीचा होता हे सांगताना धसकटे लिहितात, “तरुण लेखकांना नेमाडे यांनी एका निश्चित वेगळ्या वाङ्मयीन परंपरेचे भान दिले, एक मूल्यदृष्टी दिली. ...मराठी समाजाला मूल्यविवेक देणारे व नव-दिशादिग्दर्शन करणारे लेखन केलं. ...त्यांनी गेली ५०-६० वर्षे फुटकळ गोष्टींच्या जंजाळात न अडकता तटस्थपणे आपले योगदान दिले आहे. त्यामागे संयम, बांधिलकी, निष्ठा, वैचारिक स्पष्टता, अभ्यास व अपार कष्ट आहेत.”
नेमाडे यांच्या साहित्याची भाषिक अंगानं केलेली चिकित्सा हेदेखील या लेखाचं एक वैशिष्ट्य आहे. “चक्रधर-तुकोबा-फुले यांच्या भाषेचा जिवंत खरा भाषिक त्रिवेणी संगम नंतरच्या काळात जर कुठे झालेला असेल तर नेमाडे यांच्या साहित्यात-लेखनात,” हे त्यांचं विधान निश्चितच मननीय आहे. हा लेख ज्या वर्षी पहिल्यांदा लिहिला गेला (२०१३) तेव्हा नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नव्हता. त्यामुळे तेव्हा ‘हा पुरस्कार त्यांना मिळायला हवा’ अशा आशयाची वाक्यं लिहिली गेली असतील. पण हा लेख ग्रंथबद्ध करताना कुठेतरी अमुक साली नेमाडे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला, अशी टिप देणं गरजेचं होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अभ्यासक-समीक्षक डॉ. अनिकेत जावरे यांच्या निधनानंतर लिहिलेला ‘प्रस्फुट’ हा लेख त्यांच्या लेखकीय कारकिर्दीसोबतच त्यांच्या व्यक्तित्वातील महत्त्वाच्या पैलूंवरही भाष्य करतो. धसकटे यांना मराठी समीक्षा व साहित्यव्यवहारातील पाच समीक्षक-अभ्यासक यांच्या ‘विचारमांडण्या’ उल्लेखनीय वाटतात. त्यांना भालचंद्र नेमाडे, शरद पाटील, रा. ग. जाधव, अशोक बाबर यांच्यासोबत अनिकेत जावरे यांचं या क्षेत्रातील योगदान पायाभूत स्वरूपाचं वाटतं. अनिकेत जावरे यांची ‘पाश्चात्त्य साहित्यविचारांचं सूत्र पकडून मराठीतील लेखनाचा नव्या दृष्टिकोनातून काही अर्थ उलगडून दाखवणारी’ मांडणी त्यांना महत्त्वपूर्ण वाटते.
जावरे यांच्या लेखनातील विचारव्यूह, बारकावे, सूक्ष्म जागा, त्याचे तत्कालीन समीक्षा-वैचारिक प्रांतातील लेखनाच्या पार्श्वभूमीवर असलेलं वेगळेपण धसकटे अचूकपणे नोंदवतात. जावरे यांच्या लेखनाविषयी तज्ज्ञ व्यक्तींची असलेली मतंदेखील सांगतात. त्यांचं अभ्यासू, सहृदय, ऋजू, कुठल्याही पदांची अभिलाषा न धरणारं निगर्वी व्यक्तिमत्त्व धसकटे उलगडून दाखवतात. त्यांचं ‘काळे पांढरे अस्फुट लेख’ हे पुस्तक ज्या वेळी धसकटे यांनी छापायचं ठरवलं, त्या वेळी जावरे यांच्याकडून प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येत होत्या, ते लिहिलं आहे. त्यांतून जावरे यांच्या व्यक्तिमत्त्वातील व्यासंगी बाजू प्रकाशात येते, तसंच त्यांची प्रसिद्धीपराड्मुख वृत्तीही उजागर होते.
या संदर्भात धसकटे यांनी जावरे यांची आपल्या अभ्यासू वृत्तीबाबत दिलेली प्रतिक्रिया नव्या लेखकांनी जाणून घेणं नक्कीच फायद्याचं ठरेल. जावरे म्हणतात, “एक लेखक किंवा अभ्यासक म्हणून आपला फोकस नेहमी संबंधित अभ्यासविषयावर असला पाहिजे. ह्या गोष्टी (प्रसिद्धी, पुरस्कार) आपल्याला आपल्या अभ्युपगमापासून दूर घेऊन जातात. आपले लक्ष विचलित करतात. आपल्या लक्ष्याचा विचार करता त्यात न अडकणे, हेच श्रेयस्कर.”
‘सत्यशोधक आदिवासी कादंबरीकार : नजूबाई’ हा लेख नजूबाई गावित या आदिवासी स्त्री लेखिकेच्या साहित्य आणि जगण्याची चर्चा करणारा आहे. धसकटे सुरुवातीला आदिवासी समाज-संस्कृती यांबाबत विस्तारानं माहिती देतात. या समाजातील काही लेखकांच्या योगदानाचा यथोचित उल्लेख करतात. नंतर मराठीतील उच्चवर्णीय लेखिकांच्या लेखन आणि जगणं यांतील कृतकता, पोकळपणा यांवर कठोर शब्दांत टीका करतात. आणि या पार्श्वभूमीवर नजूबाई गावित यांचं लेखन कुठे आणि कोणती मूल्यं घेऊन उभं आहे याची सांगोपांग चर्चा करतात.
धसकटे लिहितात, “मराठीला अपरिचित असे भावविश्व-अनुभवविश्व नजूबाईंच्या लेखनातून येते. शिवाय कुठेही दिखाऊपणा नाही. जे आहे ते नितळ. अल्पशिक्षित असल्या तरी पुस्तक करताना तीन-तीन, चार-चार वेळा त्याचे पुनर्लेखन केल्याशिवाय पुस्तक छापायची घाई करत नाहीत.” नजूबाईंचं लढाऊ, प्रामाणिक कार्यकर्ती असं व्यक्तिमत्त्वही या लेखातून समोर येतं. या लेखिकेची मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी हवी तशी दखल घेतली नाही, अशी खंतही धसकटे व्यक्त करतात. या लेखाच्या शेवटी त्यांनी केलेलं विधान मात्र काही अंशी टोकाचं वाटतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी दिलेल्या नावांव्यतिरिक्तही अनेक चांगल्या लेखिका मराठी साहित्यात आपलं योगदान देऊन गेल्या आहेत, तसंच अनेक लेखिका आजही चांगलं लेखन करत आहेत.
अनिल अवचट यांच्या लेखन आणि व्यक्तित्व यांतल्या खुबी ‘उपेक्षित विषयांना समाजमनाच्या...’ या लेखात नोंदल्या आहेत. ‘‘त्यांचं सबंध लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित आणि बहुजन माणसांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं, धडपडणारं एका ‘सच्च्या’ कार्यकर्त्याचं मन आहे,” या एका वाक्यात अवचट यांच्या साहित्याचं मोल धसकटे सांगून जातात.
दुसऱ्या ‘भाषण’ या विभागातील ‘बुद्ध-गांधी विचारांतूनच जगण्याची दिशा सापडेल’ हा लेख म्हणजे धसकटे यांनी २०१८ साली १०व्या शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केलेलं भाषण आहे. या भाषणातून त्यांची लेखक म्हणून असलेली भूमिका फार स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. ते कोणत्या विचारपरंपरेला समाजाच्या उत्थानासाठी पथदर्शक मानतात, हे त्यांनी केलेल्या या उदबोधक आणि विचारपरिप्लुत अशा या भाषणातून उजागर होतं. त्यांना शाहू-फुले-विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबरच भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे विचारही आजच्या हिंस्र, क्रूर, भेदाभेदांनी भरलेल्या काळात चिरकाल शांतता नांदण्यासाठी आवश्यक वाटतात. यासाठी ते फुले-आंबेडकरी विचारप्रवाहांचा आढावा घेऊन त्यांतील आताच्या काळाला जरुरीच्या त्या गोष्टी स्वीकारण्यासोबतच काही गोष्टींची नव्यानं भर घालायला हवी, हे सांगतात.
ते लिहितात, “...आपल्या भूतकालीन सामाजिक-ऐतिहासिक-सांस्कृतिक वारशाचं नीट वाचन केल्याशिवाय वर्तमानात काय चाललंय आणि भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची नीट उकल होत नाही.” ते साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय भाषण करत असले तरी त्यांना साहित्यापेक्षाही आपल्या अवतीभवतीची जी सामाजिक स्थितीगती आहे तिच्याविषयी बोलणं जास्त सयुक्तिक वाटतं. यासंदर्भात ते स्पष्ट शब्दांत लिहितात, “...साहित्य म्हणजे घरात बसून लिहिणं आणि छापून आल्यावर लेखकराव होऊन त्याचा आपणच गवगवा पिटणं इतक्या संकुचित अर्थाने मला अभिप्रेत नाही. ...एक लेखक म्हणून स्वतःच्या लेखकीय कीर्तीचे गोडवे गाण्यापेक्षा किंवा लेखनाकडे करिअरिस्ट वृत्तीनं पाहण्यापेक्षाही समाजाशी असलेली बांधिलकी योग्य व निष्ठापूर्वक पद्धतीनं निभावणं हीच मला माझी लेखक म्हणूनची जबाबदारी महत्त्वाची वाटते.”
हे त्यांचे विचार नव्या संपर्क माध्यमांच्या प्रेमात पडून आत्मस्तुतीचे सोहळे सजवणाऱ्या सगळ्या लेखकांनी मनन करावेत, त्यामागची तळमळ समजावून घेऊन आपल्या भूमिकांत बदल करावेत, असे आहेत. ते रोजच्या जगण्यातील रूपकं वापरून आजच्या काळातील गुंते समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वानगीदाखल, आजच्या आभासी वास्तवात रमणाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्वतःतच मश्गूल असणाऱ्या वा त्या पद्धतीनं जगायला लावणाऱ्या समाज व्यवस्थेविषयी ते काय लिहितात पहा - “...अशा स्थितीत याला 'आधार' लिंक करा, त्याला ‘आधार’ लिंक करा, असं सरकारी पातळीवरून चाललेलं आहे. पण जिथं माणूसच माणसाला ‘लिंक’ राहणार नाही, याची सूक्ष्म काळजी घेतली जात आहे, तिथं याला लिंक करा त्याला लिंक करा अशा गोष्टींनी काय साध्य होणार?”
‘प्रकाशकीय’ या विभागात धसकटे यांनी आपल्या हर्मिस या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांना लिहिलेल्या प्रकाशकीय लेखांचा समावेश करण्यात आला आहे. सोबत मराठी प्रकाशन व्यवसायाच्या स्थितीगतीचा थोडक्यात आढावा घेणारा ‘जबाबदारीचा सांस्कृतिक व्यवसाय’ हा लेखही या विभागात आहे. धसकटे यांनी ‘लढता लढता केलेल्या चिंतनातील काही’ (विलास सोनवणे), ‘खिंडीत’ (निम्बाकृष्ण ठाकरे), ‘साने गुरुजी जीवन परिचय’ (यदुनाथ थत्ते) या तीन पुस्तकांत प्रकाशक म्हणून लिहिलेले या पुस्तकात समाविष्ट असलेले लेख, हे केवळ त्या पुस्तकांच्या आशय-विषयांची चर्चा करण्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांनी या पुस्तकांच्या लेखकांच्या व्यक्तित्वातील अनुकरणीय ठराव्यात, अशा पैलूंविषयी विस्तारानं लिहिलं आहे.
विलास सोनवणे यांच्या विचारांची चिकित्सा करण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तित्वातील विरोधकांची बाजू समजून घेणारी परमतसहिष्णुता आणि समान विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना त्यांची वाढ करायला आवश्यक तो अवकाश उपलब्ध करून देण्यातील स्वागतशीलता धसकटे आवर्जून नोंदवतात. निम्बाकृष्ण ठाकरे यांच्या साहित्याविषयी लिहिताना त्यांच्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तित्वाचा परिचय करून द्यायला ते विसरत नाहीत. या लेखात ते ठाकरे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठासाठी पाठराखणीचा मजकूर लिहिणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांची एक आठवण नोंदवतात. ती लिहिणाऱ्यांसाठी प्रेरक ठरावी अशी आहे. ते लिहितात, “आठ-दहा ओळींचा ब्लर्बचा मजकूर लिहिण्यासाठी नेमाडे सरांनी तब्बल आठेक पाने लिहिली होती. मग मजकूर कमी करत, आटवत आटवत शेवटी साररूपी दहा ओळी अंतिम केल्या. आठ-दहा ओळींसाठी त्यांनी घेतलेले हे कष्ट लिहिणाऱ्या मंडळींसाठी निश्चितच बोधप्रद आहेत.” यदुनाथ थत्ते यांच्या पुस्तकाविषयी लिहिताना त्या पुस्तकाची आजच्या काळातील प्रस्तुतता जशी ते विशद करतात, तसंच ते साने गुरुजी, यदुनाथ थत्ते यांच्या निरलस, निःस्वार्थी व्यक्तिमत्वाविषयीही टिप्पणी करतात.
त्यांची प्रकाशक म्हणून झालेली घडण आणि आजच्या प्रकाशन व्यवसायाविषयी असलेली त्यांची परखड मतं ‘जबाबदारीचा सांस्कृतिक व्यवसाय’ या लेखात व्यक्त झाली आहेत. या क्षेत्रातील तद्दन धंदेवाईक प्रकाशकांची आणि ते काढत असलेल्या रद्दी पुस्तकांची झाडाझडती जसे ते घेतात, तसेच पुस्तकातील आशय, पुस्तकाचा आकार, मजकुराची मांडणी यांबाबत प्रयोगशील असणाऱ्या प्रकाशकांचं कौतुकही करतात. मुंबई-पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या प्रकाशकांच्या कार्याचीही आवर्जून नोंद करतात. पुस्तक विकत घेणाऱ्याकडे केवळ ‘ग्राहक’ म्हणून न पाहता ‘वाचक’ म्हणून पाहण्याकडे त्यांचा आग्रह आहे. ‘ग्राहक’ आणि ‘वाचक’ यांतला मूल्यात्मक फरक ते समजावून सांगतात. तसेच स्वतःचा प्रकाशन व्यवसाय ‘दर्जा, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्हता’ या त्रिसूत्रीवर अवलंबून पुढे नेण्याचा संकल्प असल्याचं नमूद करतात.
‘पुस्तकांबद्दल’ या विभागात ‘गांधीजी’ (पु. ल. देशपांडे), ‘विचारशलाका’ (रा. ना. चव्हाण), ‘ब बळीचा’ (राजन गवस), ‘झडझिंबड’ (कृष्णात खोत) या चार पुस्तकांची समीक्षा करणारे विस्तृत, अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे यांनी गांधींचं चरित्र गांधीजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांची साध्यासरळ भाषेत वर्णनं करून कसं सिद्ध केलं आहे, हे धसकटे ‘गांधीजी : पु. ल. देशपांडे यांच्या नजरेतून’ या लेखात उदाहरणं देऊन नमूद करतात. ‘‘पुलंची विनोदबुद्धी किंवा त्यांचा दृष्टीकोन या लेखनात कुठेही डोकावत नाही, गांधींचे विचार आणि कार्य यांची साधार वस्तुनिष्ठ ओळख तटस्थपणे करून देण्यात ते यशस्वी ठरलेत” अशी प्रशंसा ते या लेखात करतात.
ते ‘रा. ना. चव्हाण यांची विचारशलाका’ या लेखात पुस्तकाविषयी तर लिहितातच, पण ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातील ‘ॲकेडमिक’ असलेले आणि नसलेले या दोहोंकडे पाहण्याचा बुद्धिजीवी, विद्यापीठं, सामाजिक संस्था आदींचा दृष्टीकोन कसा निरनिराळा आहे याची सोदाहरण मांडणी करतात.
‘ब बळीचा’ आणि ‘झडझिंबड’ या दोन्ही कादंबऱ्यांत ग्रामजीवन हा समान दुवा आहे. दोन्ही कादंबऱ्यांचा आशय, रूपबंध अर्थातच भिन्न आहे. धसकटे या दोन्ही कादंबऱ्यांवर लिहिताना आवश्यक तो कथानकाचा भाग सांगतातच, सोबत त्यातली मर्मस्थळंही उलगडून दाखवतात. शेतीशी संबंधित राजकारण, अर्थकारण, सहकार चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी व संघटना या सगळ्यांचा साकल्यानं आढावा ‘ब बळीचा’ या कादंबरीत कसा घेतला गेला आहे, ते धसकटे सांगतात आणि कादंबरीतील अनेक अवतरणं देऊन तिच्या चिंतनशील असण्याकडे निर्देश करतात.
‘झडझिंबड’ या कादंबरीच्या भाषेवर लिहिताना त्यांनी तिच्यातील म्हणी, वाक्प्रचार, वैशिष्ट्यपूर्ण चिंतनशील वाक्यं यांची जंत्रीच सादर केली आहे. या कादंबरीत अपरिमित कोसळणारा पाऊस हा कशाचा परिणाम आहे, हे सांगताना ते पर्यावरणाच्या ढासळत चाललेल्या समतोलाकडे बोट दाखवतात. ग्रामीण भागातील मानवी सहजीवनाचं मनोरम दर्शन या कादंबरीत कसं घडतं, हे सांगतात. माणसांतल्या निरनिराळ्या वृत्ती-प्रवृत्तींचं दर्शन किती समर्थपणे या कादंबरीत घडवलेलं आहे, ते तीमधील घटनांचा संदर्भ देत स्पष्ट करतात. एकुणात, त्यांनी दोन्ही कादंबऱ्यांचा सखोल अभ्यास करून समाजशास्त्रीयदृष्ट्या अन्वयार्थ लावला आहे, असं म्हणता येईल.
‘रोजनिशीतील नोंदी’ या विभागात एम.ए. करत असताना भाषेच्या अंगानं केलेला विचार, त्यांना आलेले अनुभव, त्यांनी ‘भाषासुधारणेसाठी केलेला खटाटोप’, त्यासाठी वाचलेली पुस्तकं या सगळ्याची त्या त्या वेळी रोजनिशीत केलेली नोंद समाविष्ट करण्यात आली आहे. यात मराठवाडी बोली भाषेतील म्हणी, आता लुप्त होण्याची शक्यता असलेले वेगवेगळे शब्द या रोजनिशीत टिपले आहेत. या लेखनातून त्यांचं बोलीभाषेवरचं प्रेम आणि ती जपण्याची तळमळ दिसून येते. प्रमाण भाषेच्या अट्टाहासातून येणाऱ्या न्यूनगंडावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात कशी विकसत जाते, हेदेखील यातून दिसतं.
‘लेखन-वाचनाच्या क्षेत्रात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद वा द्वेषभावना असू नये’ (‘मनोगत’) असं मानणाऱ्या धसकटे यांनी कुणाचीही पत्रास न बाळगता, वैचारिक गटबाजीच्या क्षुद्र राजकारणाला बळी न पडता सत्याचा एखादा अंश तरी उजेडात आणता यावा आणि परिवर्तनाचं चक्र गतिमान करण्यात थोडा फार तरी हातभार लावता यावा, अशी प्रामाणिक आकांक्षा बाळगून हे लेखन केलेलं आहे. त्या त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करून मगच त्याविषयी भाष्य केलेलं आहे, हे लेखन वाचत असताना जाणवतं. त्यांच्या या प्रामाणिक तळमळीला वाचकांनी प्रतिसाद द्यायला हवा, असं वाटतं.
‘जे आहे ते’ – सुशील धसकटे
अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे
पाने – १९४
मूल्य – २३० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.
vikas_palve@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ishwar halgare
Thu , 07 July 2022
'जे आहे ते' या ग्रंथाने सुशील धसकटे यांनी लेखक म्हणून जोहार नंतरचे दमदार पाऊल टाकले आहे. जोहार मधून धसकटे यांनी सामाजिक स्थिती गतीवर नेमक भाष्य करत आपले वैचारिक चिंतन मांडलेले आहे. तसं जे आहे ते मधून त्यांनी आपल्या लेखनाचा पुढचा टप्पा गाठलेला आहे. एवढं साधं सरळ व्यक्त होत सामाजिक प्रश्नावर टोकदार भाष्य करणे निश्चितच कसरतीचे आहे. जे आहे ते हा सर्वांगाने जुळून आलेला एक अप्रतिम ग्रंथ आहे. या ग्रंथावर विकास पालवे सरांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीने आस्वादपूर्ण भाष्य केलेले आहे, तेही महत्त्वाचे आहे ।।