अजूनकाही
‘राजहंस प्रकाशना’ला नुकतीच ७० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने नव्याकोऱ्या लेखनाला चालना मिळावी, यासाठी या दोन स्पर्धा…
१) रहस्य-सन्मान कादंबरी स्पर्धा
दर्जेदार, रंजक रहस्यकादंबऱ्या अलीकडे मराठीत क्वचितच वाचायला मिळतात, अशी खंत खूप वाचक व्यक्त करतात. यावर उपाय? ताज्या दमाच्या प्रतिभावंत लेखकांना प्रोत्साहन द्यायला हवं. त्यासाठीच ‘राजहंस’ची ही रहस्य-सन्मान कादंबरी स्पर्धा! कै. बाबुराव अर्नाळकर आणि कै. गुरुनाथ नाईक हे मराठी वाचकांचे दोन आवडते लेखक होते. या स्पर्धेतल्या विजेत्याला या दोघांच्या नावाचं स्मृती-सन्मानचिन्ह आणि रु. २० हजारांचं पारितोषिक देण्यात येईल. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. १५ व १२ हजार रुपयांची पारितोषिकं दिली जातील. विषयाचं/काळाचं बंधन नाही. पण कादंबऱ्या स्वतंत्र प्रतिभेनं लिहिलेल्या असाव्यात. शब्दमर्यादा किमान ३०,००० आणि कमाल ५०,०००! स्पर्धेला प्रवेशमूल्य नाही. मात्र काही अटी-नियम आहेत. लेखण्या सरसावा आणि व्हा तयार रहस्यातून वाचकांचं रंजन करायला...
२) कुमार-विज्ञान कादंबरी स्पर्धा
विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या आणि आधुनिक जगाशी घट्ट नातं सांगणाऱ्या ललित लेखनाची मराठीमध्ये थोडी उणीव जाणवते आणि १० ते १५ वयोगटातल्या कुमार वाचकांसाठी तर असं ललित साहित्य फारच थोडं आहे, अशी तक्रार नेहमीच कानी येते. याच्यावर तोडगा म्हणून ‘राजहंस’च्या सत्तरीनिमित्त ही दुसरी स्पर्धा....
कादंबरीची शब्दमर्यादा किमान २५ हजार ते कमाल ४० हजार शब्द. स्वतंत्र लेखनच हवं. अनुवाद किंवा आधारित/रूपांतरित लेखन नको. माहिती तंत्रज्ञान (आय.टी.), जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी), वाहन निर्मिती क्षेत्रातलं नवतंत्रज्ञान... अनेक क्षेत्रांचं रंगरूप पालटणारं हे तंत्रज्ञान. त्याला काही वेगळे, ललित, काहीसे अदभुत, रंजक पैलूही असतील का? माहितीची प्रचंड भूक असणाऱ्या कुमार वाचकांना आकर्षण वाटेल, असं काही त्यातून निघेल का? अवकाशातल्या भराऱ्या त्यांना मोहून टाकतायत. नव्या पिढीचे नायक-नायिकासुद्धा आता बदलतायत. त्यांची दखल मराठी कादंबरीला घेता येईल का? आपण निर्माण करू शकू का आपल्या मातीतले सुपर-हिरोज?
हे सारे प्रश्न आणि असे आणखीही प्रश्न ज्यांच्या सर्जनक्षमतेला आव्हान देतात, अशा ताज्या दमाच्या आणि मनानं तरुण असणाऱ्या कादंबरी लेखकांनी बाह्या सरसावाव्यात आणि या अशा प्रश्नांना भिडावं. आम्हाला तुमच्याकडून हव्यात छोट्या कादंबऱ्या. आणि आमच्याकडून तुम्हाला मिळू शकतील पारितोषिकं आणि प्रसिद्धी. ‘राजहंस’च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयानुसार पहिल्या तीन क्रमांकांच्या कादंबऱ्यांना अनुक्रमे रुपये २० हजार, १५ हजार आणि १२ हजार रुपयांची बक्षिसं दिली जातील आणि त्या कादंबऱ्या ‘राजहंस प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध केल्या जातील.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दोन्ही स्पर्धांसाठी नियमावली
- कादंबरी ही लेखकाची स्वतंत्र रचना हवी. अनुवाद चालणार नाही. स्वभाषेतील इतर लेखकांच्या अथवा परकीय भाषांमधील कथा-कल्पनांची उचल किंवा नक्कल चालणार नाही. तसे आढळून आल्यास स्पर्धकांचा सहभाग अथवा पारितोषिक रद्द केले जाऊ शकते, याची कृपया नोंद घ्यावी.
- नवे लेखक शोधणे व त्यांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे स्पर्धकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी रुपये २० हजार, १५ हजार व १२ हजारांची पारितोषिके दिली जातील. रहस्य-सन्मान कादंबरी स्पर्धेतील विजेत्याला रोख रकमेखेरीज ‘बाबुराव अर्नाळकर-गुरुनाथ नाईक स्मृती-सन्मानचिन्ह’ दिले जाईल.
- स्पर्धकांनी आपल्या कादंबऱ्या rajhans.spardha@gmail.com या ई-मेलवर दिनांक १५ सप्टेंबर २०२२पर्यंत पाठवाव्यात. ज्यांना हार्ड कॉपी देणे अधिक सोयीचे असेल, त्यांनी त्या पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवाव्यात. या स्थितीत मूळ प्रत लेखकाने स्वत:कडे ठेवून छायाप्रत (फोटोकॉपी) पाठवावी. अंतिम मुदतीपर्यंत आलेल्या कादंबऱ्याच पारितोषिकांसाठी विचारात घेतल्या जातील.
- सुयोग्य गुणवत्ताप्राप्त कादंबऱ्या स्पर्धेत आल्या, तरच वरील पारितोषिके दिली जातील. याबाबतीत ‘राजहंस’च्या परीक्षक समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. या निर्णयाची कारणे स्पर्धकांना देणे बंधनकारक नाही, व शक्यही नाही. यासंबंधी स्पर्धकांशी स्वतंत्र पत्रव्यवहार शक्य होणार नाही.
- पारितोषिकविजेत्या कादंबऱ्यांच्या पहिल्या मुद्रित आवृत्त्या, ई-बुक व ऑडिओ बुक प्रकाशित करण्याचे सर्व हक्क राजहंस प्रकाशनाकडे राहतील.
- स्पर्धेसाठी पाठवण्याच्या कादंबऱ्या युनिकोडमध्ये टाईप करून पीडीएफ फाईलमध्ये पाठवाव्यात. १४ फॉन्ट साईज वापरावा. डीटीपी केलेल्या संहिता चालतील. हस्तलिखित संहिता विचारात घेता येणार नाही.
- आपल्या कादंबरीसोबतच्या कव्हरिंग लेटर अथवा ई-मेलमध्ये खालील सुस्पष्ट उल्लेख आवश्यक आहे – “मी स्पर्धेसाठी पाठवीत असलेली कादंबरी ही माझी स्वत:ची स्वतंत्र रचना आहे. ती स्वभाषेतील अथवा कोणत्याही परभाषेतील कथा-कादंबरीवरून घेतलेली अथवा अनुवादित केलेली नाही. या कादंबरीत वाङ्मयचौर्य आढळल्यास त्याची व परिणामांची जबाबदारी लेखक म्हणून सर्वस्वी माझी राहील.”
- स्पर्धेसाठी कादंबऱ्या पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२२ राहील. स्पर्धेचा निकाल ३० नोव्हेंबर २०२२पर्यंत जाहीर केला जाईल. पारितोषिकपात्र संहिता योग्य त्या स्वरूपात राजहंस प्रकाशनातर्फे जून २०२३अखेर प्रकाशित केल्या जातील.
- स्पर्धेच्या स्वरूपात अथवा नियमावलीत आवश्यक ते बदल करण्याचे व स्पर्धेसंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार संचालक, राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे यांच्याकडे सुरक्षित राहतील. मूळ आणि/अथवा सुधारित नियम व अटी सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहतील.
- स्पर्धा फक्त मराठी भाषेतील लेखनासाठी खुली राहील. १६ वर्षे व त्यावरील मराठी जाणणाऱ्या सर्व व्यक्तींना स्पर्धांत सहभागी होता येईल. एका स्पर्धकाला दोन्ही स्पर्धांत सहभागी होण्याची मुभा राहील. स्पर्धकाला एकाहून अधिक साहित्यकृतीही पाठवता येतील.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment