अजूनकाही
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय कुणाचा होता? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा? मोदी-शहा माउंट अबूमध्ये ‘समर हॉलिडे’ साजरा करत होते का मग? नड्डा यांचा निर्णय, नड्डा यांचा निर्णय, अशा प्रकारे गाजावाजा केला जातो आहे, जणू काही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पहिल्यांदाच कुठला निर्णय घेतलाय. कुणी हे सांगू शकेल का, की याआधी कधी नड्डा यांनी कुणाला मुख्यमंत्री वा उप-मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला? देवेंद्र फडणवीस यांना उप-मुख्यमंत्री करणं हा नड्डा यांचा स्वतंत्र निर्णय होता? त्यामागे मोदी-शहा यांचा आदेश नव्हता?
विद्यमान काळात भाजपचं प्रत्येक काम मोदींच्या नावावर होतं. वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या दैनंदिन निर्णयांचं श्रेयही माननीय पंतप्रधान मोदी यांचं कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शन यालाच देतात. मोदी यांचा निर्णय असता तर, असं म्हटलं गेलं असतं की, देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचा आदेश मोकळ्या मनानं स्वीकारलाय. फडणवीस यांच्याकडून असं म्हणण्याचं सुख आणि सौभाग्यही हिरावून घेतलं गेलं की, मोदींसारख्या महान नेत्याच्या आदेशानुसार ते दुसऱ्या पक्षातल्या फुटीर नेत्याचेही ‘उप-मुख्यमंत्री’ बनू शकतात. पण ते हे विचारणार नाहीत की, भाजपकडे १०६ आमदार असताना शिंदे यांना का मुख्यमंत्री केलं गेलं?
मी या निर्णयाकडे कुणाच्या अपमानाच्या रूपात पाहत नाही, पण यातून भाजप काय सांगू पाहतोय? भाजपने आधी हे ठरवावं की, उप-मुख्यमंत्रीपद हाही सन्मान असल्याचं सांगून फडणवीस यांचा अपमान करायचा आहे की, जे. पी. नड्डा यांचा? यातून नड्डा यांना चेष्टेचा विषय बनवलं जात नाहीये का, की ते कमीत कमी उप-मुख्यमंत्री करण्याचा तरी निर्णय घेऊ लागले आहेत. भाजप हे सांगू पाहतोय का, की ‘अभिनंदन! जे. पी. नड्डा यांनी निर्णय घेतला!’
१०६ आमदार असलेल्या भाजपने मुख्यमंत्रीपद अशा गटाला दिलं, ज्याच्याकडे पाच-पन्नास आमदार असल्याचा दावा आहे. सध्या हा एक गट याच अवस्थेत आहे. तो शिवसेना असल्याचा दावा करत आहे, पण मूळ शिवसेना आहे की नाही, याचा निर्णय अजून झालेला नाही. आमदार पक्षाचा एक भाग असतात, ते म्हणजे पक्ष नसतो. उद्या भाजपचे प्रवक्ते आणि मोदी सरकारचे मंत्री असं सांगायलाही कमी करणार नाहीत की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांचाच होता, मोदी-शहा यांचा नव्हता! जर सरकार बनवणं आणि शिंदे यांना मुख्यमंत्री करणं, इथपर्यंतचा निर्णय मोदी-शहा यांचा असेल तर, मग यातून जे. पी. नड्डा यांचंही एकप्रकारे ‘उप-मुख्यमंत्रीकरण’ होतं. भाजपने एखाद्याची ‘पात्रता’ सांगण्यासाठी एक राजकीय हत्यार बनवलं आहे, याला मी ‘उप-मुख्यमंत्रीकरण’ म्हणतो. त्यानुसार हेही स्पष्ट होतं की, मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जे. पी. नड्डा घेत नाहीत, पण उप-मुख्यमंत्री करण्याचा मात्र घेतात.
आता देवेंद्र फडणवीस किती महान आहेत, असं मोदी सरकारचे मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते सांगत आहेत. त्याचबरोबर भाजपमध्ये पक्षाच्या पुढे असलेल्या व्यक्तीला मागे ठेवलं जातं हेही. शपथ घेण्याआधी फडणवीस उप-मुख्यमंत्री होत असल्याच्या आनंदाचे पेढे खात होते की, त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केलं म्हणून भाजपचे नेते त्यांना पेढे भरवत होते? इथं हे लक्षात घ्यायला हवं की, हा त्याग फडणवीस यांना आपल्या पक्षाच्या कुठल्या नव्या नेत्यासाठी केलेला नाही, तर ज्यांचा पक्षच अजून ठरलेला नाही अशा एकनाथ शिंदे यांच्यासाठी केलेला आहे. मग गोदी मीडिया कुणाशी बोलून देवेंद्र हेच महाराष्ट्राचे नरेंद्र आहेत, असा जलसा का करत होता? त्यांना कोण चुकीची माहिती देत होतं?
या सगळ्या गदारोळात आता भाजपने शिंदे यांना महान नेता म्हणायला सुरुवात करू नये. आणि हा प्रश्न निकालात काढू नये की, पक्षांतर करण्याआधी फाइव्ह स्टार हॉटेल, चार्टेड विमान यांवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये भाजपने दिले की, शिंदे यांनी स्वत:च्या खिशातून? भाजपने दिले असतील तर ते रहस्यमय इलेक्टोरल बाँडद्वारे मिळालेल्या हजारो कोटी रुपयांच्या फंडातून खर्च केले का? ज्या साधनांचा वापर करून शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, ती साधनं त्यांच्यासारखीच महान आणि नैतिक आहेत का?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. .................................................................................................................................................................
मोदी सरकारचे मंत्री आणि भाजपचे प्रवक्ता कुठलाही दावा करू शकतात. ते उद्या असं सांगायलाही कमी करणार नाहीत की, शिंदे हे पक्षांतरासारखं राष्ट्रीय कर्तव्य निभावणारे अव्वल सैनिक आहेत. त्यामुळे असं सौभाग्य गमावणं चांगलं लक्षण नाही. हे सौभाग्य मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या पायाशी बसून, उप-मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राची सेवा करायची. कमाल आहे, मुख्यमंत्री बनण्याची संधी एकनाथ शिंदे यांना आणि महान बनण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांना?
(देवेंद्र फडणवीस यांनी हा लेख वाचला तर तेही रडता-रडता हसायला लागतील.) जर मग तसं असेल तर हा महानतेचा भाव फडणवीस यांच्यामध्ये स्वत:हून का निर्माण झाला नाही? त्यांना स्वत:हून नड्डा यांना सांगता आलं असतं की, मी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या महान नेत्याचा उप-मुख्यमंत्री होऊन काम करू इच्छितो. जे शिंदे अजून भाजपचे झालेले नाहीत, त्यांच्यासमोर फडणवीस यांना उप-मुख्यमंत्री करून भाजप हे सांगू पाहतोय की, फडणवीस फक्त पक्षाचे आहेत. त्यांच्यामध्ये कुठलीही महत्त्वाकांक्षा किंवा पेढे खाण्याची इच्छा नाही. हा इतकाच महान निर्णय असेल तर गोदी मीडियाचे अँकर आणि पत्रकार इतके नाराज का झाले?
क्रिकेटमध्ये कर्णधार आपलं पद सोडून संघाचा भाग होऊ शकतो. तो संघ उप-कर्णधाराशिवाय खेळू शकतो. पण हा जय शहा यांच्या बीसीसीआयचा मामला नाही, तर अमित शहा यांच्या भाजपचा मामला आहे. तिथं मोठे निर्णय मोदी-शहा यांच्या आदेशानुसारच होतात. एका बाहेरच्या नेत्यासाठी भाजप आपल्या नेत्याला म्हणतोय की, तुम्ही त्याचा ‘सहायक’ व्हा, आणि त्यावर भाजपचे प्रवक्ते अशी कहाणी सांगू पाहताहेत, ही जणू काही प्रभु रामचंद्रांच्या चरणावर ‘भरत’ होण्याची संधी आहे.
भाजपला खरोखरच असं वाटतं का, की जनतेची तर्कबुद्ध संपलेली आहे? भाजप जे सांगेल, ते जनता मानेल, तिच्याकडे स्वत:ची बुद्धी नाही. भाजप जेव्हा आणि जसा विचार करतो, तेव्हा आणि तसा विचार जनता करते? मग भाजप असा का गाजावाजा करत आहे की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने पहिल्यांदाच एखादा निर्णय घेतलाय? ही आपल्याच अध्यक्षाची आपणच चेष्टा करण्यासारखं नाही का? भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री किंवा सरकार बनवण्याचा नाही, पण उप-मुख्यमंत्री कुणाला करायचं, याचा निर्णय घ्यायला लागले आहेत? असं वाटतंय की, देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांचं ऐकून त्यांनाही महान आणि प्रभावशाली होण्याची संधी दिलीय… या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचंही म्हणणं ऐकलं जातं. मग भाजपच्या कोट्यातून इतर जे मंत्री होतील, त्यांच्याविषयीचे निर्णय कोण घेत आहे? ती महान व्यक्ती कोण आहे, जिचा उदो उदो केला जात नाहीये?
जेव्हा आसाममध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या हिमंता बिस्वा शर्मा यांना उप-मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्रीपदावर नेमलं गेलं, तो निर्णय जे. पी. नड्डा यांनीच घेतला होता का? आसाममध्ये निवडणुका तर सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. तेव्हा जनतेला असं सांगितलं नाही की, भाजप पुन्हा सत्तेत आला तर हिमंता बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्री केलं जाईल. हे नशीबच म्हणायला हवं की, आसाममध्ये नड्डा यांनी सोनेवालांना असं सांगितलं नाही की, तुम्ही तुमचे उप-मुख्यमंत्री राहिलेल्या हिमंता बिस्वा शर्मा यांचे उप-मुख्यमंत्री व्हा. सोनोवाल यांना केंद्रात मंत्री केलं गेलं.
एकनाथ शिंदे हिमंता बिस्वा शर्मा आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या पुढचे नेते आहेत. कारण त्यांच्याआधी आपला पक्ष सोडून आलेल्या या नेत्यांनी आधी भाजपमध्ये राहून काही काळ वाट पाहिली आणि मग त्यांना सत्ता मिळवली. हिमांता बिस्वा शर्मा यांना पाच वर्षं उप-मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं. ज्योतिरादित्य सिंदिया यांना राज्यसभा खासदार आणि केंद्रात मंत्री होण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. दोघंही मोदींच्या नेतृत्वाखाली ‘सच्चे सेवक’ झाले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्वाद्वारे भाजपलाच ‘सेवक’ बनवलं, ही त्यांच्या राजकीय कौशल्याची करामत आहे.
एकनाथ शिंदे यांना हे समजून चुकलंय की, भाजपला सत्ता हवी आहे. सत्तेसाठी भाजप नैतिकतेचं राजकारण करत नाही. त्यामुळे भाजपशी त्याच पातळीवर ‘डील’ करता येऊ शकते, आपल्या अटी भाजपला मान्य करण्याकरता भाग पाडता येऊ शकतं. आणि भाजपने एकनाथ शिंदे यांच्या अटी मान्य करून एक नवा दरवाजा खुला केला आहे. तो असा की, ‘तुम्ही तुमचा पक्ष सोडून आलात तर आम्ही तुमचं सरकार बनवू. आमच्या नेत्याला तुमचा उप-मुख्यमंत्री करू. आम्ही भाजपवाले आहोत, केवळ आमचंच सरकार बनवत नाही, तर दुसऱ्यांचंही बनवतो’. नीतीशकुमार युती तोडून आले, तर भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे शिवसेना सोडून आले, तर भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं.
भाजपकडे सरकार आणि मुख्यमंत्री बनवण्याची अनेक ‘मॉडेल्स’ आहेत. फडणवीस यांना उप-मुख्यमंत्री करण्यासोबतच भाजपने ‘उप-मुख्यमंत्रीकरणा’चंही मॉडेल लाँच केलं आहे…
अनुवाद - टीम अक्षरनामा
हा मूळ हिंदी लेख रवीश कुमार यांच्या फेसबुक पेजवर प्रकाशित झाला आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment