अजूनकाही
नुकताच मराठी भाषा दिन (२७ फेब्रुवारी) साजरा झाला. त्यानिमित्तानं अनेकांनी आपली मातृभाषा, मराठीच्या नावानं उमाळे काढले, कोणी अश्रू गाळले, कोणी टाहो फोडला... मराठीची अवहेलना होते, गळचेपी होते... मराठीचे मारेकरी कोण... मराठी शाळा बंद पडताहेत सरकार काहीच करत नाही... असे खूप काही नकाश्रू गाळले गेले, दूषणं देऊन झाली, पण मराठीसाठी मी ‘मराठीतून’ काय केलं आणि काय करणार आहे, याबद्दल कुणी फार काही बोललं नाही. सिंगापूरला झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्रख्यात नाटककार, प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार म्हणाले होते, “मराठी भाषकांचा समूह म्हणून ‘आपण’ आपल्या भाषेसाठी काय करतोय? लोकशाहीचा एक सोयीस्कर व विपरीत असा अर्थ आपल्या सोयीनं आपण काढतो व सर्व गोष्टींची जबाबदारी शासनावर टाकून मोकळे होतो. मी कुठलीच जबाबदारी घेणार नाही, कुठलंच कर्तव्य पार पाडणार नाही, सगळं शासनानं करावं, मी फक्त त्याची फळं खाणार– हा काय प्रकार आहे? मी मराठी भाषा निखळ शुद्ध, इंग्लिश किंवा अन्य भाषांमधील शब्दांचा वापर न करता बोलतो का? माझ्या घरात, बाहेर बाजारात, व्यवहारात तरी मराठी आग्रहानं बोलतो का? मी किती मराठी पुस्तकं विकत घेतो व वाचतो? माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घातलं असलं, तरी त्यांची मराठी भाषेशी नाळ तुटणार नाही, त्यांच्या अवतीभवती मराठी भाषा व पुस्तकं असतील, अशी खबरदारी घेतो का? माझा पत्रव्यवहार आग्रहानं मराठीतच करतो का?” (हे पूर्ण भाषण महेश एलकुंचवार यांच्या देखण्या हस्ताक्षरात माझ्याकडे उपलब्ध आहे!)
भाषा दिनाच्या निमित्तानं प्रथेप्रमाणे माध्यमात लेख प्रकाशित झाले; वृत्तवाहिन्यांवर विविध कार्यक्रम झाले. असे कार्यक्रम हा एकंदरीतच बहुसंख्येनं उमाळे काढणारा आणि बहुसंख्य लेख तर उथळ मनोरंजक वाटणारा उपचार झालाय आजकाल. मात्र सई परांजपे यांचा दै. लोकसत्तामधील उमाळा वेधक आहे, कारण त्यातलं आत्मरुदन अस्सल तळमळीचं आहे; ते वाचलं आणि आम्ही आमच्या घरात राबवलेला एक उपक्रम आठवला. ते सुमारे तीस वर्षापूर्वीचे दिवस आहेत. नागपुरात होणाऱ्या एका कसोटी क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन (Commentry) मराठीतून न होऊ देण्याच्या आकाशवाणीच्या निर्णयाच्या संदर्भात बाळ ज. पंडित यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मी एक बातमी दिली. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या बॅनरखाली मी आणि प्रकाश देशपांडेनी मिळून मोठी मोहीम सुरू केली. क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन मराठीतून व्हावं यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्याचं नेतृत्व प्रख्यात महानुभाव संशोधक, माजी कुलगुरू, मराठीचे कट्टर पुरस्कर्ते दस्तुरखुद्द डॉ. वि. भा. उपाख्य भाऊसाहेब कोलते यांनी आघाडीवर राहून केलं; भास्कर लक्ष्मण भोळे, डॉ. यशवंत मनोहर, राम शेवाळकर, डॉ. मधुकर आष्टीकर, मनोहर म्हैसाळकर असे अनेक नामवंत त्यात सहभागी झाले. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जातीनं लक्ष घातल्यानं आमच्या लढ्याला यशही आलं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या आंदोलनात सहभागी असणारे आम्ही सर्व पत्रकार तेव्हा अविवाहित होतो. त्या काळात पत्रकारांचा आमचा गट मराठीसाठी अक्षरश: ‘पेटलेला’ होता. त्या पेटण्यातूनच आपल्या पाल्यांना मराठीतून किमान प्राथमिक तरी शिक्षण द्यायचं असं आम्ही मोठ्या जोशात ठरवलं ठरवलं. रीतीरिवाजानुसार आमचे विवाह झाले. पुढे आम्हा सर्वांना मुलं झाली, पण मराठीबद्दल केलेली प्रतिज्ञा बहुतेक सर्व विसरले. मंगलानं आणि मी मात्र ठरल्याप्रमाणे आमची कन्या सायली हिला बालवाडी ते प्राथमिक शिक्षण पूर्णपणे मराठीतून दिलं. घरातलं वातावरणच असं होतं की, आमच्यासह लेक मराठीसोबतच इंग्रजी वर्तमानपत्रं वाचू लागली. इंग्रजी वाचताना आमच्यासोबतच डिक्शनरी बघायला शिकली. वर्तमानपत्रीय वाचनाव्यतिरिक्त तिचंही अन्य इंग्रजी वाचन कधी सुरू झालं हे कळलंच नाही. आला गेला कुणी इंग्रजीतून बोलू लागला, तर तीही इंग्रजीतून सफाईदारपणे प्रतिसाद देऊ लागली. नागपूरचं सार्वजनिक जीवनातलं वातावरण हिंदी भाषक; त्यामुळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा त्रिभाषक संस्कार लेकीवर झाला. पुढे तिनं शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम घेतलं. व्यवस्थापन शास्त्रात गुणवत्तेसह पदवी मिळवली आणि तिला मुंबईत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी अक्षरश: चालून आली. त्याचं एक कारण तिचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हे तर होतंच शिवाय तिला मराठी-हिंदी समजतं आणि बोलता येतं, ही अतिरिक्त गुणवत्ता समजली गेली. आता एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीत लेक मोठ्या पदावर आहे. (नंतर लेकीनं दीपक ग्यानानी या सिंधी मुलाशी प्रेमविवाह केला. तिची सासू हेमलता या पंजाबी आहेत. लेकीच्या विवाहानंतर प्रथमच सुमारे अडीच वर्षानंतर तिच्या सासुरवाडीला गेल्या पंधरवड्यात मुक्काम केला तेव्हा लक्षात आलं; पंजाबी, मराठी, सिंधी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची हेवा वाटावा अशी सुरेल लय लेकीच्या सासुरवाडीला आहे.) प्रारंभिक शिक्षण मातृभाषेतून घेतलं आणि इंग्रजीचा नीट संस्कार केला तर करिअर करताना कोणतीही अडचण येत नाही हे मुळात आपण नीट समजूनच घेत नाही. इंग्रजी हीच ज्ञानभाषा आहे हे, इतरांचं अनुकरण करत मुलांना इंग्रजी शाळांत भल्या मोठ्या रकमा देऊन प्रवेश मिळवून देतो आणि मराठी शाळा बंद पडण्याच्या वांझोट्या चर्चांत हिरीरीनं सहभागी होऊन स्वत:ची झकास फसवणूक करत असतो! हा न्यूनगंडच आहे. तो आणि भाषाविषयक अन्य सर्व समज-गैरसमज बाजूला ठेवून प्राथमिक शिक्षण मातृभाषा मराठीतूनच घेतलं गेलं पाहिजे, अशी सक्ती प्रत्येक मराठी माणसाने व्रत म्हणून पाळली, तर बंद पडणाऱ्या मराठी शाळा आणि मराठीच्या गळचेपीचा आक्रोश ही समस्याच उभी राहणार नाही.
दुसरा मुद्दा- मराठी प्रेमाचा टाहो फोडताना वस्तुस्थितीचा विसर पडू देता कामा नये. कोणती भाषा किती लोक बोलतात याविषयी जागतिक पातळीवर केलेल्या विविध पाहण्यांवर आधारीत विविध अंदाजांनुसार चीन आणि तैवानची मॅन्डरिन ही भाषा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातले १४.१ टक्के लोक ही भाषा बोलतात. स्पॅनिश दुसऱ्या (५.८५ टक्के), इंग्रजी तिसऱ्या (५.५२ टक्के) आणि हिंदी चौथ्या स्थानावर (४.४६ टक्के) आहे. मराठीचा क्रम १३ ते १५ व्या क्रमांकापर्यंत आहे. जागतिक पातळीवर (आणि भारतातही!) मराठी ही भाषा कधीच दुसऱ्या/तिसऱ्या क्रमांकावर नव्हती! तशी ती असल्याचे ‘बाईट’नामक केवळ ‘अस्मितेचे हुंदके’ फोडणाऱ्यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. राष्ट्रीय पातळीवर म्हणजे भारतात, बोलली जाणारी या निकषावर हिंदी क्रमांक एकवर (४१. ०३ टक्के), दुसऱ्या स्थानावर बंगाली (८.११ टक्के) आणि तेलगू तिसऱ्या स्थानावर (७.१९ टक्के) आहे. आपल्या देशात मराठी भाषा बोलणारे लोक केवळ ६.९९ टक्के असून मराठीचा क्रमांक चौथा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मराठीसकट कोणतीही भाषा मरणपंथाला लागण्याची वस्तुनिष्ठ कारणं शोधण्याऐवजी टाहो फोडत, उमाळे काढत, दोषारोप करण्याचं आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी एकमेकावर ढकलण्याचं ढोंग करणं आपण (पक्षी : मराठी भाषक) थांबवलं पाहिजे. या जबादारीची सुरुवात शिक्षक आणि माध्यमापासून होते. भाषेचा मूलभूत संस्कार घर आणि प्राथमिक शाळेत होतो. घरातल्या संस्कारात कुटुंबातील लोकांसोबतच माध्यमांची जबाबदारी मोठी असते. पूर्वी केवळ मुद्रितमाध्यमं होती. त्यात आता वृत्तवाहिन्यांची भर पडली आहे आणि या जबाबदारीत मनोरंजन व वृत्तवाहिन्या अशा दोघांचाही समावेश आहे. त्यानंतर सर्व स्तरावरच्या भाषेच्या शिक्षकांवर असणारी जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते, या सर्व ठिकाणी आपण पूर्णपणे नापास होतो आहोत, हे कोणताही अभिनिवेश न बाळगता लक्षात घेतलं पाहिजे. घरात नीट मराठी बोललं जात नाही, मराठीला पोषक वातावरणही घरात नसतं. बहुसंख्य शिक्षकांना भाषा म्हणून मराठी कशाशी ‘खातात’ की ‘पितात’ हेच माहिती नाही, अशा शिक्षकांकडून मराठी शिकलेले आणि माध्यमात काम करणारे मराठीची पार वाट लावत आहेत. सध्या या सर्वच आघाड्यांवर किती दारुण स्थिती आहे याची काही उदाहरणे देतो- कंसात अचूक मराठी आहे –
-‘गरम नवऱ्याला करून खाऊ घालणं हा यांचा छंद आहे!’ (नवऱ्याला गरम पदार्थ खाऊ घालणं हा यांचा छंद आहे!)
-‘बळजबरीने बलात्कार’ (बलात्कार बिनाजबरीनं होतो का?)
-‘बेकायदेशीर अतिक्रमण’ (अतिक्रमणाचे कायदेशीर आणि बेकायदेशीर असे दोन प्रकार असतात का?)
-‘अवैद्य वाहतूक किंवा अवैद्य मद्य’ (अवैध वाहतूक किंवा अवैध मद्य हवं.)
-‘मृतक मोटरसायकल वेगाने जात असताना...’(मृत मोटारसायकल चालवेल कसा?)
-‘पायाला आणि डोक्याला जखम लागली आहे.’ (जखम लागते कशी? पायाला आणि डोक्याला जखम झाली आहे, असं हवं.)
- ‘सुमारे दीड लाख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या ‘संगम’मध्ये सहभागी झाले.’ (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दीड लाख आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक या ‘संगम’मध्ये सहभागी झाले, असं हवं.) याच चालीवर ‘येथील काँग्रेसचे (किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे) नेते’ असा उल्लेख असतो; तो ‘अमुक पक्षाचे येथील नेते/कार्यकर्ते’ असा अचूक आहे.
-‘लोकांनी बसून ठिय्या आंदोलन केलं!’ (‘ठिय्या’ आंदोलन बसून होईल नाही तर काय उभं राहून होईल?)
-‘पायदळ दिंडी काढली’ (दिंडी पायी निघेल नाही तर काय मोटारीत बसून?)
-‘अधिकृत कुलगुरू याबद्दल नंतर बोलणार आहेत.’ (विद्यापीठाला अधिकृत आणि अनधिकृत असे दोन कुलगुरू असतात का? कुलगुरू याबद्दल नंतर अधिकृतपणे (किंवा अधिकृतरीत्या) बोलणार आहेत, असं हवं.)
-‘हातात आरतीचे ताट घेऊन महिला उभ्या होत्या.’ (आरतीचे साहित्य ठेवलेल्या ताटासाठी तबक हा शब्द वापरतात/हाच शब्दप्रयोग पानाचे तबक असाही केला जातो. जेवणासाठी ताट असतं; तबक नाही!)
-‘दोन चिमूट गरम पाण्यात मीठ टाकावे!’ (गरम पाण्यात दोन चिमूट मीठ टाकावे, असं हवं.)
-‘ती वस्तू पसंद पडली’ (पसंद हा हिंदी शब्द आहे, पसंत असा शब्द हवा.)
-‘दोन ‘स्पून शुगर’ घाल मला किंवा 'सब्जेक्ट बॉक्स'मध्ये 'कॉलम'चं नाव 'मेन्शन' करा. (हे कोणतं मराठी की इंग्रजी की आणखी काही?)
-‘भाजीत अमुक एक पदार्थ टाकला की येणारा गंध चवीला खूपच छान लागतो’. (गंधाला चव कशी असेल? ती तर असेल स्वादाला!)
(यात प्रत्येकाने त्याला माहिती असलेले सर्व ‘मासले’ पाहिजे तेवढे जोडावे.)
हे असं बोलावं आणि लिहावं तितकं कमीच आहे. आपल्याच कृतीतून आपण ‘म’ मराठीचा राहूच दिला नाहीये. तो ‘म’ हृदयातून तसंच ठामपणे-बोलण्यात आणि व्यवहारात आला पाहिजे, ही आपली उत्कट भावना म्हणा की, तळमळीची इच्छाच नाहीये. आपण त्याबाबतीत केवळ बोलके शंख झालेलो आहोत आणि आपण मराठीच्या होणाऱ्या संकोचाबद्दल/ आक्रमणाबद्दल कोरडे उमाळे काढतो. अन्य कुणी तरी बाहेरून येऊन मराठीची हत्या करतो असं म्हणतो. त्यात खरंच तथ्य आहे? मराठीचे मारेकरी आपणच आहोत. अन्य कुणाला दोष देण्यात अर्थ नाही!
(अधिक वाचन संदर्भ – १) कसोटी क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन आकाशवाणीवरून होण्यासाठी उभारलेल्या आंदोलनाची हकिकत ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात आहे. २) लेकीला प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याच्या उपक्रमाविषयी मुंबईच्या मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेल्या ‘शिक्षणाचे मराठी माध्यम : अनुभव आणि अस्वस्थ वर्तमान’ या पुस्तकात आहे.)
.................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sun , 12 March 2017
"मराठीचे मारेकरी आपणच, अन्य कुणाला दोष देण्यात अर्थ नाही!" हा फक्त दिल खेचक मथळा नसून ते गृहीतक म्हणून ह्या लेखात वापरलेले आहे. म्हणजे आपण मराठी भाषकच जर मराठीचे मारेकरी असू तर आजच्या घडीला तरी मराठी मृत झालेली आहे. आता तिच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरु केली पाहिजे... मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी चे संवर्धन ह्यांची सांगड घालण्याचा उद्योग जुना ( खरेतर प्रामुख्याने शिक्षणाचा संबंध मुलांशी असला पाहिजे , मराठी भाषेचे संवर्धन त्यातून जर होत असेल तर ती एक अनुषंगिक बाब झाली )... मातृभाषेतून शिक्षण कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच हा आग्रह तर फारच जुना ... पण सध्याची बाळ पिढी जी बोलते ती (मातृ)भाषा कोणती... मराठी? छे! कारण मराठी तर मृत झाली आहे ना? ....मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षात फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्य छोटी झाली,‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाल शब्दांचे श्रीवर्धनी रोठे फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही. नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्य आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राट हि गेले. लोक खरं खरं अभिनय वगैरे करू लागले.(काय हा अत्याचार!) एकदा रेडियो मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडियो चानेल ऐकताना RJ म्हणाला “हेल्लो पुनेकर, पुण्यात ( SORRY, पुन्यात) चिल आउट करायला सोयीचा स्पॉट शोधताय. लेट अवर शाम का साथी डू इट फॉर यु.” ह्या मराठी सारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला पण नंतर विचार केला, तरुणाईला (घरच्या आया कमी वात आणायच्या म्हणून आता ह्या नव्या आया आल्यात छळायला, हिरवाई, निळाई, आणि सगळ्यात फेमस आणि डेंजरस तरुणाई)ह्याच्या सारखीच भाषा( परत sorry, लँग्वेज) आवडते त्याला ते तरी काय करणार? आता बघा मी सुद्धा बोलताना ‘फ्युज उडाला’ रेडियो चानेल, डेंजरस असे शब्द वापरलेच कि नाही. कोण वाचतय? हे जसं महत्वाच तसच जास्तिजास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं बोलण लिहिणं महत्वाच.(त्यालाच साहित्य असे म्हणतात मामू!) तरीही, शुद्ध मराठीचे आग्रहधारी आणि मराठीचे जाणकार योद्धे मला खालच्या काही शंकांची (समर्पक व स्पष्टीकरणासहित)उत्तरे देऊ शकतील काय, १. मला तुला काही सांगायचे आहे. - मला व तुला चे व्याकरण काय आहे? २. उगीच वेळ लावू नकोस . वेळ ह्या शब्दाचे लिंग कोणते ? ३.पावसाळ्यातील चपलेचा प्रताप लक्षात आहेना? मुल शब्द चप्पल कि चपला ... असो असे अनेक शंकासूर मनात उभे आहेत, पण तूर्त एव्हढेच पुरे ...