ही गोष्ट आहे केरळमधली. पण ती आपल्या महाराष्ट्राची असू शकेल किंवा गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारचीही. कदाचित आपल्या घरातलीही...
पडघम - सांस्कृतिक
विवेक कोरडे
  • चित्र - मुद्रा
  • Sat , 02 July 2022
  • पडघम सांस्कृतिक हिंदू Hindu मुस्लिम Muslims सीएए CAA नागरिकत्व दुरुस्ती कायदा Citizenship (Amendment) Act

ही गोष्ट सईदाची असली तरी, फातिमा, यास्मिन, वहिदा यांचीही असू शकते किंवा साधना, हर्षदा, अरुणा, मुक्ता यांचीही असू शकते. तशीच ती अर्षद, मन्सूर, इरफान, फिरोज यांचीही किंवा हर्षद, चिन्मय, तन्मय, निरंजन यांचीही असू शकते. इतकंच कशाला ती मागरिट, क्लारा, लिडिया यांची किंवा जॉन, लॉरेन्स, रॉबर्ट, पीटर यांचीही असू शकते. पण आपली गोष्ट मात्र सईदाची आहे. ही गोष्ट आहे केरळमधली. पण ती अगदी आपल्या महाराष्ट्राची असू शकेल किंवा गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, किंवा अन्य राज्यातीलही असू शकेल. कदाचित आपल्या घरातलीही...

केरळ राज्यातलं एक छोटंसं खेडं. गावची लोकसंख्या जेमतेम दीड-एक हजाराची. केरळचं सारं निसर्गसौंदर्य या खेड्यात एकवटलेलं. एका बाजूला हिरवीगार वनराई आणि झाडाला सहज फांदी फुटावी, तशी त्या वनराईतून पाय फुटलेली, थेट समुद्राला भिडणारी एक वाट. ही पायवाट गावात शिरली की, उजव्या बाजूचं पहिलंच घर आपल्या सईदाचं. तिचं कुटुंब मोठं, घरात एकूण १२ माणसं. सईदा धरून सहा बहिणी, तीन भाऊ, म्हातारी आजी आणि तिचे आई-बाबा म्हणजेच अम्मी आणि अब्बू.

अब्बू दिवसभर एकतर शेतात किंवा मिळतील ती छोटी-मोठी कामं करून घरखर्चाला काही कमाई करायचे. आई गृहिणी. अम्मी-अब्बूचं शिक्षण अगदीच बेतासबात. पण मुलांनी चांगलं शिकावं, उन्नत आयुष्य जगावं असं, सर्वच आई-बाबांना वाटतं, तसं त्यांनाही वाटायचं. इतर सारी भावंडं अभ्यासात ठीक, पण सईदा मात्र हुशार. नुसतीच हुशार नाही, तर चुणचुणीतही. कार्यक्रम शाळेत असो की गावात, सईदा त्यात नुसता भागच घेत नसे, तर समजू लागल्याच्या वयापासून त्या कार्यक्रमाला मदत करायलाही पुढे असे. पडेल ती जबाबदारी पार पाडत असे.

..तर अशी सईदा २००७मध्ये, वयाच्या १६व्या वर्षी तब्बल ९२ टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाली. परंतु मळलेल्या वाटेवर जात सायन्सला प्रवेश घेऊन डॉक्टर-इंजिनिअर होण्यापेक्षा आर्टसला जाऊन शिक्षिका बनवायचं तिनं ठरवलं. कला महाविद्यालय तिथून चार-पाच मैलांवरील एका गावात होतं. तिथं तिनं प्रवेश घेतला.

धर्मरक्षकांची दहशत

नवं गाव, नवं वातावरण, नव्या मित्र-मैत्रिणी आणि आपण आता शाळेतून महाविद्यालयात जातोय, या जाणीवेनं ती अगदीच हरखून गेली होती. नव्या मित्र-मैत्रिणींबरोबर रमून गेली होती. सईदा अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच सायकलने महाविद्यालयात जाई. वाटेत अन्य गावांची मुलं-मुलीही भेटायच्या. त्यामुळे सायकलवाल्या मुला-मुलींचा नवा ग्रुप तयार झाला. मग सुट्टीत एकमेकांच्या गावी जाणं-येणं सुरू झालं.

केरळ सुशिक्षित राज्य. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशी मिश्र वस्ती. धर्म वेगळे असले तरी सारे बोलणार मल्याळी भाषेत. राहणीमानही सारखंच. त्यामुळे सईदाला जात आणि धर्मभेद तोपर्यंत कधीच जाणवले नव्हते.

एक दिवस सईदाच्या मित्र-मैत्रिणींनी तिच्या घरी यायचं ठरवलं. घरात तिने तसं सांगितलं. घरातल्या लोकांनाही त्यात विशेष असं वाटलं नाही. सईदा त्यांच्या येण्याची वाट बघत घराच्या पायरीवर बसून होती. थोड्या वेळानं कशाला तरी ती घरात गेली. तितक्यात तिला मोठा आरडाओरडा ऐकायला आला. ती पटकन बाहेर आली. तेव्हा घरापासून थोड्याच अंतरावर तिच्या मित्रांना तिच्याच गावातील काही तरुण मारहाण करताना दिसले. आवाज ऐकून सईदाचे अब्बू धावत तिथं गेले. आजूबाजूची काही माणसंही धावत आली. त्या मारहाण करणाऱ्या तरुणांना त्यांनी आवरलं आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं.

सईदाला भेटायला आलेल्यांत तीन हिंदू मुलं होती आणि तीन मुस्लीम मुली होत्या. सईदाच्या गावातल्या धर्मरक्षक टोळक्याला मुस्लीम मुलींनी हिंदू मित्रांबरोबर फिरणं नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटत होतं. ‘नैतिक पोलीसगिरी’चं कर्तव्य त्यांनी पार पाडलं होतं.

कोलमडलेलं भावविश्व

त्याच दिवशी संध्याकाळी गावातील काही प्रतिष्ठित मुस्लीम मंडळी सईदाच्या घरी आली. त्यांनी हिंदू मुलं आपल्या मुलींशी मैत्री करतात. मग पळून जाऊन आपल्या मुली त्यांच्याशी लग्न करतात, म्हणून आपल्या मुलींनी हिंदू मुलांची मैत्री करता कामा नये, अशी समज सईदाच्या वडिलांना देऊन ती मंडळी निघून गेली. सईदाच्या वडिलांना काय करावं ते सुचेना. ते गोंधळले आणि घाबरलेही होते. ‘ते लोक काय म्हणाले ते ऐकलंस ना?’ या त्यांच्या एकाच वाक्यानं सईदा काय समजायचं ते समजली. त्या रात्री ती खूप रडली. दुसऱ्या दिवशी सुजलेल्या डोळ्यांनी ती महाविद्यालयात गेली. तिच्या घरी आलेल्या मित्र-मैत्रिणींपैकी कोणीही तिच्याशी बोललं नाही. तरी तिने त्यांना ‘सॉरी’ म्हटलं. पण त्याचा फारसा परिणाम त्यांच्यावर होणार नव्हता. त्या मुलीही त्या मुलांशी कमी बोलू लागल्या. सईदा तर जवळजवळ एकटीच पडली. या सर्वाला जणू काही तीच जबाबदार होती.

सुदैवानं त्या मारहाणीची प्रतिक्रिया उमटली नाही. पण सईदाच्या मनावर झालेल्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. उलट त्या जखमांच्या वेदना दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. तिने नव्या मित्र-मैत्रिणी मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी वेदना कायमच होत्या. उलट आठवणींची खपली पुन्हा पुन्हा काढली जायची आणि त्या जखमा नव्यानं भळाभळायच्या. तिला भूक लागेनाशी झाली. अम्मी जबरदस्तीनं काही खायला लावायची. तिच्या समाधानासाठी सईदा थोडंसं खायची. तिचं वजन कमी होऊ लागलं. आणि एक दिवस त्या प्रकाराला सुरुवात झाली.

दुःस्वप्नांची मालिका

सईदा झोपली होती. उठायची वेळ झाली तरी उठली नव्हती, कारण पहाटे पडणारा अंधुक उजेड पडतच नव्हता. ती नेहमी सारखे फटफटायची वाट पाहत होती. पण त्या पहाटे सूर्य जणू एकाच जागी थांबला होता. ती उठून खिडकीकडे आली. खिडकीवरचा पडदा तिने बाजूला केला. तिच्या घराकडे येणाऱ्या रस्त्याकडे तिने पाहिलं. अंधुक प्रकाशात लांब तिला काही हालचाल जाणवली. माणसांसारखा दिसणारा, पण अगदीच विचित्र हालचाली करणारा जमाव हळूहळू तिच्या घराकडे येताना दिसला. जमाव पुढे येत होता. जमावातील माणसासारख्या दिसणाऱ्या आकृत्यांचे हातवारे तिला दिसू लागले. अस्पष्ट आरडाओरडा तिच्या कानावर पडू लागला. जमावाच्या हातातील तलवार, भाले, लाठ्या तिला दिसू लागल्या. कसला तरी जल्लोष करत जमाव पुढे पुढे सरकत होता. जमावाच्या अग्रभागी असलेल्या आकृतीनं हातात एक भाल्यासारखी दिसणारी, पण वर तीन टोकं असलेली काठी उंचावून धरलेली होती आणि त्या तीन टोकी काठीवर एक मनुष्याकृती तडफडत असल्याचं तिला दिसलं. जमाव आता घराच्या अगदी जवळ आला होता आणि त्या तीन टोकी काठीवरची आकृती दुसरी-तिसरी कोणी नसून ती आपणच असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं एक मोठी किंचाळी मारली.

जेव्हा तिला अर्धवट शुद्ध आली, तेव्हा सारं घर तिच्याभोवती जमलं होतं. त्यांना पाहून ती पुन्हा हुंदके देऊ लागली. आपण अजून जिवंत आहोत, ते एक वाईट स्वप्न होतं, या जाणीवेनं तिला थोडा धीर आला. अम्मीने तिला पाणी दिलं. गरम कॉफी करून दिली. सईदाला थोडं बरं वाटलं. त्या दिवशी कॉलेजला गेली नाही. दिवसभर घरात बसून राहिली. त्या रात्री तिला खूप वेळ झोप लागली नाही. लागली तेव्हा ते दुःस्वप्न तिला पुन्हा दिसू लागलं. तिची झोप मोडली. बाजूला तिच्या बहिणी झोपल्या होत्या. त्यांना बिलगून ती झोपली आणि पुन्हा एक किंचाळी मारत उठली. सारं घर पुन्हा जमलं. त्या रात्री ती झोपलीच नाही. रात्रभर तिच्या अम्मीला बिलगून जागीच राहिली.

‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’चा असाही दुष्परिणाम

नंतर हा प्रकार रोजच घडू लागला. अम्मी-अब्बू यांना तिची खूप काळजी वाटू लागली. त्यांनी अन्य कुठला उपाय न करता सरळ शहराचा रस्ता पकडला. मग डॉक्टर, तपासण्या आणि औषधोपचार यांची सुरुवात झाली. परंतु त्याने फारसा फरक न पडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णालयात सईदा दीड महिन्यांहून अधिक काळ राहिली. थोडी सुधारणा झाल्यावर तिला घरी सोडण्यात आलं. डॉक्टरांनी तिच्या आजाराचं निदान ‘पर्सिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डर' असं केलं. चार वर्षं नियमित औषधोपचार केल्यानंतर सईदाला बरं वाटू लागलं. ती पुन्हा महाविद्यालयात जाऊ लागली. तिला नव्या मित्र-मैत्रिणीही मिळाल्या. सईदाचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ लागलं. औषधं घ्यावी लागत होती, पण शैक्षणिक प्रवास उत्तम सुरू झाला. ८७ टक्के गुण मिळवून सईदा १२वी उत्तीर्ण झाली. पदूचेरी येथील केंद्रीय विद्यापीठात तिला बी.ए.साठी प्रवेश मिळाला आणि तिथंच तिने इंग्रजी भाषेत एम.ए. ही पदव्युत्तर पदवी मिळवली. आता तिला एम.एड. करायचं होतं. उत्तम शिक्षिका बनायचं होतं.

कालिकतच्या श्री शंकराचार्य विद्यापीठात तिने एम.एड.साठी प्रवेश घेतला. पण तिचं आयुष्य सामान्य झालं, असं वाटत असतानाच भारत सरकारने ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ पारित केला आणि तिच्या दुःस्वप्नांना पुन्हा सुरुवात झाली. निमित्त कुण्या वर्तमानपत्रात या कायद्यावर आलेल्या एका लेखाचं झालं. तो लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुण्या प्रचारकानं लिहिला होता. त्यात मुस्लिमांना अनेक दूषणं दिली होती. देशातील मुस्लीम समाज या कायद्याविरोधात आंदोलनात उतरला होता. सईदा यातही भरडली जाणार होती. तिला पुन्हा एकदा भयावह स्वप्नं पडायला सुरुवात झाली.

सरकारनं युद्ध पुकारलं आहे. शत्रूशी नाही, आपल्याच नागरिकांविरुद्ध पुकारलं आहे. सैनिक गोळ्या झाडत माणसं टिपत आहेत. लोक सैरावैरा पळत आहेत. हा नरसंहार पाहून सईदाही खूप घाबरली, पळू लागली. तितक्यात तिला एक दीड-दोन वर्षांचं मूल रडत असलेलं दिसलं. धावत जाऊन ती त्याला उचलते आणि एका पडक्या घराच्या भिंतीआड दडून स्वतःचे आणि त्या मुलाचे प्राण वाचवते...

दुसरं स्वप्न पडलं ते तिच्या गावात. सईदा कुटुंबातील मुलांबरोबर घरात खेळत आहे. अचानक सैनिक घरात आले. सारी भावंडं रडू लागली. त्या सैनिकांनी साऱ्यांना एका खोलीत बांधून ठेवलं आणि सईदाच्या गुडघ्यावर गोळी मारली. का? असं विचारल्यानंतर ‘तू मुस्लीम आहेस म्हणून गोळी मारली’ असं सांगण्यात आलं. अशी विषण्ण स्वप्न वारंवार पडू लागली. एका स्वप्नात कुठेतरी एक मोठा ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ बांधलाय. त्यात आपल्याला टाकलं आहे आणि आता आपण अ‍ॅन फ्रँकसारखं मरून जाणार, या विचारानं तिला ग्रासलं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

आता पुन्हा डॉक्टर, औषधं घेणं सुरू झालं. पण या वेळी ती दोन-तीन आठवड्यांतच सावरली. अन्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं कालिकत, एर्नाकुलम, त्रिवेंद्रम यासारख्या शहरांमध्ये सीएए विरुद्धच्या आंदोलनात भाग घेऊ लागली. त्यामुळे आपण एकटे नाही, ही भावना तिच्या मनात प्रबळ झाली. तिला बळ मिळालं. आताही सईदाच्या मनातील भयाची भावना कायम असली, औषधंही सुरू असली तरी सईदाला नवीन उमेद आली आहे. एक दिवस ती उत्तम शिक्षिका झालेली आपल्याला दिसेल...

इथं सईदाची गोष्ट संपली. या गोष्टीत काल्पनिक असं काहीच नाही. फक्त मूळ नाव बदललं आहे. आता इथं फक्त सईदाचीची एक गोष्ट संपलीय. या गोष्टीच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनेकांना सईदासारखंच अनेक मनोविकारांनी ग्रासलेलं असू शकतं, नव्हे ग्रासलंच आहे. त्यांच्या गोष्टीचाही सईदासारखा सुखद शेवट व्हावा. आणि तो सुखद करण्याची जबाबदारी सुसंस्कृत समाज म्हणून आपली आहे. कारण नैराश्य ही भावना जरी वैयक्तिक असली, तरी बऱ्याचदा ती सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची परिणती असू शकते. म्हणूनच मनातील भयामुळे येणारं नैराश्य दूर करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक बाबींमध्ये सुसंस्कृत समाजाचा हस्तक्षेप आवश्यक आहे.

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ जुलै २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......