अजूनकाही
आमची ओळख झाल्याला दहा वर्षं तरी होऊन गेली. त्यांची माझी ओळख ज्या मित्रानं करवून दिली, तो कुठं आहे व कसा आहे कुणास ठाऊक, आम्ही मात्र जोडले राहिलो आहोत! केल्या गोष्टीचा फार आवाज न करता, हातात घेतलेल्या कामात पूर्णपणे समरस व्हायची, त्यांची खोड मला सतत त्यांच्याकडं बघायला लावते. आपल्या कौतुकात बुडून जाणार्या व स्वत:ला अवाजवी महत्त्व देणार्यांच्या गर्दीत राजेश मारुती काजवे हा माणूस काहीतरी नवंच घडवेल आणि आपल्याला पत्ताच लागणार नाही, असं वाटून त्यांना ‘काय चाललंय नवं?’, ‘काय म्हणतंय तुमचं मशीन?’ असे प्रश्न विचारावे लागतात.
हेच जर त्यांच्या शोरूममध्ये जाऊन विचारले तर लहान मुलाच्या उत्साहाने नवी जुळवलेली एखादी खुर्ची किंवा टीपॉय समोर आणून ठेवतात. आपण किती कोटींची उलाढाल करणारे उद्योजक आहोत, हे विसरून जमिनीवर बसकण मारतात आणि स्वत:च्या कारखान्यात घडवलेल्या त्या साधनाचं वैशिष्ट्य तपशीलवर सांगतात. ते आकाराला येण्यापूर्वी किती किती व कसे दोष उरत होते व मग त्यावर काय केलं, हेही सांगायला ते विसरत नाहीत. अशा ‘प्रेग्नंट’ काळात ते स्वप्नंही बघतात- ती मनात आकार घेत असलेल्या नव्या फर्निचरची. त्यांच्या गोलाईयुक्त कोनांची, प्रमाणांची, लाकडावरील नैसर्गिक भिंगरीची, मुठींची नि त्यासंबंधी आणखी कशाकशाची…
नुकताच, २७ जूनला त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आणि २९ जूनला ‘आयकॉनिक प्रोफेशनल’ म्हणून त्यांना ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार दै. ‘सकाळ’ने समारंभपूर्वक प्रदान केला. ‘आयकॉनिक प्रोफेशनल’ हे बिरूद जे मिळालं आहे, ते का महत्त्वाचं? कारण या माणसाचा प्रवासच तसा आहे. झपाटून जाऊन, स्वत:ला कामाला जुंपून एकदा नाही, दोनदा नाही, तिसर्यांदा स्वत:ची मजबूत ओळख निर्माण करण्याचा जोम टिकवून ठेवणं, हे वाचायला वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही.
एखादा उद्योग नावारूपाला आणण्यासाठी माणसांचा जन्म खर्ची पडतो. राजेश काजवे या माणसानं घाम गाळून, जीव लावून नावारूपाला आणलेलं काम व त्यातलं आपलं योगदान दोनदा सोडून दिलं. रिकामा झाला, पण रिक्त नाही! वयाच्या पंचेचाळिशीत मुलांची शिक्षणं, घरादाराच्या जबाबदार्या, बायकोची स्वप्नं, हे सगळं उरावर घेत घेरून राहिलेल्या नैराश्याशी हादगा खेळत यानं नवा डाव मांडला.
‘काजवे फर्निचर्स’ हे या डावाचं नाव. मला आज वाटतंय, हा उद्योगच असं नव्हे, तर परिस्थितीला शरण न जाता खेळगडी जमवत सातत्यानं काम उभं करण्याच्या त्यांच्या स्वभावातल्या उद्यमशीलतेला ही शाबासकी आहे. ही उद्यमशीलता जागती ठेवणारी त्यांची सखी कविता हिच्या निर्धाराची ही पोचपावती आहे.
इचलकरंजीत तीन काका नि सहा आत्या आणि त्यांची मुलंबाळं, अशा सणसणीत कुटुंबात वाढलेला माणूस, सगळ्या कुटुंबाचा आपण एक भाग आहोत, याच भावनेत वाढतो. सगळी भावंडं मिळून काम करतात, वकुबाप्रमाणं नैसर्गिकपणेच जबाबदार्या विभागल्या जातात. जरुरीइतकं शिक्षण घेऊन आपल्या धंद्याला लागायचं, हेच मनात असतं. शिवाय सात बहिणींचे संसार वडिलांना साथ देत आपणच उभे करायचेत, याचं एक भान होतंच.
खरं तर राजेश काजवेही तसे सहा नंबरचे म्हणजे धाकट्या बहिणीच्या आधीचे. त्याअर्थी धाकटेच, पण मोठं व्हावं लागलं. राजेश बी.कॉम होताक्षणी कुटुंबाच्या पॉवर लूम्सच्या धंद्यात मिसळून गेले. नवा फडफडता उत्साह होता, चोवीसचे साठ माग करण्यापर्यंत सुती कपड्यांचं उत्पादन वाढवलं. त्यात हात बसला. मग सायझिंगचं काम पार्टनरशीपमध्ये करायला घेतलं. यार्नवर म्हणजे सुतावर प्रक्रिया करणारी ही यंत्रणा. धाग्याला खळ चढवायची, त्याची ताकद वाढवायची.
राजेश काजवे यांच्या स्वभावातलाही हा चिवट गुण. नव्या अनुभवांची खळ चढवत घट्ट संघटना बांधण्याचा. तो पुढे उपयोगी ठरला. आयुष्याची १० वर्षं खर्ची घातल्यावर धंदा भरभराटीस आला. जबाबदारी बघता उत्पन्नाचे मार्ग वाढवणं क्रमप्राप्तच होतं. या सगळ्यात एकत्र व्यवसाय करताना वडिलांची होणारी घुसमट राजेश बघत होते. नफ्यापेक्षा नाती जपणं आणि न संपणारा घुसमटीचा प्रवास टाळणं जरुरीचं, असं मनाशी पक्कं करत या व्यवसायातून स्वत:ला वेगळं केलं.
तोवर त्यांचं लग्न कवितेशी लागलं होतं. तिच्याही घरी उद्योगाचीच परंपरा होती. वडिलांनी शून्यातून विश्व उभं केलेलं तिनं पाहिलं होतं. हॉटेल इंडस्ट्री केवळ वडिलांची नव्हती, आईचाही त्यात तितकाच सहभाग होता. सगळं साम्राज्य उभं राहिस्तोवर ती इतकी राबली होती की, गुडघे कामातून गेले. आईचा आदर्श समोर ठेवत कविताही राजेश यांच्याबरोबर उभी राहिली. व्यवसाय करायचा तर त्यातली अनिश्चितता जमेस धरायची, हे तिला ठाऊक होतं.
हातमाग आणि सायझिंगच्या कामातून आलेलं ज्ञान व अनुभव फटक्यात बाजूला सारून उभं कशात राहायचं? मग फर्निचर व्यवसायात असणार्या नातलगांबरोबर काम करता येईल, असं ठरवत त्यांच्या कामात नाव वल्हवायला घेतली. कापड व्यवसायातून लाकूड व्यवसाय उडी, यात शेवटचं ‘ड’ फक्त जुळणारं. बाकी जुन्या अनुभवांचा फार उपयोग नव्हता. मात्र डगमगेल तो राजेश काजवे कुठला!
लाकडाशी संधान बांधून त्यांनी सगळं आत्मसात केलं, फर्निचरची रचना घडवण्यापासून ते ‘बाजार’ समजून घेण्यापर्यंत आणि ग्राहकांची नस ओळखत गरजेनुरूप नवे आराखडे जन्माला घालण्यापर्यंत... ‘कमी तिथं आम्ही’ या म्हणीप्रमाणे लाकडाच्या खरेदीपासून भुसा स्वच्छ करेपर्यंत नि ग्राहकांच्या घरी सगळे सुटे भाग जुळवून त्यांच्या डोळ्यांमधला आनंद बघून, काही वर्षांनी आठवणीनं फर्निचरची दुरुस्ती करेपर्यंत. राजेश काजवे कुठं कुठं तरंगत असायचे. याच्या तारा जुळवणं हे काम कठीणच. जम बसला, पण जन्मानं येणार्या नात्यांचं प्रकरण तसं अंदाज चुकवणारंच. त्यात एक कुणी सुष्ट व उरलेला कुणी दुष्ट अशी काळी-पांढरी मांडणी कुठं असते?
एक दिवस ही सांगड तुटली. विश्वासावर प्रश्नचिन्ह, अपमान, कडवटपणा, मातीमोल झाल्याची भावना, अशा सगळ्यांनी घेरून प्रचंड नैराश्य आलं. वय पंचेचाळीस झालेलं. आता या टप्प्यावर काय करणार? सगळं तर हरपलंय! राजेश काजवेंनी ही हरल्याची भावना रॉकेटच्या ऊर्जेसारखी वापरली. कविता त्यांना निराशेच्या अंधारात अडकू देणार नव्हती. तिनं आपले होते-नव्हते ते दागिने आपल्या नवर्याच्या हातात ठेवले नि म्हणाली, “लाकडातच काम करायचंय ना? आपलं स्वत:चं करू. तुमच्या हातात कला आहे, वाणीत माणसं जोडायची शक्ती आहे. आपलं चांगलंच होणार बघा! चला, दु:ख करायला वेळ नाही. मुलं मार्गी लागायची आहेत. आपल्यावर जबाबदार्या आहेत. उठा, मला तुमचं प्लॅनिंग सांगा.” - राजेश काजवे तेव्हा उठले, त्याला आता १५ वर्षं झाली. तेव्हा जोडलेले कामगार, सहकारी आजही खांद्याला खांदा लावून उभे आहेत. व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे.
ते दिवस आठवताना आजही दोघं भावुक होतात. डोक्यात राख घेऊन काहीतरी करायला घेशील आणि पस्तावशील, असं सगळेच म्हणत होते, तेव्हा कविताला आपल्या नवर्याबाबत १०० टक्के खात्री होती. नवं काम सुरू करताना लाकूड खरेदीसाठी लाख रुपये घेऊन ज्याच्याकडे गेले होते, ती लाकूड पुरवठादार व्यक्ती आजही या दोघांशी जोडलेली आहे. अशा कितीतरी लाकूड पुरवठादारांनी खरा धंदा शिकवला, चार गोष्टी पुढं कशा न्याव्यात याची अक्कल दिली, असं राजेश काजवे सांगतात.
व्यवहार पारदर्शक ठेवला की धंदा बहरतो, हे एक तत्त्व राजेश सगळ्यांत आधी शिकले. लोकांना फसवायचं नाही, त्यांच्या गळ्यात काही मारायचं नाही, हे मनाशी पक्कं होतं. त्यामुळेच कामाचा व्याप वाढला, असंही ते सांगतात. कामाचं नुसतं प्राथमिक तंत्र कळून उपयोग नसतो, तर सगळ्या दिशांना बघावं लागतं. त्यासाठी लाकूड नि फर्निचरसंबंधी देशभरात व बाहेरही होणारी प्रदर्शनं खूप महत्त्वाची. राजेश अशा प्रदर्शनांत गरगर हिंडायचे. फर्निचरसंबंधीची असंख्य पुस्तकं घेऊन वाचायचे. त्यातलं तंत्र, सफाई, सौंदर्य आपल्या कामात कसं उतरेल, याचे प्रयोग करत राहायचे. सुरुवातीच्या दिवसांत अशाच प्रदर्शनात त्यांना डॉवेल वुड जॉयनरीविषयी कळालं. ती कशी असते, याचा त्यांनी अभ्यास केला. खिशात पैसा खुळखुळायला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळं मशीन स्वत: तयार केलं आणि कोल्हापूर भागात तशा प्रकारचं फर्निचर पहिल्यांदा निर्माण केलं. मग ऑर्डर्स वाढल्या, पैसा हातात आला आणि मनात भरलेलं मशीन विकत घेता आलं.
‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ हे राजेश यांना नेहमीच मशीन्सबाबतीत होतं. एक-दोन मशीन्स करता करता कोल्हापुरात गडमुडशिंगी इथे प्रचंड मोठी फॅक्टरी, लोणार वसाहतीतलं शोरूम, ‘काजवे फर्निचर’च्या सातारा आणि पुण्यातील शाखा इतका विस्तार वाढला आहे. फ्रान्स आणि जर्मनीतून येणार्या प्रक्रिया केलेल्या बीचवुडपासूनचं सुबक फर्निचर ग्राहकांना पसंत पडलं आहे. न कुजणारं, वाळवी न धरणारं डौलदार लाकडी फर्निचर पाहाताक्षणी नजरेत भरावं असंच आहे.
शिसमसारख्या लाकडाचे काही प्रयोग सध्या त्यांना हाका घालताहेत. विश्वासू आणि निष्णांत कारागीरांची व कामगारांची सक्रिय सोबत असल्यामुळे स्वप्नं पुरी होणार, याची खात्री राजेश व कविता दोघांनाही आहे. “मन लावून कष्ट करायची तयारी असेल, तर आपले अपमान, अपयश, धंद्यातली अस्थिरता व त्यातून येणारी निराशा यांची ऊर्जा घेऊन आणखी काम करता येतं, हा माझा अनुभवसिद्धान्त आहे. तो मानत असाल तर अतिशय कमी भांडवलात कुठलाही व्यवसाय उभा करता येतो व यशस्वीही करता येतो!” असं राजेश आणि कविता नव्या पिढीला सांगतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
गुबगुबीत खुर्चीत बसून व्यवसाय बाळसं धरत नाही, तुम्हाला अंग मळवावं लागतं, माणसं समजून घ्यावी लागतात, एखाद्या माणसाचं कौशल्य लक्षात घेऊन ते वाढवण्यासाठी वेळ व संयम ठेवावा लागतो, असं बरंच काही असतं व्यवसायाच्या संसारामागं! ‘काजवे फर्निचर्स’चा संसार असा फुलतो आहे.
राजेश काजवेंची आई फक्त चौथी शिकलेली, पण अनुभवाचं गाठोडं इतकं साठलेलं की, तिची हुशारी, करारीपण छाप सोडून जायचं. तिचं बारीक लक्ष असायचं आपल्या पोराचं काय चाललंय याकडं. काही कुरबूर झाली, कुठली चिडचिड झाली, नवं काम करायचंय तर तिचा सल्ला असायचाच. आई-बापांनी आपल्या हयातीत मुलाच्या कष्टाला धरलेलं फळ बघितलं ही समाधानाची गोष्ट. आई म्हणायची ती गोष्ट आज यश अनुभवताना राजेश यांना सतत आठवत राहते, “राजा, तू काय करतोस, काय नाही सगळं मला ठाऊक आहे, कर... कर... फक्त एक लक्षात ठेव. तुझ्याबद्दल कुणी चुकीचं बोललेलं मला चालणार नाही!”
अतिशय यशस्वी झालेल्या या मुलाला आणि उद्योजकाला आईचे बोल नेहमी माणूस राखतात. चुकू देत नाहीत. चुकलं तर झुकायचं, माफी मागायची, दुरुस्त करायचं, याचंही भान देतात. राजेश काजवे यांना बघताना वसंत बापट यांच्या एका कवितेतल्या ओळी आठवतात-
“अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे...”
..................................................................................................................................................................
लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.
sonali.navangul@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment