अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत ना. कुलकर्णी यांचं ‘ओळखीचे चेहरे’ हे पुस्तक नुकतंच प्रतीक प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील काहीशा दुर्लक्षित सहकलाकारांची ओळख करून दिली आहे. या कलाकारांचे चेहरे चित्रपटप्रेमींच्या ओळखीचे असतात, पण त्यांच्या संघर्षाविषयी, जीवनाविषयी त्यांना फारशी माहिती नसते. ते कुतूहल शमवणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं लेखकानं लिहिलेलं हे मनोगत...
..................................................................................................................................................................
पत्रकारितेत काम करत असताना आपल्या आवडीचं क्षेत्र (बीट) मिळालं की, खूप बरं वाटतं… मग ते भले मुख्य ड्युटीव्यतिरिक्त केलं जाणारं जादा काम का असेना. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये तशा पत्रकारांची संख्या खूप कमी असायची. त्यामुळे मुख्य ड्युटीव्यतिरिक्त अन्य कामांचाही भार असायचा. अर्थात आवडीचं काम असल्यामुळे त्या कामाचा ‘भार’ वाटायचा नाही. सांस्कृतिक व मनोरंजन हे क्षेत्र माझ्या आवडीचं होतं. त्यामुळे मी त्यासंबंधीचं अतिरिक्त कामही आनंदानं स्वीकारलं आणि पत्रकारितेबरोबरच सिनेपत्रकारिताही केली. ‘तरुण भारत’ आणि ‘लोकसत्ता’ (पुणे) या वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करत असतानाच मी सिनेसृष्टीशी जोडला गेलो. त्यामुळे एक सिनेपत्रकार म्हणून मी गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीतील घडामोडींशी परिचित आहे. चित्रीकरण स्थळाला प्रत्यक्ष दिलेल्या भेटी, पत्रकारपरिषदा आणि प्रीमीअर शोजला उपस्थिती, याद्वारे मी चित्रपट परीक्षणांसह चित्रपटविषयक भरपूर लेखन केलं.
त्यानिमित्तानं बदलत्या काळानुसार मराठी चित्रपपटसृष्टीत झालेले अनेक बदल मला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत नवतरुण कलाकारांचं युग अवतरलं आहे. पत्रकारपरिषदा, मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी झालेले ‘प्रीमिअर शोज’ आदींमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्याबरोबरच असंख्य अभिनेते आणि अभिनेत्रींच्या ओळखी झाल्या. त्यामध्ये पडद्यावरील नायक-नायिकांच्या भूमिका करणारे कलाकार तर होतेच, शिवाय अनेक सहकलाकारही होते. वास्तविक नायक-नायिकांइतकंच सहकलाकारांचंही महत्त्व असतं. मात्र अनेक सहकलाकारांच्या चांगल्या अभिनयाची पाहिजे तेवढी दखल घेत जात नाही, त्यांच्याकडे तसा कानाडोळाच केला जातो. प्रसिद्धीच्या पातळीवरही त्यांना तेवढा न्याय दिला जात नाही, याची खंत वाटत होती. त्यांच्यावर लिहिलं गेलं पाहिजे, त्यांच्या अभिनयातील ‘कर्तृत्व’ सर्वांना कळलं पाहिजे, असं वाटू लागलं. शेवटी तोही कलाकारच असतो. खूप प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देऊन तो कलेची सेवा करत असतो. मराठी चित्रपटांतील अनेक सहकलाकारांनी तर मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांतही भूमिका करून आपलं अभिनय-सामर्थ्य सिद्ध केलेलं आहे.
विशेष म्हणजे अशा सहकलाकारांना प्रेक्षकही पडद्यावर लगेच ओळखतात, मात्र नावाखेरीज त्यांच्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे अशा कलाकारांवरच लिहिलं पाहिजे, असं वाटू लागलं. त्यातून ‘ओळखीचे चेहरे’ या सदराचा जन्म झाला.
‘प्रीमिअर’ या सकाळ वृत्तपत्रसमूहाच्या चित्रपटसृष्टीला वाहून घेतलेल्या मासिकात मी अधूनमधून लेखन करतच होतो. त्यामुळे एकेदिवशी ‘प्रीमिअर’चे संपादकीय समन्वयक श्री संतोष भिंगार्डे यांना या सदराची कल्पना बोलून दाखवली. ही कल्पना त्यांना आवडली आणि त्यांनी त्यासंबंधीचा एक लेख पाठवून देण्यास सांगितलं. पहिलाच ‘ओळखीचा चेहरा’ चांगला असावा म्हणून प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे यांची त्यांच्या पुण्यातील कोथरूड येथील कार्यालयात जाऊन मुलाखत घेतली. तो ‘प्रीमिअर’च्या जानेवारी २०१६च्या अंकात प्रसिद्ध झाला. आणि त्या महिन्यापासून प्रत्येक अंकात मराठी चित्रपटसृष्टीतील एकेक सहकलाकार ‘ओळखीचा चेहरा’ होऊ लागला.
कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेऊनच त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं ‘अंतरंग’ ओळखण्याकडे माझा कटाक्ष असे. त्यामुळे बहुसंख्य कलाकारांच्या घरी जाऊन मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांचा जीवनप्रवास किती खडतर होता, याची कल्पना आली. त्यामुळे बऱ्याच कलाकारांचं वास्तवातलं जीवन अगदी जवळून पाहायला मिळालं. त्याचबरोबर ते काम करत असलेली चित्रपटसृष्टीची दुनिया किती मोहमयी आणि बेगडी आहे, याचीही जाणीव झाली.
रामचंद्र धुमाळ नावाचे वयोवृद्ध कलाकार (दुर्दैवानं करोना काळात त्यांचं निधन झालं) तर केवळ लहानपणी असलेल्या अभिनयाच्या आवडीपोटी चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी सुमारे ८० चित्रपटांत भूमिका केली. मात्र आर्थिक विपन्नावस्थेमुळे त्यांना शेवटपर्यंत चाळीतील पत्र्यांच्या दोन खोल्यांत राहावं लागलं. त्यांचं हे ‘वास्तव’ हे खरोखच अंतर्मुख करणारं होतं. दुसरे उमेश बोळके नावाचे कोल्हापूरचे तरुण कलावंत तर सुरुवातीला ‘रिक्षाचालक’ होते. मात्र अभिनयाची त्यांना प्रचंड आवड होती. एका मालिकेत काम मिळाल्यामुळे त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली, परंतु मुंबईला शूटिंग असल्यामुळे आणि मुंबईत राहण्याची सोय नसल्यामुळे (हॉटेलचे भाडे अर्थातच परवडण्यासारखे नव्हतं) ते ज्या दिवशी शूटिंग असेल, त्या वेळी कोल्हापूरहून मोटारसायकलने मुंबईला जात आणि शूटिंग संपलं की, पुन्हा परत कोल्हापूरला परतत. अभिनयाच्या प्रेमापोटी त्यांनी बरेच दिवस असे कष्ट सहन केले.
अशा सहकलाकारांच्या अभिनयाचा ध्यास वाखाणण्याजोगा आहे असं मला वाटतं. अनेक कलाकारांनी जिद्दीनं संघर्ष करत छोट्या-मोठ्या पडद्यावर आपला ‘चेहरा’ कायम प्रेक्षकांसमोर राहील यादृष्टीनं आपले प्रयत्न चालू ठेवले आहेत. त्याचं अप्रूप वाटल्यामुळेच त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
यातील बरेचसे कलाकार चित्रीकरणामुळे व्यस्त असायचे, मात्र त्यापैकी काही कलाकार मुंबईहून खास माझ्यासाठी पुण्याला आले आणि त्यांची भेट घेऊन मी त्यांच्यावर लेख लिहिले. अभिनेते मिलिंद शिंदे यांची पुण्याच्या एका स्टुडिओत जाऊन मुलाखत घेतली. कमलेश सावंत यांच्यासारख्या काही कलाकारांची मात्र मला नाईलाजानं दूरध्वनीवरून मुलाखत घ्यावी लागली.
‘ओळखीचे चेहरे’ हे सदर जवळजवळ तीन-साडेतीन वर्षं चाललं. दुर्दैवानं करोना महामारीचा फेरा आला आणि त्याचा फटका वृत्तपत्र उद्योगालाही बसला. ‘प्रीमिअर’ बंद करण्यात आलं. मात्र तोपर्यंत चाळीसहून अधिक कलाकारांचे ‘ओळखीचे चेहरे’ प्रसिद्ध झाले होते. नंतर त्याचं पुस्तक करावं अशी कल्पना माझ्या मनात आली.
प्रामुख्यानं चित्रपटविषयक पुस्तकंच प्रकाशित करणारे ‘प्रवीण प्रकाशन’चे श्री प्रवीण जोशी यांना हे पुस्तक प्रकाशित करण्याबाबतची कल्पना मी बोलून दाखवताच त्यांनी तात्काळ होकार दिला आणि अवघ्या तीन-साडेतीन महिन्यांत सर्व सोपस्कार पूर्ण करून पुस्तक माझ्या हातात ठेवलं.
या पुस्तकात काही निवडक सहकलाकारांचीच ओळख करून देण्यात आली आहे. वास्तविक अजूनही बरेच मराठी चांगले सहकलाकार आहेत, ज्यांची ओळख प्रेक्षकांना करून देण्याची गरज आहे. पुढे-मागे त्यांचाही जीवन परिचय करून देण्याचा मानस आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment