कृष्णाबाई माणुसकीचा दीपस्तंभ होत्या! माणुसकी, प्रेम आणि नेकी, या तीन गोष्टी त्यांच्या श्वासातून वाहत होत्या…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • कविवर्य नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे
  • Thu , 30 June 2022
  • पडघम साहित्यिक कृष्णाबाई सुर्वे Krushnabai Surve नारायण सुर्वे Narayan Surve

मराठीतील एक क्रांतिकारी कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या पत्नी, कृष्णाबाई सुर्वे यांचं मंगळवारी, २१ जून २०२२ रोजी नेरळ (ता. कर्जत) येथील राहत्या पहाटे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. सुर्वे दाम्पत्याच्या सहजीवनाचा वेध घेणारा हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

माझे शब्द तुम्हांला आमची कथा सांगतील

याच सोहळ्यासाठी दोन अश्रू जपून ठेवलेत.

- नारायण सुर्वे

ही कथा आहे दोन अनाथ जीवांची. एका कवीची, त्याच्या प्रेमाची आणि त्याला मिळालेल्या प्रेमाची.

करी रोडवरच्या चाळीत कृष्णाबाई तळेकर या मुलीचा जन्म १९२०च्या दशकात झाला. कृष्णाबाईंचं वय सव्वा वर्षाचं होतं, तेव्हा त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्या दुःखामुळे कृष्णाबाईंच्या आई पार्वतीबाई यांनी काजऱ्याचं फळ खाऊन आत्महत्या केली. त्या वेळी कृष्णाबाई पावणे दोन वर्षांच्या होत्या. अशी ही कृष्णाबाईंच्या जीवनाची सुरुवात.

नारायण सुर्वे यांची कविता आहे  -

“हे अखेरचे शब्द तिचे; ‘जाते रे’ डागीत गेलेले

वॉर्डमधील अंधार अधिकच गडद झाले

 

तिचे शव माझ्या पुढ्यात आहे

एक उघडा डोळा; माझ्यावर रोखलेला दुसरा मिटलेला, तिच्या मालकीचा;

 

विझतानाही श्वास पेरून गेली

पार्वती तळेकर काजऱ्याचं फळ खाऊन गेल्या, पण कृष्णाबाई नावाचा श्वास पेरून गेल्या.

कृष्णाबाई राहत होत्या, त्या चाळीत गंगाराम सुर्वे राहत होते. त्यांची बायको त्यांना सोडून गेली होती. कामाला जाताना त्यांनी कचराकुंडीजवळ एका बाळाचा आवाज ऐकला. त्यांनी त्याला उचलून घरी आणलं. त्याला ‘नारायण’ हे नाव दिलं. त्याला आपलं नावही दिलं. हेच बाळ पुढे कवी म्हणून ‘नारायण सुर्वे’ या नावानं नावारूपाला आलं.

कृष्णाबाईंचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. पुढे आजी गेली. कृष्णाबाईंना एकटेपणा वाटू लागला. नारायण सुर्वे त्या काळात कम्युनिस्ट पार्टीची कामं करत होते. इयत्ता तिसरी शिक्षण, पण एकूण ज्ञान वारेमाप. चळवळीतील भाषणं ऐकून आणि त्यांचा धीटपणा बघून कृष्णाबाईंना नारायणराव आवडू लागले. त्यांचं ज्ञान बघून त्या त्यांना मजेनं ‘मास्तर’ म्हणू लागल्या.

आजी गेल्यावर कृष्णाबाईंना एकटेपणा आसह्य झाला. त्यांनी मास्तरांना चाळीच्या जिन्यात गाठलं आणि मास्तरांना विनंती केली की, “मला तुमची सावली म्हणून जगू द्या. तुम्हाला काय करायचं ते करा. दुसरी बाई आणा, काहीही करा, मी तुमची साथ सोडणार नाही.”

मास्तरांनी कृष्णाबाईंचा उल्लेख ‘किशा’ असा केला! आजीने दिलेलं प्रेमाचं नाव मास्तरांच्या तोंडून ऐकून कृष्णाबाई मोहरून गेल्या. त्या मराठा आणि मास्तरांची तर जातच कुणाला माहिती नाही. घरातून विरोध झाला. त्या प्रकारात दोघांनाही चाळीचा आसरा सोडावा लागला. लग्न लागलं त्या दिवशी फुटपाथवर झोपायची पाळी होती.

नवीन लग्न झालेलं हे जोडपं दुकानं बंद झाली की, त्या समोरील गॅलरीत झोपायचं. सकाळी रस्त्यावर यायचं. कृष्णाबाई नेसत्या वस्त्रानिशी घर सोडून आलेल्या. मास्तरांच्या मित्रांनी दिलेल्या जुन्या साड्या नेसून त्यांनी संसारच्या सुरुवातीचे दिवस काढले. हे सगळे अनुभव हेच नारायण सुर्वे यांचं विद्यापीठ होतं. ‘माझे विद्यापीठ’ या कवितेत ते लिहितात -

ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती

दुकानांचे ओडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

 

अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता...

टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

१९५०च्या दशकातली ही गोष्ट. या गरिबीच्या परिस्थितीत लवकर मूल नको म्हणून ‘अडाणी’ कृष्णाबाईंनी कुटुंब नियोजन म्हणजे काय ते समजून घेतलं. त्यासाठी गोळ्यांचा वापर करायला त्या शिकल्या.

शेवटी काही दिवसांनी एक झोपडी राहायला मिळाली. रात्री मास्तर भजी घेऊन येत. तेच जेवण. कृष्णाबाई कधी कधी भाकरी करायच्या. दोघं त्या भाकरी कागदावर ठेवून खायचे. भांडीकुंडी घरात नव्हतीच. एके दिवशी ती झोपडी वादळात वाहून गेली. दोघांनी तीन दिवस मशिदीत आसरा घेतला. मास्तर तापानं फणफणले, तेव्हा तीन दिवस मशिदीत पडून राहिले.

मग दोघं धोबीघाटावर उघड्यावर राहिले. मग दुसरी झोपडी. पण एक होतं, या सगळ्या गरिबीत तारुण्याची आणि प्रेमाची श्रीमंती होती! 

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा

तेव्हाही रात्र अशीच होती ओढाळ.

खपत होतो घरासाठीच...

 

विसावत होतो शीण तुझ्या काठावर

तुझ्या खांद्यावर -

तटतटलीस उरी पोटी

तनु मोहरली गोमटी

एक कौतुक धडपडत आले; घरभरले.

रवींद्र सातव्या महिन्यात जन्मला. त्याही परिस्थितीत मास्तर मोहरून गेले.

चांदण्याच्या वेलीवर

झुलते का सोनफूल

मेघपाना आडुनिया

हसतची दावी भूल

 

दर्दभऱ्या कहाणीचा

शेवट गा आहे गोड

दुरावल्या आभाळाला

बालचंद्राचीच ओढ.

मास्तर खुश असले तरी कृष्णाबाई मात्र हैराण होत्या! अंगावर दूध येत नव्हतं. अन्न नसताना दूध कसं येणार? लोक म्हणायचे, पाणी पी भरपूर. कृष्णाबाई पोटाला तडस लागेपर्यंत पाणी प्यायच्या. काही उपयोग झाला नाही. कसा होणार? शेवटी पाण्यात अरारूट भिजवून ते पाणी कृष्णाबाई रवींद्रला देऊ लागल्या.

ती दुसरी झोपडी एका मुसलमान बाईने भाड्याने दिलेली. एके दिवशी ती झोपडीसुद्धा महानगरपालिकेकडून पाडण्यात आली. या सगळ्या धांदलीत मास्तरांना ४२ दिवसांचा टायफॉइड झाला आणि मग दोन न्युमोनियाचे अटॅक आले!

अशा या सगळ्या गोंधळातच मास्तरांचं वाचन चाले. चिमणीच्या प्रकाशात. रात्र रात्र वाचन! त्यातच एकदा वाचन करताना मास्तरांना झोप लागली आणि चिमणी कलंडली. घरातल्या एकुलत्या एका अंथरुणाला आग लागली. पराकोटीचं दारिद्र्य, पराकोटीची अस्थिरता आणि पराकोटीचं प्रेम या खदखदणाऱ्या रसायनांमधून मृत्यूच्या छायेत मास्तरांनी कृष्णाबाईंसाठी एक प्रेमगीत लिहिलं-

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर...

तू निःशंकपणे डोळे पूस....

ठीकच आहे चार दिवस उर धपापेल, जीव गदगदेल!

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर, नवे हिरवे चुडे भर

उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस!

खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे तर मला विस्मरून कर!

अमानवी गरिबीत मास्तर माणुसकी, संवेदनशीलता विसरायला तयार नव्हते. मग तिसरी झोपडी! मग मास्तरांना एका शाळेत शिपायाची नोकरी लागली. त्यात भागेना म्हणून मास्तरांनी कृष्णाबाईंसाठीसुद्धा शिपायाची नोकरी बघितली.

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा,

तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन

पंखांखाली बसलीस चार पिले ठेवून

कोनाडा हळहळला हळहळला - कळवळला.

‘नारायणा’ गदगदला.

“शिंक्यावरची भाकर घे' - पुटपुटला.

‘उद्यापासून तिलाही काम बघ बाबा.’

गांगरलो, भोवंडून स्थिर झालो.

तिच्या ओठावर ओठ टेकवून बिछान्यासह बाहेर पडलो. त्या रात्री,

तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले. अधिकच..

मास्तरांचा पगार पासष्ट रुपये. कृष्णाबाईंचा साठ रुपये. बाईंनी पाहिल्या पगाराचं बंद पाकीट मास्तरांच्या हातात दिलं, तसंच निवृत्त झाल्या, तेव्हा शेवटचं पाकीटही न उघडता मास्तरांच्या हातात दिलं.

मग परळला बोगद्याच्या चाळीत एक खोली मिळाली. त्या खोलीला ‘झाडूवाल्याची खोली’ म्हणत. त्यात भंगी लोक त्यांचे झाडू आणि बादल्या ठेवत. ब्लिचिंग पॉवडर, फिनेल असं सगळं ओतून ओतून कृष्णाबाईंनी तो वास घालवला. त्यांना तीन दिवस मळमळत होतं. मग कृष्णाबाईंनी स्वतः त्या अर्ध्या खोलीला रंग दिला, तिचा कायापालट केला. या अनुभवानं मास्तर हेलावले. एकीकडे विश्वाला कवेत घेणारी विशाल संवेदनशीलता आणि दुसरीकडे हे! त्यांनी लिहिलं -

राईचा पर्वत । पर्वताची राई ।

दोन्ही मज ठायी । सामावली ॥

ऐसा गा मी ब्रह्म । विश्वाचा आधार

खोलीस लाचार । हक्काचिया ॥

इथं सगळं वातावरण बदलून गेलं. पाणी, संडास आणि बाथरूम यांचे त्रास संपले. घर झालं. मास्तर दिवसा शिपायाची नोकरी करायचे, संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचं काम करायचे. अमर शेख यांच्यासारख्या शाहिरांमध्ये रमायचे.

मास्तरांनी स्वतःला पक्षकार्यात झोकून दिले. मोर्चे, संप, मिरवणुका आणि भाषणं! या वातावरणात मास्तरांना लिहावंसं वाटू लागलं. या चळवळीने मास्तरांची सामाजिक कविता घडवली. चळवळी हेच त्यांचं जीवन झालं.

अश्रूंच्या थेंबांत । पेटवीन वात ।

उजळीन पथ । जीवनाचा ॥

मास्तर कवी होत आहेत, हे बघून कृष्णाबाई खुश झाल्या. त्यांना मास्तरांना मोठं झालेलं बघायचं होतं.  केवळ तिसरी पास असलेले मास्तर आपल्या अफाट वाचनाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर कवी झाले होते. दारिद्र्य प्रतिभेला फार काळ आवर घालू शकत नाही.

माझी जखम जेव्हा घेते आभाळाचे रूप

त्याच व्यथेने का जळती सूर्य-चंद्राचे दीप

कृष्णाबाई नेटानं संसार चालवत होत्या. लोकांना दुधाच्या बाटल्या आणून देऊन पोरांसाठी कपभर दूध मिळवून आणत होत्या. कृष्णाबाईंचा झगडा पाहून मास्तर गलबलून जात होते. त्याच वेळी कृष्णाबाई त्यांची शक्तीसुद्धा होत्या.

गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो

तुझ्या मखमली कवेत स्वतःस अश्रूंसह झाकून घेतो

 

दिवसभर थकलेली तू तरीहि चैत्रपालवी होतेस

कढ उतू जाणाऱ्या दुधावर स्नेहमयी साय धरतेस

 

पदराने घाम टिपतांना नजरेला नजर भिडते

माझ्या केसांवरून तुझ्या पाचहि बोटांचे अमृत झरते

 

‘किती वाळलात तुम्ही’ पुन्हा व्याकुळ नजर मलाच शोधते

एवढ्या एकाच वाक्याने माझ्या हृदयाचे पोलाद होते

तेवढ्यात शेजारच्या कामगाराची बायको आपली लहानगी मुलगी मागे ठेवून मृत्यू पावली. विशालहृदयी कृष्णाबाईंनी आपल्या परिस्थितीचा विचार न करता तिची जबाबदारी घेतली. आपल्या पोरांमध्ये ही अजून एक! तिचं नाव बेबी होतं.

आपली चारही अपत्य कृष्णाबाईंनी शाळेत शिपायाची नोकरी करता करता शाळेतच वाढवली. शाळेच्या कुठल्या तरी कोपऱ्यात झोळणा करून त्यांना झोपवायचं. काम करता करता येता-जाता त्यांच्यावर लक्ष ठेवायचं.

थोडे पैसे साठल्यावर घरात वीज आली. मास्तरांच्या ओळखी चौफेर वाढल्या होत्या. केशव मेश्राम आणि शांता शेळके यांच्यासारखे प्रसिद्ध कवी घरी येऊ-जाऊ लागले. शांताबाई तर पोरांना फिरायला घेऊन जात. मुलींना माळा, रिबिनी आणि बांगड्या घेऊन देत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मास्तरांनी भाग घेतला होता. आचार्य अत्रे आणि त्यांची कन्या शिरीष पै यांचे मास्तर लाडके झाले होते.

मास्तर स्वतःला घडवत गेले. मोठे होत गेले.

आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही

उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही

 

कळप करून ब्रह्मांडात हंबरत हिंडलो नाही

स्वत:लाच रचीत गेलो; ही सवय गेलीच नाही.

या सगळ्या गोंधळात कृष्णाबाई स्वतःची सही करायला शिकल्या, कारण पगार घेताना सही करायला लागायची. आणि घड्याळ बघायला शिकल्या, कारण शाळेचे टोल द्यायला लागायचे. बाकी शिक्षण पोरांच्या उस्तवारीत जमलंच नाही. विणकाम मात्र हौसेनं आणि जिद्धीनं शिकल्या. मास्तर रात्र रात्र वाचन करायचे, कृष्णाबाई रात्र रात्र विणकाम करायच्या! काहीतरी छंद हवाच ना माणसाला!

तिसरी पास आणि शाळेत शिपाई असलेले मास्तर एकेदिवशी आपल्या सहावीतल्या मुलाला कविता आणि इतिहास शिकवत होते. कृष्णाबाई म्हणाल्या, ‘तुम्ही एवढं सुंदर शिकवता, मग तुम्ही मास्तरच का होत नाही?’ कृष्णाबाईंनी मास्तरांना सातवीची परीक्षा द्यायला लावली. त्या काळी सातवी, म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल, झालेली व्यक्ती शिक्षक होऊ शकत असे. मास्तरांचा मुलगा आणि मास्तर एकत्रच सातवी पास झाले. मग मास्तर पीटीसी म्हणजे आजच्या भाषेत डी.एड.ची परीक्षा पास झाले. इतके दिवस कृष्णाबाई त्यांना चेष्टनं ‘मास्तर’ म्हणायच्या, आता त्यांचे ‘मास्तर’ खरंच ‘मास्तर’ झाले होते. एकाच शाळेत कृष्णाबाई शिपाई, मास्तर ‘मास्तर’ आणि त्यांची मुलं विद्यार्थी...

मास्तरांना आता आपला कवितासंग्रह काढायचा होता. कृष्णाबाईंनी आपलं मंगळसूत्र विकून पाचशे रुपये उभे केले. मास्तरांचा ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचा एक हजार रुपायांचा पुरस्कार मिळाला. मास्तरांनी आपल्या ‘किशा’ने विकलेलं मंगळसूत्र तिला परत केलं.

पोरं मोठी झाली. घर अपुरं पडायला लागलं. मग चिंचपोकळीला वन बेडरूम हॉल किचन असं घर मिळालं. इथं तर टॉयलेट आणि बाथरूम स्वतंत्र होतं! कृष्णाबाईंना तर हा महालच वाटला. शिरीष पै यांनी येऊन मॅचिंग पडदे वगैरे लावून दिले. घर सजलं!

संसार स्थिरावला असं कृष्णाबाईंना वाटलं आणि त्यांच्या मनाने लहानपणापासून दाबून ठेवलेला ताण मोकळा सोडला. संसारासाठी दाबून ठेवलेला दुःखाचा बांध फुटला. हे सारं संपून जाईल काय, या भीतीनं त्यांचं डोकं दुखू लागलं. चिंचपोकळी स्टेशनजवळील दंगलीत दिसायला मास्तरांसारख्या असणाऱ्या एका भय्यावर वार होताना त्यांनी गॅलरीतून पाहिलं. तेवढ्यात एक चिमणीचं घरटं खाली पडलं. चार पिल्लं मेली. कृष्णाबाई गॅलरीतच कोसळल्या.

त्यांच्यावर केईएममध्ये मानसोपचार झाले. शॉक वगैरे! घरी आल्यावर कृष्णाबाई मास्तरांच्या गळ्यात पडून धो धो रडल्या. आयुष्यात प्रथमच! तुम्ही मला सोडून जाणार नाही ना, म्हणून रडत राहिल्या. कधीही न सोडण्याचं वचन मास्तरांकडून घेतलं. मग पुढे वर्षभर इंजेक्शनं आणि शॉक वगैरे घेत आणि इतर उपचार घेत शाळेतली नोकरी केली.

अनाथ कृष्णाबाई त्याही अवस्थेत सगळ्या घराची जान होऊन गेल्या होत्या, साऱ्या घराच्या श्वास होऊन गेल्या होत्या. त्यांच्यामुळे सगळं घर सनाथ, जिवंत होतं. शाळेत शिपायणीची नोकरी करून कृष्णाबाई घरी येत होत्या, स्वतःला घरकामाला जुंपत होत्या. त्यांची ही सारी लढाई बघून मास्तर गलबलून जात होते. ते लिहीत होते. -

खुराड्यातील जग माझे

उठते ग कलकलून

तू येतेस जेव्हा दमून

 

खिडकीत येऊन बसे

आकाशाचे पाखरू छान

तू येतेस जेव्हा दमून

 

गोबऱ्या गोबऱ्या गालाचा

ससा नेमका उठे हसून

तू येतेस जेव्हा दमून

 

तू येतेस जेव्हा दमून

येती श्वासच परतून

घरात शीतळसे ऊन.

मास्तरांना ‘सोव्हिएत लॅंड नेहरू’ पारितोषिक मिळालं. ते स्वीकारण्यासाठी ते रशियाला गेले. कृष्णाबाईंना केवढा आनंद. पण तो आनंद एक-दोन दिवसच टिकला. त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. मास्तर रशियात असतानाच कृष्णाबाई स्वतःच्या हिमतीवर गर्भाशय काढून टाकण्याच्या ऑपरेशनला सामोऱ्या गेल्या. मास्तर परत आल्यावरच त्यांना ही गोष्ट कळली. मास्तर म्हणाले, “किशा, कसं ग सगळं सांभाळून नेतेस?” कृष्णाबाई त्या एका वाक्यानंच सुखावल्या.

रवीच्या लग्नात कुसुमाग्रजांनी रस घेतला. मुलगी सुचवली. मास्तर त्यांचे मानसपुत्र आणि कृष्णाबाई त्यांची सून होत्या. कुसुमाग्रजांनीच बैठक घेतली. लग्न ठरवलं. लग्नाला भीष्म सहानी, कैफी आझमी, सरदार जाफरी, कृष्णा चौधरी असे सगळे आले. ते मास्तरांचे कम्युनिस्ट दोस्त! वासंती मुजुमदार पदर खोचून कामाला आल्या. नरहर कुरुंदकर अचानक घरी आले. म्हणाले, ‘नारायणाला भाऊ नाही म्हणून आलोय’. त्यांनी कृष्णाबाईंना पाटावर बसवलं. स्वतः त्यांची ओटी भरली. त्यानंतर कितीतरी वेळ कृष्णाबाईंचे डोळे पाझरत होते.

या नंतर सांभाळलेल्या बेबीचं लग्न झालं! मास्तरांनी त्यासाठी सातशे रुपयांचं कर्ज घेतलं. कृष्णाबाई आणि मास्तर हे जोडपंच विलक्षण होतं!

मग अंधेरीला स्वतःचं घर झालं. चिंचपोकळी सुटली. सेवानिवृत्ती घेऊन मास्तर साहित्यसेवा करायला मोकळे झाले.

एवढ्यात मास्तरांचे बाबा गंगाराम सुर्वे आजारी पडले. मास्तर बाहेरगावी होते. बाईंनी त्यांना कूपर हॉस्पिटलला हलवलं. शेवटची घटका आली, तेव्हा हातातले चार आणे त्यांनी कृष्णाबाईंच्या हातात आशीर्वाद म्हणून दिले आणि ते गेले.

कृष्णाबाई मडकं धरायला आणि अग्नी द्यायला पुढे आल्या. मास्तरांना ज्या व्यक्तीनं आपलं नाव दिलं होतं, त्या व्यक्तीला त्यांना आदबीनं आणि आपुलकीनं विदा करायचं होतं. पण शेवटच्या क्षणी मास्तर पोहोचले. मास्तरांनी अग्नी दिला. मास्तर आणि कृष्णाबाई, दोघांनाही भडभडून आलं.

झिजला चंदनासम बाप; मीही तसाच, अन् हे माझे कळे?

अशाच त्यांनाही उदास रात्री, सोबतीस काळोखाचे गार वेटोळे

ओसंडु पहातो आहे हृदयघट; सांग कुठे करू रिता

घडवुन गेला माझा बाप तुजसम स्फूर्तिशाली कविता.

गंगाराम सुर्वे यांची आठवण म्हणून मास्तरांनी गावाच्या शाळेला देणगी दिली. त्या शाळेचं नाव ‘गंगाराम सुर्वे विद्यालय’ असं झालं.

रवीची मुलगी आणि कल्पनाची मुलगी या दोघींना आजोबा-आजीचा इतका लळा लागला की, दोघीही त्यांच्याच घरी येऊन राहिल्या. घराचं खऱ्या अर्थानं गोकूळ झालं. दोघींचं कॉलेजपर्यंतचं शिक्षण यांच्याच घरी झालं.

कृष्णाबाईंनी ‘मास्तरांची सावली’ या नावानं आत्मचरित्र लिहिलं. मनात साठलेलं सांगायचा प्रयत्न केला. त्याच्या प्रकाशनानंतर एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “माझ्या मास्तरांना संसारात मीच आणलंय, तर माझी अशी इच्छा आहे की, माझ्या आधी मास्तर गेले, तर त्यांचे सर्व सोपस्कार मी स्वतः करीन आणि त्यांना आनंदाने निरोप देईन.”

त्यांच्या या वाक्यावर भयंकर टीका झाली. पण कृष्णाबाईंचं म्हणणं असं होतं की, ‘माझ्या मागे मास्तर जर लाचारासारखे कुणाच्या दारात गेले, तर माझा प्राण तडफडत राहील. बाईमाणसाची जात चिवट असते आणि कणखरही. नवऱ्याच्या मागं सगळा डोलारा ती पूर्णपणे सांभाळते, पण नवरा मात्र बायको नसली की, पांगळाच होऊन जातो. मला मास्तरांना असं पांगळं झालेलं पाहायचं नाही.’

मास्तर म्हणाले, “किशा, तू खरंच धन्य आहेस, कुठून शिकलीस तू हे बोलायला?” बाहेर कुणी काही बोललं तरी विंदा करंदीकर मास्तरांना म्हणाले, “तुझ्या बायकोला माझे प्रणाम सांग.”

मास्तरांचं बाईंकडे आणि घराकडे लक्ष तसं कमीच होतं. ते साहित्यविश्वात मश्गूल होते. एके दिवशी कृष्णाबाईंनी त्यांना विचारलं, “मास्तर तुमचं कुठं प्रेमबिम जमलंय का? मी ही अशी अडाणी बाई. तुम्हाला तुमच्या योग्यतेची, तुमच्या कवितांवर प्रेम करणारी कुणी आवडली आहे का?”

मास्तर म्हणाले, “नाही ग किशा, तू इतकं माझं सगळं करतेस. माझ्यावर जीव टाकतेस. तसं पाहिलं तर मीच तुझ्यापुढे शून्य आहे. तुझ्यामुळं मी इथवर आलो, पण मी मात्र तुला काहीच दिलं नाही. माझ्या मनात दुसऱ्या स्त्रीचा विचार कधीही येणार नाही.”

बाई म्हणाल्या, “तुम्ही एखादी आणली तर मी तिचाही स्वीकार करेन. नाहीतरी मलाही बहीण नाहीच आहे.” कृष्णाबाईंना मास्तरांची ‘पहारा’ ही कविता आठवली असती तर त्या इतक्या असुरक्षित झाल्या नसत्या.

तुझ्या पापण्यांचा पहारा माझ्या शब्दांवर असतो

म्हणून माझ्या पद्यपंक्तीत व्यभिचाराचा अंश नसतो

सदैव माझ्या कवितेत सत्याचा सहवास असतो.

 

मिळविलेले सारे साठवितेस जपतेस फोडासारखे

जसे झाड जपते फुलास; आकाश जपते सूर्याला

सुखदुःखांतहि तुझ्या स्नेहाचा धूपदीप जळत असतो.

 

कधी शब्दांच्या पलटणी खांद्यावर रायफली घेतात

कधी डुलणारी शेते; कधी बंडवाले कामगार होतात

शब्द झुंजतात गरूडासम तुझ्या मुठीत मेघझरा असतो.

झाड आपल्या फुलाला जपतं. झाडानं फुलाआधी कसं जावं? कृष्णाबाईंशी झालेल्या त्या संवादानंतर मास्तर जरा अधिक वेळ घरी राहू लागले. कविता आणि श्रीरंगचं लग्न झालं. त्यांनाही अपत्यं झाली. चार अपत्यांचं करून झाल्यावर बाई चार नातवंडांचं करू लागल्या. त्यांचे स्वतःचे आईबाप दूर राहत असतानासुद्धा!

पुढे रवीला आणि श्रीरंगला दारूचं व्यसन लागलं. रवीचा मुलगा मेंदूचा विकार होऊन विकलांग झाला. श्रीरंग यकृताच्या आजारानं गेला. पाठोपाठ त्याची पत्नी सुनीता कॅन्सरनं गेली. शोकांतिकांची रांगच्या रांग!

श्रीरंग गेल्याच्या अकराव्या दिवशी मास्तरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. पुरस्कार घ्यायला कसे जायचे? मास्तरांचा पाय हलत नव्हता. बाई त्यांना म्हणाल्या, “माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. तो त्याच्या कर्मानं गेला. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं पुरस्कार मिळतो आहे. त्याचा अव्हेर करू नका.”

बाईंकडे पराकोटीचा बॅलन्स होता. ज्याचं त्याचं माप बाई ज्याच्या त्याच्या पदरात घालत राहिल्या. उतरत्या वयात पोरांच्या आधाराची अपेक्षा न धरता, त्यांनी ज्याचे त्याचे गुणदोष आपल्या आत्मचरित्रात लिहिले.

मग नातवंडांची शिक्षणं आणि त्यांची लग्नकार्य! पुढे जमेना तेव्हा श्रीरंगाच्या मुलीची जबाबदारी त्यांनी आपल्या मुलीवर, कल्पनावर, सोपवली. तिनेही ती उचलली आणि पार पाडली. मास्तरांच्या हृदयाचं ऑपरेशन झालं. त्याचा खर्च कसा होणार, या विवंचनेत बाईंचा जीव एवढा एवढा झाला. मास्तरांची कवी म्हणून पुण्याई मोठी होती. महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहिला.

मग बाई आणि मास्तर राहण्यासाठी नेरळला गेले. अंधेरीचं घर मास्तरांना का विकावं लागलं, याच्या साहित्यविश्वात खूप चर्चा झाल्या. बाईंनी यातलं काही आत्मचरित्रात लिहिलं नाही. मास्तर आणि कृष्णाबाई त्याबाबत कुणाशी काही बोलले नाहीत. ‘मास्तरांना निसर्गरम्य नेरळ आवडलं म्हणून आम्ही नेरळला घर घेतलं’ एवढंच कृष्णाबाईंनी लिहिलं.

आपलेच घर जेव्हा

आपणाशी वैर धरते

अशावेळी हे हृदया

कोठे जावे तेवढे सांग

 

मालवले जातात दिवे

एकापाठोपाठ एक

कोठून आणाव्या ज्योति

हे हृदया तेवढे सांग

 

धक्के मारून काढावा

बिन्हाडातील भाडेकरू

पुन्हा यावे आडोशाला

अशी दैना का गा सांग

मास्तरांचा आणि कृष्णाबाई यांची कुठलीही चूक नसताना अंधेरीचं घर त्यांना विकावं लागलं. एवढे कष्ट करून सगळं रचलं होतं. उतारवयात ऐन वस्तीतलं घर सोडावं लागलं. तरुणपणात दुःख त्यांची पाठ सोडायला तयार नव्हतं. त्यांना उसंत द्यायला तयार नव्हतं. त्यावर मास्तरांनी कविताही लिहिली होती-

जीवनाच्या कावडीतून

दुःखगंगेचा भार वाही

आज मला उसंत नाही

 

चार उष्टेचे दीनार

कलाबुती नक्षी मिनार

याच विटक्या शय्येवर

माझे मरण मीच पाही

 

फूल होऊन सजलो

चांदणे लेवून नटलो

भीर्रर्र गगनी उडालो

आढळले पाश पायी

 

टपटपलो मेघांतून

सळसळलो लाटांतून

घळघळलो अश्रूंतून

रिक्तच शामल धरा ही

आता उतारवयातही हीच कविता पुन्हा एकदा लिहावी, असं त्यांना वाटत असावं.  रोमँटिसिझम आणि न्याय या दोन गोष्टी मास्तरांच्या ‘पॅशन्स’ होत्या. माणुसकी, प्रेम आणि नेकी या तीन गोष्टी कृष्णाबाईंच्या श्वासातून वाहत होत्या.

नेरळला मास्तर एकटे पडले. सतत माणसात राहिलेल्या मास्तरांच्या दृष्टीनं ही फार मोठी शोकांतिका होती. पोरांचं व्यसनी होणं, श्रीरंग आणि सुनीताचा मृत्यू आणि त्यात आता हे! मास्तर खचून गेले. कृष्णाबाई त्यांना सांभाळत राहिल्या, त्यांचं वाचन-लेखन अव्याहत कसं चालू राहील, याची काळजी करत राहिल्या.

पुढे, उत्तम कांबळे, राजीव नाईक यांनी मास्तरांना नाशिकला न्यायचा घाट घातला. मास्तरांना माणसांत न्यायचा प्रयत्न केला. एका मोठ्या बंगल्यात त्यांची व्यवस्था केली. पण तिथं मास्तर आणि कृष्णाबाई रमू शकल्या नाहीत. मास्तरांची तब्येत तोळामासा झाली. सारखी आजारपणं आणि दवाखाना!

मास्तरांनी एकदा अचानक कृष्णाबाईंना हिरवी साडी नेसायला सांगितली. त्यांना कृष्णाबाईंना एकदा शेवटचं हिरव्या साडीत पाहायचं होतं. त्यांच्याबरोबर शेवटचा फोटो काढायचा होता. बाईंना मास्तरांची ‘तेव्हा एक कर’ ही कविता आठवली -

बाईं लिहितात, “ते असं म्हणाले आणि माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. मनात चरकलं. क्षणभर वाटलं, मास्तर मला ‘कसला तरी’ संकेत तर देत नाहीयेत ना! त्यांच्या त्या कवितेतले शब्द तर खरे करू पाहत नाहियेत ना!”

पण खरं तर, मास्तरांना आपल्या किशाला डोळे भरून पाहायचं होतं. या जीवनाच्या झटापटीत त्यांना कृष्णाबाईंकडे पाहायलाच मिळालं नव्हतं. हिरवी साडी नेसायला सांगताना मास्तरांच्या मनात वेगळीच कविता होती.

“- छानसे घरकूल नांदते गुलमोहोराखाली

केवळ कांकणे किणकिणली असती.

रोजच आला असता चंद्र खिडकीत

नक्षत्रांपलीकडची एक दुनिया असती.

भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र

आम्हीही कुणाची याद केली असती.”

शेवटच्या आजारांमध्ये मास्तर ‘किशा, किशा’ अशा हाका मारत राहिले. दवाखान्यामध्ये कृष्णाबाईंशिवाय केविलवाणे होत गेले.

दुःखादुःखांतील तरतमभाव पाळला

दर खेपेस असे जगणे कठीण गेले

हमेशाच जमवून घेणे कठीण गेले

म्हणून म्हटले; एकदाची कापावी नाळ

म्हणता, म्हणता कैक ऋतू उडून गेले.

कृष्णाबाईंची साथ सुटणार आहे, हे डोळ्यानं दिसत असताना दुःखादुःखातला तरतमभाव कसा पाळला जाणार? ही नाळ कापायला मास्तरांचा हात आणि मास्तरांचे अंतर थरथरत होते! खूप वर्षांपूर्वी मास्तरांनी ‘क्षण माघारी गेले’ ही अतीव सुंदर कविता लिहिली होती.

मलाहि वाटते तिला हात धरून न्यावे

निळ्या सागराच्या कुशीत बिलगून बसावे

विसरावे तिने अन् मीहि भोगलेले दुःख

एकमेका खेटून सारस जोडीने उडावे

 

झिमझिमत्या मेघधारेत दोघांनी भिजावे

तिच्या बिलोरी चेहऱ्यावरील थेंब मी पुसावे

थोडे तिने रुसावे आणि मीहि समजवावे

क्षणांत ढगाळलेले आकाश लख्ख व्हावे

 

रात्र संपूच नये अधिकच देखणी व्हावी

झाडे असूनहि नसल्यागत मला भासावी

तिची रेशीम कुरळबटा गाली झुळझुळावी

माझ्या बाहूत पडून स्वप्ने तिने पाहावी

 

मऊ कुंतलांत फिरणारी बोटे झिणझिणावी

तिच्या श्वासांची पाखरे गालांवर फडफडावी

असे कैकदा वाटूनहि क्षण माघारी गेले

वाटेतच निरोप घेऊन ‘लोकल’ धरावी.

कृष्णाबाईंना मास्तरांनी आपल्या कवितेत सेलिब्रेट केलं होतं. त्या सगळ्या कविता ज्या जीवनानं दिल्या होत्या, त्या जीवनाच्या हाती सुपुर्द करून आपल्याला जावं लागणार, हे मास्तरांना कळत होतं. क्षण, माघारी फिरायला लागले होते. पण मास्तरांना कृष्णाबाईंवर अजून प्रेम करायचं होतं.

शेवटी मास्तर गेले. दवाखान्यामध्येच गेले. कृष्णाबाई घरी होत्या. आपण मास्तरांचा निरोप घेऊ शकलो नाही, हे त्यांच्या मनाला खूप लागलं. मास्तरांना नेरळच्या घरी आणतील, असं त्यांना वाटलं होतं, पण त्यांना दादरच्या एका हॉलमध्ये नेलं गेलं. बाईंनी त्यांचं दर्शन तिथंच घेतलं. स्मशानात मास्तरांना बंदुकांची सलामी दिली गेली. मास्तरांना आपणच अग्नी द्यावा, अशी बाईंची इच्छा होती. पण विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाले. बाईंना मास्तरांना खराखुरा निरोप देता आला नाही. आता मास्तरांचं जिवंतपण संपलं होतं, त्यांचे जिवंत शब्द संपले होते. स्मशानात जमलेल्या त्या गर्दीत दुःख व्यक्त करणारे पोशाखी शब्द उरले होते. मास्तर लिहून गेले होते -

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते; मरताना तेही बापडे दडतील

स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

मायेची आजी गेली, तेव्हा कृष्णाबाईंनी चाळीच्या जिन्यात मास्तरांना अडवून त्यांला मागणी घातली होती. त्यांना प्रेमाच्या सोबतीला बोलावलं होतं. त्यांना संसारात ओढलं होतं. त्या संसाराची अखेर झाली. एका कवीचं आयुष्य बाईंनी घडवलं होतं, तो दिगंताच्या यात्रेला निघून गेला.

बाई पुन्हा एकदा एकट्या पडल्या. मधल्या काळात त्यांच्या प्रेमात पडून मास्तरांनी बेफाम आणि इंटेन्स प्रेम-कविता लिहिली होती. ती बाईंपर्यंत पोहोचली होती का? मास्तर कविता लिहून झाली की, त्यांना वाचून दाखवत. आपण अडाणी आपल्या तोंडातून काहीतरी चुकीचं जायला नको म्हणून बाई काहीच बोलत नसत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मास्तर गेल्यावर बाई १२ वर्षं जगल्या. त्यांच्या या काळाविषयी फारसं लिखाण झालेलं नाही. काहीही झालं तरी कृष्णाबाई माणुसकीचा दीपस्तंभ होत्या. शेवटच्या आजारपणांच्या वादळातसुद्धा त्या तशाच माणुसकीनं तळपत राहिल्या असणार.

मास्तरांना निरोप देऊन आपण नंतर जायची कृष्णाबाईंची इच्छा होती. ती मात्र पूर्ण झाली. कृष्णाबाई आधी गेल्या असत्या तर संवेदनशील मास्तरांचं काय झालं असतं, याचा विचारही करवत नाही. मास्तर पहिल्यांदा गेले. त्यांची प्रेमकविता कृष्णाबाईंची साथ करायला त्यांच्या मनात थांबली असणार. कृष्णाबाई गेल्यावर आता ती मास्तरांच्या कवितासंग्रहांत परत जाईल.

संसार कृष्णाबाईंचा होता. त्यांनी मास्तरांना मागणी घालून तो सुरू केला होता. फारसं काही न बोलता, त्यांनी तो मास्तरांना जपत जपत जमेल तसा पैलतीराला लावला होता. संसार कृष्णाबाईंचा होता आणि त्या संसारातली प्रेम-कविता मास्तरांनी लिहिली होती. संसार त्यांचा आहे, तर कृष्णाबाईंनी आपलं प्रेम शब्दांतूनसुद्धा व्यक्त करावं, असं मास्तरांना खूप वाटत होतं. पण कृष्णाबाई फक्त कृतीतून प्रेम व्यक्त करत राहिल्या. 

उरावर दगड ठेवून बोलू नको; बोलवणार नाही

सूर तुझे, लय तुझी, तारा तू पिळल्यास, मी नाही

 

तू बोलत रहा; सारखी बोलतच रहा प्रिये...

अजून हृदय तृप्त भरून उतू गेलेले नाही

 

खूप दूरवर नांगरून पडला आहे उजेड

खुषीत आहे मी; तुझे फूलपण तुला विसरले नाही

 

उरावर दगड ठेवून बोलू नको; बोलवणार नाही

सूर तुझे, लय तुझी, तारा तू पिळल्यास, मी नाही.

कृष्णाबाई मास्तरांचं झाड होत्या, मास्तर त्यांचं फूल होतं. या झाड होण्याच्या प्रकरणात बाई आपलं फूलपण विसरल्या होत्या. पण कृष्णाबाईंचं फूलपण संसारात त्यांच्या नकळत कुठे कुठे उमटत राहिलं असणार. मास्तर म्हणत, ‘तुझे फूलपण तुला विसरलेले नाही’. मास्तरांच्या कठीण आयुष्यातला तोच एकमेव असा मोठा आनंद होता.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : ...अन् ही कृष्णाबाई तळेकर, कृष्णाबाई सुर्वे झाली. मग पुढे कुठे जायचं? घरदार नव्हतंच…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......