अजूनकाही
धर्मा प्रोडक्शन्सचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या नावाचा चित्रपट येत आहे. त्यात निर्माता-दिग्दर्शकांनी माधुरी-संजय दत्त यांच्या 'थानेदार' चित्रपटातलं 'तम्मा तम्मा' गाणं 'रिक्रिएट' केलं. या गाण्यावरून काही दिवसांपूर्वी बरंच वादंग उठलं होतं. हीच धून असणारं अजून एक गाणं अमिताभ बच्चनच्या 'हम' चित्रपटात (जुम्मा चुम्मा) वापरलं होतं. 'थानेदार'ला बप्पी लाहिरी यांचं संगीत होतं, तर 'हम'ला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. तर त्यावेळेस ही धून कुणाची यावरून बप्पी लाहिरी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यात जोरदार भांडण झालं. दोन्ही बाजूंनी ओरिजनल धून आपलीच असून, दुसऱ्याने ती ढापली आहे, असा आरोप उच्चरवात केला गेला. प्रसारमाध्यमांतून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. नंतर काही वर्षांनी उघडकीला आलं की, हे गाणं या दोघांचंही नव्हतं. हे कम्पोज केलं होत गयानामधल्या मॉरी कांटे या कलाकारानं. आपल्या गाण्यावरून भारतासारख्या देशात रण माजलं आहे, याची त्या मनस्वी कलाकाराला खबरही नव्हती. एखाद्या घरात दोन चोर शिरावेत, तिथल्या एका मूल्यवान दागिन्यांवर दोघांचीही नजर पडावी, दोघांचा हा दागिना कोण चोरणार यावरून भांडण सुरू व्हावं आणि घरमालक गाढ झोपेत असावा, असाच काहीसा हा प्रकार झाला!
करण जोहरलाही 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मधल्या गाण्याचं श्रेय मॉरी कांटेला द्यावंसं वाटलं नाही.
संगीत चौर्य म्हटलं की, भारतीय लोकांना हटकून आठवतात ते अनु मलिक (याच्यावर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याचा आरोप पण आहे) आणि प्रीतम. पण आपली संगीतचौर्याची थोर परंपरा फार मोठी आहे. कोण नाहीत या परंपरेचे पाईक? आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी (यांनी एका गाण्यात मोझार्टच्या सिम्फनीवरच डल्ला मारला होता), शंकर -जयकिशन, राजेश रोशन, नदीम श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित आणि आपले बहुतेक दिग्गज संगीत दिग्दर्शक या संगीत चौर्याच्या महान परंपरेचे पाईक आहेत. अनेक लोकांच्या तरुणपणीच्या रम्य आठवणींचा नॉस्टॅल्जिया हा यांच्या संगीतावर चालतो. अनेक लोक आपल्या आवडत्या संगीतकारांच्या इतके प्रेमात असतात की, मग ते ‘शंकर-जयकिशन नाईट’ किंवा ‘एक शाम नय्यर के साथ’ असे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांनी सहीसही उचललेल्या गाण्यांची हिंदी व्हर्जन्स ऐकत आपल्या नॉस्टॅल्जियाच्या नावानं उसासे टाकतात.
या संगीत चौर्य करणाऱ्या लोकांचं व्यक्तिस्तोम इतकं मोठ्या प्रमाणावर माजलं आहे की, त्यांच्या संगीतचौर्यावर काही ऐकून घेण्याचीही त्यांची तयारी नसते. या लोकांनी स्वतःची अशी सुंदर गाणी केली आहेतच यात वादच नाही. पण या संगीतदिग्दर्शकांनी अनेक गाणी मूळ संगीतकारांची परवानगी न घेता अमेरिकन, युरोपियन, आफ्रिकन आणि अगदी पाकिस्तानी गाण्यांच्या धून इथं स्वतःच्या नावावर बिनदिक्कत खपवल्या आहेत, हे मान्य करावं लागतंच. 'मन' हा आमिर खानचा चित्रपट सगळ्यांना आठवत असेल. चित्रपट तिकीटखिडकीवर आपटला असला तरी त्याचं संगीत सुपरहिट होतं. या चित्रपटाला नदीम-श्रवण जोडगोळीतल्या श्रवणची मुलं असणाऱ्या संजीव-दर्शनच संगीत होतं. या 'मन' चित्रपटाच्या नावानं एक आगळा वेगळा विक्रम आहे. त्या चित्रपटातलं प्रत्येक गाणं हे अनु मलिकच्या शब्दांत सांगायचं तर 'इन्स्पायर्ड' आहे. संगीतचोरीचा हा आगळा वेगळा लाजिरवाणा विक्रमच!
जेव्हा हे संगीतचौर्य जोरात चालू होतं, तेव्हा भारत उर्वरित जगाशी जोडला गेलेला नव्हता. उर्वरित जगातल्या संगीतकारांनाही भारतासारख्या तिसऱ्या जगातल्या देशात आपलं संगीत चोरलं जातंय याची कल्पना नव्हती. त्यामुळे सुमडीत हा उद्योग बराच काळ चालला. विदेशी संगीत ऐकणाऱ्यांची आपल्याकडची संख्याही अतिशय अल्प होती. जागतिकीकरणानंतर परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या भारत उर्वरित जगाशी जोडला जाऊ लागला. विदेशी संगीतकारांचं संगीत हळूहळू आपल्याकडे यायला लागलं आणि आपल्याकडच्या संगीतदिग्दर्शकांचं चौर्यकर्म उघडकीस यायला लागलं. इंटरनेटची व्याप्ती जशी जशी वाढायला लागली, तसं तसं हे चौर्यकर्म अजून वेगानं उघड पडायला लागलं. ‘आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ युगात युट्युबवर तुम्ही लगेच चोरलेली गाणी शोधू शकता. अनेक भारतीय लोकांनीही संगीतचौर्यावर संशोधन करून पुराव्यांसकट आपल्या संगीतदिग्दर्शकांची चोरी उघडी केली. सज्जाद किंवा रेहमानसारखे काही लखलखीत अपवाद वगळता थोड्याफार फरकानं आपले बहुतेक संगीतकार सांगीतिक चौर्यात लिप्त आहेत, ही गोष्ट या संशोधनावरून उघड होते.
या संगीतकारांच्या चोरीचं समर्थन करणारे एक बाजू मांडतात. त्यांचं मत असं असतं की, या संगीत दिग्दर्शकांनी 'मध्यस्थाची' भूमिका बजावल्यामुळे तेव्हाच्या भारतीय प्रजेला जागतिक दर्जाचं संगीत ऐकायला मिळालं. पण ही 'मध्यस्थी' ओरिजनल संगीतकाराला श्रेय देऊनही करता आली असतीच की! त्यामुळे या युक्तिवादात फारसा दम नाही.
पण फक्त संगीतचौर्याबद्दल बोलणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होईल. आपले चित्रपटलेखक, दिग्दर्शक हेही मोठ्या प्रमाणात दुसऱ्यांची कलाकृती चोरण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपले अनेक गाजलेले चित्रपट हुबहू इंग्रजी, कोरियन, तुर्की सिनेमांची नक्कल आहेत. इतकंच काय आपल्या सिनेमांच्या पब्लिसिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोस्टरच्या कल्पनाही चोरलेल्या असतात. भारतीय लोक आपल्या अनैतिक वागण्यासाठी जगात ओळखले जातात. आपण पायरेटेड चित्रपट बघतो, पायरेटेड संगीत ऐकतो, पायरेटेड सॉफ्टवेअर्स वापरतो, ट्रॅफिक पोलिसला चिरीमिरी देतो आणि त्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही. अशा देशात संगीतचौर्य हा फारसा महत्त्वाचा मुद्दा असूच शकत नाही. कारण एक समाज आणि एक देश म्हणून आपण कायमच ‘जुगाडू’ होतो आणि राहू.
शेवटी एक मुद्दा स्पष्ट करणं जरुरी आहे. वर ज्या संगीत दिग्दर्शकांच्या चौर्यकर्माचा उल्लेख केला आहे, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. या लोकांनी अनेक सुमधुर ओरिजनल गाणीही बनवली आहेत हेसुद्धा मान्यच आहे. पण त्यांच्या कारकिर्दीचं सकल मूल्यमापन करताना त्यांच्या संगीतचौर्याचा हिशेबही मांडायला हवाच. ज्यानं ओरिजनल गाणं बनवलेलं असेल, त्याला उशिरा का होईना श्रेय द्यायला हवं. परिस्थिती हळूहळू बदलत आहे. अनेक विदेशी स्टुडियोजची आणि म्युझिक लेबल्सची ऑफिस भारतात आली आहेत. ते आपल्याकडच्या चित्रपटविषयक आणि संगीतविषयक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. मध्यंतरी बी. आर. चोप्रांच्या प्रोडक्शन हाऊसने गोविंदा आणि लारा दत्ताला घेऊन ‘बंदा ये बिंदास है’ नावाचा चित्रपट सुरू केला. तो चित्रपट 'माय कझिन विन्नी' या चित्रपटाची सहीसही नक्कल होती. पण ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्स या मूळ निर्मात्यांना याची भनक लागली. त्यांनी लगेच कोर्टात निर्मात्यांविरुद्ध खटला गुदरला. कोर्टात सिद्ध झालं की, चोप्रांचा चित्रपट ही 'माय कझिन विन्नी'ची नक्कल आहे. निर्मात्यांना एक कोटी रुपये ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्सला द्यावे लागले. चित्रपटही गुंडाळला गेला. ही केस सृजनशील चौर्यकर्माच्या बाबतीत लँडमार्क केस मानली जाते. तेव्हापासून आपल्याकडची चोरी परंपरा खंडित झाली आहे. पण जोपर्यंत आपला 'जुगाडू' अॅटिट्यूड कायम आहे, तोपर्यंत हे पूर्णपणे थांबणार नाहीच.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vijay Paranjape
Tue , 12 March 2019
माय कझिन विन्नी हा मराठी मधे कायद्याचे बोला या नावाने हुबेहुब अगदी व्यक्तिरेखेच्या लकबी सकट उचलला होता
Chandrakant Kamble
Wed , 28 June 2017
yes this is Indian mentality.
Ravindra Gandhi
Sat , 22 April 2017
This happens in Pharma and medical industry also..