तुम्ही गायींसारखे वत्सल, शांत, निरुपद्रवी आणि अहिंसक का नाही?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • गोमाता, भारतमाता आणि प्रभू रामचंद्र
  • Wed , 29 June 2022
  • पडघम देशकारण गोमाता Gomata भारतमाता Bharat Mata प्रभू रामचंद्र Prabhu Ramchandra हिंदू Hindu मुस्लीम Muslim सावरकर Savarkar

ते परशुराम अपार्टमेंट आमचा पिच्छा काही सोडेना. तिथे राहणाऱ्या मुस्लीमद्वेष्ट्यांची मुलाखत गाजल्यापासून आम्हाला मुलाखतीसाठी येण्याची इतकी आमंत्रणे मिळू लागली की, पुरे पुरे झाले अगदी. मुस्लीमद्वेष्टे आता लाजबीज सोडून चक्क जाहीरपणे आपला बाणा मिरवायला निघाले, हे काही चांगले लक्षण नाही, असे आम्हाला वाटू लागले. एवढे होऊनही मुस्लिमांनी काही खुलासे, प्रत्त्युतरे अथवा प्रतिवाद करावेत, अशी आमची अपेक्षा. तेही नाही. पण म्हटले जाऊ द्या. वर्गातल्या एखाद्या गरीब मुलाचा हकनाक छळ होतो, तेव्हा त्याला व्यायाम करायला न सांगता आपण पुढे होऊन छळवाद्यांचा मुकाबला करायला हवा, हे आम्हाला पटले होते.

थेट पहिल्या मुस्लीमद्वेष्ट्यांच्या घरी त्या परशुराम अपार्टमेंटमध्ये पोचलो. घंटीचे बटण दाबल्यावर टर्रर्रचा आवाज न येता ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…’ अशी प्रार्थना आतून ऐकू येऊ लागली. दार उघडले अन् आमच्या तोंडून कुजकट प्रतिक्रिया बाहेर पडली, “दारावर ‘हिंदूराष्ट्र’ उभे आहे असे समजून ही प्रार्थना डोअरबेल म्हणून लावलीय वाटतं?” काटकुळे, गोरेपान, चश्मीश डोळे वटारून उत्तरले, “पाठ होईल तुम्हाला. आता तेवढंच राहिलंय!” त्यांचे लक्ष आमदारांसह विमानातून आसाममध्ये गेलेल्या संघवाल्या बातमीदाराकडे होते. तो एकनाथ शिंदे यांची मुलाखत अत्यंत मनोभावे घेत असल्याचे दिसत होते. आम्ही वेळ वाचावा म्हणून मध्येच टोकले अन् विचारले, “ते लांडे आडनावाचे गृहस्थ इथंच कुठं तरी राहतात, ते सांगता का?” एकाएकी, संशय, असूया व चीड चेहऱ्यावर आणून मुस्लीमद्वेष्टे कडाडले, “तो हरामखोर? वरतीच राहतो, शेवटच्या मजल्यावर... माझ्या डोंबलावर. पण काम काय त्याच्याकडे?”

“ ‘गोधन बचाव संघ’ चालवतात ते… त्यांच्याशी बोलायचे आहे”, असे आम्ही सांगताच ज्येष्ठ मुस्लीमद्वेष्टे उसळलेच. “अहो, नाटक्या आहे तो नुसता. स्वत:ला आमच्यापेक्षा जहाल समजतो. बघाच तुम्ही,” असे सांगून ते दारात उभे राहून गुवाहाटीत बुडून गेले. आम्ही शेवटचा मजला गाठला. दार उघडेच होते. आतून ‘‘या या! गॅलरीमधूनच पाहिलं होतं तुम्हाला’’ असा आवाज आला. आत गेलो. पोक्त आवाजाचा प्रभाव खाडकन उतरला. स्वागताला चक्क एक विशीबाविशीचा तरुण उभा होता. “तुम्हीच ते लांडे का?” अशा आमच्या प्रश्नाला तो तरुण उत्तरला, “हो. शेंडी, जानवं आणि गंध लावणारे लांडे आम्हीच! म्हणजे मी. बसा. दूध आवडतं ना?”

बापरे! आमचा दुधाशी संबंध आठव्या वर्षीच संपला होता. पण संवादाला काही उत्तेजक द्रव्य लागते, ते ठाऊक असल्याने ‘हो’ म्हटले. या घरात एका भिंतीवर गायीसह उभी असलेली भारतमाता अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरलेल्या नकाशापुढे उभी होती. तिच्या चार हातांत मुंडकी दिसत होती... दाढीवाली, टोपीवाली. मातेच्या पायाशी बाबरीचा असावा, तसा ढिगारा दिसत होता. टेबलावर आणि शोकेससह लाकडी, धातूच्या, पोर्सिलीनच्या अनेक रंगीत गायी, वासरे आणि शिंगे उभारलेले बैल मांडलेले दिसले.

दुसऱ्या भिंतीवर गोवऱ्या थापलेल्या होत्या. पण त्या धुळीने माखून पांढरट झालेल्या. खूप दिवसांच्या असाव्यात. एका कोपऱ्यात कडब्याची पेंढी उभी ठेवलेली होती. तीही काळपट पडत चाललेली होती. चौथ्या भिंतीवर कासरे, दावणी, घुंगुरमाळा खुंटीला लटकलेल्या. त्या खाली कोपऱ्यात फायबरच्या मोठमोठ्या बादल्या. त्याही खूप दिवसांच्या कोरड्या वाटत होत्या.

दुधाचा एक छोटा कप घेऊन तरुण मुस्लीमद्वेष्टे बाहेरच्या खोलीत आले. पुन्हा एकदम कुजका बाण आम्ही सोडला, “गोठा म्हणता का तुम्ही या खोलीला?” ते थोडेसे गडबडले. चिडल्याचेही दिसले. पण हसून म्हणाले, “दोन गायी होत्या. तुम्ही ज्यांची मुलाखत घेऊन गेलात, त्यांच्या खिडकीखाली माझा गोठा होता. पण त्यांनी पोलीस तक्रार केली हो. ढोंगी कुठला! त्याला म्हणे शेणाचा वास यायचा. गायी हंबरल्यामुळे झोपमोड व्हायची. गोमातेच्या असा अपमान मला सहन झाला नाही. विकून टाकल्या त्या! शेवटी परशुराम अपार्टमेंटमध्ये राहायचं होतं मला.”

“अच्छा, म्हणजे ही सारी सजावट त्या गायींच्या आठवणींसोबत राहता यावं यासाठी काय? छान छान! कसं काय बोलावलंत आम्हाला?”

तरुण मुस्लीमद्वेष्टे आपल्या दाढीवरून हात फिरवू लागले. बहुधा त्यांना गायीचा मुद्दा आधी यायला नको असावा. गायी पाळणारी अन गोधन सांभाळणारी व्यक्ती गायीसारखी प्रेमळ, शांत, उपयुक्त आणि पवित्र असावी, असे त्यांना वाटत नसावे. गायी बाळगूनही उग्र, आक्रमकता, हिंसक, कारस्थानी ओळख असणे अधिक फायदेशीर असते, असा त्यांचा कयास असावा. कारण आवाज मोठा करून आणि चेहऱ्यावर चीड एकवटून ते आम्हाला कशासाठी बोलावले, ते सांगू लागले- “नूपुर शर्मांच्या वक्तव्यानं आमच्या प्रिय देशाची मान खाली गेलीय, असं अजित डोवाल यांनी कबूल केल्याचं तुम्ही वाचलं असेलच. हे फार वाईट झालं. आमचं द्वेषाचं राजकारण खचलंय. मुसलमानांबद्दल काही बोलायचं नाही महिनाभर, असा आदेश आलाय आम्हाला. म्हणून सध्या अग्निवीर, महाराष्ट्राची शिवसेना, आसामचा पूर असे पाणचट विषय नागरिकांपुढं जात-येत आहेत. हे बरोबर नाही. शत्रूविरुद्ध मोहीम सौम्य केल्याचा चुकीचा संदेश जातोय लोकांत. मुघलांचा इतिहास आमचं सरकार आता अभ्यासक्रमांमधून वगळत चाललंय. त्याची चर्चा होत नाहीय. तुम्हीच सुचवा आमच्यासारख्यांनी आता काय करायचं ते!”

आम्ही उडालोच. ही काय नसती बला गळ्यात येऊन पडली असे वाटले आम्हाला. त्या गोठ्यात आम्हाला गुदमरायला झाले. एकदम त्यांना म्हणालो, “तुम्ही तूर्तास नावं बदलायची मोहीम हाती घ्या. ‘हिरवे’, ‘प्रेषित’, ‘औरंगाबादकर’, ‘गुलाम’, ‘पेशवा’, ‘रजा’, ‘माफी’ असे मुसलमानांशी संबंधित असणारे शब्द बदला. त्या जागी नवी नावे रुजवा. आपोआपच नाहीसा होईल प्रभाव. भाषा बदला, आपोआप हवा बदलेल. खेरीज तुमचं काम निम्म्यानं हिंदी चित्रपटांनी गेली आठ वर्षं केलंय. पाकिस्तान, इस्लाम, मुसलमान, दहशतवाद, जिहाद, दंगल, धर्म असे विषय कित्येक हिंदी चित्रपट हाताळून बसलेत. अजूनही तसे चित्रपट येत आहेत. मात्र एक शंका आहे. एकही चित्रपटनायक गोरक्षक, गोभक्त कसा नाही? अक्षयकुमार, अजय देवगण, खासदार सनी देओल यांनी अजून गोसेवकाची भूमिकाच केलेली नाहीय. आम्हाला ही फार मोठी त्रुटी वाटते!”

झाले! तरुण मुस्लीमद्वेष्टे एकदम विचारमग्न झाले. त्यांना गोभक्तीचा एकही चित्रपट आठवेना, असे दिसू लागले. ‘गाय और गौरी’ नावाचा चित्रपट ५० वर्षांपूर्वी करून जया भादुरी व शत्रुघ्न सिन्हा या दोन विरोधी पक्ष खासदारांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर कशी मात केली, ते या तरुणाला जरा खिजवून सांगावे असे वाटले, पण आवरले. तरुण मुस्लीमद्वेष्टे खूप अस्वस्थ झाल्याचे पाहून आम्हीही झालो. त्यांना मूळपदावर आणायला एक प्रश्न विचारला, ‘‘एकीकडे गोभक्ती, दुसरीकडे मुस्लीमद्वेष हे कसं काय?”

त्यांना अधिक कळावे म्हणून सांगितले, “मुसलमान शेतकरी खूप आहेत. त्यांच्याकडेही बैल, गायी, म्हशी असतात. गोधनाशिवाय त्यांचेही चालत नाही. भाकड गोधनाचे जे हिंदू शेतकरी करतात, तेच तेही करत असतील, तर त्यात वावगे काय? त्यांचे काय घरोघरी कत्तलखाने असतात की काय? प्रत्येक मुसलमान गाय कापून खाणारा असतो, असा समज कसा काय झाला तुमचा? शाकाहारी मुसलमान ही कल्पनाच तुम्हाला मान्य नाही का? दुधाचा व्यवसाय करण्यासाठी गायी-म्हशी पाळणारेही मुसलमान असतात, हे ठाऊक असेलच तुम्हाला. हो की नाही?”

असा प्रश्नांचा भडिमार होताच तरुण मुस्लीमद्वेष्टे आम्हाला खाऊ का गिळू, अशा नजरेने म्हणजे मांसाहारी दृष्टीने बघू लागले. ‘नरभक्षक कुठले!’ अशी मनातल्या मनात त्यांची प्रतिमा रंगवून आम्ही त्यांचे उत्तर ऐकू लागलो. अत्यंत छद्मीपणे म्हणजे संघवाल्या मूळ मुद्रेने ते बोलू लागले, “सावरकरांचे अनुयायी दिसता तुम्ही! गाय हा उपयुक्त पशू आहे असे ते म्हणायचे आणि तुम्ही बावळट हिंदू ते ऐकायचात. त्यांचं राजकारण फसलं त्यामुळं. पुण्यभू आणि पितृभू यांचा सिद्धान्त मांडून त्यांनी मुसलमान परका, दुय्यम ठरवला खरा, पण तो शत्रूसमान ठरवता आला नाही त्यांना. त्यात ते मुस्लीम लीगशी युती करून सत्तेतही बसले. ते म्हणजे त्यांचा हिंदू महासभा हा पक्ष! मुसलमान राक्षस, शैतान, हिंस्त्र वाटायला हवा होता. तो गायी कापून खातो, असा मुद्दा मांडल्याशिवाय तो तसा वाटला नसता. शिवाय गायीत ३३ कोटी देव असतात. गांधी, विनोबा यांचं गोप्रेम आमच्या कामी आलं.”

“का हो, मग तुम्ही कृष्ण-बलराम, दत्त यांना का नाही गोभक्त, गोसेवक म्हणून मानत? कृष्ण तर गोपाल होता. महादेवाचा परमभक्त तर नंदी! म्हणजे साक्षात शिवदेखील गोवंशप्रेमी. तुमच्या प्रचारात हे देव दिसत नाहीत म्हणून विचारतोय.” आम्ही शंका मांडली.

मुस्लीमद्वेष्ट्यांना मांसाहाराची फारच गरज भासतेय, हे त्यांच्या लालबुंद झालेल्या नजरेमधून आम्हाला जाणवले. खाऊ का गिळू, यापेक्षा तुडवू का गाडू, असा भाव आमच्याबाबत त्यांच्या डोळ्यांत उमटला, ते आम्ही जाणले. ‘‘म्हणजे आमचा श्रीराम तुम्हाला खटकतोय वाटतं…” असे विचारून त्यांनी आम्हाला रावणाकडे ढकलायचा प्रयत्न केला. मग एकदम मृदू स्वरात ते बोलू लागले, “अहो, असे आपण आपल्यातच का वाद घालू लागलो? बघा, आपल्यात फूट पडली की नाही? असे आपण भांडत बसतो अन् ते आपल्यावर मात करतात. त्यांचा धर्म एकेश्वरी आहे, म्हणून आम्हीही आपला धर्म एकेश्वरी केला पाहिजे. तरच त्यांना तोंड देता येईल आपल्याला.”

हे तरुण मुस्लीमद्वेष्टे ‘आपल्याला’ असे संबोधून आम्हाला त्यांच्यात सामील करवून घेताहेत, हे कळून सावधपणे आम्ही म्हणालो, “ ‘आम्हाला’ असे म्हणा ना! ‘आपल्याला’ म्हणजे कोणी तिसरे आहे इथे? आम्हाला ओढू नका तुमच्यात. तुमचे आई-वडील असतील ना तुमच्यासोबत…?”

एकदम फुस्स झाल्यासारखे वाटले. आतल्या खोलीत काही हालचाल झाली. ‘नाही, नाही, आई-वडील सोबत नाहीत’ असे ओरडत एक वडीलधारे गृहस्थ बाहेरच्या गोठ्यात आले. तरुण मुस्लीमद्वेष्टे यांचे ते बाप असल्याचे चेहरेपट्टीच्या साम्याने आम्ही ओळखले. आम्हाला निरखत, पारखत ज्येष्ठ लांडे काय म्हणाले ते सारांशाने असे : ‘त्यांचे चिरंजीव वाया गेले असून, त्याचे कारण त्यांना कोणत्याही विषयात कमी असलेली गती. कोणा बाळासाहेबांनी त्यांना शाखेत नेल्यापासून हे गोमाताप्रेम न् मुस्लीमद्वेष उफाळला आहे. विचार न करता फक्त शाखेत सांगितल्याप्रमाणे चिरंजीव दिवसभर बडबड करत असतात. दोन गायींचे कर्ज बोडक्यावर असून स्टार्टअप म्हणून ‘काऊबॉय बुलडोझर्स’ अशी कंपनी काढली, तर तीही बुडाली. दगडफेक करणाऱ्यांचे पत्ते शोधून चिरंजीव घर पाडायला गेले होते. तिथे चार गायी पाहून ते परतले. घरी पाहतात तो यांच्या दोन गायी गायब! कशीबशी दिलगिरी व्यक्त करून त्या गोमातांसकट घरी आले. मालकांनी म्हणजे ज्येष्ठ मुस्लीमद्वेष्ट्यांनी घर सोडायला सांगितले. का, तर नसता राडा नको म्हणे. बघा, हे एकविचारी कसा पळ काढतात ते! टाकल्या विकून गायी… त्याला म्हटले, जा, सोशल मीडिया टीममध्ये जाऊन ट्रोल करत जा. पैसे मिळतील. तर म्हणे, आता अ‍ॅक्शन मोडमध्ये यायला हवे!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

प्रत्येक वाक्यागणिक आमचा चेहरा करुणामय, दयार्द्र व केविलवाणा होत गेला. मुस्लीमद्वेष्ट्या तरुणांना या जालीम व्यवहारी जगाचा ताप कसा सोसावा लागतो, त्याने आमचे हृदय हेलावले. चिरंजीव लांडे रडवेले होत होते आणि क्रुद्धही. आपल्या प्रिय मातृभूमीसाठी काही करायला जावे अन् अपयश पदरी पडावे, अशा अनुभवाने ते व्यथित झाले.

“तुम्ही कोण? यांच्याकडून गायडन्स घ्यायला आला काय?” वडिलांनी आमच्या धट्ट्याकट्ट्या शरीराकडे पाहत प्रश्न केला.

“हो, गायी-बैलांचे कळप आणि माणसांच्या झुंडी यांचं नातं समजावून घेत होतो. वत्सल, शांत, निरुपद्रवी पाळीव प्राण्यासोबत राहूनही माणूस रक्तपिपासू का झाला ते कळत नव्हते. गायीला दावण लावणारा माणूस आपल्याला कायद्याचा कासरा लावलेला असतो, हे कसं विसरतो ते जाणून घ्यायचं होतं.” -आम्ही.

गोठ्यात शांतता पसरली. तिसऱ्या कुणा उत्तरदायी मुस्लीमद्वेष्ट्याकडून शंका-समाधान करून घ्यावे लागेल, असा निर्धार करून आम्ही परशुराम अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरू लागलो. ‘झाली का भेट?’ असा प्रश्न करत ज्येष्ठ मुस्लीमद्वेष्टे अचानक आमच्या वाटेत आले. आम्ही आमचा चेहरा कसनुसा करत काही उत्तर देणार एवढ्यात त्यांच्या घरातल्या टीव्हीने आसाममधल्या पुरात किती जण बुडाले, किती नुकसान झाले, याची बातमी द्यायला सुरुवात केली. देणारा तो मराठी बातमीदार होता. त्यालाही बंडखोरीचा कंटाळा आलेला दिसला. एकाएकी ज्येष्ठ मुस्लीमद्वेष्टे आम्हाला विचारते झाले, “या पुरात आपले किती अन् ते किती बुडाले, ते काही कळत नाहीये हो! एनआरसी केली असती तर आकडा पक्का समजला असता… हो ना?”

डोके थंड ठेवून आम्ही त्यांच्या समोरून निघालो…

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......