आपल्या हिंदी हॉरर सिनेमांत ‘महिला’नांच नेहमी ‘भूत’ म्हणून का दाखवलं जातं?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
कुंडलिक विमल वाघंबर
  • ‘भूलभुलैय्या - २’, ‘भूलभुलैय्या - १’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘एक थी डायन’ या सिनेमांची पोस्टर्स
  • Wed , 29 June 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा भूलभुलैय्या - २ Bhool Bhulaiyaa २ भूलभुलैय्या - १ Bhool Bhulaiyaa १ रुही Roohi रागिणी एमएमएस २ Ragini MMS 2 एक थी डायन Ek Thi Daayan

हॉरर सिनेमा हा आवडता प्रकार असल्याने ‘भूलभुलैय्या - २’ हा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला सिनेमा पाहिला. त्यावर विचार करत असताना पूर्वीचा ‘भूलभुलैय्या’ आठवला आणि वाटलं की, दोन्हींची कथा वेगळी आहे. हा काही सिक्वेल नाही, पण तरी एक गोष्ट मात्र समान आहे. ती म्हणजे या दोन्हीत एक स्त्रीच भूत आहे. केवळ यामध्येच नाही, तर बहुतांश हिंदी हॉरर सिनेमांत भूत, डाकीण, चेटकीण या स्त्रियाच असतात. असं का? पुरुष अभिनेत्यांना भुताचं पात्र करता येत नाही का? की पुरुष भूतांना प्रेक्षक भीत नाहीत?

लोकांना खलनायकापेक्षा भुताची अधिक भीती वाटते. खलनायकाची पात्रं पुरुष करतात आणि लोक ज्या गोष्टीला अधिक भितात, ती पात्रं मात्र स्त्रिया करतात… हा हिंदी सिनेमांतील मजेशीर विरोधाभास आहे.

काही मोजक्या सिनेमांत पुरुष अभिनेत्यांनी भुताची भूमिका केलेली आहे, पण ती चांगल्या भुताची आहे. उदा. ‘भूतनाथ’मधली अमिताभ बच्चनची, तर ‘पहेली’मधली शाहरुख खानची भूमिका. या दोन्ही भूमिका भीतीदायक नसून प्रेमळ आहेत. हे गमतीशीर आहे की, भुताला प्रेमळ दाखवायचं असल्यास पुरुष पात्राची निवड केली जाते आणि भयानक व भीतीदायक दाखवायचं असल्यास स्त्री पात्राची. हिंदी सिनेमांत हे काही सहज झालेलं नाही. यामागे ‘पितृसत्ताक’ व्यवस्था नावाची विचारधारा आहे. 

ही पितृसत्ताक व्यवस्था हिंदी हॉरर सिनेमांत कशी काम करते, हे आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून पाहूया. नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूलभुलैय्या - २’ घ्या. यात तब्बूने दुहेरी भूताची भूमिका केली आहे. दोन बहिणींपैकी एक दुसरीला कशी पाण्यात पाहतं, तिचं वाटोळं करण्यासाठी कशी तंत्र-मंत्र करायला लागते, असं सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे दोन बहिणींमध्ये असलेलं शत्रुत्व हा या सिनेमाचा गाभा आहे. बाई ही बाईची शत्रू असते, असा पितृसत्ताक व्यवस्थेचा आजवरचा दाखला राहिलेला आहे. त्याला अधिक मजबूत करण्याचं काम हा सिनेमा करतो.

प्रत्यक्षात बहिणीनेच बहिणीचं वाटोळं केलं, याची उदाहरणं अपवादात्मकच असतात. वास्तवात मुख्यतः भावाभावांत मोठ्या प्रमाणात भांडणं होताना दिसतात. अशी तर असंख्य उदाहरणं आहेत की, भावानं भावाला जीवानिशी मारलं, एकमेकांचं डोकं फोडलं. असं वास्तव असताना बहिणीच्या नात्यात शत्रुत्व दाखवणं, हे स्त्रियांना एकप्रकारे बदनाम करण्यासारखंच आहे.

हे अजून प्रभावशाली होतं, जेव्हा त्याला हॉररचा मुलामा चढवला जातो. ‘भूलभुलैय्या - २’मध्ये तर बहीण मेल्यानंतरही तिचा बदला घेण्यासाठी ती इतकी बैचेन, तडफडत असते की, चक्क भूत होते.

या सिनेमाच्या पहिल्या भागात मंजुलिका नावाची स्त्री भूत आहे. तिची पार्श्वभूमी प्रेमाची आहे. आपल्या प्रियकराचा बदला घेण्यासाठी ती भूत झालेली असते. जिवंतपणी स्त्री-पुरुष एकमेकांवर प्रेम करत असताना खलनायक आडवा आला, तर त्याचा काटा काढण्याचं काम पुरुषांकडे असतं. जिवंतपणी स्त्री दुबळी असते, ती काहीच करू शकत नाही. मृत्यूनंतर मात्र भूत होऊन बदला घेते. प्रेम हे स्त्रीसाठी सर्व काही आहे, हे इथं मानलेलं आहे. मृत्यूनंतरही प्रेमाच्या सापळ्यात ती अडकलेली दाखवलेली आहे. प्रेम हाच स्त्रीच्या जीवनाचा व मृत्यूचाही सारांश मानला गेला आहे. हेच तर पुरुषप्रधान संस्कृती सतत सांगत असते, नाही का?

दोन-अडीच वर्षापूर्वी ‘रुही’ हा सिनेमा आला होता. त्यात जी स्त्री भूत असते, त्या भुताचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे लग्न करणं. ज्या ठिकाणी विवाह समारंभ होत असतात, त्या ठिकाणी जाऊन हे स्त्री भूत नवरीच्या अंगात शिरतं. या स्त्री भूतापासून जर सुटका करून घ्यायची असेल, तर त्याचं लग्न करणं गरजेचं असतं. थोडक्यात, या स्त्री भूतासाठी लग्न म्हणजे जीव की प्राण. त्यासाठी हे स्त्री भूत वाट्टेल ते करत असतं.

आपल्या समाजातही मुलीच्या जीवनाचा एकमेव उद्देश लग्न करणं हाच सांगितला, बिंबवला जातो. मुलीनं लग्न केलं तर ती मार्गाला लागली असं म्हटलं जातं. हा समज अधिक दृढ करण्याचं काम हा सिनेमा करतो. आपल्या विवाहसंस्थेनं स्त्री भूतालाही सोडलेलं नाही, म्हणजे बघा!

काही वर्षापूर्वी ‘स्त्री’ नावाचा एक चांगला हिंदी हॉरर सिनेमा आला होता, पण त्यातल्या स्त्री भुताचा उद्देश लैंगिक संबंध ठेवणं, प्रेम, इज्जत याभोवतीच फेऱ्या मारताना दाखवलेला आहे. यातली भूत झालेली स्त्री फक्त पुरुषांना घेऊन जात असते. वास्तवात आपण अशा अनेक घटना ऐकत असतो की, पुरुष गुंडांनी स्त्रीचं अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केले, बलात्कार केला. या सिनेमात मात्र उलट घडतं.

या सिनेमात काही संवाद व दृश्यं चांगली आहेत, पण तो कुठेही पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देताना दिसत नाही. स्त्री भूत पात्राच्या आधारे स्त्री कशी वासनेत बुडालेली आहे, हेच एकप्रकारे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्याचं काम केलं जातं. शेवटी या सिनेमात असा संदेश दिला आहे की, त्या स्त्री भुताला इज्जत किती महत्त्वाची आहे. ही इज्जत लैंगिकतेशी संबंधित आहे. त्या स्त्री भुताची पार्श्वभूमी वैश्या व्यवसायाशी जोडलेली असते.

‘रागिणी एमएमएस- २’ या गाजलेल्या सिनेमातल्या स्त्री भूताची पार्श्वभूमी एका आईची आहे. ही अशी आई आहे, जिला मुलगा विहिरीत पडून मेल्याचं इतकं दु:ख झालेलं असतं की, आपल्या डोळ्यासमोर एका तांत्रिकानं दोन मुलींचा गळा कापला तरी तिला काही वाटत नाही. एवढंच नाही तर मृत्यूनंतरही तिच्यासाठी मुलगाच सर्वस्व असतो. भुताचा जीव त्या मुलाच्या खेळण्यात असतो. मुलीशी काही देणं-घेणं नसतं. मुलीबाबत आई निर्दयी दाखवली आहे. आईच्या नजरेत मुलीला काहीच किंमत नाही, हे या सिनेमातून दिसतं. हा विचार पितृसत्ताक व्यवस्थेला अधोरेखित करणारा आहे. मुलगा न होता एकापेक्षा अधिक मुली होऊ लागल्या, तर कुटुंबप्रमुख त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नकोश्या नजरेनं पाहतात. ‘रागिणी एमएमएस- २’मधल्या स्त्री भुताचं विश्व कुटुंब असतं, त्यापलीकडे काही नाही. स्त्रियांनी जन्मभर कुटुंबाची काळजी घ्यावी, हे आपली संस्कृती सांगत आलेली आहे, तीच इमान- इतबारे जपण्याचं काम हे भूत करतं.

‘एक थी डायन’ या सिनेमातलं स्त्री भूत कुटुंबातील पुरुषांना, मुलांना फसवत असतं आणि त्यांचा काटा काढताना दिसतं. एका स्त्रीमुळेच कुटुंबाचा नाश होत असतो, या तथाकथित प्रचाराला बळकटी देण्याचं काम या सिनेमातून होताना दिसतं. यामध्ये गमतीशीर हे आहे की, पिशाच्च म्हणून जे पुरुष भूत दाखवलेलं आहे, ते अगदी सभ्य आणि चांगलं आहे. त्याला वाईट प्रवृत्तीचा नाश करायचा असतो. स्त्री भूत मात्र सर्वांच्या मुळावर उठलेलं असतं.

एकंदरीत हॉरर सिनेमांतल्या स्त्री भूतालाही पितृसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीतच वावरावं लागतं. वर ज्या सिनेमांची उदाहरणं दिली आहेत, ते सर्व ‘हिट’ झालेले आहेत. हॉरर सिनेमांचा प्रभाव कळत-नकळत होत असतो. त्यातही ज्या कारणांमुळे त्यातील मुख्य पात्र स्त्री भूत होतं, तो त्या कहाणीचा गाभा असतो. एखाद्या स्त्रीचं करिअर करायचं राहून गेलं किंवा एखादीनं व्यवसाय सुरू केला, तो अर्ध्यातचं बंद करावा लागला म्हणून कोणत्या हॉरर सिनेमात स्त्री भूत झाली, असं कधी घडताना दिसत नाही. स्त्रीनं भूत होण्याची कारणं ही नेहमी लग्न, कुटुंब यांच्याशीच संबंधित असतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

थोडक्यात, हॉरर सिनेमांतली स्त्री भूतं महिला कशा एका बाजूला संस्कृती रक्षणासाठी व दुसऱ्या बाजूला कुटुंबं उदध्वस्त करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात, याचीच प्रतीकं असतात. ही दोन्ही टोकं पितृसत्ताक व्यवस्थेनं गढलेली आहेत. समाजात महिलांना देवी मानलं जातं, पण प्रत्यक्षात दासी म्हणून वागवलं जातं… या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रिया आयुष्यभर देवी म्हणून संस्कृतीचं रक्षण करतात, तर मृत्यूनंतर भूत होऊनही तेच करतात.

स्त्री जेवढी प्रेमळ आहे, तेवढीच भीतीदायक आहे, हे हॉरर सिनेमे स्त्री भुताच्या पात्रातून बिंबवत असतात. एका स्त्री भुताच्या पात्रातून पितृसत्ताक व्यवस्थेचे अनेक उद्देश साध्य होतात. हिंदीमधील बहुतांश कौटुंबिक सिनेमे एका बाजूला भावनेचा आधार घेऊन स्त्रियांना संस्कृतीचा पुतळा म्हणून दाखवतात, त्यांचं गौरवीकरण-उदात्तीकरण करतात, तर दुसऱ्या बाजूला हॉरर सिनेमे भीतीच्या माध्यमातून स्त्रियांचं ‘दानवीकरण’ करतात.   

डाकीण म्हणून, भूत म्हणून अनेक महिलांची सामूहिकरित्या हत्या करण्यात आल्याची असंख्य प्रकरणं समाजात घडलेली आहेत, घडतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या (NCRB) अहवालानुसार २०१० ते २०१४ या काळात भारतात २२९० स्त्रियांची हत्या त्या ‘डाकीण’ असल्याच्या अपप्रचारातून करण्यात आल्या आहेत. हे विदारक वास्तव बेदखल करत आपले सिनेमे मात्र स्त्रीलाच भूत दाखवून समाजाच्या विकृत मानसिकतेचंच समर्थन असतात. हे भयानक आहे. अशा रूढीवादी, महिलांविरोधी सिनेमांचा निषेध करायला हवा.    

..................................................................................................................................................................

लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.

kundalik.dhok@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख