या पाच वर्षांची येत्या काळात पंचवीस वर्षं करण्याचं बळ ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या या पुरस्कारानं दिलं, पण….
पडघम - माध्यमनामा
राम जगताप
  • महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराचं स्मृतिचिन्ह आणि फाउंडेशनच्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांची बोधचिन्हं
  • Tue , 28 June 2022
  • पडघम माध्यमनामा अक्षरनामा Aksharnama पत्रकारिता Journalism फीचर्स जर्नालिझम Features Journalism समांतर पत्रकारिता Parallel Journalism

महाराष्ट्र फाउंडेशनचा २०२१चा डिजिटल पत्रकारितेसाठीचा पुरस्कार नुकताच ‘अक्षरनामा’ला मिळाला. त्यानिमित्तानं महाराष्ट्र फाउंडेशनसाठी लिहिलेलं मनोगत...

..................................................................................................................................................................

नमस्कार,

‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा २०२१चा डिजिटल पत्रकारितेसाठीचा विशेष पुरस्कार मला ‘अक्षरनामा’ या मराठी फीचर्स पोर्टलच्या संपादनासाठी जाहीर झाला, याचा मनापासून आनंद झाला. पण त्यापेक्षाही जास्त आनंद दोन गोष्टींचा झाला. पहिली, ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे साहित्य व समाजकार्यासाठीचे दरवर्षी जाहीर होणारे पुरस्कार हा गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या विशेष कुतूहलाचा आणि आवडीचा विशेष राहिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, या वर्षीचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार’ हरियाणातील सिरसाचे पत्रकार-संपादक अंशुल छत्रपती यांना जाहीर झाला आहे; तर वाङ्मयप्रकारातील पर्यावरण-पत्रकारितेसाठीचा पुरस्कार संतोष शिंत्रे यांना जाहीर झाला आहे. अंशुल यांच्यासारखा त्याग व धैर्य आणि शिंत्रे यांच्यासारखी एका कळीच्या विषयाचा पाठपुरावा करण्याची चिकाटी, या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. तरी माझा या मांदियाळीत समावेश झाला. याची मी कधी कल्पना केली नव्हती.

माझ्याबाबतीत सांगायचं तर, गेल्या सतरा-अठरा वर्षांपासून मी पत्रकारितेमध्ये आहे. त्याआधी काही काळ प्रकाशन व्यवसाय आणि मासिकांमध्ये काम केलं. नंतरच्या काळातही केलं. खरं तर पत्रकारितेमध्ये मी अपघातानेच आलो. काहीसं पॅराजम्पिंग करून. म्हणजे थेट वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणी विभागातच दाखल झालो. ‘प्रभात’, ‘प्रहार’, ‘लोकसत्ता’ आणि ‘मी मराठी लाइव्ह’ या चार दैनिकांच्या रविवार पुरवणी विभागात काम केलं. ‘आयबीएन-लोकमत’ या वृत्तवाहिनीमध्येही मी फीचर्स विभागातच होतो.

पण खरं तर तेव्हा म्हणजे १७-१८ वर्षांपूर्वी मराठी वर्तमानपत्रांत ‘फीचर्स जर्नालिझम’ची मोठ्या प्रमाणावर छाटणी चालू झाली होती. त्याविरोधात आम्ही संपादकांशी भांडून आमची फीचर्स शक्य तेवढी मोठी करायचा प्रयत्न करत होतो. एके दिवशी संपादक मला म्हणालेसुद्धा की, ‘तू दहाएक वर्षं आधीच पत्रकारितेत यायला हवं होतंस. आता वर्तमानपत्रांतला मोठमोठ्या फीचर्सचा काळ संपुष्टात आला आहे’. पण मला, किंबहुना आमच्या संबंध टीमलाच ते मान्य नव्हतं. आजही मला ‘फीचर्स जर्नालिझम’चा काळ संपलाय असं अजिबात वाटत नाही.

ही गोष्ट खरीच आहे की, नव्वदनंतर केवळ मराठीच नव्हे तर एकंदर जगभरचीच पत्रकारिता बदलली आहे. सोशल मीडियानं जगभरचं जनमानसही बदलवलं आहे. परिणामी अटीतटीची स्पर्धा आणि दिवसागणिक बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा झपाटा, यांमुळे छापील आणि इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेला केवळ मनोरंजनाचं स्वरूप आलं आहे. इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेत तर ‘फीचर्स’ला अजिबातच महत्त्व उरलेलं नाही आणि छापील पत्रकारितेतही ‘फीचर्स जर्नालिझम’ची दिवसेंदिवस खरडछाटणी होत चालली आहे. मराठीतील कितीतरी चांगली नियतकालिकं बंद पडली आहेत आणि जी चालू आहेत, त्यांची स्थिती फारशी बरी नाही. पण याचा अर्थ असा नाही की, ‘फीचर्स जर्नालिझम’, ज्याला मराठीत ‘नियतकालिक-पत्रकारिता’ म्हणतात, ती संपत चालली आहे.

‘Long Live The King’च्या चालीवर ‘फीचर्स जर्नालिझम चिरायू’च राहणार आहे. आपण म्हणतोच ना की, टिकून राहण्याला महत्त्व असतं आणि चिकाटीनं काम करण्यालाही. त्यामुळे मला खरोखरच मनापासून असं वाटतं की, आजच्या माहितीच्या भस्मासूराच्या काळात आणि नानाविध सत्य-असत्याच्या गदारोळात ‘फीचर्स जर्नालिझम’ हेच खऱ्या अर्थानं वाचकांचं जनमानस घडवण्याचं, निदानपक्षी त्यांना विचारप्रवृत्त करण्याचं काम करू शकतं.

बौद्धिक चर्चामंथन घडवण्याचं काम हे नेहमीच ‘फीचर्स जर्नालिझम’ करतं. टीव्हीमुळे, विशेषत: वृत्तवाहिन्यांमुळे आणि आता न्यूज पोर्टल्स, यु-ट्युब चॅनेल्स यांच्यामुळे वर्तमानपत्रांचा वाचक काही प्रमाणात कमी झालाय, हे खरं. पण म्हणून ‘फीचर्स जर्नालिझम’ही संपलं असं नाही. उलट या गदारोळाच्या आणि कोलाहलाच्या काळात ‘फीचर्स जर्नालिझम’च वाचकांची बौद्धिक भूक भागवण्याचं काम चांगल्या प्रकारे करू शकतं.

‘न्यूज जर्नालिझम’ हा माझा स्वभाव नाही, माझी प्रकृती ‘फीचर्स जर्नालिझम’चीच आहे. तेच माझं बलस्थान आहे, म्हणून मी हे म्हणत नाही, तर खरोखरच ‘फीचर्स जर्नालिझम’चा काळ संपलेला नाही, असाच माझा ‘अक्षरनामा’चा आजवरचा अनुभव आहे.

‘आउटलुक’ या इंग्रजीतील प्रतिष्ठित साप्ताहिकानं २०१५ साली त्यांच्या विसाव्या वर्धानपन दिनाचा विशेषांक ‘The Magic of Magazines’ या विषयावर काढला होता. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मान्यवर लेखक-पत्रकारांनी एकमुखानं ‘फीचर्स जर्नालिझम’ला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत, असंच सांगितलं आहे.

पाच वर्षांपूर्वी आम्ही ‘अक्षरनामा’ सुरू केलं, तेव्हा इंग्रजीमध्ये ‘द वायर’ आणि ‘द स्क्रोल’ ही ‘न्यूज-फीचर्स पोर्टल्स’ चांगल्या प्रकारे काम करत होती. त्यामुळे त्यांच्याच धर्तीवर, मात्र केवळ फीचर्सला केंद्रस्थानी ठेवत आम्ही ‘अक्षरनामा’ची सुरुवात केली. तेव्हा मराठीत काही न्यूज पोर्टल्स होती, पण केवळ पत्रकारितेच्या उद्देशातून सुरू झालेलं तसं नाव घ्यावं, असं एकही मराठी फीचर पोर्टल नव्हतं.

दुसरी गोष्ट म्हणजे ‘ऑनलाईन न्यूज’ हा अतिशय त्रस्त समंध आहे. त्याच्यावर स्वार होण्यात काहीच अर्थ नव्हता. शिवाय गेल्या काही वर्षांत ‘घटना’, ‘वास्तव’ आणि ‘सत्य’ - ज्याला इंग्रजीमध्ये ‘फॅक्ट’, ‘रिअॅलिटी’ अँड ‘ट्रुथ’ म्हणतात - यांचा ऑनलाईन न्यूजमध्ये (खरं तर वर्तमानपत्रं आणि न्यूज चॅनेलसमध्येही) सतत खून होताना दिसतो. ‘पोस्ट ट्रुथ’, ‘फेक न्यूज’, ‘व्हायरल न्यूज’ या ऑनलाईन भस्मासूराचा सामना जिथं इंग्रजी पोर्टल्सना करता येत नाहीये, तिथं मराठीसारख्या एका प्रादेशिक भाषेतल्या पोर्टलला ते कसं शक्य होणार? तरी त्याचा सामना करायचा असेल तर ‘घटना’, ‘वास्तव’ आणि ‘सत्य’ यांची सरमिसळ न करणारी अभ्यासपूर्ण फीचर्स हा त्यावर उपाय आहे, असं मला वाटलं, आजही वाटतं.

त्यामुळे कुठल्याही ऑनलाईन रॅटरेसचा भाग न होता, कुठल्याही ‘क्लिकबेट’सारख्या वाचकांना एंगेज करू पाहणाऱ्या गिमिकरी तंत्राचा वापर न करता, आम्ही ‘अक्षरनामा’वर चालू घटना-घडामोडींविषयी अभ्यासू आणि संशोधनपर लेख प्रकाशित करतो. राजकारण, समाजकारण, साहित्य, सिनेमा, शेती, पर्यावरण, चळवळी-आंदोलने कुठलाही विषय ‘अक्षरनामा’ला वर्ज्य नाही. पण ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे धावत त्यावर आधारित जुजबी, तात्कालिक स्वरूपाचे लेख मात्र आम्ही प्रकाशित करत नाही.

पत्रकारितेच्या नीतीमूल्यांशी आणि परंपरेशी तडजोड न करता ‘चांगल्याला चांगलं’ आणि ‘वाईटाला वाईट’ म्हणण्याचं काम, आम्ही आमच्या परीनं गेल्या पाच वर्षांपासून दररोज करत आहोत. अर्थात यासाठी आम्हाला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नामांकित पत्रकार-संपादकांपासून तरुण पत्रकारांपर्यंत आणि मान्यवर लेखकांपासून नवोदित लेखकांपर्यंत अनेकांचं मन:पूत सहकार्य लाभत आलं आहे. किंबहुना त्यांच्या बळावरच आम्ही इथवर मजल मारू शकलो आहोत.

‘अक्षरनामा’ सुरू केलं, तेव्हा आम्हाला काही मान्यवरांना आवर्जून आणि पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की, ऑनलाईन फार मोठे लेख वाचले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही आठशे-हजार शब्दांपर्यंतचे लेख प्रकाशित करा. पण आज मला हे आनंदानं आणि अभिमानानं सांगायला आवडेल की, ‘अक्षरनामा’वरील बहुतांशी लेख दोन-अडीच हजारापासून चार-पाच हजार शब्दांपर्यंतचे असतात. आणि ते मोठ्या प्रमाणावर वाचले जातात. उलट आज ‘अक्षरनामा’ची ओळख या सविस्तर लेखांमुळेच आहे. त्यामुळे ऑनलाईन माध्यमात दीर्घ वा सविस्तर स्वरूपाचं लेखन वाचलं जात नाही, हा गैरसमज आहे, असाच माझा आजवरचा अनुभव आहे.

वर्तमानपत्रं बातम्या व वृत्तलेख यापलीकडे जाऊन साधार, सविस्तर विवेचन-विश्लेषण करू शकत नाहीत, हे अलीकडच्या काही वर्षांत आपल्याला दिसतंच आहे. त्यांची साप्ताहिक रविवार पुरवणी आणि त्यातील लेखांचा आकारही आक्रसत गेलेला आहे. त्यामुळे वाचनाची सवय-आवड असणाऱ्या वाचकांची बौद्धिक भूक शमवण्यात वर्तमानपत्रं कमी पडू लागली आहेत. मात्र अनेकदा आपले आग्रह पुढे रेटण्यासाठी तंत्रज्ञानाचा बागुलबुवा उभा केला जातो. पण गांभीर्यानं काम करू इच्छिणाऱ्या कुठल्याही नियतकालिकाला नवं तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरत आलं आहे. तंत्रज्ञान हे सर्जनशीलतेला नवा पैलू बहाल करण्याचं काम करतं. पण तंत्रज्ञानाकडे सहसा त्या दृष्टीनं न पाहता, आपण रॅटरेसमध्ये मागे पडू नये, एवढ्याच एका दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कारण नव्या तंत्रज्ञानासाठी नवा दृष्टीकोनाचीही गरज असते, हे लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा, पण मानसिकता जुनीच बाळगायची, यातून फारसं काही साध्य होताना दिसत नाही, झालेलं नाही.

गेल्या काही वर्षांत इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील पोर्टल्सना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे छापील माध्यमांना आता ओहोटी लागणार, त्यांच्यावर संक्रांत ओढावणार असं म्हटलं जातं. करोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात काही काळ वर्तमानपत्रं बंद होती. शिवाय बाहेरच्या वस्तूंना स्पर्श करायचा नाही, या भीतीमुळे अनेकांनी या काळात वर्तमानपत्रं बंद केली. परिणामी वर्तमानपत्रांचा खप बराच कमी झाला. मराठीमध्ये तर तो काही प्रस्थापित वर्तमानपत्रांच्या बाबतीत जवळपास ५० टक्क्यांच्या आसपास घसरला. आता करोना-लाट जवळजवळ ओसरलीय, पण तरीही मराठी वर्तमानपत्रांचा खप फारसा वधारलेला नाही. या अशा काही कारणांमुळे छापील पत्रकारितेबाबत उलटसुलट बोललं जात आहे.

पण खरं सांगायचं तर वृत्तवाहिन्या जशा वर्तमानपत्रांना पर्याय ठरू शकल्या नाहीत, तशीच ऑनलाईन पोर्टल्सही वर्तमानपत्रं, नियतकालिकं किंवा वृत्तवाहिन्यांना पर्याय नाहीत. ही सर्व परस्परांना पूरक अशीच माध्यमं आहेत. या प्रत्येक माध्यमाची आपापली बलस्थानं, स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत आणि स्वतंत्र मर्यादाही.

वर्तमानपत्रांत एकेकाळी दीर्घ स्वरूपाचे अभ्यासपूर्ण लेख येत असत. नव्वदच्या दशकापासून या लेखांची लांबी ट्रेंडच्या नावाखाली सातत्यानं कमी होत गेली आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण, सविस्तर आणि संशोधनपर लेखन करणाऱ्या लेखकांना वर्तमानपत्रांमध्ये स्थान मिळेनासं झालं. काही लेखक वर्तमानपत्रांच्या मागणीनुसार पाच-सातशे शब्दांचे लेख लिहितातही, पण त्यातून त्यांना आपला विषय नीट मांडता येत नाही. ‘अक्षरनामा’वर मी कायमच मोठमोठे लेख प्रकाशित करत असल्यामुळे आमच्याकडे लिहिणाऱ्या लेखकांची संख्या कितीतरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

‘अक्षरनामा’चं काम वाचकांचं मनोरंजन करण्याचं नाही. त्यासाठी ऑनलाईन जगतात कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही आमच्या वाचकांना ‘दृष्टीकोन’ देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी चालू घटना-घडामोडींचा अनुषंग असलेले लेख छापतो, पण ते साधार, सविस्तर आणि अभ्यासपूर्ण रितीनं लिहिलेले.

अर्थात आमच्यापुढे अडचणी नाहीत असं नाही. भरपूर आहेत. आर्थिक अडचणींचा तर अक्षरक्ष: डोंगरच उभा आहे. ऑनलाईन पोर्टल्स ही काही वर्तमानपत्रं वा साप्ताहिकं-मासिकं यांच्यासारखी विकत घेऊन वाचावी लागत नाहीत. ती विनाशूल्कच उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यामुळे तुमच्याकडे डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा स्मार्ट फोन असेल आणि इंटरनेट (डाटा) असेल, तर तुम्ही कुठेही बसून ही पोर्टल्स विनामूल्य वाचू शकता. हा या माध्यमाचा एक मायनस पॉइंट आहे. त्यामुळे आम्हाला वाचकांना वर्गणीसाठी विनंती करावी लागते. पण सक्ती नसते, तेव्हा केवळ विनंतीला मिळणारा प्रतिसाद जेमतेम असतो. आणि ‘न्यूज जर्नालिझम’मध्ये नसल्याने आम्हाला जाहिरातीही फारशा मिळत नाहीत (आम्हीही त्यांच्या मागे फार धावत नाही). त्यामुळे सकस, दर्जेदार मजकूर देऊनही ‘अक्षरनामा’चा एकंदरीत कारभार तोट्यातच चालवावा लागतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची पत्रकारिता ही ‘समांतर-पत्रकारिता’ आहे. ‘समांतर सिनेमा’ किंवा ‘प्रायोगिक नाटक’ जसं असतं, तशीच ‘समांतर पत्रकारिता’ही असते, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. समांतर सिनेमा दर्दी सिनेरसिकांच्या कौतुकास पात्र ठरतो किंवा प्रायोगिक नाटक दर्दी नाट्यप्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतं. पण त्यांना व्यावसायिक सिनेमा वा नाटकांना मिळतो, तसा प्रेक्षक-प्रतिसाद मिळत नाही. तसंच काहीसं ‘समांतर-पत्रकारिते’चंही असतं. समांतर सिनेमा किंवा प्रायोगिक नाटक सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आर्थिक बाजू अडचणीची ठरते, तसंच समांतर पत्रकारितेचंही असतं. मात्र ऑनलाईन माध्यमामुळे डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब, फॅब असणाऱ्यांपासून साधा स्मार्ट फोन असणाऱ्यांपर्यंत कुणालाही ‘अक्षरनामा’ सहजपणे उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या या सुलभतेमुळे गेल्या पाच वर्षांत ‘अक्षरनामा’ला मिळत आलेला प्रतिसाद दिवसेंदिवस वर्धिष्णूच होतो आहे. या पाच वर्षांची येत्या काळात पंचवीस वर्षं करण्याचं बळ ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या या पुरस्कारानं दिलं आहे. त्यासाठी संयोजक आणि पुरस्कार निवड समितीचे मनापासून आभार.

तसं पाहिलं तर गेल्या पाच वर्षांत ‘अक्षरनामा’ला मिळणारा हा तसा तिसरा पुरस्कार आहे. पुरस्कारामुळे काम करायला बळ मिळतं आणि आपण जे काम करतोय ते अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा दिलासा मिळतो. पण वाचकांच्या आर्थिक सहकार्याच्या जोरावरच समांतर पत्रकारिता तग धरू शकते. आम्ही तुम्हा वाचकांपर्यंत पोहचलो आहोत. आता तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहण्याची नितांत निकडीची गरज आहे. त्याशिवाय ‘समांतर-पत्रकारिते’चा हा प्रयोग यशस्वी होणार नाही.

थांबतो.

धन्यवाद.

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

Post Comment

Vivek Date

Sun , 03 July 2022

Congratulations on your award by the prestigious Maharashtra Foundation. I live in the USA and have seen the great leadership of the Foundation doing good work.


Ravi Go

Wed , 29 June 2022

वेगवेगळ्या विषयांवरचे वैचारिक लेखन आणि निरनिराळे 'दृष्टिकोण' आपण वाचकांपर्यंत पोचवता. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......