अजूनकाही
मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात, खरं तर सत्ताधारी शिवसेनेत झालेल्या बंडाची मोठ्या प्रमाणावर चर्वितचर्वणं चालू आहेत. टीव्ही वाहिन्या आणि सोशल मीडिया यांना अशा काळात फारच चेव येतो आणि तिथं तथा‘कथित’, ‘अ’कथित व ‘न’कथित बातम्यांचा अक्षरक्ष: महापूरच येतो.
राजकारणात महत्त्वाकांक्षा, हितसंबंध आणि श्रेष्ठत्व अशा गोष्टींना महत्त्व असतं. आपल्याकडे तर जरा जास्तच असतं. त्यामुळे आपल्या राज्यातले किंवा देशातले राजकारण हे अनेकदा अनपेक्षित म्हणता येतील अशी वळणं घेताना दिसतं, एकाचे दोन पक्ष होतात, एक पक्षातून दुसऱ्या पक्षात बाडबिस्तरा हलवला जातो, सत्ताधारी पक्षाला पायउतार केलं जातं इत्यादी इत्यादी. ‘वापसी’चेही प्रयोग होतात. थोडक्यात, महाराष्ट्र वा देशाच्या राजकारणात बंड किंवा बंडाळी ही काही नवी गोष्ट नाही. अविश्वसनीय घटना वा वळणं हा राजकारणाचा एक पैलूच असतो.
गेल्या सहा दशकांच्या काळात महाराष्ट्राने अनेक वेळा यशस्वी, फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली, केवळ काहींच्या ‘मनात’ असलेली राजकीय बंडाळी अनुभवली आहे.
महाराष्ट्रातले सबंध देशात गाजलेले पहिले बंड होते शरद पवार यांचे. त्यांनी १९७८ साली काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना सत्तेतून घालवून जनता पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीनं सत्ता हस्तगत केली होती. तेव्हापासून भारतीय राजकारणात शरद पवार हेच केवळ एकमेव विश्वासघातकी, बेभरवशाचे, ‘पाठीत खंजीर खुपसणारे’ आणि बाकीच्यांनी सत्तेसाठी अनेकदा पक्ष, आघाडी बदलली, पुनरागमन केले ते मात्र अगदी संत, असे चित्र निर्माण झाले आहे! हे खरे म्हणजे खूप हास्यापद आहे.
आपल्याच नेत्याविरुद्ध, पक्षाविरुद्ध बंड करून, पारंपरिक विरोधकांशी हातमिळवणी करून सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांची देशभरात भलीमोठी यादीच पाहायला मिळते. पवार यांच्याआधी महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींविरुद्ध बंड करून - आपलाच पक्ष खरा असा दावा करून - त्यांनाच पक्षातून बाहेर काढले होते. त्यापैकी काहींनी स्वतःचा पक्षही काढला होता. या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरे बुजुर्ग होते.
आणीबाणीच्या काळात इंदिराबाईंनी ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले, त्या शंकरराव चव्हाण यांनी इंदिराबाईंचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांच्याबरोबर ‘महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस’ हा पक्ष काढला होता. इंदिराबाई लोकसभेच्या अधिक जागा मिळवून सत्तेवर परतल्याबरोबर शरद पवार वगळता ही सर्व नेतेमंडळी काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाली. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर तेव्हा देशभर सगळीकडे असेच चित्र होते.
राजकीय बंडांचा इतिहास पाहता सत्तेतल्या प्रथम क्रमांकाच्या जागेवर नजर असलेल्या, दुसऱ्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींकडून किंवा आपल्याला सत्तेतून डावलले जात असल्याची भावना असलेल्या व्यक्तींकडून अशी बंडाळी होते, असे दिसते. अनेकदा ही बंडाळी सत्ताप्रमुख असलेल्या नेत्यांच्या सर्वाधिक जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींकडूनच होते, असेही दिसते. पंतप्रधान मोरारजी देसाईंची जागा घेणारे चौधरी चरणसिंग, पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे नेते विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर अशी देशपातळीवरील काही उदाहरणे देता येण्यासारखी आहेत.
राज्यात छोटे-मोठे बंड करणाऱ्या, कुठल्याशा नावाने पक्ष किंवा विचारमंच काढणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पंतप्रधान राजीव गांधींच्या नजरेतून उतरल्यावर बाळासाहेब विखे पाटील यांनी पक्षांतर्गत एक मंच काढला होता. गोविंदराव आदिक यांनीही असाच प्रयत्न केला होता. आपले उपद्रवमूल्य पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आणून देण्याचा माफक हेतू यामागे असायचा.
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील हे कायम राजकीय युद्धाच्या किंवा बंडाळीच्या पवित्र्यात असत. आणीबाणीनंतरच्या काँग्रेस पराभवानंतर वसंतदादा यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘अर्स काँग्रेस’ आणि ‘इंदिरा काँग्रेस’ यांच्या युतीचे सरकार चालवले आणि त्यानंतर शरद पवार यांनी.
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात शरद पवार काँग्रेसमध्ये परतल्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हा पायउतार झालेल्या वसंतदादांनी आपला बंडाचा झेंडा कायम ठेवला. त्यांना राज्याबाहेर ठेवण्याच्या हेतूने राजीव गांधींनी त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक केली. पण शांत राहतील ते वसंतदादा कसले! त्यांनी राजभवनातून मुख्यमंत्री पवार आणि राजीव गांधी यांना त्रास देण्याचे काम चालूच ठेवले. मात्र त्यातून पुरेसे समाधान होत नाही, हे लक्षात आल्यावर राज्यपालपदाचा राजीनामा देऊन ते महाराष्ट्रात परतले होते!
मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाळी करून त्यांचे सहकारी असलेले रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे दिल्लीत हायकमांडला भेटायला गेले होते, मात्र या सर्वांना लगेचच उपरती झाली आणि हे बंड शमले.
विलासराव देशमुख आपल्या लातूर मतदारसंघात १९९५ साली निवडणूक हरले. त्यानंतर त्यांनी सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर विधान परिषदेवर येण्याचा प्रयत्न केला, पण ते ही निवडणुकसुद्धा हरले. पुढच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर हेच विलासराव देशमुख दोनदा काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले.
छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाळी करणारे पहिले नेते. नंतर शिवसैनिकांचा उद्रेक टाळण्यासाठी त्यांना अनेक दिवस भूमिगत राहावे लागले होते. त्या नंतरच्या विधानसभा निवडणुकीत तरुण शिवसेना नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी त्यांचा माझगावमध्ये पराभव केला आणि भुजबळ यांना नाशिक हा स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला.
भुजबळ यांच्या तुलनेत नारायण राणे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला नाही, कारण राणे आपल्या कोकण बालेकिल्ल्यात राजकीयदृष्ट्या सुरक्षित होते. त्यांच्याबरोबरचे निम्हण वगैरे नऊ आमदार टप्प्याटप्प्याने राजीनामे देत नंतर काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आले. भारतीय जनता पक्षाने राणेंचा आणि काँग्रेसचा हाच फॉर्मुला आपल्या ‘ऑपरेशन लोटस’साठी गोवा, कर्नाटक वगैरे राज्यांत वापरला आहे.
केंद्रातल्या २०१४च्या सत्तांतराआधी भाजप नेते गोपीनाथ मुंडे अनेक महिने आतल्या आत धुमसत होते. प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर पक्षातल्या काही नेत्यांनी त्यांची कोंडी केलीय, त्यांना अडगळीत टाकलेय, अशी त्यांची भावना झाली होती. याबद्दल अधूनमधून प्रसारमाध्यमांतून त्यांची वक्तव्ये यायची. बंड करून पक्ष सोडण्याचाही त्यांनी विचार केला होता, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त केले, असं काही जाणकार सांगतात.
पक्षातल्या आपल्या जवळच्या साथीदारांकडूनच आपल्याला दगाफटका होऊ शकतो, हे चाणाक्षपणे ओळखून अशा संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे नामोहरम केल्याचे दिसते. ‘ओबीसींचे मुख्यमंत्री’ असा स्वत:चा उल्लेख करणारे एकनाथ खडसे यात सर्वप्रथम होते. ‘पहिली महिला मुख्यमंत्री’ असे स्वत:ला म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे, ‘मराठा मुख्यमंत्री’चे दावेदार विनोद तावडे यांची वर्णी नंतर लागली… आणि मग महाराष्ट्र भाजपमधले बाकीचे नेते सुतासारखे सरळ झाले. फडणवीस यांना या घडीला पक्षांतर्गत एकही स्पर्धक नाही, यातच सर्व काही आले!
अडीच वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या फसलेल्या किंवा वेळीच आवरते घेतलेल्या बंडाचे गौडबंगाल राजकीय विश्लेषकांना आजही समजलेले नाही. या रात्रीच्या आणि पहाटेच्या खेळातले मुख्य खेळाडू अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेच भविष्यकाळात, या बंडाची खेळी कुणाची आणि कशामुळे होती, यावर प्रकाश टाकू शकतील. मात्र असे होणे असंभव दिसते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत किंवा सरकारविरोधी बोलण्याची हिंमत एक सुब्रह्मण्यम स्वामी सोडले तर इतर कुणीही करताना दिसत नाही. भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी तशी हिंमत दाखवली आणि ते काँग्रेसमध्ये आले. आपली बंडाची खुमखुमी कायम आहे, हे पटोले आजही अधूनमधून दाखवत असतात.
यशस्वी बंड करण्याचा, योग्य वेळी बंडाची तलवार म्यान करण्याचा आणि आपल्याविरुद्धचे बंड मोडून काढण्याचा अनुभव शरद पवार यांच्यासारखा इतर कुणालाही नाही, नसावा. सत्तरच्या दशकात पहिले यशस्वी बंड करून सत्तेवर आल्यावर १९९९ साली पवारांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड करून दुसऱ्यांदा नवीन पक्ष काढला. मात्र केवळ सहा महिन्यांत काँग्रेस व सोनिया यांच्याशी हातमिळवणी करून त्यांनी आपला सवतासुभा कायम ठेवला, तो आजतागायत. लालू प्रसाद यादव यांच्यानंतर काँग्रेसशी एकनिष्ठ राहणारे देशातले ते दुसरे मोठे राजकीय नेते.
सध्याच्या महाविकास आघाडी सरकारविरुद्धच्या ताज्या बंडातसुद्धा शरद पवार आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव कसा पणाला लावतात (किंवा लावत नाहीत), हे येत्या काही दिवसांत दिसेलच. खरे तर हे बंड शिवसेनाप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध त्यांच्याच निष्ठावान कार्यकर्त्याने पुकारले आहे. त्यामुळे खरी प्रतिष्ठा उद्धव ठाकरे यांची पणाला लागली असली, तरी महाविकास आघाडी सरकारचे भवितव्यही पणाला लागले आहेच…
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment