मराठीतील एक क्रांतिकारी कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या पत्नी, कृष्णाबाई सुर्वे यांचं काल मंगळवारी, २१ जून २०२२ रोजी नेरळ (ता. कर्जत) येथील राहत्या पहाटे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. कृष्णाबाईंचं ‘मास्तरांची सावली’ हे आत्मकथन २००९मध्ये प्रकाशित झालं. त्याला महाराष्ट्रातील रसिकवाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे आत्मकथन बव्हंशानं नारायण सुर्वे यांच्याभोवती फिरत असलं तरी त्यातून कृष्णाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचं, त्यांच्या हिंमतीचं, करारीपणाचं, कष्टाचं आणि शहाणपणाचंही दर्शन होतं. त्या केवळ नारायण सुर्वे यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या ‘अभिन्नजीव सहकारी’ही होत्या. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या तर लग्नाआधीपासूनच शब्दश: आणि अक्षरक्ष: सावलीसारख्या पाठीशी राहत आल्या. त्यांचा हा लेख ‘सुर्वेमास्तर’ या नावानं ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या जानेवारी १९८४च्या अंकात प्रकाशित झाला होता. नंतर तो ‘सर्व सुर्वे’ या वसंत शिरवाडकर संपादित ग्रंथात समाविष्ट करण्यात आला. तो लेख ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...
..................................................................................................................................................................
लोक विचारतात, “नारायण सुर्वे एवढे मोठे कवी. तुम्ही त्यांची बायको. कसे आहेत हो सुर्वे?”
“म्हणजे?” - मी विचारते.
“नाही. म्हणजे तुम्ही अगदी पूर्वी झोपडपट्टीतही राहत होतात, नंतर चाळीत आणि आता तर स्वत:च्या ओनरशिप ब्लॉकमध्ये राहायला आलात. सुर्वेही आता एक नावाजलेले कवी आहेत असं सगळे जण ओळखतात. तुम्हाला कसं वाटतं?”
- हे असं लोक विचारतात, तेव्हा मला खरंच कळत नाही, की काय सांगायचं!
मी आपली अशी एक अडाणी बाई. म्हणजे सहीपुरती शिकले. अक्षरओळख आहे, पण त्यापुढे लिहायला वगैरे जमण्यासारखं नाही.
अन् खरं म्हणजे ३०-३५ वर्षांपूर्वी मी जशी होते ना, झोपडीतही राहणारी, गरिबीला न घाबरणारी, तशीच आजही आहे आणि सुर्वेही मोठे झाले, शिकले, शिपाई होते त्याच शाळेत शिक्षक झाले, रशियाला जाऊन आले, बक्षिसे मिळाली, पण घरात ते पूर्वी होते ना, तसेच आहेत अजून.
आमचे ते पूर्वीचे दिवस मी कधी विसरणार नाही अन् माझे मास्तरही विसरणार नाहीत.
हो, सुर्वे माझे ‘मास्तर’.
..................................................................................................................................................................
................................................................................................................................................................
म्हणजे गंमत अशी, की मी तेव्हा काकांकडे राहत होते. असेन १३-१४ वर्षांची. सुर्वे माझ्यापेक्षा थोडे मोठे. तिथेच चाळीत- लालबागच्या- राहत होते. मला आई-वडील नव्हते. काकाच सांभाळायचे. घरकामाचा रगाडा खूप असे. म्हातारी (आजी) माया द्यायची, पण घरगुती खाणावळही चालवायची. त्यामुळे कामंही खूप. त्यात मी अंगानं थोराड. वयापेक्षा मोठीच वाटायची. सुर्वे त्याच लालबाग- करी रोडच्या चाळीत खालच्या मजल्यावर गंगाराम सुर्वे यांच्याकडे राहत...
सुर्वे काही गंगाराम सुर्व्यांचा औरस मुलगा नाही. दुर्दैवानं सुर्व्यांचं आई-वडिलांचं छत्र अगदी लहानपणीच हरपलं अन् ह्या अनाथ मुलाला गंगाराम सुर्व्यांनी सांभाळलं. आपलं म्हटलं. तेव्हापासून ते नारायण गंगाराम सुर्वे झाले. गंगाराम सुर्व्यांना सखू नावाची एकच मुलगी होती. नारायण पण त्यांचा मुलगाच बनून गेला.
नारायणचं शिक्षण फक्त चौथीपर्यंत. चाळीतले सगळेच कम्युनिस्ट पार्टीत होते. नारायण सुर्वे थोडे अधिक बोलके. पार्टीवर्क करायचे. कुणाची पत्रं लिही, सभांची माहिती सांग, पुस्तक वाचून दाखव, थाळीप्रचार वगैरे सगळ्यांत पुढे असत. सगळे लोक त्यांना ‘मास्तर’ म्हणत. पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ते माहिती सांगत, तास घेत. पण मी काही कधी त्यांच्या तासाला जायची नाही...
तर असे ते माझे ‘मास्तर’.
नारायणचं आमच्या घरी जाणं-येणं होतं. आम्ही मोकळेपणी बोलत असू. मला आई-वडील नव्हते. सुर्वेही तसे अनाथच. आम्हाला एकमेकांविषयी आपलेपणा वाटत होता.
कशी कोण जाणे, घरात काकांची कुरबूर सुरू झाली. सांगू लागले, नारायणशी बोलायचं नाही.
एकदा तर काका म्हणाला, “नारायण दहा खोल्या ओलांडून आपल्या अकराव्या खोलीत तर येऊ दे, त्याचे पायच तोडून टाकीन!”
नारायण पार्टीचा कार्यकर्ता होता. तो १९४४-४५चा काळ असेल. एक कार्यकर्ता म्हणून त्याने असं मुलींशी बोलायला त्याच्या पार्टीतल्या लोकांचा विरोध होता.
सर्वांनी असं काही काहूर केलं की, बुवा या दोघांचं काय करायचं?
आता मात्र इकडे मला धास्ती वाटायला लागली, की आपल्याला कुणाचा आधार नाही, नारायणलाही नाही.
नारायण तेव्हा काही मोठा आडवातिडवा गडी नव्हता. उंच, किडकिडीत. कुणी दम दिला तर घाबरेल असं वाटायचं.
मी त्याला नळावर गाठायची, विचारायची, की हे कसं चाललंय? आपण तर तसं काही वाईट वागत नाही. लोक तर बोलताहेत. तुझा काय विचार आहे?
तर तिकडे सुर्व्यांचे वडील (आता वडीलच म्हणायचं त्यांना), त्यांनाही हे काही पसंत नव्हतंच.
नारायण मला म्हणायचा की, “किशा, लोक बोलतात. पण मी तरी कसं करू? लग्न लावायला मी तयार आहे. पण तू कुठे राहशील? माझ्या मित्राच्या घरी राहावं लागेल. किती दिवस ते आताच सांगता येत नाही. मी तिथं येऊन भेटीन तुला.”
मला काही ते म्हणणं पटत नसे प्रथम.
इकडे घरच्यांनी चांगलाच गोंधळ घातला. मला गावाला पाठवून द्यावं असं ठरवलं. माझी एक मावळण (आत्या) होती. तिच्या मुलाशी माझं लग्न करायचं ठरवीत होते. तो माझ्यापेक्षा इतका लहान, की लहानपणी मी त्याला अंगाखांद्यावर खेळवलेलं.
माझ्या मामालाही बोलावून आणलं. पण मामा म्हणाला, “नारायणला अनाथ समजायचं कारण नाही. आता तो गंगाराम सुर्व्यांचा रक्ताचाच मुलगा मानला पाहिजे. पण कृष्णाबाई, एकदा लग्न केलंस की हे घर संपलं.”
मी म्हटलं, हरकत नाही.
नारायणला नळावर भेटून सर्व सांगत असेच. तोही निश्चयाचा पक्का होता
आता काय होईल ते होवो, दोघांनी लग्न करायचंच, असं ठरवलं. तसे त्याचे काही मित्रही पाठीशी होते.
एक दिवस मी चटकन निर्णय केला. रेशनची पिशवी घेतली, शेजारणीबरोबर नारायणला निरोप दिला अन् घर सोडून निघाले.
शेजारीण म्हणाली, “बघ, नारायण नाही आला तर?”
मी म्हटलं, “काही होवो. ही कृष्णाबाई काही आता परत ह्या घरी यायची नाही. बाहेर जायला कारण म्हणून घेतलेली ही पिशवी, हे रेशन कार्ड अन् हा फूटपाथ असेल तोवर चालत राहीन. माघारी येणार नाही.”
दुपारी साडेबाराच्या सुमारास निघाले ते थेट भोईवाडा कोर्टात आले. वकिलांना भेटले. म्हटलं, लग्न करायचं आहे. नोटीस द्यायचीय. घरातून पळून आले, पण काहीही बरोबर आणलेलं नाही.
पोलिसांना म्हटलं, घ्या झडती वाटल्यास. नाहीतर घरचे लोक माझ्याविरुद्ध तक्रार करतील.
इकडे दोन वाजत आले तरी नारायणचा पत्ता नाही.
मला काळजी वाटायला लागली, की बाबा ह्याला काही कुणी केलं की काय? का त्यानं मला फसवलं? मी पुन्हा पुन्हा रस्त्यावर येऊन पाही.
शेवटी सव्वादोन-अडीच वाजता तो आला. म्हणाला, “घर सोडून आलो. चल आता”.
मग दादरच्या ऑफिसात गेलो- लग्न रजिस्टर करायला.
अन् ही कृष्णाबाई तळेकर, कृष्णाबाई सुर्वे झाली.
मग पुढे कुठे जायचं? घरदार नव्हतंच. शंकर जाधव म्हणून ह्यांचा पार्टीतला एक मित्र होता. त्याच्या घरी फक्त त्याची आई होती. तिथे थोडे दिवस राहिलो.
सुर्वे दिवसभर कामासाठी बाहेर. मी दिवसभर त्यांची काळजी करत घरी.
सुर्वे मिळेल तिथे नोकरी करत. गोदीत, मिलमध्ये, ऑफिसात. कधी फक्त पार्टीचं काम. नोकऱ्या तात्पुरत्या असत.
पुढे राहायला एक झोपडी मिळाली. तीही ‘दुबळी’ नावाच्या जमातीची. सुर्वे दिवसभर कामासाठी बाहेर असायचे. आल्यावर म्हणायचे, “काय तुझी अवस्था झाली आहे किशा! केसांना तेल लावता येत नाही की पाणी प्यायला भांडं नाही.”
मी म्हणायची, “तुम्ही माझी नका काळजी करू.”
तेव्हाही जसे पैसे मिळत, तेव्हा ते घरी प्रथम काही खायला घेऊन येत. भजी विशेष आवडीची. रोज नीटनेटकं राहणं, चांगलं वेळच्या वेळी खाणंपिणं हे जमायला कित्येक वर्षं गेली.
पुढे दुर्दैव ओढवलं- म्हणजे तीही झोपडी पाडली गेली.
मग पुढे खारला नॅशनल कॉलेजजवळ, टॅकजवळ बिबीबाईची म्हणून एक झोपडी पाहिली. बिबीबाई भाडं वगैरे वसूल करी. पण तेही सगळं बेकायदेशीर होतं. आम्हाला राहायलाच जागा नाही, तर आम्ही बेकायदेशीर वगैरे कुठे विचार करणार? ती झोपडी पाडायला आले. बिबीबाई कुठे पळून गेली. सुर्व्यांनी तिथंही सगळ्यांना एकत्र करून मोर्चा काढला होता, झोपडी पाडू नये म्हणून. पण उपयोग झाला नाही. आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो. भटकत भटकत आताच्या कालिनाजवळ आलो. तेव्हा तिथे तडीपार केलेले गुंड लोक राहायचे..
आता ते सगळे दिवस गेले. चांगले दिवस आले. आता मी पाहते लग्नाच्या वयाच्या मुलामुलींना. ते त्यांचे हिंडण्याफिरण्याचे, मौजमजेचे दिवस. पण आमचं जगण्याचंच दोघांना असं कोडं होतं की, वेगळे काही विचार (सांसारिक सुखाचे) मनातही येत नसत. तशी सवडच नव्हती. तेव्हा आम्ही फक्त एकमेकांची काळजी करणारे सोबती होतो. मित्र होतो. नवरा-बायको असे नाहीच.
सुर्व्यांना शिपायाची कायम नोकरी लागली अन् मग मला दिवस गेले. वाटलं, आता जरा वाटेला लागलो तर कशाला हे संकट! कधी नव्हे तो स्वत:चाच तिरस्कार वाटला. कसं सगळं सांभाळणार? पण सुर्व्यांनीच मला धीर दिला.
मुलगी झाली, पण ती फार वर्षं जगली नाही.
आमचा प्रवास सुरूच होता- मिळेल तिथे जागा पाहत.
सुर्वे शिक्षणखात्यात शिपायाची नोकरी करत. तिथंच श्रीमती कपिला खांडवाला या सज्जनबाईंनी एक छोटीशी खोली दिली. संसार सुरू झाला. झोपडीतून खोलीत आलो. रोज नवी नवी कोडी पडत, आम्ही ती सोडवत असू.
सुर्वे डबल टायफॉइड होऊन आजारी पडले. मी घाबरले. माझंही दुसरं बाळंतपण जवळ आलेलं.
मी मास्तरांना ऑर्थर रोडवरच्या दवाखान्यात पोहोचवलं अन् मी पोट लागलं म्हणून वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मुलगा झाला- अगदी अशक्त. काचेच्या पेटीतच ठेवला होता.
मास्तरांचं काय म्हणून काळजी वाटू लागली. रडू आवरेना. मास्तरांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, तेव्हा दुपारी कॉफी घेऊन येते म्हटलं होतं. आता चार दिवस झाले. काही बातमी नाही एकमेकांची एकमेकांना. शेवटी एक माणूस म्हणाला, पाहून येतो.
सुर्वे तिकडे काळजीतच होते. त्यांचा ताप थोडा उतरला होता. त्यांना सांगितलं की, ठीक आहे सगळं. मुलगा झाला आहे. त्यांनी ताबडतोब एका कागदावर लिहिलं- ‘रवी मावळलेला पुन्हा उगवला आहे’. म्हणाले, हा कागद किशाला नेऊन द्या.
मला आनंद झाला. मुलाचं नाव ठेवलं रवींद्र.
सुर्व्यांच्या मनात फार येई, शिकावं, मास्तर व्हावं.
मी म्हणत असे, “शिका. मी कष्ट करीन, घरचं पाहीन.”
सुर्व्यांनीही नेटानं नोकरी, खूप वाचन, शिक्षण चालू केलं. मागं पाहिलं नाही.
मोठा रवींद्र, त्याच्या पाठची कल्पना, मग श्रीरंग अन् धाकटी कविता झाली, तेव्हा सुर्वे पी. टी. सी. परीक्षा देऊन जिथे शिपाई होते, त्याच खात्यात शिक्षक झाले होते.
त्यांच्या पी. टी. सी. कोर्सला अंबर, चरखा, पेळू, सूतकताई- सगळं प्रकरण होतं. ते सगळं मीच करून द्यायची. पण अभ्यासाचा ताण त्यांचा त्यांनाच होता.
त्यांचा बौद्धिकचा पेपर पहिल्या वेळी राहिला. दुसऱ्या वेळी परीक्षेची वेळ आली तरी आपले हे स्वस्थ बसलेले. मला कळेना, की ह्यांचा विचार काय?
मी म्हटलं, “अहो, निघायचं नाही का?”
म्हणाले, “मला नाही ते परीक्षेचं जमणार.”
आता काय करावं? उठले. चहा केला. पुन्हा जरा जोरात म्हटलं की, “असे कसे हो तुम्ही? अशानं तुमची अर्धी भाकरी कधी तरी पुरी होणार का? अन् तुम्हाला खायला मिळणार का? तुम्ही उपाशीच राहणार.”
शेवटी कसेबसे परीक्षेला गेले अन् चांगले पास झाले. शिपाई होते, तिथं मास्तर झाले.
सुर्वे मलाही म्हणत, “किशा, तूही शीक”.
पण आता कविताच्या जन्मानंतर मीही शिपायाची नोकरी करू लागले होते. नोकरी, चार मुलांचं करून शिकायला सवड कशी अन् कधी काढणार? मला काही ते जमायचं नाही.
सुर्व्यांचं वाचन खूप असतं. पण घरी नाही- बाहेर. घरी आले की, ते माझे पूर्वीचेच ‘मास्तर’ होते तसे असतात.
सुरुवातीला ते कविता करायचे, तेव्हा घरी वाचून दाखवायचे. आमचा संसार, आमची आयुष्यं यांच्याच त्या कविता होत्या. ‘माझी आई’ वगैरे कविता तेव्हाच्याच.
मी म्हणायची, “तुमच्या अशा कविता कोण वाचणार?”
पण ते ‘कवी’ झाले.
पहिलं पुस्तक काढायचं झालं तेव्हाची गोष्ट.
ते अस्वस्थ, गप्प गप्प असायचे. आपणच मग विचारायचं की, बाबा का असे गप्प? तरी आपणहून काही बोलणार नाहीत.
म्हणाले शेवटी की, “किशा, बघ ह्या एवढ्या कवितांचं पुस्तक काढता येणार आहे. पण थोडे पैसे उभे करायला हवेत. ते कुठून आणायचे? शिरीष पैताईही म्हणतात, की आता पुस्तक निघालं पाहिजे.”
आमची परिस्थिती सुधारली- म्हणजे झोपडीतून खोलीत आलो होतो एवढंच. शिल्लक, हौसमौज ह्यांना कधी सवडच नव्हती तर पैसे कसे, कुठून उभे करणार! पण मला नेहमी एकच वाटतं, की ह्या माणसाला पुढे जायला दिलं पाहिजे. मी माझं मंगळसूत्र विकलं अन् ६०० रुपये आणले.
अभिनव प्रकाशनच्या मदतीने मग ‘ऐसा गा मी ब्रह्म’ पुस्तक प्रसिद्ध झालं १९६२ साली. आनंदाची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाला राज्य सरकारचं बक्षीस मिळालं. सुर्वे कवी म्हणून मान्यता पावले.
सुरुवाती-सुरुवातीच्या कवितांचं लिहून झाल्यावर घरी वाचन होई. कधी कधी रात्री-अपरात्रीसुद्धा सुर्व्यांना लिहावंसं वाटतं. मग ह्या किशाला ते चहा करायला सांगतात. चहा घेऊन लेखन करू लागतात. मुलंबाळं मीच पाहते. त्यांना त्रास देऊ देत नाही. आता नातवंडं आली. ते लिहीत असताना एक नात टेबलावर चढते, एक खुर्चीवर. मी त्यांना रागावते. पण सुर्वे म्हणतात, “असू दे. आपल्याला एक नाही मिळाली आईवडिलांची माया.”
त्यांना मुलांचा फार लळा. धाकट्या सारिकाला (मुलाच्या मुलीला) ग्रंथालीच्या यात्रेतही एक-दोन ठिकाणी त्यांनी नेलं होतं. मुलांना, नातवांना झोपवायला गोष्ट सांगावी लागते, गाणं म्हणावं लागतं. हे फिरवून आणतील पण गोष्ट सांगायची म्हटली की, देतात माझ्याकडे पाठवून. कधी म्हणायचे पूर्वी, “किशाबाई, आवाज चांगला आहे तुमचा. म्हणा काही.” मी मुळीच म्हणत नसे त्यांच्यासाठी! मुलांसाठी म्हणते.
पूर्वी मी म्हटलेलं एक गाणं त्यांना आवडलं होतं- ‘डोंगरी शेत- डोंगरी शेत’. ते शब्द घेऊन त्या धर्तीवर त्यांनी एक गाणं केलं -
‘डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती
आलं वरीस राबून मी मरावं किती’
ते गाणं खूप गाजलं.
एरवी गाणं, सिनेमा, नाटक आम्ही दोघांनी मिळून कधीच जाण्याचा प्रसंग आजपोत्तर नाही. मीच जायला तयार नसते. ते मोठे झाले, सगळे लोक एवढे मानतात! मला वाटतं की कुणी विचारेल, म्हणेल की ही अशी कशी सुर्व्यांची बायको अडाणी? त्यांना माझ्यामुळे कमीपणा येऊ नयेसं वाटतं.
सुर्व्यांचा सत्कार झाला की हार-गुच्छ घरी येतात.
एकदा एक गुच्छ अर्धाच घरी आला. सगळी गुलाबाची फुलं बरोबर कार्यक्रमाला कुणी बाई होत्या, त्यांनी घेतली. सुर्व्यांनी दिली.
मी म्हटलं, “असं का केलंत? सगळा गुच्छच द्यायचा.”
तसं माझ्यासाठी फुलं-गजरे आणायच्या दिवसांत त्यांना कधी वाटलं तरी परवडणारं नव्हतं. त्यांची फुलांची आवड म्हणजे हिरवा चाफा आणि कवठी चाफा. दिसला कधी, शक्य झालं, तर आणतातही. पण आता आणतात तर एकच फूल आणतात. मी म्हणते, एक कसं आणता? आता घरी लेकी-सुना-नातवंडं आहेत.
सुर्व्यांना खरेदी करायला आवडते. घरी कपडालत्ता, भाजीपाला, सगळं तेच आणतात. पण एकदा पिशवी घेऊन बाहेर गेले की, कधी परत येतील वाट पाहायची नाही. वाटेत मित्र भेटले की बाजार थांबलाच!
त्यांना स्वत:ला खाण्या-पिण्याचा कसला षौक नाही. पूर्वी करून चालणार नव्हता. तरी तेव्हा गोडाचा शिरा आवडीचा. आता आवडनावड करावी तर साखर खायलाच बंदी आहे प्रकृतीमुळे. असं हे नवीनच कोडं.
पुस्तकं विकत आणण्याचा षौक भयंकर. पण घरी आणलेली पुस्तक आवरून ठेवण्याचं काम मात्र माझं. चुकीचं आवरलं तरी रागवण्याचे प्रसंग कमीच. त्यांची रागवारागवी एकूण कमीच.
मुलांना तर फक्त माझाच धाक. त्यांच्या पप्पांचा अजिबात नाही. रागावलं की, सरळ कपडे करतात आणि बाहेर जातात. दोन-तीन तास परत येत नाहीत. राग निवाला की, घरी परत येणार. चुकून कधी हात उगारणार नाहीत, आरडाओरडा नाही. मुलांशीही अगदी मोकळ्या गप्पा, वादविवाद चालतात. मुलं त्यांना म्हणतात, “तुमच्या कविता आम्हाला शिकायला लागतात. तुम्हीच शिकवा.” ते त्यांना सांगतात, “नको, मी शिकवलं तर एखाद्या वेळी अर्थ चुकेल परीक्षेत!” तशी खूप मजा चालते.
मी कधी सुर्व्यांना कधी म्हणते, “लोकांची किती पुस्तकं निघतात. तुम्ही का नाही आता भराभर पुस्तकं काढत?”
सुर्वे म्हणतात, “बाजारात जितकी लवकर पुस्तकं येतात, तितकी लवकर मागे पडतात. चालेल तुम्हाला?”
मनात असेल तेच करणार- तेही आणि मीही…
मी कविताच्या वेळी दवाखान्यात गेले होते. ऑपरेशन करून घेणार होते. मी दवाखान्यात आजारी किंवा झोपून असले म्हणजे सुर्व्यांना अजिबात चैन पडत नाही.
ह्यावेळी ऑपरेशनचं मी पक्कं ठरवलं होतं.
मी गेले हॉस्पिटमध्ये. हा माणूस काही आला नाही. येणार नाही माहीत होतं.
मी डॉक्टरांना सांगितलं, की ऑपरेशन करून टाका.
डॉक्टर म्हणाले, “असं कसं? सुर्व्यांना बोलवा. त्यांची सही हवी.”
सांगून टाकलं, की ते इथे नाहीत. येणारही नाहीत एवढ्यात.
“का?”
“ते रशियाला गेलेत.”
“कशासाठी?”
“गेलेत हमाली करायला.”
पुढे सुर्वे खरंच दोन वेळा रशियाला गेले- पण हमाली करायला नाही. लेखक-कवी म्हणून सन्मानाने गेले.
१९७३ साली रशियाला गेले होते. तिथं त्यांना एक सुंदर परडी भेट मिळाली होती. त्यात द्राक्षाच्या आकाराच्या खूपशा अत्तराच्या बाटल्या होत्या.
घरी मला दाखवल्या. म्हणाले, “किशा, ह्या एवढ्या आपल्याला काय करायच्या? तू तर कधी लावत नाहीसच- आणि करायच्या काय? ज्याला स्वत:ची कर्तबगारी आहे, हुशारी आहे त्याला अत्तराची गरजच नाही.”
मग काय बोलणार! गप्प बसले.
म्हटलं, “द्या तुम्हाला कोणाला द्यायच्या तर!”
तर आपलं घरी पोरांना दोन बाटल्या ठेवून बाकी सगळ्या वाटून टाकल्या.
सुर्व्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.
मी शाळेत शिपायाची नोकरी करत होते, तिथेही सुर्व्यांना ओळखणारे खूप लोक येत. मी शिपाई म्हणून माझ्याजवळ चौकशी करत. मी खालच्या मजल्यावर गजराथी शाळेत शिपाई होते व वरच्या मजल्यावर मराठी माध्यमाच्या शाळेत सुर्वे शिक्षक होते.
एकदा एका बाईंना मी सुर्व्यांची माहिती विचारत असता इतकी व्यवस्थित माहिती दिली की, त्यांनी शेवटी मला विचारलं,
“तुम्हाला कसं इतकं माहीत?”
मी म्हटलं, “राहतात आमच्या तिकडेच.”
त्यांचं काही पस्तकाचं काम होतं. मी सांगितल्याप्रमाणे त्या घरी आल्या. मला तिथे पाहून म्हणाल्या, “तुम्ही इथेही असता का?’’
सुर्वे गप्पच हो. मी ‘हो’ म्हणून टाकलं.
पुढे जेव्हा त्या बाईंना आमचं दोघांचं नातं कळलं, तेव्हा फार मनाला लागलं. म्हणाल्या, तुम्ही दोघांनीही आता आमच्याकडे आलं पाहिजे.
मी सुर्व्यांचं कविपण कधीच मिरवत नाही. मला आपलं वाटतं, की आपण मागेच राहावं. शाळेत तर एकदा मस्टरवर सही केली की, मी त्यांची कुणी नसते. मी आपली साधी शिपाईणबाई. एकदा आमच्या दोघांच्याही शाळेच्या सहली बसनं एकाच ठिकाणी गेल्या होत्या. पण खाणंपिणं, कार्यक्रम वेगवेगळे होते. कुणीतरी गंमत म्हणून मला त्यांच्या ग्रुपमध्ये बोलावू लागलं.
मी सांगितलं, “मी माझ्या शाळेबरोबर आले आहे.”
नंतर ‘सुर्वे बोलावताहेत’ असा निरोप आला. मी सांगितलं, “ड्यूटीवर आहे. आता कामात आहे. येणार नाही अशी, म्हणून सांग.”
गेले नाही.
सुर्वे आधी घरी पोहोचले. शेजारची बाई म्हणाली, “चहा करून देऊ का?” सुर्वे म्हणाले, दोन कप करा. किशाही येईलच एवढ्यात.
सुर्व्यांना स्वत:ला चहा, स्वयंपाक काही करता येत नाही. म्हणजे वेळही आली नाही.
चहा करायला सांगून पुलावरून मी येताना दिसते का पाहत गॅलरीत उभे होते. असे तुमचे ‘कवी’ सुर्वे
अन् माझे मास्तर.
ते खूप उंच होत जाताहेत. मला खूप समाधान वाटतं. मी शाळेतल्या बायकांकडून खूप विणकाम, कलाकौशल्य शिकले. एक काही तरी विणकाम सारखं करायला घेतलेलंच असतं.
सुर्वे म्हणतात, “मला कर ना एक स्वेटर”.
मी म्हणते, “कुठे करावा बाई एवढ्या उंच माणसाचा!”
मी त्यांना मशिनवर एक स्वेटर करून आणून दिला. तरी अजून कधीतरी गमतीनं म्हणतातच.
मुलं त्यांना पप्पा म्हणतात. सगळी मुलं आता चांगली शिकून चांगल्या नोकरीत आहेत. मुलं माझ्याशी त्यांच्या पप्पांबद्दल बोलताना सुर्व्यांना मास्तरच म्हणतात-
“आई, तुझे मास्तर बोलवताहेत बघ तुला.”
मुलांनाही माहीत आहे ह्या अडाणी बाईचे हे मास्तर कसे आहेत ते. त्यांनीच एकदा मुलांना सांगितलं आहे की, “किशाबाई आहे तोवर खरं. ती घरात नसेल, आजारी असेल की, या देवळातली घंटाच बंद पडल्यासारखी वाटते.”
सुर्व्यांचं वय नोकरीत अंदाजाने लावलेलं होतं. त्यामुळे ते ५८ वर्षांपूर्वीच निवृत्त झाले. मध्ये मलाही माझी तब्येत थोडी बिघडली म्हणून त्यांनी नोकरी सोडायला सांगितली. शाळेतल्या लोकांचा आम्हा दोघांवरही खूप जीव होता.
सुर्व्यांचा महाराष्ट्र शासनातर्फे सत्कार होता, साहित्य संस्कृती मंडळाची पहिली गौरववृत्ती मिळाली होती तेव्हा. सत्काराला मलाही जाण्याचा सगळ्यांनी खूप आग्रह केला. पण मी आपली शाळेत माझ्या ड्यूटीवर गेले. मी अशी अडाणी बाई. त्यांच्याबरोबर जाण्यात काय मतलब? घरी आल्यावर काय मिळालं ते मास्तर आधी मलाच देणार.
घरात त्यांच्या सगळ्या मानपत्रांच्या फ्रेम्स करून लावल्या आहेत त्या मीच.
आमच्या मास्तरांना पत्रं आली की आनंद होतो. बाहेरून घरी आल्यावर पहिला प्रश्न, “टपाल आहे का?” त्यांचा पत्रव्यवहार मोठा असतो.
मी म्हणते, “एवढे गावाला जाता, तेव्हा मलाही पत्र पाठवत जा.”
त्यावर ते म्हणतात, “तुला काय पाठवायचं पत्र? वाचायला शीक म्हटलं तर शिकत नाहीस. जरा नेट धर. लिहा- वाचायला शीक. मी पत्र पाठवून काय उपयोग? पत्र आलं की दुसऱ्याकडूनच वाचून घेणार ना?”
मी म्हणते, “नाही घेणार. तुम्ही पाठवा तर खरं. तुम्ही परत आलात की, तुमच्याकडूनच वाचून घेईन!”
ते खूप हसतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
आता मी एकच प्रार्थना करते की, ‘बाबा, मी हलती, डुलती आहे तोवर सुर्व्यांचं काय व्हायचं ते नीट सन्मानानं झालेलं मला पाहू दे.’ मुली मला म्हणतात, “आई तू असं का बोलतेस? लोक काय म्हणतील? बायका असं बोलत नाहीत.”
पण मी बोलते ते खरं आहे. बायकांचं काय, कुठंही कसंही होतं. म्हातारपणी पुरुषांचं कठीण होतं. मला रस्त्यावर पडायची वेळ आली तरी हरकत नाही. माझी गरिबी मी कधीच विसरले नाही. मी तशीच आहे आणि मला हेही माहीत आहे, उद्या हात पसरायची वेळ आली तर नुसत्या सुर्व्यांच्या नावाने माझी ओंजळ भरेल. उभ्या महाराष्ट्रानं त्यांना प्रेम दिलं, आपला केलं, तसं ते मलाही करतील. पण माझ्या माणसाचं मात्र सगळं नीट शेवटपर्यंत सन्मानानं झाल्याशिवाय माझ्या जिवाला चैन नाही पडायचं. माझा जीव त्यांच्यात अडकेल.
शब्दांकन - आशा साठे
................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा - नारायण सुर्वे मजूर-कामगारांची भाषा बुलंद राहण्यासाठी, करण्यासाठी पुन्हा पुन्हा आठवत राहायला हवेत…
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment