अजूनकाही
लोकप्रिय लेखक, प्रसिद्ध नाटककार, उत्तम वक्ते अशा नानाविध पैलूंनी ज्यांची ओळख करून दिली जाते, त्या पु. ल. देशपांडे यांची २२वी पुण्यतिथी नुकतीच साजरी झाली. पुलंच्या हयातीपासूनच त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी आणि विचारसरणीविषयी बोललं जात आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकाही केली जाते. मात्र त्यातली बहुतांश टीका प्रच्छन्न स्वरूपाची असते. तो प्रकार अजूनही अधूनमधून होतच असतो. पुलं खरंच उजवे होते की डावे होते? की दोन्ही नव्हते? या विषयीचा हा तब्बल २२ वर्षांपूर्वीचा लेख लेखकाच्या पूर्वसंमतीसह...
..................................................................................................................................................................
बहुतेक सर्व मराठी लेखक आपली राजकीय मूस कोणती हे सांगायचे टाळतात. आपण ललित लेखक आहोत, राजकारणाशी आपला काय संबंध? असे म्हणून ते राजकारण म्हणजे फार दूरची गोष्ट असल्याचा भास निर्माण करतात. प्रत्यक्षात तसे नसते. आसपासच्या राजकीय-आर्थिक-सामाजिक घडामोडींचा अन्य नागरिकांप्रमाणे त्यांच्यावरही परिणाम होत असतो व त्यांचे संवेदनशील मन काही विचार, काही मते, काही सिद्धान्त स्वीकारून त्याप्रमाणे लेखनास प्रवृत्त करत असते. तरीही आपली राजकीय मते नाहीत, आपण राजकारणमुक्त आहोत, असे मराठी लेखक सांगत राहतोच. त्यातच लेखकाचा मध्यमवर्गीय परिसरही त्याचे अ-राजकीय अस्तित्व आणखी ठळक करत राहतो. आपल्या लोकप्रियतेला आपली राजकीय विचारसरणी अथवा बांधीलकी बाधक ठरेल, असा व्यावहारिक विचार मराठी लेखक करत राहतो. याला अर्थातच काही लेखक अपवाद आहेत.
पुलंनी दोन गोष्टी सतत सांगितल्या. एक, आपला जन्म शहरी मध्यमवर्गीय घरात झाला. दोन, आपली वाढ स्वातंत्र्याच्या चळवळीच्या आणि गांधीजींचे नेतृत्त्व चिरस्थायी होण्याच्या काळात झाली, या त्या दोन गोष्टी. या दोन्हींचा वारसा आणि संस्कार आपल्यापाशी आहे हे पुलं सांगत. या कथनाचे दोन अर्थ होतात. पहिला, मी शहरी, मध्यमवर्गीय असल्याने तुमच्यातलाच एक आहे हे सांगण्याचा. दुसरा, मी तुमच्याप्रमाणेच असलो तरी माझे आयुष्य जरा वेगळे आहे, कारण गांधीजींचा प्रभाव, स्वातंत्र्य चळवळीचा स्पर्श माझ्या घरातच होता हा.
पुलंचे विद्वान आजोबा वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे गांधीभक्त होते. त्यांच्यामुळे आपण गांधीजींकडे वळलो, असे गांधीवादी लेखक आचार्य कालेलकर यांनीच म्हणून ठेवले आहे. असे आजोबा आणि राष्ट्र सेवा दलातून आलेली पत्नी सुनीताबाई, यामुळे पुलंच्या घरात काही राजकीय मूल्ये व विचारसरणीचा वावर होताच.
शहरी मध्यमवर्गीय जन्माचा अर्थ असा असतो की, जे जे ग्राम्य ते ते मला वर्ज्य. यामध्ये भारतभर घट्ट रुजलेली जातिव्यवस्था व तिचा अभिमान, अतिरेकी धर्मभावना, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष विषमता, गरीब-श्रीमंत भेद, निरक्षरता, अस्वच्छता, शोषणाचे व अन्यायाचे राजकारण, सरकारी बधीरपणा, भांडवलशाहीचा अमानुषपणा, आदी असंख्य बाबींचा समावेश करता येतो. पुलंच्या अवतीभोवती या बाबी असत व त्याच त्यांच्या मर्मभेदक टिंगलीचे लक्ष्य असत. गांधीसंस्कारांमुळे या टिंगलीला विध्वंसक रूप प्राप्त होऊ नये, याचे भान पुलंना आले.
त्याचबरोबर सौजन्य, सहिष्णुता, अहिंसा, सत्यनिष्ठा, सदाचरण, विश्वस्तवृत्ती, साधी राहणी, चैनबाजीला फाटा, यांचा वैयक्तिक जीवनात केलेला स्वीकार त्यांना मध्यमवर्गाच्या अधिक जवळ घेऊन गेला. या गांधीमूल्यांमुळेच पुलंचे लिखाण कोठेही विखारी व हेकेखोर होत नाही.
पुलंचे लिखाण व भाषण लोकप्रिय होण्याआधीचा महाराष्ट्र कर्कश्श, तर्ककठोर, लढाऊ आणि बेदरकार होता. लोकमान्य व त्यांचे अनुयायी यांनी महाराष्ट्राला व्यापून टाकले होते. गांधीजींना स्वीकारणे महाराष्ट्राला जड जात होते. गांधीजींसह आलेली जैन, गुजराती वणिकवृत्तीची लवचीक-धूर्त, व्यवहारी पण बहुजनसमाजाला समजेल, अशी संस्कृती स्वातंत्र्यलढ्यात पसरत होती. तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘मध्यमवर्ग’ झालेला मराठी माणूस फडके-खांडेकर-माडखोलकर इत्यादींना चाहू लागला होता. तरीदेखील उगाचच आपले महाराष्ट्री वेगळेपण टिकवण्याच्या खटाटोपात अडकलेल्या महाराष्ट्रीयांची थट्टा पुलंकडून होऊ लागली आणि आस्ते आस्ते हा मराठी माणूस सैल होऊ लागला. गांधीजींनी भारतीयांना सभोवतालच्या प्रत्येक जोखडातून बाहेर काढले व सामूहिक शक्तीचे प्रत्यंतर प्रत्येकालाच जाणवून दिले. गांधीजी व पुलं महाराष्ट्रात शिरताना ‘मराठीपण’ कसे होते?
“ताठरपणा हा एक त्याचा विशेष आहे. खडबडीतपणा हा एक त्याचा दुसरा विशेष आहे. स्वबुद्धीला अनुसरणे हा त्याचा आणखी एक विशेष आहे. पूर्वजांचा व त्यांनी संपादन केलेल्या वतनवाडीचा अभिमान हा चौथा विशेष म्हणून सांगता येईल. महाराष्ट्रातील पांढरीचा व त्याबरोबर काळीचा अभिमान हेही त्याचे लक्षण आहे. या गुणांच्याबरोबर दुसऱ्याही काही गुणांचा निर्देश करणे आवश्यक आहे. परंतु हे गुण अभावरूप आहेत, अवगुण मात्र नव्हेत. मराठ्यांच्या ठायी धाडस असले तरी साहस नाही. मराठ्यांच्या ठायी वतनवाडीचा अभिमान असला तरी तो मर्यादादूषित आहे. त्या मर्यादेच्या बाहेर जाण्याची मराठ्यांची कधी इच्छा होत नाही. घरकुलाच्या जरी नाही, तरी देशकुलाच्या बाहेर तो सहसा जावयाचा नाही. मराठा हा अल्पसंतुष्ट आहे. तो स्वसंतुष्ट आहे आणि त्याच्या या संतुष्ट वृत्तीमुळेच त्याच्या ठिकाणी महत्त्वाची आकांक्षा नाही. मग ती चांगली आकांक्षा नाही आणि वाईटही नाही. या जातिवंत स्वसंतुष्ट वृत्तीमुळे तो दुसऱ्यापुढे तोंडही वेंगाडत नाही. दुसऱ्याला तो आपले दैन्य दाखवीत नाही. परिस्थितीच्या त्रासाने वैतागला, तर स्वत:च्या घरकुलात भिंतीला टाचा घासून राहील, पण त्यातून सुटण्याकरीता दुसऱ्याकडे याचना करणार नाही. मराठा हा बुद्धिवादी आहे, भावनावादी नाही. या बुद्धिवादामुळे त्याच्यामध्ये बुद्धिचापल्य आहे, परंतु बुद्धिचापल्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी शब्दचापल्यही आहे.... या बुद्धिवादामुळे स्वमताविषयी आग्रह उत्पन्न होतो; आणि आग्रहाबरोबर भांडखोर वृत्तीही येते. सह्याद्रीचा कणखरपणा व खडबडीतपणा मराठ्याच्या वृत्तीत पुरेपूर उतरला आहे. त्याच्यामध्ये कलेची कुसराई नाही व नरमाई पण नाही. तो सौदर्ययुक्त कलांचा उपभोक्ता आहे पण जातिवंत भोक्ता नाही. अशा रीतीने मराठा हा सोळा आणे व्यवहारी मनुष्य आहे आणि तोही सारासार विवेचक व्यवहारी आहे; निव्वळ मोजमाप्या व्यवहारी नाही.” (कृ. पां. कुलकर्णी, ‘वाग्यज्ञ’, पृष्ठ १५०-५१)
पुलंनी चितारलेले प्रत्येक पात्र वर उल्लेखिलेल्या गोष्टींचे विडंबन तरी आहे किंवा प्रतिनिधी तरी आहे. गांधीजींनी हा मराठी बाणा बहुजन समाजाला टाकायला लावला, तर पुलंनी पुढे आपल्या नरमगरम आघातांनी सुशिक्षित पांढरपेशांना त्यागायला लावला. या दोघांत आणखी एक समान धागा दिसतो. गांधीजींना औद्योगिक-आधुनिक-वैज्ञानिक जीवनशैलीविषयी संशय होता. कुटुंबव्यवस्था, स्त्रीधर्म, शेजारधर्म, परोपकार, साहचर्य, कामजीवन, शिक्षण, रोजगार, ग्रामीणता, कला अशा कैक गोष्टींवरची त्यांची मते परंपरानिष्ठ तरी होती किंवा प्रायोगिक तरी होती. पुलंच्याही अनेक पात्रांच्या तोंडून आधुनिकताविरोध प्रकटतो. अनेक नवे बदल त्यांची पात्रे कुरकुरत व नाइलाजाने स्वीकारताना दिसतात. एकीकडे परंपरांचे ओझे वाहायचे व दुसरीकडे आधुनिक युगाकडे वाटचाल करत राहायचे, हे जे द्वंद्व गांधीजींच्या मनात व आचरणात दिसते, तेच पुलंच्या लिखाणातही दिसते.
पुलंच्या ‘फिक्शन’मध्ये जे विडंबन, खिल्ली, उपहास, टीका आहे, ती आधुनिक मूल्यांवर व जीवनसरणीवर आहे, पण पुलंनी खऱ्याखुऱ्या माणसांवर लिहिताना मात्र अत्यंत आधुनिक व पुरोगामी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना गांधीजी व काँग्रेस हा केंद्रबिंदू मानायचा आणि त्याच्या परिघात येणाऱ्या माणसांचा सतत गौरव करायचा, हे पुलंचे धोरण अनेक व्यक्तिचित्रे, प्रस्तावना, श्रद्धांजली, उद्घाटनपर भाषणे, प्रवासवर्णने अथवा परिचय यांमध्ये आढळते.
पुलंची ही द्विधावस्था अगदी ठळकपणे दिसते. हा अर्थात त्यांच्या नकळत घडणारा स्वाभाविक आविष्कार होता. आपल्या कह्यातून निसटत चाललेले जनजीवन-रूढी-परंपरा-सुखी जीवनाचे घटक यांबद्दल उसासे टाकणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या पुढे त्यांनी त्यागी, कष्टाळू, वत्सल, गप्पीष्ट, संतापी पण परोपकारी, निर्मळ, नि:स्वार्थी लोकांची व्यक्तिचित्रणे ठेवली आणि ‘नॉस्टाल्जिया’त सर्वांना रमवले.
त्याच वेळी बावळट, भित्रा, चतुर, प्रेमळ, भांडखोर, कंजूस, लोभी शहरी मध्यमवर्गाची टिंगलही केली. नवनव्या बदलांच्या आधुनिक वातावरणात घुसळल्या जाणाऱ्या मध्यमवर्गाला अशा जुन्या व गोष्टींशी पुलंनी बांधून ठेवले. शेजारधर्म, एकत्र कुटुंब, आजीआजोबा, घरातील कष्टाळू स्त्री, गप्पागोष्टी, निवांतपणा, पोरकट खोड्या, निसर्ग अशा हरवत चाललेल्या कैक गोष्टींना पुलंच्या कल्पित लिखाणात आश्रय मिळाला.
मग साने गुरुजी, विनोबा, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, नानासाहेब गोरे, नाथ पै, हमीद दलवाई, राम नगरकर, ग.दि. माडगूळकर इत्यादी बंडखोर, परंपराभंजक माणसांचाही गौरव पुलं का करतात? गौरकिशोर घोष नावाचे एक भलतेच थोर बंगाली लेखक-पत्रकार आहेत. त्यांची प्रदीर्घ अंतर्बाह्य ओळख पुलं मराठी माणसाला का करून देतात? पुलं बंगाली का शिकतात? रवींद्रनाथांच्या प्रेमात का पडतात? छत्रपती शाहू महाराजांवर जुनीच माहिती वापरून पण नाट्यमय असा अफलातून लेख का लिहितात? दलित साहित्याची दखल अवघ्या महाराष्ट्राने घ्यावी, यासाठी एकच लेख असा लिहितात की, तमाम मध्यमवर्गीय दलित साहित्यासाठी अधाशासारखा वागतो. का? आमट्यांच्या आनंदवनाकडे तरुण-तरुणींच्या झुंडी वळाव्यात इतके अफाट कौतुक हा माणूस का करतो? गांधीजींवर लहान मुलांसाठी पुस्तक का लिहून देतो? कुमार गंधर्वाना ‘गांधीराम’ तयार करण्याची प्रेरणा का देतो?
थेट गांधीवाद्यांसारखे पुलं वागणे शक्य नव्हते. कोणी कोणाला पीडा देऊ नये, जे जे मंगल ते ते टिकावे, असत्याचा प्रतिकार करावा, मनाने उदार असावे, असे गांधीसंस्कार त्यांना महाराष्ट्रातील अपरिहार्य परिवर्तनाकडे खेचत होते. त्यातूनच त्यांनी उपरोल्लेखित लिखाण केले. कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना प्रिय असल्याने त्यांनी आणीबाणीनंतर तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचारच केला. इतकेच काय, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी युतीचे सरकार असताना ‘ठोकशाही’वरही ते बोलले.
याचा अर्थ, निर्वाणीचा काळ आला की, पुलं कणखर भूमिका घेत. एरवी, पुलं माणसांना, विचारांना जवळ करत, तो ते पारखून घेत असत. म्हणून त्यांची वैयक्तिक भूमिका कोणत्याही कलावंताची असते, तशी सर्वंकषवादाच्या, एकाधिकारशाहीच्या विरोधात असे. याच भूमिकेतून त्यांनी कम्युनिस्ट पक्ष व विचारसरणीवर टीका केली आहे. त्यांची काही पात्रे त्याबद्दल टिंगलीवजा बोलतात.
एक मात्र स्पष्ट दिसते. सावरकर आणि देवल दोन हिंदुत्ववादी व संघपरिवारातील माणसे सोडली, तर या परिवाराला आपल्यापासून चार हात दूरच ठेवले. उदारमतवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी व्यक्ती व संस्थांच्या जवळ ते स्वतःहून जात किंवा त्या जवळ आल्या असता त्यांना पाठिंबा देत, तसे त्यांनी संघपरिवाराबद्दल केले नाही. म्हणजेच पुलं आपला प्रेमवर्षाव करण्याबाबत ‘डावे-उजवे’ करत असत. निष्ठा, विचार व वर्तन याबाबतीत ते फारच काटेकोर व चोखंदळ होते.
गांधीजींशी त्यांची तुलना करणे अनुचित आहे, पण गांधीजी आपल्या आश्रमात कोणाला येऊ द्यायचे व कोणाला नाही, हे जसे ठरवायचे, तसे पुलंच्या निकटवर्तीयांवरून म्हणता येते. पुलंमार्फत ‘प्रकाशित’ होण्याची धडपड अनेक जण करत. पण पुलं आपल्या उदारमतवादी, लोकशाहीनिष्ठ कसोट्या लावत असणार व त्यांना जो खरा उतरेल त्यालाच प्रकाशात आणत असणार.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
बाकी वैयक्तिक जीवनात पुलं निधर्मी, नास्तिक होते. देवधर्म व कर्मकांडे यांना त्यांच्या आयुष्यात मज्जाव होता. गांधीजींना दिले गेलेले देवपण व त्यांच्या सूतकताई-साफसफाई-प्रार्थना आदींना आलेले कर्मकांडाचे स्वरूप, याचाही त्यांनी समाचार घेतला होता, पण उदारमतवाद व सहिष्णुता यामुळे पुलं आपली मते लादत नसत. देवळे, मूर्त्या, तथाल परिसर यांचे त्यांना आकर्षण होते, पण सांस्कृतिक अर्थाने. तरीही पुलंचा वाचक बहुसंख्येने संघपरिवारातलाच होता किंवा संघाशी निगडित माणसांना पुलं आवडायचे असे म्हणू. हा एक मोठाच विरोधाभास मानला पाहिजे.
आपली वैचारिक निष्ठा, जाणीवपूर्वक स्वीकारलेली जीवनपद्धती आणि आयुष्यभरची कमाई प्रागतिक व्यक्ती व संस्थांसाठी उपलब्ध करून देण्याची दानत, या पुलंच्या गोष्टी मराठी वाचकाने साफ नजरेआड केल्या. जण लेखकाचे अन्य पैलू त्याच्या गावीही नाहीत. त्यामुळे उत्तम करमणूक करणारा माणूस आणि उत्तम कलेचा रसिक गृहस्थ, अशीच त्यांची प्रतिमा या वाचकाने निश्चित केली. या व्यतिरिक्तही ते खूप काही होते, हे त्यामुळे अनेकांना समजलेच नाही.
(‘ललित’ मासिकाच्या ‘पु.ल.देशपांडे विशेषांका’तून साभार, सप्टेंबर २०००)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment