अजूनकाही
‘ते घोर मुस्लीमद्वेष्टे इथंच राहतात का?’ आम्ही परशुराम अपार्टमेंटच्या समोर उभे राहून एका मुलाला विचारले. दहा वर्षांचाच तो, पण लगेच म्हणाला, ‘हो, हो. ते काय तिथं!’ मी वर पाहायच्या आतच वरून आवाज आला, ‘कोणेय? हां, वर या!’ पहिल्याच मजल्यावर जायचे असल्याने आम्ही आनंदलो. हे मुस्लीमद्वेष्टे गड व किल्ले यांचा कायम एकांत बिघडवतात असे ऐकले होते. वाटले उंच, शेवटच्या मजल्यावर एखाद्या गुप्त दरवाजाने आत जावे लागेल, असा फ्लॅट असेल. पण हे चक्क आठ पायऱ्या चढून गेल्यावरच भेटले.
“केवढ्या मोठ्यानं मुस्लीमद्वेष्टे म्हणालात हो? चक्क घरात ऐकू आले मला”, असे म्हणत त्या काटकुळ्या, गोऱ्यापान चष्मेवाल्याने आम्हाला कोचावर बसायचा इशारा केला. “त्यात काय? आपली आयडेंटीटी का लपवायची? नाही तरी ‘ते’ आणि ‘आपण’ अशी फाळणी केलीच आहे तुम्ही! त्यात १० वर्षांच्या मुलालाही तुमचा मुस्लीमद्वेष समजला, हे किती कौतुकास्पद. एक नवी पिढीच तुम्ही भारतात जन्माला घातलीय…” त्यांना चर्चेचे स्फुरण चढवण्यासाठी आम्ही बोलून गेलो.
मग मुस्लीमद्वेष्टे खुलले, “ती खाली पाटी पाहिली ना तुम्ही? भंगारवाले, फळवाले अन ब्रेडवाले यांना कॉलनीत यायला बंदी असल्याची, ती मुसलमानांसाठीच लावली आहे. पण काय आहे, तुमची भारतीय राज्यघटना असं धर्माचं नाव घेऊन बंदी करू देत नाही. त्यामुळे अमूक विक्रेत्यांनी आत येऊ नये, अशी शक्कल लढवली. काय? कसं काय येणं केलंत?”
द्वेषाने इतका तळपलेला माणूस पाहून आम्ही खरे तर दिपलो. पंखा जोरात सुरू होता. ‘चहा चालेल’ असे त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर ते आत ‘अगं ए…’ करत गेले अन् आम्ही त्यांच्या खोलीचं निरीक्षण करू लागलो. त्यांच्या खुर्चीच्या मागे एक नोटीसवजा फलक होता. तो सांगत होता- १) उर्दू ही काफरांची भाषा आहे. त्यातले शब्द टाळून बोलावे. २) शेजारच्या मशिदीच्या नमाजाच्या वेळा सकाळी पाच, आठ, दुपारी दीड, सायंकाळी साडेपाच व रात्री आठ अशा आहेत. त्या सुमारास आमच्या घरात सेट केलेली ‘हनुमानचालिसा’ सुरू होईल. त्या वेळी उभे राहावे. ३) चहासोबत टोस्ट, खारी, बिस्किट, ब्रेड इ. मिळणार नाही. शिळी पोळी चांगली लागते. चिवडा बरा असतो. फरसाण मिळेल. कारण आमच्या प्रिय नरुभाईंचा आग्रह. ४) आपले बोलणे सुरू असले तरी टीव्हीवर बातम्या, चर्चा चालूच राहील. मुसलमानांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष असल्यामुळे आम्ही तुमच्याशी संवाद करता करता चॅनेल बदलत राहू. कृपया गैरसमज असू नये. ५) संघ एक ईश्वरी कार्य आहे. त्यामुळे आम्ही कोण्याही दैवताचा अपमान सहन करणार नाही. उदा. मोदी, शहा, भागवत, फडणवीस, नूपुर आदी.
“हं, बोला”, असे मोठ्याने म्हणत ते परत आले खरे, पण आम्हाला न बोलता ते टीव्हीला तसे म्हणालेत असेच आम्हाला वाटले. आम्ही गप्पच. टीव्हीवर बुलडोझर काही नासधूस करत असल्याचे दिसत होते आणि वार्ताहर लांब, धुळीपासून स्वच्छ व आनंदी सुरात कशी जिरली, हे आडून आडून सांगत होता. “हे, हे बघताय ना? परक्यांनी जे जे उभं केलं, ते ते आम्ही आडवं पाडणार. आधी आम्ही हे सारं नष्ट करणार अन् मग नव्या भारताची घोषणा करणार. ‘नवा’ भारत म्हणजे म्लेंच्छ नसणारा, यवनशून्य भारत! जर्मनीत जसं…” असे बोलून मुस्लीमद्वेष्टे अचानक थांबले. एका धुंदीतून रिकामे होत आम्हाला म्हणू लागले, “जे लहान असतात त्यांनी मोठ्यांचं ऐकावं. उलट बोलू नये. राष्ट्राचं भलं त्यातच असतं. राष्ट्र नेहमी बलवंताचं ऐकतं. बायका आणि बाजार दोन्ही बळकावयाचे असतात, तसे हे शिस्त, संस्कृती, परंपरा डोळे वटारल्यावरच पाळतात लोक.”
चहा आला. सोबत शंकरपाळी आणि तिखटाच्या पुऱ्या! आम्हाला नाष्टा झाल्याने भूक नव्हती. अभावितपणे बोलून गेलो, ‘अहो, बिस्किटे चालली असती की!’ मुस्लीमद्वेष्टे म्हणाले, “आम्ही पार्ले कंपनीची खातो. ती संपली. ब्रिटानियाची खात नाही!” ‘का, का?’ आम्ही प्रश्न विचारणार हे जाणून ते म्हणाले, “ती परदेशी असतात. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनीची. थोडक्यात, परकियांची. आम्हाला परकं काहीही आणि कोणीही चालत नाही. आपलं, आमचं आम्ही पसंत करतो.”
मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेत आम्ही खुलासा करत म्हणालो, “अहो भय्याजी, ब्रिटानिया कंपनी आपले ‘बॉम्बे डाईंग’ कंपनीचे नुसली वाडिया आहेत ना, त्यांची आहे. हां, हे गृहस्थ बॅ. जीनांचे नातू आहेत, म्हणून तुमचा त्या नावावर बहिष्कार असेल तर दाद द्यावी लागेल तुमच्या द्वेषाला! परंतु आता ‘शुद्ध देशी’, ‘निखळ भारतीय’ असं काय राहिलंय? अमेरिकेतल्या हिंदू संघटनांकडून किती तरी पैसा येतो तुम्हाला. ती हिंदू मंडळी गोऱ्या कातडीची सेवा करूनच पैसा कमावते. शिवाय असंख्य कंपन्यांत शेख, अमीर, सुलतान, राजे यांची गुंतवणूक असते. अमेरिकेतच आता ‘शुद्ध अमेरिकन’ काही राहिलेलं नाही. भांडवलशाहीला जिथून पैसा अन् गिऱ्हाईक मिळेल, ते हवं असतं. कसला आलाय राष्ट्रवाद अन राष्ट्रप्रेम? नूपुरताईंना मुस्लीम राष्ट्रांमुळे घरी जावं लागलं, याचं दु:ख बोचतंय तुम्हाला… त्यांचं चुकलंच हो. प्रेषितांविषयी असं बोलायला नको होतं त्यांनी…”
मुस्लीमद्वेष्टे गरम झाल्याचे दिसले. मुद्द्यांची जुळवाजुळव करून आम्हाला प्रत्युत्तर देणार तितक्यात टीव्हीवर खासदार ओवैसी काही बोलताना दिसले. त्यांच्याकडे लक्ष अन आमच्याकडे दुर्लक्ष करून भय्याजी ऐकू लागले. आम्हाला वाटले, आता हा बाबा प्रचंड खवळणार. ओवैसीची ‘ऐसी की तैसी’ करणार. कसचे काय! ओवैसी बोलायचे थांबले. अफाट कौतुक चेहऱ्यावर आणत मुस्लीमद्वेष्टे बोलू लागले, “काय विद्वान माणूस आहे हा! समस्त डाव्यांची योग्य फजिती करतो. आमचं भले चिंतणारा मित्रच. शतायुषी व्हावा तो. तुमचा जलिलही चांगलाय…”
आम्ही बुचकळ्यात पडलो. मुस्लीमद्वेष्टे म्हणून याला भेटायला आलो, तर हा मुसलमान नेत्यांची स्तुती करतोय… दुहेरी निष्ठा अन दुतोंडी वर्तन म्हणतात ते हेच काय, असा विचार आम्ही मनात घोळवू लागलो. तेवढ्यात मुस्लीमद्वेष्टे बोलले, “हा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे! चमकू नका. आपला नव्हे, पाकिस्तानचा. पुन्हा दचकलात का? अहो, जेव्हा आपला ‘अखंड भारत’ तयार होईल भागवतजी म्हणाले तसा, तेव्हा ओवैसी यांनी आम्ही भारतातर्फे पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून नेमू. त्यालाही सेवेबद्दल प्रसाद, आम्हाला पूर्वी हिंदू असलेला, डीएनए एकच असलेला माणूस नेमल्याचा आनंद. नाही तरी आता निम्मे लोक काँग्रेसमधून आलेच आहेत आमच्यात. त्यानं काय फरक पडतो? प्रत्येक मशिदीच्या खाली काय पुरलेय, ते कशाला खोदून पाहायला पाहिजे? माणूस महत्त्वाचा. तो आपल्यात सामावतोय की नाही तेवढं बघितलं म्हणजे पुरं. आम्हाला माना, वाचतील माना!”
“तुमचे हे उदगार विस्तारवादी, आक्रमक, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची कदर न करणारे वाटतात आम्हाला. हिंदू असे सत्तालोभी अन साम्राज्यवादी कसे काय होऊ शकतात?” आमचा भाबडा सवाल.
तेवढ्यात मशिदीमधून अजान सुरू झाली आणि आम्ही बसलो होतो, त्या खोलीत ‘हनुमानचालिसा’ही. रेकॉर्डेड अशी ती लागताच मुस्लीमद्वेष्टे उभे राहिले. आमच्या हातातला चहाचा कप, दोन शंकरपाळी खाली ठेवत आम्हालाही उभे राहावे लागले. साधारण दोन मिनिटांनी नमाज आणि चालिसा दोन्हीही थांबले. टीव्हीचा आवाज या आवाजात बुडून गेला होता. मुस्लीमद्वेष्ट्यांना आपले काहीतरी महत्त्वाचे निसटले असे वाटून ते चॅनेल बदलत सुटले. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राज्यस्थान या राज्यांत हिंदीमधून बातम्या देणाऱ्या चॅनेलमागे ते एका पाठोपाठ धावू लागले. मुसलमानांविरुद्ध काही मुद्दे मिळतात का, त्याचा हा पाठलाग तब्बल चार मिनिटे चालला. एकाच प्रकारचे दाढीवाले, टोपीवाले बऱ्याच चॅनेलवर दिसले. मुस्लीमद्वेष्टे दमले. थांबले.
मग म्हणाले, “ते नांदेडचे तुमचे कोणी शेषराव आहेत ना, ते आम्ही वाचतो आणि आमचा इस्लाम त्यामुळे एकदम पक्का झालाय बरं का! ते मुल्ला-मौलवी आता आमच्यापुढे शरण येतील. खरं तर या चॅनेलवाल्यांनी आम्हाला चर्चेला बसवायला पाहिजे. असे आम्ही त्यांचे मुद्दे खोडून, सांगूच नका. पण काय आहे, आमच्या कॉलनीमधून बाहेर पडल्यावर बेगमपुरा लागतो. जरा भडक लोक राहतात तिथं. कशाला उगाच रिस्क? त्यापेक्षी ही आमची कॉलनीतली मुलं जमवतो आणि सांगतो त्यांना इस्लाम, मुसलमान, कुराण, पैगंबर, मुघल, पाकिस्तान वगैरे.”
“तुम्ही म्हणे मुसलमान मुलांशी मैत्री करू नका असं सांगता या कॉलनीतल्या मुलांना? सलमान, अमीर, शाहरुख या खानांचे सिनेमे न बघायचाही सल्ला तुम्ही दिल्याचं ऐकतो. खरंय का ते?” आम्ही
मुस्लीमद्वेष्टे गडबडले. आपले गुपित उघडे पडले असे वाटल्याने बावरले. चाचरत बोलले, “न न नाही. तसं काही नाही. त्यांच्या चित्रपटांत मजा नसते, म्हणून सांगत होतो…”
मुसलमानांशी संबंध ठेवू नका, बहिष्कार घाला, असाच मुस्लीमद्वेष्ट्यांचा इरादा होता. ‘लव्ह जिहाद’चा बागुलबुवा उभा करून त्यांनी आधीच मुला-मुलींना मिसळण्यास अडवले होते. हे सारे आमच्या कानी पडले होते, म्हणून तर समजून घ्यायला त्यांच्या घरी आलो होतो… तर मुस्लीमद्वेष्टे चक्क डरपोक निघाले! आम्हाला डावे, समाजवादी, नाव बदललेले मुसलमान समजले. आमची दाढी (कोरलेली), झब्बा-पायजमा, अजागळपणा आणि कमावलेले शरीर पाहून बहुधा आम्हाला ते माफिया, गँगस्टर, सुपारीबाज किंवा कसाई समजले. त्यांनी घाईघाईने टीव्ही बंद केला. पाणी प्यायले आणि आतून बायकोला बोलावून जवळच्या सोफ्यावर बसायला सांगितले. मग सांगू लागले, “तशीही आता मुसलमानांशी घसट होत नाही. शहराचे तुकडे झाले आहेत. शाळा वेगळ्या, कॉलेजे-क्लासेस वेगळे. कॅफे, हॉटेले अन करमणुकीची ठिकाणंही अलग असतात. आपोआपच मैत्रीबंध खुरटले. त्यांचं वागणं-बोलणं आता आम्ही सिनेमा, टीव्ही, बातम्या यांतूनच जाणतो.”
हा कबुलीजवाब मानायचा की, हद्द वेगळ्या करून टाकलेल्या भिन्न धर्मीयांच्या सामाजिक वर्तनाबद्दलच्या वावड्या? हा तर शत्रू उभा करून तो न पाहताच त्याच्याबद्दलच्या काल्पनिक कहाण्या रचायचा प्रकार. कोवळ्या, भाबड्या, नि:शंक मतांवर विकृत व विपर्यस्त प्रतिमा लादायचा कट!
मुस्लीमद्वेष्ट्यांना आम्ही सांगू लागलो, “हे पाहा भय्याजी, आम्ही ना एमआयएमचे, ना काँग्रेसचे. मुसलमान चुकीच वागतात, तेव्हा आमचे पुरोगामी, सत्यशोधक मुसलमान विचारवंत त्यांना समजावतात. त्यांच्याशी भांडतात. ते जिवावर बाजी लावून सुधारणा करू पाहतात. सभा, संमेलनं, चर्चासत्रं आखून अंधश्रद्धा, शोषण, दादागिरी, बेकारी, असुरक्षितता इत्यादी प्रश्न हाताळतात. स्त्रिया-मुलं यांच्या विशेषाधिकारांचा आग्रह धरतात. त्यांचं कौतुक तुम्हाला असणार नाही. कारण मुस्लीम धर्मगुरूंप्रमाणे तुम्हीही मानता की, ते धर्मविध्वंसक आणि बंडखोर लोक आहेत. तुम्हाला हिंदूंमधल्या सुधारकांची, जातीविरोधकांची, पुरोगाम्यांची जशी गरज नाही, तशी मुल्ला-मौलवींनाही त्या मंडळींची गरज नाही. म्हणून तुमचं ओवैसीवर प्रेम!”
एका मुसलमानावर प्रेम म्हटल्याबरोबर मुस्लीमद्वेष्टे चिडले. हा आरोप म्हणजे त्यांच्या आजवरच्या प्रतिमेशी केलेला द्रोहच. मुस्लीमद्वेष्टा मुस्लीमप्रेमी कसा असू शकतो? एमआयएम भाजपचा हस्तक असल्याचा आरोपही मग मंजूर केल्यासारखे होईल. संघाचे नेते इंद्रेशकुमार हैदराबादमध्ये निजामाच्या वंशजासह निजामशाहीचे गुणगान करत असल्याची वार्ता फुटल्यापासून ओवैसी व हिंदुत्ववादी यांची स्तुती छुपी की उघड, या चर्चा सुरू झाल्या होत्या. आपण चांगलेच पेचात सापडलो, असे भाव मुस्लीमद्वेष्ट्यांच्या चेहऱ्यावर तरळू लागले. ते पटकन उठले व शेषराव नांदेडकरांचे एक पुस्तक काढून त्यात काही शोधू लागले. ‘छे!’ असा उदगार काढून नरहर नांदेडकर यांचे पुस्तक चाळू लागले. त्यातही त्यांना हवे ते मिळेना.
आम्हाला संधीच मिळाली. त्यांना म्हटले, “भय्याजी, हे वाळीत टाकणं, बहिष्कार, असहकार, अस्पृश्यता, उच्च-नीचता यामुळे त्रासून तुमचे डीएनए बंधू इस्लाममध्ये गेले. आता पुन्हा त्याच ब्राह्मणी शिव्याशापांनी तुम्ही त्यांना त्रासू लागला आहात. हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना प्रेषितांचे सत्य, मुस्लीम देशांचं वास्तव सांगून त्यांना अवमानित करत आहात. आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागला. ‘रिडल्स इन हिंदूइझम’ लिहिलं. त्यावर तुम्ही बंदी आणायची मागणी केली. मोर्चे काढले. दाढी-टोपीवाल्या पुराणपंथियांशी तुमच्यासारख्या सनातन धर्मवाल्यांची अशी चुंबाचुंबी हीच खरी ‘रिडल्स इन हिंदूइझम’ आहे. तुम्ही मुस्लीमद्वेष्टे नसून हिंदूद्वेष्टे आता काय?”
मुस्लीमद्वेष्टे पुन्हा गडबडले. त्यांना काही उत्तर सुचेना. ते मोबाईल उघडून बहुधा व्हॉटसअप युनिव्हर्सिटीच्या कोण्या वर्गातही जाऊन आले. सरसंघचालक एकीकडे हिंदू-मुसलमानांची पाळेमुळे एकच, असे सांगताना स्वयंसेवक मंडळी ही मुळेच उखडू पाहणारे कसे, याचा पेच त्यांना पडलेला दिसू लागला. आपण एकाच वेळी दोघांचे द्वेष्टे कसे, हा प्रश्नही त्यांना सतावू लागला.
घोटभर पाणी पुन्हा पिऊन मुस्लीमद्वेष्टे सांगू लागले की, “आम्ही मुस्लिमांना परत हिंदू धर्मात आणायचा प्रयत्न करत आहोत. त्यांची सुटका तरी होईल…!”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
आम्ही विचारले, “सुटका कशी काय? ते समजा हिंदू धर्मात परतले, तर त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जातीच मिळतील. मग त्यांची बहुसंख्या होईल. त्यांना काँग्रेसला मतं देण्यावाचून पर्याय नसेल मग. कारण काँग्रेसवर तुम्ही अजूनही मुसलमानांच्या ‘व्होट बँके’चा आरोप करता. जुने मुसलमान आणि नवे बाटगे हिंदू म्हणून तुमचे लोक त्यांची हेटाळणी करत राहणार. ट्रोलर्स त्यांना सतावत राहणार. काँग्रेसवाले असं काही करत नाहीत…”
मुस्लीमद्वेष्टे अवाक् झाले. हताश होऊन बसून राहिले. त्यांना तसे पाहून आम्ही काढता पाय घेतला. खाली आम्हाला गळ्यात भगवे गमछे घातलेले चार कार्यकर्ते एक मोठे कमळ हातात घेऊन येताना दिसले. ‘ते मुस्लीमद्वेष्ट इथंच राहतात काय?’, असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला. आम्ही ‘बहुतेक’ एवढेच बोलून पुढे गेलो…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment