१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या घटनेला १ मे २०२० रोजी ६० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ग्रंथाली या प्रकाशनसंस्थेने विज्ञान, भाषा, साहित्य आणि संस्कृती या तीन क्षेत्रांतील महाराष्ट्राच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या तीन महत्त्वाकांक्षी ग्रंथांचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र हे तिन्ही प्रकल्प करोनाच्या आकस्मिक लाटेमुळे लांबले. तरीही ग्रंथाली आणि संबंधित प्रकल्पाच्या संपादकांनी ते नेटाने पूर्ण केले. नुकतेच हे तिन्ही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. प्रस्तुत ‘मोहरा महाराष्ट्राचा’ हा त्यापैकीच एक. याचे संपादन रमेश अंधारे यांनी केले आहे. या ग्रंथात गो. बं. देगलूरकर, रा. चिं. ढेरे, वसंत आबाजी डहाके, आ. ह. साळुंखे, श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, रावसाहेब कसबे, दि. के. बेडेकर, अशोक चौसाळकर, भास्कर लक्ष्मण भोळे, फकरुद्दीन बेन्नूर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्रीपाद भालचंद्र जोशी, जनार्दन वाघमारे, सुनीलकुमार लवटे, फ. म. शहाजिंदे, निशिकांत मिरजकर, गो. म. कुलकर्णी, अजय देशपांडे आदी ४३ लेखकांच्या साहित्य आणि संस्कृतीविषयक लेखांचा समावेश आहे. त्यातील हा एक लेख...
..................................................................................................................................................................
समजा, प्रसारमाध्यमे नसती तर माणसाची प्रगती झाली नसती का? झाली असती, पण ती फार हळूहळू झाली असती. आपल्याला गोष्टी लवकर कळाव्यात म्हणून तर माणसाने माध्यमांचा शोध लावला. ज्ञानाचा साठा केलेले अक्षर भाषा बनून इकडे तिकडे प्रसरण पावू लागले, म्हणजे माध्यम म्हणूनच भाषा उत्पन्न झाल्यावर, भाषेलाही निर्जीव आणि सुलभ माध्यमांची गरज भासू लागली. त्यातूनच आधी छापखाना जगात आला. त्याआधी पोथ्या लिहायला अक्षरांची जाण असणारा साक्षर माणूस हाताने लिहून, अनेक प्रती तयार करून त्यांचे वाटप करत होता.
छापखाना आल्यावर माणसाचे कष्ट वाचले. गुटेनबर्गने जर्मनीत छापखाना काढताना पहिले पुस्तक छापले, ते होते ‘बायबल’. भारताचा पहिला चित्रपट दादासाहेब फाळक्यांनी काढला, त्याचे नाव होते ‘राजा हरिश्चंद्र’, मराठीत पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले, त्याचे नाव होते ‘दर्पण’. नावावरूनच या तिन्ही प्रणेत्यांची इच्छा सामान्य माणसाचे उन्नयन (प्रगती) व्हावे अशी होती. ‘बायबल’, हरिश्चंद्र, आणि ‘दर्पण’ यांचा उपयोग स्वतःत काही चांगले बिंबवण्यासाठी करायला हवा, असा विचार तिन्ही अग्रेसरांनी समाजासाठी केलेला होता.
ज्ञान एका जागी, एका समाजात, एका जातीत, एका ग्रंथात नसते. ते वाटले पाहिजे. ज्ञानाचा गुणधर्म प्रसार व प्रसरण असतो. थिजलेल्या गोष्टीला ज्ञान म्हणत नसतात. माध्यमांमुळे एकाच्या वर्चस्वाला धक्का पोचतो. अनेकांपर्यंत ज्ञान पोचते. म्हणून माध्यमे हुकूमशाहीच्या, एका व्यक्तीच्या, एका पक्षाच्या, एका विचाराच्या सत्तेच्या विरोधात असतात.
आता माध्यमे व ज्ञान यांचा काय संबंध, असा प्रश्न कोणी उपस्थित करील. माहिती आणि ज्ञान यांत विभागणी करायला आपण शिकले पाहिजे. कारण पुष्कळदा प्रसारमाध्यमे देत असतात ते ज्ञान नसते, ती माहिती असते. परंतु आजकाल ज्ञान कशातूनही होते आणि कशामुळेही होते. त्यामुळे ज्ञानदान करणारी साधने वेगळी आणि माहिती देणारी वेगळी, असे सध्या करता येत नाही. मुख्य म्हणजे ज्ञान देतो, असा दावा माध्यमे करत नाहीत. त्यांचीही ज्ञानाविषयीची धारणा वेगळी असते. कारण पत्रकारिता करणारी मंडळी आपल्या व्यवसायाकडे जितक्या गांभीर्याने बघायला हवे, तितकी पाहत नाहीत. ज्ञान म्हणजे काही तरी भव्य, जाडजूड, गंभीर, कठीण अशी त्यांची समजूत झालेली दिसते.
ज्ञानाचा संबंध कॉलेजे, वाचन, पुस्तके, ग्रंथालय, संशोधन, वेळ, एकाग्रता अशा कैक गोष्टींशी जोडला जातो. उघड आहे, उपरोल्लेखित सर्व बाबी शिक्षणाशी आहेत. त्यामुळे ज्ञान व शिक्षण यांची अभिन्न सांगड घातली गेली आहे. ज्ञानाची गाठ विशिष्ट लायकीशी बांधली गेली आहे. साक्षरता, पदवी, अभ्यास अशा गोष्टी ज्ञानाशी निगडित असाव्या लागतात, असा एक समज आहे. आज त्यांच्यावाचून काही ज्ञानविषयक होणार नाही.
प्रसारमाध्यमांसाठी पदवी, अभ्यास, चिंतन, संशोधन या गोष्टीची आवश्यकता नसते. म्हणजे रोजची वृत्तपत्रे, तासागणिक बातम्या सांगणाऱ्या चित्रवाणी माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक व्यवस्था, इंटरनेटवर कोठूनही येणाऱ्या-जाणाऱ्या सूचना यासाठी फार मोठी विद्वत्ता, तयारी, अथक समजूत लागते असे नाही. किंबहुना प्रसारमाध्यमांचा लघुत्तम साधारण विभाजक काढलेला असतो. त्यासाठी साधी, सोपी, सरळ भाषा वापरलेली असते. सारी माहिती सचित्र, सुस्पष्ट व थेट सांगितलेली असते. बहुतेकदा एका घटनेचे अनेक पैलू सांगायचा प्रयत्न केलेला असतो. मुख्य म्हणजे निर्णय, निष्कर्ष, निर्वाचन प्रेक्षकांवर, वाचकांवर सोपवलेले असते. तटस्थता, निष्पक्षता या पायांवर बव्हंश माहितीप्रसारण करण्यात आल्याचा प्रयत्न न दाखवता केलेला असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी माहिती पोचवताना ती शक्यतो अचूक, निर्दोष व उपयुक्त असली पाहिजे, असा माध्यमांचा प्रयत्न असतो.
हे सारे कशासाठी? माध्यमांचा दावा असा आहे का? आम्ही मनोरंजनासोबत प्रबोधनही करत असतो, ते कशासाठी? सरळ उत्तर आहे की, लोकांचे वर्तन सुधारावे यासाठी! ते मग कशासाठी? साऱ्यांना सुखाने जगता यावे यासाठी. माध्यमांच्या या दाव्याबाबत दुमत आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके म्हणजे मुद्रित माध्यमांविषयी हा दावा कोणी धुडकावत नाही. कारण मुद्रित माध्यमाला साक्षरतेची आस आहे. एकांत आणि एकाग्रता याशिवाय मुद्रित माध्यमांचा लाभ म्हणा, आस्वाद म्हणा, घेता येत नाही. एकांत, एकाग्रता यांचा स्वीकार विशिष्ट वातावरणात होतो. ज्याच्यावर वाचकाचा संस्कारच नाही, तो माणूस जसा स्वतः एकटा बसू शकणार नाही, तसे इतरांनाही बसू देणार नाही. कलार्निर्मिती वा विचारनिर्मिती एकांतात आणि एकाग्रचित्त होऊनच शक्य असते. म्हणजेच उन्नयनासाठी शरीर व मन यांची विशिष्टावस्था आवश्यक असते. उन्नयन व मुद्रित माध्यम यांची सांगड तशी विजोड नाही. कारण छापील माध्यमातून वाईटसाईट डोक्यात शिरण्यापूर्वी ते हातात आधी यायला हवे. तसे ते प्राप्त व्हायला फार यातायात करावी लागते.
त्या उलट इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणून विख्यात झालेली चित्रवाणी अर्थात टेलिव्हिजन. हे माध्यम लोकांची अफाट बोलणी खाते. तरीही त्याचा प्रेक्षकवर्ग जराही कमी होत नाही. ते दूषणे का मिळवते? कारण एक माध्यम म्हणून त्याचे कार्य माहिती, ज्ञान, मनोरंजन असेच असले तरी त्यावर मनोरंजनाचा पगडा जास्त आहे. मनोरंजन सदैव अभ्यास, कष्ट, कर्तव्ये, जबाबदाऱ्या यांच्या आड येते. म्हणून टीव्ही शिव्याशाप खात खात वाढला व पसरला. एवढेच नव्हे, तर जेथे ज्ञान मिळते, तेथूनच त्याने उड्डाण केले. म्हणजे वृत्तपत्रे, नियतकालिके यांनी टीव्हीचे कार्यक्रम छापून ते लोकप्रिय केले. टीव्हीवरच्या कलाकारांचा परिचय, गुणवत्ता यांची रोज भरताड ते आजही करतात. किंबहुना सण आले की, छाप या कलावंतांच्या छब्या आणि आवडीनिवडी! आले कुठले उत्सव की, छाप या कलावंतांनी तयार केलेले पदार्थ आणि त्यांची पाककला! असे हे एकतर्फी प्रेम सदोदित चालते. एरवी एखाद्या टीव्ही कार्यक्रमात वृत्तपत्रांचा अग्रलेख, लेख वा व्यंगचित्र आवडल्याचा साधा उल्लेखही नसतो. टीव्हीमधल्या कार्यक्रमांमधले एकही पात्र वृत्तपत्र वाचताना आढळत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? वाचन ही उन्नयन करणारी कृती नाही, असा?
जगात वृत्तपत्रांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त टीव्ही या माध्यमाचा कीस काढला गेला आहे. म्हणजे त्या माध्यमांचा अभ्यास, विश्लेषण आदी करण्यात आले आहे. मुद्दा तोच होता. माध्यमाने समाजाचे सांस्कृतिक, मानसिक उन्नयन होते की, त्याचा विपरीत परिणाम होतो? कारण टीव्ही घराघरांत पोचला आणि लोक त्याचे व्यसन करू लागले. प्रेक्षक त्याच्यावर आसक्त झाले. ‘टीव्ही अॅडिक्ट’ असा एक मानवच जगभर तयार झाला. या माध्यमाने गरीब-श्रीमंत, शिक्षित-अडाणी, शहरी-गावठी, तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष आदी अनेक सामाजिक भेद मिटवून वा मोडून टाकले. मुलांची वाढ आणि संगोपन टीव्हीच्या पुढ्यात होऊ लागले. तरुणांची भावविश्वे टीव्हीच घडवू लागला. वृद्धमंडळी त्यांच्याकडून निसटलेले आयुष्य टीव्हीत शोधू लागले.
शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य यांच्या जोडीने सामाजिक व सांस्कृतिक उन्नयन होण्यासाठी धार्मिक साहित्य, आध्यात्मिक साधने, सज्जन माणसांची संगत यांचा अग्रमान होता. कीर्तन, प्रवचन, निरुपण, आरती, श्लोक, ओव्या, अभंग, प्रार्थना यांचा त्यात अग्रभाग होता. इतिहासाचे वाचन व श्रवण यांचाही हातभार त्यास लागे. नाटके, चित्रपट यांची त्यात भर पडली, मात्र त्यावर मोठ्यांची सक्त निगराणी असे. पारख केल्याशिवाय त्याकडे जायलाच बंदी असे. याचा परिणाम असा झाला की, आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान यांचा आधार घेऊन जन्मलेले एक माध्यम या सर्वांची पोतडी होऊनच घराघरांत पोचू लागले. आज चित्रवाणीची शेकड्याने रूपे आपण पाहतो. एक वाहिनी म्हणजे एक रूप.
पूर्वी वृत्तपत्रे सदरांनी कमी माखलेली असायची. आजकालच्या पुरवण्या सदरांकित असतात. अशी सदरे म्हणजे चित्रवाणीच्या पूर्णवेळ वाहिन्या बनल्या आहेत. पाकक्रिया, क्रीडा, फॅशन, धर्म व अध्यात्म, पर्यटन, वन्यजीव, विज्ञान व तंत्रज्ञान, बालांचे मनोरंजन, इतिहास, अर्थव्यवहार व बाजार, शेती व बागकाम, निसर्ग, संगीत, चित्रपट, विनोद असे असंख्य एकएकटे विषय चित्रवाणी वाहिन्यांचे आहेत. त्याची मांडणी आकर्षक, चटपटीत, थोडक्यात मुद्देसूद आणि सोपी असते. म्हणून प्रेक्षकवर्गही त्यांना लाभतो. जेवढा प्रेक्षकवर्ग जास्त, तेवढ्या जाहिरातीही जास्त, असा चित्रवाणीच्या व्यवस्थापनाचा साचा असतो. तेव्हा हे काही जे चालते, ते व्यावसायिक असते. त्याद्वारे जे ज्ञान मिळत असेल, ते या व्यवसायाचा हिस्सा असते. थोडक्यात, ज्ञानाच्या देवाणघेवाणीला जर आपण उन्नयन म्हणणार असू, तर ते पूर्णपणे व्यावसायिक आहे, हे आपण जाणले पाहिजे. शिवाय तो नफ्याचा व्यवसाय आहे, हेही ध्यानी ठेवावे लागेल.
पूर्वीप्रमाणे आता ज्ञानविषयक कसलेही कार्य पवित्र, निर्मोही, फुकट केले जात नाही. १९९१पासून आपल्या देशाने उदारमतवादी, खाजगीकरण झालेली अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रसारमाध्यमांचे विश्वही तसेच झाले आहे. तसे पाहिल्यास भारतात माध्यमांची मालकी खाजगीच होती. त्यांचा आर्थिक विचार समाजवादविरोधी असे. सरकारी मालकी वा सार्वजनिक मालमत्ता त्यांना कोणत्याच बाबतीत नको होती. शिक्षण, करमणूक, प्रबोधन, जागृती सरकारचे काम नव्हे, असे ती म्हणत. सर्व क्षेत्रे जास्तीत जास्त प्रमाणात खाजगी झाली पाहिजेत, असा त्यांचा दावा होता. त्याप्रमाणे झाले. त्यामुळे माध्यमे एका अप्रत्यक्ष जबाबदारीतून मोकळी झाली. सारे काही ज्ञान, माहिती, जागृती यासाठी करायचे हा दबाव त्यांनी झुगारून लावला.
वेळ, खर्च, श्रम, तंत्र, उद्दिष्ट, शैली यांची बधने माध्यमांनी उधळून लावली. प्रचंड स्पर्धा सुरू होताच नवी कार्यशैली आणि कार्यसंस्कृती अवतरली. आशयही बदलत चालला. सारे काही विक्रीयोग्य बनवायचे असल्याने आशयाचे स्वरूप चित्तवेधक, आवाजी आणि भडक रंगीत होत चालले. इतके की, आशयाच्या आगेमागे येणाऱ्या जाहिराती आणि आशय यांत काही भेदच दिसेना. वेग, मांडणी, जागा, मारा, प्रभावर्निर्मिती यांत सारा आशय अडकत निघाल्याने प्रेक्षक खिळवून ठेवणे एवढाच एकमात्र हेतू, या माध्यमांचा होऊ लागला. विशेष म्हणजे सर्व कार्यक्रमांचा फॉर्म म्हणजे त्यांचे रूप सारखेच होऊ लागले. एवढी स्पर्धा, परंतु वैविध्य कोठेही दिसेना. स्पर्धेचा वैचित्र्य हा पाया, तोच लुप्त झाला. वृत्तपत्रे एकसारखी, वाहिन्या जुळ्या दिसत चालल्या.
उन्नयन ही इतकी विधायक गोष्ट आहे की, त्यामध्ये विचार, तत्त्वे, मूल्ये, सिद्धांत, सत्य, वास्तव, सर्व बाजूंसहित माहिती इ. विचारांना खोली लाभणे, व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडणे, अशा रितीने उन्नयनाकडे बघायला हवे. माणसाला माध्यमांकडून यांपैकी बरेच काही मिळत असते, सर्व काही नाही. शिवाय माणसाची दृष्टी वेचक असेल तर! सरसकट माध्यमांमार्फत उन्नयन होत नसते.
रस्त्यावरील चांभार परवा ‘पुण्यनगरी’ वाचताना दिसला. त्याचे वाचन झाल्यावर त्याने ते वृत्तपत्र त्याच्या पुढ्यातील लाकडी चौथऱ्यावर अंथरले अन गिऱ्हाईकाची वाट पाहत बसला. तो जर नियमित वाचक असेल तर त्याचे उन्नयन झाल्याचे वा होत असल्याचे आपण मानू. तो जरी वय, कौशल्य, पैसा, वेळ यामुळे मागे पडला असला तरी त्याने त्याची मुले नक्कीच शिक्षित केली असणार. त्याच्या विचारांचे उन्नयन आपल्याला त्याच्या पाल्यांत दिसणार. कारण एक वाचक चांभार, आपल्या मुलाचे हित कशाकशात असते, हे नक्कीच जाणून असणार.
‘पुण्यनगरी’ने विक्रीयोग्य आशय सांभाळून जेवढे ज्ञानविषयक साहित्य देता येईल, तेवढे दिलेले असेल असे समजू या. या दैनिकात महत्त्वाचे आकडे मोठ्या प्रमाणात छापलेले असतात, हेही विसरून चालणार नाही. जीवनात यशस्वी झालेल्या कित्येकांनी लहानपणी वाचलेली वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यांनी ज्ञानात खूप भर टाकल्याचे नेहमीच सांगितले आहे. स्पर्धापरीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे सारे माध्यमांचे वाचन व ग्रहण निष्ठापूर्वक करत असतात. अभ्यासाच्या पुस्तकांसोबतच माध्यमांमधील आशयाचा लाभ विद्यार्थ्यांना/उमेदवारांना होत असतो. पण केवळ माध्यमांमुळे कोणी यशवंत झाल्याचे ऐकिवात नाही. व्यक्तिमात्राच्या उन्नयनात साहित्य, अनुभव, सखे, कुटुंब, संस्कार, साहचर्य, दृष्टी, जात, घराणे, पैसा अशा अनेक गोष्टींचा हिस्सा असतो.
वृत्तपत्रे वा टीव्ही ना कोणाचे पालक होऊ शकतात, ना कोणाचे मित्र. पूर्वी मोठ्या घरांमध्ये घरगडी व हरकामे असायचे. त्यांची भूमिका सध्या प्रत्येक घरात टीव्ही व वृत्तपत्रे बजावतात. घरच्यांसाठी बाहेरचे जग यांच्या पुढ्यात आणून टाकायचे. यांनी ते निवडून त्याचा उपभोग घेत बसून राहायचे. टीव्ही त्याच्या पुढ्यातील प्रत्येकाचे लाड करतो. प्रत्येकाला आवडेल तेवढे देत राहतो. ऐदी करून टाकतो साऱ्या घराला. जसे इंटरनेटने बव्हंश तरुण पिढीला ऐतखाऊ, डल्लामारू आणि परोपजीवी करून सोडले तसे. माध्यमात जे आहे, तेवढेच सत्य नसते. मात्र गुगलवरून शोध करून माहिती व विश्लेषण जमवत जायचे आणि प्रबंध, निबंध लिहायचा. या उचलेगिरीमुळे यांचे ज्ञान उष्टे-खरकटे असते. त्याने बौद्धिक भरणपोषण कसचे होणार?
प्रश्न, जाब, पृच्छा ही पत्रकारांची आद्यकर्तव्ये. जे दिसते ते स्वीकारणे पत्रकाराचे काम नव्हे. माहिती व ज्ञान या प्रक्रिया प्रश्नोत्तरावाचून साकारू शकत नसतात. त्यामुळे पत्रकार व माध्यमे सत्ताशरण होत असतील किंवा प्रस्थापितांत सामील होत असतील तर ती स्वतःसकट आपल्या वाचकांना अन् प्रेक्षकांना अडाणी ठेवणारच. राष्ट्रउभारणीसाठी संज्ञापन केले पाहिजे, असा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या नेत्यांचा आग्रह होता. त्यामुळे प्रचार हा तेव्हाच्या माध्यमांचा गाभा होता. विधायक टीका, सूचना, मार्गदर्शन हा माध्यमांचा आधार तेव्हा होता. हळूहळू सरकार व माध्यमे यांचे मैत्रीपूर्ण संबंध बदलत गेले. १९७५-७७च्या आणीबाणीच्या सेन्सॉरशिपनंतर तर ते खूपच तणावपूर्ण आणि तटस्थ बनले. मात्र भारत गरीब राष्ट्र असल्याने विकासाच्या पथावर माहितीचा फार मोठा सहयोग असावा लागतो, असा सिद्धान्त विकासवादी तज्ज्ञांचा राहिला.
प्रसारमाध्यमांनी वंचित गटांचा कैवार घेऊन त्यांच्यासाठी दबाव उत्पन्न केला पाहिजे, असाही वैकासक अर्थशास्त्राचा आग्रह होता. म्हणजे भारतीयांच्या भौतिक विकासात (उन्नयनात) माध्यमांनी वाटा उचलायला हवा. यात द्वंद्व असे निर्माण झाले की, पत्रकाराला एकीकडे सरकारी विकासकामांचा प्रचारक म्हणूनही काम करावे लागले आणि सरकारी प्रभावाखालून दूर जाऊन निःपक्षपातीपणे सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध बातम्याही द्याव्या लागल्या. प्रत्येक सरकार गरिबांसाठीच जन्माला आलेले असते. याचा गर्भितार्थ असा की, गरिबांच्या हिताआड पत्रकारांनी यायचे नाही. प्रत्येक सरकार लोकांनी निवडून दिलेले असल्याने सरकार-जनता या नात्यामध्ये माध्यमांनी लुडबुडायचे नाही, विरोधात तर मुळीच उभे राहायचे नाही, असे काहीसे एकतर्फी वातावरण सरकारी राजकीय पक्षांत सतत असते. कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या सत्तेला कोणी धक्के देत असल्याचे आवडत नसते. त्यामुळे सत्ता व माध्यमे यांच्या संबंधांविषयी राजकारणात नेहमी द्विधा मनःस्थिती असते.
माध्यमांद्वारे सामाजिक-सांस्कृतिक उन्नयन अपेक्षित असेल, तर ते फक्त लोकशाही राज्यव्यवस्थेत शक्य आहे, हे वरील पार्श्वभूमीवर लक्षात ठेवावे लागेल. साम्यवादी सत्तांच्या काळात, विविध हुकूमशहा व लष्करशहा, धार्मिक व पंथीय राजवटी यांत माध्यमांमार्फत उन्नयन शक्य नसते, हेही लक्षात ठेवावे. लोकशाही नसलेल्या राष्ट्रांत क्रीडा, राष्ट्रनिर्माण, धर्मरक्षण, मनोरंजन या विषयांत माध्यमांना रुतून पडावे लागते. वादविवाद वा आक्षेपार्हता याची संस्कृती त्यांनी रुजवायची नसते. अमेरिकेसारख्या भांडवली लोकशाहीवादी देशांत आत्यंतिक व्यक्तिवाद, आत्मकेंद्रितता, स्वनिष्ठा आणि कुटुंब एवढ्या मुद्द्यांभोवती संपूर्ण माध्यमविश्व फिरते. तेथील उन्नयन म्हणजे स्वतःपुरते उन्नयन. त्यामुळे आता गेल्या २० वर्षांपासून भारतीय माध्यमांचे अमेरिकीकरण होऊ लागताच व्यक्तिकेंद्री विकासावरचा भर ठळकपणे प्रकटू लागला. सर्व प्रकारची सामाजिकता माध्यमांमधून लोप पावू लागली आहे.
एकजूट, संघटन, चळवळ, आंदोलन या गोष्टींविरुद्ध माध्यमे कोणत्याही निमित्ताने तुटून पडू लागली आहेत. विशेषत: राजकीय आणि व्यवस्थाबदल यासाठी एकी व संघटन यावर त्यांचा दात असतो. त्याऐवजी धर्म, अध्यात्म, मनोरंजन, क्रीडा, परंपरा, उत्सव, व्यक्तिमाहात्म्य यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा जयजयकार माध्यमे करत सुटली आहेत. या साऱ्या गोष्टींचा आधार व्यक्तिगत उन्नयन हाच आहे. अध्यात्म घ्या, क्रीडा घ्या की, कलाप्रकार घ्या, वैयक्तिक सुख आणि यश एवढाच त्यांना प्रसाराचा अर्थ माध्यमे लावतात. सौंदर्यवृद्धी, फॅशन, शेअरमार्केट, खाद्यनियमन, बालसंगोपन आदी माध्यमांचे विषय निखालस स्वोन्नतीकडे नेणारे आहेत. त्यांचा हुंडाबळी, दारिद्र्य, उपासमार, बालमजूर, यांच्याशी काहीही संबंध नाही.
आता सोशल मीडिया या नावाखाली सपशेल व्यक्तिगत माध्यमे सामाजिक उन्नयनाच्या आड येत आहेत. मोबाइल फोन मुळातच खाजगी वापरासाठी जन्मला. ई-मेलचेही सार्वत्रिकीकरण अपेक्षित नाही. परंतु भांडवलशाही वृत्तीने त्यांना असे वापरले की, ती आता तरुण पिढीची व्यासपीठे झाल्याची बतावणी होते आहे. सध्या माध्यमे म्हणजे सोशल नेटवर्किंगच होय, असाही गाजावाजा होतो आहे. मुळात समविचारी वर्तुळासाठी हे सोशल नेटवर्क अर्थात सामाजिक जाळेवीण तयार झाली. ‘माय स्पेस’, ‘ऑर्कुट’, ‘यू-ट्यूब’, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘सेकंड लाइफ’, या वेबसाइटस कम्युनिटीज म्हणजे समविचारी, समजीवी लोकांसाठी एक व्यासपीठ म्हणून जन्मल्या. त्यातून परस्पर सवाद आणि सहकार्य साधले जावे, एवढाच त्यांचा हेतू होता. आपले आताचे मत योग्य आहे ना, हे पक्के करण्यासाठी सारख्याच मतांचा समूह तयार करण्याचा, या सामाजिक जाळेविणीचा उद्देश होता व आहे.
कित्येकदा त्यांची मते स्फोटक, अतिरंजित आणि पर्यायवाची असतात व तशी मानलीही जातात. लोकशाही विचारस्वातंत्र्याचा हा एक नवा आविष्कार असल्याने या जाळ्याचे कौतुक केले गेले. परंतु विसंगती अशी की, अशी अख्खी कम्युनिटी किंवा संपूर्ण समूह लोकांपासून तुटलेला, अलग पडलेला बनू लागला. इंटरनेटने कम्युनिटीचा म्हणजे समुदायाचाही भास उत्पन्न केलेला नसताना त्याला लोकशाही स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला जाऊ लागला आहे. याला उन्नयन कसे म्हणता येईल? सांस्कृतिकतेच्या बाबतीत तर प्रस्थापित माध्यमांपेक्षा हे इलेक्ट्रॉनिक माध्यम सर्वाधिक हिंसक, विध्वंसक, लैंगिक, धर्मांध, अतिरेकी आणि असहिष्णू बनले आहे. एकमेकांच्या मतांना लाइक करत जाण्याचा प्रघात, या सोशल मीडियाचा असल्याने आपल्याबाबत हट्टी, दुराग्रही आणि विकृत प्रीती झालेला एक प्रचंड समुदाय आता या इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पैदा केला आहे. याला उन्नयन कसे म्हणावे?
उन्नयन होण्यासाठी प्रत्येक माणसात तेवढी तयारी, संयम व समजूतदारपणा हवा. परंतु इंटरनेटवरील समुदाय आणि कळप पाहिले, तर ते कमालीचे अहंकारी आणि उद्धट असतात. त्यांची बौद्धिक कुवत जेमतेम असूनही अहंकार मात्र एखाद्या जागतिक विद्वानाएवढा असतो. सतत संगणकाशी खिळून राहिलेल्या वा मोबाइल फोनला चिकटलेल्या तरुण पिढीला मैत्री, ज्ञान आणि माहिती यांची प्राप्ती सोशल नेटवर्किंगमुळे झाली आहे. मुख्य म्हणजे ज्या अर्थाने प्रस्थापित माध्यमे जनसंज्ञापना (मास कम्युनिकेशन)ची माध्यमे जाणली जातात, त्या अर्थाने सामाजिक जाळ्याची माध्यमे जाणली जात नाहीत. संपादन, नियमन, सातत्य, शैली या पत्रकारितेच्या अविभाज्य गोष्टी त्या जाळ्यातून गळून पडल्या आहेत.
त्यामुळे अफवा, बोलवा, अपसमज, गैरसमज, विपर्यास, असत्य, अर्धसत्य, अपप्रचार, प्रचार यांना तिथे मोकळे रान मिळते. साध्या लिखित नियमांची धूळधाण तिथे उडवली जाते. किंबहुना प्रत्येक चांगल्या गोष्टीचे अवमूल्यन तिथे केलेले आढळते. तिथे प्रत्येक जण शहाणा असतो. अतिशहाणा असतो. हे पाहता या माध्यमांच्याच उन्नयनाची फार गरज भासली. सामाजिक जाळेवीण हा गुंतवणूक करण्याचा एक नवाच रस्ता किंवा मुक्काम राजकीय अतिरेक्यांना आढळला. तिकडे इस्लामी, ख्रिस्ती धर्मी लोक या माध्यमांचा वापर करून आपला प्रसार करतात, तर भारतात हिंदुत्ववादी लोक. कधीतरी इंटरनेट एक निरुपद्रवी व बहुउपयोगी सेवा मानले जायचे. आता त्यात बडे भांडवलदार खूप गुंतवणूक करून नफा मिळवत आहेत. कशासाठी?
कार्ल मार्क्स यांचा एक सिद्धान्त असा आहे की, ज्या वर्गाची मालकी उत्पादनाच्या नावावर असते, त्या वर्गाचे विचार, मूल्ये, संस्कृती समाजावर प्रभुत्व गाजवत असते. म्हणजे प्रसारमाध्यमांवर ज्यांची मालकी असते, त्यांची मते आणि विचार माध्यमे प्रसारित करत असतात असा त्याचा अर्थ. ही माध्यमे जे काही प्रसारित, प्रक्षेपित करत असतील, ते अवघे मालकाच्या हिताचे आणि आवडीचे असते, असाही त्याचा अर्थ. पर्यायाने या माध्यमांमार्फत जे काही समाजाचे उन्नयन होत असेल, ते सर्वथा एकतर्फी, एकांगी आणि एकेरी, दुसरी, तिसरी बाजू एखाद्या विषयाची कधीच वाचकांच्या, प्रेक्षकांच्या वाट्याला येणार नाही. मुकेश अंबानी यांनी आपण ‘नेटवर्क एटीन’, ‘टीव्ही एटीन’ या कंपन्या खरीदल्याचे जाहीर केले. ‘ईटीव्ही’, ‘आयबीएन सेव्हन’, ‘सीएनएन आयसीसी’, ‘कलर्स’ आदी वाहिन्या अंबानीच्या मालकीच्या झाल्या. मग अंबानी हे आपल्या टीकाकारांना, विरोधकांना लोकशाही तत्त्वानुसार संधी व जागा देत राहतील काय? आणखीही काही वाहिन्या राजकीय पुढारी, उद्योगपती यांच्या मालकीच्या असून त्यांचे प्राधान्यक्रम आता प्रेक्षकांना ज्ञात झाले आहेत. वृत्तपत्रे तर आता त्यांच्या राजकीय मालकांच्या नावानेच ओळखली जातात. तसेच देशात राजकीय पुढाऱ्यांच्या टीव्ही वाहिन्या आहेत.
तरीही लोकलाजेस्तव या माध्यमांना तटस्थतेचा आव आणावा लागतो, पण महत्त्वाच्या बातम्या गाळणे, एका पक्षाला झोपडून काढणे, उगाच वाद निर्माण करणे, उशिराने एखादी बाजू प्रसिद्ध करणे, असे खेळही ही माध्यमे करत राहतात. तेव्हा सांस्कृतिक म्हणा की सामाजिक, कसचे आले उन्नयन?
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
कित्येक वर्षे माध्यमांवर ब्राह्मण जातीचे वर्चस्व होते. आता ते घटू लागले आहे. उघड आहे, ब्राह्मणांची जी दृष्टी होती, ती माध्यमांना व प्रेक्षकांवर बिबली जात होती. परंतु हेही तेवढेच खरे की, जात कोणतीही असो, विचार समतानिष्ठ, परिवर्तनवादी असतील तर जो आशय समाजात पोचतो, त्यावर त्या विचारांचा प्रभाव राहणार, जातीचा नव्हे! आज असंख्य पत्रकार बहुजन समाजातील आहेत, पण त्यांची दृष्टी, तत्त्वे जर समतावादी, परिवर्तनानुकूल नसतील, तर त्यांची जात कोणतीही असो, तिचा काय संबंध? त्यांच्या हातून कशाचे उन्नयन होणार?
तेव्हा निष्कर्ष एवढा की, माध्यमे स्वत:हून कसलेही उन्नयन करत नसतात. करू शकत नसतात. ज्यांच्या हाती माध्यमे असतात, त्यांना उन्नयन करण्याची संधी, क्षमता, वेळ व स्थळ प्राप्त असते. तशी इच्छा मात्र हवी.
‘मोहरा महाराष्ट्राचा’ - संपा. रमेश अंधारे
ग्रंथाली, मुंबई
पाने - ६४४ (मासिक आकार)
मूल्य - १५०० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment