‘जे आहे ते’ हा ‘जोहार’कार सुशील धसकटे यांचा पहिलावहिला लेखसंग्रह नुकताच अक्षरवाङ्मय प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. यात ‘लेख’, ‘भाषण’, ‘प्रकाशकीय’, ‘पुस्तकांबद्दल’ आणि आणि ‘नोंदी’ अशा पाच विभागांत मिळून एकंदर १६ लेखांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात मराठी पुस्तकांमधून दुर्मीळ होत चाललेली ‘पूर्वप्रसिद्धी’ आणि ‘सूची’ अशी दोन महत्त्वाची परिशिष्टेही या पुस्तकात आहेत. या पुस्तकातील हा एक लेख… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनिकेत जावरे यांच्याविषयीचा…
..................................................................................................................................................................
डॉ. अनिकेत जावरे यांचं अचानक जाणं खूप चटका लावून गेलं.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक विद्वान अभ्यासक-समीक्षक आपण गमावला, ही मराठी भाषा-साहित्य-समीक्षा आणि विचार यांच्या दालन मोठी सांस्कृतिक हानी आहे.
डॉ० अनिकेत जावरे हे ‘लोकप्रिय कोटी’तील वा सतत वर्तमानपत्री लिहिणार समीक्षक-अभ्यासक नव्हते. त्यांनी मराठीत लेखवजा मोजकेच, परंतु विचारदृष्ट्या भरीव लेखन केले. त्यांनी विशेषत: इंग्लिशमध्ये लेखन केले. 1.Simplifications : An introduction to Structuralism and Post-Structuralism, 2. Neon fish in dark water, 3. Practicing Caste : On Touching and Not Touching अशी उणीपुरी तीन इंग्लिश पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली त्यांची ‘जवानी दिवानी अर्थात उद्धव दीक्षितचा प्रेमभंग’ ही एकमेव मराठी कादंबरी होय. या कादंबरीची म्हणावी तशी चर्चा मराठीत झाली नाही. याशिवाय त्यांनी त्या त्या सुमारास विविध मराठी नियतकालिकातून काही लेख लिहिले होते. त्यातील निवडक लेखांचा ‘काळे पांढरे अस्फुट लेख’ हा मराठीतील एकमेव संग्रह २०११ साली ‘हर्मिस प्रकाशना’ने प्रकाशित केला.
त्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राम बापट, यशवंत सुमंत, राजेंद्र व्होरा, गोपाळ गुरू, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सुहास पळशीकर, सदानंद मोरे, राजन गवस, विद्युत भागवत, शर्मिला रेगे, राजा दीक्षित, तेज निवळीकर, प्रवीण सप्तर्षी अशी वेगवेगळ्या विषयांतील जाणती अभ्यासक-लेखक मंडळी होती. या मंडळींशी संवाद साधण्याची संधी त्या त्या विभागात किंवा अभ्यासवर्ग, चर्चासत्रे, व्याख्याने किंवा काही ना काही कार्यक्रमांमुळे नेहमीच मिळायची. त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल मतभेद असू शकतील, ते मान्य करूनही- चांगली अभ्यासू माणसं त्या वेळी विद्यापीठात होती. त्यात इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ० अनिकेत जावरे हेही होते.
दस्तऐवजीकरणाचं महत्त्व न कळलेल्या आपल्या मराठी समाजात माणसं येतात, निघून जातात, मात्र त्यांच्या कार्याच्या, आठवणींच्या सूक्ष्म नोंदी लिहून ठेवल्या जात नाहीत, जतन केल्या जात नाहीत, या कटु अनभवाची परंपरा अखंड चालूच आहे. हे लक्षात घेता डॉ० जावरे – दिसलेले- जाणवलेले आणि त्यांच्याबद्दलच्या काही आठवणीची नोंद करणे, मला व्यक्तिश: महत्त्वाचे वाटते.
१.
डॉ. अनिकेत जावरे सरांच्या वाचनाचा-अभ्यासाचा आवाका अफाट होता. इतकं असूनही ते मनानं-विचारानं सतत जमिनीवर राहिले. ‘काळे पांढरे अस्फूट लेख’ या पुस्तकामुळे जावरे सरांशी जुळलेली ‘केमिस्ट्री’ शेवटपर्यंत कायम राहिली.
व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून सर सतत जर्मनी-दिल्ली-कोलकाता आदी विद्यापीठांमध्ये जात. पुण्यात असले म्हणजे अधूनमधून गाठीभेटी होत. भेटल्यावर अगदी सहजपणे विविध विषय चर्चेत येत आणि मग ही चर्चा आपसूकच कार्ल मार्क्स-मिशेल फुको-जॅक देरिदा-लाकाँ-हाबरमास-ॲन्तानिओ ग्राम्सी-बाख्तीन इत्यादी मार्गे पुढे जात असे. या व्यक्तींच्या विचारकार्यावर मराठीत काही लिहायचा माझा विचार आहे, वगैरे ते बोलत. चर्चेच्या ओघाने ते जे काही बोलत, त्यातूनही नकळत बरेच ज्ञान मिळे. वास्तविक, नुकताच एमे झालेला मी ही परकी अभ्यासकांची नावे पहिल्यांदाच त्यांच्याकडून ऐकत होतो. मराठी शिकवणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांकडून ही नावे ऐकायची सोय नव्हती. त्यामुळे जावरे सरांची भेट नेहमीच ज्ञानदायी असे. अर्थात, शिक्षक चांगला अभ्यासक, व्यासगी ग्रंथप्रेमी असला म्हणजे विद्यार्थ्याला आपसूकच ‘टेक्स्टबुकां’पलीकडच्या चार वेगळ्या ज्ञानाच्या गोष्टी कळत जातात. दुर्दैवानं, आज चांगले व्यासंगी शिक्षक-प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर येऊ नयेत, याची काळजी व्यवस्थेतील प्रत्येक घटक घेत असतो. यावरून आपला पुढील प्रवास किती अवघड असणार आहे, याची कल्पना येते.
एखाद्या विद्वान व्यक्तीच्या सहवासात आल्यावर त्याच्या विस्तीर्ण ज्ञानकणांतील काही ज्ञानकण आपसूकपणे आपल्या मेंदूला चिकटतात. काही संस्कार साहजिक आपल्यावर होतात. आणि ते जर तसे होत नसतील तर मग आपण स्वत:ला करंटे म्हटले पाहिजे. इंग्रजीतील कोणतं उत्तम वाङ्मय - पुस्तकं वाचायला हवीत, हे तो विषय निघाला म्हणजे जावरे सर सहज सांगून जात. त्यामुळे आपण काय वाचलं पाहिजे, याची एक निराळी दिशा आपोआपच सुस्पष्ट होत गेली. इंग्रजी वाचन आणि इंग्रजी भाषा शिकण्याच्या संदर्भात कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात वगैरे ‘टिप्स’ त्यांनी दिल्या होत्या. परिणामी, इंग्रजीविषयीचा न्यूनगंड आणि भीती घालवण्यात जावरे सरांचा मोठा वाटा आहे. त्यांचं मार्गदर्शन सदैव उपयुक्त ठरेल असंच होतं.
या संदर्भातला सरांच्या व्यक्तिमत्त्वातील एक विशेष मला सांगावासा वाटतो. आपल्याकडे इंग्रजी कळणारी काही मंडळी इतरांना तुच्छ वा कमी लेखतात. यापाठी ‘इंग्रजी म्हणजे विद्वतेचं प्रतीक’ असा स्व-मातृभाषा न्यूनगंड असतो. पूर्वी प्रस्थापित प्रभुत्ववादी लोकांनी संस्कृतचे अवडंबर माजवून अन्य समाजावर एक प्रकारचा भाषेचा-ज्ञानाचा धाक ठेवलेला होता. त्याच्या मुळाशी सांस्कृतिक दर्प होता. याचप्रमाणे आता काही लोक इंग्रजीचा आधार घेऊन इंग्रजी न येणाऱ्या लोकांवर धाक निर्माण करत असतात. फरक इतकाच की, संस्कृतची जागा आता इंग्रजीने घेतली, आणि प्रस्थापितांबरोबर बहुजनही या सांस्कृतिक व भाषिक राजकारणाच्या कटात सहभागी आहेत. मराठीत काहीच चांगले लिहून होत नाही आणि इंग्लिशमध्ये खूप काही आहे, असे ताणेही या मंडळींकडून प्रसंगी ऐकायला मिळतात. असा दिखाऊ वा पोकळ इंग्रजी पांडित्याचा डौल मिरवणाऱ्यांना इंग्रजीत वा मराठीत गजग्याच्या आकाराचीही भर घालता आलेली नाही.
जावरे सर अशा गोष्टींना अपवाद होते. आपण इंग्रजीचे प्राध्यापक आहोत, असा सूरही कधी त्यांच्या बोलण्यातून ऐकायला आला नाही. साधेपणा होता, अवडंबर नव्हते. इंग्रजी हा त्यांचा अध्यापनाचा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या बोलण्यात वा लिखाणात इंग्रजी संदर्भ जरूर येत, परंतु स्वाभाविकपणे - विषयाची गरज म्हणून. श्रोत्यांवर/वाचकांवर प्रभुत्व किंवा धाक म्हणून प्रदर्शनी नव्हे. डेक्कन कॉलेजला मी एमए भाषाशास्त्राला प्रवेश घेतल्याचे त्यांना समजल्यावर ‘रूढ वाट सोडून वेगळे महत्त्वाचे करतोयस’ म्हणून ते खूष झाले होते. भाषाशास्त्राचे महत्त्व सांगताना भाषा आणि संस्कृती (Language and Culture), सांस्कृतिक भाषाशास्त्र (Cultural Linguistics), किंवा संस्कृतिलक्ष्यी भाषाशास्त्र (Ethnolinguistics) किंवा मानवजातिशास्त्र (Ethnology) यावर त्यांनी भर दिला होता. भाषाशास्त्राशी संबंधित किती तरी मुद्दे, संदर्भ, पुस्तके आदी माहिती त्यांनी आनंदाने मला दिली होती. त्या संबंधी काही शंका-प्रश्न असतील तर माझा फोन लागो न लागो इमेलद्वारे विचारत जा, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
एकतर त्यांचा स्वभाव पुष्कळसा मितभाषी. अगदी निवडक मित्रमंडळीत रमणारा. वाचन-अभ्यासात नेहमी मग्न. पटले तर छान म्हणणे आणि पटले नाही तर स्पष्ट बोलणे किंवा शांत बसणे. मोजकेच लिहिणे. एखाद्याशी तार जुळली की छानच जुळे. त्यामुळे जावरे सर अगदी क्वचितच एखाद्या जाहीर कार्यक्रमाला दिसत. मराठीत अनेक कवी-लेखक-समीक्षक-प्राध्यापक-अभ्यासकांना साहित्य अकादमी-साहित्य संस्कृती मंडळ-साहित्य संमेलन, विविध कमिट्या- प्रसिद्धी आदी अशा गोष्टींचे प्रचंड ‘ऑब्सेशन’ (obsession) असते. (आता तर नुकतेच लिहू लागलेल्या तरुण लेखकांनाही त्याची लागण होऊ लागली आहे.) जावरे सरांना मात्र या गैरलागू वा क्षणिक गोष्टी वाटत. त्यांच्या मते, एक लेखक किंवा अभ्यासक म्हणून आपला ‘फोकस’ नेहमी संबंधित विषयावर असला पाहिजे. या गोष्टी आपल्याला आपल्या अभ्युपगमापासून (hypothesis) दूर घेऊन जातात. आपले लक्ष विचलित करतात. आपल्या लक्ष्याचा (target) विचार करता त्यात न अडकणे, हेच श्रेयस्कर. प्रसिद्धीपासून अशा प्रकारे विचारपूर्वक दूर राहणारी माणसे अलीकडच्या काळात मराठीत तरी अपवादात्मकच!
‘डॉ. जावरे नेहमी इतरांपासून फटकून राहतात, कोणामध्ये मिसळत नाहीत’ वगैरे त्यांच्याबद्दल बोलले जाते. त्यात फार तथ्य नाही. वास्तविक अशा मंडळींना जावरे सरांकडून ‘जे अपेक्षित’ असायचे, ‘त्यात’ सरांना अजिबात स्वारस्य नसे. व्यक्ती व समाज यांना संकुचितपणा आणणाऱ्या जात, धर्म, गट, अस्मिता या मर्यादा त्यांनी केव्हाच पार केल्या होत्या. मानसन्मान, पुरस्कार या गोष्टी त्यांच्या गावीही नसत. इतरांपासून जाणीवपूर्वक फटकून राहून स्वत:चे वेगळेपण जपावे, असा ऱ्हस्व विचार करणाऱ्यांतले ते नव्हते. खूप वाचायचे-लिहायचे आहे, गत अनेक पिढ्यांचा ‘बॅकलॉग’ भरून काढायचा आहे, त्यामुळे मिळेल तो वेळ अभ्यासात घालवला पाहिजे, ही चाह त्यामागे असावी.
२.
साचलेपण आलेल्या मराठी समीक्षा वा साहित्यव्यवहाराला त्या त्या टप्प्यावर काही समीक्षकांच्या अभ्यासकांच्या विचारमांडण्यांनी चालना दिलेली दिसते. मला स्वत:ला महत्त्वाच्या वाटलेल्या ठळक काही मांडण्या थोडक्यात अशा -
१. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘निरस्तपादपे देशे...’ (१९६१) या टीकालखापासून ते ‘टीकास्वयंवर’ (१९९०) पर्यंतच्या विविध लेखांनी मराठीतील प्रस्थापित साहित्य-समीक्षाविचारांना पहिल्यांदा धक्के दिले आणि देशीवादी प्रमाणकाचा साहित्यव्यवहाराला विचार करण्यास भाग पाडले.
२. १९८० पासून शरद पाटील यांनी ‘अब्राह्मणी साहित्यांच्या सौंदर्यशास्त्रा’चे महत्त्व व गरज लक्षात घेऊन त्याच्या निर्मितीच्या दिशेने स्वतंत्र पावले टाकत १९८८मध्ये पुस्तकरूपाने ही मांडणी पूर्ण केली. शपा म्हणतात, “भारतीय समाज सर्वंकष अरिष्टाने ग्रस्त आहे. ५९व्या घटनादुरुस्तीआडून शास्ते व मूलतत्त्ववादी यांचे संयुक्त प्रतिक्रांतीचे अभियान येत आहे. कारण देश जातवर्गस्त्रीदास्यान्ताच्या मन्वंतराकडे जात आहे. त्याचे गुंतागुंतीचे व विराट भावविश्व अब्राह्मणी साहित्यांनी चितारणे ही काळाची गरज आहे. अब्राह्मणी साहित्यांच्या सौंदर्यशास्त्राची गरज यासाठी आहे.” याबरोबरच शपांनी सौत्रान्तिक मार्क्सवादी बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीचे महत्त्वही अधोरेखित केले. ही एकूण मराठी विचारविश्वातील क्रांतिकारी मांडणी होती.
३. रा. ग. जाधव यांनी १९९४ साली ‘साहित्याची परिस्थितिविज्ञाना’नुसार (Ecology of literature) विश्लेषण करणारी वेगळी विचारमांडणी केली होती. त्यामागची भूमिका मांडताना राग नोंदवतात की, “पर्यावरणीय प्रबोधनयुगाला (the age of ecological enlightenment) साहित्यविचाराने प्रतिसाद देण्याचा हा माफक प्रयत्न आहे... समकालीन साहित्यविचारात कोठेतरी एक प्रकारची कुंठितता निर्माण झाल्याचे तीव्रपणे जाणवते.” दुर्दैवाने, ‘साहित्याच्या सामाजिक व सांस्कृतिक अंगांची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा’ करू पाहणाऱ्या रागंच्या या मांडणीचा (ज्याला जाधव ‘प्रारूप’ म्हणतात) विस्तार वा त्यावर प्रतिकूल चर्चाही समकालीनापैकी किंवा पुढीलानी केल्याचे आढळत नाही. याला एक अपवाद म्हणजे सोलापूर येथील डॉ. सुहास पुजारी यांचा. ‘मराठी कादंबरी : सृष्टी आणि दृष्टी’ या ग्रंथाद्वारे डॉ० पुजारी यांनी पर्यावरणीय प्रबोधन, पर्यावरणीय प्रश्न आणि मराठी साहित्य यांचा स्वतंत्र अभ्यास वाचकांसमोर ठेवला आहे.
४. ज्येष्ठ आंबेडकरवादी अभ्यासक व समीक्षक डॉ. अशोक बाबर यांनी बुद्ध आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या परिप्रेक्ष्यातून देशीवादाच्या चिकित्सेला वेगळा आयाम व सशक्त दृष्टीकोन दिला आहे. अशी मांडणी करताना त्यांनी देशी आणि वैश्विक साहित्यमूल्ये मांडणीच्या केंद्रस्थानी ठेवलेली आहेत. आंबेडकरवाद हा देशी विचारस्रोत आहे, हे सांगतानाच त्यांनी आंबेडकर याच्याकडे जाण्यासाठी दलित आणि दलितेतरांच्या मनातील गैरसमजांच्या अढी काढत सोप्या भाषेत संवादपूल घालून दिला आहे. हे बाबर यांचे हे अभ्यासाच्या-सामाजिक क्षेत्रातील पथदर्शी कार्य म्हणता येईल. बाबासाहेबांचे सत्यशोधनाचे मूलसूत्र त्यांनी भारतीय देशीवादाच्या संदर्भात अधोरेखित केलेले आहे. ‘देशीवाद’ (२००५), ‘आंबेडकरवाद’ (२०१६), ‘Ambedkarite Nativism’, ‘Two Versions of Nativism’, ‘भारतीय देशीवाद’ (आगामी) ही त्यांची पुस्तक महत्त्वाची आहेत.
या पार्श्वभूमीवर पाचवी मांडणी म्हणून डॉ. अनिकेत जावरे यांचा विचार केला, तर त्यांचे लेखन नव्या ज्ञाननिर्मितीच्या व सिद्धान्तनाच्या विविध शक्यता समोर ठेवते, असे म्हणता येईल. पाश्चात्य साहित्यविचारांचे सूत्र पकडून मराठीतील लेखनाचा नव्या दृष्टीकोनातून काही अर्थ उलगडून दाखवता येतो का, हा त्यांच्या लेखनप्रयत्नाचा एक भाग होता. हा प्रयत्न ऐतिहासिक, सौंदर्यवादी, मानसशास्त्रीय, साहित्यशास्त्रीय, द्वंदात्मक, भौतिकवादी, आन्विक्षिकी अशा विविध दृष्टीकोनांतून केलेला दिसतो. चिकित्सा भाषाशास्त्रीय दृष्टीकोन हा या सगळ्याचा मूळ सामायिक पाया म्हणून दिसतो. सांस्कृतिक भाषाशास्त्र हा त्यांच्या खूप आस्थेचा विषय होता. त्यामुळे त्यांच्या सबंध लेखनाच्या मुळाशी भाषाशास्त्रीय प्रेरणा अनिवार्यपणे येताना दिसते. कदाचित म्हणूनच साहित्याची वा विचारांची विचारपरिलुप्त व दिशादर्शक अशी चिकित्सा ते करू शकले.
वरीललपैकी नेमाडे-बाबर, पाटील, जाधव, जावरे यांच्या विचार वा भूमिका यांत भिन्नता असली किंवा त्यांच्याशी आपले वैचारिक मतभेद असू शकतील, मात्र रूढ वाट सोडून निराळी वाट चोखाळण्याची, तिला वळण देण्याची क्षमता वा ताकद या समीक्षक मंडळींमध्ये दिसते, हे नाकारता येत नाही.
‘काळे पांढरे अस्फुट लेख’ आणि ‘पॅक्टिसिंग कास्ट : ऑन टचिंग अँड गॉट टचिंग’ या लेखनांमधून स्पष्ट सैद्धान्तिक भूमिका घेत इथल्या साहित्याची-जातिव्यवस्थेची-संस्कृतीची तटस्थ चिकित्सा डॉ. जावरे करू शकले. दलित लेखकांनी-साहित्याने ‘दलितत्वा’पलीकडे गेलं पाहिजे, हे ठाम व नि:संदिग्धपणे प्रवाहपतित न होता म्हणूनच ते लिहू शकले. ते म्हणतात, “जी जीवनदायी ऊर्जा दलित काव्याने समाज आणि साहित्याला दिली, ती अस्सलपणाच्या संकल्पनेचा वापर करून दलितत्वाच्या चौकटीत बांधून ठेवली गेली. ज्याप्रमाणे मानवी शरीरे ‘जाती’च्या संकल्पनेद्वारे बांधली गेली, त्याचप्रमाणे दलित काव्याची ऊर्जा व ताकद दलितत्वात बांधली गेली, आणि या घटनेला कुणीही फार विरोध केला नाही... दलित काव्याने मराठी काव्यात काय भर घातली, त्याचे मराठी साहित्याच्या इतिहासात नेमके स्थान काय, याचा व्यवस्थित अभ्यास व्हायचा असेल तर ‘दलित साहित्य’ ही कोटीच नष्ट करावी लागेल.”
असे म्हणण्यामागे संकुचिततेच्या पलीकडचे व्यापकत्व त्यांना अपेक्षित होते. नाही तरी ‘सामाजिक क्रांतिपेक्षा साहित्यिक क्रांती मराठी समाजाला अधिक रुचली’ या दर्दनाक वास्तवात आपण किती काळ रमणार, हाही एक महत्त्वाचा मुद्दा उरतो. परिणामी, रूढ दलित साहित्यात वा लेखकांत त्यांची गणना होत नाही, आणि मला वाटतं ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे.
मात्र भविष्यातला एक आगाऊ धोकाही जाता जाता मनाला अस्वस्थ करून जातो, तो म्हणजे, आपल्या समाजात ‘जात’ ही गोष्ट फायदे-तोटे बघून सोयीने वापरली जाते. फायदा नसेल तेव्हा ती तात्पुरती वर्ण्य करून पुरोगामी/डी-कास्ट\मार्क्सवादी होता येते. आणि फायदा पाहून पुरोगामित्वाला बगल देत ती धारण करून इष्ट ते साध्यही करता येते. काही चलाख मंडळी एकाच वेळी या दोन्ही पद्धती आत्मसात करतात. जी ‘दलित कोटी नष्ट केली पाहिजे’ असे जावरे म्हणतात, उद्या ते (जावरे) ‘आमचे-आपले आहेत’ हे कळेल तसतसे त्यांनाही कळत-नकळत वाटून घेतले जाईल, त्यानुरोधाने त्यांच्यावर लिहिलेही जाईल. आपल्या समाजात सुधारकाना-विचारकांना-अभ्यासकांना त्यांच्या पश्चात जातीच्या सातबाऱ्यानुसार वाटून घेतले जाते, हा अनुभव काही नवा नाही. अशा ‘वाटाघाटी’तून आपण इतिहासातील एरवी टाकाऊ असलेल्या गोष्टी नेहमीच जिवंत ठेवल्या. त्यामुळे डॉ. आंबेडकरानी सत्यशोधनाचे जे क्रांतिविज्ञान दिले, त्या दिशेने एकजुटीने जाणेही आपल्याकडून होत नाही. या एकजुटीला जातीचा आणि अंतर्गत धुसफुशीचा ‘शाप’ आहे. रा० अशोक बाबर यांनी त्यांच्या ‘आंबेडकरवाद’ या ग्रंथात ‘आंबेडकरांना आजही साहित्यात दलित म्हणूनच वावरावे लागते’ अशी खंत नोंदवली आहे. जातभावना ही व्यक्तीच्या मनावर-विचारांवर नेहमीच अशी हावी होताना दिसते. इथे मला रा० राजा ढाले यांची एक मुलाखत प्रकर्षाने आठवतेय. रा. ढाले म्हणतात, “बाबासाहेबांची चिकित्सा जो वाचेल तो बदलल्याशिवाय राहणार नाही आणि जो वाचणार नाही तो कधीही बदलणार नाही. दलितत्व अंतिम नाही, माणूसपण अंतिम आहे.” दुर्दैवाने बाबासाहेबांची चिकित्सा वाचूनही बदललेले नाहीत, असे पुष्कळ लोक आजूबाजूला आहेत.
तात्पर्य, जावरे यांच्या एकंदर लेखनामागची जी सहजप्रेरणा होती, ती म्हणजे, ‘माणूस, माणूसपण व त्यांतील अंतर्विरोध’ याचा तळशोध घेणे. माणूस जर इथूनतिथून सारखा असेल, तर मग एक ब्राह्मण व एक दलित का? एक सवर्ण, तर एक अवर्ण का? एक काळा, तर एक गोरा का? एक स्पृश्य, तर एक अस्पृश्य का? अशा भेद करणाऱ्या या ‘का’च्या उत्तराचाच ते एका अर्थाने खोल खोल जाऊन शोध घेतात. त्यासाठी ते पाश्चात्य व भारतीय तत्त्वज्ञ-विचारवंतांच्या अभ्यासाचा, त्यांच्या तत्त्वचिंतनाचा आधार घेतात, प्रसंगी त्यांच्या विचारांचीही परखड समीक्षा करतात, इतकेच! वरील त्यांची दोन्ही पुस्तके म्हणजे या तळशोधाचे प्रत्यंतर आहेत.
‘Practicing Caste : On Touching and Not Touching’ या जावरे यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकातून त्यांनी स्पर्श-स्पृश्यास्पृश्यता-जातीयता आदींचा भारतीय व परकीय अभ्यासकांच्या मतांआधारे खूप चिकित्सक-तात्त्विक धांडोळा घेतला आहे. हे पुस्तक ‘स्पर्श’ या संवेदनेचा – जावरे यांच्या भाषेत स्पर्शव्यवस्थेचा - विविध अंगाने विचार करायला भाग पाडते, स्पर्शांचे अनेकानेक अन्वयार्थ लावते. त्यातून जे प्रश्न याआधी मनात कधी डोकावले नसतील, असे कितीतरी प्रश्न वाचक म्हणून आपल्या मनात उपस्थित करते. वास्तविक, स्पर्शव्यवस्थेबद्दल त्यांनी फार पूर्वीच विचारमंथन सुरू केले होते. त्याची त्रोटक झलक मराठी दलित काव्याच्या अनुषंगाने ‘काळे पांढरे अस्फुट लेख’ (२०११) या त्यांच्या लेखसंग्रहात बघायला मिळते. ‘प्रॅक्टिसिंग कास्ट...’ची सुरुवातच मुळी ‘काळे पांढरे अस्फुट लेख’पासून होते, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच त्यासंबंधीची विचारप्रक्रिया फार आधीपासूनच त्यांच्या मनात सुरू झालेली होती, हे ओघानेच येते.
या पुस्तकावर ‘इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल विकली’मध्ये वि० सनील, गोपाळ गुरू आणि उदय कुमार यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. वि. सनील लिहितात, “Aniket has always warned us about how not to talk about caste... Here Aniket takes forward the path breaking move Ambedkar made in his 1916 essay “Castes in India : Their Mechanism, Genesis and Development.”
जावरे यांनी आपल्याला वेळोवेळी सावध केले, हे खरेच आहे. स्पर्शाच्या आकृतिबंधांची विविधप्रकारे चिकित्सा करणे शक्य आहे, हे ध्यानात घेऊन ते स्पर्शव्यवस्था व त्यातील संरचनात्मक बदलांच्या सूक्ष्म स्तर-अंत:स्तरांचा एकेक करून उलगडा करतात. त्यातून स्पर्शाचे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, निवृत्त/साधन स्पर्श, असे तीन प्रकार ते मांडतात. या तिन्हींच्या व अभिधा स्पर्श व लक्षणा स्पर्श या दोन विशेषणांच्या आधारे जाती, जातीयता आदींचा तळशोध घेतात.
हा शोध जसा फुले-आंबेडकर यांना धरून होतो आहे, तसाच तो लेव्हि-स्त्रोस, मिशेल फुको आदी अनेक मंडळींची विचारवाट धुंडाळतही होत आहे. गोपाळ गुरू लिहितात, “अनिकेतच्या पुस्तकाचं सखोल वाचन केल्यास जातीयता प्रश्नाचा नव्या सैद्धान्तिक दमाने खल करण्याचं बौद्धिक आव्हान ते आपल्याला देतं. जातीयता आणि दलित साहित्य याविषयीच्या संतृप्त समाजशास्त्रीय संभाषितांना प्रतिसाद देणारं हे पुस्तक आहे.”
डॉ. गुरू यांच्या म्हणण्याला सहमती दर्शवून त्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ एक मुद्दा मांडतो. हिंदू समाजातील आंतरिक भेदाविषयी अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ आदी मंडळी असंवेदनशील आहेत, अशी काहीशी खंतवजा नोंद स्वत: जावरे यांनी स्पर्शाबद्दल लिहिताना पूर्वीच व्यक्त केलेली आहे. कदाचित ‘प्रॅक्टिसिंग कास्ट...’ हे पुस्तक त्या आत खदखदणाऱ्या खंतेला आपण स्वत:च उत्तर दिले पाहिजे, या आत्यंतिक अस्वस्थतेतून आलेले असावे, असे मला वाटते.
३.
आपल पुस्तक छापून यावे - मराठीत - याबद्दल जावरे सर फार उत्सुक नसतं. पुस्तकाचा विषय काढला की, ‘बघू या रे. करू कधीतरी’ ही ठरलेली उत्तरे. हे पाहता, विविध नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या त्यांच्या मराठी लेखांचा एक संग्रह यावा, याचा पाठपुरावा डॉ० बालाजी घारूले यांनी केला. एवढेच नव्हे तर घारूळेंनी त्यासाठी स्वत: खूप परिश्रम घेतले. त्यामुळे पुस्तक होऊ शकले. ‘शोधार्थी अभ्यास गटा’तील विद्यार्थ्यांनी लेखांची जमवाजमव करून एक झेरॉक्स प्रत तयार केलेली होती. त्यामुळे पुस्तकाच्या दृष्टीने पुढचे काम करणे सोपे झाले. दरम्यान सरांनी फोन करून ‘अरे, कुठपर्यंत आलं पुस्तकाचं काम? कधी करणारेस?’ अशी विचारणा कधी केल्याचं माझ्या आठवात नाही. पुस्तक छापून येण्याची घाई त्यांनी कधीच केली नाही. पुस्तकाची अंतिमुद्रिते त्यांना दिल्यावर ते गंभीरपणे म्हणाले, “हा मजकूर पुस्तकरूपाने छापण्यायोग्य आहे ना? असेल तरच पुस्तक कर, नाही तर राहू दे.’’
स्वत:च्या लेखनाबद्दल इतक कठोर व स्पष्ट मत असणारा दुसरा लेखक मी पाहिला नाही. यथावकाश त्यांनी मुद्रिते वाचून दिली. पाठराखणीसाठी गो० पु० देशपांडे यांचा मजकूर घ्यायचे ठरले. मग मुद्रिते घेऊन मी देशपांडे सरांकडे गेलो. मुद्रिते पाहिल्यावर देशपांडे सर म्हणाले, ‘‘अनिकेत स्वत:चं पुस्तक करायला तयार झाला, हेच मला खूप महत्त्वाचं वाटतंय. हल्ली काही न येणाऱ्या लोकांच्या पुस्तकांचा काळ आहे, आणि अनिकेत सारखी ‘स्कॉलर’- उत्तम अभ्यास, वेगळा दृष्टिकोन व आकलन असलेली मंडळी स्वत:चं पुस्तक करण्यासाठी फार उत्सुक नाहीत, हे मला खटकायचं. पण असो. उशिरानं का होईना अनिकेत तयार झाला, याचं समाधान वाटतं. पुस्तकाचं काम-निर्मितिप्रक्रिया ही खूप un-predictable गोष्ट असते. अशा वैचारिक-समीक्षात्मक पुस्तकांना फारसा ‘ग्राहक’ नसतो, पण ती विचारांच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. हे छापण्याचं मोठं धाडस तू करतोयस.” देशपांडे सरांनी जावरे यांच्या या लेखसंग्रहाची यथोचित पाठराखण केली.
यथावकाश ‘काळे-पांढरे अस्फुट लेख’ छापून आले. पुस्तक पाहिल्यावर सर म्हणाले, “आता इथून पुढं मी मराठीत जे काही लिहील, ते तूच छापायचं. माझी प्रथम पसंती तुला असेल.”
असेच एकदा चर्चे चर्चेतून अन्तोनिओ ग्राम्सीवर बराच वेळ ते रेंगाळले आणि पुढचा तासभर ते बोलत होते. ग्राम्सीचे ‘Prison Notebooks’ त्यांनी दाखवले. सरांचा त्यावेळचा उत्साह काही औरच होता. ते अशा पद्धतीने खुलण्याचे क्षण क्वचित! हे सगळे ऐकल्यावर मी त्यांना म्हणालो,
“सर, संपूर्ण ग्राम्सी मराठीत आणायचा का?”
“कोण आणील?”
“अनुवादाची जबाबदारी तुमची नि बाकी सगळी जबाबदारी माझी.”
“वेडा आहेस का? ते इतकं सोपं नाही. ग्राम्सीनं खूप लिहिलंय, ते सगळं छापायला पैसा किती लागेल?”
“लागायचा तितका लागू द्या, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी कर्ज घेतो, लोकांकडे वर्गणी मागतो. वाट्टेल ते करून पैसा जमवतो, पण ग्राम्सी छापायचाच.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
काही वेळ विचार करून- “असं म्हणतोस... ठीकय. ठरलं मग. आता हातावर काही प्रकल्प आहेत, आधी ते मार्गी लावतो आणि मग ग्राम्सीकडे वळतो. कोलकात्याचा एक मित्र आहे, त्याचीही या कामी मदत घेऊ.” मग चर्चे चर्चेतून ग्राम्सीवर प्रथम परिचयपर पुस्तक करायचे ठरले. त्या दृष्टीने तयारीही सुरू झाली होती. फोन किंवा भेट झाली म्हणजे ग्राम्सीची आठवण होई. त्यावर ते ‘होय रे, आहे माझ्या लक्षात’ म्हणत.
त्यांच्या निधनाआधी तीनेक महिन्यांपूर्वी आम्ही विद्यापीठात भेटलो होतो. त्या भेटीत कच्चा आराखडा तयार केला होता. दुर्दैवाने हा प्रकल्प होण्याआधीच मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. एकसुरी सांस्कृतिक राजकारणाच्या काळात जावरे सरांची उणीव आणि निकड सदोदित जाणवत राहणार. एका निरलस, प्रतिभावान समीक्षक व अभ्यासकाला आपण मुकलो.
वि. सनील त्यांच्या लेखात म्हणतात, “Aniket is an author in a hurry and took almost a decade to write this book. On completion, again, he left us in a hurry.” जावरे सर जरा घाईनेच, परंतु आपल्या सर्वांना चटका लावून निघून गेले. ते आपल्याबरोबर नसले तरी ‘काळे पांढरे अस्फुट लेख’च्या पाठराखणीत गो. पु. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे, त्यांचे ‘प्रस्फुट’ विचार मात्र मराठीला कायम ऊर्जा पुरवत राहतील, दिशा देत राहतील.
‘जे आहे ते’ – सुशील धसकटे
अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे
पाने – १९४
मूल्य – २३० रुपये.
.................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा : डॉ. अनिकेत जावरे : कोणत्याही कळपात न रमलेला आणि स्वतःचाही कळप न काढलेला उत्तर-संरचनावादी अभ्यासक
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment