अजूनकाही
१. मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला मोठी हार पत्करावी लागली. गेली पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जनतेसाठी भरपूर कामे केली. प्रत्येक वेळी मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला, त्या लोकांना जनतेनी निवडून दिले. : मनसेच्या ११व्या वर्धापनदिनी राज ठाकरे
राजसाहेब, असं म्हणतात की जो पडतो, तो अपयशी नसतो; आपण पडल्यानंतर जो अमक्याने ढकललं म्हणून पडलो, असं सांगतो, तो अपयशी असतो. निव्वळ पैशांच्या बळावर निवडणुका जिंकल्या गेल्या असत्या, तर सत्तेत असणारा कोणताही पक्ष कधी खालीच खेचला गेला नसता आणि आधीच्या निवडणुकांमध्ये मनसेला यशही मिळालं नसतं. आधीच्या चुका सुधारून पक्षाचं नवनिर्माण केलं नाही, तर महाराष्ट्राचं नवनिर्माण तुमच्या हातात कधीच सोपवलं जाणार नाही.
…………………………….…………………………….…………………………….
२. नोटाबंदीनंतर देशातल्या अब्जाधीशांच्या यादीतून तब्बल ११ अब्जाधीशांना स्थान गमावावं लागलं असताना पेटीएमचे संस्थापक विजय शंकर शर्मा यांना या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शर्मा यांच्याकडे १.५ अब्ज डॉलर संपत्ती आहे, असं हुरुन ग्लोबल रिच या अहवालात म्हटलं आहे. नोटाबंदीमुळे अनेक उद्योग-व्यवसाय डबघाईला आले असले तरी पेटीएम अॅपला मोठी मागणी आली.
ही सगळी जाहिरातीतल्या मॉडेलची कमाल. काही मॅस्कॉट सर्व प्रकारच्या उद्योगांसाठी शुभंकर ठरतात. पेटीएमच्या जाहिरातीत कोण होतं मित्रों? जिओची भरभराट कोणाच्या जाहिरातीमुळे झाली भाईयों औंर बहनों? आता पेटीएमने क्रेडिट कार्डाच्या व्यवहारांवर दोन टक्के शुल्क-आकारणी केली आहे. पुढच्या खेपेला प्रथम क्रमांकावरच्या जिओमालकांना खेटूनच पेटीएममालकही बसलेले आढळणार दुसऱ्या क्रमांकावर.
…………………………….…………………………….…………………………….
३. मनोरंजन वाहिन्यांवर जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, सूर्यपुत्र कर्ण, कर्मफलदाता शनी, जय संतोषी माँ, नागीन-२, बालकृष्ण, देवलोक विथ देवदत्त पटनाईक अशा पौराणिक मालमसाल्यावर आधारित मालिकांना मिळणाऱ्या रसिकांच्या पसंतीमुळे वाहिन्यांचे अर्थकारण पुरते बदलून गेले असून या मालिकांसाठी पौराणिक कथा सल्लागारांची मागणीही वाढू लागली आहे. त्याचा थेट फायदा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील पौराणिक कथा-पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला झाला आहे. पौराणिक मालिकांचे लिखाण करताना मूळ कथांची उकल करून सांगण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. ही गरज संस्कृत विभागातील हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी भागवू शकतात हे लक्षात आल्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहिन्यांकडून कामे मिळू लागली. यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला आहे.
काही लोकांच्या पोटापाण्याची सोय झाली, हा आनंदाचाच विषय आहे. मात्र, या मालिका पाहिल्यानंतर त्यांच्या लिखाणाला अशा काही अभ्यासाचा आधार असेल, असं वाटतही नाही. कदाचित आपण मांडतोय ती कथा मूळ पौराणिक कथेशी अजिबातच सुसंगत असता कामा नये, ही खबरदारी घेण्यासाठीच या मंडळींच्या सेवेचा वापर करून घेत असावेत.
…………………………….…………………………….…………………………….
४. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा एन. लोकेश यांनी सोमवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आर्थिक प्रगतीचा आलेख पाहून अनेक जण अचंबित झाले. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे ऑक्टोबर २०१६ मध्ये एन. लोकेश यांची संपत्ती अवघी १४.५० कोटी इतकी होती. मात्र, केवळ पाच महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्या संपत्तीचा आकडा थेट ३३० कोटींवर जाऊन पोहचला आहे.
अहो, भलत्या शंका कसल्या काढताय? साक्षात हनुमंताचा आशीर्वाद आहे हा. नमस्कार करा भक्तिभावाने. समर्थ रामदासांनी 'कोटीच्या कोटी उड्डाणे' असं लिहिलंय ते याच जमातीसाठी. यांच्या प्रगतीच्या 'गतीसी तुळणा नसे,' असंही म्हणून ठेवलंय समर्थांनी ते काय उगाच!
…………………………….…………………………….…………………………….
५. केरळमधील कोची येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करत मरीन ड्राइव्ह येथे बसलेल्या प्रेमीयुगुलांना हुसकावून लावले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस आणि माध्यमांसमोर घडला. शिवसेनेची दादागिरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस उपनिरीक्षकला तत्काळ निलंबित करण्यात आले असून आठ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हातात ‘स्टॉप लव्ह अंडर अम्ब्रेला’ असे फलक होते. व्हॅलेंटाइन डेला कोल्लम येथील अजहीक्कल बिचवर अशा प्रकारचा त्रास झाल्याने दोन युवकांनी आत्महत्या केली होती.
अरेच्चा, कोचीत काही वेगळीच शिवसेना आहे की काय? की अजून तिथे युवराजांची फेरी झालेली नाही आणि युवासेनेची स्थापना झालेली नाही? तिथले शिवसेनेचे कार्यकर्ते अजून बजरंगी मानसिकतेत कसे? बाकी छत्रीखाली प्रेम करायला या मंडळींची काय हरकत आहे, देव जाणे! कदाचित या फ्रस्ट्रेटेड आंबटशौकिनांना नीट दिसत नसेल ना सगळं लांबून.
…………………………….…………………………….…………………………….
६. होळी खेळताना खिसापाकीट नीट जपा; खिशात नोटा तर अजिबात ठेवू नका, कारण पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत.
आधीच होळीच्या स्वस्त रंगात रंगल्यासारख्या दिसणाऱ्या या बटबटीत नोटांना आणखी रंग लागायला जागा आहे? आधीच रंगपंचमीतूनच काढल्यासारख्या दिसणाऱ्या या नोटांवर नवा रंग लागला, तर बँक कर्मचाऱ्यांना ते समजू तरी शकेल का?
…………………………….…………………………….…………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment