हिटलरच्या सरकारात कमी बुद्धीचे, कुवत व चारित्र्य नसलेले लोक बरेच होते. मुख्य म्हणजे ते महत्त्वाच्या पदांवर होते...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
रवींद्र कुलकर्णी
  • ‘द नाईटमेयर इयर्स - १९३० ते १९४०’ या पुस्तकाचे मुख-मलपृष्ठ
  • Fri , 10 June 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो द नाईटमेयर इयर्स - १९३० ते १९४० The Nightmare Years - 1930-1940 विल्यम शिरर William L. Shirer हिटलर Hitler

‘कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम’चा वार्ताहर म्हणून पत्रकार विल्यम शिररने दुसरे महायुद्ध पहिली तीन वर्षे  जर्मनीतून व युरोपातून अनुभवले. त्याच्या आठवणींचे ‘द नाईटमेयर इयर्स - १९३० ते १९४०’ हे पुस्तक १९८४ साली प्रकाशित झाले. या पुस्तकातून त्या काळात जर्मन समाज कुठल्या स्थित्यंतरातून जात होता, हे समजते. त्याचे नंतरचे परिणाम पाहू जाता, हे पुस्तक वाचताना आपल्या मनावर एक प्रकारचा ताण येतो.

शिररचा वार्ताहर म्हणून सत्तावर्तुळातल्या अनेकांशी संबंध आला. त्यातील गोबेल्स, हिमलर अशी काही  नावे आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलची निरीक्षणे शिररने आपल्या डायरीत नोंदवली व नंतर आठवणी लिहिताना त्याचा उपयोग केला. या पुस्तकातले ‘हिटलरभोवतालची माणसे’ हे प्रकरण अत्यंत उद्बोधक झाले आहे. हिटलरसारख्या सत्ताधिशाला कोणच्या प्रकारच्या माणसांची गरज असते, हे त्यातून समजते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................

हिटलरने आल्फ्रेड रोसेनबर्गला ‘नॅशनल सोशालिस्ट पार्टी’चा तत्त्ववेत्ता म्हणून नेमले होते. तो अनेकदा विदेशी वार्ताहर व राजदुतांसाठी मेजवान्या व बिअर पार्ट्या भरवे. अशा वेळी तो नाझी पक्षाच्या एखाद्या मोठ्या पदाधिकाऱ्याला बोलवे. क्वचित त्याच दर्जाच्या सैन्यातील अधिकाऱ्याला बोलवे. तो प्रत्येक टेबलापाशी येऊन काही वेळ बसे. बिअर पिता पिता वार्ताहरांना त्याच्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारता येत.

रोसेनबर्गचे वर्णन शिररने ‘अत्यंत मूर्ख व अतिरेकी’ असे केले आहे. त्याचे इतिहासाचे ज्ञान अगाध होते. काही वर्षे तो रशियात होता. त्याची पदवी मास्को विद्यापीठाची होती. जर्मन वर्तुळात त्याला ‘रशियन’ म्हणत. नॉर्डिक श्रेष्ठत्वाच्या, जर्मन वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या त्याच्या कल्पना हास्यास्पद होत्या. त्याच्याकडे फाईन आर्ट्सचा डिप्लोमा होता. हिटलरला इच्छा असूनही तो न मिळवता आल्याने रोसेनबर्गला त्याच्यावर छाप पाडणे सोपे गेले असावे, असे शिररला वाटले.

हिटलरला त्याच्या बुद्धिमत्तेची कल्पना असावी, कारण त्याने १९३०मध्ये ‘मिथ्स ऑफ ट्वंटियथ’ सेंचुरी नावाचे आर्य वंशच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण सांगणारे ७०० पानी पुस्तक लिहून प्रकाशित केले होते. हिटलरने ते वाचण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचणे अशक्य असल्याचे जवळच्या लोकांजवळ सांगितले. पण या पुस्तकाचा हिटलरच्या ‘माइन काम्फ’च्या खालोखाल खप होता. हिटलरच्या युवा आघाडीचा प्रमुख बॅल्डर व्हॉन शिराच हादेखील स्वत:ला लेखक समजे. तो म्हणाला, “जर्मन इतिहासात सर्वांत जास्त विकले गेलेले व सर्वांत कमी वाचले गेलेले ते पुस्तक आहे.” अशा माणसाला हिटलरने पक्षात व सरकारात अनेक संधी दिल्या. अर्थात रोसेनबर्गदेखील धडपडत व प्रयत्न करत राहिला. बातम्या मिळवण्याच्या दृष्टीने शिररसाठी तो महत्त्वाचा माणूस होता.

शिररने न्युरेंबर्गमधल्या अनेक संध्याकाळी अशा लोकांबरोबर घालवल्या. यातले काही जण अजून प्रसिद्धीला यायचे होते. शिररला डॉ. बर्नहार्ड रुस्ट तेथे भेटे. तो एकेकाळी शिक्षक होता. त्याला त्याच्या टोकाच्या मतांमुळे शाळेतून काढून टाकले होते. हिटलरने त्याला शिक्षण विभागाचा प्रमुख केले. एकेकाळी सर्व युरोपला हेवा वाटावा, अशी शिक्षण पद्धती जर्मनीत होती. (‘असेंट ऑफ मॅन’ या ब्रोनोवस्कीच्या पुस्तकात व ‘ब्रायटर दन थौसंड सन्स’ या पुस्तकात त्याबद्दल माहिती आहे.) ‘जर्मन शाळा या केवळ बौद्धिक कसरती करण्याची ठिकाणे झाली आहेत. त्या नाझीवादाची व फ्युररची स्वप्ने साकार करण्यासाठी चालवल्या पाहिजेत’, असे रुस्टचे मत होते.

शिरर म्हणतो, “मी हिटलरचे ‘माइन काम्फ’ वाचले होते. त्यामुळे मला हिटलरचा शिक्षकांवरला राग माहीत होता. शिक्षकांमुळे आपल्या शिक्षण अर्धवट सोडावे लागल्याची त्याची भावना होती. शिवाय फाईन आर्ट्सचा न मिळालेला डिप्लोमा त्याच्या जिव्हारी लागला होता.” नवीन सत्तेची री न ओढणाऱ्या प्राध्यापकांना रुस्टने घरचा रस्ता दाखवला. त्यांची संख्या एकंदर संख्येच्या २५ टक्के म्हणजे जवळपास २८०० होती. निम्म्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ज्या जर्मनीने जगाला उत्तमोत्तम संशोधक व इंजिनियर दिले होते, त्यांची संख्या २० हजारावरून ९ हजार आली. जे विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले, ते देशभक्त होते, पण त्यांचे काम त्यांना धड येत नव्हते, अशी तक्रार उद्योग जगतातून झाली.

आईनस्टाईनचा सापेक्षतावाद त्या वेळी नवीन होता व तो सप्रमाण सिद्ध झाला होता. पण त्याच्यावर जुईश विज्ञान म्हणून हल्ला चढण्यात आला. ज्यूला मुळातच सत्य समजण्याची पात्रता नसते, तर आर्यन वंशाच्या संशोधकाला मात्र सत्याची आस असते व ते समजण्याची पात्रता असते, असे म्हणणारा एक मोठा वर्ग विद्यालयांत निर्माण झाला. त्यात फिलीप लेनार्डसारखे नोबेल प्राइज विजेते प्राध्यापकदेखील सामील झाले. आईनस्टाईन व त्याच्या सापेक्षतावादाची निंदा करण्यात ते आघाडीवर होते. विज्ञान फक्त विज्ञान न राहता ते ‘जर्मन विज्ञान’ व गणित ‘जर्मन गणित’ झाले.

शिररने लिहिले आहे, “मी एका प्रचंड मोठ्या वेड्यांच्या इस्पितळात राहतो आहे असे मला वाटू लागले. एका बिअर पार्टीत डॉ. रुस्टचे म्हणणे ऐकत मी व अमेरिकन राजदूत डोड बसलो होतो. डॉ. रुस्ट जे बोलत होते, ते ऐकून त्यांना एकही प्रश्न विचारण्याची मला इच्छा झाली नाही. तेथून निघताना मी डोड महाशयांना रुस्टबद्दलचे त्यांचे मत विचारले. ते म्हणाले, ‘तो मूर्ख आहे.’ ”

वायमार प्रजासत्ताक लयाला जात असताना व हिटलरचा उदय होत असताना जर्मनीत तरुणांच्या वेगवेगळ्या संघटना होत्या, ज्या जर्मन युथ असोसिएशनच्या बॅनरखाली एकत्र आल्या होत्या. त्यात सुमारे एक कोटी तरुण होते. बल्डर व्हॉन शिराचला तरुणांचा नेता बनवताच परिस्थिती झपाट्याने बदलली. शिराचचे पूर्वज अमेरिकन होते. त्यामुळे शिररला त्याच्या संपर्कात येणे सोपे गेले. फुटबॉल खेळाडूसारखी त्याची अंगकाठी होती. जबाबदारी मिळताच शिराच आपल्या केवळ ५० तरुणांना घेऊन जर्मन युथ असोसिएअशनच्या कार्यालयात शिरला व तिथल्या सर्वांना हाकलून दिले. जर्मनीतल्या साऱ्या तरुणांच्या संघटना त्याने हिटलर युथच्या छताखाली आणल्या. यात कॅथॉलिक तरुणांची संघटना महत्त्वाची होती. त्यात एक लाख तरुण होते. त्यासाठी हिटलरने पोपशी केलेला करारही त्याने धाब्यावर बसवला.

सर्वांत ६ ते १० वर्षांच्या मुलांचा गट ‘फिम्फ’ म्हणून ओळखला जाई. या काळात त्याची विचारसरणी घडवायला सुरुवात होत असे. १०व्या वर्षी जर्मन इतिहासाच्या ज्ञानाची व शारीरिक चाचणी होऊन त्याला हिटलरशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली जाई. पुढचा गट ‘जंग व्होल्क’ म्हणून ओळखला जाई. याचा वयोगट १४ ते १८पर्यंत असे. शिररने बर्लिनभोवतालच्या रानात अशा तरुणांचे कॅम्प भरलेले व ते बंदुका घेऊन सराव करताना अनेकदा पाहिले.

यालाच समांतर मुलींची संघटनादेखील उभारण्यात आली. त्यांना शेतावर व घरात दोन्ही ठिकाणी कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. उत्तम आई होण्याचे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येई. शहरातील मुलगी खेड्यातल्या शेतावर प्रशिक्षणाला गेल्यावर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत. नाझी पक्षाने तिकडे दुर्लक्ष केले. उत्तम जर्मन वंशाची मुले जेवढी जन्मतील तेवढी त्यांना हवीच होती. 

१९३८च्या अंताला हिटलर युथच्या सभासदांची संख्या सात कोटी बहात्तर लाखाच्या आसपास होती. ज्या पालकांनी आपल्या मुलाला या युथ संघटनेत घातले नसेल, त्यांना धमकावण्यात आले. युद्धाच्या अंताला जेव्हा दोस्त सैन्ये बर्लिनमध्ये शिरली, तेव्हा या मुलांनी बर्लिन शेवटपर्यंत लढवले. पण १९३४मध्ये याची कल्पनाही करणे अवघड होते.

हिटलरच्या खालोखाल जर्मन सेना वेगाने वाढवण्यात जनरल व्हॉन फ्रित्शचा सहभाग होता. तो अत्यंत बुद्धिमान होता. रोसेन्बर्ग व इतर नाझी पक्षातल्या लोकांविषयी आपली कडवट मते तो अजिबात लपवत नसे. लढाईला तोंड फुटल्यावर लगेच पोलंडच्या सीमेवर दुसऱ्या अधिकाऱ्याशी बोलत असताना त्याला अचानक गोळी लागली आणि तो मरण पावला. शासकीय इतमामात त्याचे दफन करण्यात आले, तेव्हा विल्यम शिरर उपस्थित होता. त्याने लिहिले, “अंधारून आले होते आणि पाऊस पडत होता. हिटलर, रीबेंट्रॉप व हिमलर यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.”

लोकप्रियतेत हरमन गोअरिंगचा क्रमांक बराच वरचा लागे. जर्मनीची राष्ट्रीय विमान कंपनी लुफ्तांझा व लष्करी विमानदल लुफ्तवाफ याचा तो प्रमुख होता. गोष्टी मॅनेज करण्यात तो वाकबगार होता. पहिल्या महायुद्धात त्याला मिळालेले शौर्यपदक खरे होते. म्युनिचमधल्या बिअर हॉलच्या बंडात हिटलरच्या बाजूला उभे असताना त्याला गोळी लागली. गंभीर जखमी होऊनदेखील तो त्या वेळेला हिटलरच्या बरोबर चालत राहिला. नंतर त्या जखमेतून पूर्ण बरा झाला. त्याला अमली पदार्थांचे व्यसन होते, पण प्रयत्नाने त्यातून त्याने स्वत:ला सोडवले. त्याची बायको स्विडिश होती. त्याला छानछौकीने राहणे आवडे. त्याचे अनेक उच्चपदस्थांशी संबंध होते. पार्टीच्या सुरुवातीच्या दिवसात त्याने हिटलरची गाठ अनेक योग्य व्यक्तींशी घालून दिली. त्यामुळे हिटलरला त्याची गरज होती. प्रशियाचा गृहमंत्री असल्याने तिथले संपूर्ण पोलीस दल त्याच्या ताब्यात होते. गेस्टापो, म्हणजे गुप्त पोलीस त्याने जन्माला घातले व नको असलेल्या अनेक माणसांना शोधून निर्दयपणे छळछावण्यात पाठवले. शिररचा सहकारी, ‘शिकागो ट्रिब्युन न्यूज’च्या वायल ड्युअलच्या मते गोअरिंगला पाहिले की, त्याचे रक्त उसळे.

हुकूमशाही राजवटीत लोकांनी राजकर्त्यांवर प्रेम नसेल तरी चालते. फक्त त्याला घाबरून असले तरी पुरेसे असते. रशियातल्या स्टालिनचे तसे होते, पण हिटलरवर लोकांचे प्रेम होते व त्याच्या खालोखाल गोअरिंग लोकांना आवडत असे. त्याचे व्यक्तिमत्त्व आनंदी असे व विनोद बटबटीत असत. त्याचे प्रॅक्टिकल असणे जनतेला भावे व आत दडलेल्या खुनशीपणाकडे लोक दुर्लक्ष करत.

वार्ताहरांनी अडचणीच्या प्रश्न विचारायला त्याची कोणतीही हरकत नसे. त्याला, “राईशस्टॅगला तुम्हीच आग लावली असे म्हटले जाते, यावर तुमचे काय म्हणणे आहे?” असे त्याला विचारले असता, त्याने शांतपणे ते खोटे असल्याचे व त्यासाठी केवळ कम्युनिस्ट जबाबदार असल्याचे सांगितले. विल्यम शिररच्या टेबलापाशी बसून गप्पा मारत असताना शिररने त्याला विचारले, “व्हर्सायच्या अटीनुसार विमानदल परवानगी नसताना तुम्ही निर्माण करता आहात का?” या प्रश्नावर गोअरिंग छद्मीपणे हसला व म्हणाला, “मी त्याची चिंता करत नाही”. त्याला अमेरिकन वर्तमानपत्रात लेख लिहायची विनंती केली असता त्याने हिटलरची परवानगी घेऊन कळवतो असे सांगितले. ती मिळाल्यानंतर मोबदल्याबद्दल बरीच घासाघीस केली. तो क्रूर होता हे खरे होते, पण त्यावर विश्वास बसणे अवघड होते.

हुकूमशाही राजवटीत बातम्या मिळवणे सोपे नसते. हिटलरच्या राजवटीला जर्मनीबाहेरच्या जगाविषयी फार माहिती नव्हती. त्यामुळे साशंक मनाने का होईना ते परदेशी वार्ताहरांना बाळगून असत. पण त्याबरोबर एखाद्या नाझी पदाधिकाऱ्याची परदेशी उच्चपदस्थांशी जास्त जवळीक संशय उत्पन्न करणारी असे. फ्रेंच राजदूताशी जास्त जवळीक अर्नेस्ट रोहेमला महागात पडली व त्याचा जीव गेला. काही मैत्रीपूर्ण पत्रकारांना नाझी सरकारमधले लोक स्वत:हून बोलवत. मुलाखती व सरकारच्या धोरणासंबंधी बातम्या देत. शिररला मात्र कुणी कधी मुद्दाम बोलावले नाही. नाही म्हणायला एकदा गोअरिंगने बोलावले व त्यात गोअरिंगने वर्तमानपत्रात लेख लिहिण्याविषयी बोलणे झाले. शिररची गणना शत्रुपक्षात नव्हती, पण तो अ-मित्रांच्या गटात होता. हळूहळू त्याला बातम्या मिळणे अवघड होऊ लागले.

राइश प्रोटेक्टर हिमलर चणीला लहान होता. जाड भिगांच्या चष्म्यामागे असलेले त्याचे डोळे चमकदार होते. तो गेस्टापो, एसए व एसएसचा प्रमुख होता. त्याला पाहून वाटत नसे की, ही व्यक्ती छळछावण्या निर्माण करणारी, त्या निर्दयपणे चालवणारी व भविष्यात ज्यूंचा कर्दनकाळ बनेल. तो सामान्य बुद्धिमत्तेचा व दुर्लक्ष करण्याजोगा माणूस वाटला.

हिटलरच्या सरकारात असे कमी बुद्धीचे, कुवत व चारित्र्य नसलेले लोक बरेच होते. मुख्य म्हणजे ते महत्त्वाच्या पदांवर होते. लाखो लोकांचे जीवन त्यांच्यावर अवलंबून होते. हिमलरची पदवी शेतकी विषयातील होती. राजकारणात येण्याआधी तो कोंबडी पालनाचा व्यवसाय करे. ग्रेगोर स्ट्रासर या नाझी पक्षातल्या नंबर दोनच्या माणसाने त्याला आपल्या छायेखली घेतल्यावर त्याची भरभराट झाली. नंतर नाझी पक्ष सत्तेवर आला व स्ट्रासरची हत्या करण्यात आली. यात हिमलरचा हात होता. स्ट्रासर त्याला ‘आमचा पापभिरू हिमलर’ असे म्हणे.

हॉटेल अड्लोन या पंचतारांकित हॉटेलात चालणाऱ्या या पार्ट्यांना सरकारातील एक महत्त्वाची व्यक्ती मात्र उपस्थित नसे, ती म्हणजे आल्फ्रेड गोबेल्स! एकतर तो जर्मन दिसत नसे. शिवाय तो एका पायाने अधू व बुटका होता. लोक पाठीमागे त्याला ‘रॅट’ (उंदीर) म्हणत. त्याला पक्षात, सरकारात वा इतर कोठेही मित्र नव्हते. तो सत्ता राबवण्यात हुशार आणि निर्दयी होता. हिटलरच्या इतर सहकार्यांपेक्षा त्याचे वेगळेपण म्हणजे त्याच्याकडे जबरदस्त महाविद्यालयीन शिक्षण होते. पण त्या शिक्षणाने त्याचे मन रुंदावले नव्हते. त्याला जर्मनी सोडून बाहेरच्या जगाविषयी, परदेशी भाषा, साहित्य याबद्दल काहीही माहीत नव्हते.

हे वैगुण्य हिटलरसहित त्याच्या सर्व सहकाऱ्यांत समान होते. जर्मनीचे परराष्ट्र धोरण आखताना हे अज्ञान, केवळ अडचणीचे नाही, तर धोकादायक ठरले, असे मत शिररने व्यक्त केले आहे. अमेरिकेविषयी गोबेल्सच्या कल्पना बालिश होत्या. जर्मनीतील वर्तमानपत्रे व आकाशवाणी त्याच्या नियंत्रणात होती. कोणते संगीत कुणी वाजवायचे, कोठली नाटके आली पाहिजे व काय छापले गेले पाहिजे, हे सारे तो ठरवे.

नाझी पक्ष १९३३ साली सत्तेवर आला, तेव्हा रेडिओ हे प्रकरण १० वर्षांचे होते आणि सरकारी नियंत्रणाखाली होते. जवळपास ४० लाख माणसांकडे तो होता. गोबेल्सने कमीत कमी प्रत्येक घरात एक रेडिओ असला पाहिजे, हे ठरवले. त्यासाठी जनता रेडिओ बनवण्यात आला. त्याची किंमत फक्त ३५ मार्क्स ठेवण्यात आली. साऱ्या युरोपात तो सर्वांत स्वस्त होता. त्यावर ‘कम्युनिटी रिसेप्शन’ नावाचा कार्यक्रम असे. त्यात तो भाषणे देई. ते सुरू झाले की, हातातले काम सोडून प्रत्येकाला ऐकावे लागे. यानंतर त्याने रस्त्यावरच्या खांबावर लाउडस्पीकर लावले व ज्यांच्या घरात रेडिओ नसे, त्यांनादेखील आपले भाषण ऐकवण्याची सोय केली. कितीही खोटे सांगा, पण ते सतत सांगितल्याने त्याचा थोडातरी भाग लोकांच्या मनात शिल्लक राहतो, असे त्याचे म्हणणे होते.

रिबेंट्रॉपला परराष्ट्रमंत्री करण्याचे एकमेव कारण म्हणजे तो हिटलरशी एकनिष्ठ होता. फ्रेंच व इंग्लिश तो बरे बोले. पण ते ज्ञान त्या भाषांच्या अभ्यासातून न येता, त्याने काही काळ त्या त्या देशांत काढला होता, त्यामुळे होते. एका बिअर कंपनीच्या मालकाच्या मुलीशी लग्न करून तो श्रीमंत झाला. व्यवसाय वाढवण्यासाठी तो पश्चिम युरोपात फिरतीवर असे. तेथल्या, तसेच जर्मनीतल्या उद्योगपतींशी त्याचे संबंधही होते, ज्याचा उपयोग हिटलरला सत्तेवर येताना झाला. नंतर त्याला हिटलरने ब्रिटनमध्ये राजदूत म्हणून पाठवले आणि त्याने तेथे बराच गोंधळ करून ठेवला. गोअरिंगने त्याला परत बोलवावे असे हिटलरला सुचवले, तर हिटलर म्हणाला, “पण त्याच्या तेथे ओळखी आहेत. तो... लॉर्डला ओळखतो.” गोअरिंग म्हणाला, “ अडचण अशी आहे की, तो लॉर्डपण त्याला ओळखतो.”

एकदा घाईघाईने प्रचार मंत्रालयात पत्रकार परिषद बोलावली. तेथे जर्मनी व जपान यांच्यात ‘अँटी कोमिटर्न करार’ झाल्याची घोषणा करण्यात आली. (हे चीनशी संबंधित प्रकरण होते) जपानी राजदूत बोलल्यानंतर रिबेंट्रॉप उभा राहिला व म्हणाला, “पाश्चिमात्य संस्कृतीच्या रक्षणासाठी जर्मनी व जपान एकत्र आले आहेत.” यावर एका ब्रिटिश पत्रकाराने, ते वाक्य उदधृत करत, त्याने बरोबर ऐकले आहे ना, असे विचारले.” रिबेंट्रॉपने परत तेच वाक्य उच्चारले. ते ऐकून “या माणसाला विनोद कळत नाही,” अशी नोंद शिररने आपल्या डायरीत केली.

रुडोल्फ हेसचा क्रमांक हिटलरनंतर तिसरा लागे. तो इजिप्तमध्ये वाढला होता. त्यामुळे इंग्लिश व फ्रेंच बरे बोले. सभेत लोकांसामोरही तो चांगले बोले, पण हिटलर जे बोले, तेच तो परत बोले. ब्रिटिशांचे त्याला कौतुक होते व आपण ब्रिटिशांना चांगले ओळखतो, असा त्याचा दावा असे, जो पुढे खोटा ठरला. कारण ब्रिटनशी बोलणी करून युद्ध थांबवण्यासाठी म्हणून एक दिवस तो विमान घेऊन उडाला व स्कॉटलंडमध्ये उतरला व पुढचे सारे आयुष्य त्याने ब्रिटिशांच्या बंदिवासात काढले. तो मानसिकदृष्ट्या कधी वाढला नाही. हिटलरच्या आसपास चाललेल्या गळेकापू राजकारणात तो इतक्या मोठ्या पदावर पोहचावा, याचे विल्यम शिररला आश्चर्य वाटे.

दुसऱ्या महायुद्धात रस असणाऱ्यांना वरील नावे माहीत असतात, पण रोबर्ट ले याचे नाव माहीत असण्याची शक्यता कमी असते. तो जर्मन नाझी पक्षाचा कामगार पुढारी होता. हिटलरच्या कारकिर्दीत पहिल्या महायुद्धानंतर पसरलेली  बेकारी जवळपास संपुष्टात आली. पण यावरून जर आपल्याला वाटेल की, जर्मन कामगारांना संघटित होण्याचे व मालकाशी वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य होते, तर आपली फसगत होईल. संपूर्ण युरोपात ‘मे डे’ (कामगार दिन) म्हणून तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे. हिटलरची सत्ता आल्यावर जाहीर करण्यात आले की, १९३३चा ‘कामगार दिन’ कधी नव्हे एवढ्या भव्य प्रमाणावर साजरा करण्यात येईल. त्यासाठी संपूर्ण जर्मनीतून कामगार पुढाऱ्यांना बर्लिनमध्ये विमानाने आणण्यात आले, तेव्हा जर्मन कामगार हिटलरच्या मागे ठामपणे असल्याचे बॅनर सर्व शहरभर झळकत होते. या पुढाऱ्यांबरोबर कामगारांची शिष्टमंडळेपण होती. आपल्या भव्य चान्सलरीत हिटलरने त्यांची गाठ घेतली व असा कामगार दिन पुढची १०० वर्षे साजरा करण्याचे जाहीर केले. ‘कामाला सन्मान व कामगाराला मान’ हे नाझी पक्षाचे धोरण असल्याचे त्यांना सांगितले.

याच्या दुसऱ्या दिवशी या सर्व कामगार नेत्यांना पकडण्यात आले. त्यांच्या संघटना बरखास्त करण्यात आल्या. उद्योगाच्या मालकालाच कामगारांचा पुढारी करण्यात आले. हे सर्व रोबर्ट ले याने घडवून आणले होते. त्याच्या सेक्रेटरीला तो खूप मोठा माणूस वाटे. त्याची एकच तक्रार असे, ती म्हणजे त्याचा साहेब सतत प्यायलेला असतो. एवढे वजा केले तर रसायनशास्त्रातील डॉक्टरेट असलेला रोबर्ट ले हिटलरच्या कामाचा माणूस होता.

गोबेल्स, गोअरिंग, हेस व काही प्रमाणात खुद्द हिटलर यांचा ज्योतिषविद्येवर विश्वास होता. अशा अज्ञ व केवळ संघटना बांधण्यात व ती राबवण्यात कुशल असलेल्या या माणसांनी साऱ्या युरोपला व नंतर जगाला युद्धात लोटले. जर्मन सैन्यातले अनेक अधिकारी मात्र बुद्धिमान होते व बऱ्याच प्रमाणात भान राखून होते. काय घडत आहे, याची त्यांना कल्पना होती. शेवटी त्यांनीच हिटलरला बॉम्बस्फोटात ठार मारण्याचा प्रयत्न केला, जो दुर्दैवाने अयशस्वी ठरला.

विल्यम शिररपेक्षा सत्तावर्तुळातल्या घडामोडी ‘लंडन टाइम्स’चे पत्रकार नॉर्मन इब्बट यांना जास्त माहीत असत. पण त्यांनी दिलेल्या स्फोटक ठरणाऱ्या बातम्या ‘लंडन टाइम्स’ छापत नसे. त्या वेळेला एवढे प्रतिष्ठित वर्तमानपत्रदेखील हिटलर बरोबर सामोपचाराने घ्यावे या मताचे होते. ‘लंडन टाइम्स’ने न छापलेली बातमी, मग इब्बट शिरर यांच्याकडे  देत. ती अमेरिकन वर्तमानपत्रात छापली जाई.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

हिटलरविरोधात ठाम उभे राहण्याची गरज त्या वेळेला फक्त विन्स्टन चर्चिल यांना वाटत होती. त्यासाठी पार्लमेंटपासून सगळीकडे ते बोलत आणि त्याबद्दल लिहीत. पण त्या वेळी कोणी त्यांच्याकडे फार लक्ष देत नसे. एकदा त्यांनी याच प्रकारचे भाषण ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये केले. त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. तेच भाषण ते शिरर यांच्या ‘कोलंबिया ब्रॉडकास्टिंग’साठी करतील काय असे विचारायचे ठरले. चर्चिल यांच्या मुलाशी ओळख असल्याने शिरर यांना चर्चिल या १५ मिनिटांच्या भाषणाचे किती पैसे घेतील याचा अंदाज होता. त्या वेळी ते जगभरातल्या २००पेक्षा जास्त वर्तमानपत्रांतून स्तंभलेखन करत. त्याचे त्यांना ३०० ते १५०० पौंड दर आठवड्याला मिळत. कोलंबिया ब्रॉडकास्टिंग किती देऊ शकेल, असे विचारताच ‘५० डॉलर’ हे उत्तर मिळाले. त्या वेळी एका पौंडाची किंमत चार डॉलर होती. हे कळल्यावर शिरर यांना चर्चिल यांना भाषणासाठी विचारण्याचीही लाज वाटली. पण अखेर त्यांना भाषणासाठी  विचारण्यात आले. साहजिकच चर्चिल यांनी त्याचे पैसे किती मिळणार, असे विचारताच ‘५० डॉलर’ असे उत्तर मिळाले. हा आकडा ऐकून क्षणभर चर्चिल काही बोलले नाहीत. म्हणून त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या भाषणामध्ये जाहिराती नसतील. त्यामुळे ब्रॉडकास्टिंग कंपनीला त्यापासून काही उत्पन्न मिळणार नाही. हे ऐकून चर्चिल यांनी त्यांच्या मोबदल्याचा आकडा खाली आणला व आपल्याला १००० डॉलर्स मिळाले पाहिजेत असे सांगितले. थोडी भवती न भवती होऊन त्यांना ते देण्यात आले आणि त्यांचे भाषण अमेरिकेत ऐकले गेले.

विल्यम शिररने डायरीत केलेल्या नोंदींची मदत घेऊन नंतर पुस्तक लिहिले, तेव्हा जर्मनीचा पराभव झाला होता. त्यांची अनेक कृष्णकृत्ये उजेडात आली होती. त्याचा प्रभाव या पुस्तकावर आहे. नाझी पक्षाच्या राजवटीच्या सुरुवातीला शिररचे हिटलरविषयी मत वाईट नव्हते. समोरच्या माणसांच्या बुद्धीचा ताबा घेणे, ही यशस्वी नेतृत्वाची महत्त्वाची पायरी असते. काही काळ का होईना शिररसहीत इतर अनेक पत्रकारही हिटलरच्या प्रभावाखाली होते.

..................................................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......