कोल्हापूरला गेलो की, काही कार्यक्रम फिक्स असतात. त्यात राजाभाऊंची भेळ खाणे, फडतरे यांची मिसळ खाणे, मिरजकर तिकटी येथील बुचडे यांच्या मिसळीच्या दुकानात जाऊन कांद्याची गोल भजी खाणे, महालक्ष्मी मंदिराच्या मुख्यद्वारा जवळील दगडू बाळा यांचे कंदी पेढे घेणे आणि आहार हॉटेलचा चहा पिणे असे सगळे ठरलेले असते!
या सगळ्या लज्जत महोत्सवाची लज्जत वाढते कोल्हापुरी रिक्षावाल्यांच्या गप्पांनी.
१.
कोल्हापुरात अंतरं कमी पण चढ-उतार जास्त! त्यामुळे खाद्यभ्रमंतीसाठी मी रिक्षा वापरतो. परवा राजाभाऊंची भेळ खाल्यावर लॉजवर जाण्यासाठी रिक्षा केली आणि मीटर टाकल्या टाकल्या गप्पा सुरू झाल्या. कोल्हापुरात रिक्षावाल्यांशी गप्पा सुरू करायला त्याच्याकडे बघून प्रेमाने हसायचे असते फक्त.
रिक्षावाले काका पन्नाशीतले होते. काळा रंग, पांढरे-काळे केस, तरतरीत चेहरा आणि ठेंगणी मूर्ती. मी बसल्या बसल्या हसलो. म्हणालो - ताराराणी पुतळा.
भाएरुन घिऊ का आतनं?
गर्दी नसेल तिथून घ्या.
मग भाएरूनच जायाला लागनार!
घ्या हो बाहेरून. चार-पाच रुपये इकडं-तिकडं. गर्दी नको पण.
कोल्ल्हापुरात यवडी गर्दी झालिया तुमाला सांगतो. आता रंकाळ्याला आडाकलो व्हतो. कंबरच दुखाया लागली. मटन आनायला जायाचं हुतं मला. पन मी तर अडाकल्यालो. बायकोला फोन केला म्हटलं, मला काय मटन अनाया जमायचं नाई. बायको म्हटली येशा आणंल.
हे यशवंतराव कोण?
आमचा पोरग्याय. कोल्हापुरात ‘आहे’चा उच्चार शॉर्टमध्ये ‘य’ असा होतो कित्येकदा. ‘आमचा पोरगा आहे’ याचा उच्चार आमचा पोरग्याय असा होतो. ‘आहे’चा उच्चार कोल्हापुरात अनेक वेळा ‘ए’ असाही होतो. उदा. त्ये येतए. म्हणजे ‘तो येतो आहे’. कोल्हापूर या नावामध्येही ‘को’नंतर अर्धा ‘ल्’ येतो. कोल्ल्हापूर! या छोट्या ‘ल्’मुळे पहिल्या ‘को’ला एक सुंदर झोळ मिळतो. जिज्ञासूंनी उच्चार करून बघावा. माझ्या मते उच्चारांशी प्रामाणिक राहायचे असेल तर कोल्हापूर हे नाव ‘कोल्ल्हापूर’ असेच लिहिले जायला हवे! असो.
..................................................................................................................................................................
................................................................................................................................................................
रिक्षावाले काका बोलतच होते.
आमच्या पोरग्याचा बी फोन आला - बाबा मी आनतो मटन, तुमी नका काळजी करू. म्हनून तुमचं भाडं घेतलं… आमच्यात ओम घातल्येला ओ. दोन महिनं झालं मटन नाई काई नाई! निस्ता आमटी-भात, आमटी भात खावून जीव कातावलाय ओ!
काय घातला होता?
ओम घातला व्हता ओम!
ओह होम!
बायको बी कावल्याली ओ आमटी भात खाऊन! म्हटली अर्दा किलो मटन आना आजच्याला.
दोन महिन्यांनी मटण म्हणजे मजाच!
येत्ता का जेवाया?
नको नको अहो. आज मित्र येणार आहेत. जेवायला जायचं ठरलं आहे.
बायको चांगली आच्चारीए माजी. भाकऱ्या, रस्सा समदं भारीतलं काम असतंय यकदम.
नाही, नको. मित्रांचं ठरलं आहे आमच्या.
दारूकाम करायचं ठरल्यालं असनार तुमचं?
नाही आता पीत नाही कुणी. रिटायर झालेत सगळे. वयं झालीत सगळ्यांची.
हां ते बी बरूबरय म्हना!
नाव काय तुमचं?
रामचंद्र लगारे! रामा लगारे म्हनत्यात मला…कुट्टून रिटायर झाला तुमी?
कस्टम्समधून!
आगायाया! बंगलाए का तुमचा तारारानी पुत्ळ्याजवळ?
नाही लॉज वर उतरलोय- ‘ग्रॅन्ड अयोध्या’.
म्हंजे ‘यात्री निवास’?
हो पूर्वी लॉजचं पूर्वीचं नाव ‘यात्री निवास’ होतं.
आमच्या पै सायबांचंय. पै सायेब म्हंजे येक नंबर मानूस! त्यांचा येक पावना बसल्येला रिक्षात माज्या. तो म्हनाया लागला लॉज यवडं भारितलं केलंया पन नाव कसं धर्मशाळेवानी ठिवलंय?
हं! मी मोघम प्रतिक्रिया दिली.
मी जास्त काही बोललो नाही, कारण बॉल नक्की कुठल्या दिशेला चालला आहे, हे कळत नव्हते. काम करणारा चुकला की हसणे हे पुण्यात आद्य कर्तव्य ठरते. कोल्हापुरात कष्ट आणि प्रयत्न करणाऱ्या माणसाला असं हसणं योग्य समजत नाहीत.
मी काय म्हनलो त्या पावन्याला? आवो त्ये पै सायेब कायतरी प्रयत्न करायलेत आनि तुमी का हसायलाय त्यान्ला?
बरोबर आहे. मी आपलं हो ला हो म्हणायचं म्हणून म्हणालो.
त्या वं त्यो पावना म्हनला, नाव चुकलं की, वो पन लॉजचं! त्या वं मी त्याला म्हन्लो…
काय?
मी म्हन्लो, त्यो पै सायेब कायतरी कराया लागलाय म्हनून चुकाया लागलाय. आपन हिथं निस्तीच बोंबाबोंब करायलोय. उपेग काय?
मग? मी विचारले.
पावना म्हन्ला फुडं बगून रिक्षा चालीव. मी म्हन्लो फुडंच बगून रिक्षा चालवाया लागलोय मी. मागं बगून रिक्षा चालीवत्यात काय कोल्ल्हापुरात?
मग?
मग बोल्ला न्हाई मला काई फुडं.
बॉल कुठं चालला आहे, हे कळल्यामुळं मला हायसं वाटलं. त्यामुळे मी म्हणालो -
लॉज सुंदर आहे बाकी!
त्यावर लगारे माझ्यावर उलटले!
लॉज मस सुंदर असंल वो तुमचं. नाव सुंदर नको काय? हेमामालिणीचं नाव राधाबाई सनगर असतं, तर शिणेमे चाल्ले असते काय तिचे?
खरं आहे. मी बॉल प्लेड केला.
तसं बघाया ग्येलं तर पै सायबांच्या पावण्याकडं पॉइंट व्हता ओ. पन हसायला नको व्हतं त्यानं पै सायबाला. त्यो मानूस यवडं दांडगं लॉज बांदून ऱ्हायलाय आनि आपन का बरं हसायाचं त्याला?
खरी गोष्ट!
पन आता चालंन लॉज. नाव चांगलं ठिवलंय आता! ग्रॅन्ड अयोध्या. पावरए नावाला!
कोल्हापुरात असा चांगुलपणा भरलेला आहे. तुमचं चांगलं झालं की, जितक्या लोकांना वाईट वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांना तुमचं चांगलं झालं म्हणून आनंद वाटतो कोल्हापुरात.
तेवढ्यात एक बाईकवाला थोडा जास्तच जवळून गेला.
लगारे त्याला रिक्षाच्या बाहेर डोकं काढून म्हणाले - अस्का कराय्लाईस? दम्मान्जाकी जरा!
दम्मान्जाकी म्हंजे ‘दमानं जा की’ असतं हे कळायला कोल्हापुराशी अनेक वर्षं मैत्री करावी लागते. ‘अस्का कराय्लाईस’ म्हणजे पुण्याच्या भाषेत ‘अरे, असे का करतो आहेस तू?’. या उदाहरणावरून कोल्हापुरी मराठी कमीत कमी श्वासांमध्ये जास्तीत जास्त इफेक्ट कसा साधते, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेले असेलच. असो.
तुमाला सांगतो कोल्ल्हापुरात यवड्या नो एन्टऱ्या केल्याती या लोकानी. रोच्चे पाच लाख तरी जमत असनार. यवडी बकरी गावत्यात बगा. त्यो बगा गावाला.
पोलिसांनी पकडलेल्या एका बाईकवाल्याकडे बोट दाखवून लगारे म्हणाले.
लई बकरी! कारवाला, गावाला तर म्येलाच! तीन हज्जाराची पावती फाडत्यात ओ!
शेवटी लॉज आले.
लगारेंना पैसे दिले. लगारे म्हणाले, सायेब फोन नंबर ठीवा माजा तुमच्यापाशी. फुडच्या टायमाला मट्टन खायला यायचं माज्याकडं. बायको एक नंबर आच्च्यारीए माजी.
त्यांनी नंबर सांगितला - नऊ शून्य चार नऊ शून्य सात नऊ दोन आट नऊ.
लगारे म्हणाले - भाएरून आलो म्हनून लवकर आलो. नायतर कंबार मोडली असती. तुमचीबी आनि माजी बी.
लगारे आनंदात निघून गेले. कोण कुणाचा मी, लगारे मला घरी मटण खायला चला म्हणून मनापासून आग्रह करत होते. चार लोकांच्या कुटुंबात दोन महिन्यांनी अर्धा किलो मटण आणलं जात होतं आणि लगारे त्यात मला शरीक करू इच्छित होते. मी गेलो असतो तर स्वतः कमी खाऊन त्यांनी मला पोटभर खाऊ घातलं असतं.
आता जुलैमध्ये मी कोल्हापुरात गेलो की, लगारेंना फोन करेन. मी वर जो नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून लगारे यांना कुणी त्रास देऊ नये. तो खरंच लगारे यांचा नंबर आहे.
२.
मागच्या ट्रिपला एका सकाळी मी शाहजी चोरगे यांच्या रिक्षात बसलो. सुंदर रिक्षा. लाल सिटा, आयव्हरी कलरच्या झालरी. खाली ब्राऊन रंगाचं मॅटिंग! मीटरला पोपटी रंगाचं फॉल्स लेदरचं कव्हर. पुढे वर एक आयताकृती आरसा. रूढ अर्थानं म्हणाल तर रंगसंगती नव्हती. पण जे होतं ते प्रसन्न होतं. शाजी चोरग्यांचा जीव होता आपल्या रिक्षावर. ‘शाहजी’चा उच्चार कोल्हापुरात ‘शाजी’ होतो हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेले असेलच.
चोरग्यांना दोन मुली होत्या. एक तेरा वर्षांची, एक पंधरा वर्षांची. बायको सहा वर्षापूर्वी गेलेली. तरीही चोरग्यांमध्ये रिक्षा स्वच्छ ठेवण्याची इच्छाशक्ती टिकून होती.
घरचं कोण बघतं तुम्ही रिक्षावर असताना?
म्हातारी हाय. पोरीबी मदत करत्यात तिला आता.
सावरलंय म्हणजे सगळं.
बिगडलं कुट व्हतं तवा. बायकू ग्येली तवा वाईट वाटलं, पन लई बी मनाला लावून घीउन चालतय व्हय तवा. मी रडाया लागलो अस्तो तर म्हातारीनं तर जीवच दिला अस्ता. लई सर्किटे म्हातारी.
मी विचार करत राहिलो. केवढी जाणीव!
मी म्हटले परत लग्न करायला पाहिजे तुम्ही.
कराया पाहिजे. पन सावत्र आई कशाला आनायची माज्या पोरग्यांच्या उरावर? इच्चार करून गप बसतो मी. मी काय इच्चार करतो… आपल्यावर वेळ काय चांगली नाहीए. गप बसाया पायजे आपन.
पण विचार येतच राहणार मनात तुमच्या.
सायेब लई इच्चार नाई करायचा. डोस्क्यात इच्चार लई यायाला लागलं की नई, मी रिक्षा धुवाया घेतो. रिक्षा धुन्यात तास जातुया. मग पुसाया घ्यायाची रिक्षा. पुसन्यातबी एक तास जातुया.
मामाची मुलगी हाए. आमाला लग्न करायचं व्हतं. मामा नग म्हनाला. म्हनला तू रिक्षावाला. तिला नोकरदार मिळतुय तर मिळू दे. म्हटलं मिळू दे. काय बोललो नाई ओ मी. फुडं कळलं बेवडं आहे त्ये. त्यावर बी काई बोललो नाई मी. गप ऱ्हायलो. गेलं ते शेवटाला. एक वर्स हुईल आता.
मदी मामा आला व्हता. म्हनला तुमी दोगं लग्न करा. मी म्हनलं बगू. काई बोललो नाई मी. पोरी मोट्या झाल्याव बगू… कदी कदी जीव उचल खातुया… वाटतं की जावं आनि अनावं तिला. पन मग मी रिक्षा धुवाया घेतो. कदी मदी जाऊन येतो तिच्याकडं. पैसं दिऊन येतो तिला. बघाया पाहिजे कुणीतरी तिच्याकडं.
आडमाप देहाचे, पहिलवानासारखे दिसणारे, काळ्या-पांढऱ्या केसांचे, काळे-सावळे चोरगे सारासार विचार करून स्वतःला प्रेमापासून दूर ठेवत होते. पण त्याच वेळी आपल्या प्रिय व्यक्तीला पैसा-पाणी पुरवत होते. ते परिस्थितीच्या खिंडीत सापडले होते. खिंड पार व्हायची वाट बघत होते ते. पोरी सेफ झाल्या की, ते आपल्या प्रेमाचा विचार करणार होते. मामे बहीण म्हणजे तशी माहितीतलीच. शिवाय तिच्यावर प्रेम! पण ती आपल्या पोरींची सावत्र आई असणार आहे, या जाणीवेने चोरगे सावध होत होते. हा कोल्हापुरी कॉमन सेन्स!
३.
असेच एकदा शाहबाज मणेर भेटले. उच्चारी शाबाज मणेर! मेंदी लावलेले केस, पांढरी दाढी, आणि कानावरचे केस मात्र काळे! सरळ नाक, उभा चेहरा. डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा. चेहऱ्यावर 'सगळे जग आपण जाणले आहे' असा भाव. त्यामुळेच ओठांवर एक सुप्त असे मिश्किल स्माइल. अंगात शर्ट आणि पॅन्ट.
उद्यमनगरात फडतरेंच्यात मिसळ खाऊन मी बाहेर पडलो. महाद्वार रोडला जाऊन दगडू बाळा यांच्याकडून पेढे घ्यायचे म्हणून रिक्षा केली. फडतरे मिसळीच्या समोर एक ‘खांडोळी’ नावाचे रेस्टॉरंट चालू झाले आहे. मी म्हणालो 'खांडोळी' हा काय प्रकार आहे? शाबाज म्हणाले -
ये बुर्जीही होती हैं. सॉस और बन के अंग्रेजी कपडे पहनाते हैं बुर्जी को. खांडोळी तो सिर्फ नाम हैं.
शाबाज गालातल्या गालात हसत होते.
पुढे मिरजकर तिकटीला वळसा घालून आम्ही महाद्वार रोडला आलो. मी दगडू बाळा यांचे पेढे घेतो आहे, याचा शाबाज यांना आनंद झाला.
समद्या कोल्लापुरातला बेष्ट पेडा हैं ये - शाबाज म्हणाले.
दगडू बाळा माल फार कमी बनवतात. मला पोह्यांचा चिवडा एक किलो हवा होता. मालक म्हणाले -
अर्दा किलोचे.
सकाळी दहा वाजता दगडू बाळा यांच्या दुकानात एक किलो चिवडा मिळणं मला मुश्किल झालं होतं.
मी म्हणालो एवढाच माल कसा बनवता?
मालक म्हणाले, दोनदा बनिवतो माल दिवसातनं!
पण म्हणून काय झालं? सकाळी सकाळी अर्धाच किलो चिवडा कसा करता तुम्ही?
जास्त बोलण्यात अर्थ नव्हता. एवढे सुंदर पेढे आणि चिवडा बनवण्याची कला असलेला माणूस माझे कशाला काही ऐकून घेईल?
मी चिडचिड करत रिक्षात बसलो.
शाबाज रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे दुकान दाखवत म्हणाले - तुमी या मराठ्याचा संगीत चिवडा घेत जावा. दगडू बाळाचा एकदम बाद वाटंल तुमाला.
मराठे संगीत चिवडा खरंच भारी असणार याची खात्री पटली. कारण ऐन रविवारी सकाळी दहा वाजून गेले तरी त्या दुकानाच्या मालकांनी दुकान उघडले नव्हते. मी तसे शाबाज मणेर यांना सांगितले.
ते हसून म्हणाले - आपला माल खपनार के नाई याचं काई टेन्शन नसतं यांना. जेवडा बनिवत्यात तेवडा खपनारच याची खात्री असतीया मालकाला.
पुढे भवानी मंडपाच्या जवळ झाड पडलं होतं, म्हणून मग एक मोठा वळसा पडला. मटण मार्केटच्या गल्लीतनं बिंदू चौकाकडं यावं लागलं. त्या गल्लीत रविवार म्हणून शेतकरी आपले गावठी कोंबडे विकायला घेऊन आलेले.
मी म्हटलं मजा आहे कोल्हापुरकरांची. अस्सल गावठी कोंबडे मिळतात तुम्हाला दर रविवारी. पुण्यात कितीही बोंबाबोंब केली तरी असलं कोंबडं मिळत नाहीत. माझ्या नकळत माझ्या पुणेरी मराठीनं कोल्हापुरी साज चढवलेला असतो.
शाबाज नाक उडवत म्हणाले - त्ये काई खरं नसतंय वो! आजकल पोल्ट्रीवालेच गावठी कोंबडे विकायलेत.
विकू देत की! गावठी कोंबडीची चव गावठी कोंबडीसारखीच लागणार!
अस्कसं? शाबाज एक्साईट झाले. गावठी कोंबडी शेतात फिरून दाणापानी करते, उन्हात फिरते, म्हणून तिला चव असते. तिला डी व्हिटामिन मिलते, तिला व्यायाम मिलतो म्हणून चव असते तिला. तुमी तिला ब्रॉयलर कोंबडीगत खुराड्यात ठिवलं तर गावठी कोंबडीबी ब्रॉयलर सारखीच लागणार चवीला.
मी गार झालो. शाबाज यांचा पॉइंट बरोबर होता!
सायेब, आपन कोंबडी आनी मटन खायाचा लई शौक केलाय. हमें फसाना मुश्किल हैं. असे म्हणून शाबाज यांनी रिक्षा थांबवली. मला म्हणाले - या तुमाला मजा दाखिवतो.
मग आम्ही एका शेतकऱ्याच्या टोपलीपाशी बसलो. त्यात सहा-सात कोंबडे होते.
शाबाजनी एक एक कोंबडा हातात घेऊन माझी शिकवणी घेतली.
त्या कोंबड्यांच्या चोचीच्या वरच्या भागाची पुढची टोकं कशी कापून टाकलेली आहेत, ते मला दाखवले. त्यामुळे त्या चोची चमच्यासारख्या कशा झाल्या आहेत ते दाखवले. त्यामुळे खुराड्यातले अन्न वाया कसे जात नाही हे त्यांनी मला सांगितले. ज्यांच्या चोची कापलेल्या नसतात ते कोंबडे खाताना पखारडा कसा करतात आणि चोची चमच्या सारख्या केल्यामुळे कोंबड्यांना पखारडा कसा करता येत नाही याचे प्रात्यक्षिक शाबाज यांनी मला दिले. या सगळ्या उद्योगामुळे पोल्ट्री फीड कसे वाचते. हे त्यांनी मला समजावून सांगितले.
त्यांनी प्रत्येक कोंबडा हातात घेऊन मला त्याच्या बरगड्यांना हात लावायला लावला. जवान कोंबड्याची पोटापासली बरगडीची हाडे मऊ कशी लागतात आणि जून कोंबड्याची हीच हाडे कडक कशी लागतात, हे सगळे त्यांनी मला प्रात्यक्षिक देऊन शिकवले.
सगळी ट्रेड सीक्रेट्स बाहेर पडायला लागली म्हणून तो टोपलीवाला अस्वस्थ झाला. ते बघून शाबाज त्याला म्हणाले - सायेब पोलीस आहेत हे. कपडे बदलून गुप्त हेर बनून आल्येत कोन कोन पब्लिकला गंडिवतंय ते बगायला.
तो शेतकरी कसानुसा झाला. आम्ही तिथून उठलो, तेव्हा त्याच्या जिवात जीव आला.
शेजारी एक म्हातारी दोन कोंबडे घेऊन बसली होती. तिचे कोंबडे जेन्युईनली गावठी कसे आहेत, हे त्यांनी मला दाखवले. म्हातारी खुश झाली. म्हणाली, जातोयस काय घीऊन?
शाबाज म्हणाले, बीबी आजारी हाय. नंतर घीऊन जातो बरी जाली की.
आम्ही रिक्षात बसलो. शाबाज त्या शेतकऱ्याला हसत होते. पुढे त्यांनी मला मटणाबद्दल ज्ञान दिले. नर बोकड कापण्याऐवजी माद्या कशा कापल्या जातात. आधी कापलेल्या बोकडाचे वृषण त्या माद्यांच्या चरबीमध्ये कसे अडकवले जातात आणि नरच कापला गेला आहे, असा भास कसा तयार केला जातो. त्यामुळे मटण घेण्याआधी त्याचे वृषण ओढून बघणे कसे आवश्यक असते, असे सगळे त्यांनी मला मन लावून सांगितले.
मटण मार्केटमधील सगळे ‘फशीव-गंडीव’ त्यांनी मला सांगितले. फशीव-गंडीव म्हंजे फसवणूक करण्याच्या इराद्याने केलेली अॅक्टिव्हिटी! श्वासांचा ऑप्टिमम वापर कसा करावा हे पुणेरी मराठीने कोल्हापुरी मराठीकडून एकदा शिकून घ्यायला हवे. प्रत्येक वेळी संपूर्ण वाक्य बोलण्याचा शिष्टपणा करण्याचे काही कारण नाही! असो.
शाबाज यांनी दिलेले ज्ञान ग्रहण करून मला फार डिप्रेशन आले. ज्ञानाचा एवढा मोठा विषय या जगात अस्तित्वात आहे, हेच मला माहीत नव्हते. एवढा महत्त्वाचा विषय या जगात अस्तित्वात असावा आणि मला त्याबाबत एक अक्षरही माहीत नसावे ना!
पुढे चौकात गेल्यावर माळकर यांची जिलेबी ‘एक नंबर’ कशी असते, यावर त्यांचे प्रवचन झाले. पुढे राजाभाऊ भेळ आली, तेव्हा राजाभाऊंचे चिरंजीव बापू ‘सोत्ता’ फरसाण कसे ‘बनिवत्यात’ हेसुद्धा शाबाज यांनी मला सांगितले.
मी म्हटले, मला नंबर देऊन ठेवा तुमचा, पुढे कधी कोल्हापूराला आलो तर भेटेन येऊन तुम्हाला.
ते म्हणाले, मी मिरजकर तिकटीवर उभा असतो सकाळी, कदीपन येवून भेटा. बीबी बीमार हैं, नाहीतर आजच कोंबडं करून घातलं असतं तुमाला.
मी विचारले, फोन नंबर का नाही देत आहात?
ते म्हणाले, मुसलमानोंका वक्त बुरा चल रहा हैं आजकल. किसी अनजान आदमी को फोन नंबर देने में डर लगता हैं.
मिरजकर तिकटी लागल्यावर आपण नक्की कुठे उभे असतो, हे त्यांनी मला दाखवले.
पुढच्या वेळी मी तिथे जाऊन त्यांला भेटायचे आणि मग आम्ही जाऊन ‘कोंबडं घ्यायचं’ असं आमचं ठरलं आहे. तोपर्यंत त्यांच्या पत्नी बऱ्या झाल्या असतीलच असा विश्वास त्यांना आहे.
मी आहार हॉटेलसमोर रिक्षातून उतरलो. शाबाज यांना म्हटले चहा घेऊ. त्यांनी नम्र नकार दिला. म्हणाले - अगले टाईम!
मी आत गेलो आणि डिप्रेशन उतरवण्यासाठी ‘आहार’मधला घट्ट् दुधाचा चहा मागवला. पिता पिता मनात विचार आला - पुण्यात कोल्हापूरसारखे दिलदार रिक्षावाले भेटत नाहीत हे समजण्यासारखे आहे, पण ‘आहार’सारखा घट्ट् दुधाचा चहा मिळायला काय हरकत आहे?
रिक्षावाल्यांशी गप्पा झाल्याशिवाय कोल्हापूर ट्रिप पूर्ण झाली, असं मला वाटतच नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
४.
कोल्हापुरी हवेतला दिलदारपणा, जीवन जगण्यातला एक अस्सल कोल्हापुरी कॉमन सेन्स आणि आदरातिथ्य करण्यातली कोल्हापुरी उमेद; कोल्हापुरी मध्यमवर्गातून आता हळूहळू कमी होत चालली आहे. कोल्हापुरी रिक्षावाल्यांमध्ये मात्र ही सर्व तत्त्वे अजून साकल्याने जिवंत आहेत. विचार करता करता मी चहा पीत राहिलो. तेवढ्यात आमचे शाहजी सावंत आले. गालातल्या गालात हसत म्हणतात - यवढा कसला विचार करायला लागलाइसा?
मी म्हणालो, कोल्हापुरी रिक्शावाल्यांचा!
आमी याच बाकड्यांवर बसून पोरींचे विचार करत हुतो चहा पिता पिता! पंचेचाळीस वर्षं झाली म्हना त्याला आता! अजून बाकडी बी तीचेत, मालक बी तेचेत, त्यो चहाचा बंब बी त्योचे आणि चहाची चव बी तीचे.
‘आहार’चे मालक यावर हसले.
शहाजी म्हणाले - जोशीसाहेब, पोरी गेल्या तुमच्या विचारातून आणि रिक्षावालं आलं त्यांच्याजागी! काय म्हणावं या तुमच्या आयुष्याला!
यावरही ‘आहार’चे मालक हसले.
शाजी पुढे म्हणाले - आमी ज्या पोरींचे विचार करत हुतो त्या पोरींच्या आज्या झाल्यात आता पन आमची मनं काई आज्जोबाच्या लेव्हलला जायला तयार न्हाईत!
‘आहार’चे मालक पुन्हा हसले.
मी माझ्याच विचारांमध्ये अडकून पडलेलो होतो. मी म्हणालो, कोल्हापुरतले रिक्षावाले, हे ‘आहार’ हॉटेल, त्यातला तो चहाचा बंब आणि त्या बंबातल्या चहाची ती चव; असं सगळं टिकून राहिलं पाहिजे कायम.
त्यावर कोल्हापुरी कॉमनसेन्स वापरत शहाजी म्हणाले - या जगातलं सगळं बोंबलत जातय बगा. काईबी उरणार नाई यातलं. फक्त कोल्हापूरची माती तेवडी उरंल. शाजींनी एक पॉज घेतला आणि विचार करता करता एकदम म्हणाले, तुमाला सांगतो जोशीसाहेब, ही मात्तीच यवढी भारीए किनई, ती जन्माला घालनारच नवीन कायतरी! आनि तुमाला सांगतो, आपल्या जमान्यातल्या पोरीं यवडंच स्पेशल असनार ते! या आहार हॉटेलाच्या स्पेशल चहा यवडंच अफलातून असणार बगा त्ये! शंबर टक्के! मी सांगतो तुमाला!
या जगाच्या चलनामागची स्थिर तत्त्वे त्यांच्या नकळत का होईना अस्सल कोल्हापूरकरांना माहीत असतात. कोल्हापूरकरांच्या जिंदादिलीमागचं सनातन कारण हेच आहे, याविषयी शंका नाही!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment