धावून आयुष्य आरोग्यदायी आणि संपन्न करता येतं, हे सांगणारी दोन उपयुक्त व प्रेरणादायी पुस्तकं…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
अरविंद जाधव
  • ‘डेअर टू रन’ आणि ‘म-मॅरेथॉनचा’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Wed , 08 June 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो डेअर टू रन Dare to run अमित शेठ Amit Sheth म-मॅरेथॉनचा M Marathoncha संदीप काटे Sandip Kate

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात आपण अधिकाधिक भौतिक सोयी-सुविधांमध्ये अडकत आहोत आणि शारीरिक, मानसिक व आत्मिकदृष्ट्या समृद्ध आयुष्यापासून दूर जात आहोत. अशा काळात नैसर्गिक, स्वाभाविक आणि संपन्न आयुष्याच्या मार्गावर येण्यासाठी अमित शेठ यांचं ‘डेअर टू रन’ हे इंग्रजी आणि डॉ. संदीप काटे यांचं ‘म-मॅरेथॉनचा’ हे मराठी, ही दोन पुस्तकं नक्कीच प्रेरणादायी ठरतील. ही दोन्ही पुस्तकं ‘धावणे’ या विषयावर आहेत. ही पुस्तकं एक प्रकारे संपन्न आयुष्य जगण्यासाठीचं तत्त्वज्ञान आहे.

‘डेअर टू रन’

अमित शेठ आणि त्यांची पत्नी नीपा शेठ यांनी वयाच्या तिशीत धावायला सुरुवात केली. अमित हे गुजराती सुखवस्तू कुटुंबातील एक उच्चशिक्षित आणि यशस्वी उद्योजक. त्यांनी ३८ वयापर्यंत कोणत्याही प्रकारचा व्यायामप्रकार केला नाही. २००५च्या ‘मुंबई मॅरेथॉन’चे टीव्हीवरील प्रक्षेपण पाहून त्यांनी ‘मी २००६मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये (म्हणजे ४२.२ किमी इतके अंतर) धावणार’ असं जाहीर केलं. पत्नीसहित घरच्या इतर मंडळींनी त्यांना अगदी थंड प्रतिसाद दिला. सप्टेंबर २००५मध्ये ट्रेनिंगचा भाग म्हणून त्यांनी जेव्हा जुहू बीचवर प्रत्यक्ष पळायला सुरुवात केली, तेव्हा ते पहिल्या दिवशी २०० मीटर इतकंच अंतर धावू शकले, तेही जीवाचा खूप आटापिटा करून. आता ‘हार्ट अॅटॅक येतो की काय’ अशी शंका त्यांना आली. मात्र त्यांचा निश्चय दृढ होता. त्यांनी हळूहळू तयारी सुरू ठेवली. आणि शेवटी २००६ची ‘मुंबई मॅरेथॉन’ अगदी शर्तीनं ६ तास २९ मिनिटांत पूर्ण केली. त्यामुळे त्यांना आपण साडेसहा तासांपर्यंत धावू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. एखादी गोष्ट मनापासून ठरवली आणि त्या दृष्टीनं योग्य प्रयत्न केले, तर यश मिळतं, याची जाणीवही झाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................

त्यानंतर त्यांनी अमेरिका, फ्रान्स, आयर्लंड, इटली, स्पेन, जर्मनी अशा विविध देशांत आणि भारतातील मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, अरोव्हिल अशा अनेक मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्या. आफ्रिकेमधील ८९ किमीची अत्यंत कठीण समजली जाणारी ‘कॉमरेडस्’ ही अल्ट्रा मॅरेथॉन पाच वेळा पूर्ण केली. बहुतेक मॅरेथॉन त्यांनी पत्नी नीपा शेठ यांच्यासोबत पूर्ण केल्या. अगदी कॉमरेडस् मॅरेथॉन २००९सुद्धा! ही मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले भारतीय होते.

अमित शेठ यांनी त्यांचा हा धावण्याचा संपूर्ण प्रवास ‘डेअर टू रन’ या २०१०मध्ये सविस्तर मांडला आहे. त्याशिवाय यामध्ये मानवाचं अस्तित्व, स्वत:चा शोध, आत्मिक उन्नती, मनाची शांती, एकांत, जीवनाचं तत्त्वज्ञान, मानवी मूल्यं, कला, सौंदर्य इत्यादी विषयांबरोबरच समृद्ध जीवन आणि जीवन-मृत्युविषयीचं चिंतनही वाचायला मिळतं.

याचबरोबर त्यांच्या सभोवतालचं वातावरण, निसर्ग, प्राणी व मानवी सहसंबंधाबाबतचे उल्लेखही आहेत. यात ते कधी जमीन, वारा, डोंगर, आकाश, समुद्र याविषयीचं चिंतन मांडतात, तर कधी दिवस-रात्र, चंद्र-सूर्य व निसर्गात असलेली आणि सतत बदलत जाणारी अप्रतिम रंगसंगती यांचंही सौंदर्य उलगडून दाखवतात.

अमित शेठ यांनी त्यांनी विविध तत्त्वज्ञ, कवी, कलाकार, द्रष्टे महापुरुष, संत यांचे विचार, वचनं व काव्यपंक्ती उदधृत केल्या आहेत. तसंच दैनंदिन जीवनातील साधे लोक, साध्या गोष्टी, दैनंदिन घटना व अचानक सुचणाऱ्या भन्नाट कल्पना, यातून समजलेल्या तत्त्वज्ञानाविषयीही लिहिलं आहे. ते वर्ण, भाषा, धर्म, प्रांत किंवा इतर कोणत्याही निकषांपेक्षा वैश्विक संस्कृतीला कवेत घेताना दिसतात.

हे पुस्तक वाचताना आपणाला प्रसिद्ध लेखक पाउलो कोएलोच्या ‘अल्केमिस्ट’ व रॉबिन शर्माच्या ‘द माँक हू सोल्ड हीज फेरारी’ या दोन पुस्तकांची आठवण येते. यातील पहिल्या पुस्तकातील स्वप्नाच्या मागे धावणारा प्रवास, तर दुसऱ्यातील आत्मशोध अमित शेठ यांच्या ‘डेअर टू रन’मध्ये जाणवतो.

या पुस्तकामुळे आपला धावण्याकडे व पर्यायाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो!

‘डेअर टू रन’ – अमित शेठ

संजय अँड कंपनी, मुंबई

पाने– २४०

मूल्य – ३९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘म-‘मॅरेथॉनचा

सध्या ‘मॅरेथॉन’ हा शब्द बऱ्यापैकी कानावर पडतो. पण याबाबत अनेक समज-गैरसमजही प्रचलित आहेत. धावणे हा कमीत कमी साधनांमध्ये अगदी सहज करता येईल, असा व्यायामप्रकार. अगदी अनवाणीही धावता येतं. विस्मृतीत निघालेल्या धावण्याचं पुन्हा स्मरण करून आपल्या आरोग्यदायी आणि संपन्न जीवनाचा भाग बनवण्याच्या हेतूनं मॅरेथॉनचा जगभर प्रसार होतो आहे. मॅरेथॉन म्हणजे ४२.१९५ किलोमीटर इतकं अंतर ठराविक वेळेत धावून पूर्ण करणं.

‘म-‘मॅरेथॉन’चा’ हे सातारा येथील डॉ. संदीप काटे यांचं पुस्तक या विषयावरील मराठीतलं बहुधा पहिलंच पुस्तक असावं. वैद्यकीय पेशातील या अवलियानं वयाच्या ३७व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. त्यानंतर २०१२ ते २०२० या काळात देश-विदेशातील अनेक मॅरेथॉन पूर्ण केल्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत कठीण अशी ८९ किमी ‘कॉम्रेडस’ ही अल्ट्रा-मॅरेथॉन तीनदा पूर्ण केली.

दरम्यानच्या काळात त्यांनी आपली पत्नी डॉ. सुचित्रा काटे यांनाही धावण्याचं वेड लावलं. त्यांनीही काही मॅरेथॉनबरोबरच ऑक्टोबर २०१९मध्ये गोव्यातील ट्रायथॅलॉन अर्थातच अर्ध-आर्यनमॅन (९० किमी सायकलिंग, १.९ किमी पोहणे व २१.१ किमी धावणे) ही स्पर्धा पूर्ण केली.

याच दरम्यान डॉ. काटे दाम्प्त्यानं आपापल्या मित्रमैत्रिणींनाही हे व्यसन लावलं. त्यांच्या माध्यमातून सातारकरांमध्ये हे सकारात्मक व्यसन हळूहळू वाढत आहे. या धावण्याच्या सार्वजनिक चळवळीची मुहूर्तमेढ डॉ. काटे यांनी ‘सातारा हिल्स हाफ मॅरेथॉन’च्या रूपानं २०१२मध्ये रोवली. शिस्तबद्ध व नेटकं नियोजन, सुंदर वातावरण, सातारा-कास असा यवतेश्वर घाटातून जाणारा अवघड मार्ग आणि पावसाची हजेरी, या गोष्टींनी अगदी पहिल्याच स्पर्धेपासून ‘सातारा हिल्स हाफ मॅरेथॉन’ अतिशय लोकप्रिय अर्धमॅरेथॉन म्हणून नावलौकिकास आली. ‘रनर्स वल्ड’ या जगप्रसिद्ध मासिकानं ‘सातारा हिल्स हाफ मॅरेथॉन’ला आपल्या मुखपृष्ठावर प्रसिद्धी देऊन सन्मान केला. पुढे त्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ड रिकॉर्डस्’मध्येही नोंद झाली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

पण ही स्वप्नवत गोष्ट घडली कशी, याचा प्रवास ‘म-‘मॅरेथॉन’चा’ या पुस्तकातून जाणून घेता येतो. डिसेंबर २०२०मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात संदीप काटे यांना डॉक्टर, धावपटू, व्यवस्थापक आणि माणूस म्हणून आलेले व्यक्तिगत व सार्वजनिक अनुभव आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध धावपटूंचेही दाखले दिले आहेत. 

या पुस्तकाला सनदी अधिकारी व धावपटू डॉ. नामदेव भोसले यांची प्रस्तावना लाभली आहे. एकुण ८९ प्रकरणांद्वारे मॅरेथॉनबाबतच्या विविध संकल्पना, समज-गैरसमज, पूर्वतयारी, प्रत्यक्ष धावताना व धावल्यानंतर घ्यावयाची काळजी, आहार, झोप, अत्यावश्यक साधनं इत्यादी सखोल व स्वानुभवावर आधारित माहितीही दिली आहे. ती नव्या-जुन्या मॅरेथॉनपटूंसाठी उपयुक्त आहे. याशिवाय जिज्ञासूंसाठी काही क्यू-आर कोडेड लिंक्सही दिल्या आहेत. त्याचबरोबर नवीन मॅरेथॉन आयोजनासाठी काय करावं व काय करू नये, याचीही माहिती आहे.

काही ठिकाणी अनुषंगिक पुनरावृत्ती आढळते. पण हे पुस्तक ‘डेअर टू रन’सारखंच उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे.

कोणत्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून व कुटुंबापासून करावी, हा संदेश या दोन्ही पुस्तकांतून मिळतो.

-मॅरेथॉनचा डॉ. संदीप काटे

दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव

पाने- ३८१

मूल्य ३२५ रुपये.

.................................................................................................................................................................

डॉ. अरविंद जाधव

arvind.linguistics@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......