अजूनकाही
“सर्वजण समान आहेत, पण काही जण इतरांपेक्षा जास्त समान आहेत.”
“स्वातंत्र्याचा काही अर्थ असलाच, तर तो म्हणजे, लोकांना जे ऐकायची इच्छा नाही, ते त्यांना सांगण्याचा अधिकार.’’
ही थेट, परखड वक्तव्यं आहेत जॉर्ज ऑर्वेलची. या जगप्रसिद्ध पत्रकार, राजकीय भाष्यकाराने लिहिलेल्या ‘1984’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या राजकीय कादंबऱ्या विशेष गाजल्या, मैलाचा दगड ठरल्या. त्यांत ऑर्वेलने राजकीय संदर्भात वापरलेल्या काही संज्ञा आज राजकीय समीक्षा करताना सर्रास वापरल्या जातात, उदा. ‘न्यूस्पीक’ आणि ‘बिग ब्रदर’. ऑर्वेलने भिन्न भिन्न लोकमतांना नियंत्रित करून आपल्या सोयीचा विचार सातत्यानं त्यांना ऐकवण्याच्या ब्रेनवॉश प्रचारतंत्राला ‘न्यूस्पीक’ म्हटलं. ही संज्ञा ऑर्वेलने आपल्या १९४९ साली प्रकाशित केलेल्या ‘1984’ या कादंबरीत, तर राजकीय स्वार्थासाठी लोकांवर, जनतेवर पाळत ठेवून त्यांच्या हालचालींवर बंधनं आणणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांसाठी ‘बिग ब्रदर’ हा शब्द ऑर्वेलने योजला. पुढे तो त्याच अर्थानं उपहासात्मक टीकेसाठी रूढ झाला.
ऑर्वेलच्या पत्रकारितेचा कालखंड बऱ्याच राजकीय विरोधाभासांनी भरलेला होता. १९३०च्या सुमारास स्पेनमध्ये डावे आणि उजव्या पक्षांमध्ये यादवी पेटलेली होती. या युद्धात ऑर्वेल साम्यवाद्यांकडून लढला. कामगारवर्गाच्या शोषणाची, उद्ध्वस्त जीवनांची चित्रं त्याच्या डोळ्यांपुढे होतीच. या युद्धात फॅसिस्ट फ्रँकोचा जय झाला. जगात इतरत्र ब्रिटिश साम्राज्यवादी जुलूमही त्याने जवळून पाहिले होते. शोषितांप्रती सहानुभूती असलेला ऑर्वेल या काळात आपलं पहिलं राजकीय भाष्य करणारं पुस्तक प्रकाशित करतो आणि त्यात समाजवादी राजकारणाची वेगळ्या पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे विचार तेव्हा रूढ असलेल्या मार्क्सवादी विचारांपेक्षा वेगळे आहेत. कामगारांना प्रत्यक्ष निर्णयक्षमता देण्याचा तो पुरस्कार करताना दिसतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
साम्यवादी व्यवस्था असलेल्या राष्ट्रांमध्ये समाजवादाचं रूपांतर एकाधिकारशाहीमध्ये होताना बघितल्यावर साम्यवादाचा पुरस्कार करण्याऱ्या ऑर्वेलचा भ्रमनिरास होतो. याच काळात लिहिलेल्या ‘अॅनिमल फार्म’ कादंबरीतून तो स्टॅलिनच्या साम्यवादावर कडाडून टीका करतो.
दरम्यान दुसरं महायुद्ध पेटलं होतं. युद्धानंतरच्या जगाची राजकीय व्यवस्था कुठे झुकलेली असेल, याची चिकित्सक मीमांसा ऑर्वेल मुद्देसूदपणे करतो. ‘1984’ या कादंबरीत मुक्त भांडवलशाही व लोकशाहीला निर्माण होणाऱ्या धोक्यांची चर्चा आहे. खाजगी मालकी बाळगणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या बलशाली झालेल्या मूठभरांच्या हाती समाजव्यवस्थेचं नियंत्रण जाऊ शकते, हा भांडवलशाही व लोकशाहीला असलेला मोठा धोका ऑर्वेल अधोरेखित करतो.
भांडवलशाही, लोकशाही, साम्यवाद, फॅसिझम तसंच व्यवस्थापकीय व्यवस्था (जेम्स बर्नहॅमने मांडलेली व्यवस्थापकीय क्रांतीची व्यवस्था) इत्यादींबाबतची तार्किक चर्चा ऑर्वेलने त्याच्या लेखनामधून, कादंबऱ्यांतून केली आहे. व्यक्तिश: तो या सर्वांना पर्याय म्हणून ‘लोकशाही समाजवादा’चं समर्थन देतो. त्यातलं वेगळेपण नेमकेपणानं मांडतो. राजकीय लोकशाहीप्रणाली, सामाजिक समता आणि विश्वबंधुत्वावर आधारलेलं आंतरराष्ट्रीय राजकारण, या मूल्यांवर उभी असलेली ‘लोकशाही समाजवादा’ची व्यवस्था खरं तर आदर्शच म्हणायला हवी.
भारतानेही स्वातंत्र्यानंतर या मूल्यव्यवस्थेची पाठराखण केली आणि नव्या भारताची उभारणी केली. अपेक्षा खूप होत्या, पण आज इतर व्यवस्थांप्रमाणे ही व्यवस्था ही ‘युटोपीया’ ठरली की काय, असं वाटू लागतं. लोकशाही समाजवाद सोडून आपण भांडवलशाही किंवा फॅसिझमकडे वाटचाल करू लागलोय का, असं वाटण्याइतपत आपलं समाजकारण बदललं आहे. महात्मा गांधींना अपेक्षित असणारा ‘विकेंद्रित समाजवाद’ प्रत्यक्षात न उतरू शकल्यानं सामाजिक, आर्थिक विषमता वाढत चालली आहे. लोकशाही समाजवादाला असं अपयश येण्यामागे धोरणात्मक कारणं काय असावीत, असा प्रश्न पडतो.
इथं ऑर्वेल आपल्या विचारांना दिशा देण्याचं काम करतो. त्याच्या मते, विधिनिषेध न बाळगता केलेल्या राजकारणामुळे ज्यांच्या गुणांना वाव नाही, अशी असमाधानी जनता राजकारणाबाबत उदासीन बनते. समाजाची ‘शासक’ आणि ‘रयत’ अशी सरळसरळ विभागणी होते. मूठभर शासक आणि स्वत:चं डोकं वापरण्यास उत्सूक नसलेली ‘रयत’ हे लोकशाहीपुढचं मोठं आव्हान आहे.
हे असे अनेक प्रश्न, तर्कवितर्क ऑर्वेलच्या लिखाणातून अनुभवायला मिळतात. ऑर्वेलच्या काही निवडक लेखांचा स्वैर अनुवाद आणि त्यावरील भाष्य मनोज पाथकरांच्या ‘जॉर्ज ऑर्वेल - निवडक निंबध आणि लेख’ या पुस्तकात पाहायला मिळतं.
अर्थात केवळ ऑर्वेल वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. तोही कुठलंही रेडिमेड तत्त्वज्ञान वाचकांसमोर मांडत नाही. मात्र प्रत्येक प्रश्नावर तर्काच्या आधारे उलटसूलट विचार कसा करायचा, हे मात्र नक्की सांगतो. हे असे प्रश्न पडणं आणि उलटसूलट विचार करायला लावणं, हे ऑर्वेलचं यश आहे. त्याविषयी मनोज पाथरकर म्हणतात, ‘‘हे उलटसूलट विचारच आपल्याला ‘न्यूस्पीक’ आणि ‘बिग ब्रदर’पासून वाचणार आहेत. या प्रचारकी युगात आपली विचारशक्ती जागृत ठेवून ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी मेंढरं होण्यापासून आपल्याला वाचणार आहेत.”
या पुस्तकात ऑर्वेलच्या ‘भडक रंग राष्ट्रवादाचे’ या लेखातले ‘राष्ट्रवाद’ आणि ‘देशभक्ती’वरील विचार मार्मिक आहेत. आपल्या विद्यमान सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर हे विचार अंतर्मुख करतात. तो लिहितो, ‘‘राष्ट्रवादाचे पहिले गृहितक असते, माणसांचे किटकांप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते आणि लाखो करोडो व्यक्तींना एकगठ्ठा चांगले अथवा वाईट अशी लेबले लावली जाऊ शकतात. याउलट, जगात सर्वश्रेष्ठ वाटत असल्या तरी आपल्या प्रादेशिक जीवनपद्धती दुसऱ्यांवर लादण्यात देशभक्ताला अजिबात रस नसतो.’’
या पुस्तकात लेखांचा मोठा भाग राजकीय लेखांचा असला तरी इतर विषयांवरील लेखांचाही यात आहे. कला, विज्ञान आणि साहित्य या विषयावरील ऑर्वेलचे लेख त्याचं वेगळेपण यथार्थपणे पटवून देण्याचं काम करतात.
ऑर्वेल ‘मी का लिहितो’ या लेखाच्या प्रारंभीच्या लिखाणामागचे चार हेतू (चरितार्थाचा वगळून) मांडतो. लेखकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारे हे विचार आहेत. साहित्यिकानं राजकीय भूमिका घ्यावी की नाही? कलेचं खरं सामर्थ्य कशात आहे? कोणत्याही भाषेची अधोगती होण्यास त्या भाषेचा साहित्याला चुकीचा वापर कसा कारणीभूत आहे? असे बरेच प्रश्न ऑर्वेल वाचकांसमोर मांडतो, त्यांवर चर्चा करतो.
‘लेखक आणि साहित्य’ या विभागात काही निवडक लेखकांच्या साहित्याची, भूमिकांची समीक्षा आहे. या लेखांची शीर्षकंही सूचक आणि रंजक आहेत. उदा. ‘वूडहाऊस जेव्हा गिनिपिग होतो’, ‘भारतीय हातातील इंग्रजी तलवार’ इ.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
शेवटच्या दोन ललित लेखांचे मराठी अनुवाद वाचनीय झाले आहेत. ‘पुस्तक पहावे विकून’ या लेखात ऑर्वेल जेव्हा स्वत: पुस्तकांच्या दुकानात विक्रेता म्हणून काम करत होता, तेव्हाचे अनुभव आहेत. दुकानात पुस्तक खरेदी करण्याच्या आविर्भावात येणाऱ्या ग्राहकांची वर्णन खुसखुशीत झाली आहेत. तर ‘सुखाचे हरवलेले बेट’ या लेखात चंगळवादानं झालेली पर्यावरणाची हानी ऑर्वेल चक्क काव्यात्मक शैलीत लिहितो.
ऑर्वेलची भाषा, मांडणी मुळात क्लिष्ट, त्यात त्याच्या भूमिका विरोधाभासांनी भरलेल्या, असं असूनही पाथरकरांनी लेख समजायला सोपे जावेत, असा अनुवाद व मांडणी केली आहे. प्रत्येक लेखापूर्वी विषयाचा परिचय, पार्श्वभूमी आणि लेखाच्या शेवटी ‘समारोपा’मध्ये ऑर्वेलची मते सोदाहरण स्पष्ट करून दिल्याने खूप मदत होते.
एकूणच हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवण्यासारखं नाही. यातील प्रत्येक लेखांवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल, इतकी खोली, उलटसूलट विचार, तर्क यात आहेत. ‘ऑर्वेलियन’ मत आपल्या भोवतालच्या परिस्थितीला, राजकीय घडामोडींना चिकटलेली जाणवतात; विचार करायला भाग पाडतात.
जॉर्ज ऑर्वेल : निवडक निबंध आणि लेख
अनुवाद आणि भाष्य - मनोज पाथरकर
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य - २९९ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment