अजूनकाही
इलाकाई देहाती बँके(Ellaqui Dehati Bank-EDB)च्या विजयकुमार नामक त्या व्यवस्थापकाभोवती रा.स्व.संघाच्या चार शूर व धाडसी स्वयंसेवकांनी कडे केलेले असते तर? रजनीबाला नामक ती शिक्षिका जर संघ स्वयंसेवकांच्या गराड्यात तिच्या शाळेत निघाली असती तर? बडगामच्या मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयात काम करणारा राहुल भट संघ स्वयंसेवकांच्या वेढ्यात बसला असता तर?
तर काय हिंमत झाली असती त्या भेकड अन एकेकट्याला नथुरामी वृत्तीने गोळ्या झाडून ठार करणाऱ्या काश्मिरी दहशतवाद्यांची? अत्यंत शौर्यवान, तेजस्वी आणि राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेल्या त्या संघ स्वयंसेवकांचे नुसते दर्शन जरी झाले असते, तरी त्या दहशतवाद्यांनी हातात पुन्हा बंदुका धरण्याचा विचारच केला नसता.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
इतकेच नव्हे, आता जम्मू-काश्मीर भागात सारी सुरक्षा व्यवस्था अशा धाडसी व जाँबाज स्वयंसेवकांच्या हाती गेल्याचे दहशतवाद्यांनी जरा गांभीर्याने जाणले असते, तर आपला हा दहशतवाद किती कचकड्याचा आहे, त्याची जाणीव होऊन कित्येकांनी आत्महत्या केल्या असत्या. एवढे साहसी, त्यागी, समर्पणाला तयार संघ स्वयंसेवक बघून त्यांना आपले काम किती फालतू आहे, याची उमज पडून ते चक्क मेंढपाळ अथवा गुराखी होऊन काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांत तोंड लपवत फिरले असते!
मंडळी, ही कल्पना नव्हे की, मनोरंजन... अशी इच्छा मनी रुंजी घालू लागली, त्याचे कारण खुद्द संघच आहे. म्हणजे अगदी तारीखवार सांगायचे झाल्यास १२ फेब्रुवारी २०१८ रोजी मुजफ्फरपूर मुक्कामी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एक घोषणा करून बसले होते. ते म्हणाले होते की, “रा.स्व.संघ अवघ्या तीन दिवसांत एक सैन्य तयार करून सीमेवर लढायला जाऊ शकतो, एवढ्या तयारीचा आहे. फक्त तशी परिस्थिती उगवली पाहिजे आणि राज्यघटनेने परवानगी दिली पाहिजे. मग देशासाठी आम्ही कुणाशीही लढाई करू. लष्कराला जे काम करायला सहा-सात महिने लागतात, ते संघ तीन दिवसांत करील!”
आता एवढी मोठी बढाई काँग्रेसवाल्यांना कशी रुचणार? त्याने भागवत देशाचा आणि सैन्याचा अपमान करत आहेत, असे पटापट ट्विट करत जगाला सांगितले. मग मनमोहन वैद्य, राकेश सिन्हा यांना खुलासे करत बसावे लागले. प्रकरण मिटले.
पण संघद्वेष्टे त्यांचा कुजकटपणा करायचे थोडेच थांबवतील? त्यांनी आता थेट प्रत्येक संघ स्वयंसेवकाच्या राष्ट्रनिष्ठेला आव्हान देण्याचे ठरवले आहे. आम्हाला असे समजले की, काश्मीरमध्ये परिस्थिती निवळल्याची थाप मारून कामासाठी आणलेल्या हिंदूंच्या रक्षणार्थ थेट संघालाच विनंती केली जाणार आहे. कारण संघासारखी राष्ट्रवादी संघटना दुसरी कुणी नाही! बळ आणि आक्रमकता यावर तिचा विश्वास असतो. त्यातच लाठी, वेत्रचर्म, कुस्ती, कराटे, दांडपट्टा यांचा प्रशिक्षणवर्ग प्रत्येक स्वयंसेवकाने केलेला असतो. शत्रू म्हणजे मुसलमान कुठूनही येवो, त्याच्याशी चार हात करण्याची तयारी प्रत्येक स्वयंसेवकाची झालेली असते.
मध्यंतरी नागपुरात विजयादशमीच्या शस्त्रपूजनात बंदुका, स्वयंचलित एके ४७ आदी अत्याधुनिक शस्त्रेही दिसली होती. त्यामुळे प्रत्येक हिंदूच्या मनात स्वयंसेवकांविषयी सच्चा राष्ट्ररक्षक हाच, असा विश्वास तयार झाला. त्यातूनच काश्मीरसारखा प्रदेश संघाहाती सुरक्षेसाठी सोपवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. रोज सकाळ-संध्याकाळ भरणाऱ्या शाखा काय केवळ कसरत अन् क्रीडा यांसाठीच असतात काय? ‘ओटिसी’ म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्पांमध्ये फक्त बौद्धिके आणि जेवणे चालतात की काय?
अशी संघाची बदनामी होऊ नये, अशी अनेकांची इच्छा आहे. म्हणून संघाच्या कोट्यवधी स्वयंसेवकांनी आपले भारतमातेविषयीचे सच्चे प्रेम प्रात्यक्षिकाद्वारे दाखवावे, असा त्या सूचनेमागचा प्रामाणिक भाव आहे. संघद्वेष्टे झाले म्हणून काय झाले? त्यांचेही त्यांच्या देशावर प्रेम आहे. त्यांनीही खूप खूप त्याग केलेला आहे. अडचण अशी की, ते फक्त भाषणे, चर्चा, टीका यांत अडकून गेले आहेत. म्हणून ते फार निष्क्रिय आहेत. घरबसल्या संघकार्यावर आणि संघविचारांवर टीकेच्या पिचकाऱ्या मारत राहतात. स्वयंसेवा असे काही करणे त्यांच्या मनातही कधी येत नाही. स्वयंसेवक म्हणजे आपले काम आपण करणारी, अशी एक अत्यंत चुकीची समजूत त्यांच्या मनात आहे. तो घरगुती स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक स्व-प्रेरणेने शाखेत जातो, स्वत:हून संघाचा गणवेश घालतो, आपणहून ध्वजप्रणाम, दक्ष-आरम् करतो. तो राष्ट्रीय असतो, हे या घरबश्या टीकाकारांना ठाऊक नाही. आपणहून म्हणजे कुणीही न सांगता जो रस्त्यावरची घाण दूर करतो किंवा रिक्षावाल्यांना मीटर कुठे आहे, असे विचारतो, तो खरा स्वयंसेवक, असा कमालीचा चुकीचा व धोकादायक अर्थ त्यांनी डोक्यात धरून ठेवलेला आहे.
तर अशा चुकलेल्या मार्गावर गेलेल्यांनाही संघाचा स्वयंसेवक काश्मीरमध्ये शिल्लक राहिलेल्या हिंदूंचे रक्षण करू शकतो, असा ‘सब का विश्वास’ वाटावा, यातच संघाचे थोरपण प्रकटते. अशाच एका विश्वासवाटू गृहस्थाला आम्ही जाऊन भेटलो. त्यांना थेट विचारले, ‘‘तुम्ही एक जाहीर संघद्वेष्टे. तरीसुद्धा तुमच्या मुखातून संघाच्या कर्तृत्वाबाबत एवढा भरोसा कसा काय प्रकटतो?’’
शाखेवर जाऊन देशप्रेमाने ओथंबून वाहणाऱ्या स्वयंसेवकी चेहऱ्याने अन स्वराने ते सांगू लागले, “हे पहा. काश्मीरमधील सैन्य, पोलीस, निमलष्करी दले यांची मर्यादा आता सिद्ध होऊ लागली आहे. आमचे राज्यपालसुद्धा दिङमूढ झाल्यासारखे वाटत आहेत. हे दहशतवादी लपतछपत येतात आणि बेसावध हिंदूंवर गोळ्या झाडून त्यांचा प्राण घेतात. किती ठिकाणी या सशस्त्र रक्षकांची निगराणी व टेहळणी ठेवणार? त्यांना कार्यालयात किंवा कुण्या इमारतीत रक्षणार्थ नेमणेही गैर. त्यापेक्षा संघाचे जे कोट्यवधी स्वयंसेवक आणि स्वयंघोषित राष्ट्रभक्त आहेत, त्यांना बोलावून जर त्यांची सुरक्षा भिंत प्रत्येकाभोवती उभी केली तर?”
“माफ करा. तुम्ही चेष्टा करताय का? एका गंभीर अन वेदनादायी घटनेची तुम्ही टिंगल करताय, असे वाटतेय. तुमचा नेहमीचा द्वेष तुम्ही अशा रीतीनं व्यक्त करताय की, तुमची लबाडी प्रकटतीय….”
संघद्वेष्टे म्हणाले, “नाही, नाही, तसे काही नाही. जे जे मारले जातात, त्याने आम्हाला दु:ख होते. मग कुणी झुंडीने मारलेला मुसलमान असो की, लखीमपूर खिरीत पुढाऱ्याच्या वाहनाने चिरडलेला शेतकरी. गांधीजींच्या खुनाने आम्ही अजूनही दु:खी होतो, तर दिनदयाळ उपाध्याय यांच्या गूढ मृत्युने साशंक. काश्मीरमधून आतापावतो मुस्लीम नागरिक दहशतवाद्यांची शिकार होत होते. सध्या हिंदू नागरिक बळी पडत आहेत. त्यांच्या बातम्या पहिल्या पानावर झळकत आहेत. त्या राज्यात हिंदू अल्पसंख्याक असल्याने आम्हाला त्यांच्या असहायतेची काळजी वाटते. जसे आम्ही सर्वत्र अल्पसंख्य असलेल्या मुसलमानांची काळजी वाहतो, तसेच आहे हे सारे.
“डॉ. भागवतच एकदा आपल्या ताकदीबाबत बोलले होते म्हणून वाटले की, एकेका हिंदू माणसाचा जीव वाचवता येऊ शकतो. चार-चार स्वयंसेवकांनी रात्रंदिवस जर प्रत्येक हिंदूच्या जिवाचे रक्षण केले, तर ती एक राष्ट्रसेवा तर होईलच. खेरीज काश्मीरच्या विकासात किती तरी भर पडेल. कारण रक्षकांमुळे काश्मीरची अर्थव्यवस्था उर्जितावस्थेत येईल. त्यांचे खाणेपिणे, गरजा भागवता भागवता काश्मिरी माणूस बरकतीत येईल आणि दहशतवादी नैराश्यात जातील.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
“अच्छा, म्हणजे कोणाच्याही जिवाच्या रक्षणात राजकारण तुम्ही करत नाही, असे तुमचे म्हणणे आहे तर…”
संघद्वेष्टे सांगू लागले – “हे पाहा, राजकारण काय असते ते आम्हाला ठाऊक आहे. ते आम्ही करत नाही, असे म्हणणारे तेच करत असतात. लोकांना ठार करून आपला विचार पुढे नेता येईल अथवा ठार मारायची भीती घालून आपली सत्ता रुजवता येईल, अशा हिटलरी विचाराची माणसे आम्ही नाही. आमचे ना सैनिकांसारखे सैन्य, ना स्वयंसेवक म्हणवून घेणारे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षित लोक आमच्याकडे. हातात लाकडी का होईना, एखादे शस्त्र घेऊन सेवेचे ढोंग करणारे लोक आम्ही नव्हे. सेवेसाठी कुणी गणवेश का घालतो? मातृभूमीची सेवा करण्याची घोषणा एकीकडे अन त्या मातृभूमीतच जन्मलेले मुसलमानादी नागरिक शत्रू म्हणून जाहीर करायचे दुसरीकडे, असा दुतोंडी व्यवहार आम्ही करत नाही.
“सारखी लढायची भाषा करणे म्हणजे राष्ट्रसेवा कशी काय होते? सतत बलिदान, हौतात्म्य, प्राणत्याग अशी भाषा जे करतात, त्यांना आम्ही काय सांगणार? आम्ही बापडे चाकोरीबंद जगू पाहणारे. भागवतांनी स्वत:हून आपल्या ताकदीचा उच्चार केल्याचे लक्षात होते, म्हणून वाटले की, संधी चालून आलेली आहे. सरहद्द ओलांडून येणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा.
“त्यांच्या हाताशी सत्ता, सरकार, नोकरशाही, यंत्रणा, फौजफाटा आहे, तर विचार आला मनात… बाकी काही नाही. नसेल जमणार तर राहिले. ‘तेव्हा तुम्ही कुठे होता?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना ‘आता तुम्ही कुठे आहात?’ असा प्रश्न विचारावासा वाटला, एवढेच.”
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment