भारतातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा अतिशय वेगाने नेस्तनाबूत करण्याचे कार्यक्रम २०१२-१३ पासून देशात सर्वत्र सुरू आहेत. १९९२मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त करून देशात हिंदू आणि मुस्लीम अशी उभी फूट पाडण्यात पक्षांना यश आले. पुढील तीस वर्षे मुस्लीम समाजाला सातत्याने हिंसेच्या दबावाखाली ठेवले गेले. यामध्ये २००२मध्ये घडवून आणला गेलेला गुजरातमधील मुस्लीम नरसंहार हा ठरला. या देशातील मुस्लीम या एका हिंसाचारामुळे कायमचे निर्णायक हिंदुत्ववादी दुय्यम नागरिक ठरवले गेले, परंतु तरीही देशात सर्वदूर लहान मोठी गावे आणि शहरात सामान्य हिंदू आणि सामान्य मुस्लीम सलोख्याने नांदत होते.
मुळात, गेली ३० वर्षे ही विद्वेषाची विषवल्ली उच्चवर्णीय हिंदुत्ववादी प्रवाहाने सर्व प्रसारमाध्यमे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सातत्याने रुजवली असली तरीही गावाखेड्यांतील धार्मिक सलोखा अजूनही चिवटपणे टिकून राहिला आहे. आजही सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर आपल्या आजूबाजूच्या समाजातील मुस्लीम माणसाविषयी द्वेषाची वा तिरस्काराची भावना नाही. हे वास्तव नक्कीच दिलासादायक आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या आश्चर्यकारक वाटणाऱ्या वास्तवाचे कार्यकारण समजून घ्यायला हवे या उद्देशाने आम्ही ‘सलोखा संपर्क गटा’च्या काही प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरुन शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
संत महंमदाची हाक
या आमच्या शोधाचे पहिले स्थान म्हणजे, नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे संत महंमद समाधी स्थळ! सूफी आणि भागवत परंपरा एकत्र, पद्धतीने महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून वाढल्या, रुजल्या. या परंपरांचे अग्रेसर प्रतिनिधी म्हणजे, श्रीगोंद्याचे संत शेख महंमद. त्यांनी इस्लामी सूफी दर्शनाची भारतीय दर्शनाशी सांगड घातली आहे, ती या प्रमाणे. आपल्या योग संग्राम या ग्रंथात १७/१८ अध्यायात ते म्हणतात -
“श्री गणेशाय नमः । जल्ले जलालहु अल्ला गनि प्यारा । जयजय जी जयवंत नरा । विश्वव्यापक निज परमेश्वरा । रहिमान साचा ।।....सच्चा पीर कहे मुसलमान । महाठे म्हणविती सद्गुरू पूर्ण । परि नाही दोन्हीत भिन्नत्वपण । आंखो खोल देख भाई।।”
संत शेख महंमदांच्या अशा प्रकारच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत. वारकरी संप्रदायात संत शेख महंमदांना मानाचे स्थान आहे.
सूफी इस्लामी परंपरा आणि भागवत परंपरा या का रुजल्या असाव्यात, याचा विचार केला पाहिजे. या दोन्ही परंपराना समाजातील आम अठरापगड जातीत स्थान होते आणि आहे. याचाच दुसरा अर्थ वैदिक, उच्चवर्णीय धार्मिक तत्त्वज्ञानाला छेद देणाऱ्या या स्वतंत्र बंडखोरीच्या परंपरा आहेत.
या वर्षी म्हणजे २०२२च्या संत शेख महंमद महाराज वार्षिक उत्सवात आम्ही सक्रिय सहभाग केला होता. या उत्सवाचे बारकाईने निरीक्षण केले तर हे स्वच्छ दिसते की, दोन दिवसांत उत्सवातील प्रमुख कार्यक्रमात एकही उच्चवर्णीय वैदिक/ ब्राह्मणी विधी नव्हता. (एकच गोष्ट खटकली. ती म्हणजे संत शेख महमद महाराज आणि त्यांच्या पत्नीची कबर एकत्र असताना त्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही, असं का?) उलट, सामान्य सर्व जाती धर्माच्या माणसांना वाव देणारा असा हा उत्सव होता. रात्रभर चालणारा छबिना, नाचत गात प्रसाद घेऊन जाणारे लोकांचे गट. ढोल ताशांची पथके, संत शेख महंमद महाराज समाधी स्थळाबाहेर भरलेला कुस्त्यांचा जंगी हंगामा यातून उत्साह ओसंडत होता.
ही काही निव्वळ परंपरा म्हणून टिकून राहिलेली नाही. किंवा निव्वळ धार्मिक/ अध्यात्मिक प्रथा नाही. हा एक सामाजिक आशय व्यक्त करणारा प्रवाह आहे. सामूहिक समाज जीवनातील सहिष्णुता अधोरेखित करणारा प्रवाह आहे.
नेमका हाच विचार श्रीगोंदा येथील प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांनी आम्हाला सांगितला. श्रीगोंद्यात त्यांची आम्ही आवर्जून भेट घेतली. बळेसर पत्रकार होते. तसेच नामांतराच्या लढ्यात सहभागी होते. बळेसरांनी पारधी समाजाचा सखोल अभ्यास केला आहे. या विषयावर त्यांनी पीएच.डी. संपादित केली आहे. श्रीगोंदा आणि परिसरातील अनेक सहिष्णता वाढवणाऱ्या प्रथा परंपरा आणि त्यांचा जातीय, धार्मिक इतिहास डॉ.बळे यांनी आम्हाला सांगितला.
श्रीगोंद्यात अशीच एक दुसरी महत्त्वाची भेट झाली, ती ज्येष्ठ पत्रकार अरिफ शेख यांची. श्रीगोंदामधील सहिष्णू, सलोख्याचे वातावरण, जातीय सलोखा याबाबत त्यांनी खूप उत्साहाने माहिती दिली.
दोन दिवस यात्रेच्या गर्दीत फिरताना, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विक्रेते भेटले. उस्मानाबाद, कोल्हापूर येथून आलेले यात्रेकरू भेटले. छबिना बघायला, सजवलेला दुडकत चालणारा घोडा बघायला आलेली मुलं आणि घोळक्याने जमलेल्या मुस्लिम स्त्रिया दिसल्या. या सर्वांमध्ये शनी शिंगणापूरमधून आलेले चाँद जुम्मा शेख आणि नवाज दगडू शेख आणि त्यांच्या हजरत निजामुद्दीन सिलसिला परंपरेचे फकीर साथी भेटले. आमचे सहकारी आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या.
हिंदू धर्मातील अठरापगड जाती, मुस्लीम आणि अन्य धार्मीय समाजात ऐक्याचे प्रतीक बनलेल्या संत शेख महंमदांशी आज सातशे वर्षांनी आम माणसांचे घट्ट भावनिक नाते आहे, हीच माणसांच्या शहाणपणाची खूण. तीस चाळीस हजार लोकसंख्येच्या श्रीगोंद्यात या यात्रेसाठी १५/२० हजार लोक जमले होते. दरवर्षी जमतात.
मढी येथील कानिफनाथ देवस्थान
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथील नाथपंथीय देवस्थान म्हणजे संत कान्होबा/कानिफनाथ यांचे ‘संजीवन समाधी’ स्थळ आहे. इतिहास असा आहे की, संत कान्होबा १३५०मध्ये मढी येथे आले. त्यांनी सूफी पंथाचा स्वीकार केला आणि शाह रमझान माही सवार असे नाव धारण केले. पुढे काही वर्षे भारत भ्रमण केले. १३८०मध्ये मढी येथे परत आले आणि वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना हिंदू-मुस्लीम संत म्हटले जाते.
कान्होबा देवस्थान हे भारतातील भटक्या विमुक्त जमातींसाठीही एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी फाल्गून महिन्यातील पंचमीला भटक्या विमुक्त समाजाची पंधरा दिवसांची मोठी यात्रा मढी येथे भरते. देशभरातून अक्षरश: लाखो भाविक मढीला जमतात. या भटक्या समाजांसाठी फाल्गुनातील यात्रा म्हणजे एक वार्षिक कौटुंबिक-सामाजिक मेळाव्यासाठी निर्माण झालेली एक व्यावहारिक रचनाच ठरते.
म्हणजे, एका बाजूला भटक्या विमुक्त जमातींच्या श्रद्धापरंपरा तर दुसऱ्या बाजूला ही हिंदू-मुस्लीम श्रद्धा परंपरा, असा अनोखा संयुक्त श्रद्धा परंपरांचा वारसा मढीला आहे. मात्र गेली काही वर्षे मढीचे व संत कानिफनाथ देवस्थानचे हे संयुक्त धार्मिक स्वरूप नष्ट करून त्या ठिकाणी एकसाची उच्चवर्णीय हिंदू धर्म परंपरा लादण्याचा प्रयत्न गेली काही दशके सतत सुरू आहे.
आज शाह रमझान माही सवार हे नाव मढीमध्ये ऐकूही येत नाही. या देवस्थानच्या कारभारातून मुस्लीम समाजाला बेदखल केले गेले आहे. वास्तविक देवस्थानच्या कारभारात हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजांना समान स्थान होते. तसे शेकडो वर्षांचे कागदोपत्री पुरावे स्थानिक लोक दाखवतात. आम्ही सलोखा गटातर्फे मढीला भेट दिली, तेव्हा स्थानिक मुस्लीम मंडळींनाही भेटलो. तेव्हा हे वास्तव पुढे आले.
आम्ही मढीतील सूफी परंपरांचा वारसा असलेले श्री. मुजावर यांची भेट घेतली. त्या वेळेस गोपाळ या भटक्या विमुक्त समाजातील लोकही आम्हाला भेटायला आले. या सगळ्यांनी त्यांची कैफियत मांडली. गेली ३० वर्षे या देवस्थान विश्वस्त मंडळ कारभारात मुस्लीम समाजाला उघडपणे हटवले गेले आहे. त्यासाठी धर्मादाय कायद्याचा खुबीने वापर केला गेला आहे. आता विश्वस्त मंडळात एकही मुस्लीम नाही. आता या देवस्थानाचे स्वरूप केवळ हिंदू देवस्थान केले गेले आहे. संत कान्होबा यांच्या समाधीवर आता फक्त आणि फक्त भगवी चादर असते.
गोपाळ समाज हा भटका विमुक्त समाज. या समाजात वाद्य संगीताची मोठी परंपरा आहे. मढी देवस्थानात नगारावादनाचे पारंपरिक हक्क या समाजाकडे आहेत. या समाजाला मढीमध्ये ‘ढोली’ असे म्हटले जाते. या समाजाचे नगारा वादनाचे हक्क आज पूर्ण नाकारले जात आहेत. किंबहुना सूफी परंपरा आणि भटक्या विमुक्तांच्या अनेक प्रथा आणि रितीरिवाज नष्ट होतील अशी व्यवस्था लादण्यात आली आहे. उदाहरणार्थ, देवस्थान गडावर जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दरवाजा आणि प्राचीन दगडी पायऱ्या आता कायमस्वरूपी बंद केल्या जात आहेत.
हे कशाला? तर या वाटेवर मुस्लीम आणि भटके विमुक्त समाजातील लोकांची वस्ती आणि दुकाने आहेत. या समाजांची नाकेबंदी केली जात आहे.
गेले काही वर्षे कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे काही वादग्रस्त नेते मढी देवस्थान आणि परिसरात सतत संपर्क ठेवून आहेत. सूफी परंपरा, भक्ती परंपरा आणि भटक्या विमुक्तांच्या लोक श्रद्धा पूर्णपणे नष्ट करण्याची मोहीम सुरू आहे.
धार्मिक सलोख्याशी इमान सांगणारे वडशिंगे
वडशिंगे हे सोलापूरमधील माढा तालुक्यातील अगदी सामान्य म्हणता यईल, असे चार साडेचार हजार वस्तीचे गांव. टेंभुर्णी येथील प्रसिद्ध साहित्यिक आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांची अचानक भेट झाली आणि सलोखा संपर्क गटाचा विषय झाला. तेव्हा डॉ. कदम यांनी आपल्या वडशिंगे गावाच्या सलोखा परंपरेची आणि गावाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेबद्दल बरीच माहिती दिली. त्यामुळे आम्ही टेंभुर्णीपासून पस्तीस कि.मी.वरील त्यांच्या वडशिंगे गावाला भेट दिली. या गावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या गावाचे ग्रामदैवत आहे रामसिद्ध पीर. या पिराचा वार्षिक उरूस भरतो. गावात मुस्लीम कुटुंबे अगदी थोडी. पण उरुसाचा आणि ग्रामदैवताच्या उत्सवाचा मान या मुस्लीम कुटुंबांचाच. गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रितपणे हा उत्सव गेली पाच सातशे वर्षे साजरा करतात, आम्ही राम सिद्ध पिराला भेट दिली, तेव्हा गावातील मुस्लीम समाजाचे मानकरी तेथे आले आणि त्यांनी पीर परंपरेची सविस्तर माहिती दिली.
राम सिद्ध पीर पाहून झाल्यावर डॉ. महेंद्र कदम आणि सत्तार भाईंनी आम्हाला ‘तुम्ही गावात चला. आम्ही तुम्हाला आमचे गाव दाखवतो’, असा आग्रह धरला. गाव तसं छोटं आहे. त्यामुळे आम्ही पायीच निघालो. छोट्या छोट्या गल्ल्या ओलांडत आम्ही १०-१५ मिनिटात गावाच्या मुख्य पारावर आलो. वाटेत सत्तारभाई पिराची आणखी माहिती देत होते. त्यांनी सांगितलं की, या राम सिद्ध पिराच्या मालकीची सुमारे साडे चार एकर जमीन आहे. ही जमीन मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर रसेल जॉर्ज यांनी दिल्याची सनद आमच्याजवळ आहे. ही जमीन आता वक्फ बोर्डाची आहे.
मढी येथील कानिफनाथाचे समाधिस्थान हेसुद्धा हिंदू-मुस्लीम आणि भटक्या-विमुक्त समाजाचे संयुक्त धार्मिक श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे वडशिंगे येथील हा पीर म्हणजे हिंदू-मुस्लीम सर्वांचे संयुक्त श्रद्धा स्थान आहे, अशी आमची चर्चा सुरू होती. त्यावर सत्तार भाई म्हणाले, ‘अहो आमच्या भागात अशी आणखीही ठिकाणं आहेत. जी हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाचे लोक पवित्र मानतात. त्यांचे सण, उत्सव, उरुस साजरे करतात’.
आता या मुद्द्यावर बाकीच्या लोकांनी भराभर अशा पिरांची नावे सांगितली. ठोंगेची उपळाई, तालुका बार्शी येथील पीर, पापनस पीर आणि रोपाळ्याचा पीर, उमाठा अंजनगावचा पीर हे माढा तालुक्यातील पीर, तर शिराळ व नालगाव हे परांडा तालुक्यातील पीर या सर्व ठिकाणी हिंदू-मुस्लीम भाविक एकत्रित यात्रा साजरा करतात. यातील अनेक ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे, रामसिद्ध पीराचा उरुस साजरा होतो, त्याच दिवशी हे उरुस असतात.
आम्ही गावात येताना डॉ. कदम सांगत होते की, आमच्या गावाची पारंपारिक रचना अतिशय वेगळी आहे. आमच्या गावात विविध जाती-धर्म आणि जमातींची घरांची मिश्र वस्ती आहे. जाता जाता त्यांनी एकेक घर दाखवत आम्हाला माहिती दिली. हे पाहा हे परटाचे घर, त्याला लागून हे धनगराचे घर, हे मुसलमानाचे घर आणि त्याला लागून हे ब्राह्मणाचे घर आणि त्याला खेटून हे मराठ्यांचे घर, पलीकडे परत कुलकणींचे घर आणि समोर हे मुसलमानाचे घर आणि बाजूला परत मराठ्याचे घर.
आता आमच्या मागे मागे गावातील अनेक लोकांचा घोळका फिरत होता. सारे उत्साहाने गावाची माहिती देत होते. एका माणसाने सांगितले, ‘ही अशी रचना आमच्या लहानपणापासून आहे. असं म्हणा अगदी पहिल्यापासून ही अशी एकत्र रचना आहे. हे बघा हे हनुमान देऊळ, हे इकडे देवीचं आणि त्या बाजूला विठ्ठल-रखुमाईचं देउळ, तर मध्ये ही मशीद... ती पाहा ती मागे आहे ती छोटी जुनी मशीद. मोडकळीला आली आणि ही बघा ही नवी बांधलेली मशीद. दरवर्षी सर्व देवाचे उत्सव जोरात साजरे होतात. प्रत्येक उत्सवात मिरवणुका निघतात. बैलपोळ्याचीसुद्धा मिरवणूक निघते, पण या मशिदीच्या मागे नाक्यावर मिरवणूक आली की, वाद्ये आपोआप थांबतात आणि मिरवणूक मशिदीच्या पलीकडे गेली की वायें परत वाजू लागतात. हे कोणाला सांगावे लागत नाही. हे सर्वांनी आपण होऊन पाळायचे असते.’
आज-काल मशिदी पाडल्या जात असताना, या छोट्याशा गावात नवी मशीद बघितल्यावर आश्चर्यच वाटलं. आम्ही मशिदीत जायची इच्छा व्यक्त केली. मुस्लीम समाजातील बुजुर्ग इसाकभाई शेख यांनी हात धरून आम्हाला मशिदीत नेले. मशीद साधीच पण अतिशय स्वच्छ होती. बोलता-बोलता मुस्लीम समाजातील लोकांनी सांगितले की, ‘ही मशीद आम्ही आमच्या पैशाने उभारली. पण मशिदीचे भोंगे गावकऱ्यांनी आम्हाला दिले. इथे भोंग्यांचा वाद नाही. गावात कधीच धार्मिक तणाव नाही. आमचे सणसुद्धा मोठ्या आनंदाने आणि उत्साहात सर्व गावकरी साजरे करतात. शिवाय राम सिद्ध पिराच्या यात्रेची समिती आहे. त्यात सर्व जाती धर्माचे गावकरी सामील होतात. पिराच्या बाजूला बिरोबाचे स्थान आहे. त्याचे पूजेचे मानकरी गावातील धनगर समाजाचे ठोंबरे कुटुंब आहे.’
आता आम्हाला स्थानिक काँग्रेसचे नेते श्री. रोहिदासजी कदम यांनी आग्रहाने आम्हाला चहासाठी घरी नेले. गावातील या सलोख्याच्या परंपरेबद्दल तेही अभिमानाने सांगत होते. रोहिदासजींनी बहुदा सत्तरी ओलांडली असावी. ते म्हणाले ही अशी परंपरा आमच्याही आधीच्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. याला कधीच बाधा आली नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
एकदाच, हां एकदाच ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न झाला होता. म्हणजे बघा १९८०-८१चा काळ असेल. आमच्या गावात त्यावेळी भीमराव नाना पाटील नावाचे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. तसे ते संघाचे एकटेच होते. पण भीमराव नाना निष्ठावान होते. ते सोलापूरला जात असत. सोलापुरात हिंदू महासभेचे वि.रा.पाटील नावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी आमच्या भीमराव नानांना सांगितले की, ‘हा राम सिद्ध-पीर कसा असू शकतो? तुम्ही हे देवस्थान उकरून बघा. मी तुम्हाला सोलापुरातून मदतीला मुले पाठवतो. कोणी काही करणार नाही. घाबरायचं काम नाही.’
भीमराव नाना गावात आले आणि त्यांनी गावकऱ्यांना ही योजना सांगितली. यावर गावातल्या सगळ्या जातीच्या लोकांनी भीमराव नानांना बजावले की, ‘हे असलं इथं काही होणार नाही. राम सिद्ध पीर आपलं ग्रामदैवत आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तेव्हा असलं काही कराल तर आम्ही आडवे पडू.’
रोहिदासजी हे सांगत असतानाही आम्हाला आश्चर्य वाटत होते. हे उपजत शहाणपण आहे. याचा अर्थ माणुसकी जपणारी सलोख्याची परंपरा ही या ठिकाणी माणसांच्या रक्तात आहे. कोणत्याही संवेदनाशील माणसाला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट! डॉ. महेंद्र कदम यांनी आम्हाला आग्रहपूर्वक येथे आणले याबद्दल त्यांचे आभार मानत आम्ही परत निघालो.
महाराष्ट्रातील संयुक्त धार्मिक परंपरा आणि जनसामान्यांच्या श्रद्धास्थानांनीच महाराष्ट्रातील सहिष्णू समाज उभा केला आहे. याचे भान नव्याने जागवणारे हे आमचे अनुभव. आमच्या समाजातील संयुक्त धार्मिक परंपरा सजगपणे टिकवण्याचे आव्हान तातडीने लक्षात घ्यायला हवे.
विद्वेषाच्या या काळातही या सामान्य माणसांनी टिकवलेल्या सलोख्याच्या परंपरा खूप काही सांगणाऱ्या आहेत एवढे नक्की!
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ जून २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment