अजूनकाही
पत्रकार-संपादक अशी ओळख असलेल्या झिया उस सलाम यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’,“द स्टेट्समन’, ‘द पायोनियर’, ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकांत मागील तीन दशके काम केले आहे. सध्या ते ‘द फ्रंटलाइन’ या पाक्षिकाचे ‘असोसिएट एडिटर’ आहेत. साहित्य, संस्कृती व सामाजिक बदल हे त्यांच्या अभ्यासाचे व लेखनाचे विषय आहेत. ‘विमेन इन मस्जिद’, ‘निकाह हलाला’, ‘मदरसाज इन द एज ऑफ इस्लामोफिबिया’, ‘शाहीन बाग : फ्रॉम प्रोटेस्ट टू अ मूव्हमेंट’, ‘लिंच फाईल्स’, ‘ऑफ सॅफ्रॉन फ्लॅग्ज ॲन्ड स्कलकॅपस्’ ही त्यांची इंग्रजी पुस्तके आहेत. ‘द हिंदू’ या दैनिकात ९ मे २०२२च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा अनुवाद आहे.
..................................................................................................................................................................
रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी झाल्यानंतर काही दिवसांनी व ‘जुम्मतुल विदा’च्या (रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार) काही दिवस आधी योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश सरकार सक्रीय झाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘मोतीलाल यादव विरुद्ध उत्तर प्रदेश’ या खटल्यात दिलेल्या निकालाचा दाखला देऊन निरपेक्ष कारवाई करत त्यांनी राज्यातल्या विविध धर्मस्थळांवरील जवळपास दहा हजार नऊशे भोंगे हटवले. लखनऊ आणि अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांसोबतच मुख्यमंत्र्यांचा गोरखपूर मतदारसंघ आणि पंतप्रधानांचा वाराणसी मतदारसंघही या कारवाईच्या केंद्रस्थानी होता. विनापरवाना भोंगे लावून, ध्वनिमर्यादा ओलांडून बहुतांश धर्मस्थळे - मंदिरे व मशिदी - न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचे प्राथमिक माहितीतून पुढे आले. दोन-एक दिवसांतच या कारवाईचे लोण पश्चिम उत्तर प्रदेशातील आग्रा, मीरत, गाझियाबाद, मुझफ्फरपूर इत्यादी गावांमध्ये पसरले. या वेळी आग्रयातील विविध धर्मळांवरील ७५६ भोंगे हटवण्यात आले. त्यात जवळपास ९० टक्के मशिदी आणि ८५ टक्के मंदिरे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.
सरकारच्या या कारवाईवर आलेल्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी प्रगल्भ होत्या. धार्मिक नेते आणि धर्मगुरू यांनी सदर कारवाईला विरोधच न केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दिल्ली आणि मध्यप्रदेश या शेजारी राज्यांतील ‘बुलडोझर कारवाई’च्या ताज्या दृश्यांचा हा परिणाम असावा. काही हिंदू धर्मगुरूंनी मवाळ प्रतिक्रिया दिली, तर मुस्लीम समाज प्रतिक्रियेच्या बाबतीत विभागलेला दिसला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम समाजामध्ये ‘अझान’साठी लाउडस्पीकरचा उपयोग, शुक्रवारच्या नमाजसाठी सार्वजनिक रस्त्यांचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन मंथन सुरू आहे. मात्र बहुसांस्कृतिक लोकशाहीत या सर्वांसाठी सूट मिळायलाच हवी, असे एक वर्ग ठासून सांगत होता. दुसऱ्या धर्मांमध्येही या स्वरूपाचे सण आणि प्रार्थना असतात, अशी पुस्तीही त्यासाठी तो जोडत होता. वर्चस्वासाठी बहुसंख्याकांसोबत या वर्गाची सतत स्पर्धा सुरू होती. पण या वर्गाचे पाठीराखे आता झपाट्याने कमी होऊ लागले आहेत. या समाजातील एका मोठ्या वर्गाने आत्मपरीक्षणाचा मार्ग निवडला आहे. कायदे आणि धर्म यानुसार योग्य असलेल्या गोष्टींनाच प्राधान्य देण्याचे त्यांनी ठरवले. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा वा बंदी घालणे किंवा प्रार्थनेसाठी सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्यावर मर्यादा आणणे, हे सरकारचे निर्णय या वर्गाला न्याय्य वाटतात. प्रत्येकावर ते राहत असलेल्या भूमीचे कायदे पाळणे बंधनकारक आहे, आणि एकाच्या वागण्याचा त्रास दुसऱ्याला अजिबात होता कामा नये, या प्रेषितांच्या वचनांचा ते यासाठी वारंवार दाखला देतात.
या समाजातील बहुतांश शिक्षित वर्गाला धर्माचे कायदेकानून माहीत असतात. साठच्या आणि सत्तरीच्या दशकात संपर्काच्या साधनांचाच अभाव असल्यामुळे त्या काळी (लोकांना प्रार्थनेला बोलावण्यासाठी) भोंग्यांचा वापर क्षम्य होता. तेव्हा मोबाईलचा मागमूसही नव्हता, टेलिफोनही दुर्मीळ होते आणि काही घरांमध्ये तर घड्याळंही नसायची. एचएमटीचे घड्याळ घेण्यासाठी अनेक आठवडे आधीच आगाऊ नोंदणी करावी लागायची. कधी कधी तर कुणी येणारी-जाणारी व्यक्ती किंवा शेजारी बरेचदा केवळ वेळ विचारण्यासाठी घरात डोकावत असत. रमजानच्या महिन्यात तर मुस्लीम बरेचदा गाणाऱ्या फकिरांच्या आवाजाने उठायचे. हे फकीर धार्मिक कवणे म्हणत दारोदारी जाऊन लोकांना सहरीच्या (उपवास ठेवण्याची सकाळची) वेळेची आठवण करून देत असत. वेळेचा हा प्रश्न अनेक दशकांपूर्वीच सुटला. आता इंटरनेट, मोबाईल आणि इस्लामिक ॲप्सच्या जमान्यात मुअ़िज्ज़नने (अझानची बांग देणारा) दिवसातून पाचवेळा लाऊडस्पीकरवरून प्रार्थनेसाठी साद घालण्याची (अझान देण्याची) आता गरजच उरलेली नाही. उलट, आता अनेक नमाजी (प्रार्थना करणारे) नमाजच्या वेळांची आठवण करून देणारे ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेणे पसंत करतात.
मजेशीर गोष्ट म्हणजे, भोंग्यावरून अझान देण्यावरून मुस्लीम समाज कायमच विभागलेला होता. साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांमध्ये बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनुयायी मिळवणाऱ्या ‘तब्लीग जमात’च्या समर्थकांचा (मुस्लिमांना नमाझसाठी बोलावण्यासाठी) लाऊडस्पीकर-वरून आझान देण्याला विरोध होता. कारण आझान देण्यासाठी एखाद्या उंच ठिकाणी किंवा टेकडीवर चढून एखाद्या व्यक्तीने प्रार्थनेसाठी लोकांना साद घालावी, याला प्रेषितांनी प्राधान्य दिल्याचे या सर्वांत मोठ्या मुस्लीम संघटनेने निदर्शनास आणून दिले होते. सातव्या शतकात मुस्लीम मक्केतून मदिनेत गेल्यावर त्यांना दिवसातून पाच वेळा नमाजसाठी बोलवण्याकरता काहीतरी मार्ग शोधत होते. त्यासाठी घंटा वाजवावी असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सुचवले. तर काही म्हणाले शिंग फुंकले जावे. प्रार्थनेची वेळ कळावी म्हणून त्या वेळी टेकडीवर अग्नी पेटवावा, असेही काहींनी सुचवले.
प्रेषितांनी हे सर्व सल्ले नाकारले. कारण यांपैकी काही पद्धती ख्रिस्ती किंवा ज्यू धर्मीय वापरत होते, तर काही सल्ले अव्यवहारी वाटल्यामुळे नाकारले गेले. शेवटी त्यांनी गुलामगिरीतून मुक्त झालेल्या बिलाल या कृष्णवर्णीय सहकाऱ्याला बोलावले, आणि अब्दुल्लाह इब्न ज़ैदने सुचवल्याप्रमाणे ‘अल्लाहू अकबर’ने सुरू होणारी अझान टेकडीवरून द्यावी, अशी सूचना केली. अशा प्रकारे ढोल किंवा कोणत्याही वाद्याशिवाय एका काळ्या व्यक्तीने दिलेली ही अझान समतेची महत्त्वपूर्ण कृती ठरली. प्रार्थनेसाठी उंचावरून साद घालण्याच्या प्रेषितांच्या कल्पनेवरूनच पुढे मशिदींमध्ये मिनार बांधले जाऊ लागले. आजही दिल्लीतील जामा मशिदीसह भारतातील बहुतेक सर्व मध्ययुगीन मशिदींमध्ये उंच आणि मजबूत मिनार दिसतात. त्यावर चढून मुअज्जिनने आझान देणे अपेक्षित असते. (लाउडस्पीकरऐवजी) हीच परंपरा सुरू ठेवावी, अशी तब्लीग जमातीची इच्छा होती.
मात्र सत्तरच्या दशकात आणि पुढे नव्वदीच्या दशकापर्यंत हे चित्र पूर्णपणे बदलले. आता मोहल्ल्यातील मशिदी अझानच्या आवाजाबाबत परिसरातील इतर मशिदींशी स्पर्धा करू लागल्या. ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या बाबरी मशिद-राम‐जन्मभूमी आंदोलनामुळे वातावरण तापू लागले आणि अझानचा आवाज दूरपर्यंत जावा, म्हणून अनेक माशिदींवर चहूदिशेला तोंड करून भोंगे लावले गेले. याला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवले गेले.
अनेक मंदिरांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आणि त्यापैकी अनेक जण काकड आरतीसाठी लाउडस्पीकर वापरू लागले. (अझानची वेळ सर्वत्र एकच असल्यामुळे) मुस्लिमांची बऱ्यापैकी लोकसंख्या असलेल्या हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ आणि दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये अनेक मशिदींवरून एकाच वेळी अझान दिल्या जाऊ लागल्या. आणि आध्यात्मिक शांतता मिळण्याऐवजी परिसर कोलाहलाने भरून जाऊ लागला. विशेषतः पहाटे (फज्र) आणि आणि संध्याकाळी (मगरिब) हा गोंगाट अधिक जाणवू लागला आणि त्याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधले गेले. या वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे ते निदर्शनास आणून देऊ लागले.
विशेष म्हणजे, भारतीय उपखंडात सगळीकडे परिस्थिती अशीच आहे. पाकिस्तानातील कराची आणि लाहोर या शहरांमधील मशिदीही अझान देताना लाउडस्पीकरचा आवाज अधिक ठेवतात. बऱ्याचदा एकाच वेळी एकापेक्षा अधिक अझान ऐकू येतात. बांग्लादेशमध्येही अझान लाउडस्पीकरवरूनच दिली जाते. पाकिस्तानमध्ये किंवा बांग्लादेशमध्ये क्रिकेटचा सामना सुरू असताना मशिदीतून अझानचा आवाज ऐकू येणे, ही अजिबात असामान्य बाब नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
नुकतेच, ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्सने उत्तर पाकिस्तानातून ऐकू येणाऱ्या अझानविषयी लक्षवेधी ट्वीट केले होते. असे असले तरी सौदी अरेबिया व मलेशिया या देशांमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. दोन्ही देशांतील प्रशासनाने मशिदींमधील लाउडस्पीकरच्या वापरावर मर्यादा आणली आहे. २०१०मध्ये मलेशियातील इस्लामिक प्रशासनाने एक फतवा काढला. त्याद्वारे, पहाटेच्या नमाजच्याआधी लाउडस्पीकरवरून कुराण पठन करण्यावर बंदी घालण्यात आली. तझकीरा म्हणजे धार्मिक प्रवचनांसाठी लाउडस्पीकरचा वापर करण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनाने २०१५मधील एका मार्गदर्शिकेचा आधार घेतला.
२०२१च्या ग्रीष्मात, सौदी अरेबियाच्या इस्लामिक व्यवहार (Islamic Affairs) मंत्रालयाने एक आदेश काढला. सर्व लाउडस्पीकर्स सर्वोच्च मर्यादेच्या एक तृतीयांश क्षमतेनेच वापरावे, अशी सूचना त्यात करण्यात आली होती. नमाज सुरू होण्याआधी दिल्या जाणाऱ्या इकामाहसाठी (निर्वाणीची हाक) या मर्यादेत लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी दिली. मात्र नमाज सुरू झाल्यावर ती शेजारीपाजारी प्रसारित करताना ध्वनिवर्धकाच्या वापरावर बंदी घातली. सोबतच, मशिदीत कुराण पठन करताना लाउडस्पीकरचा उपयोग करू नये, कारण त्यामुळे या पवित्र पुस्तकाचा अनादर होतो, असे आवाहन सौदी प्रशासनाने तेथील मुस्लिमांना केले.
सौदी अरेबियात वाहू लागलेले बदलाचे वारे आता ‘भारतीय इस्लाम’लाही कवेत घेऊ लागले आहे.
मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद : समीर शेख
‘साधना’ साप्ताहिकाच्या २१ मे २०२२च्या अंकातून
.................................................................................................................................................................
दै. ‘हिंदू’मध्ये ९ मे २०२२ रोजी ‘Turning down the volume on a call to prayer’ या शीर्षकासह प्रकाशित झालेला हा मूळ लेख वाचण्यासाठी पहा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment