अजूनकाही
‘सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धन यांचा आज आठवा स्मृतिदिन. साहित्याची असाधारण जाण असलेला प्रतिभावान संपादक! त्यांच्या हयातीत त्यांच्या संपादनशैलीची, आवश्यक तेथे पुनर्लेखनाच्या आग्रहाची यथेच्छ टिंगल झाली. आता मात्र त्यांची अनेकदा आठवण केली जाते. ऑगस्ट १९८२ मध्ये ‘सत्यकथा’ बंद झाले. त्याची जागा नंतर कुठल्याही मराठी नियतकालिकाला घेता आली नाही. प्रा. अविनाश कोल्हे यांना १९८० ते १९९५ या काळात पटवर्धनांचा सहवास लाभला. त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी त्यांचा ‘सेकंड इनिंग’ हा दीर्घकथासंग्रह त्यांना अर्पण केला आहे. त्याची ही वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका...
..................................................................................................................................................................
१ सप्टेंबर १९८० रोजी माझी मुंबईच्या नोकरीची सुरुवात झाली. तेव्हा मुक्काम होता ठाकुरद्वार नाक्यावरील झावबाच्या वाडीत. तेथून गिरगाव नाक्यावरच्या खटाववाडीतले ‘मौज-सत्यकथा’चे कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर. नोकरीचा पहिला दिवस होता सोमवार. त्यामुळे संध्याकाळी परतायला उशीर झाला. त्या काळी प्रत्येक होतकरू कवी/लेखकाला ‘सत्यकथा’चा पत्ता पाठ असायचा - ‘मौज प्रकाशन गृह, खटाववाडी, गोरेगावकर लेन, गिरगाव, मुंबई’. तो मलासुद्धा पाठ होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी खटाववाडीतील सत्यकथाच्या कार्यालयात हजर. तेव्हा कळले की, दर मंगळवारी कार्यालय साप्ताहिक सुट्टीसाठी बंद असते. मी खट्टू होऊन बाहेर पडलो. तो पहिला, एक प्रकारचा नकार.
मी बुधवारी संध्याकाळी पुन्हा हजर. तेव्हा सत्यकथाचे संपादक श्री. राम पटवर्धन (१९२८-२०१४) भेटले. मी स्वतःची ओळख करून दिली. त्यांनी आस्थेने चौकशी केली. तेवढ्यात चहा आला. मलाही देण्यात आला. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. आदल्या दिवशी कार्यालय बंद असल्यामुळे उपनगरात राहणाऱ्या लेखक, कवी, चित्रकारांची ये-जा सुरू होती. मी कोपऱ्यातल्या खुर्चीत मासिकं चाळत बसलो होतो. डोळे मजकुरावर होते, पण कान पटवर्धन एका तरुण कथाकाराला त्याची कथा कशी फसली आहे, हे समजून सांगत होते, ते ऐकत होते.
माझ्यासाठी हा अनुभव अभूतपूर्व होता, अनोखा होता.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हळूहळू ओळख वाढत गेली व माझी भिड चेपत गेली. नंतर तर असे दिवस सुरू झाले की, मी जवळपास दररोज संध्याकाळी साडेसहाच्या आसपास ‘सत्यकथा’त जात असे. साडेसातपर्यंत लेखक, कवी, ज्येष्ठ समीक्षक यांची वर्दळ असे. येथे बसून मी संभाजी कदम, वसंत पळशीकर वगैरेंच्या पटवर्धनांशी झालेल्या वैचारिक चर्चा ऐकल्या.
दररोज संध्याकाळची ही वर्दळ संपल्यानंतर मात्र फक्त मी आणि पटवर्धन. त्यांच्या टेबलावर देश/परदेशातून आलेली अनेक इंग्रजी मासिकं असत. ती चाळत बसणे हा माझा उद्योग होता, तेथेच मी पहिल्यांदा ‘इंडेक्स ऑन सेन्सॉरशिप’ हे त्रैमासिक बघितले. ही वेळ पटवर्धनांची ‘परिक्रमा’ या त्यांच्या सत्यकथातील सदराची जुळवाजुळव करण्याची होती. ते सर्व वृत्तपत्रं/ मासिकं काळजीपूर्वक चाळत असत व त्यातील कात्रणं काढत असत.
निघायला साडेआठ होत असत. नंतर गिरगाव नाक्यावरच्या सेंट्रल हॉटेलमध्ये चहा. हे हॉटेल बंद झाल्यानंतर ठाकुरद्वार नाक्यावरचे तांबे उपाहारगृह येथे चहापान होत असे. नंतर पटवर्धन ठाकुरद्वार नाक्यावरील बस स्टॉपवरून बोरबंदरला (हा खास त्यांचा शब्द. त्यांचे ‘व्ही.टी.’ या शब्दाशी काय वैर होते, न कळे!) जाणारी बस पकडत.
जसजशी ओळख वाढत गेली, तसतसा माझ्यावरचा ताण कमी झाला. एक दिवस मी त्यांना माझी पहिलीवहिली कथा वाचायला दिली. एव्हाना मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती झाली होती. त्यानुसार मला वाटले की, ते माझी कथा वाचायला कमीत कमी दोन-तीन महिने घेतील. मी एक प्रकारे निश्चिंत होतो.
दुसऱ्या दिवशी कार्यालयात सर्व निवांत झाल्यावर त्यांनी माझी कालच दिलेली कथा बाहेर काढली. माझ्या पोटात गोळा. त्यांनी माझ्यासमोर अनेक कथाकारांच्या कथांचे कसे थडगे बांधले होते, हे मी प्रत्यक्ष बघितले होते. आज माझी पाळी होती. हा दिवस एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते.
त्यांनी त्यांच्या पद्धतीने कथेचे विश्लेषण केले. कथेत काय चांगले आहे व काय वाईट आहे, याचे तौलनिक विवेचन केले. कथा कशी विकसित व्हायला पाहिजे, कथाबीजातल्या शक्यता कशा जोखल्या पाहिजे, त्यातील योग्य ती शक्यता कशी फुलवता आली पाहिजे, भाषेचा पोत कसा सांभाळला पाहिजे, वगैरे वगैरे. मला बरेच कळत होते व बरेच कळत नव्हतेही, पण आतून उंच झाल्यासारखे वाटत होते.
दिवस पुढे सरकत होते. जुलै १९८२मध्ये ‘सत्यकथा’ बंद झाली. पण माझे सत्यकथेत जाणे यत्किंचितही कमी झाले नाही. तोपर्यंत आमचे संबंध ‘ज्येष्ठ संपादक व होतकरू लेखक’ ही चौकट ओलांडून गेले होते. उलटपक्षी आता गप्पांना खरा रंग भरू लागला. आता दर महिन्याला सत्यकथाच्या संपादनाचे टेंशन नव्हते. पटवर्धन नंतर मौजेच्या ग्रंथसंपादनात लक्ष घालू लागले. यामुळे ते नेहमीप्रमाणे सत्यकथाच्या कार्यालयात येत असत. आमच्या गप्पा सुरू राहिल्या व उत्तरोत्तर रंगत गेल्या.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
या गप्पांतून त्यांना काय मिळाले, हे मला सांगता येणार नाही; पण मला मात्र जीवनभर पुरेल असे काहीतरी भरगच्च मिळाले. माझ्यातला लेखक संस्कारित होत गेला. एखादी कलाकृती कशी समजून घ्यायची, त्याची प्रतवारी कशी ठरवायची, लेखकाचा प्रामाणिकपणा कशा ओळखता येतो (उदाहरणार्थ श्री. ना. पेंडसे यांची ‘लव्हाळी’ प्रामाणिक व दर्जेदार कादंबरी आहे, तर ए.व्ही. जोशींची ‘काळोखाचे अंग’ ही इंटेन्स कादंबरी आहे) इत्यादी इत्यादी.
पटवर्धन संपादकाच्या ज्या खुर्चीत अनेक वर्षे बसले होते, तेथून त्यांनी मराठी साहित्याचा व समाजाचा प्रवाह अगदी जवळून बघितला होता, त्यात यथाशक्ती सहभागी झाले होते. त्यांच्याकडे माहितीचा, किश्श्यांचा खजिना होता. हा खजिना माझ्यासाठी सहज उपलब्ध झाला होता.
मी साहित्याचा विद्यापीठीय अभ्यास (बी.ए./एम.ए. वगैरे) केलेला नाही, याची मला सुरुवातीला खंत होती. पटवर्धनांच्या सहवासात आल्यानंतर ही खंत कायमची गेली. सत्यकथाच्या कार्यालयात १९८० ते १९९५ ही वर्षं पटवर्धनांशी केलेल्या व त्यांच्या इतरांशी झालेल्या गप्पांतून मला भरभरून मिळाले.
..................................................................................................................................................................
लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment