अजूनकाही
ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार हैं
हद-ए-निगाह तक जहाँ गुबार ही गुबार हैं
(ही कोणती जागा आहे मित्रांनो, ही कोणती दुनिया आहे
जिथंपर्यंत नजर जाईल, धुळीचेच लोट दिसत आहेत )
‘उमराव जान’ या चित्रपटामधील गीतात शहरयार यांनी लिहिलेल्या वरील ओळी नंदा खरे यांचं नवं पुस्तक ‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ वाचून झाल्यावर आठवतात. अर्थशास्त्रावरील एखाद्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी शायरीचा वापर तुम्हाला आश्चर्यजनक वाटला असेल, परंतु पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर मनातून आलेली ही उस्फूर्त प्रतिक्रिया. अर्थशास्त्रात पीएच.डी. केलेल्या अस्मादिकांना अनेक नव्या बाबी, नवे दृष्टीकोन या पुस्तकातून समजले. आपणासी जे ‘भावे’, ते इतरांना सांगावे, या उक्तीप्रमाणे या पुस्तकाचा परिचय करून देण्यावाचून राहवलं नाही.
पिढी दरपिढी जीवनाची मूल्यं बदलत जातात आणि अर्थव्यवस्थेची मूल्यं हरवत जातात. या मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांवर नंदा खरे सरांनी केलेलं हे मुक्तचिंतन. अतिशय महत्त्वाचा असलेला हा विषय अतिशय सुंदर पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यासमोर आणला आहे. वाचकांशी गप्पा मारल्याप्रमाणे अतिशय सोप्या भाषेत आणि नेहमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन खरे सर हा अवघड विषय सोपा करून सांगतात. आणि आपण रोज आसपास अनुभवत असलेल्या बाजारव्यवस्थेचे अनपेक्षित पैलू आपल्याला दिसू लागतात.
‘शेतीचा शोध हा मानवाचा आजपर्यंतचा सर्वांत घातक शोध आहे’ अशी खरे सर मांडणी करतात आणि अंतर्मुख व्हायला होतं. मानवानं शेती सुरू करणं हा उत्क्रांतीचे गोडवे गाणाऱ्यांसाठी आजवर गौरवाचा काळ होता. परंतु हे पुस्तक वाचल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन समजला. शेतीतून मालकी ही संकल्पना जन्माला आली आणि त्यातून पुढं जन्माला आला मोबदला. तोवर मानव हा केवळ अन्नसंकलक होता, नंतर तो अन्नउत्पादक झाला आणि भांडवलशाही जन्माला आली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘सर्व माणसं समान आहेत’ हे तत्त्व भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी विचारधारा मानतात. मात्र त्या दोन्हींमधील फरक स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांच्या अंगानं पाहिला, तर लक्षात येतो. स्वातंत्र्य हे मूल्य वाढीस घालताना भांडवलवादाचं समतेकडे दुर्लक्ष झालेलं असतं.
वेगवेगळ्या ‘इझम’चं सामर्थ्य आणि मर्यादा खरे सर त्यांच्या नेहमीच्या परखड शैलीत मांडतात. अर्थव्यवस्था ही एक रंगभूमी असून त्याचा नायक असलेला ‘मानव’ हा केंद्रस्थानी असलेलं कथानक लिहिलं जावं, मूठभर तुच्छतावादी संपूर्ण मानवतेचं भविष्य कसं निर्धारित करणार, हा प्रश्न ते उपस्थित करतात.
औद्योगीकरण झालं आणि पैसा वाचवणं हेच मूल्य सर्वात महत्त्वाचं बनलं. हातावर पोट असलेले देशोधडीस लागले, पर्यावरणाचा नाश झाला, मात्र भांडवलशाही आपल्याच मस्तीत होती, अनिर्बंध स्वातंत्र्य असलेल्या तिला कशाचीच पर्वा नव्हती. तिला सोयीचं तत्त्वज्ञानदेखील मांडलं जात होतं. व्यक्ती नेहमी स्वस्त पर्याय निवडतात, असं ॲडम स्मिथ मांडतो. मात्र काही गोष्टींना पर्याय नसतो. अर्थशास्त्र हे रुपये आणि पैसे यांचं शास्त्र नाही, ते माणसांचं शास्त्र आहे. त्यामागे भावना आणि नैतिकमूल्य असलं पाहिजे आणि या मूल्यांना पर्याय नसतो. अशा वेळी ‘समता हे मूल्य स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे’ हे डॉ. आंबेडकरांचं म्हणणं पटतं.
जागतिक मंदीचं विश्लेषण वाचताना लक्षात येतं की, तेजी असो किंवा मंदी, अर्थव्यवस्था ही मूठभर प्रस्थापितांच्या कल्याणासाठी राबत आहे. यज्ञामध्ये हत्ती, घोडे नाही, दुबळ्या बकऱ्याचा बळी जात असतो, याची आठवण होते. गंमत म्हणजे बकऱ्याची आई आणि हत्ती, घोडे या दोन्ही घटकांनी ‘हे असंच होणार’ हे गृहीत धरलेलं असतं. लॉर्ड केन्स यांचं कल्याणकारी अर्थशास्त्र आणि कार्ल मार्क्स यांचा सहसंबंध जाणून घेत असतानाच त्यांचे अनुयायी असलेले रघुराम राजन यांसारखे अर्थतज्ज्ञ सत्ताधाऱ्यांना का डोईजड होतात, याचंदेखील आकलन होतं.
एकाच उद्योगातील सर्व भांडवलदार एकत्र येऊन कार्टेल तयार करतात आणि आपल्या ग्राहक आणि पुरवठादार यांच्यासोबतच्या किमती निर्धारित करतात. अर्थातच स्वतःच्या फायद्यासाठी. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपणदेखील अशा कार्टेलचा भाग कसा झालो होतो, याची कबुली देऊन खरे सर त्यांच्याबाबत घडलेला गमतीशीर अनुभव सांगतात. या पुस्तकामध्ये चुरचुरीत प्रसंग, संवाद, काही वेबसिरीज/सिनेमांमधील संदर्भ, गाणी, दोहे, शायरी यांची रेलचेल असल्यामुळे विषय कुठंच जड होत नाही.
मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांमुळे श्रीमंत आणि गरीब यातील दरी अधिक तीव्र होत जाऊन त्यात मध्यमवर्गीयांचं ध्रुवीकरण होणार. लुप्त होत जाणारा मध्यमवर्ग जर सशक्त झाला नाही, तर मानवता हे मूल्य धूसर होत जाणार आणि निर्माण होणार अप्रत्यक्ष गुलामगिरी जन्माला घालणारं वेगळं जग, जिथं यंत्रवत जीवन सुरू असेल. जिथं मूठभर श्रीमंत रोबोटच्या दिमतीला असणार आहेत शेकडो, हजारो गरीब रोबोटस… एका वर्गाला मोकळेपणानं जगता येणार नाही आणि एका वर्गाला जगणे म्हणजे काय हे समजलेलं नसणार… अंतर्मुख करायला लावणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे.
‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ - नंदा खरे
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment