अजूनकाही
तशी कुणकूण होतीच. पक्की खात्री वाटत नव्हती, पण मे महिन्याच्या अखेरीस भारतीय साहित्यविश्वाला सुखद धक्का देणारी बातमी आली. गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या हिंदी कादंबरीच्या डेझी रॉकवेल यांनी केलेल्या इंग्लिश अनुवादाला ‘बुकर इंटरनॅशनल’ हा नोबेलनंतरचा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळाला. पुरस्काराची रक्कम किती? तर तब्बल ५० हजार पौंड. इंग्रजी साहित्यातल्या अभिजनांची मक्तेदारी असलेला बुकर पुरस्कार आणि त्याची डोळे फिरवून टाकणारी रक्कम ऐकून काहीतरी अदभुत, अद्वितीय नि अवर्णनीय घडलेय, याची अनेकांची खात्री झाली. पण कशी प्रतिक्रिया द्यावी, हेच अनेकांना उमगले नाही. इतर बेखबरांचे सोडून द्या, हिंदी भाषेची टिमकी मारणाऱ्या हिंदी प्रसारमाध्यमांतल्या भल्याभल्यांना बातमीचे मूल्य तर कळले, पण साहित्यसृजनात निर्झर मग्न असलेले गीतांजली श्री हे नेमके काय रसायन आहे, हे नेमकेपणाने सांगता आले नाही.
रवीशकुमारसारख्या हिंदी साहित्यातल्या जाणकार पत्रकार-संपादकाने आपण अद्याप गीतांजली श्री यांचे साहित्य फारसे वाचलेले नाही, हे मोठ्या मनाने कबूल केले. आणि एक अख्खा ‘प्राइम टाइम शो’ त्यांच्या सन्मानार्थ सादर केला. आदराने त्यांच्या ‘रेत समाधी’मधला उतारादेखील प्रेक्षकांपुढ्यात वाचून दाखवला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अर्थातच, हिंदी आणि इतर भारतीय भाषांतल्या जाणकारांसाठी बुकरसारखा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळणे अनपेक्षित नसले तरीही, आजवर गीतांजली यांनी आपल्या साहित्यिक प्रतिभेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जी झेप घेतलीय, ती पाहता बुकर सन्मान ही म्हटली तर पुढची तार्किक पायरी होती.
अजूनही भारतीय भाषांतल्या रसिकांना ‘माई’, ‘हमारा शहर उस बरस’, ‘तिरोहित’, ‘खाली जगह’ आदी कादंबऱ्या, तसेच ‘अनुगूंज’, ‘वैराग्य’, ‘यहाँ हाथी रहते थे’ आदी कथासंग्रहावर आपली नाममुद्रा कोरलेल्या गीतांजली श्री यांचे नाव, फारसे परिचित नाही. पण इंग्लिशसोबतच फ्रेंच, जर्मन, जपानी, सर्बियन या परदेशी भाषांत त्यांच्या साहित्यकृती याआधीच पोहोचलेल्या आहेत. स्कॉटलंड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स आदी देशांत त्यांनी ‘रायटर इन रेसिडेंस’ या नात्याने वास्तव्यही केले आहे. त्या अर्थाने, तिकडच्या जगाने गीतांजली यांच्या साहित्यिक कर्तृत्वाची यापूर्वीच दखल घेतलेली आहे. इतकेच नव्हे, त्यांच्या ‘बिटविन टू वर्ल्डस - अॅन इंटलेक्चुअल बायोग्राफी ऑफ प्रेमचंद’ या शोधनिबंधाने एतद्देशीय, तसेच परदेशी अकादमिक वर्तुळात कधीच मानाचे स्थान मिळवले आहे.
गीतांजली या निःसंशय एक स्त्रीवादी लेखिका आहेत. ‘मी तुमच्यापेक्षा वेगळी असली तरीही मी माझा बरोबरीचा हक्क मागणार, बरोबरीचा म्हणजे, माझी कल्पना स्त्रीला शिश्न असावे आणि पुरुषाला स्तन असावे अशी कदापी नाही. बरोबरीचा अर्थ, कोणत्याही परिस्थितीत दोघांना समान हक्क असावा, समान पर्याय उपलब्ध असावा आणि निवडीचं एकसमान स्वातंत्र्य असावे’, असे त्यांचे ठाम म्हणणे आहे.
पण म्हणून या चौकटीत वावरणाऱ्या इतरांमध्ये प्रसंगी आढळणारा तर्ककर्कशपणा त्यांच्यात नाही. त्यांचे लेखन परंपरेच्या चौकटी मोडणारे आहे, पण म्हणून ते परंपरेचा अव्हेर करणारे नाही. गतस्मृतींमधून नवा जीवनार्थ शोधणारे आहे, पण गतस्मृतींच्या जंजाळामध्ये अडकून पडणारे स्थितीवादी नाही. त्यांच्या साहित्यातून भाषा आणि संस्कृतीच्या पातळीवर भिन्नता उठून दिसत असली तरीही, जगातल्या कोणत्याही समाजातल्या माणसांना स्वानुभवाचे प्रतिबिंब त्यात सापडत आले आहे. म्हणजेच वैश्विक मानवी सत्याचाच त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या साहित्यातून पुकारा करत आलेल्या आहेत.
त्यांच्या ज्या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला, ती ‘रेत समाधी’ ही कादंबरी तर लेखिकेने मनस्वीपणाचे, उन्मुक्ततेचे गाठलेले शिखर आहे. इथे प्रस्तुत कादंबरीने धर्म-रूढी परंपरा-संस्कार, वैकल्ये आदी बंधनं तोडताना, रुजलेली चौकट नाकारताना स्वतःचे म्हणून एक सत्य शोधले आणि जोपासले आहे.
वयाची ऐंशी वर्षे उलटून गेलेली फाळणीचा उलाथापालथ घडवून आणलेला काळ मनाच्या कोपऱ्यात जपून असलेली, पण अंथरुणाला खिळलेली निरिच्छ आई आणि तिची पुढारलेली मुलगी यांच्या निरुदेश जगण्याला उद्देश मिळवून देणाऱ्या घटना-प्रसंगांचा विहंगम पट या कादंबरीतून गीतांजली यांनी उलगडला आहे.
रूढीप्रिय मुलाच्या घरात कैद झालेली आई रोझी नावाच्या एका तृतीयपंथीयाच्या तगाद्यामुळे मुलीच्या घरी येते. इथून पुढे तिची जीवनेच्छा उसळी मारते. भूतकाळातल्या आपल्या जगण्याचा शोध घेताना सारी बंधने गळून पडतात. तारुण्यात दुरावलेल्या अन्वर नावाच्या प्रियकराला शोधत ती आपल्या मुलीसोबत सीमापार जाते. सरतेशेवटी, दोघीही समाधीसदृश रेतीची टेकाडे असलेल्या एका निर्मनुष्य प्रदेशात जाऊन पोहोचतात.
एका टप्प्यावर आई मुलगी होऊन जाते आणि मुलगी आईची भूमिका जगू लागते. दोघीही आपापल्या परीने जगलेल्या, भोगलेल्या शोषित आयुष्याचा अर्थ लावू पाहतात. इथेच कादंबरीतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या जगण्याचा उत्सव झालेला असतो. हा सीमेपलीकडचा परिसर, तिथली परिसंस्था, या कादंबरीत एका ठिकाणी गीतांजली लिहितात- “बेटियां हवा से बनती हैं. निस्पंद पलों मे दिखाई नहीं पडती और बेहद बारीक एहसास कर पाने वाले ही उनकी भनक पाते हैं...”
त्या म्हणतात, “साहित्यकृती आत्मस्वर मिळाला की, सशक्त बनतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, आपली पायवाट स्वतःच ठरवतात.” एरवीसुद्धा गीतांजली स्वतःला मुक्त करतात आणि त्या-त्या साहित्यकृतीला आपला आकृतीबंध, भाषा आणि शैली निश्चित करण्याची मोकळीक देतात. त्यातून भाषेची नवता वाचकांचे मन समृद्ध करत जाते. साहित्यिक रामानुजन यांची शिकवण त्या तंतोतंत पाळताना दिसतात. रामानुजन यांचे म्हणणे – “मी कवितेचा कधी पिच्छा नाही पुरवत. तर स्वतःला अशा वातावरणात आणि अशा जागी सामावून घेतो की, कविताच मला शोधत तिथवर येते.” उस्ताद अली अकबर खाँसाहेबही एकदा म्हणाले होते- “शुरू करता हूँ, तो सरोद मैं बजाता हूँ, फिर सरोद मुझे बजाने लगता हैं...”
जवळपास सात वर्ष ‘रेत समाधी’चे लेखन होत राहिले. त्यानंतर राजकमलने प्रकाशित केली. लेखिका-संपादक-प्रकाशन अशा सगळ्यांनी मिळून कादंबरीला नैसर्गिकरित्या जोपासले. वाढू-बहरू दिले. गीतांजली म्हणतात, “एकारलेल्या जगण्याला कवटाळण्याऐवजी जगण्यातल्या बहुविधतेचा आदर करणारी ही कादंबरी आहे.” आज या कादंबरीमुळे गीतांजली यांचे कर्तृत्व जागतिक स्तरावर मान्यता पावले आहे.
तीन पिढ्यांचा पट मांडणाऱ्या या कादंबरीची तुलना गॅब्रिएल गार्सिया मार्केझच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूट’ या सात पिढ्यांच्या स्थित्यंतराची कहाणी सांगणाऱ्या जगविख्यात कादंबरीशी केली जात आहे. या कादंबरीने लॅटिन अमेरिकी साहित्याला जगाचे दरवाजे खुले करून दिल्याची आठवणही आवर्जून सांगितली जात आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
“शांति से ज़्यादा क्रांति मगन करती हैं. शील से ज़्यादा अश्लील, आराधना से ज्यादा दहाड़ना, बनाने से ज़्यादा बिगाड़ना, धीर से ज़्यादा अधीर, चुपचाप से ज़्यादा मारधाप…” हे गीतांजली यांच्या कादंबरीला वेग देणारे सूत्र आहे. त्या सूत्राला धरून एका स्त्रीची कहाणी नकळतपणे समस्त स्त्रीवर्गाची होऊन जाते. त्यातच तिच्यातली वैश्विकता उजळून निघते.
साहित्य, चित्र आणि शिल्प वा चित्रपट-नाट्य कलेच्या क्षेत्रातला कोणताही आंतरराष्ट्रीय सन्मान धर्म-पंथ-वंशवर्णाचा चष्मा नाकारून वैश्विक सत्यापर्यंत पोहोचणाऱ्या कलाकृतीवर आपली मोहोर उमटवतो. साहित्यकृतीमुळे श्रोते, प्रेक्षक, वाचकांमधला माणूसपणाचा अंश वाढवा आणि त्यायोगे जात-धर्म-पंथाचा फुकाचा गर्व गळून पडावा, अशी रास्त अपेक्षा असते. गीतांजली श्री यांना मिळालेल्या ‘बुकर इंटरनॅशनल’ पुरस्काराने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ जून २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vishnu Date
Wed , 08 June 2022
बुकर इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त गीतांजली श्री मॅडम चे हार्दिक अभिनंदन!