अजूनकाही
नवराष्ट्राच्या उभारणीमागील प्रेरणा, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्या संघर्षातही जपलेली मूल्ये यांचं आज विस्मरण झालं आहे. द्वेष आणि उन्मादाने भारलेल्या आजच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला या संकल्पनेचे आणि तिची पायाभरणी करणाऱ्यांचे पुन:स्मरण करावेच लागेल. म्हणूनच महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ‘गांधीजन’ या चरित्रमालेचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. ही चरित्रे लवकरच मनोविकास प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहेत. किशोरवयीन मुलं समोर ठेवून लिहिलेल्या या चरित्रमालेचं संपादन करणाऱ्या अनुराधा मोहनी यांनी मांडलेली या प्रकल्पामागची भूमिका...
..................................................................................................................................................................
भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा आपल्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातील एक देदीप्यमान व गौरवशाली अध्याय आहे. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, अशा सशस्त्र इंग्रजांशी निःशस्त्रपणे, केवळ आत्मबळावर लढून आपले राज्य परत मिळवणे आणि जातिधर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या आधारावर तिथे लोकशाहीची प्रतिष्ठापना करणे, ही एक अपूर्व अशी गोष्ट होती. इंग्रज आले तेव्हा हा देश जात-धर्म-भाषा-वर्ग यांच्या शेकडो गटातटांत विभागलेला होता. इंग्रजांनी या विभाजनरेषा ठळक केल्या आणि त्यांच्या सामर्थ्यापुढे आपण आपले आत्मतेज गमावून बसलो. पण या विविधतेतही एकता आहे, हे गांधीजींनी प्रथम सांगितले. सत्याचे पालन करणारे आणि माणुसकीचा धर्म आचरणारे सर्व जण एक आहेत, मग ते कोणतीही भाषा बोलणारे, कोणत्याही प्रदेशात राहणारे वा कोणत्याही देवाची उपासना करणारे का असेनात! अशा रीतीने गांधीजींच्या हाकेला ‘ओ’ देऊन सारा देश आपल्या अंगभूत विविधतेसह एक होऊन जगातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्यवादी शक्तीसमोर उभा ठाकला आणि सत्याग्रहाच्या नावीन्यपूर्ण शस्त्राने त्याने स्वातंत्र्य मिळवले. या लढ्याने अनेकांना प्रेरणा दिली, अनेक देशांच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला केला व आजही करत आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
भारताला स्वातंत्र्य मिळून आता तीन पिढ्या उलटून गेल्या आहेत. ज्यांना जन्मतः स्वातंत्र्य व समाजात स्थान मिळाले, त्यासाठी संघर्ष करावा लागला नाही, अशा पुढच्या पिढ्यांना त्याचे आकलन होणे व स्मरण ठेवणे कठीणच होते. साहजिकच हा गौरवशाली इतिहास आता विस्मृतीत जाऊ लागला आहे. शंभर वर्षांपूर्वी देशाची व जगाची परिस्थिती काय होती, देश राजकीय-आर्थिक-बौद्धिक गुलामीत होता म्हणजे काय होते, हे नव्या पिढीला अजिबात माहीत नाही. त्यांच्यासाठी हा (किंवा कोणताही) इतिहास हा फक्त पाठांतर करून काही लिहिण्याचा ‘विषय’ आहे. आज आपण ज्या समाजात वावरतो, विकासाचे, लोकशाहीचे, खुल्या वातावरणाचे लाभ घेतो, त्याच्या पाठीशी या महान विभूतींचे परिश्रम व त्याग आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नाही. त्यातून आज तर देशातील सर्व पातळींवरील विविधता, समस्यांची व्यामिश्रता या बाबी लक्षात न घेता अतिसुलभ केलेला विकृत इतिहास नव्या पिढीसमोर मांडला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून या महान व्यक्तींबद्दल तिच्या मनात पूर्वग्रह व अकारण द्वेष भरलेला आहे. नवराष्ट्राच्या उभारणीमागील प्रेरणा, त्यासाठी केलेला जमिनीवरचा व मूल्यांचा संघर्ष तिला माहीतच नाही. या सर्वांमधून आत्मतेज हरवण्याचे भयावह आव्हान आज पुन्हा या पिढीसमोर उभे ठाकले आहे.
आज आपण नवभारताची संकल्पना, ‘आयडिया ऑफ इंडिया’ हीच विसरलो आहोत. हा देश इथे राहणाऱ्या सर्वांचा आहे, त्यावर त्यांचा समान हक्क आहे, समता-न्याय-बंधुता यांवर आधारित देश उभारणे, त्याला समृद्ध करणे ही या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, ही झाली ‘आयडिया ऑफ इंडिया’. द्वेष आणि उन्मादाने भारलेल्या आजच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला या संकल्पनेचे आणि तिची पायाभरणी करणाऱ्यांचे पुन:स्मरण करावेच लागेल. हीच गांधीजन चरित्रमाला प्रकाशित करण्यामागील भूमिका आहे.
यामध्ये सर्वप्रथम नाव येते ते महात्मा गांधींचे. गांधी हे जगाच्या आजवरच्या इतिहासातील अभूतपूर्व व्यक्तित्व होय. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मूलगामी विचार मांडला व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी जिवाचे रान केले. त्यांची धडपड केवळ गोऱ्या साहेबांची सद्दी संपून भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळावे, यासाठी नसून समतेच्या आधारावर शोषणरहित स्वराज्य स्थापन व्हावे यासाठी होती.
या कामासाठी त्यांनी लाखो स्त्री-पुरुषांना कार्यरत केले. गोषा-पडद्यात वावरणाऱ्या स्त्रियांना रस्त्यावरील आंदोलनात उतरवले. त्यांना निर्भयपणे वावरता यावे, म्हणून पुरुषी मानसिकतेला वेगळे वळण दिले. समानतेला आपल्या देशात सर्वात मोठा अडसर होता, तो जातिव्यवस्थेतील अस्पृश्यतेचा. तिच्या निवारणाशिवाय स्वातंत्र्य व्यर्थ, असे म्हणून त्यांनी सवर्ण हिंदूंच्या गर्वोन्मत्ततेला टकरा दिल्या. तेव्हाचे वातावरण पाहता केवढे विलक्षण धैर्य व शौर्य त्यांना या कामासाठी कमवावे लागले असेल, याची कल्पना करून पहा. अक्षरशः जिवावरची जोखीम घेऊन त्यांना हे काम करावे लागले. नंतर त्यांनी बलिदानही दिले, परंतु आजही आपण भारतीय समाज म्हणून एक झालेलो नाही. आपल्या मनात आपपरतेच्या, उच्चनीचतेच्या कल्पना कायम आहेत, उलट वाढतच आहेत हे आपल्यासाठी लांच्छनास्पद नाही का?
काँग्रेसपक्षाला इंग्रजी बोलणाऱ्या बॅरिस्टरांच्या तावडीतून सोडवून गांधींनी मातृभाषेत व्यवहार करणाऱ्या दलित-बहुजन, शेतकरी-श्रमिक, अलुतेदार-बलुतेदार यांच्या स्वाधीन केले. त्यातूनच या देशाच्या राजकीय लोकशाहीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली. खादी, ग्रामोद्योग, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांत क्रांतिकारक परिवर्तन करून ग्रामकेंद्रित, पर्यावरणस्नेही समाजाच्या निर्मितीचा विचार त्यांनी जगासमोर मांडला. त्यांच्या सहकाऱ्यांनी यातील एकेक पैलूसाठी आपले आयुष्य वेचले व त्या क्षेत्रात थोर कामगिरी करून दाखवली. त्यांच्यापैकी काहींचे चरित्र या मालिकेतून तुमच्यासमोर ठेवत आहे.
तशी ही मालिका सर्व सुजाण वाचकांसाठी आहे. मात्र तिच्या केंद्रस्थानी आहे तो आपल्या अवतीभवतीचे जग ताज्या नजरेने बघणारा, कुतूहलाने टिपून घेणारा, प्रभाव पडण्याच्या वयातील आजचा किशोरवयीन वाचक. हा वाचक माझ्या पिढीतील किशोरांपेक्षा अनेक प्रकारे भिन्न आहे. त्याच्या हाती असलेली तंत्रकुशलता आणि प्रसारमाध्यमांवर झालेला माहितीचा विस्फोट यांच्यामुळे त्याला बरेच काही नवीन कळते आहे. त्यातून गेले वर्षभर तो घरात अडकून पडलेला आहे. शाळा नाही, सवंगड्यांबरोबर खेळणे नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात भावंडे नाहीत. अशात तो आभासी जगाकडे फार झपाट्याने ओढला जात आहे. बुद्धीची कवाडे बंद करून आणि निव्वळ बोटांची टोके नाचवून या माध्यमांमध्ये काहीही पसरवणे सोपे असते. अधिकृततेसाठी अपार कष्ट घेणाऱ्या मुद्रित माध्यमांकडे त्याने पाठ फिरवली आहे. काही बाबतीत ज्ञानग्रहण करत असला, तरी काही बाबतीत तो अकाली प्रौढ झालेला व अनेक ठिकाणी अपप्रचाराला, कुचाळक्यांनाही बळी पडताना दिसत आहे. त्याचे परिणाम आपण पाहतो व भोगतो आहोतच.
माझ्या पिढीत जे विषय मुलांसाठी निषिद्ध समजले जात असत, त्यांच्यावरही ही मुले सहजतेने बरे-वाईट बोलत आहेत. अशा वेळेस खरा इतिहास सांगण्याची, खऱ्या-खोट्यामधील भेद ओळखायला शिकवण्याची आणि लढण्यासाठी हिंम्मत देण्याची मोठी जबाबदारी माझ्या पिढीतील सुजाण नागरिकांवर येऊन पडली आहे. हे सर्व लक्षात घेऊन या चरित्रांची रचना करण्यात आली आहे. चरित्रनायकांची खरी माहिती देतानाच त्यांच्याविषयी इतरत्र काय बोलले जाते, त्यात तथ्यांश किती व कशावरून, हेही सांगितले आहे.
या मालिकेचा लेखकवर्ग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ३८-८८ या वयोगटातील आठ लेखकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. त्यांनी चरित्रनायक/नायिका यांचा काळ, तेव्हाचे सामाजिक-राजकीय पर्यावरण, नायक/नायिकेची जडणघडण-विचार-भावना यांच्याशी समरस होऊन हे लेखन केले आहे. सरोजिनी नायडू यांनी राजकारण व साहित्य या दोन्ही क्षेत्रात जे प्रचंड काम केले आहे, ते मराठी वाचकांसमोर लालित्यपूर्ण शैलीत पहिल्यांदाच मांडण्याचे कार्य सिसिलिया कार्व्हालो (वसई) या प्रसिद्ध कवयित्रीने केले आहे.
फाळणीच्या विरोधात अखेरपर्यंत ठाम भूमिका घेऊन लढणारा व पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही तिथे सर्वधर्मसमभावाची पताका फडकवत ठेवणारा ‘सरहद्द गांधी’ श्याम पाखरे (मुंबई) या इतिहासाच्या तरुण व अभ्यासू प्राध्यापकाने ऐतिहासिक दाखले देत जिवंत केला आहे. प्रज्ञावान विनोबांचे अवघे आयुष्य आपल्याला विस्मयचकित करणारे आहे. भूदान, आध्यात्मिक साधना, मौलिक लेखन या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा परिचय गांधीविचार व गांधीजन यांच्याशी जवळीक असणाऱ्या मीना कारंजेकर (वर्धा) यांनी आत्मीयतेने करून दिला आहे. त्यातून विनोबांविषयीचे काही गैरसमज दूर होण्यासही मदत होईल.
साने गुरुजींची ओळख ‘श्यामची आई’च्या पलीकडे बरीच काही आहे. गुरुजींच्या कामाचा वारसा चालवणाऱ्या सुचिता पडळकर (कोल्हापूर) या कार्यकत्र्या लेखिकेने त्यांच्यातील प्रखर समतावादी, संघटक, लेखक, आंदोलक, अनुवादक, शेतकरी-कामकरी समूहाचा नेता अशी विविध रूपे प्रस्तुत चरित्रातून रेखली आहेत. कस्तुरबा म्हणजे केवळ गांधींची सावली नव्हती. जुन्या वळणाची पण स्वतंत्र बाण्याची स्त्री होती ती! गृहिणी-पत्नी ते जगन्माता या तिच्या अनोख्या व खडतर प्रवासाचा आलेख तिच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या सुनंदा मोहनी (नागपूर) यांनी आत्मीयतेने चित्रित केला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
आधुनिक भारताच्या निर्मात्या नेहरूंचे कर्तृत्व समर्थपणे विशद करण्यासाठी राजकीय-आर्थिक प्रश्नांची उत्तम जाण असणाऱ्या लेखकाची गरज होती. ती लेखक-प्रकाशक हेमंत कर्णिक (मुंबई) यांनी पूर्ण केल्यामुळे नेहरूचरित्र समकालीन, भारतीय-वैश्विक पटलावरील नेहरूंच्या कामगिरीचे यथार्थ मूल्यांकन करणारे बनले आहे.
आजच्या मुस्लीम विरोधाने बरबटलेल्या वातावरणात मौलाना आझाद या विलक्षण कर्तबगार व देशप्रेमी नेत्याची, देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्याची व थोर पत्रकाराची जीवनकहाणी नंदू गुरव (सांगली) या युवा पत्रकाराने रंगवली आहे. महात्मा गांधी यांचे चरित्र सुप्रसिद्ध लेखक व गांधीवादाचे भाष्यकार रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ (सेवाग्राम) यांनी मुलांना व मोठ्यांना समजेल व त्यांच्याविषयीच्या अपप्रचाराचे न्यायपूर्ण व तर्कसंगत उत्तर मिळेल अशा रीतीने अभिनव पद्धतीने चितारले आहे.
सारी चरित्रे विषय व लेखक यांतील वैविध्य जपत असतानाच चरित्रमालिकेच्या समान उद्देशानुसार लिहून घेऊन ती संतुलित, वाचक-स्नेही व अभ्यासाधारित असल्याची खातरजमा करून प्रकाशित करण्यात येत आहेत. ही सर्व चरित्रे सर्व वाचकांच्या पसंतीस उतरतील, यात शंका नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment