अजूनकाही
नैराश्य (Depression) हा आजकाल भयानक मोठा आजार होतो आहे. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नैराश्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. वर्तमानपत्र वाचलं किंवा टीव्ही लावला वा समाजात वावरताना ११-४५ या वयोगटातील अनेक तरुण आत्महत्या करत असल्याचं दिसतं. त्यामागचं कारण बहुतेकवेळेला नैराश्य हेच असतं.
आपल्याकडे मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, हे कित्येकांना माहीतच नाही. त्यामुळे त्यावर उपचार घेण्याचा\करण्याचा प्रश्नच नाही. परिणामी असं का आहे, हे नक्की सांगता येत नाही. आपल्या शिक्षण पद्धतीतही अभ्यासावरच भर दिला जातो, त्यात जीवनाबद्दल काहीच शिकवलं जात नाही.
मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही. त्यामुळे केवळ माझा आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या अनुभवातून लिहितो आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
नैराश्य म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरात दोन प्रकारची रसायनं असतात- ‘सेरोटोनिन’ व ‘डोपामिन’. या दोन रसायनांमुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट आवडते. जेव्हा तुम्ही उदास असता, तेव्हा ही दोन्ही रसायनं तयार होत नाहीत.
नैराश्य दोन प्रकारात मोडतं. पहिलं वैद्यकीय (मानसिक), दुसरं परिस्थितीमुळे आलेलं. वैद्यकीय नैराश्य तुमच्या आयुष्यातल्या सर्वच बाबींवर परिणाम करतं. असे लोक काम करू शकत नाहीत. हळूहळू त्यांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं जातं. खूप महिने उदास वाटतं. त्यातून त्यांना बाहेर येता येत नाही. यातून मानसोपचार तज्ज्ञाच्या सल्लानेच बाहेर यावं लागतं. अशा वेळी जवळच्या लोकांसोबतच औषधोपचाराची गरज लागते.
परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्याचा सामना कधी ना कधी करावा लागतो. हे नैराश्य जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे, जोरदार अपघातामुळे, घटस्फोट किंवा ब्रेकअप अशा कारणांमुळे येतं. कारण या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात अचानकपणे मोठे बदल होतात. ते स्वीकारता येत नाहीत, म्हणून अनेक जण नैराश्यग्रस्त होतात. आजकाल बहुतेकांना लोकांना याच नैराश्याचा सामना करावा लागतो.
नैराश्यातून बाहेर येणं का गरजेचं आहे?
नैराश्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य वाया जाऊ शकतं. शिवाय इतरही काही मानसिक आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यातून लवकरात लवकर बाहेर येणं कधीही चांगलं. जेव्हा आपण नैराश्यात असतो, त्या वेळी आपल्या मनाच्या तळाशी असा एक भाग असतो, जो आपल्याला यातून बाहेर काढायला उत्सुक असतो. मात्र त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, इतरांची मदत, सल्ला घ्यावा लागतो.
मीसुद्धा काही काळ नैराश्य अनुभवलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की, नैराश्यामुळे विचार करण्याची पद्धत कशी बदलते. त्या काळात मी एकाला भेटलो होतो. ती व्यक्ती मला म्हणाली होती, ‘मला नैराश्य आवडतं, कारण त्यात मला माझ्या विचार करण्याची पद्धत आवडत होती.’ पण तिची स्थिती पाहून मी स्वत:ला सावरलं. कारण असा विचार करून त्या व्यक्तीनं स्वत:च्या आयुष्याची माती करून ठेवली होती. हे असे विचार ‘विचार’ नसून ‘नैराश्य’च असतं. जितका वेळ तुम्ही निराश, हताश असता, तितका वेळ तुम्ही स्वत:ला व तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हानी पोहचवत असता.
माझा असा अनुभव आहे की, जर वाचनाची आवड असेल, तर ‘शिवचरित्र’ आणि ‘Lost Connections’ यासारखी पुस्तकं वाचली पाहिजेत. नैराश्यातून जिद्दीनं कसं बाहेर यायचं, याची प्रेरणा या पुस्तकांतून मिळते. ‘शिवचरित्रा’मधील काही प्रसंग खूपच प्रेरणादायी आहेत. उदाहरणार्थ-
१) अफजल खानाचा वध
शिवाजी महाराजांची सेना मूठभर असताना बलाढ्य सैन्य घेऊन निघालेल्या अफजल खानाला त्यांनी रणनीती आखून मारले, हा प्रसंग प्रेरणादायी आहे. युद्धात नुसती शारीरिक ताकद नाही, तर बौद्धिक ताकदही खूप जास्त महत्त्वाची असते.
२) पुरंदरचा तह
मिर्ज़ा राजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महारांजाशी पुरंदरचा तह करून २३ किल्ले घेतले, पण महाराज हातावर हात ठेवून बसले नाहीत. पुढच्या काही वर्षांत त्यांनी ते किल्ले परत मिळवले.
३) आग्राहून सुटका
आग्ऱ्यामध्ये कैद करून ठेवल्यावर शिवाजी महाराज मोठ्या शिताफीने तिथून निसटले. ‘झालं, आता सर्व संपलं, आता काही होऊ शकत नाही’ असा विचार करून महाराज जर नैराश्यग्रस्त झाले असते, तर?
तसंच ‘Lost Connections’ या पुस्तकाचे लेखक जोहॉन हॅरी हे स्वत: नैराश्यानं ग्रासलेले होते. खूप वर्षं त्यांनी औषध घेतली, पण काही वर्षांनी त्यांना समजलं की, औषध न घेता हा आजार ठीक करता येऊ शकतो. तो अनुभव त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
मी या पुस्तकातून काय शिकलो? या पुस्तकाचा गाभा हा आहे की, जे लोक नैराश्याचे रुग्ण असतात, त्याचं एक कारण ‘Disconnection’ हेदेखील असतं. कारण माणसाला जगण्यासाठी फक्त हवा, पाणी, जेवण व पुरेशी झोप एवढंच पुरेसं ठरत नाही. त्याच्या काही मानसिक गरजा असतात. त्यामुळे सामान्य माणसासारखं जीवन जगण्यासाठी आपल्याला Connectionsची आवश्यकता असतेच.
या पुस्तकानुसार काही Disconnection आपण ठीक करू शकलो, तर औषधांशिवायदेखील नैराश्यातून बाहेर येऊ शकतो. यातली काही ‘Connections’ मी इथं सांगू इच्छितो-
१) अर्थपूर्ण कामापासून दुरावा (Disconnection from Meaningful Work)
जे नोकरी केवळ कामधंदा करायचा म्हणून करतात, त्याची त्यांना आवड नसते, त्या कामाचं महत्त्व त्यांना समजत नाही, तर अशा व्यक्ती नैराश्यात जाऊ शकतात. त्यामुळे आपण जे काम करतो, त्याबद्दल प्रेम असायला. त्याचे समाजावर काय परिणाम होतात, याची माहिती असायला हवी. त्याची आवड असायला हवी, तर तुम्ही नैराश्यापासून दूर राहू शकता.
२) इतरांपासून दुरावा (Disconnection from Others)
माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपल्याला जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी इतरांची गरज असते. कुटुंबामध्ये कोणी विचारत नाही, समाजात वावरताना एकटे पडला असाल किंवा सामाजिक जीवन नसेल, तर अशा व्यक्ती नैराश्यात जाऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे विशेष लक्ष देऊन त्यांना त्या काळात थोडं जास्त महत्त्व देऊन नैराश्यातून बाहेर काढता येतं.
३) निसर्गापासून दुरावा (Disconnection from Nature)
निसर्गापासून दूर असाल तरीदेखील नैराश्य येण्याची शक्यता असते. ही इतरांच्या तुलनेत जास्त असते. आपण स्वत:च्या कामात इतके व्यग्र असतो. त्यातून थोडासा निवांत वेळ काढून कुठे सहलीला गेलो, तर एक वेगळीच ऊर्जा मिळते. आपण नव्या उमेदीनं, जोमानं पुन्हा कामाला लागतो. म्हणून थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात राहणं, हेदेखील नैराश्यातून बाहेर येण्यासाठी उपयोगाचं ठरू शकतं.
४) मूल्यांपासून दुरावा (Disconnection from Value)
प्रत्येककाची काही मूल्य/सिद्धान्त असतात. उदाहरणार्थ, काही लोक मांसाहार करत नाही, पण काही कारणास्तव त्यांना मांसाहार करावा लागला, तर त्यांना तुम्ही कितीही प्रोटीनयुक्त मांसाहार द्या, ते नैराश्यात जाऊ शकतात. कारण ते मूल्यांच्या विरोधात करावं लागलेलं असतं. मांसाहार चांगला की वाईट, हा वेगळा चर्चेचा विषय असू शकतो, पण त्या परिस्थितीत त्या व्यक्तीची मानसिकता लक्षात घेता, ती नैराश्यात जाऊ शकते. तसंच तुम्ही कुठल्या देवाला मानत असाल आणि तुमच्या समोर त्या देवाच्या प्रतिमेला कोणी नुकसान पोहचवलं आणि असं करणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा ताकदवान असेल, तर तुम्ही नैराश्याची शिकार होऊ शकता.
५) लहाणपणाच्या घटनांपासूनचा दुरावा (Disconnection from childhood traumas)
एखाद्याच्या आयुष्यात लहानपणी खूप मोठा अपघात किंवा घटना घडल्या असतील, ज्या खूप पीडादायक असतील आणि त्यातून ती व्यक्ती मोठेपणी बाहेर येऊ शकली नाही, तर सर्व सुखसोयी असूनदेखील ती आपल्याला नैराश्यग्रस्त आहे, असं वाटतं. कारण त्याचं मूळ त्याच्या लहानपणीच्या आयुष्याशी निगडीत असतं.
६) आदर-प्रतिष्ठेपासून दुरावा (Disconnection from Respect/status)
प्रत्येक व्यक्तीला आदराची अपेक्षा असते, पण ती जर अशा लोकांमध्ये सतत वावरत असेल, जिथं तिला कोणीही आदरपूर्वक वागणूक देत नाही, रोज तिचा नाही नाही ते बोलून अनादर केला जातो, तर अशी व्यक्ती नैराश्यग्रस्त होऊ शकते.
७) सुरक्षित भविष्य (Secure future)
जर एखादी व्यक्ती आशा/अपेक्षा घेऊन पुढे जात नसेल, तर तीदेखील नैराश्यग्रस्त होऊ शकते.
या सात गोष्टींकडे बारकाईनं लक्ष ठेवल्यास औषध न घेता नैराश्यातून बाहेर पडता येतं, असं या पुस्तकात सांगितलं आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
नैराश्यग्रस्त व्हायचं नसेल तर चारचौघांत मिसळायला हवं. काही छंद जोपासायला हवेत. व्यायाम करायला हवा आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करायला हवी. एकटं राहून किंवा लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, असा विचार करून तुम्ही स्वत:च स्वत:ला नैराश्याचा खाईत लोटता.
त्यामुळे वेळीच सावध व्हा. एकच आयुष्य आहे. सर्व प्रसंगावर खंबीर राहून मात करा, परिस्थिती बदलत असते. ‘संजु’ चित्रपटातला एक संवाद आहे- “अपनी लाईफ तो फुल सापसिढी का खेल हैं, कभी अप तो कभी डाऊन’. त्यामुळे आज निराश वाटत असलं, तरी उद्या नक्कीच आनंदी दिवस येतात...
.................................................................................................................................................................
लेखक अनिरुद्ध राम निमखेडकर एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात.
aniruddhanimkhedkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment