प्रेमाताई पुरव : सामाजिक कार्य, महिलांचे शिक्षण, पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणार्‍या धडाडीच्या कार्यकर्त्या
पडघम - सांस्कृतिक
रवींद्र ठिपसे
  • प्रेमाताई पुरव आणि त्यांच्या ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’तील काही महिला सहकारी
  • Tue , 31 May 2022
  • पडघम सांस्कृतिक प्रेमाताई पुरव Prematai Purav अन्नपूर्णा महिला मंडळ Annapurna Mahila Mandal

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव यांना नुकतंच महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा २०२१ सालच्या ‘समाजकार्य जीवनगौरव पुरस्कारा’नं गौरवण्यात आलं. त्यांच्याविषयीचा हा लेख... 

..................................................................................................................................................................

महाराष्ट्र फाउंडेशनचा (अमेरिका) ‘समाजकार्य जीवनगौरव सन्मान २०२१’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कारप्राप्त करणारी महिला म्हणजे गोवामुक्ती संग्रामातील सर्वांत तरुण कार्यकर्ती प्रेमा तेंडुलकर होय. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या लेकीने (डॉ. मेधा सामंत पुरव) सुरू केलेला ‘अन्नपूर्णा परिवार’ प्रेमाताईंच्या पुरस्काराचा सह-मानकरी आहे.

पद्मश्री प्रेमाताई पुरव यांचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळायच्या बारा वर्षे आधी, म्हणजेच १५ ऑगस्ट १९३५ रोजी गोव्यात झाला. प्रेमाताईंनी वयाच्या १२व्या वर्षी आपला भाऊ काशिनाथ याच्यासोबत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. ब्रिटिशांचा मार खाल्ला, त्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या पायावर झेलल्या. त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झाला, मारामुळे एका कानाने कमी ऐकू येऊ लागले. कित्येक सहकारी डोळ्यादेखत मेलेले पाहिले तरी त्या डगमगल्या नाहीत. जंगलात लपतछपत, उपाशीपोटी दिवस काढले, स्फोटकांची वाहतूक केली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गोवा मुक्ती-आंदोलनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पोर्तुगीज राजवट संपुष्टात आणून गोवा मुक्त करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, हे सांगण्यासाठी दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळात प्रेमाताईंचा समावेश होता.

गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर प्रेमाताईंनी आपले सारे आयुष्य महिलांना उद्योगिनी बनवून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या कार्यात झोकून दिले. त्यांची जन्मभूमी गोवा आणि कर्मभूमी महाराष्ट्र राहिली. स्वातंत्र्यसंग्रामात स्वत:चा पाय अधू झालेला असताना इतर महिलांना मात्र प्रेमाताईंनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद आणि आत्मविश्वास दिला. प्रेमाताई म्हणजे सामाजिक कार्य, महिलांचे शिक्षण, पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणार्‍या धडाडीच्या कार्यकर्त्या. समाजात महिलांना बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे यासाठी त्या आग्रही राहिल्या.

आर्थिकदृष्ट्या संपन्न महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्यांनी बदलवण्याचा प्रयत्न केला. ‘महिला कामगार चळवळीतील लढवय्यी कार्यकर्ती’ अशी त्यांची ओळख आहे. महिलांसाठी सूक्ष्म कर्ज योजनेच्या (मायक्रो क्रेडिट स्कीम) जनकांपैकी त्या एक आहेत. आर्थिक आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध तसेच अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेक वेळा लढे उभारले. महिलांचे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन यामुळेच समाजात परिवर्तन घडून येऊ शकते यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. महिलांसाठी झोकून देऊन कार्य करणार्‍या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, प्रमिला दंडवते इत्यादींच्या बरोबर ‘महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती’त प्रेमाताईंनी झोकून देऊन काम केले. प्रेमाताईंचे खरे शिक्षण हे भिंतींच्या आत घेतलेल्या शिक्षणाच्या ऐवजी त्यांनी केलेल्या अनेक चळवळींतून भक्कम झाले आहे.

महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत यासाठी प्रेमाताईंनी सुरुवातीस काही महिलांना बरोबर घेऊन १९७५मध्ये ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ची स्थापना केली आणि ‘अन्नपूर्णा’ सेवेद्वारा भाजीपोळी डबे पुरवायला सुरुवात केली. नोकरदार वर्गासाठी रुचकर, ताजे आणि माफक दरात जेवण उपलब्ध करून दिले. सध्याची ‘हेल्दी फूड टिफिन सर्व्हिस’ म्हणजे प्रेमाताईंच्या त्या उपक्रमाचा आधुनिक अवतार म्हणायला हरकत नाही. प्रेमा पुरव म्हणजे ‘अन्नपूर्णा’ हे एक समीकरणच बनून गेले. त्यामुळे त्यांचे नाव घेतले गेले की, मुंबईतल्या हजारो चाकरमान्यांचा जेवणाचा प्रश्न सोडवणारी ‘अन्नपूर्णा संस्था’ नकळत डोळ्यासमोर येते. प्रेमाताईंची गोवा मुक्ती संग्रामातील भूमिका, पुरोगामी राजकारणातील त्यांचा वाटा, कामगार चळवळीतील त्यांचा सहभाग या गोष्टी मात्र लोकांच्या थोड्या विस्मरणात गेल्या. त्यांना नव्याने उजाळा देण्यासाठी हा ‘जीवन गौरव पुरस्कार’ महाराष्ट्र फाउंडेशन देत आहे.

अशिक्षित आणि परित्यक्ता महिला व मुले यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचे सबलीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९७५मध्ये महिलाकेंद्रित ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ची स्थापना केली. प्रत्येक गरीब महिलेच्या चेहर्‍यावर हास्य आणि महिलांचे आर्थिक स्वावलंबन हे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. १९८२मध्ये गिरणी कामगारांच्या अभूतपूर्व संपानंतर मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. तेव्हा कामगारांच्या घरातील स्त्रियांना खाणावळ चालवण्यासाठीचे स्वयंपाकशास्त्राचे धडे द्यायला त्या पुढे सरसावल्या. त्याचप्रमाणे त्यांचे पदार्थ बँका, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये अशा ठिकाणी विकले जावेत म्हणून त्यांनी योग्य ते विक्री व्यवस्थापनही केले. पुढे ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ खाद्यपदार्थांसाठीच प्रसिद्ध झाले. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या माध्यमातून प्रेमाताई पुरव यांनी निराधार महिलांना आणि त्यांच्या  मुलींना शिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’त सहभागी होणार्‍या प्रत्येकास प्रेमाताईंची महिला सबलीकरणाची तळमळ आणि सामाजिक बांधिलकी जाणवत असते. ‘अन्नपूर्णा’ महिलांना सुरुवातीला महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मरून शपथ घ्यावी लागते. या शपथेचा आशय असा आहे -

- महिला आणि मुलीच्या सबलीकरणास प्रोत्साहन.

- ‘हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही’ हा निश्चय.

- लिंगनिदान करून स्त्रीलिंगी गर्भसमापन करणार नाही, ही प्रतिज्ञा.

- महिलांवरील सामाजिक अथवा कौटुंबिक हिंसा सहन करणार नाही, हा खंबीर दृढनिश्चय.

- मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करीन, हे आश्वासन.

- महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्याची काळजी.

प्रेमाताईंनी स्थापन केलेल्या ‘अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी मर्यादित’ या सोसायटीमार्फत स्वयंरोजगारासाठी गरजू महिलांना आणि पुरुषांना संयुक्त जबाबदारीवर विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच छोटा व्यवसाय, शिक्षण, घर दुरुस्ती, जुने कर्ज फेडणे यासाठी सूक्ष्म कर्ज (मायक्रो फायनान्स लोन) दिले जाते. आर्थिक साक्षरतेचे वर्ग घेतले जातात. ‘महिला प्रामाणिकपणे कर्ज फेडतात’ असा प्रेमाताईंचा अनुभव आहे. या उपक्रमात १०० टक्के कर्जवसुली साधलेली आहे.

अन्नपूर्णा महिला मंडळाने २०१६मध्ये ‘अन्नपूर्णा परिवार विकास संवर्धन’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘आधारपूर्ण’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे महिलांना विम्याची जरुरी आणि विमा व्यवसायाची ओळख करून देण्यात आली. मृत्यू, अपघात, शारीरिक हानी यांवर मात करून पुढ जाण्यासाठी विमा सुरू केला. दिवसभर घराबाहेर राहून काम करणार्‍या झोपडवस्तीतील महिलांच्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ‘वात्सल्यपूर्ण सेवा सहकारी सोसायटी’ हे केंद्र चालवले जाते. या केंद्रामुळे महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी मुलांना केंद्रात सोडून कामासाठी बिनधास्त घराबाहेर पडू शकतात.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रेमाताईंची ज्येष्ठ कन्या डॉ. मेधा सामंत-पुरव ‘अन्नपूर्णा परिवारा’तील सहा सहयोगी संस्थेची धुरा सांभाळत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘बँक ऑफ इंडिया’तील आपली सुखासीन नोकरी सोडून दिली. मेधाताईंचे मुंबईतील बालपण पुरोगामी वर्तुळात गेले. दहावीचा अभ्यास सांभाळून हिशोब लिहिणे, वर्गणीच्या पावत्या बनवणे, अशी मदत त्या आईला करत असत. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रेमाताई पुरव यांच्या दिवंगत पतींना, म्हणजेच नरेंद्र (दादा) पुरव यांना सामान्य नागरिकांसाठी देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्यदेखील महत्त्वाचे आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेच्या कर्मचार्‍यांना एकत्र आणून, ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन’ची स्थापना केली. सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले.

प्रेमाताई आणि दादा पुरव यांच्यापासून प्रेरणा घेऊन मेधाताई त्या दोघांचे कार्य आई-वडिलांच्या जवळच्या सहकार्‍यांच्या आणि इतर तज्ज्ञांच्या सहकार्यानं नेटानं पुढे नेत आहेत. ‘बँकेत होणारे घोटाळे जरी बँकांसाठी घातक ठरत असतील तरी यासाठी सरकारने त्यांचे खासगीकरण करणे हा उपाय नाही, तर मोठ्या उद्योजकांनी बुडवलेले पैसे त्यांच्याकडून वसूल करणे आणि बँका जास्त लोकाभिमुख करणे हा आहे’, अशा मौलिक विचारांचा प्रसार करत असलेल्या दादा पुरव यांच्या ज्येष्ठ कामगार मित्रांचे मार्गदर्शन त्यांना कायम लाभत गेले आहे.

दादा पुरव सातत्याने कष्टकरी स्त्रियांच्या आर्थिक शोषण व सक्षमीकरणाबद्दल बोलत असत. १९६९ ला भारतातील बँका राष्ट्रीयीकृत झाल्या, तेव्हा बँकिंग सेवा खेडोपाडी, सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत, हा त्यामागील उद्देश होता. अशा चर्चा कानावर पडत पडत मेधाताई लहानाच्या मोठ्या झाल्या. म्हणूनच पुढे जाऊन त्यांनी ‘अन्नपूर्णा लघुवित्त’ची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. आपल्या आईच्या विचाराला नवीन आर्थिक संकल्पांची जोड देऊन कामाची व्याप्ती वाढवली. ‘अन्नपूर्णा परिवार’तर्फे कष्टकरी स्त्रियांच्या मुलांना सांभाळण्याच्या प्रश्नापासून ते आकस्मिक आजारपणं, घरातल्या मुख्य व्यक्तीचे निधन अशा अनेक संकटप्रसंगांमध्ये तसेच इतर अनेक आघाड्यांवरही मदत केली जाते. सध्या ‘अन्नपूर्णा महिला क्रेडिट को ऑॅप. सोसायटी’ या संस्थेचे काम पुण्यातील ६०० झोपडपट्ट्यांत, तर मुंबईतील ५०० झोपडपट्ट्यांमध्ये जोमाने चालू आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

अन्नपूर्णा परिवारातील सर्व प्रकल्पांचे नेतृत्व सहभागी महिलांकडेच राहील, याकडे संस्था काटेकोरपणे लक्ष देत आहे. एकल मातेच्या मुलांना शिक्षण घेऊन भविष्य घडविता यावे यासाठी ‘विद्यापूर्ण प्रकल्प’ सुरू करून त्यामार्फत होतकरू मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’चे सहसंस्थापक असलेल्या दादा पुरव यांच्या स्मरणार्थ ‘दादा पुरव संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ ही संस्था जन्माला आली. या संस्थेत ‘मायक्रो फायनान्स’ आणि ‘मायक्रो इन्श्युरन्स’ या विषयांत संशोधन केले जाते, विद्यार्थ्यांना त्यातील प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रम आखले जातात, प्रकाशने आणि माहिती प्रसारण या स्वरूपाचे कार्यही केले जाते. प्रेमाताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २००२मध्ये तत्कालीन

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ सन्मान देऊन गौरविले. ‘अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थे’ने (AIWEFA) २००२मध्ये त्यांचा ‘स्त्री रत्न’ पुरस्कार देऊन गौरव केला. प्रेमाताई सध्या ८६ वर्षांच्या असल्यामुळे वयोमानानुसार येणार्‍या काही शारीरिक तक्रारी येऊ लागल्या आहेत. प्रेमाताईंच्या आणि अन्नपूर्णा परिवाराच्या आजवर केलेल्या महिलांविषयक सामाजिक कार्याला मनापासून सलाम आणि प्रेमाताईंना आरोग्यसंपन्न आणि आनंददायी आयुष्य लाभो, यासाठी सदिच्छा.

(‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’मधून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......