डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर बुवा-बाबांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढाईत त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तसाच लढा हरियाना राज्यातील सिरसा या गावचे एक निर्भीड पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी २० वर्षांपूर्वी सुरू केला होता. महाबलाढ्य बाबा रामरहीम याची आणि त्याच्या ‘डेरा सच्चा सौदा’मधील कृष्णकृत्ये ते आपल्या दैनिकातून प्रसिद्ध करत असत. एक प्रकारे ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेच कार्य करत होते. या लढाईत त्यांनाही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखीच प्राणाची आहुती द्यावी लागली. रामचंद्र छत्रपतींच्या खुनाचा अत्यंत जिद्दीने सलग १७ वर्षे पाठपुरावा करून बाबा रामरहीमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याला कारणीभूत ठरला, त्यांचा सुपुत्र अंशुल छत्रपती!
या अंशुल छत्रपती यांना महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा २०२१ सालचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदान करण्यात आला. अनेक मुलींचे लैंगिक शोषण करणार्या बाबा राम रहीमला तुरुंगात पाठवण्यासाठी अंशुल छत्रपती यांनी मोठा संघर्ष केला आहे. पुरस्काराला उत्तर देताना अंशुल छत्रपती म्हणाले, ‘‘माझे वडील रामचंद्र छत्रपती यांनी सच्चा डेराचे गुरमित रामरहिम याच्या विरोधात आवाज उठवला. हा आवाज दाबण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला. मात्र आम्ही घाबरलो नाही. १७ वर्षे आम्ही आमचा लढा सुरूच ठेवला. शेवटी न्याय मिळाला. गुरमित रामरहिमला शिक्षा झाली. डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. सूत्रधार पकडले गेले पाहिजेत. मला मिळालेला सन्मान रामचंद्र छत्रपतींच्या बलिदानाचा आणि अन्यायाविरोधात लढणार्या चळवळीचा आहे.’’
या पुरस्काराच्या निमित्ताने अंशुल छत्रपती यांच्याशी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी साधलेला संवाद.
..................................................................................................................................................................
राहुल थोरात : आपण रामरहीमसारख्या बड्या बाबाच्या विरोधात १७ वर्षे विनासंघटन उभे राहिलात, लढलात. तुमचा हा लढा आम्हाला प्रेरणा देतो. जेव्हा रामरहीम विरोधात कोणी लिहायला तयार नव्हते, तेव्हा रामचंद्र छत्रपती यांनी लिहिले. त्यांच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर वाटतो. रामचंद्रजींनी घालून दिलेल्या निर्भयतेच्या मार्गावर पुढील अनेक पिढ्या चालतील, अशी आम्हास आशा आहे. अंशुलजी मला सांगा, रामचंद्र छत्रपतींची जडणघडण कशी झाली, कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती?
अंशुल छत्रपती : माझे वडील रामचंद्र छत्रपती यांचा जन्म शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. माझे आजोबा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील होते. ते राहत असलेला भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. मग आजोबांनी सर्व कुटुंबाला भारतात स्थलांतरित केले. आमच्या कुटुंबाला सरकारने सिरसा येथे भरपाई म्हणून शेतजमीन दिली.
माझे वडील रामचंद्र छत्रपती हे लहानपणापासूनच धाडसी वृत्तीचे होते. त्यांच्यातील धाडसीपणा व नेतृत्वगुण पाहून त्यांचे शिक्षक एकदा त्यांना म्हणाले, “तुझ्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखी निर्भयता दिसते. त्यामुळे तुझ्या नावापुढे छत्रपती लाव.” त्यानंतर मग ते आपल्या नावासोबत ‘संधू’ऐवजी ‘छत्रपती’ असे अभिमानाने लावू लागले. या नावामुळे आमचे संबंध महाराष्ट्राशी जोडले आहेत, याचा अभिमान वाटतो.
कॉलेजमध्ये असताना रामचंद्र छत्रपती यांनी आर्यसमाज, स्वामी अग्निवेश यांच्यासोबत काम केले. आर्य समाजाच्या एका मासिक पत्रिकेचे काम करण्यासाठी ते दिल्लीत राहिले होते. तिथे त्यांची पुरोगामी विचारांशी ओळख झाली. धर्म, जाती यांमुळे माणसाचे शोषण होते. देवा-धर्माच्या नावाखाली काही चतुर लोक इतर लोकांना फसवतात, हे त्यांच्या लक्षात आले.
पुढे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. सिरसा कोर्टात वकिली चालू केली. मात्र त्यांचे मन त्यात रमेना. त्यांचा कल पत्रकारितेकडेच होता. त्यांनी दिल्लीहून प्रकाशित होणार्या ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू केले. त्यासोबत काही स्थानिक दैनिकांत स्तंभलेखन सुरू केले. पत्रकारितेत काम करताना संपादकाला आवडेल, रुचेल ते लिहावे लागते. अनेकदा आपण लिहिलेल्या मजकुराला संपादकाची कात्री लागते, असा त्यांना अनुभव आला. मग त्यांनी स्वत:चे ‘पुरा सच’ हे वर्तमानपत्र चालू केले. हे वर्तमानपत्र सुरू करताना त्यांनी शपथ घेतली होती की, ‘पूरा सच में पूरा सच ही छपेगा’. त्यात त्यांनी तत्कालीन चौटाला सरकार आणि आमच्याच गावात असणार्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या दहशती विरोधातल्या बातम्या छापायला सुरुवात केली.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
राहुल थोरात : तुमच्या सिरसा गावात बाबा रामरहीमने ऐवढे मोठे साम्राज्य कसे निर्माण केले?
अंशुल छत्रपती : १९९०च्या दशकात राजस्थानमधून आलेल्या नववी पास असलेल्या रामरहीमने बंदुकीच्या जोरावर डेर्याचे प्रमुखपद मिळवले असे म्हणतात. त्यानंतर त्यानं सिरसा भागात आपली दहशत पसरवली, लोकांच्या जमिनी जबरदस्तीने हडप केल्या. इतकी प्रचंड संपत्ती, हजारो एकर जमिनी ‘डेरा सच्चा सौदा’ने कशा लाटल्या, याची चौकशी कोणत्याच सरकारने कधी केली नाही. लोकांच्या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांनी तपास चालू केला. मात्र त्यांचे सरकार लगेच पडले आणि पुढे काहीच झाले नाही. अर्थात याच बरोबर हरियाना, पंजाबातील अज्ञानी गरीब लोक डेरा सच्चा सौदाचे प्रस्थ तयार करण्यास कारणीभूत ठरले.
राहुल थोरात : रामचंद्र छत्रपती आणि बाबा रामरहीम यांचा संघर्ष नेमका कशामुळे सुरू झाला?
अंशुल छत्रपती : बाबा रामरहीम आपल्या आश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण करत आहे, यासंदर्भात डेर्यातील अज्ञात मुलीचे पत्र अचानक एके दिवशी बाहेर आले. त्याच्या झेरॉक्स सगळीकडे मिळायला लागल्या. लोक कुजबूज करायला लागले, पण समोर येऊन कोणीही बाबा विरोधात बोलत नव्हते. सिरसामध्ये डेरा सच्चा सौदा आश्रमाने शाळा, कॉलेजेस काढली, तेथील भक्त मंडळी आपल्या मुलांना अॅडमिशन घेऊ लागली. त्यातही मुला-मुलींची शाळा-कॉलेजेस वेगळी होती. आश्रमात असणार्या शाळा-कॉलेजमधील सुंदर मुलींना ‘पित्या’ने म्हणजे रामरहीमने सेवेसाठी बोलवले आहे, असे सांगून त्याच्या गुहेत नेले जात असे. तिथे त्यांचे बाबा रामरहीमकडून लैंगिक शोषण केले जात असे. अशा पीडित मुलींनी ‘रामरहीमने काय गैरकृत्य केले’ हे आपल्या घरी सांगितले, तर बाबाचे भक्त असलेले पालक त्या मुलींवरच अविश्वास दाखवत. बाबाविरोधी बोलणार्या काहा मुलींना डेर्यात मारझोड केली जात असे. त्यांना आश्रमातही धड जगता येणार नाही; बाहेरही जगता येणार नाही, अशी त्यांची असहाय अवस्था केली जात असे.
२००२मध्ये ‘डेरा सच्चा सौदा’चा भांडाफोड करणारे एक निनावी पत्र एका पीडित मुलीने लिहिले. ते पत्र छापण्याचे धाडस कोणीही करेना. तेव्हा ते पत्र रामचंद्र छत्रपतींनी आपल्या ‘पुरा सच’ या सायंदैनिकात जसेच्या तसे छापले. त्यामुळे पंजाब-हरियानात मोठी खळबळ उडाली. लोक बाबा रामरहीमच्या विरोधात कुजबूज करू लागले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पहिल्यांदाच बाबा रामरहीम याच्या विरोधात वातावरण तयार झाले. त्यामुळे पंजाब-हरियाना हायकोर्टानं त्या मुलीच्या ‘पत्रा’ची आपण होऊन (suo moto) दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा न्यायाधीशांना आदेश दिले.
रामचंद्र छत्रपती या पत्र-प्रकरणाचे रोजचे अपडेट आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करू लागले. डेर्याने जमिनी बळकवल्याबद्दल लिहू लागले. या रामचंद्र छत्रपतीच्या पत्रकारितेमुळे आपल्या धार्मिक, आर्थिक साम्राज्याला हादरा बसू शकतो, हे चतुर रामरहीमने ओळखले, तो छत्रपतींवर हरप्रकारे दबाव टाकू लागला. भक्तांकरवी ‘अॅट्रॉसिटी’चे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या; पण माझे वडील दबले नाहीत. याची परिणती त्यांच्या खुनात झाली.
राहुल थोरात : बाबा रामरहीमच्या भक्त गुंडांनी रामचंद्र छत्रपतींवर राजरोस हल्ला केला?
अंशुल छत्रपती : हो ना... २४ ऑक्टोबर २००२च्या संध्याकाळी घराबाहेर आमच्या वडिलांना कोणीतरी मोठ्याने हाक मारली. कोण आले आहे, ते पाहण्यासाठी वडील बाहेर गेले, तेव्हा दोन तरुणांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करत पाच गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने आम्ही भावंडे बाहेर पळत आलो, तर गेटजवळ वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. गोळीबार करणारे युवक पळून जात होते. तेव्हा आम्ही भावंडांनी मोठ्यानं आरडाओरडा केला. त्यामुळे आमचे शेजारी गोळा झाले. शेजार्यांच्या कारमधून वडिलांना तातडीने आम्ही सिरसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. आमच्या घरापासून जवळच पोलीस चौकी आहे. आमचा आरडाओरडा ऐकून तेथील तैनात पोलीस सावध झाले. त्यांच्या समोरूनच ते हल्लेखोर पळून जात होते. एका धाडसी पोलीस शिपायाने त्यांचा पाठलाग करून तिथेच एका हल्लेखोराला पकडले, पण दुसरा निसटला. त्याच्याजवळील बंदूक, वॉकीटॉकी, गाडी आणि इतर सर्व वस्तू सापडल्या. या सर्व वस्तू म्हणजे बंदूक, वॉकीटॉकी ‘डेरा सच्चा सौदा’च्या मॅनेजरच्या नावाने रजिस्टर होत्या. त्यामुळे या खुनात बाबा रामरहीमचा हात आहे, हे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसत होते.
राहुल थोरात : मग सरकारने रामरहीम विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला का?
अंशुल छत्रपती : अजिबात नाही, कारण तत्कालीन हरियाना सरकार मतांसाठी रामरहीमच्या बाजूने होते. या सरकारचे रामरहीमला आतून सहकार्य होते. पोलीस आम्हाला सहकार्य न करता उलट त्रासच देत असत. रामरहीमचा आमच्यावर दबाव होता. नैतिक आणि विचारी जनांची ताकद सोडली, तर आमच्याकडे कोणतीच ताकद नव्हती. आम्हाला लोकशाही मार्गाने सगळे करायचे होते. या खुनानंतर सिरसामध्ये ‘जन संघर्ष मंच’ आणि ‘पुरोगामी तर्कशील संघटनां’नी मोठे आंदोलन पुकारले. वकिलांनी संप पुकारला. पत्रकार संघटनाही या आंदोलनात उतरल्या. बाबा रामरहीम विरोधात मोठे जनआंदोलन संपूर्ण हरियाना आणि पंजाब राज्यात उभे राहिले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री चौटाला वडिलांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. त्या वेळी मुखमंत्र्यांनी ‘या खुनामध्ये कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्याच्यावर सरकार नक्की कारवाई करेल’ असे आश्वासन दिले. पण त्याप्रमाणे मुख्यमंत्री वागले नाहीत.
हल्ला झाल्यानंतरही माझे वडील १५ दिवस हॉस्पिटलमध्ये जिवंत होते. मृत्यूशी अखेरची झुंज देत होते. या वेळी आम्ही पोलिसांकडे मागणी करूनही या खून खटल्यात अत्यंत महत्त्वाचा ठरला असता असा माझ्या वडिलांचा ‘ऑन रेकार्ड’ न्यायालयीन जबाब पोलिसांनी शेवटपर्यंत नोंदवला नाही. आम्ही मागणी करूनही एफआयआरमध्ये डेरा सच्चा सौदा आणि बाबा रामरहीम यांची नावे पोलिसांनी नोंदवली नाहीत.
राहुल थोरात : खुनातील मूळ सूत्रधारावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही जो न्यायालयीन लढा दिला, त्याच्याविषयी सांगा!
अंशुल छत्रपती : हरियाना सरकार व पोलीस हे संपूर्णपणे बाबा रामरहीमला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत होते, हे आम्ही पाहत होतो. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळणार नव्हता. डेर्याचे भक्त असणार्या हल्लेखोरांची ओळख पटूनही डेर्याचा प्रमुख रामरहीम याची साधी पोलीस चौकशी होऊ शकत नव्हती. त्यामुळे आम्ही या विरोधात पंजाब-हरियाना हायकोर्टात जायचे ठरवले. त्यानुसार वडिलांच्या वकील मित्रांकडून चंडीगढ हायकोर्टात मी एक याचिका दाखल केली. या याचिकेत आम्ही अशी मागणी केली केली, ‘हरियाना पोलीस या प्रकरणात पक्षपातीपणा करत आहे. प्राथमिक पुरावे बाबा रामरहीमच्या विरोधात असूनही त्याला आरोपी केले जात नाही, तेव्हा हे प्रकरण हरियाना पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे द्यावे.’
आम्ही कोर्टात गेल्याचा राग मनात धरून पोलिसांनी हे प्रकरण रामचंद्र छत्रपतींच्या सासुरवाडीतील एका जमिनीच्या वादातून घडले आहे, असं धादान्त असत्य पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. या प्रकरणाला अशा रीतीनं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
या अगोदर १० जुलै २००२ रोजी ‘डेरा सच्चा सौदा’चे मॅनेजर रणजित सिंग यांचा खून झाला होता. त्यानेच ते पत्र बाहेर काढले होते, असा त्याच्यावर संशय असल्याने त्याला संपवण्यात आले. आमच्या प्रकरणामुळे बाबा रामरहीम विरोधात वातावरण तयार झाले होते, तेव्हा मॅनेजर रणजित सिंगच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या खुनाची सीबीआय चौकशी व्हावी, म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली. या दोन्ही याचिका हायकोर्टात एकत्र सुनावणीला आल्या, तेव्हा रामरहीमने दिल्लीतील सुप्रिम कोर्टातील मोठमोठे वकील प्रचंड फी देऊन आमच्या विरोधात उभे केले, पण मेहेरबान कोर्टाने योग्य साक्षीपुरावे तपासून सीबीआय चौकशीची जॉईंट ऑर्डर दिली.
राहुल थोरात : सीबीआय चौकशीवेळी ही मोठमोठे अडथळे आणले गेले, त्याविषयीही सांगा -
अंशुल छत्रपती : हायकोर्टाने सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या या निर्णयाविरोधात बाबा रामरहीम सुप्रीम कोर्टात गेला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निकालावर स्टे दिला. तेव्हा तेथील अवघड लढाईत सुप्रसिद्ध विधिज्ञ राजेंद्र सच्चर यांनी आमचे वकीलपत्र घेऊन मोठे सहकार्य केले. विनामोबदला त्यांनी ही केस सुप्रीम कोर्टात लढवली व आमच्या बाजूने निकाल लागला. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बाबा रामरहीमची सीबीआय चौकशी सुरू झाली.
तपास यंत्रणेवर सरकार आणि बाबाचा दबाव होता. ‘डेरा’चे भक्त तपासात अडथळा आणत असत. साक्षीदारांच्या गावी सीबीआय पोलीस गेले की, बाबाचे हजारो भक्त त्या गावात जमा होऊन पोलिसांचीच नाकाबंदी करत. पोलिसांना त्या गावातून बाहेर पडू देत नसत. जमाव पांगवण्यासाठी सीबीआय राज्य पोलिसांना विनंती करत, परंतु राज्य पोलीस सीबीआयला सहकार्य करत नसत, तरीही सीबीआयचे निर्भीड अधिकारी सत्यपाल सिंगजी, सतीश डागरजी आणि त्यांच्या हाताखाली काम करणार्या कर्मचार्यांनी उत्तम काम केले. या केसच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला. रामचंद्र छत्रपती यांचा खून बाबा रामरहीम यांच्या सांगण्यावरून केला गेला, असा निष्कर्ष सीबीआयने काढला आणि तो कोर्टात सिद्धही झाला. कोर्टाने बाबा रामरहीमला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. केवळ सीबीआयमुळे वडिलांची हत्या, मॅनेजर रणजितिंसह यांची हत्या आणि साध्वीवरील लैंगिक अत्याचार या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन अंतिम निष्कर्षापर्यंत पोचता आले. हे सगळे घडत असताना कोर्टात रामरहीमचा ड्रायव्हर खट्टरिंसग यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कारण त्यांच्या समोरच खुनाचा कट रचला गेला होता.
राहुल थोरात : (ही मुलाखत घेत असतानाच एक बातमी येऊन थडकली- ‘बाबा रामरहीमला तुरुंग प्रशासनाने तीन आठवड्यांची रजा (फर्लो) मंजूर केली आहे’. मी त्या संदर्भात लगेचच प्रश्न केला-) अनेक निरपराध विद्यार्थ्यांना, विद्वानांना सहजासहजी बेल मिळत नाही. तुरुंगात खितपत पडावे लागते. या पार्श्वभूमीवर आपण या घटनेकडे कसे बघता?
अंशुल छत्रपती : बाबा रामरहीमला ज्या वेळी ही सुट्टी तुरुंग प्रशासनाने दिली आहे, ती वेळ तुम्ही बघा, सध्या पंजाब व उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. बाबा राम रहीमला मानणारा अजूनही मोठा समुदाय पंजाब व पश्चिम उत्तर प्रदेश राज्यात आहे. बाबाच्या भक्तांची मते आपल्या पक्षाला मिळावीत, असा छुपा उद्देश या रजेमागे आम्हाला दिसतो. बाबांच्या भक्तांच्या मतावर काही राजकीय पक्षांचा डोळा आहे, म्हणून हे बाबासोबत केलेले साटेलोटे आहे. नाहीतर दोन खून आणि दोन बलात्कार, अशा चार फौजदारी गुन्ह्यांबद्दल आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या बाबावर प्रशासन इतके का प्रसन्न होते? का मेहेरबान होते? या रजेची नि:पक्ष चौकशी निवडून आयोगाने करावी आणि बाबाची रजा त्वरित नामंजूर करावी, अशी मागणी मी केली आहे, यासंबंधी अनेक वृत्तवाहिन्यांवर मी अलीकडेच माझ्या मुलाखती दिल्या आहेत.
राहुल थोरात : सतरा वर्षे तुम्ही न्यायालयीन लढाई लढला. या सर्व संघर्षाबद्दल तुम्हाला आता काय वाटतं?
अंशुल छत्रपती : ही लढाई लढणे म्हणजे मोठ्या संकटात स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबाला ओढवून घेणे होते. सरकार, पोलीस, महाबलाढ्य बाबा आणि त्याचे आर्थिक साम्राज्य हे सर्व आमच्या विरोधी असूनही आपल्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही झटत होतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मुलींचे राजरोस लैंगिक शोषण करणार्या या बाबाला शिक्षा झालीच पाहिजे, याबाबत आग्रही होतो. या बाबाला शिक्षा झाली, तरच अजून काही मुली त्याच्या शोषणापासून वाचतील, तेव्हा हे काम आपण केलेच पाहिजे, असा माझा ‘आतला आवाज’ मला सांगत होता. त्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणेच मरण आले तरी बेहत्तर, असे मनोमन ठरवूनच या लढाईच्या मैदानात मी उतरलो होतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
भारतीय संविधानातील नागरिकांच्या हक्कावर माझा अपार विश्वास होता. किती मोठा बाबा असू दे, पोलीस असू दे, सरकार असू दे, भारतीय संविधानाने दिलेले हे हक्क कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, हे मला पक्के ठाऊक होते. याच संविधानाच्या हक्काच्या पाठिंब्याने मी ही लढाई लढून जिंकू शकलो. एका मोठ्या बाबाला जन्मठेपेची शिक्षा देऊ शकलो.
या सर्व लढाईत मानसिक आधार देण्याचे, कायदेशीर लढाईत साथ देण्याचं काम ज्यांनी केले, त्यांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. त्यांच्या सहकार्याची परतफेड मला करता येऊ शकत नाही. माझ्या वडिलांसारखेच बुवाबाबांच्या हल्ल्यात प्राणांची आहुती देणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने आज हा पुरस्कार मला मिळतोय, याचा आनंद किती झाला आहे, हे मी शब्दांत सांगू शकत नाही.
शेवटी एवढेच सांगतो, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आणि माझे वडील रामचंद्र छत्रपती यांनी ही जी बुवाबाजी विरोधी लढाई सुरू केली आहे, ती नक्की यशस्वी होईल. या महान हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
(‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’मधून साभार)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment