महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळींशी संबंधित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक-संपादक सुधीर बेडेकर यांचं ‘हजार हातांचा आक्टोपस’ हे १९७६ सालचं पुस्तक बऱ्याच वर्षांपासून ‘आऊट ऑफ प्रिंट’ आहे. हे पुस्तक पुरोगामी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांना दृष्टीकोन आणि दिशा देणारं आहे. आजही त्याची प्रस्तुतता जाणवते. त्यामुळे पुण्याचं हरिती प्रकाशन हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करत आहे. या नव्या आवृत्तीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अशोक राजवाडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
सुधीर बेडेकरांचं ‘हजार हातांचा आक्टोपस’ हे पुस्तक म्हणजे १९७० ते १९७६ या काळात विविध विषयांवरच्या त्यांच्यां लेखांचं संकलन आहे. आजची, म्हणजे २०२१ मधली, परिस्थिती पाहता १९६० आणि १९७०ची दशकं कशी दिसतात, हे पाहिलं तर काही बाबी ठळकपणे समोर येतात. प्रस्थापिताबद्दल तरुण पिढीच्या मनात संताप असला तरी तो काळ स्वप्नं पाहण्याचा होता. काही ठळक पर्याय आजूबाजूला होते. स्वप्नं पाहण्याची तारुण्यसुलभ उर्मी जागी राहील, अशा घटना जगाच्या रंगमंचावर घडत होत्या. बेडेकरांचं हे पुस्तक वाचताना त्याच्या खुणा जवळजवळ प्रत्येक लेखात दिसतात.
‘मागोवा’ नावाच्या त्या काळात निघालेल्या मासिकाचं स्वरूप, ज्याचे सुधीर बेडेकर संपादक व प्रकाशक होते, इतर मासिकांसारखं नव्हतं. त्या वेळच्या सुशिक्षित आणि चळवळ्या तरुण-तरुणींचा एक गट त्याभोवती सक्रिय झाला होता. या सर्व तरुण मंडळींचे विचार आणि त्यांच्या कृती यातून त्यांची अस्वस्थता व्यक्त होत होती. मागोवा गटातल्या काहीनी शहादा-तळोदा भागात जाऊन आदिवासी आणि शेतमजुरांमध्ये मध्ये लक्षणीय काम केलं आणि तिथल्या इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘श्रमिक संघटना’ बांधली. या संघटनेमधले निर्णय लोकशाही मार्गाने घेतले जात असत. तळागाळातल्या आदिवासी माणसाच्या मताचासुद्धा तिथे आदर केला जात असे. एखादा नेता किंवा पक्ष आपले निर्णय त्या कष्टकरी जनतेवर थोपत नव्हता आणि सत्तेची उतरंड तिथे अस्तित्वात नव्हती, हे या संघटनेचं वैशिष्ट्य होतं. दुसरीकडे, तिथले लढे शांततापूर्ण मार्गाने चालत. त्यांत हिंसाचार नव्हता. त्याच काळात उदयाला आलेल्या नक्षलवादी संघटनांपेक्षा हे काम वेगळं होतं. सुमारे शंभर गावांतून काही वर्षं हे काम सुरू होतं. सुधीर बेडेकर स्वतः जरी या कामात गुंतले नसले तरी अनेक प्रकारे ते अशा संघटनांशी जोडलेले होते आणि ‘निव्वळ एक मासिक चालवणारे’ इतकंच त्यांचं मर्यादित स्वरूपाचं काम नव्हतं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘मागोवा’मध्ये राजकारणासोबत सामाजिक तसंच सांस्कृतिक घटनांवर (यात अनेक कलांचासुद्धा समावेश होता) भाष्यं येत असत. अर्थकारण-राजकारणासोबत जातपात, धर्म, कला, कथा-कविता या सर्वांतून ताजेपणा जाणवत असे. चळवळ्या तरुण पिढीची मतं त्यातून व्यक्त होत होती. आपापल्या मनातल्या व्यथा, असंतोष त्यातून व्यक्त होत होते. लिहिणारे सगळे काही मार्क्सवादी नव्हते. नंतरच्या काळात नावारूपाला आलेल्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीला अनेक साहित्यिकांचं आणि कलाकारांचं लिखाण आणि कलाकृती ‘मागोवा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दिसतात. आणि हे घडवून आणण्यात सुधीर बेडेकरांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या मासिकाच्या मजकुरात जी विषय-विविधता होती, ती ‘हजार हातांचा ऑक्टोपस’मध्ये पाहायला मिळते. निव्वळ कोरडं, करडं आणि एकसुरी राजकारण तिथे नाही.
१.
तो काळ कसा होता, याची काही चित्रं या निमित्ताने डोळ्यांसमोर येत आहेत.
१९६० आणि १९७० ही दोन दशकं काय घडत होतं हे लक्षात घेतल्याशिवाय बेडेकरांच्या लेखनाचं आपल्याला नीट आकलन होणार नाही. त्यातही १९६५ ते १९७५ हा कालखंड आपल्याला नीट तपासून पाहण्यासारखा आहे. या काळात जगभर जे वारे वाहत होते, त्यांत तरुण पिढी अनेक प्रकारांनी आपला असंतोष व्यक्त करत होती. अमेरिकेतले तरुण-तरुणी व्हिएतनाम युद्धाच्या विरुद्ध बंड करत उभे राहिले होते. १९६४पासून अमेरिकेच्या विद्यापीठांत युद्धविरोधी निदर्शनांना सुरुवात झाली होती. ‘प्रेम हवं; युद्ध नको’ अशा घोषणा तरुण-तरुणी देत होते. बंदुकीच्या नळीत खोवलेलं फूल, हे जसं त्या काळातल्या अस्वस्थतेचं प्रतीक म्हणून पुढे येतं, तसंच ‘सत्ता बंदुकीच्या नळीतून जन्माला येते’ हे माओचं घोषवाक्यदेखील तरुणांत लोकप्रिय होण्याचे ते दिवस होते. पश्चिमी दुनियेत बीटल्स लोकप्रिय झाले होते ते याच काळात. हिप्पी तरुण-तरुणींचे जत्थे वावरत होते ते याच काळात.
इतकंच नव्हे तर लिबरेशन थिऑलॉजीचे वारे त्या काळात ख्रिश्चन धर्मोपदेशकांत वाहत होते. त्यांच्या दृष्टीने येशू हा गोरगरिबांचा प्राधान्याने विचार करणारा; त्यांचा कैवार घेणारा माणूस होता. विशेषत: लॅटिन अमेरिकेत या विचाराचे काही धर्मगुरू होते. व्हॅटिकन विरुद्ध बंड करून हे धर्मगुरू तिथल्या डाव्या शक्तींच्या सोबत त्या काळातल्या हुकुमशाही आणि अमेरिकाधार्जिण्या राजवटींविरुद्ध लढत होते. १९६८ साली फ्रान्समधले विद्यार्थी बंड करून उभे राहिले होते आणि तिथे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.
त्या काळातली तरुण पिढी प्रचलित भांडवली प्रस्थापितासोबत लढत होती. पण त्या काळच्या डाव्या पक्षांबद्दल त्या वेळच्या पिढीला वाटणारं असमाधान, हा या चळवळीमागचा एक महत्त्वाचा घटक होता. ज्यों पॉल सार्त्र, बर्ट्रांड रसेल यांसारखे विचारवंत त्या काळात ठाम युद्धविरोधी भूमिका घेऊन उभे होते. यातून तरुण पिढीला बळ मिळत होतं. १९७१ मध्ये कम्युनिस्ट विचारांचा साल्वादोर आयंदे चिले नावाच्या देशात निवडणूक जिंकून सत्तेवर आला, ही घटना सगळ्या तरुणाईच्या उत्साहात भर घालणारी होती. एखाद्या देशाच्या पातळीवर हे प्रथमच घडत होतं. नंतर तिथे लष्करी कट झाला आणि १९७३मध्ये त्या सगळ्या क्रांतिकारी घटनेवर बोळा फिरला. तसं झालं तरी ‘निवडणुकांद्वारे एखाद्या देशाच्या पातळीवर कम्युनिस्ट सत्तेवर येऊ शकतात’ ही भावना आशावाद जागा ठेवणारी होती. (पुढे १९९८नंतर नऊ लॅटिन अमेरिकन देशांत तांबूस लाट (पिंक टाइड) आली. तिच्यात डाव्या विचारांकडे झुकलेले नेते लोकशाही मार्गानेच निवडणूक जिंकत सत्तेवर आले होते.) १९७५ साली अमेरिकेने व्हिएतनाम युद्धातून माघार घेतली ही घटना त्या काळच्या आशावादाला अधिक बळ देणारी होती. लोकसहभाग जर बलवत्तर असेल तर एखादा चिमुकला आणि दरिद्री देश महासत्तेलासुद्धा कसा हरवू शकतो याचं प्रत्यक्ष दर्शन जगाला घडलं होतं.
पश्चिमी जगात ‘नवे डावे’ (न्यू लेफ्ट) नावाचा प्रवाह याच काळात सुरू झाला. हे डावे रशियन आणि चिनी अशा दोन्ही पद्धतींच्या कम्युनिझमबद्दल साशंक होते.
भारतात या काळात घडणाऱ्या घटना पाहिल्या तर काही महत्वाचे बदल होताना दिसतात. १९६८ ला पश्चिम बंगाल मधल्या नक्षलबाडी नावाच्या गावात एक चळवळ सुरू झाली. तरुणांच्या डोक्यात त्या वेळी सुरू असलेल्या असंतोषाचं एक टोकाचं आणि हिंसक रूप तिच्यात दिसत होतं. ते दिवस तत्कालीन प्रस्थापितबद्दल वाटणाऱ्या भ्रमनिरासाचे होते. नेहरूंचा मृत्यू १९६४मधला. स्वातंत्र्यसंग्रामात लढलेली पिढी हळूहळू मागे पडत होती. व्यक्तिगत आकांक्षांनी भारलेलं नवं नेतृत्व सत्तेवर येताना दिसायला लागलं होतं. समाजातले सधन राज्यव्यवस्थेवर कब्जा करत आहेत याची वाढती जाणीव सर्वांना दिसत होती. भ्रष्टाचाराने सत्ताधारी पक्ष ग्रासले होते. आणि अनेक प्रकारांनी हा भ्रमनिरास व्यक्त होत होता.
१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे नवनिर्माण आंदोलन सुरू झालं, त्यातून जनतेच्या साचलेल्या भ्रमनिरासाचे आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येतात. दारिद्र्य, भाववाढ आणि पदोपदी जाणवणार भ्रष्टाचार हे मुद्दे घेऊन जयप्रकाशांनी १९७४मध्ये ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिली. त्या काळातल्या युवावर्गाने या साऱ्याला प्रतिसाद दिला. पुढे १९७५मध्ये इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीमागे अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या निकालाचा मुद्दा असला तरी जेपींच्या आंदोलनाला थोपवण्याचं काम आणीबाणीत झालं. आणीबाणी आल्यावर जेपींची तुरुंगात रवानगी झाली. भारतापुरतं बोलायचं तर इंदिरा गांधींची आणीबाणी हा १९७०च्या दशकातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड होता. तिथून पुढे या असंतोषाने एक वेगळंच रूप घेतलं. पुढे १९७७मध्ये ‘जनता पक्ष’ नावाची आघाडी आणि नंतरच्या घडामोडी हे एक वेगळंच प्रकरण आहे
सांस्कृतिक महत्त्वाच्या काही प्रवाहांचा उगम १९६० नंतरच्या दोन दशकांत दिसतो. श्रीलंकेतले प्रसिद्ध विवेकवादी डॉ.अब्राहम कोवूर यांनी आपल्या ‘सिलोन रॅशनॅलिस्ट स्थापना १९६०मध्ये केली. ‘केरळ शास्त्र साहित्य परिषदे’ची स्थापना १९६२ सालात झाली. केरळमध्ये गेली साठएक वर्षं जनतेत विज्ञाननिष्ठा जागी ठेवण्याचं काम ती करत आली आहे. विज्ञान आणि समाज यांच्यातील संबंधाचं एक वेगळं भान यायला सुरुवात झाली होती.
नाटकांबद्दल बोलायचं तर बादल सरकार हे या काळातलं आणखी एक महत्त्वाचं नाव. १९७०च्या आसपासच्या नक्षलवादाच्या काळात त्यांची नाट्यजाणीव बहरलेली दिसते. ‘एबोंग इन्द्रजित’, ‘बाकी इतिहास’, ‘पगला घोडा’ यांसारख्या त्यांच्या नाटकांची अनेक भाषांत रूपांतरं झाली आहेत. रंगभूमीला दिवाणखान्यातून मोकळ्या प्रांगणात आणि रस्त्यावर आणण्याचं महत्वाचं काम बादल सरकारनी केलं आहे. नंतरच्या काळात अनेक प्रकारे दिसणाऱ्या ‘पथनाट्य’ या प्रकाराचे बादल सरकार हे एक खंदे धुरंधर होते. मराठी रंगभूमीवर त्यांच्या ‘जुलूस’ या भाषांतरित नाटकाचा प्रभाव काही वर्षं होता. आपल्या देशात आणि आसपास चाललेल्या अशा अनेक घटना आणि प्रवाह आपल्याला सांगता येतील.
भारतीय सिनेमातली नवी लाट याच काळातली. मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’ हा चित्रपट १९६९ मधला. तो या देशातल्या नव्या लाटेची सुरुवात मानली जाते. तसंच अधिक पाहिला जाणारा (काहीसा मध्यममार्गी) शाम बेनेगल याचा सिनेमा पाहिला, तर त्यावरही या काळातल्या जाणिवेचा प्रभाव दिसतो. अंकूर (१९७३) आणि निशांत (१९७५) हे बेनेगलांचे पहिले दोन चित्रपट जर आपण बारकाईने पाहिले, तर त्यांतून या काळात तरूण पिढीच्या मनात चाललेली खळबळ आणि निषेध दोन्ही स्पष्टपणे ऐकू येतात. (या दोन्ही चित्रपटांचा शेवट या दृष्टीने सूचक आहे.) सत्यजित राय यांचा ‘प्रतिद्वन्द्वी’ आणि मृणाल सेन यांचे ‘इंटरव्ह्यू’, ‘कोलकता ७१’, हे चित्रपट तर स्पष्टपणे या काळातल्या कोलकत्यातल्या असंतोषाचं दर्शन घडवतात.
या दरम्यान महाराष्ट्रातही काही बदल घडत होते. नव्याने शिकून जागा झालेला कष्टकरी आणि दलित आपल्या व्यथा मांडत होता. जाती आणि वर्ण यांविषयी प्रश्न समोर येत होते. नारायण सुर्वे यांचा ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा कवितासंग्रह १९६२सालचा तर त्यांचा ‘माझे विद्यापीठ’ हा संग्रह १९६६ सालचा. नामदेव ढसाळांचा ‘गोलपिठा’ हा संग्रह १९७२ साली आला. ढसाळांचा ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’ हा संग्रह मागोवा प्रकाशनाने १९७५मध्ये काढला. या दोन्ही कवींनी कष्टकरी समाज, भीषण जातीव्यवस्था आणि दारिद्र्य, अधोविश्व यांचे प्रश्न समोर आणले. बाबूराव बागूल, दया पवार यांचं लेखनही या परंपरामधलंच होतं. हे सगळं सुखवस्तू आणि उच्चवर्णीय मराठी साहित्यविश्वाला अनोखं आणि हादरवून टाकणारं होतं. त्याची अनेकांगी चर्चा नंतर कितीतरी वर्षं होत राहिली. हे आणि इतर अनेक नवे-जुने अनेक कवी-लेखक हे मागोवा मासिकाला आपलं एक हक्काचं व्यासपीठ मानत असत.
स्त्रीमुक्ती चळवळीला १९७५नंतर जोर आला, असं मानलं जात असलं तरी त्या प्रश्नाचे काही आविष्कार आजूबाजूला दिसत होते. (‘मागोवा’ मासिकाने १९७३मध्ये आपला स्त्रीमुक्ती विशेषांक काढला होता.) मराठीतली अनियतकालिकांची चळवळ, हा या काळातला एक महत्त्वाचा साहित्यिक आविष्कार. प्रस्थापितावर घणाघात करून साचलेल्या साहित्यजाणिवेला आणि आविष्काराला प्रवाही करण्याचं महत्वाचं काम अनियतकालिकांनी केलं. सुधीर बेडेकरांनी आपल्या ‘निशासूक्त का सूर्यगर्जना’ या प्रदीर्घ लेखात त्याविषयी केलेलं जे भाष्य आहे त्यातून बेडेकरांची पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट होत होती. (१९७०मध्ये हे लिखाण प्रसिद्ध झालं होतं. ते टिपण वाचलं तर त्यात त्या काळच्या अनेक घडामोडींचा त्यांनी परामर्श घेतला आहे.)
२.
‘हजार हातांचा आक्टोपस’मधली काही अवतरणं पाहण्यासारखी आहेत.
‘‘जे जे जागे आहेत, तरुण आहेत, अन जन्माने, पैशाने वा सांस्कृतिक कारणांमुळे खालच्या वर्गातले आहेत, त्या सगळ्यांमध्ये प्रचंड असंतोष व असमाधान आहे. त्यांना कोणत्याही पक्ष वा प्रणालीविषयी भक्ती नाही. त्यांची फार फसवणूक झाली आहे. चालली आहे. ते आता सगळेच तपासून घेतील. आपले मार्ग आपण घडवतील. त्यांना आपल्यात ओढण्याचे प्रयत्न सगळीकडून होतील. पण या माराच्या यक्षसैन्याला ते भीक घालणार नाहीत. ते स्वतः स्वतःच्या क्रांतीच्या वाटा धुंडाळतील.’’
अशी बेडेकरांची विधानं त्या काळातल्या एकूण परिस्थितीचं दर्शन घडवणारी आहेत. सभोवतालच्या समाजजीवनात काहीतरी मुळातच चुकलं आहे; तरीपण आशेची ज्योत जागी आहे; समोर चाललेल्या गोष्टींना क्रांतिकारी पर्याय आहेत असं वाटण्याचा तो कालखंड होता. सोविएत रशिया आणि चीनच्या क्रांतीबद्दल त्यावेळी तरुण असलेल्या आमच्या पिढीत बरेच संभ्रम होते; काहीतरी चुकत असल्याची जाणीव होती; पण अद्याप त्या दोन्ही देशांत काटे उलटे फिरले नव्हते. ‘कार्यकर्त्यांची एक नवी फळी निर्माण होऊन ‘ते स्वतः स्वतःच्या क्रांतीच्या वाटा धुंडाळतील’ असा विश्वास वाटण्याचे ते दिवस होते.
‘‘… मार्क्स लेनिन पाठ म्हणता आले की व त्यांची तत्त्वं समजली की संपलं, असली अल्पसंतुष्ट वृत्ती आता निकामी आहे; गेल्या शंभर वर्षांतल्या ज्ञानाची भर घालून मार्क्सवादाचा विस्तार आणि खोली वाढवणं जरूर आहे’’ असं विधान बेडेकर करतात तेव्हा परंपरागत मार्क्सवाद्यांच्या मर्यादा उघड करत आपल्या नव्या अपेक्षा व्यक्त करताना ‘ते शक्य आहे’, असा भाव त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो. कारण पुढे लगेच ते ‘अशी प्रक्रिया जगभर सुरू असल्याचं’ म्हणतात; रशिया, पूर्व युरोप, चीन आणि क्यूबा येथे नव्या कल्पना आणि नवे विचार यांची खळबळ चालू असल्याचं मान्य करतात. ‘मार्क्सवादाला एवढे चांगले दिवस बऱ्याच दिवसांत आले नव्हते’ असं त्याच पानावर म्हणतात.
मात्र इतकं असूनही ‘एवढे चांगले दिवस’ पेलण्यासाठी मार्क्सवादी सक्षम नव्हते, याची कबुली देताना ‘कम्युनिस्ट शहरी आणि पुस्तकी राहिले आणि याचमुळे साम्राज्यशाहीविरुद्ध लढणारी व समाजात क्रांती मागणारी सर्वांत सुसंगत व लढाऊ शक्ती म्हणून ते स्वतःला रुजवू शकले नाहीत’, याची कबुली ते पुढे देतात.
‘‘आपण साऱ्याच गोष्टींबद्दल संशय घेतला पाहिजे आणि प्रश्न विचारत गेलं पाहिजे -अगदी मार्क्सवादालासुद्धा’’ असं सुधीर बेडेकर म्हणतात. या संदर्भातली एक आठवण मनावर कायमची कोरली गेली आहे. त्या काळात केव्हातरी एकदा मागोवा गटातले काही जण आणि एका डाव्या गटाचे नेते अशी एक संयुक्त बैठक मुंबईत झाली होती. बेडेकरांच्या ‘मार्क्सवादाला सुद्धा प्रश्न विचारण्या’वरून त्या गटाच्या नेत्यानी नाखुशी व्यक्त केली होती. मार्क्सवाद ही जणू शंकेला वाव नसलेलं चिरंतन सत्य आहे, असं त्यांना सुचवायचं होतं. बेडेकरांसह ‘मागोवा’मधले आम्ही अनेक तरुण विज्ञान आणि अभियांत्रिकीत शिक्षण घेतलेले होतो. अशी पोथीबद्धता आम्हाला अनोळखी आणि धक्कादायक होती.
जून १९७५ मध्ये ‘मागोवा’ गटात तात्त्विक कारणांवरून फूट पडली आणि त्याचा शेवट कालांतराने हा गट विसर्जित होण्यात झाली. आणीबाणीच्या वेळी ‘मागोवा’ गटाचं अस्तित्व नाममात्र होतं.
बेडेकरांनी आपल्या या पुस्तकात तत्कालीन मुद्द्यांची जी चर्चा केली आहे, त्यातून बेडेकरांची साठोत्तरी राजकीय जाणीव कशी दिसते ते लक्षणीय आहे. उदाहरणार्थ : ‘‘आजवर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांनी केलेल्या प्रचंड चुकांचा आपल्याला विचार करावा लागेल’’ असं ते एके ठिकाणी म्हणतात. मार्क्सने सामाजिक नियतीवाद सांगितला होता काय; बाबासाहेब आंबेडकरांनी सुधारून घेतलेला बौद्धधर्म काय होता; तो मूळ बौद्ध धर्मापेक्षा वेगळा होता काय; त्याचं सामर्थ्य आणि त्यातल्या त्रुटी यांचा विचार झाला पाहिजे असं ते मांडतात. उजवे, डावे कम्युनिस्ट, समाजवादी, रिपब्लिकन पक्ष या सगळ्यांवर रागावलेल्या तरुण पिढीचं बेडेकर प्रतिनिधित्व करतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
आणखी एका गोष्टीची नोंद मुद्दाम घेणं आवश्यक आहे. गांधींच्या बरोबर डॉ. आंबेडकरांच्या कार्याची ताकद आणि मर्यादा या दोहोंचीही बेडेकरांना जाणीव आहे. बाबासाहेबांचा मार्ग सनदशीर, घटनात्मक आणि एकूणच गांधींपेक्षा रानड्यांकडे झुकणारा होता, हे त्यांचं निरीक्षण लक्षणीय आहे. दलितांना ते ‘अत्यंत क्रांतिकारक वर्ग’ असं पुढे म्हणतात (हा निष्कर्ष सगळ्या मार्क्सवाद्यांना पटणार नाही) आणि अशा वर्गाला हा सनदशीर आणि घटनात्मक मार्ग मानणारा नेता मिळावा, हा इतिहासाचा खेळ होता; यामुळे त्यांच्या चळवळीत तीन लढे (महाडचा सत्याग्रह/मनुस्मृतीदहन, नाशिकच्या काळाराम मंदिरातला सत्याग्रह आणि पुण्यातला सत्याग्रह) सोडून जनतेचे लढे झाले नाहीत; मागण्या, प्रतिनिधित्व आणि निवडणुका यांचंच प्राबल्य झालं; जातीव्यवस्थेचा नाश हा त्यांचा ध्यास होता; बाकी सर्व गोष्टी दुय्यम होत्या, अशी विधानं बेडेकरांनी परखडपणे मांडली आहेत.
आंबेडकरांसोबत फुल्यांच्या कामाचीही त्यांनी समीक्षा केली आहे. त्यानंतर ते आजच्या रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या वाताहतीकडे येतात. अशी सारी सूत्रं घेऊन ते स्वाभाविकपणे त्याकाळच्या जनसंघाकडेसुद्धा वळतात. ही केवळ उदाहरणं झाली. महत्त्वाची गोष्ट ही की, बेडेकरांना बहुक्षेत्रीय भान होतं. ऑक्टोपसच्या अनेक हातांचा त्यांनी विचार केला होता. म्हणूनच त्यांनी या संग्रहाला दिलेला ‘ऑक्टोपस’ हा शब्द चपखल आहे.
‘हजार हातांचा आक्टोपस’ - सुधीर बेडेकर
हरिती प्रकाशन, पुणे
मूल्य - १९० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment