अजूनकाही
‘वाद’ ही तत्त्वज्ञानातील एक संकल्पना आहे. राष्ट्रवाद, जीवनवाद, कलावाद, मानवतावाद, हा जसा एक विचार आहे, तसंच मानवमुक्ती, समता व विश्वबंधुत्व, जाती-धर्मविरहीत माणूस म्हणून जगण्याचा मार्ग म्हणून आंबेडकरवादा\विचारधारेकडे पाहिले जाते. ‘आंबेडरवाद’ ही संकल्पना मानवी मूल्यांच्या पेरणीतून उदयास आली आहे. ही तात्त्विक संकल्पना ललितसाहित्यातून व्यक्त करणे अतिशय कठीण काम आहे. पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी ‘गनीम’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने यशस्वी व जबाबदारीने केले आहे.
यापूर्वी अंभोरे यांचे ‘पत्ता बदलत जाणारा गनीम’ व ‘धगीवरची अक्षरं’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. प्रस्तुत ‘गनीम’ या त्यांचा तिसरा संग्रह. मानवीमुक्तीच्या विचाराला शिरोधार्य मानणारी, कुठल्याही अंधविश्वासाला, श्रद्धेला बळी न पडता विवेकबुद्धीचे सतेज ज्ञान समाजात प्रवाहीत करणारी, स्वयंप्रकाशित होण्यासाठी मर्म सांगणारी ही कविता आहे. मनोगतात अंभोरे म्हणतात, “जे वाटतं ते सगळे शब्दांत बांधता येत नाही. काव्यात बांधण्याची कदाचित माझ्यात कुवतही नाही. पण जेवढं कळतं, तेवढंसुद्धा सांगणं महत्त्वाचं वाटले म्हणून हा प्रयत्न! यातील बऱ्याचशा कविता स्वपरीक्षणाच्या, टोकदार वास्तवाच्या नि ढोंगीपणाचे बुरखे फाडणाऱ्या दिसतील. जे आहे, जे कळलं ते मांडत गेलो. स्वतःशीही भांडत गेलो.”
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हा संग्रह मुखपृष्ठापासून आकर्षित करतो. पहिलं पान उघडताच एक वाक्य येतं- ‘मी माझीच कविता दुरुस्त करीत चालतो’. या वाक्याचे अनेक अन्वयार्थ मनाला स्पर्शून जातात. अजून थोडं आपण पुढे गेलो की, कवी-समीक्षक अर्जुन डांगळे यांची प्रस्तावना संग्रहाचा अर्क सांगते.
हा कवितासंग्रह पाच भागांत विभागलेला आहे. एकूण शंभर कविता या संग्रहात आहेत. वीस वीस कवितांचे पाच भाग या अर्थानं ही संख्यात्मक विभागणी केली नाही, तर ‘प रि व र्त न’ या पाच अक्षरांच्या अवकाशात सर्व कविता सामावलेल्या आहेत. काळानुरूप आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे, परंपरागत चौकटीत तयार झालेली मिथकं तपासून घेतली पाहिजेत, ही कवीची इच्छा आहे. कवितांची शीर्षकंही या अर्थानं बोलकी आहेत. ‘कविता अपरिहार्यतेच्या’, ‘अन्वयार्थ’, ‘लखलाभ’, ‘गद्दार’, ‘संभ्रमित’, ‘चळवळ : कालची आजची’, ‘अकलेच्या चड्डीचं बक्कल तुटलेल्या बुद्धीवादी’, ‘मेंदूला नाल जिभेला लगाम’, ‘समरसता’, ‘मूक इशारा’, ‘इरादा’, ‘होपलेस’, ‘रिॲक्शन कविता : भारतरत्न’... या नावातच सूचकत्व आहे.
प्रस्तावनेत डांगळे म्हणतात, ‘गनीम म्हणजे मानवमुक्तीच्या लढ्यात खोडा घालणाऱ्या प्रवृत्ती होत. असे तत्त्वज्ञान, अशा संघटना आणि त्यांची कृती ही ‘फॅसिझम’कडे झुकणारी असते. या गनिमाचा प्रतिकार करावयाचा असेल तर या गनिमाचे नेमके स्वरूप काय आहे, हे ओळखायला हवे आणि त्याबाबतची परिपूर्ण समज अंभोरे यांच्या कवितेला आहे.”
कवीला याची जान आणि भान आहे, म्हणून ते लिहितो-
“आता थोडं सावध व्हायलाच हवं
पाठीशी उभं असणारावर नि
पाठीवरून हात फिरवणाऱ्यावरही शंका घ्यायला हवी”
कारण शत्रू नव्या रूपात वावरतोय. आपण शत्रूच्या छावण्यांची पुराण ठिकाणं तीच तीच समजून आपल्याच पायावर आपण दगड मारून घेत आहेत. ‘हे रस्ते, जमीन, इमारत, झाडे, पानं, फुले आपलीच आहेत असं पिंजऱ्यात राहून फक्त हो हो म्हणायचं’ ही हवा पालटलेली लोकशाही आहे. हे कळत असूनही जर तुम्हाला कुणालाही न दुखवता मोठेपणाचं तत्व बाळगत असाल तर कवी म्हणतो-
‘तुम्हाला लखलाभ
फुल्यांच्या घोषणेतच अडकायचं असेल तर
तुम्हाला लखलाभ
भीमाच्या पुण्याईतच मानायची असेल कमाई
तर तुम्हाला लखलाभ’
गावाबाहेर आणि गावातच व्यथांचे डोंगर उभे असताना तुम्ही बुद्ध, फुले आंबेडकरांचा पीर करण्यात धन्यता मानत असाल, तर हे जगणं तुम्हालाच लखलाभ असो, असं कवी चिडून म्हणतो. पेटणारी वणवा आणि जळणारी पायवाट यांचा आपला काय संबंध आहे, असं वाटत असेल तर ‘आता आपलं चांगभलं’ असं कवी उपहासानं म्हणतो.
आज आपण एका अनाकलनीय व्यवस्थेतून वाटचाल करत आहोत आणि आपले नेते, वक्ते, समाजसुधारक, जनता या चक्रात सहज अडकले जात आहेत, ही भीती कवीला वाटते आहे. म्हणून तो उपहासानं, तर कधी उपरोधानं चिमटा काढतो. ‘वक्तापुरता वक्ता नि कालचाच तक्ता’ या कवितेत कवी म्हणतो- शत्रू नेहमीच चांगला बोलतो. आपला इतिहास, संघर्षमय गाथा शब्दाशब्दात रंगवतो. तोंडपाठ बोलणे हा त्यांचा धंदा आहे, पण वांधा आपला होतो.
‘करायचेच असेल क्रांतिपुरुषांना
बाबा
अवतारीपुरुष'
तर ते
गुलाल-नारळ फोडतील’
असे मतलबी समाजवादी कवींना सगळीकडेच दिसतात. भाजप, काँग्रेस, लाल निशाण किंवा कुठलाही गामी-आगामी-पुरोगामी-प्रतिगामी सर्वत्र याचा संचार असतो. यास आजचे विचारवंतही अपवाद नाहीत असं कवीला वाटतं. कुठल्याच दावणीला विरोध न करणारे आपण ‘जरीला’ झालोय ही खंत कवीला आहे.
‘डोळ्याला झापड
मेंदूला नाल
जिभेला लगाम
लावणं जमलं की
सारंच सुजलाम सुफलाम होतं’
सावल्या सावल्यांनीच जगायचं म्हटल्यावर उन्हात पाय कुणी ठेवायचा? चौकटी कुणी मोडायच्या, हरवलेल्या वाटा कुणी शोधायच्या? असा प्रश्न कवी विचारतो. ‘सावल्या सावल्यातच बा गेला असता, तर त्याचा बाबासाहेब झाला असता का?’ हा प्रश्न तर आपल्या मेंदूत घुसळण करून जातो.
आपणास प्रश्न पडले पाहिजे. व्यवस्थेनं लादलेल्या संकल्पना तपासून घेता आले पाहिजे. त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे, ही कवीची भूमिका आहे.
‘ज्ञानेशाची समाधी
तुकयाचं अवकाशगमन
चोख्याचं भिंतीखाली मरण
याचं हनन त्यांचं नमन’
याचे काय काय अर्थ असतील? हा प्रश्न कवीला सतावतो. जुनी परंपरा, चौकट शाबुत ठेवण्यासाठी नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्या समोर आणले जात आहे. सातत्यानं एखादी गोष्ट खोटी, चुकीची सांगितली गेली, तर ती खरी वाटायला लागते. आपणास त्या गोष्टीची सवयच होऊन जाते. पण विवेकभान असणाऱ्यांनी ती तपासून घेतली पाहिजे, वेळप्रसंगी बंडाची गर्जना करून त्यावर प्रहार केला पाहिजे, म्हणून कवी म्हणतो-
‘नेहमी नेहमी
त्याच त्याच गोष्टी
सांगण्याची नि ऐकण्याची
सवयच झालीये आपल्याला
आता आपले कान कापले पाहिजेत नि
सांगणाराचे तोंड फोडले पाहिजे!’
पण व्यवस्था एवढी कुटील आहे की, आपण त्यांनी केलेल्या मोठेपणाला, दिलेल्या सन्मानाला बळी पडतो. ही व्यवस्थेची एक चाल असते, म्हणून कवी इ.स.पूर्व काळापासून संदर्भ देत आपल्या डोळ्यात अंजन घालतो. म्हणतो-
‘तसं त्यांचं हे गणित नवं नाही
बुद्धालाही त्यांनी असंच
अवतार चक्राचं लेबल दिलं
तुकारामाचं गोलमटोल आध्यात्मिकीकरण
राजा शिवाजीचं गोब्राह्मण प्रतिपालकत्व
नि
भारतरत्न
यात तसा
थोड्या फार फरकानेही फरक वाटत नाही
त्यांचे मोठेपच बहाल करण्याची पद्धतच
आता पटत नाही!’
आज तर या रत्नमालेत ‘लिंबू-टिंबू-लोंबडे-चोंबडे’ या रांगेत बसवून ‘रत्न’ची हवाच काढून घेतली. त्यामुळे ‘रत्न’पणाच्या गर्वानं वागण्यात काही अर्थ नाही, असं कवीला वाटतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
कवी जसा आपणास व्यवस्थेतील कुटील चाली उलगडून दाखवतो, तसे तो आम्ही जागरूक झालोय, हे प्रस्थापितांना आणि विषमतावाद्यांना प्रतिमांच्या भाषेत सांगतो-
‘तहान भागविण्याची कला
कावळे शिकलेत
खडे उचलून उचलून घामाघूम होण्यापेक्षा
पाण्याचाच नवा साठा शोधण्याच्या गोष्टी ते
कोवळ्या कावळ्याला शिकविताहेत’
अनेक मिथकांना कवीने दिलेलं उत्तर विचार करायला भाग पाडतं.
थोडक्यात, हा संग्रह आपल्या जगण्याच्या पद्धतीला, मोठेपणाच्या गर्वाला, परंपरागत विषमतावादी मूल्यं रुजवणाऱ्या मिथकांना उघडा पाडतो. आणि कविता बुद्ध, कबीर, फुले, मार्क्स, आंबेडकर यांची पायवाट रुजवतो.
‘गनीम’ - उत्तम अंभोरे
सौरव प्रकाशन, औरंगाबाद
पाने – २०८
मूल्य – २२० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.
shankarnvibhute@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment