‘माहिती-संस्कृती’ने आपले झोंबी, रोबोटस करून टाकले आहेत… ज्यांना केवळ आदेशाचं पालन करणंच माहीत असतं
पडघम - तंत्रनामा
प्रियदर्शन
  • सोशल मीडियाची काही बोधचिन्ह आणि ‘आज की जनधारा’च्या साहित्य वार्षिकीचं मुखपृष्ठ
  • Thu , 26 May 2022
  • पडघम तंत्रनामा आज की जनधारा Aaj Ki Jandhara माहिती-संस्कृती Information culture माहिती Information

‘आज की जनधारा’ या उत्तर प्रदेशातील रायपूरहून प्रकाशित होणाऱ्या हिंदी दैनिकाचं २०२२चं साहित्य वार्षिक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या वार्षिकाचा यंदाचा विषय आहे - ‘सूचना सभ्यता के स्वप्नपाश’. यात महत्त्वाच्या लेखकांचे लेख, कथा, कविता, कादंबरीअंश यांचा समावेश आहे. विनोदकुमार शुक्ल यांची कविता आणि कथा यांचाही यात समावेश आहे. यात एनडीटीव्हीचे वरिष्ठ संपादक प्रियदर्शन यांचा ‘यह जो दुनिया हम बना रहे हैं’ हा लेख आहे. त्याचा हा मराठी अनुवाद…

..................................................................................................................................................................

हे हल्ली सर्रासपणे सांगितलं जातं की, हे माहिती-संस्कृतीचं युग आहे. पण या युगाची व्याख्या करण्यासाठी हे जाणून घेणं आवश्यक आहे की, माहिती नेमकी काय आहे? आजकाल आपण ‘माहिती’ या शब्दाचा उपयोग अनेक अर्थांनी करत आहेत. आणि जेव्हा ते अर्थ आपल्याला माहितीतून मिळत नाहीत, तेव्हा आपण निराश होतो. माहिती ‘माहिती’ राहिलेली नाही, माहिती-संस्कृती ‘माहिती-संस्कृती’ राहिलेली नाही.

‘माहिती’ हा शब्द जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळपास जाणाऱ्या शब्दांकडेही पाहावं लागतं. उदा. चर्चा, माहिती, समाचार, संवाद, संप्रेषण किंवा वार्ता. हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत. माहितीचा अर्थ एखादी गोष्ट एका माणसा वा समूहाकडून दुसरा माणूस वा समूहापर्यंत पोहचवणे. त्यासाठी हे गरजेचं नाही की, ती माहिती योग्य असावी. तथ्याच्या पातळीवर चुकीची माहितीही माहितीच असते. अर्धवट माहितीही माहितीच असते- मग ती चुकीची वा अपूर्ण का असेना. अफवादेखील एक प्रकारची माहितीच असते. जेव्हा आपण म्हणतो की, माहिती या युगाचं सर्वांत मोठं हत्यार आहे, तेव्हा त्यात चुकीच्या माहितीचाही समावेश असतो. २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान जी माहिती सर्वांत जास्त प्रसिद्ध झाली, ती योग्य प्रकारची नव्हती, चुकीची होती. पोपने ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, असं एक ट्विट या काळात खूप वेळा री-ट्विट झालं. पण त्याचं खंडन करणारं ट्वीट त्या चुकीच्या माहितीची बरोबर करू शकलं नाही. ही माहिती पूर्णपणे चुकीची होती. अशी माहिती या युगाला चालवत आहे, कारण आपण ‘माहिती’ या शब्दाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे.

खरं तर माहितीची एक मर्यादा असते. आपल्या सर्वोत्तम रूपात ती जास्त वेळा तथ्याच्या कसोटीवर उतरते. पावसाचा अंदाज ही माहितीच असते. सरकार बदलणं ही माहितीच असते. ही माहिती तोवर आपल्यात काही निर्माण करत नाही, जोवर आपण तिला कुठल्या संदर्भांशी जोडत नाही. म्हणजे पाऊस झाला तर पिकं चांगली येतील, हे माहितीला संदर्भ जोडणं झालं. पाऊस झाला तर दिल्लीत ट्रॅफिक जाम होईल, हा त्याच माहितीचा दुसरा संदर्भ आहे. खरं तर या संदर्भांमुळे माहिती पूर्ण तथ्य न होता वर्दी किंवा बातमी बनते. उघड आहे की, एखादी घटना किंवा तिच्याशी जोडलेली माहिती एक संदर्भ असतो, जो तिला आधी बातमीत बदलवतो आणि मग आपल्या विचारकक्षेत आणतो. पावसामुळे पीक चांगलं येईल या विचाराशी शेतकरी जोडला जातो. मग तो विचार करतो की, या वेळी तो काय काय खरेदी करणार आहे. त्या विचारानंतर अनुभूतीचं भांडार उघड होतं. त्यात पाऊस पाहण्याची, त्यात भिजण्याची किंवा पावसाची गाणी म्हणण्याची कल्पनाही येऊ शकते. म्हणजे माहिती संदर्भांचं बोट धरून पुढचा प्रवास करते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पण आपल्या काळाचं आव्हान हे आहे की, अनेक संदर्भ हरवून जायला लागले आहेत. माहिती आपल्यासाठी फक्त ‘माहिती’ ठरू लागली आहे. तिलाच आपण सर्व काही मानू लागलो आहोत. हे काय होतंय, हे समजून घेतलं तर ज्याला ‘माहिती-संस्कृती’ म्हणतात त्या विडंबनेचा वास्तव अर्थ लक्षात येऊ शकतो. सद्यकाळात माहिती जवळजवळ आपल्यावर हल्ला करू लागली आहे. जणू काही तिने आपल्या संवेदनेच्या समूळ जमिनीवर आक्रमण केलंय. ती संदर्भ, विचार, संवेदना सर्वांना बेदखल करू लागली आहे. आता पावसाची माहिती येते, तेव्हा लगोलग तिच्याशी जोडल्या गेलेल्या माहितीचा पाऊस कोसळायला लागतो. या वर्षी किती मिलीमीटर पाऊस झाला, त्याने किती वर्षांचा रेकॉर्ड मोडला, त्यामुळे किती पीकं नष्ट झाली किंवा चांगली आली. ही सर्व माहिती ऐकणाऱ्याला काही सुचण्याचा अवसरच देत नाही. त्याचा पाऊस त्याच्यापासून हिरावून घेतला जातो, ज्याला तो आपल्या अनुभवातून ओळखतो, अनुभवतो, त्यावर कविता\गाणी लिहितो.

हे खूप स्थूल स्वरूपाचं उदाहरण आहे हे नक्की, पण माहितीने आक्रमण केलेल्या सद्यकाळात सगळीकडे याची उदाहरणं प्रत्ययाला येताना दिसतात. ही माहिती आपल्याला केवळ संदर्भांपासूनच नाही, तर आठवणीपासूनही छाटून टाकतेय. आता कुठलंही स्मरण राहत नाही. आपण एखादी गोष्ट जाणून घेतो आणि विसरून जातो. नंतर एखादी नवी गोष्ट ऐकायला लागतो. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर चोवीस तासात बदलणाऱ्या वाद-चर्चा याच माहिती-संस्कृती आणि तिच्यातून जन्माला येणाऱ्या माहिती-उद्योगाची देण आहे. आज महिला अत्याचारांवर बोललं जातं, उद्या राजकीय भ्रष्टाचारावर, परवा निवडणूक सुधारणेविषयी, त्यापुढच्या दिवशी मानवाधिकारावर, त्यानंतर मुलांच्या प्रश्नावर, नंतर करोनाच्या संकटावर – या वाद-चर्चा संपतच नाहीत. कारण अशा वाद-चर्चा कुठल्या चिंतेऐवजी एका उपभोक्तावादी समाजाची भूक शांत करण्यासाठी केल्या जातात. त्यातून एक व्यक्ती म्हणून आपल्याला जगभरातल्या तमाम विषयांवरची, साऱ्या चालू वाद-विवादांशिवाय अद्ययावत माहिती मिळत आहे, या भ्रमाशिवाय काहीच मिळत नाही. हा पूर असा असतो की, त्यातून थोडं फार आपण स्वत:साठी राखू शकत नाही. काहीच आपल्या आठवणीत टिकत नाही. माध्यमं पुन्हा पुन्हा ओरडून सांगतात की, ही गोष्ट ध्यानात ठेवा, पण खरं तर ते गोष्टी विसरण्याचंच तंत्र आहे. आपण लक्षात ठेवू लागलो तर माध्यमांचे रोजचे वाद कोण ऐकणार?

एल्विन टॉफलर यांनी पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी ‘फ्यूचर शॉक’ आणि ‘थर्ड वेव्ह’ यांसारखी पुस्तकं लिहिली. त्यांची तक्रार होती की, सद्यकाळात माहितीचा पूर इतका वेगवान आहे की, अनुभव आणि आठवणीत काहीच राहत नाही. पण टॉफलरसाठीही आजचा वेग कल्पनातीत होता. त्या वेगाने  खरोखरच आपल्याला आपल्या मुळापासून उखडून टाकलंय.

या माहिती-संस्कृतीच्या स्वप्नपाशांनी आपल्याला खाजगी जीवनातही जखडून टाकलंय. पूर्वी लोक घरातून निघत, स्टेशनवर जात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शहरात पोहचत आणि त्यानंतर पत्र लिहीत. त्यात ते आपल्या प्रवासाची हकीकत सांगत. दरम्यान ते प्रवास अनुभवत, जगत. दृश्यं पाहत, लोकांना भेटत, रंग, गंध आणि वास यांच्या अनेक पातळ्यांवरून जात. पत्र लिहिताना परत ते सगळ्याचा अनुभव घेत. ते पत्र तीन दिवसांनी घरी पोहोचे. या तीन दिवसांत घराजवळही सांगण्यासारखी अनेक गोष्टी जमा झालेल्या असत – कोण आलं-गेलं, कुठलं काम अर्धवट राहिलं, कुठलं पूर्ण झालं. म्हणजे त्या काळात माहिती अशा धीम्या गतीनं चालायची की, तिचे संदर्भ तयार होत, ती एका नात्यात बांधली जाऊन संवेदनेचा भाग बनत असे.

पण आता काय होतं? आपण मोबाईलवर प्रत्येक क्षणाची खबर देतो – स्टेशनला पोहोचलो, ट्रेनमध्ये बसलो, रात्रीचं जेवण केलं, सकाळी उतरलो, घरी पोहोचलो. घराचीही एकेक खबर मिळत राहते – अमूक आला, तमूक गेला, अमूक असं म्हणाला, अमूकची तब्येत संध्याकाळी थोडी ठीक नव्हती. पण या माहितीशी आपलं कुठं नातं निर्माण होत नाही. कारण यानंतर आपण परत दुसऱ्या माहितीकडे वळतो. तिच्याशीही तसंच वागतो… आणि मग तिसऱ्या एखाद्या माहितीच्या जंगलात वा वनात जाऊन उभे राहतो. आपल्याला हे कळतही नाही की, हळूहळू आपल्याला विचार आणि संवेदनांच्या दुनियेतून बेदखल केलं जात आहे. विसाव्या शतकातील आधुनिक माणसाला आपल्या एकटेपणाशी कसं लढायचं, हा प्रश्न पडलेला असे, तो आपला कोंडमारा आणि बेचैनी ओळखू शकत होता; एकविसाव्या शतकातल्या माणसाला हे माहीतच नाही की, तो पूर्ण एकटा आहे. तो आपल्या कोंडमाऱ्यापासून पळता पळता एका बाटलीत बंद झालाय, जिचं नाव ‘माहिती-युग’ आहे.

त्याचं एकटेपण घालवण्यासाठी विशाल सोशल मीडिया आहे – फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि वेगवेगळी माध्यमं… जिथं तो आपले संदेश लिहितो, आपली छायाचित्रं टाकतो, इतरांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सतत आपली उपस्थिती दाखवून देत राहतो. पण या सगळ्याचा वेग इतका गतिमान आहे की, प्रत्येक संदेश माध्यमापर्यंत पोहोचेपर्यंत धूसर होऊन जातो, प्रत्येक छायाचित्र आपली चमक आणि ओळख विसरतं, किंवा त्यांना दुसरा-एखादा संदेश वा छायाचित्र बेदखल करून टाकतं. हे आपल्याला कळतही नाही की, जे आपण सादर करतोय, ते आपण अनुभवतोय की नाही? एका क्षणी कुणाला तरी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तर दुसऱ्या क्षणी कुणाच्या तरी निधनावर दु:ख व्यक्त करतो. या दोन्हीसाठी आपल्याकडे इतकी कमी वेळ असतो की, आपण ‘HBD’ आणि ‘RIP’ असं लिहून पुढे जातो.

माहिती-संस्कृतीचा हाच स्वप्नपाश आहे. ही संस्कृती आपल्याला हा भरवसा देते की, आपलं सामाजिक जीवन शिल्लक आहे, वाढत चाललंय, पण प्रत्यक्षात आपण त्यापासून तुटत चाललो आहोत, स्वत:पासूनही तुटत चाललो आहोत. आणि नव्या माहिती-संस्कृतीद्वारा आदर्शनामक व्यवहारात ढकलल्या गेलेल्या कठपुतळ्यांमध्ये बदलत आहोत.

माहितीचं आपलं एक महत्त्व असतं हे नक्की. माहितीमुळे आपण मोठमोठ्या लढाया जिंकतो. करोनासारखी महामारी कोट्यवधींचा घास घेऊ शकली नाही, याचं एक कारण माहिती-तंत्रज्ञान हेही आहे. त्यामुळे आपण सजग होऊ शकलो. जगभरचे शास्त्रज्ञ करोनावरची लस शोधण्यात गढून गेले. नक्कीच हे खूप महत्त्वाचं होतं, पण ते झालं. त्यामुळे आपण वाचलो. पण या दोन वर्षांत माहितीने इतर कुठली कुठली कामं केली? भारताच्या संदर्भातच विचार करायचा झाला, तर हा करोना काळ त्या अनेक विषाणूंची आठवण करून देत राहिला, जे आपल्या मनांत अनेक वर्षांपासून जमा झालेले होते. त्यांच्याशी लढाई करण्याची जास्त गरज आहे. करोना सुरू झाला आणि आपण द्वेषाचा पहिला घाव तबलीगी जमातीच्या माथ्यावर मारला. त्यानंतर आपण करोना-बाधितांनाही गुन्हेगार मानू लागलो. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखू लागलो. इतकंच काय पण, करोना-बाधितांवर उपचार करणाऱ्या नर्सेस आणि डॉक्टरांनाही आपण कॉलनीत येण्यापासून रोखलं. हे सगळं तेव्हा झालं, जेव्हा आपलं सरकार करोनाविरुद्ध लढणाऱ्या लोकांसाठी, डॉक्टरांसाठी दिवे लाववत होतं, थाळी वाजवत होतं आणि सैन्याच्या विमानातून फुलांचा वर्षाव करत होतं. आपला वास्तव विचार आणि दिखाऊ व्यवहार यांत जो मोठा विरोधाभास आहे, तो अशा वेळी बाहेर येतो. कारण तो नाहीसा करण्यासाठी जी संवेदना आपल्याकडे हवी, ती नव्हती, त्याऐवजी काही अर्धसत्य माहिती होती.

असं असलं तरी या माहिती-संस्कृतीने अनेक शक्यताही निर्माण केल्या आहेत. फेसबुकने आपल्या जुन्या मित्रांना भेटवलं, विसरून गेलेल्या पत्त्यांवर पोहचवलं. सर्वांत मोठी आणि चांगली गोष्ट म्हणजे, या काळात केंद्रीकरण उदध्वस्त झालं आणि किनारे\परीघ आपल्या जागेपासून पुढे सरकले. माहितीच्या संसाधनांवरील दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांचं आधिपत्य नाहीसं झालं आणि अत्यंत साध्या मोबाईल फोनच्या आधारे छोट्या-छोट्या शहरांतील लोकांना, परीघावरच्या समाजांना – महिला, दलित आणि आदिवासी – समजलं की, त्यांच्याकडे असं एक माध्यम आहे, ज्यामुळे त्यांचा आवाज कुठपर्यंतही पोहचू शकतो. सोशल मीडियामुळे अनेक आंदोलनं यशस्वी होऊ शकली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सोशल मीडियावर अनेक ‘जंतर-मंतर’ तयार झाले. नागरिकता दुरुस्ती कायदाच्या विरोधात आंदोलन सुरू झालं, तेव्हा फेसबुक-ट्विटरवर अनेक ‘शाहीन बाग’ पाहायला मिळाले. शेतकरी आंदोलनाच्या वेळी जेव्हा ‘गोदी मीडिया’ शेतकऱ्यांचं म्हणणं दाखवत नव्हता, तेव्हा सोशल मीडिया आणि यू-ट्युबवर सक्रिय असलेल्या पत्रकारांनी संपूर्ण शेतकरी आंदोलनाला उचलून धरलं, त्याला अधिकाधिक लोकांशी जोडण्याचं काम केलं आणि इतकं सशक्त बनवलं की, शेवटी सरकारला शेतकऱ्यांपुढे गुडगे टेकवावे लागले.

म्हणजे प्रतिकाराच्या सामूहिक संघर्षात सोशल मीडियाची एक मोठी भूमिका आहे. पण आपल्या राजकारणाने, आपल्या सत्ताधाऱ्यांनी या संघर्षांनाही बहकवण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. आता प्रत्येक पक्षाचा एक आयटी-सेल आहे, जो २४ तास प्रचार करत असतो. आणि हा प्रचार कसा असतो? सहसा, अतिरेकीच नाही तर सांप्रदायिक, विभाजनकारी आणि वर्चस्ववादीही. कारण सोशल मीडिया निरपेक्ष असल्या मुळे त्याचा फायदा ज्यांच्याकडे संसाधनं जास्त आहेत, ज्यांचा माध्यमांवर आधीपासूनच कबजा आहे त्या शक्ती उठवतात. हे त्यामुळेच शक्य होतं, ज्याला आपण माहितीचा खेळ म्हणतो. परिणामी आपली नाती आणि संवेदना बहिष्कृत करण्यात आल्या आहेत. आता सर्व काही माहितीच्या आधारेच होत आहे. प्रत्यक्षात वास्तविक संवेदनांच्या अभावात माहिती नकली संवेदनाही निर्माण करत आहे. त्यामुळे मुळापासून तुटलेले अतिरेकी लोक पुढे येऊ लागले आहेत. त्यांना हे दाखवून द्यायचंय की त्यांची मुळं शाबूत आहेत. त्यांच्यामुळे गायीला वाचवण्याच्या नावाखाली ‘मॉब लिंचिंग’ होते, त्यांच्यामुळे कट्टर लोक नव्या सांप्रदायिक युद्धासाठी तयार होतोहेत, त्यांच्यामुळे सरकार सत्याची झाकपाक करत आहे. ते सामाजिक कार्यकर्त्यांना नक्षलवादी आणि दहशतवादी ठरवत आहे… आणि हे सांगत नाहीत की, दोन्हीमध्ये फरक आहे.

युव्हाल नोआ हरारी यांनी त्यांच्या ‘सेपियन्स’ या पुस्तकात एक गमतीशीर तथ्याकडे लक्ष वेधलं आहे. त्यांनी म्हटलंय की, ७० हजार वर्षांपूर्वी संज्ञापन क्रांती झाली. त्यामुळे होमो सेपियन्सनी आपल्यापेक्षा सशक्त असलेल्या निएंडरथल्सला काही हजार वर्षांत जवळपास नामशेष केलं. ते कशामुळे यशस्वी झाले? कारण त्यांनी या काळात भाषा विकसित केली. भाषेने काय केलं? त्यांना फक्त माहिती देऊन सजग करण्यापेक्षा त्यांना कल्पना दिली. त्यामुळे त्यांची एकजूट झाली. नदीकाठी वाघ आहे, ही माहिती चिम्पाझीही आपल्या सहकाऱ्यांना देऊ शकत होते. पण तो वाघ आपला कुलगुरू आहे, ही कल्पना फक्त होमो सेपियन्सकडे होती. ज्यामुळे त्यांच्यात एका वा अनेक समुदायांत एकत्र येण्याची क्षमता आली. प्रत्यक्षात संस्कृतीचा संपूर्ण विकास नव्या कल्पनाशीलतेमुळे, तिच्याद्वारा रचलेल्या मिथकांमुळे, त्याद्वारा तयार झालेल्या धर्मपीठांमुळे, अर्थतंत्रामुळेच झाला आहे. या कल्पनाशीलतेमुळे समुदायांचे परस्परांशी संघर्षही झाले, रक्तपातही झाला, पण शेवटी ते या नैसर्गिक जीवनात एक बेमिसाल संस्कृती तयार करण्यात यशस्वी झाले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

आजची माहिती-संस्कृती माणसाची स्वाभाविक कल्पनाशीलता हिरावून घेत आहे. ती त्याला एक आरोपित मिथक-विश्व देत आहे, ज्यात त्याला एका ‘प्रोग्राम्ड’ नागरिकासारखं राहण्यासाठी भाग पाडलं जात आहे. अलीकडच्या काळात असे अनेक चित्रपट आले, ज्यात झोंबी, रोबोट वा इतर ग्रहावरील जीव मध्यवर्ती भूमिकेत आहेत, जे माणसालाच बंदी बनवतात. हे चित्रपट खरे असतील किंवा नसतील, पण या माहिती-संस्कृतीने आपले झोंबी, रोबोटस करून टाकले आहेत… ज्यांना केवळ आदेशाचं पालन करणंच माहीत असतं, अनुभवणं नाही.  

पण ही माहिती-संस्कृती अंतिम सत्य नाही. हे खरं आहे की, याच्या विरोधात एक संस्कृती विकसित होतेय. जग माहितीचे धोके अनुभवत आहे आणि त्याचा सामना करण्याचे मार्गही शोधत आहे. पण हे आपण आधुनिकता आणि उपभोगक्तावाद यांचे फासे समजूनही त्यांच्याकडेच ओढले जात आहोत, काहीसं त्याच्यासारखंच आहे. आपण केवळ आशा व्यक्त करू शकतो की, सद्यकाळातल्या माहितीच्या या वर्चस्वाच्या विरोधात संवेदनांचे काही तुकडे शिल्लक राहतील आणि माणसालाही शिल्लक ठेवतील.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......