अजूनकाही
प्रसिद्ध कवी व लेखक श्रीकांत देशमुख यांची ‘पिढीजात’ ही सहाशेहून अधिक पानांची कादंबरी अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला देशमुख यांनी लिहिलेलं हे प्रास्ताविक...
..................................................................................................................................................................
एखादा कवी, लेखक लिहितो, व्यक्त होतो - म्हणजे नेमकं काय होतं? कलावंताची अभिव्यक्ती ही त्याला अंतर्बाह्य उसवून काढणारी असते. आपला भूतकाळ आणि वर्तमान कवेत घेऊन सभोवतालाबद्दल व्यक्त होणं, मला स्वत:ला आवडतं. विशिष्ट पातळीवरील मनाची तरलता नेमकी किती प्रमाणात अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरते, हा तसा मलाही पडणारा प्रश्न आहे.
‘पिढीजात’ ही माझी पहिलीच कादंबरी. याआधी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वेगळ्या कादंबरीचा एक खर्डा लिहून ठेवलेला, तो अनेक वर्षांपासून तसाच पडलेला आहे. ‘पिढीजात’ ही त्यानंतर गेल्या काही वर्षांत लिहायला हाती घेतली. कवी म्हणून माझं असणं या कादंबरीचा प्रदीर्घ पट हाताळताना बहुतांशी माझ्यासाठी उपकारकच ठरलं असावं. गद्यलेखनातही कवितेची संप्रक्तता, तरलता, टोकदारपणा टिकणं तसं कठीणच असतं. तशी अपेक्षाही नसते. भोवतालचं गद्यप्राय जगणं आपल्याही जगण्याचा नकळतपणे भाग बनून जातं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
लेखनाच्या पातळीवर स्वत:ला कितीही घुसळून काढलं, तरी त्याचं अभेद्यपण वेगळं नाही करता येत. लेखक, कलावंत म्हणून आपण बरंच काही पाहत असतो. बहुतेकदा कलावंत हा त्याचे विषय निवडत नाही, तर सभोवताल ते विषय निवडण्यास त्याला भाग पाडत असतो. मनाच्या तळाशी जपलेली काही एक मूल्यव्यवस्था असते. तिला धक्का देणारे अनेक घटक आपल्याभोवती असतात. त्याचबरोबर कलावंताचं जगण्याच्या पातळीवरचं व्यावहारिकपण हाही एक महत्त्वाचा घटक असतोच.
माणूस म्हणून जगत असताना या दोन घटकांतील संघर्षाची अटळता नाकारता येत नाही. हीच अवस्था सामाजिक पातळीवरही पाहावयास मिळते. आपला समाज हा अनेकार्थांनी दुविधेत सापडलेला समाज आहे. आजच्या भोवतालाकडे नजर टाकली, तर भय आणि अनिश्चिततेची सावली सगळीकडे दृश्य-अदृश्यपणे फिरताना आपल्याला दिसेल. कलावंताची आणि कलेची स्वायत्तता या पार्श्वभूमीवर निश्चितपणे विशेष महत्त्वाची ठरावी, असा हा कालखंड आहे.
नवनाथ शेळके हा या कादंबरीचा नायक. तो बोलतो, चालतो, कामं करतो आणि बहुतेकदा ऐकतो, पाहतो. त्याच्या जगण्याचा, विचारांचा असा एक परिप्रेक्ष्य आहे, जो त्याच्या मनातल्या भूमीशी जोडला गेला आहे. खेड्यातून अभावात शिक्षण घेऊन तो एका व्यवस्थेचा अपरिहार्य घटक बनला आहे. खरे तर त्याच्यासाठी ती अनिवार्य आपत्तीसारखी व्यवस्था आहे. त्या अर्थाने नवनाथ हा एकटा नाही, तो अनेकार्थांनी प्रातिनिधिक असा ठरावा. त्याचं प्रातिनिधिक असणं हाच त्याच्या संवेदनेचा सर्वोच्च बिंदू मानावा लागेल.
असंख्य पात्रं नवनाथभोवती फिरत आहेत. कितीतरी प्रसंग अंगावर येणारे, सोलून काढणारे, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारे. त्यातही त्याचं टिकून असणं हे त्याचं मूलत: शेतकरी असण्यातून घडणारं. आपण या व्यवस्थेत ना-लायक आहोत, असंही त्याला खुपदा वाटून जातं. तरीही आलेल्या परिस्थितीला, संकटांना धीटपणाने सामोरं जाणं हा त्याचा स्वभाव आहे.
‘पिढीजात’ ही या अर्थाने कोणाला आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. व्यापक अर्थानं कोणत्याही कलाकृतीबद्दल असं विधान करता येईल. नवनाथभोवती फिरणाऱ्या पात्रांबद्दलही कोणाला असंच वाटू शकेल. कथा-कादंबऱ्यांतील पात्रांत वास्तवातील पात्रं अकारण शोधण्याची अनेकांची सवय तशी नवी नाही. तसा ताण उगाचच कोणी घेऊ नये, अशी इच्छा. शेवटी पात्रांचं बोट धरूनच लेखक व्यक्त होत असतो. ते होताना वास्तवाचा एक पदर हातात असला, तरी कादंबरीच्या पात्रात कोणाचा चरित्रशोध घेणं गैर ठरावं. समकालाचा शोध त्यात कोणी घेतल्यास अधिकच योग्य.
महात्मा जोतीराव फुले यांचा असा कयास होता की, शूद्र सत्तेवर आले, तर शूद्रांची दु:ख दूर होतील. लोकशाहीकरणाचा एक भाग म्हणून प्रशासकीय, राजकीय सत्तेवर शूद्र येऊनही यात कितपत फरक पडला आहे, याचा शोध घेणं अपरिहार्य ठरावं. वाढत्या शेतकरी आत्महत्या, स्त्री-दलित अत्याचार या साऱ्या बाबी आपल्या भोवताली आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग म्हणून फिरताना दिसतात. शेती आणि शेतीव्यवस्था, त्याला जोडून असणारी प्रशासकीय व्यवस्था, सहकार चळवळ यातली घुसमटही नवनाथला त्रासदायक ठरणारी आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
‘पिढीजात’चे माझे लेखन सलग चार ते पाच वर्षे चालले. एकदा लिहून झाल्यानंतर पुन्हा परकं होऊन आपलीच कलाकृती वाचणं हेही तसं तापदायक काम. माझ्या काही आत्यंतिक जवळच्या मित्रांनीही कादंबरी वाचून अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या. लेखक म्हणून मी राजहंस परिवाराचा भाग होणं, ही माझ्यासाठी आनंददायी बाब. कादंबरीचे काही खर्डे गेल्या दोनेक वर्षांत काही दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेले. मुखपृष्ठ साकारणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं हा नेहमीच माझ्या आस्थेचा आणि प्रेमाचा विषय राहत आलेला आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार.
‘पिढीजात’ – श्रीकांत देशमुख
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने – ६१२
मूल्य – ६०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment