अजूनकाही
हेरवाड ग्रामपंचायतीने गेल्या आठवड्यात केलेला ठराव कौतुकाचा विषय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी त्याची विशेष दखल घेतली असून, ‘छत्रपती शाहू महाराजांच्या सुधारकी वारशाला सुसंगत असे ते पाऊल आहे,’ असा सूर लावला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांनी आणि इंग्रजीतील ‘द इंडियन एक्स्प्रेस’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘द हिंदू’ इत्यादी मोठ्या वृत्तपत्रांनीही त्याला ठळक प्रसिद्धी दिली आहे. मुळात कोल्हापूर जिल्हा हा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या पातळीवरही सर्वाधिक सधन व सुखी-समृद्ध जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका आघाडीवर मानला जातो. तर तो ठराव असा...
ग्रामपंचायत हेरवाड
ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
जा.क्र.३४/२०२२-२३
दि. ५-५-२०२२
ग्रामसभा दि. ४ मे २०२२ ठराव क्र. ४ चा कारणापुरता उतारा.
विषय नं. ४ : विधवा प्रथा बंद करणेसंदर्भात चर्चा करणे.
ठराव नं. ४ : आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे घडते. तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, याकरता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी, त्यास ही सभा मंजुरी देत आहे.
सूचक : सौ. मुक्ताबाई संजय पुजारी
अनुमोदक : सौ. सुजाता केशव गुरव
ठराव सर्वानुमते मंजूर.
येणेप्रमाणे ठरावाची नक्कल असे.
शिक्का / ग्रामविकास अधिकारी, सरपंच
ग्रामपंचायत हेरवाड, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
वरील ठरावाला एक तत्कालिक कारण आहे. मागील दोन वर्षांच्या करोना काळात तरुण किंवा मध्यमवयीन विधवा महिलांचे प्रमाण सर्वत्रच वाढल्याचे दिसते आहे. त्याप्रमाणे हेरवाड या लहान गावातही घडले आहे. तेथील २० महिलांना वैधव्य आले आहे, त्यातील काहींना अपत्ये आहेत, काहींना नाहीत. अचानक कोसळलेल्या पतीनिधनाच्या संकटामुळे त्यांची जी काही अवस्था व्हायची ती झालीच; पण विधवा झालेल्या त्या महिलांनी स्वत: कसे वागावे आणि त्यांना इतरांनी कसे वागवावे, या संदर्भातील दृश्ये तेथील काही नागरिकांच्या डोळ्यांत नको तितकी खूपली आणि त्याचा परिणाम म्हणून हे पाऊल पडले आहे. मात्र त्याच्या आधी त्या गावात या ना त्या प्रकारे चर्चामंथन झाले होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील प्रमोद झिंजाडे या कार्यकर्त्याचे मार्गदर्शन त्यासाठी उपयुक्त ठरले. महात्मा फुले समाज सेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष असलेल्या झिंजाडे यांनी कोरोना संकटापूर्वीच या प्रकारची जाणीव जागृती सुरू केली होती. त्यांना स्वत:ला ती प्रेरणा झाली त्याचे कारण, त्यांनी जवळच्या एका मित्राच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीचे काय हाल होत आहेत हे पाहिले होते. आणि म्हणून शंभर रुपयांच्या स्टँट पेपरवर, ‘माझा मृत्यू झाल्यावर माझ्या पत्नीच्या बाबतीत असे वर्तन केले जाऊ नये’, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी करून ठेवले आहे. त्यांची आणि हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांची ओळख २०१९मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतकार्य करताना झाली. हेरवाडच्या सरपंचांच्या मनात तो विषय तेव्हापासून घोळत होता. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथील राजू मगदूम हेही श्री.झिंजाडे यांच्या त्या विचाराने प्रभावित झाले होते, त्यांनीही आपल्या गावात असा ठराव नुकताच करून घेतला आहे.
हेरवाड जवळच्याच अर्जुनवाड या गावातील अंजली पैलवान या ३५ वर्षीय महिलेला दोन वर्षांपूर्वी वैधव्य आले. तेव्हा तिनेही झिंजाडे यांच्याशी संपर्क साधला होता, स्वत:चे अनुभव त्यांना सांगितले होते. ‘तुम्ही स्वत:पासून सुरुवात करा’ असा सल्ला त्यांनी दिला. आणि मग अंजली यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी स्वत:च्या घरी गुढी उभारून, दागिने परिधान करून, हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता. अंजली यांचे हे धाडसही विशेष कौतुकास्पद आहे.
शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमधील सरपंचांची परिषद बोलावून असा ठराव त्या-त्या गावांनी करावा असा प्रयत्न करण्याबाबत चर्चा आता सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेनेही परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना म्हणून विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या प्रयत्नांचे स्वागत केले असून, ‘वैधव्याचा अनुभव काय असतो ते मला माहीत आहे’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आणि प्रमोद झिंजाडे यांनी म्हटले आहे की, ‘विधवांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा छळ रोखण्यासाठी कोणताही कायदा नाही, तसा कायदा महाराष्ट्र विधानसभेत केला जावा, यासाठी विविध पक्षांच्या आमदारांना आम्ही भेटणार आहोत.’
वरील सर्व प्रकार म्हणजे सध्याच्या अस्वस्थतेच्या काळातील थंडगार झुळूक म्हणता येईल, त्यामुळे सर्व संबंधितांचे अभिनंदन करून त्यांच्या या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सहकार्य द्यायलाच हवे!
मात्र पुन्हा एकदा हे लक्षात घ्यायला हवे की, एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम अशा कुप्रथांचा जाहीर निषेध करून बदलांची गरज अधोरेखित केली होती. त्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळराव आगरकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, महर्षि वि. रा. शिंदे या व अन्य सुधारकांनी पुढची पावले टाकली होती. एवढेच नाही तर संपूर्ण एकोणिसावे शतक महाराष्ट्रासाठी प्रबोधनाचे शतक ठरले आणि विसावे शतक हे जगासाठी क्रांत्यांचे शतक, तर महाराष्ट्रासाठी परिवर्तनवादी चळवळींचे शतक होते. आणि तरीही, म्हणजे एकविसाव्या शतकाची दोन दशके उलटल्यानंतरही विधवा प्रथा बंद करण्याचा एका ग्रामसभेचा ठराव झाल्यावर आपण थंडगार झुळूक अनुभवत आहोत, आनंद व्यक्त करत आहोत, याचा अर्थ काय?
याचा अर्थ आपण अल्पसंतुष्ट आहोत! असे चिमुकले बदल दिसले की, क्रांती दारात आली असा समज करून घेत आहोत, धर्म व रूढी-परंपरा यांना छेद दिला गेला असा आत्मगौरव करून घेत आहोत. सभोवताली उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही, स्वत:च्या कुटुंबात घडत असूनही किंवा स्वत:वर वेळ आलेली असूनही आपण बदलायला तयार नसतो. आपली सहनशक्ती अफाट आहे. आपण जनलज्जेस्तव भूमिका घेणे टाळतो, लोकभयास्तव बदलाला नकार देतो. धर्माचा काच आपल्याला असह्य होत नाही. रूढी-परंपरांची बंधने अद्यापही आपल्याला तोडता येत नाहीत.
आपल्या पूर्वसूरींचे काही समज होते. माणसे शिक्षणामुळे शहाणी होतील, असा एक समज होता. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार झाल्यावर गतानुगतिक वृत्ती कमी होईल, असा दुसरा समज होता. स्वदेशातील सरकारे कायदे-नियम करून कुप्रथा संपुष्टात आणतील असा तिसरा समज होता. प्रबोधनाच्या व संघर्षाच्या चळवळीमुळे समतेची वाटचाल वेगवान होईल, असा चौथा समज होता. रचनात्मक कामांचे डोंगर उभे केले, तर समाजमन विरघळेल, असा पाचवा समज होता. मात्र हे सारे घडूनही समाजमनाचे जडत्व हटता हटत नाही. अर्थातच काही चांगले बदल होतात, पण त्यांची गती व परिणामकारकता खूपच कमी असते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
बघा ना! न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला, पण १८७४मध्ये दुसरा विवाह करण्याची वेळ आली, तेव्हा विधवेशी केला नाही म्हणून ‘बोलके सुधारक’ या विशेषणाने त्यांना हिणवले गेले आणि अद्यापही त्यासाठी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मात्र त्यानंतर दीडशे वर्षांनीही आपल्या समाजात विधवांना कसे वागवले जाते? तिने आभूषणे वापरू नयेत, बहुरंगी कपडे वापरू नयेत, सभा-समारंभात मिरवू नये, धार्मिक कार्यक्रमात तिची उपस्थिती अशुभ मानली जावी, हे सर्व प्रकार आजही सर्वत्र व सर्रास पाहायला मिळतात. स्वत:च्या मुलाच्या लग्नात मिरवता येत नाही, अशी स्थिती अनेक विधवांच्या बाबतीत घडते आहे. त्याला तथाकथित खानदानी घराण्यातील पुरुषच नाही, तर स्त्रियाही जबाबदार आहेत. शिवाय याच महाराष्ट्रात शनि देवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाही म्हणून डॉ.नरेंद्र दाभोलकर व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनिशिंगणापूरला आंदोलन केले होते. तेव्हा कोणत्या राजकीय पक्षांनी वा त्यांच्या सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला होता?
पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या व फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राची ही स्थिती आहे. अन्य राज्यांबद्दल विशेषत: उत्तर भारतातील राज्यांबद्दल तर काय बोलावे? तिथे तर अनेक मंदिरांमध्ये आणि आश्रमांमध्ये विधवा महिलांना आणून सोडले जाते. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे तर बंदिस्त वातावरणात भजन-पूजनात त्यांचे उर्वरित आयुष्य कुजवले जाते.
वृंदावन शहरातील विविध आश्रमांत १५ ते २० हजार विधवा महिला राहतात. त्यातील १५०० महिलांना घेऊन तिथल्या अतिप्रतिष्ठित गोपीनाथ मंदिरात २०१६मध्ये ‘सुलभ’ या संस्थेने होळी साजरी केली होती. गुलाब व झेंडूची फुले आणि रंग उपलब्ध करून दिले होते. पण तेवढे एक पाऊल टाकण्यासाठी त्यांना किती झुंज द्यावी लागली होती. त्या विधवा महिलांची व आश्रमधारींची मानसिक तयारी व्हावी, यासाठी आधी विधवांची दिवाळी साजरी करावी लागली होती, तेव्हाचा विरोध सौम्य करून मग होळीचे आयोजन केले होते. म्हणजे प्रकाशाचा सण आणि रंगांचा सण विधवांनाही साजरा करता यावा, एवढ्याचसाठी तो खटाटोप होता. पण तरीही आश्चर्य हे होते की, गोपीनाथ मंदिरात होळी साजरी झाल्यानंतरही वृंदावनातील अन्य मंदिरांतील पुजारी व व्यवस्थापक यांचे डोळे झापडबंद होते, त्यांनी तशा होळीला विरोध केला होता.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा : हेरवाड, माणगाव आणि बनवाडी : सामाजिक सुधारणेची नवी सुरुवात करणाऱ्या या खेड्यांची संख्या येत्या काळात वाढत जावो…
..................................................................................................................................................................
असे हे अस्वस्थ वर्तमान पाहता, हेरवाड गावाने टाकलेले क्रांतिकारी पाऊल हे एक पाऊलच ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्याची पायवाट तरी होईल का, ही शंकाच आहे! कारण आता जरी कौतुक होत असले तरी, दबा धरून बसलेले विरोधक आहेतच. शिवाय, ‘भारत माता की जय’ हा जयघोष करण्याचा आग्रह धरणारे लोकच आपल्या माता-भगिनींना अशा अवस्थेत ठेवून त्यांचे उदात्तीकरण करण्यात आघाडीवर असतात!
(‘साधना’ साप्ताहिकाच्या २१ मे २०२२च्या अंकातून)
..................................................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment