“माझा बाप आयुष्यभर रानात राब राबराबणारा. त्यानं कधी कोणाचा रुपयाही बुडवला नाही. दिवसभरात दोन वेळा भाकर खाण्याशिवाय दुसरी कोणती चैनही आयुष्यात केली नाही. त्याला सुपारीचंही व्यसन नाही. आम्हाला धड कपडे घेता आले नाहीत अन् स्वत:च्या अंगावरही कधी त्यानं धड कपडे घातले नाहीत. त्याचा गुन्हा काय? त्यानं काय चोरी केली की डाका-दरोडा घातला कुठं? इतकं राबून अन् जीवतोड कष्ट करून काय त्या बँकेचे चार-सहा हजार रुपये असतील तेही त्याला का फेडता येऊ नयेत? डोक्यावर कर्ज ठेवून चैन करणं हा तर त्याचा स्वभाव नव्हता. तरीही अशी पाळी त्याच्यावर का यावी?”( पृ.२२)
“... आजवर किती ठिकाणी लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. किती पुढार्यांशी खेटताना काय काय पदरात पडलंय. किती माणसांवर गुन्हे, किती माणसांना जेल याचा अंदाज बांधणं कठीण. सतत वाहत्या धारांतच
उभाय असं वाटू लागतं. कुठं आडत्या लुटतो, कुठं अधिकारी नाडतात, सरकार तर नेहमीच डाफरल्यासारखं करतं, कधीमधी पुळका दाखवला तर तोही पुतना मावशीसारखा. कळल्याबरोबर धावून जावं लागतं. आजवर कधी वाहनाचा विचार केला नाही. पायी तर पायी. मुक्काम कुठंपडंल, खायचं काय असाही हिशोब बांधला नाही. कधी उपाशी झोपलोय तर कधी बसस्टँड, रेल्वे स्टेशनवरही रात्र काढलीय.” (पृ. १००)
“हे असे जागोजाग कोंडवाडे आहेत. त्यांच्या दगडी बंथीवर कितीही मस्तक रक्तबंबाळ करू घेतलं, तरी त्यांचा टवकाही निघणार नाही अशा कातळाच्या भिंती वाढू लागल्या आहेत. कोंडवाडे वाढू लागलेत. ज्याच्याकडे कोणतीच ताकद नाही, सत्तेचा जराही अंश नाही अशा माणसानं काय करायचं? या भिंतीवर धडका देत किती वेळा मस्तक रक्तबंबाळ करून घ्यायचं? अन् कुठं जाऊन आपल्या काळजाच्या जखमा दाखवायच्या? कोणाला पाझर फुटणार? अशा सार्या माणसांच्या जगण्याचं मोल कुठं मोजलं जाणार? कोणत्या ठिकाणावर? ही माणसं जगली काय, मेली काय, यांची कुठं दाद-फिर्याद नोंदली जाईल? सारी मुळं तटातटा तुटत असताना एखाद्या कुठल्या भुईतल्या धाग्याने चिवटपणानं नांगराच्या फाळाला बिलगून बसावं तसं हे जगणं. जिथं उखडण्याचा धोका तिथंच तळामुळात सारा जीव गोळा करून ही माणसं गुडघ्याभोवती गच्च मिठी घालून बसली आहेत...” ( पृ. २४०)
आसाराम लोमटे यांच्या ‘तसनस’ या कादंबरीतील काही महत्त्वाच्या आशयसूत्रांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीकोनातून या कादंबरीतील ही काही विधाने उपयुक्त ठरू शकतात असे वाटते. या तीनही विधानांमधून राबणार्या सामान्य माणसांचे जगणे आणि त्यांच्या कष्टांचे चिज व्हावे या आंतरिक तळमळीने चळवळ राबवणारे कार्यकर्ते यांच्या अनुषंगाने या कादंबरीचे मध्यवर्ती आशयसूत्र प्रकट करणार्या काही प्रवृत्तीही समजून घेता येऊ शकतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आसाराम लोमटे हे मुख्यत्वे त्यांच्या कथा व रिपोर्ताज पद्धतीच्या गद्यलेखनासाठी विख्यात आहेत. त्यांच्या या दोन्ही प्रकारांतील लेखनामध्ये प्रामुख्याने कृषिकेंद्रित गावगाड्याच्या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यांतील माणसांच्या जगण्यात आधुनिक काळामुळे होत जाणारी उलथापालथ प्रत्ययकारी भाषेत चित्रित केलेली दिसून येते. आधुनिक काळातील शेतीविषयक धोरणे, नव्या तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर, राजकीय व सामाजिक अनास्था, शेतीउद्योगापेक्षा व्यापार व अन्य उद्योगांना दिले जाणारे महत्त्व, शेतीकडे पाहण्याचे पारंपरिक दृष्टीकोन, शेतकर्याकडील व्यावसायिक दृष्टीचा अभाव, दुष्काळ व अन्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पुरेसे सक्षम नसणे, या व अशा अनेक कारणांनी शेतीचे होत जाणारे विघटन, शेती हाच एकमेव व्यवसाय असलेल्या व त्यावरच अवलंबून असलेल्या शेतकर्यांची दिवसेंदिवस होत जाणारी हलाखीची स्थिती, त्या परिस्थितीला वैतागून आत्महत्या करणारे शेतकरी अशा वरकरणी जाणवणार्या आशयसूत्रांबरोबरच शेतीउद्योगाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांची आत बाहेरून केलेली कठोर चिकित्सा हे लोमटे यांच्या लेखनाचे प्रमुख अंत:सूत्र राहिले आहे.
शेतीसंबंधित प्रश्नांविषयी मुळापासून केलेला अभ्यास, शेतीशी संबंधित पायाभूत घटकांविषयी असलेली आस्था, संघटनात्मक कामांचा अनुभव व कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे प्रत्यक्षानुभव यांमधून लोमटे यांची ही लेखकीय दृष्टी विकसित गेली आहे असे म्हणता येईल. शेती व शेतकरी यांच्याविषयी निव्वळ सहानुभूती असून वा त्याविषयी संवेदनशील असून चालत नाही, तर या गोष्टींच्या बरोबरीने ज्या कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, त्या कारणांचा बारकाईने शोध घेऊन कठोर चिकित्साही करता येणे आवश्यक असते. असे करत असताना काही वेळा आपल्या आस्था घटकांमधील काही दोषही जाणवून आले, तर आत्मटीका करण्याचे धाडसही असावे लागते.
लोमटे यांच्या लेखनाचा हा विशेष म्हणता येईल की, त्यांनी अत्यंत तटस्थपणे ग्रामीण वर्तमान वास्तवाचा वेध घेताना कमालीची पारदर्शकता दाखवली आहे. कुठेही अकारण भावूक वा रोमँटिक न होता वा कुणा एकाची बाजू न घेता आपल्या समोर येणार्या वस्तुस्थितीचा भेदक मागोवा घेण्याची या लेखकाची शैली आधुनिक मराठी साहित्यामध्ये अनोखी अशीच म्हणावी लागते. त्यातून जाणवणारी लेखकाची मर्मदृष्टी कलाकृतीला अधिकचे श्रेष्ठ परिमाण मिळवून देते.
त्यांच्या कथांप्रमाणे ‘तसनस’ या कादंबरीमध्येही हे वैशिष्ट्य ठळकपणे जाणवून येते, हे पहिल्यांदाच नोंदवले पाहिजे. ‘तसनस’ ही आसाराम लोमटे यांची अलीकडेच (डिसेंबर २०२०) प्रकाशित झालेली पहिली कादंबरी.
या कादंबरीमध्येही त्यांनी कथात्म निवेदनाला रिपोर्ताज शैलीची जोड देत कृषिसंस्कृतीचा कणा असलेल्या शेतकर्याच्या जगण्याची होरपळ मांडताना या शेतकर्याची अशी दुरावस्था करणारे सामाजिक व राजकीय घटक, शेतकर्यांविषयी आस्था असलेल्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पडझड रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, अंतिमत: राजकारणाच्या क्रूर आणि कराल जबड्यात सापडून त्यांची होणारी फरफट नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेकदा असे दिसते की, कविता, कथा, नाटक अशा काही अन्य साहित्यप्रकारावर हुकूमत मिळवलेल्या एखाद्या लेखकाने पहिल्यांदाच कादंबरीसारख्या दीर्घ अवकाशाची मागणी करणार्या साहित्यप्रकाराला हात घातल्यावर अनेकदा त्याने त्या त्या आधी हाताळलेल्या लेखनप्रकाराचीच खास वैशिष्ट्ये म्हणता येतील, अशी काही वैशिष्ट्ये त्याच्या कादंबरीमध्येही जाणवत राहतात. कविता लिहिणार्या कादंबरीकाराच्या लेखनामध्ये कवितेच्या भाषेच्या खाणाखुणा दिसत राहतात, कथाकाराच्या कादंबरीमध्ये काही वेळा एकमेकांशी वा कादंबरीच्या मूळ आशयसूत्राशी एकजीव न होणार्या काही छोट्या मोठ्या घटना, पात्रे वगैरे सुट्टेपणाने आलेल्या दिसतात. नाटककाराने निवेदनातून काही सांगण्यापेक्षाही संवादांवर अनावश्यक जास्त भर दिलेला दिसतो. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत हे असे होते किंवा अगदी काटेकोरपणे हे असेच असते असे काही म्हणता येत नाही. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांची म्हणून असलेली अंगभूत वैशिष्ट्ये आत्मसात करून त्या त्या साहित्य प्रकारावर सारखीच हुकूमत असलेले अनेक लेखक मराठीतही दाखवता येतात.
आसाराम लोमटे यांच्या बाबतीतही काही अंशी असे निश्चितपणे म्हणता येते. कथा व रिपोर्ताज लेखनाची सगळी वैशिष्ट्ये मुरवून त्यांनी आपल्या या कादंबरीची रचना केली आहे. या रचनेला कादंबरी म्हणून तिचे एक स्वतंत्र स्थान आहे, हेही सांगितले पाहिजे. कादंबरीचे म्हणून असलेले प्रचलित संकेतव्यूह या कादंबरीमध्ये लेखकाने अनुसरले असले तरी कादंबरीच्या आशयघटकांची आवश्यकता आणि लेखकाचे व्यक्तिमत्त्व यांचा प्रभावही या कादंबरीच्या रचनेवर पडलेला दिसून येतो. कादंबरीच्या अर्थनिर्णयनाच्या दृष्टीनेवाचकांसाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार्या आहेत.
भारतासारख्या कृषिकेंद्री देशात वास्तविक शेती आणि शेतकरी हाच आपल्या जगण्याच्या व्यवस्थेचा कणा असायला हवा होता. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळ असो वा स्वातंत्र्यानंतर लोकशाही शासनप्रणाली स्वीकारल्यानंतरचा लोकांच्या राज्याचा काळ असो, शेतकर्याच्या जगण्याची परवड थांबलेली तर नाहीच, उलट ती अधिकाधिक भीषण होत गेलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकर्यांचे शोषण करणारे घटक स्वातंत्र्यानंतर बदलले तरी मूळ आईतखाऊ गोचीड प्रवृत्ती तीच राहिली. कुलकर्णी जाऊन आपणच निवडून दिलेले आणि आपल्या कल्याणाची धोरणे ठरवणारे राज्यकर्ते आले, त्यांना मदत करणारे सनदी अधिकारी आले, प्रशासकीय नोकरदार आले, हाच काय तो फरक. मुकुंदराव पाटलांच्या ‘दीनमित्र’सारख्या नियतकालिकामधून स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतकर्यांची अशा शोषक वर्गामुळे झालेली दैन्यावस्था समजून घ्यायला मदत होऊ शकते. जे काम मुकुंदराव पाटलांसारख्या म. फुलेंच्या सत्यशोधक विचारांच्या कार्यकर्त्याने त्या काळात केले, तेच काम आधुनिक काळात कथात्म साहित्याच्या माध्यमातून म. फुलेंचे विचार मानणारे काही नव्या पिढीतील लेखक करत आहेत.
त्यामध्ये आसाराम लोमटेंचे नाव महत्त्वाचे आहे. ‘तसनस’ या कादंबरीमधून त्यांनी आजच्या वर्तमानातील शेतकर्यांचे शोषण करणार्या बदललेल्या रूपातील घटकांचे दर्शन घडवले आहे. नव्वदोत्तर दशकानंतरच्या कालखंडात भारताने स्वीकारलेल्या नव्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य शेतकर्यांचे दैन्य कमी होण्याएवजी वाढतच गेलेले दिसते. आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक खते, बी-बियाणी यांच्याशी जुळवून घेताना शेतकर्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला. कष्टांच्या मानाने उत्पन्न वाढले तर नाहीच, पण उत्पादनाच्या बाजारभावाची हमी नसणे, हवामानातील चढउतार, दलाल व बाजार समितीकडून केली जाणारी अडवणूक, सरकारी धोरणांतील धरसोडपणा, अशा गोष्टींमुळे सगळीकडूनच नागवल्या गेलेल्या शेतकर्यावर आत्महत्या करण्याची पाळी येऊ लागली. नव्वदोत्तर काळातील शेती आणि शेतकर्यांच्या याच वास्तवाची चिकित्सा ‘तसनस’मध्ये केलेली आहे.
नामा ऊर्फ नारायण माधव चिलवंत या मध्यवर्ती पात्राच्या अनुषंगाने या कादंबरीतील सर्व महत्त्वाच्या घटना, प्रमुख आशयसूत्रे, प्रमुख पात्रे, निवेदन आपल्यासमोर येत जाते. काही प्रकरणांमध्ये नामाचे प्रथमपुरुषी निवेदन आहे, तर काही अन्य प्रकरणांमध्ये नामाविषयी तिसरा कुणी निवेदक सांगतो आहे. निवेदनातील हे बदलही प्रामुख्याने नामाची वेगवेगळ्या टप्प्यावरची भावावस्था दाखवण्यासाठी, त्याचे चिंतन, एखाद्या घटना वा व्यक्तीविषयीची त्याची प्रतिक्रिया थेटपणे व्यक्त व्हावी, वाचकाला ती एका अर्थी त्याच्याच तोंडून ऐकता यावी या उद्देशाने केलेले असावेत असे वाटते.
नामा या केंद्रवर्ती पात्राबरोबरच राम, बदामराव, त्रिवेणीबाई, रुस्तुम, भाऊसाहेब महाजन, सखाराम धानोरकर, भागचंद, कांचन थोरात, शशांक, नारायण धुळे, बाळू शिंदे अशी काही अन्य प्रमुख पात्रेही या कादंबरीमध्ये येतात. ही सर्वच पात्रे वर्तमान समाजातील विविध वृत्तीप्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणारी आहेत, हे हळूहळू लक्षात येत जाते. प्रामुख्याने शेतकरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या शेतकरी संघटनांच्या यशापयशाची कारणमीमांसा या विविध प्रवृत्तींच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या कादंबरीमध्ये करण्यात आलेला आहे.
हेच या कादंबरीमधील एक प्रमुख आशयसूत्रेही म्हणता येईल. रूढ पद्धतीने सांगितलेल्या कथानकापेक्षाही प्रमुख पात्रांच्या सहाय्याने या आशयसूत्राला लगडून येणार्या अन्य बाजू लेखक आपल्यासमोर ठेवतो. शेतकरी वर्षभर शेतात मरेस्तोवर राबूनही त्याची दैन्यावस्था होते, जो पिकवतो त्यालाच आपल्या पोराबाळांना पोटभर दोन घास घालता येत नाहीत, अंगभर कपडे घालता येत नाहीत, या मागची कारणे आपल्या समाजव्यवस्थेत आहेत.
शेतकर्यांच्या हिताचा विचार न करता सरधोपटपणे धोरणे राबवणार्या राजकारण्यांच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे ही व्यवस्था बदलावी लागेल, शेतकर्यांच्या हातात सत्तेच्या नाड्या याव्या लागतील, तरच मातीत प्रत्यक्ष राबणार्या कास्तकाराच्या कष्टांचेचिज होऊ शकेल, असे मानणार्या काही कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे विचार प्रत्यक्षात यावेत म्हणून जिवाचे रान करायला सुरुवात केलेली असते. सुरुवातीच्या अनेक बर्यावाईट अनुभवांनंतर या चळवळीला काही प्रमाणात तरी यश मिळू लागलेय, समाजामध्ये संघटनेची दखल घेतली जावी असे वातावरण निर्माण झालेय. सत्ता व अधिकार यांची मस्ती असलेल्या लोकप्रतिनिधी व नोकरशाहीतल्या अधिकार्यांना जरब बसू लागलीय, असे आशादायक चित्र समोर येते. मात्र त्याच वेळी संघटनेत राहूनही संघटनेला पोखरू पाहणार्या काही अळ्या ठळक होऊ लागतात.
दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप, पैसा, मनगटशाही यांच्या माध्यमातून चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोडण्याचे, आमिष दाखवून विकत घेण्याचे वा सरळसरळ जीवानिशी संपवण्याचे घृणास्पद प्रकारही सुरू होतात. चळवळीचे विघटन होत जाऊन सामान्य लोकांच्या मनातील तिच्याविषयी निर्माण झालेल्या विश्वासाला तडा जाण्याची हीच सुरुवात असते. यातूनच मग चळवळीच्या इतिहासाशी, ध्येयधोरणांशी, उद्दिष्टांशी देणेघेणे नसलेल्या नव्या कार्यकर्त्यांची बेफिकीर वृत्तीबळावत जाणे, चळवळीकडे सत्तासंपादनाची शिडी वा चरितार्थ व करियरचे साधन म्हणून पाहणे, जुन्यांचे निराश होत उदासीन होत जाणे, चळवळीतून पूर्णपणे लक्ष काढून घेणे अशा गोष्टी घडत जातात. ज्या कार्यकर्त्यांनी घरादाराचा, संसाराचा विचार न करता, दिवसरात्र एक करून चळवळीची पाळेमुळे रुजवलेली असतात, सामान्य माणसांचा विश्वास संपादन केलेला असतो, त्याच कार्यकर्त्यांच्या डोळ्यांपुढे चळवळीची घसरण होणे सुरूच असतो. पुढे अशा चळवळींचे निर्णायकी स्वरूपात दिशाहीन होत भरकट जाणे अटळ असते. ज्या उद्देशाने चळवळीची रुजुवात केली गेली होती, त्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याने शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया अशा राबणार्या जीवांच्या जगण्यात काहीच फारक पडलेला नसतो. उलट शेतकर्यांच्या रक्तावर पोसलेल्या असंवेदनशील आइतखाऊ लोकांच्या हाती चळवळीचे शस्त्र गेल्याने त्यांची होरपळ अधिकच तीव्र झालेली असते. नेमका हाच अनुभव इथेही येतो.
शेतकर्यांचे जगणे केंद्रस्थानी असलेल्या अनेक कादंबर्या मराठीमध्ये लिहिल्या गेल्या आहेत; मात्र डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी म्हटल्याप्रमाणे यातील अनेक कादंबर्यांमध्ये रूपाचा वा कलात्मकतेचा विचार न करता शेतकर्यांच्या जगण्याशी संबंधित असलेले वास्तव अतिशय सरधोपटपणे वर्तमानपत्री पद्धतीने मांडण्यात आलेले दिसते. वास्तवाचे सर्जनशील कलेमध्ये उपयोजन करून घेण्याचे भान या काही कादंबरीकारांनी दाखवलेले नाही असे म्हणता येते. कादंबरीचे नाते वास्तववादाशी असते हे खरे असले तरी वास्तवाचा सर्जनशील वापर कादंबरीसारख्या कथात्म साहित्यात केला जाणे गरजेचे असते. तसा तो केला न गेल्यास अनेकदा कलाकृती वास्तवाची वर्तमानपत्री मांडणी करणारा माहितीपट बनून जाण्याचीच शक्यता अधिक असते.
यादृष्टीने ‘तसनस’ या आसाराम लोमटेंच्या कादंबरीकडे पाहू गेल्यास काय दिसून येते? जाणवणारी पहिली ठळक गोष्ट म्हणजे आपण कादंबरीच लिहितो आहोत याचे पुरेपूर भान लोमटेंना होते व ते त्यांनी शेवटपर्यंत कायम राखलेले दिसते. कादंबरीसारखा दीर्घ अवकाश व्यापणारा साहित्यप्रकार कवेत घेताना मानवी व्यवहार केंद्रस्थानी ठेवणार्या वास्तवाची विविध रूपे, अनुभवांना मिळवून दिलेले विविध रचनाबंध, विविध संभाषिते, सांस्कृतिक आविष्कार, कथनरूपे अशा अनेक घटकांचा सुनियोजित वापर करावा लागतो. कादंबरीतील अवकाश, काळ आणि आशयाच्या अनुषंगाने निर्माण केलेली पात्रे यांना कथनामध्ये महत्त्वाचे स्थान असते.
लोमटेंना आपल्या कादंबरीतील कथनरूपाचे भान व कादंबरीच्या निर्मितीमागील वैचारिक दृष्टीकोन स्पष्ट असल्याने त्यांनी कादंबरीच्या संकेतव्यूहांसाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा योग्य पद्धतीने वापर करून घेतला आहे. कोणत्याही कादंबरीच्या संकेतव्यूहामध्ये कथन करणारा निवेदक हा घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो. त्यातूनच लेखकाची वैचारिक भूमिका, कादंबरीतील तत्त्वज्ञान, दृष्टीकोन स्पष्ट होत असतो. अनेकदा निवेदनातील एकसूरीपणा कादंबरीला मारक ठरतो. अनेक लेखक स्वत:च्या आयुष्यातील अनुभवांचा वापर कादंबरी लेखनामध्ये करून घेत असताना प्रथमपुरुषी निवेदन तंत्राचा उपयोग करतात. मात्र त्यातून बर्याचदा आत्मकथनाचा रूपबंध लेखक हाताळतो. त्यात काही गैर नसले तरी या रूपबंधाचा सर्जक स्वरूपाचा वापर करता न आल्याने अनेकदा असे लेखन एकांगी होत गेलेले दिसते. लेखकाच्या विचार, कृती, दृष्टीकोन यांची मर्यादा कादंबरीच्या मध्यवर्ती पात्राची आणि एकूणच कादंबरीचीही मर्यादा बनून जाते. अशा लेखनात मध्यवर्ती पात्राचे आत्मसमर्थन हे प्रत्यक्ष लेखकाचेच आत्मसमर्थन असल्यामुळे कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखा दुय्यम बनून जातात किंवा त्यांना पुरेसा न्याय दिला जात नाही. त्यांची म्हणून काही बाजू असू शकते, हे प्रथमपुरुषी निवेदन करणार्या लेखकाने विचारात घेतलेले दिसून येत नाही.
तृतीयपुरुषी निवेदनामध्ये निवेदकाने मध्यवर्ती पात्रांसह सर्वांकडेच समदृष्टीने पाहून कादंबरीची उभारणी करणे आवश्यक असते. लेखकाची सहानुभूती काही विशिष्ट पात्रांना असली वा काही पात्रांमधून लेखकाचा तात्त्विक दृष्टिकोन प्रकट होत असला तरी कोणतेही पात्र काळ्यापांढर्या छटांमध्येच उभे न करण्याची जबाबदारी निवेदकाला पार पाडावी लागत असते. त्यासाठी पात्रांच्या मनात शिरून त्याची म्हणून असलेली बाजू मांडण्याची संधी त्याला दिली जाणे गरजेचे ठरते. काळाच्या उभारणीमध्येही निवेदकाची भूमिका महत्त्वाची ठरणारी असते. या दृष्टीने ‘तसनस’मधील निवेदनाचे स्वरूप कशाप्रकारचे आहे हे पाहता येऊ शकेल.
चळवळीच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ता असलेला भास्कर लुंगारे सुरज मोरेच्या म्हातार्या आईला भेटायला जातो, या घटनेच्या निवेदनाने या कादंबरीची सुरुवात होते. निवेदन आणि संभाषण यांमधून काही वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने सरकारकडून कापसाला दिला जाणारा हमी भाव वाढवून मिळावा यासाठी आयोजित केलेला रस्ताबंदी कार्यक्रम व त्यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सुरज मोरे या कोवळ्या वयातल्या तरुणाचा बळी गेल्याची हकिकत आपल्या समोर येते. या घटनेत काही कार्यकर्त्याना जाणूनबुजून अडकवले जाते. अनेक वर्षे खटला चालू राहतो. शेवटी त्याचा निकाल लागून सगळ्यांना निर्दोष मुक्त केले जाते. पण तोवर पुलाखालून बरेच पाणी गेलेले असते.
तृतीयपुरुषी निवेदन तंत्राचा वापर करून लिहिलेले हे प्रकरण अत्यंत प्रभावी व परिणामकारक झाले आहे. चळवळीची भूमिका, चळवळीला मिळणारा लोकांचा पाठिंबा, सरकारची चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन, सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांची व त्यांच्या कुटुंबाची होणारी फरफट याविषयी निवेदनातून कळणार्या गोष्टी पुढील प्रकरणांतून येणार्या आशयाची भक्कम पायाभरणी करतात.
भूतकालीन घटनेचे निवेदन केले गेले असले तरी त्यात आलेल्या वर्तमानाला भारित करणार्या सांस्कृतिक संदर्भांमुळे ते कुठेही स्मरणरंजनाच्या पातळीवर उतरत नाही. भूतकाळाचा वर्तमानाबरोबरच भविष्यावर पडलेला प्रभाव त्यातून सतत दृग्गोचर होत राहतो. काळाची ही अशा प्रकारची सरमिसळ तसेच भूतकाळ व वर्तमानकाळ यांचा अर्थपूर्ण वापर हे या कादंबरीतील निवेदनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
भूतकाळाचा वेध घेत ही कादंबरी सतत वर्तमानाशी संबंध जोडत राहते. या कादंबरीतील अधलीमधली काही प्रकरणे नामा ऊर्फ नारायण माधव चिलवंत या कार्यकर्त्याच्या दृष्टीकोनातून प्रथमपुरुषी निवेदन असलेली आहेत. तेथेही नामाच्या पूर्वायुष्यातील काही घटनांचे आठवणींच्या स्वरूपातील निवेदन येते. मात्र नामाच्या भूतकाळातील या घटनांचा संबंध त्याच्या कार्यकर्ता बनण्याशी, शेतकर्यांची परिस्थिती बदलावी म्हणून चळवळीशी जोडून घेण्याच्या वर्तमान आयुष्यातील निर्णयांशी आहे. कर्जवसुली करण्यासाठी बँकेचे पथक गावात आल्याचे कळल्यावर भेदरलेला नामाचा बाप धान्याच्या कणगीतलपून राहतो. नेहमी अन्यायाविरोधात चवताळून उठणार्या करारी व स्वाभिमानी स्वभावाच्या बापाचं असं लोळागोळा होणं, गुडघामिठी घालून थरथरत लपून बसणं नामाला विसरता येत नाही. आयुष्यभर शेतात राबताना भाकरतुकडा खाण्याशिवाय दुसरी कसलीही चैन न केलेल्या आणि चारदोन हजार रुपयांच्या कर्जासाठीही गुन्हेगाराप्रमाणे लपून राहावं लागलेल्या बापाची ही अवस्था एकीकडे आणि दुसरीकडे नामाच्या बापासारख्या कष्टकर्यांच्या जीवावर आयता मलिदा खाणारे दलाल, सत्तेतले लोक, नोकरशाहीतली माणसं. दोन परस्परभिन्न काळाप्रमाणेच परस्परांहून वेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक अवकाशातील अस्वस्थ करणार्यावास्तवाचे प्रतिरूपण या निवेदनामधून आपल्यासमोर येते. नामाच्या आयुष्यातील भूतकाळातील घटना नामाच्या वर्तमानाला कृतिप्रवण बनवतात.
आपल्या भूतकाळासारखा भूतकाळ इतर शेतकर्यांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी चळवळीच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलवण्यासाठी तो क्रियाशील होतो. आजवर शेतमालाचा दरकपात, बाजारभाव, वीजबिले, वेगवेगळे कर अशा अनेक बाबतीत सरकारने आपल्याला इतकं लुटलंय की सरकारच आता आमचे पैसे देणं लागतंय. त्यामुळे यापुढे शेतकर्यांनी सरकारला कसलीही कर्जाची परतफेड करू नका, वीजबिले भरू नका, असे नामाचे सांगणे असते. आम्हाला आमचे सरकार आणायचे आहे, त्यात आम्हीच मालक असू असा त्याचा आशावाद आहे. पुढे त्याचे हे चळवळीशी जोडले गेलेले वर्तमान आयुष्य, त्यातील संघर्ष मांडण्यासाठी पुन्हा तृतीयपुरुषी निवेदनाचा खुबीने वापर केला गेला आहे.
कादंबरीतील एकूण पंचवीस प्रकरणांपैकी फक्त सहा प्रकरणे (प्रकरण क्रमांक २, ९, १२, १७ , १९, २५) नामा या प्रमुख पात्राच्या आत्मनिवेदनासाठी आली आहेत. उर्वरित एकोणीस प्रकरणांमधून तृतीय पुरुष निवेदनामार्फत नामासह अन्य पात्रांच्या वर्तमानाची गोष्ट सांगितली जाते. नामाचे आत्मनिवेदन असलेल्या या पाचही प्रकरणांच्या सुरुवातीस काव्यात्म शैलीत काही ओळी येतात. डायरीतले लेखन असावे किंवा स्वगत असावे तशा स्वरूपाच्या त्या आहेत. आत्मनिवेदनात्मक कथनशैलीत अशा प्रकारच्या डायरी वा कवितेसारख्या आत्माविष्कारात्मक संभाषितांचा वापर करून निवेदन करणार्या त्या विशिष्ट पात्राच्या मानसिकतेचा नेमका परिचय वाचकांना करून दिला जाऊ शकतो. नामा कवी नसला तरी त्याला कविता चांगली कळते. कार्यकर्त्याला ज्या प्रकारच्या कविता आपल्या चळवळीचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी आवश्यक वाटतात, तशा प्रकारच्या कविता त्याला आवडतात. कविता किंवा साहित्याचे स्वरूप कशा प्रकारचे असले पाहिजे याविषयी त्याच्या काही पक्क्या धारणा आहेत. त्या त्याच्या कार्यकर्त्याच्या मनोवृत्तीला साजेशा अशाच आहेत. कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही लिहिण्याला एक परिणामकारक टोक असावं. (पृ. १२८) जे जगण्यात येतं ते काहीही लिहिण्यात आलं तरी चालेल फक्त ते उपरं वाटू नये... (पृ. १३१) ही त्याची लेखनाकडून अपेक्षा आहे.
कार्यकर्त्याच्या भूमिकेतून वावरत असताना अधूनमधून नामा आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतो. आपल्या आयुष्यातील भूतकालीन घटनांच्या अनुषंगाने आत्मचिकित्सा करू पाहतो. स्वत:च्या आयुष्याबरोबरच आपल्या कुटुंबातील माणसे, चळवळीत भेटलेली माणसे, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, वागणं, निर्णय, चळवळीचे यशापयश यांची मनाशी उजळणी करीत त्याचीही चिकित्सा करू पाहतो. उदाहरणार्थ, शशांक धानोरकर हा सुमार वैचारिक जाणिवांचा हौशी कवी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा इतिहास लिहिणार होता. त्याचे काका सखाराम धानोरकर चळवळीच्या नावाखाली प्रस्थापित राजकीय सत्ताधार्यांच्या ताटाखालचं मांजर बनून जगत असतात. यासंदर्भात आपलं चळवळीतला त्याचा जवळचा साथीदार असलेला राम व त्याची चर्चा पाहता येईल.
राम म्हणतो, “... सगळं त्यांच्या सोयीचंच असणार त्या पुस्तकात. आपल्याला फारशी जागाच नसणार त्यात. भागचंदसारखे लोकच नायक असतील त्यात आणि त्यांच्याच आठवणी सार्या पुस्तकरूपातून येणार. मग आपण केलेल्या कामाचं काय? यावर चिडून नामा म्हणतो, तुला सखारामजीच्या प्रमाणपत्राची गरज कधीपासून लागायली? आणि या पुस्तकात समजा तुझ्याबद्दल काहीच उल्लेख नसला म्हणजे तुझी जिंदगी वाया गेली का? आणि असलाच उल्लेख तर तुला असा कोणता ताम्रपट मिळाला? आपण लढतोय त्याच्या प्रेरणा इतक्या ठिसूळ कधीपासून झाल्या? कुठल्या तरी भंपक गोष्टीवर एवढा विचार करतोस...” (पृ. १७६) चळवळीच्या आपल्या कामाविषयी त्याची काही ठोस भूमिका आहे.
कुणी आपली दखल घ्यावी, भौतिक लाभ मिळवावेत, कागदी प्रसिद्धी मिळावी म्हणून तो चळवळीत आलेला नाही. त्याची भूमिका अत्यंत लख्ख, पारदर्शक आहे. म्हणूनच तो म्हणतो, एखाद्या गोष्टीला भोंगळ विरोध करण्यात, पालतू म्हणण्यात ताकद घालवणं मला आवडत नाही. जे नाकारायचं ते नाकारलंच पाहिजे. पण फक्त तेवढ्यावरच थांबू नये. जोवर पर्यायी काम उभं राहत नाही, तोवर आरडाओरडा करण्याला अर्थ उरत नाही. (पृ. १८०) राम हा त्याचा अगदी सर्वात निकटचा सहकारी असला आणि त्यांच्यात वैचारिक स्वरूपाचे जाणवण्याजोगे ठळक मतभेद नसले, तरी राम आणि त्याच्यामधील चळवळीकडे बघण्याच्या दृष्टीकोनातील फरक अशा काही छोट्या छोट्या आत्मनिवेदनात्मक विधानांमधून स्पष्ट होत जातो.
कादंबरीच्या अखेरच्या भागात या दोन पात्रांच्या दृष्टिकोनातील फरक नामाच्या आत्मचिकित्सेमधूनच अधिक ठळक होत जातात. दोघांनीही तन-मन-धनाची पर्वा न करता चळवळीत झोकून दिले असले तरी नामापेक्षा राम अधिक व्यवहारी दृष्टी असलेला, बदलत्या वर्तमानाचे अधिक भान बाळघणारा कार्यकर्ता आहे.
याउलट नामा काहीसा भाबडा, भविष्याकडून सकारात्मक होण्याची आशा बाळगणारा, स्वप्नाळू कार्यकर्ता वाटत राहतो. अन्य कार्यकर्त्यांकडूनही त्याची काहीशी तशीच अपेक्षा आहे. पण तसे घडणे प्रत्यक्षात अशक्यच असते हे अखेरीस जाणवल्यावर त्याचे चळवळीपासून दूर जात उदासीन होणे नैसर्गिक वाटते. कादंबरीतील नामाच्या आत्मनिवेदनात्मक प्रकरणांमधून त्याचे हे स्वभावविशेष अधिक थेटपणे वाचकांपर्यंत पोहोचायला मदत होते. चळवळीशी संबंधित असलेले अन्य कार्यकर्ते वा कार्यकर्ते असल्याचे भासवून चळवळीचा स्वत:च्या भौतिक फायद्यासाठी लाभ उठवू पाहणारे लोक यांच्याविषयीची नामाची मतेही या आत्मनिवेदनात्मक प्रकरणांमध्ये आलेली आहेत.
कॉम्रेड रुस्तुम, त्रिवेणीबाई यांसारख्या थेट चळवळीशी संबंधित असलेल्या किंवा चळवळीला पूरक ठरेल असे समांतर काम करणार्या कार्यकर्त्यांविषयी या कादंबरीमध्ये तपशीलवार घटना-प्रसंगांतून सांगितले गेले आहे. कादंबरीतील या दोन्ही व्यक्तिरेखा नामा व रामच्या व्यक्तिरेखांइतक्याच महत्त्वाच्या आहेत. त्रिवेणीबाईच्या व्यक्तिरेखेमधून एका महिला कार्यकर्तीचे हळूहळू घडत गेलेले कार्यकर्तीपण ठळकपणे मांडले गेले आहे. तिची स्त्रियांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून असलेली तळमळ, आपला संसार सांभाळून समरसून समाजासाठी काम करणे, चळवळीचे काही कटू अनुभव येऊनही आस्था कायम असणे व अखेरीस स्त्री म्हणून असलेल्या मर्यादांमुळे चळवळीपासून तटस्थ होत जाणे, अशा सगळ्या गोष्टी फार नेमकेपणाने उभ्या केल्या गेल्या आहेत. तिच्याविषयी नामाच्या मनात एक प्रकारचे अनाम असे खोलवरचे आकर्षण असावे असे काही वेळा जाणवत राहते. तिच्याविषयीचे आपले मत तो नेमकेपणानं मांडतो- “त्रिवेणीबाईचं भान वरवरचं नाही. खोलवरंय. काय करायचं, काय नाही याची बाईची जाण एकदम पक्कीय. जे शहाणपण अंगी आहे ते स्वत:च्याच जगण्याच्या कसोटीवर आलेल्या अनुभवातून. कुणी सांगूनसवरून माणसं इतकी तयार होत नाहीत.” (पृ. १०१)
मात्र काही वेळा हे पात्र मुख्य कथाभागाशी असूनही व्यापक पटावर एकजीव होणे गरजेचे होते, असे वाटत राहते. कॉम्रेड रुस्तुमबाबत तसे म्हणता येत नाही. याचे कारण रुस्तुम संघटनेमध्ये प्रत्यक्ष सामील न होताच समांतरपणे आपले काम तळागाळातील अन्य वर्गासाठी करत राहिलेला असतो. संघटनेचे पाठबळ नसतानाही तो करत असलेले काम ठळकपणे जाणवत राहते. नारायण धुळे या दलित शेतकर्याचे डोळे काढले गेल्यानंतर त्याच्यावरच्या अन्यायासंदर्भात तो नामाला पत्र लिहितो. त्या पत्रातून त्याची सर्वसामान्यांविषयीची तळमळ, त्याची संवेदनशील वृत्ती याचे मनोहारी दर्शन घडते. मातीतून उगवणार्या धान्याला, पिकाला रास्त भाव मिळावा हे कबूल पण गावात दुबळ्या माणसाला रास्तपणानं जगता यावं हे महत्त्वाचं वाटत नाही का? सगळ्या आजारांवर एकच इलाज कसा लागू होईल? एखाद्या गावकुसाबाहेरच्या माणसानं काडी काडीविणून उभा केलेला संसार विसकटून का टाकावा वाटतो? हा माज कशाचा? अन् कुणाच्या जिवावर? (पृ. ८९) हे त्याने नामाला विचारलेले प्रश्न गंभीरपणे विचार करायला लावणारे आहेत. कोणत्याही चळवळीला एखाद्या प्रश्नाची सर्व बाजूंनी विचार करू शकणार्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. रुस्तुम हा अशा प्रकारचा समतोल विचारांचा प्रगल्भ कार्यकर्ता वाटत राहतो.
याव्यतिरिक्त कोणत्याही संघटनेत वा चळवळीत असतात तशी संघटनेचा लाभ व्यक्तिगत स्वार्थासाठी करून घेणारी, पदे, सत्ता यासाठी चळवळीचा शिडीसारखा वापर करणारी, आत्मलोलुप वृत्तीची माणसे या कादंबरीतही रेखाटली गेली आहेत. भागचंद पोखरदास, सखाराम व शशांक धानोरकर अशा काही व्यक्तिरेखा या प्रवृत्ती ठळक करतात. ही मंडळी इकडे आपण शेतकर्यांबरोबर आहोत, चळवळीतले कार्यकर्ते आहोत, असे भासवत असली तरी प्रत्यक्षात मात्र बदामरावासारख्या सत्तेच्या राजकारणातील राजकीय व्यवस्थेच्या हस्तकांशी जवळीक साधून असतात. दुसरीकडून फायदे उठवून आपली तुंबडी भरत असतात. आपण जन्माने शेतकरी जातीतले वा शेतकरी व्यवसायाशी संबंधित नसूनही केवळ शेतकर्यांच्या हितासाठी चळवळीत, आंदोलनात असल्याचे सांगून सतत आपली जाहिरातच एक प्रकारे हे लोक करत असतात. असे असले तरी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे आजवर कधीही एकही काठी यांच्या अंगावर पडलेली नसते. शेतकरी चळवळीतला एकही गुन्हा यांच्यावर नोंदवला गेलेला नसतो. अश्रुधूर डोळ्यांत जाऊन डोळे कधी चुरचुरलेले नसतात की कधी लाठीमारात सैरावैरा धावताना पायाची नळी फुटलेली नसते.
मोर्चात कुणाविरुद्ध बेंबीच्या देठापासून आरोळी देताना त्यांना कधी कुणी पाहिलेलं नसतं. तरीही वर्तमानपत्रांमधून, भाबड्या शेतकर्यांसमोर हेच लोक चळवळीतले मोठे कार्यकर्ते म्हणून मिरवून घेत असतात. याशिवाय कांचन थोरातसारख्या सुमार वैचारिक कुवत असलेल्या बाईची व्यक्तिरेखाही या कादंबरीमध्ये अशा प्रकारचा उथळ विचार करणार्या बुद्धिजीवींचे प्रतिनिधित्व करणारी म्हणून येते. अर्थात ही व्यक्तिरेखाही कादंबरीच्या मूळ आशयसूत्रांशी फारशी एकजीव न झाल्याने उपरीच वाटत राहते. ती नसल्याने फार काही फरक पडला असता असे वाटत नाही. स्वत:ला शेतकरी कार्यकर्त्यांचा विठ्ठल म्हणवणारी चळवळीची संस्थापक असलेली भाऊसाहेब महाजन यांच्यासारखी म्होरकी व्यक्ती अखेरीस ज्या प्रकारे हास्यास्पद होत जाते ते पाहणे म्हटले तर चळवळीच्या अपयशाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणता येईल. विविध वृत्ती-प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणार्या या पात्रांच्या माध्यमातून गेल्या पंचविसेक वर्षांतील जागतिकीकरणानंतरचे ग्रामीण भागातील बदलते कृषिजीवन, शेतकर्यांच्या हितासाठी तळमळीने काम करी पाहणार्या संघटनांतील कार्यकर्ते, सर्व क्षेत्रात घुसलेल्या मूल्यविवेकहीन राजकारणाने पोखरलेल्या व्यवस्था लेखकाने उभ्या केल्या आहेत. त्यांचे आपापसांतील मूल्यसंघर्ष, टकराव व अंतिमत: ध्येयवाद, संवेदनशीलता, विवेक, वैचारिकता यांसारख्या मूल्यांचे क्षीण होत जाणे ही कादंबरी फार ताकदीने आपल्यासमोर मांडते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
एकूणच, शेतकरी चळवळीसारख्या एका महत्त्वाच्या समकालीन विषयाला भिडणारी, निवेदनतंत्रे, व्यक्तिरेखा, भाषाशैली अशा सगळ्या अंगांनी आसाराम लोमटे यांची ही कादंबरी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करते. वास्तवातील केवळ तपाfशलांवर अवलंबून न राहता वास्तवाचे मूल्ययुक्त कलात्मकतेत रूपांतर करण्यात लेखकाची सर्जनशीलता दिसून येते. शेतकरी प्रश्नांच्या अनुषंगाने शेतकर्यांना लुटणारे दलाल, निष्क्रिय बाबू लोकांच्या हाती गेलेली कृषिविद्यापीठे, बहुजन शेतकरी कुटुंबातून येऊनही शेती व शेतकरी यांच्याविषयी आस्था व अभ्यास नसलेले संवेदनाशून्य लोकप्रतिनिधी, खेड्यापाड्यातील जातीय गुंडगिरी, स्त्रियांचे प्रश्न, समाजाकडे पाठ फिरवून आत्मानंदात मश्गुल असलेले कवी, उदासीन बुद्धिजीवी अशा अनेक गोष्टींना ही कादंबरी स्पर्श करते. बहुजनसन्मुख भाषा, ग्रामीण कृषिसंस्कृतीतील मूल्यांचे भान, राबणार्यांविषयीची पराकोटीची संवेदनशीलता व चळवळीच्या आतबाहेरच्या अंगांचे सखोल व चिकित्सक विश्लेषण करण्याची सम्यक दृष्टी, यामुळे आसाराम लोमटे यांची ही कादंबरी या दशकातील मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी ठरू शकते, असा विश्वास वाटतो.
‘तसनस’ - आसाराम लोमटे
शब्द पब्लिकेशन, मुंबई
पाने – २९०
मूल्य – ४८५ रुपये.
(अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक ‘अक्षरयात्रा (२०२१-२०२२)’मधून साभार)
.................................................................................................................................................................
लेखक प्रवीण दशरथ बांदेकर कवी व कादंबरीकार आहेत.
samwadpravin@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment