‘रहबर’ : या कादंबरीतील सलीमचा मूल्यसंघर्ष आजच्या जातीय आणि मूलतत्त्ववादी वास्तवाशी नेमकेपणाने भिडत असल्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
महेंद्र कदम
  • ‘रहबर’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 21 May 2022
  • ग्रंथनामा शिफारस रहबर Rahbar रफीक सूरज Rafiq Suraj

रफिक सूरज यांची ‘रहबर’ ही कादंबरी शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. सलीम मुजावर हा तरुण निमशहरातील एका महाविद्यालयात हंगामी प्राध्यापक म्हणून रुजू होतो आणि वर्षअखेर नोकरीच्या समारोपाचा निरोप घेऊन बाहेर पडतो. या दोन घटनात्मक बिंदूमध्ये कादंबरीचे कथानक घडत जाते. वस्तुत: कादंबरीचा कालखंड एक वर्षाचा असला तरी अवकाश मात्र व्यापक आहे. या अवकाशात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संघर्षाची मीमांसा करत करत जीवनाविषयी काही एक मूल्यात्मक विधान करण्याचा प्रयत्न कादंबरीकाराने केला आहे. कादंबरीतील सलीमचा मूल्यसंघर्ष आजच्या जातीय आणि मूलतत्त्ववादी वास्तवाशी नेमकेपणाने भिडत असल्यामुळे त्याच्या विधानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

सलीम मुजावर हा ज्या समूहाचा घटक आहे, त्या मुस्लीम समाजाचे अंतर्बाह्य चित्रण येथे आले आहे. नमाजापासून विवाह, बारसे, इस्तेमा, जमात ते अंत्यविधीपर्यंतचे चित्रण करताना कादंबरीकाराने अत्यंत तटस्थपणे पुरोगामी मूल्यविवेकाची दृष्टी बाळगली आहे. या सर्व संस्कारविधींचे चित्रण करताना त्यांच्यातील फोलपण, चिरंतनत्व जसे अधोरेखित होते, तसेच ते हिंदू धर्म परंपरेशी किती एकजीव झाले आहे, याचेही प्रत्यंतर येते. नमाजातील बयान ऐकणारे ‘जिस ने गरीब के खिलाने-पिलाने का जिम्मा ले लिया, उसको अल्लाहत अल्ला जन्नत में दाखिल करेगा’ यासारखी मौलानाची विधाने ऐकून मंत्रमुग्ध होणारे बाबालाल मस्जिदमध्ये पंखा बसवण्याची जबाबदारी घेतात; परंतु मामूच्या नातवाला दवाखान्यात नेण्यासाठी उसने पैसे देत नाहीत. तसेच इस्तेमाच्या ठिकाणी सैनिकांपेक्षा अधिक स्वयंशिस्तीने वागणारी माणसे एस.टी.त चढताना मात्र कसलाही विचार करत नाहीत. या घटनांमधून मुस्लीम लोकांच्या ढोंगीपणाचे चित्रण रफिक सूरज नेमकेपणाने नोंदवतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मुस्लिमांच्या विवाहातील करणी-धरणी, हळदी, गरोदर स्त्रीचा सातव्या महिन्यातील विधी यांसारख्या अनेक प्रथा हिंदू परंपरेशी अत्यंत जवळचे नाते सांगतात. गैबीवली दर्ग्याच्या जीर्णोद्धारासाठी गावातील सगळी प्रतिष्ठित मंडळी एक होतात. बापू धनगरसारखा दारुड्यासुद्धा त्यामध्ये सामील होतो. यासंदर्भातील बाबू सुतार आणि अब्दुलमामूचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. बाबू एकाऐवजी लॉटरीची दोन तिकीटे फाडतो व पैसे न घेता व मामूची इच्छा नसतानाही तो एक तिकीट मामूच्या खिशात कोंबतो. त्यावर म्हादू म्हणतो, ‘‘बाबू, तू बळेच तुजं सोताचं नशीब मामूच्या सोध्यान करतूयास, पन समज मामूला खरोखरच सोडत लागली तर?’’ त्यावर बाबू म्हणतो, ‘‘तर काय? तेचं नशीब त्याच्यासकट! आणि म्हादू असा प्रसंग आलाच तर तिकिटाचा उधार रुपाया तेवढा वसूल करून घेईन हां! हिशेबाला मातर आपून चोक.’’

हा संवाद सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. इथे बाबूच्या डोक्यात कसलाही धार्मिक-जातीय विचार नाही. तो मामूकडे निखळ एक सहकारी माणूस म्हणून पाहतो आहे. यातून गावपातळीवरच्या हिंदू-मुस्लिमांमध्ये असलेल्या एकजीवत्वाचे दर्शन घडते. सगळेच लोक दिवाळीला व ईदला एकमेकांकडे जातात. गावपातळीवरील या एकजीवत्वाचे मूल्य अधोरेखित करणे, हे या कादंबरीचे केंद्र आहे.

गावपातळीवरील या एकत्वाला नागर आणि शिक्षित माणसात मात्र तडा गेला आहे. त्यांच्या नात्यात दरी पडत चालल्याचे चित्रही या कादंबरीत आले आहे. प्राध्यापक असलेला सलीम वर्गात शिकवताना अनावधानाने शिवरायांचा एकेरी उल्लेख होतो आणि वर्गात चुळबूळ वाढीस लागते. वातावरण तणावात्मक बनते. तेव्हा तो औरंगजेबाचा उल्लेख औरंग्या असा करून वर्ग तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. जातीयतेच्या वाढत चाललेल्या तीव्र भावनेने तो अधिकच त्रस्त होतो. तो म्हणतो,

‘‘आमचे मूळ या मातीतले असूनही पुन्हा आमच्याकडे परकेपणावरून पाहिले जाते. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली, तरी मुस्लीम मानसिकतेची फरफट सुरू आहे; पण वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, त्यावर खुद्द आमचा मुस्लीम समाजच आवाज उठवायला तयार नाही.’’

मुस्लीम समाजातील पारंपरिक आणि आधुनिक मूल्य संघर्षाचेही चित्रण ही कादंबरी करते. सलीमच्या लग्नात त्याच्या अब्बाने घेतलेली तथाकथित उच्च कुलीनतेची प्रतिगामी भूमिका, काझीबानची उर्दू शाळेबद्दलची वरपांगी भूमिका, संकटात सापडलेल्याच तलाठ्याला आपल्या मुस्लीम जातीची आठवण होणे, व्होटबँक म्हणून आपला वापर होत आहे हे लक्षात ये असूनही कोणतीच भूमिका न घेणार्‍या समाजाची मानसिकता, शौकतचा उडाणटप्पूपणा, जातीयतेच्या आधारेच आपल्याला राजकारणात प्रवेश मिळाल्याचे भान असूनही जाणीवपूर्वक त्याच्याकडे डोळेझाक करणारा इरफान आणि त्याची मानसिकता, घरात पत्नीचा आईकडून होणारा छळ, रझियाच्या लग्नाचा प्रसंग अशा अनेक प्रसंगातून रफीक मुस्लीम समाजातील प्रतिगामीत्व अधोरेखित करीत जातो. तथाकथित घरंदाजपणा, जातीयता, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, अल्पवयीन विवाह, पारंपरिक दृष्टिकोन, अर्थकारणातील अडाणीपण अशांमुळे हा समाज गर्तेत अडकून पडला आहे. पत्र्याच्या घागरीवरून सलीमची आई त्याच्या बायकोला बोल लावते. नातवाला दवाखान्यासाठी पैसे नसल्याने मामू चिंताक्रांत असतो. इमरानला ओबीसी सर्टिफिकेट मिळत नसल्याने त्याचा मेडिकलचा प्रवेश रद्द होणे, त्याला सावकाराचे व्याजाचे पैसे परत देता न येणे, सलीमजवळ इस्तेमाला जाण्यासाठी पैसे नसणे, नोकरीसाठी सायकलवर पाय खोडत जावे लागणे, अशा सगळ्या अभावग्रस्ततेवर मात करण्यासाठी हा समाज छत्र्या दुरुस्ती, गारेगार विकणे, अंडा ऑम्लेटचा गाडा लावणे, पंक्चरचे दुकान टाकणे, उदबत्त्या विकणे असे विविध व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आले आहेत.

हा सगळा संघर्ष इतर धर्मीय मानवांसारखाच आहे. तोही हिंदूंसारखाच आपल्या जगण्याच्या लढाईत हरत आहे, अस्तित्वासाठी झगडत आहे, तरीही या समाजाकडे संशयाने का पाहिले जाते, असा प्रश्न ही कादंबरी विचारते.

सलीम मुजावर ही या कादंबरीची प्रमुख व्यक्तिरेखा, त्याची स्वत:ची अशी एक जीवनधारणा व मूल्यधारणा आहे. तो प्रयत्नवादी आहे. येणार्‍या प्रत्येक संकटास तो धीराने सामोरा जातो. त्याचा पिंड अंतर्मुखी असला तरी तो त्याला दाबून टाकण्यासाठी अधिकाधिक बहिर्मुख बनतो. इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी धडपडतो. अधिकाधिक समाजाभिमुख बनू पाहतो. त्याची ही समाजाभिमुखता त्याच्या स्वत:च्या मूल्यसरणीने अधोरेखित झाली आहे. सलीमच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा विशेष म्हणजे त्याची सडेतोड व स्पष्ट बोलण्याची वृत्ती.

त्याला जे पटेल तेच तो बोलतो व करतो. उर्दू हायस्कूलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्याला जेव्हा भाषण करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा तो काझीजनाब बुजूर्ग असूनही त्यांची भूमिका खोडून काढतो, तो त्यांना म्हणतो, ‘‘तुम्ही तुमच्यासारख्या दोनशे लोकांचं हित बघता ही गोष्ट मला कबूल आहे; पण त्यासाठी तुम्ही किती लोकांचा बळी देता? गावातली उर्दू शाळा बंद पडायला लागली तेव्हा विद्यार्थिसंख्या वाढावी म्हणून तुम्ही जमातची मीटिंग घेतली; पण शाळेत जी पोरं दाखल झाली ती कुठल्या घरातली?... तुमची पोरं का उर्दू शाळेतनं शिकली नाहीत? त्यांना कसे तुम्ही मराठी माध्यमांच्या शाळेत पाठवून शिकविता? कारण तुम्ही दूरधोरणी आहात.’’

आणखी एका प्रसंगात प्राचार्य जेव्हा त्याला मुस्लीम पात्रांचे कल्चर तुम्ही बरोबर सांगाल असे म्हणतात तेव्हा तो दुखावतो. त्यांना म्हणतो, ‘‘सर, येथील मुस्लीम कोणत्या हिंदूपेक्षा तुम्हाला वेगळा वाटतो?... आता माझंच बघा, माझे आडनाव माहीत नसेल तर मी बघताक्षणीच मुस्लीम आहे, याची खात्री कशी देणार?’’

सलीमचा हा जगण्यातला खुलेपणा स्टाफमध्ये चर्चा करताना, साहित्य संमेलनात भूमिका मांडतानाही दिसून येतो. त्याचे एक स्टाफमेंबर लुंगी लावून मुलाण्याचे काम करत फिरत असतात, तरी प्राध्यापकापेक्षा जास्त कमावले असते असे म्हणतात, तेव्हा सलीम त्याच्यावर न चिडता त्याच्या व्यावसायिकतेचे कौतुक करतो. कामावरून कुणाचा दर्जा ठरवू नये, असे तो रझियाला सांगतो. दर्ग्याच्या बांधकामावरही तो पाणी मारतो. बाहेर कुठेही आपले मत नोंदविताना तो स्वत:ची भूमिका जराही नजरेआड होऊ देत नाही; परंतु घरामध्ये मात्र तो अधिक संयमी, शांत आणि सहनशील भूमिकेतून वागतो.

त्याचे द्वंद्व अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. आपल्या बायकोचा छळ आणि अब्बा-अम्मीची एकांगी भूमिका तो निमूटपणे सहन करतो. कुटुंब टिकावे यासाठी तो धडपडतो. कुटुंब आणि गाव टिकला पाहिजे, अशी त्याची सतत धारणा राहिली आहे. यासाठी तो सगळ्या जातीधर्माच्या भिंती ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो संज्याचा मार सहन करतो.

कुटुंब टिकावे म्हणून तो म्हणतो, ‘‘मी कबूल करतो की, तुम्ही जे काही माझ्यासाठी केले आहे, त्याची उतराई मी आयुष्य संपेपर्यंत कधीच करू शकणार नाही. मुलाला जन्म घालतानाच्या गर्भवेदना मला आता कळू लागल्या आहेत... माझ्या शरीराच्या रंध्रारंध्रावर तुमचा अधिकार आहे. मी भोगलेला प्रत्येक श्वास याची साक्ष द्यायला तयार आहे. तुमच्या ऋणातून मुक्त होण्याचा करंटेपणा अल्लाहशप्पत सांगतो माझ्याजवळ नाही... तुम्हाला गोड बोलून फसगत करण्याची कला कोठून जमली? पण खर्‍या अर्थाने तुम्ही कुणाची फसगत करत आहात? आपणही आपले आत्मपरीक्षण करावे, असे तुम्हाला वाटत नाही का?’’

ही सलीमची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. टिकून राहण्याच्या भारतीय मूल्यव्यवस्थेचा प्रत्यय या विधानातून येतो.

सलीमचा आणखी एक महत्त्वाचा व्यक्तिविशेष म्हणजे तो अंतर्बाह्य संघर्ष करीत असला तरी संभ्रमित नाही. आजच्या संभ्रमित वर्तमानावरही तो स्वत:पुरता पर्याय शोधू पाहत आहे. संघर्ष तर आहेच; परंतु त्यातून मार्ग काढणे हेच त्याचे महत्त्वाचे धोरण आहे. म्हणूनच नोकरीचा निरोप घेताना तो फार अस्वस्थ होत नाही. अवती-भोवती सगळे संघर्ष सुरू असले तरी त्या सगळ्यांना तो धीराने सामोरे जातो. प्रारंभापासून तो सगळ्यांशी संवाद साधतो आहे. परंतु संघर्षाच्या एकेका टप्प्यावर एकेक व्यक्ती त्याच्यापासून तुटत जाते. इमरान व त्याची आई ओबीसीचे सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे त्याच्यापासून तुटतात. मामूचा मृत्यू होतो. राजकीय मतभेदात इरफान तुटतो. नोकरी संपल्याने स्टाफ तुटतो. संशयामुळे संज्या व त्याची बायको तुटते. सगळीकडून तो तुटत जातो. एकाकी पडतो. विसंवाद अधिक ठळक होत जातो. तरीही होडून पडत नाही. तो शेवटी धर्माकडे वळतो. यामागे त्याची अशी एक भूमिका आहे ती म्हणजे, धर्म हा शांतीचा केंद्रबिंदू आहे. तेथे सगळी माणसे समान आहेत. समाधान मिळवून देणारे, जगण्याला उभारी देणारे ते एक ऊर्जाकेंद्र आहे, अशी त्याची धारणा आहे. म्हणूनच तो जमातला जातो. जमातमधले मार्गदर्शन आणि आमीरसाबच्या वागणुकीने तो शांत होत जातो.

त्याच्या या अवस्थेचे वर्णन करताना कादंबरीकार लिहितो, ‘‘आपण खोल खोल अशा अनामिक भूपृष्ठावर उतरत आहोत, असे त्याला वाटू लागले. एक वेगळी प्रसन्नता अंगाला लपेटू लागली. आपण इतके दिवस दिशाहीन झाल्यासारखे भटकत होतो, हे हळूहळू तो विसरू लागला. वागण्यात एक प्रकारचा सैलपणा आला... जमातमधला एकोपा नवी शक्ती आणि उत्साह वाढवीत होता. एकाच बर्तनमध्ये तीन-चार बसून जेवत होते. एकमेकांची फिकीर घेतली जात होती. सलीमला गाढ झोप लागली.’’

सलीमने धर्मासोबत साहित्याबाबतही भूमिका घेतली आहे. मुस्लिमांचे कित्येक प्रश्न अद्याप साहित्यामध्ये आले नाहीत. इतकेच नव्हे तर चांगले आणि कसदार लेखन करणार्‍यांची एकूण मराठी साहित्यात वानवा असल्याचे मत सलीम नोंदवतो. तो चांगला कवी आहे. त्याची संवेदनशीलता अत्यंत तीव्र आहे. म्हणून तो प्रत्येकाशी जेवढा संवाद साधतो तेवढाच संवाद तो निसर्गाशी साधतो आहे. या संवेदनशीलतेमुळे त्याचे स्वत:चे असे एक वाङ्मयीन आकलन तयार झाले आहे. सवंग लोकप्रियतेपेक्षा गंभीर लेखन त्यात महत्त्वाचे वाटते. म्हणून त्याचा तांबोळी या गंभीर लेखकाशी चांगला संवाद होतो.

त्यापोटीच तो धर्माचेही नव्याने आकलन करू लागतो. शेवटी तो एकाकी न पडता जीवनाला नव्याने भिडू लागतो. याचाच परिणाम म्हणून नोकरी गेल्यावर स्वत:ला मुलगा झाल्याचा त्याला अतिशय आनंद होतो. जीवनसंघर्ष न संपता तो अधिक उग्र बनलेला असतानाही सलीमने आपल्या आयुष्याला दिलेले सकारात्मक वळण दखलपात्र आहे.

सलीमसोबत या कादंबरीत येणार्‍या इतर व्यक्तिरेखाही निराशावादी नाहीत. त्याची बायको आबेदा सासूचा छळ सहन करीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. इरफान, तानाही जगण्याची लढाई आनंदाने लढतात. इरफान जातीच्या आधारावर सरपंच होतो. मामू, काझीजनाब, आमीरसाब या व्यक्तिरेखा प्रयत्नवादी आहेत. एक प्रकारची जीवनसन्मुखता त्यांच्यात ठासून भरलेली आहे. ही माणसे मोडून पडतात; पण हार मानीत नाहीत. पुन्हा नव्याने लढायला तयार होतात. समाधानाचे नवे नवे संदर्भ शोधत राहतात. आपणाला कुणीतरी मार्गदर्शक (रहबर) मिळावा म्हणून धडपतात; परंतु स्वत:लाच स्वत:चे मार्गदर्शक व्हावे लागते याचे भान सलीमबरोबरच इरान, इमरान, सलीमचा भाऊ, आबेदा यांना आले आहे.

‘रहबर’ची आणखी एक जमेची बाजू म्हणजे या कादंबरीची भाषाशैली, या कादंबरीची मुस्लीम पात्रे जी भाषा बोलतात ती वली दख्खनी भाषा आहे. (ती उर्दूच्या अगोदरची भाषा असून १४६१मध्ये या भाषेचे पुरावे सापडतात, असे मत शफाअत खान यांनी मांडले आहे.) याचाच अर्थ ही दख्खनी भाषा प्राकृत मराठीच्या सोबत वाढत आली आहे. यामुळेच या भाषेची जडणघडण आणि मांडणी मराठी भाषेच्या वळणाचीच आहे. केवळ मराठीच्या वळणाची आहे, असे नाही तर ती मराठी बोलीशी अधिक जवळीक साधणारी आहे.

याची काही कादंबरीतील उदाहरणे थोडी सूक्ष्मपणे पाहिली तर अस्सल मराठी धाटणीचे संवाद वाटतात, त्याचे काही नमुने :

‘‘मुजे एम्बीबीस्सको अ‍ॅडमिशन मिल्या तोच मैं आगे सीखनेवाला. दुसरे कौसने तरफ मै जानेवाला नय. गप घर में बैठकू रहूँगा.’’

‘‘हाँ, क्या पूछनेका अचींगा तो पूछो.’’

‘‘तुमारे तरफ केबल हाय’’

‘‘पंख्ये का काम मेरे तरफ लग्ग्या. मै लातू पंखा. लई तो लई पाँच सो रुपय खाच आईंगा नव्हे क्या? आगले आठवडे में पंखा लगेशी कारन!’’

‘‘पावोआठ बजे स्टँडपर आये... यष्टी आनेकू तैय्यारच नै. इत्ता क्या करने का? एक टॅक्सीवाला मिल्या. दो सौ भाडा बोलने लग्या. मै कया दौ सौ नय अडैय सौ लो सचपन पटकन काडी चालू कर.’’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

ही उदाहरणे थोडी सूक्ष्मपणे वाचली तर ती अस्सल मराठीची बोलीतील वाटू लागतात. नव्हे ती तशी आहेतच. मिल्या, नै, लग्या, सचपण, अचगा, हाय, आईंगा, लगेशी कारण, लई तो लई, आये अशा प्रकारची शब्दकळा मराठी बोलीशी खूप जवळचे नाते सांगते. तर संवादाची धाटणीही मराठीशी अकृत्रिम नाते सांगते. यावरून दख्खनी भाषेचे वेगळेपण व मराठीशी असलेले तिचे अकृत्रिम निकटत्व सहचर्य लक्षात येते. याचाच अर्थ भाषेपासून, संस्कार, रीती, परंपरा, विधी या सगळ्यांपर्यंत इथला मुस्लीम इथल्या मातीशी एकरूप झालेला दिसतो. त्याची ही नैसर्गिक एकरूपता नोंदवताना रफिक सूरज कोणतीही ‘पोज’ घेऊन लेखन करीत नाहीत, हे महत्त्वाचे.

एकूणच ‘रहबर’च्या शोधात असलेला सलीम आणि त्याचा संघर्ष हा अस्सल भारतीय आहे. त्याची व त्याच्या समाजाची सर्वच पातळ्यावरची पाळेमुळे इथल्या मातीत खोलवर रुजलेली आहेत. त्याचे रास्त भान ही कादंबरी देते. एकूणच सर्व धर्मातील माणसाने स्वत:च रहबर होऊन जीवनाचे सत्य व सत्व शोधावे म्हणजे मग आपण ‘माणूसपणा’च्या दिशेने प्रवास करू शकू, असा मूल्यविवेक ही कादंबरी नोंदवू पाहते. या कादंबरीमध्ये बहुसंख्यातील अल्पसंख्याक आणि त्यातही पुन्हा पुरोगामीत्व स्वीकारणार्‍याच्या वाट्याला येणारे एकाकीपण, असुरक्षितता, भय हतबलता, अस्वस्थपणा रफिक सूरज नेमकेपणाने नोंदवतो. आजच्या सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘रहबर’चे महत्त्व नाकारता येत नाही. हेच ‘रहबर’चे यश आहे.

‘रहबर’ - रफिक सूरज

शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर

पान – १५२

मूल्य –१५० रुपये.

(अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक ‘अक्षरयात्रा (२०२१-२०२२)’मधून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......