विखे पाटलांच्या आरोपामागची ‘खरी’ ग्यानबाची मेख काय आहे?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • राधाकृष्ण विखे-पाटील, देवेंद्र फडणवीस आणि राम शिंदे
  • Thu , 09 March 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar राधाकृष्ण विखे-पाटील Radhakrishna Vikhe-Patil देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis राम शिंदे Ram Shinde बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat मधुकर पिचड Madhukar pichad

राजकारणातल्या माणसांचं वर्तन, बोलणं, आरोप करणं, भाषणं ठोकणं याकडे आपण फार उथळपणे बघतो. ही माणसं काही साधीसुधी नसतात. त्यांच्या चालण्या-बोलण्यामागे मोठमोठे हिशोब लपलेले असतात. ताजं उदाहरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं घेऊ. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जलयुक्त शिवार योजनेतून गुत्तेदारांना चार हजार कोटींची खिरापत वाटल्याचा आरोप करून प्रसारमाध्यमांमध्ये धुराळा उडवून दिला आहे. विखे पाटलांच्या या सनसनाटी आरोपाचा अर्थ अनेकांना लागला नाही.

विखे पाटलांनी हा आरोप का केला असावा? त्यामागे त्यांची काय गणितं असावीत? विखे पाटलांच्या फडणवीसांवरच्या विखारी आरोपामागची खरी ग्यानबाची मेख काय असावी? कोणता हिशेब ते चुकता करू पाहत आहेत? त्यांच्या आगपाखडीमागचं खरं कारण काय? या प्रश्नांचा माग काढायचा तर आपल्याला अहमदनगर  जिल्ह्याच्या राजकारणात डोकावं लागेल. २०१४पर्यंत या जिल्ह्यात विखे पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सत्तेची वाटणी झाली होती. विखे पाटील कृषिमंत्री, तर थोरात महसूलमंत्री होते. दोन्ही खाती वजनदार. कामाची. ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाची. २०१४नंतर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता घालवली. राज्यात भाजपचं सरकार आलं आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे हे तरुण तडफदार मंत्री झाले. पालकमंत्री झाल्यानंतर राम शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विकासकामांचा धडाका सुरू केला. अगोदर गृहराज्यमंत्री आणि आता जलसंधारण मंत्री म्हणून त्यांना खातीही वजनदार मिळाली. विखे पाटलांना हे टोचू लागलं आहे.

राम शिंदे यांचा जिल्ह्यातला वावर उठून दिसू लागला आहे. जिल्ह्यातले प्रस्थापित विरोधी कार्यकर्ते त्यांच्याभोवती एकवटू लागले आहेत. पूर्वी जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे कळतही नसे. त्याचा फारसा प्रभावही पडत नसे. शिंदे यांच्या रूपाने पहिल्यांदा काम करणारा, प्रभाव पाडणारा पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाल्याचं चित्र दिसतं आहे. हा प्रभाव विखेंना अडचणीचा वाटू लागला आहे.

शिंदे यांच्या या प्रभावाचा फायदा भाजपला नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेला दिसतो. अहमदनगर जिल्हा परिषदेत यापूर्वी काँग्रेसची एकहाती सत्ता असे. विखे पाटलांच्या पत्नी शालिनीताई या काही काळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. ७३ सदस्य संख्या असणाऱ्या या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचं संख्याबळ घटून २३वर आणि राष्ट्रवादीचं १७वर आलंय. त्याचवेळी भाजपचे सदस्य वाढून १४ झाले आहेत. काही अपक्ष आहेत. शिवसेनेचे ७ सदस्य आहेत. या वाटणीमुळे विखे पाटलांचं सत्तेचं स्वप्न भंगलं आहे.

ज्या जिल्हा परिषदेत काँग्रेसची सरशी होती, तिथं भाजपच्या वाढीनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांच्याही सदस्य संख्येत घट झाली आणि भाजपचं संख्याबळ वाढलं. शिवाय भाजपने सर्व तालुक्यांत या निवडणुकीच्या निमित्तानं हातपाय पसरले. पक्षाची ताकद वाढवली. भाजप हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा एकसंध आणि बलवान झाला आहे.

अहमदनगर  जिल्ह्यातला कर्जत-जामखेड हा शिंदे यांचा मतदारसंघ. तिथे शिंदे यांनी सर्व पक्षांवर मात करून जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमध्ये जास्त सदस्य निवडून आणले आहेत. शिवाय त्यांनी संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यांची निवडणुकीची जबाबदारीही घेतली होती. यातला अकोले हा माजी मंत्री मधुकर पिचड यांची मक्तेदारी असलेला तालुका. तिथं शिंदे यांनी लक्ष घातलं आणि जिल्हा परिषदेचे तीन सदस्य निवडून आणले. पंचायत समितीमध्ये यश मिळवलं. मधुकर पिचडांच्या ५३ वर्षांच्या मक्तेदारीच्या राजकारणाला हा सर्वांत मोठा धक्का मानता गेला. पिचडांचा वाडा ढासळला त्यामुळेही विखे पाटील धास्तावले आहेत!

अकोले तालुक्यात पाडोशी धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पिचड सत्तेत राहून सोडवू शकले नाहीत. या प्रकल्पग्रस्तांनी गेली २२ वर्षं मंत्रालयात टाचा घासल्या तरी त्यांचे २ कोटी ८३ लाख रुपये मिळत नव्हते. शिंदे यांनी या चालू अधिवेशनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे रदबदली करून तो सोडवला. आता धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. या एकाच उदाहरणातून शिंदे यांच्या कामाची शैली दिसून येते.

अकोलेसारखेच संगमनेर तालुक्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांपुढेही आव्हान उभं केलं होतं. या तालुक्यातलं राजकारण खूप चमत्कारिक आहे. थोरातांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, जिंकणारे उमेदवारही त्यांचेच आणि हरणारेही त्यांच्यात छायाछत्राखालचे असतात. थोरातांचा हा पॅटर्नच विखे त्यांच्या राहता, शिर्डी मतदारसंघात वापरतात. या निवडणुकीत शिंदे यांनी या पॅटर्नला सुरूंग लावला. जिल्ह्यातले विखे-थोरात यांचे विरोधक शिंदे यांनी एकत्र तर आणलेच, पण दोघांपुढेही एवढं तगड आव्हान उभं केलं की, या बड्या नेत्यांना वाड्यावस्त्यांवर मतदारांच्या विनवण्या करत फिरावं लागलं. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत विखे-थोरात दिवसाआड वाड्यावस्त्यांवर फिरताहेत, मतदारांची विनवणी करताहेत, असं अत्यंत दुर्मीळ चित्र पाहायला मिळत होतं. त्याचा राग विखे पाटलांच्या मनात असणं साहजिक आहे.

विखे-थोरात यांच्याकडे साखर कारखाने, शिक्षणसंस्था, आरोग्यसंस्था, बँका, दूधसंघ असं संस्थांचं जाळं आहे. त्या तुलनेत शिंदे यांच्याकडे यापैकी काहीच नाही. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची शैली समजून घेतली पाहिजे. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज. मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक. नोकरी सोडून काही नवं, वेगळं करायचं म्हणून राजकारणात आले. चाळीशीच्या उंबरठ्यावर कर्जत-जामखेडचे आमदार होण्याची संधी त्यांना मिळाली. तरुण आमदार म्हणून कर्जत-जामखेड परिसरात त्यांनी खूप काम केलं. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रीपद आलं. मुलुखमैदानी फर्डे वक्ते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. अभ्यासूपणा, वक्तृत्व या जोरावर भाजपच्या पक्षसंघटनेत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. फडणवीसांच्या ‘गुड बुका’त त्यांचं नाव वरच्या यादीत घेतलं जातं.

शिंदे यांच्या नेतृत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. ओबीसी नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात एक प्रकारची आश्रिताची भावना दिसून येते. मुख्य प्रवाहातल्या राजकीय नेत्यांसारखा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये यायला वेळ लागतो. शिंदेंच्या नेतृ्त्वाची शैली ही मुख्य प्रवाहातल्या नेत्यांसारखी आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती सर्व जातीधर्माचे लोक-कार्यकर्ते विश्वासानं वावरताना, जोडले जाताना दिसतात. त्यात तरुणांचा भरणा अधिक असतो.

शिंदे यांच्या अशा समन्वयी, सर्वसमावेशक, नव्या नेतृत्वशैलीचा धसका विखे पाटीलांनी घेतला नसता तरच नवल. त्यांच्या नेतृत्वाची घडण प्रस्थापित प्रकारातली आहे. शिंदे यांनी त्या प्रस्थापित व्यवस्थेनं झोडपलेल्यांना भाजपच्या छत्राखाली जमा केलं. तो काफिला वाढतोय, हे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दिसलं. प्रस्थापित विरोधात जमलेले हे लोक उद्या विखे-थोरातांच्या तख्याखाली सुरूंग लावतील, हे सांगायला कुणा ज्योतिषी थोडाच लागणार आहे? विखे पाटलांच्या दु:खाच हेही कारण आहे.

त्यात आधीच राज्यभर काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, नारायण राणे अशा बड्या नेत्यांचे किल्ले उदध्वस्त होत आहेत. काही शेवटच्या घटका मोजत आहेत. दहा महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने कधी नव्हे एवढा मार खाल्ला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही काँग्रेसची सर्वांत निच्चांकी पडझड म्हणता येईल. त्यामुळे काँग्रेसजन भेदरले आहेत.

विरोधी पक्षनेते हे जबाबदारीचं पद असलेले विखे पाटीलही त्यांच्या बालेकिल्ल्यात ही पडझड रोखू शकलेले नाहीत. काँग्रेस नेतृत्व प्रभावहीन ठरतंय, ही चर्चा खुद्द काँग्रेस पक्षात उघडपणे सुरू झाली आहे. त्यातलं एक बोट विखे पाटलांकडेही रोखलेलं आहे. थोरात यांनीच विखे यांचं नेतृत्व अडचणीचं आणि स्वपक्षीयांचा घात करणार आहे, असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी केलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद आता नेत्यांच्या दिशेनं जाईल, यामुळे काँग्रेस नेते घाबरले आहेत. विखे यांचं या घाबरलेल्या नेत्यांत सर्वांत पुढे असणं स्वाभाविक आहे. कारण ते विरोधी पक्षनेते आहेत. अशा बिकट परिस्थितीत तरण्यासाठी विखे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. त्या आरोपामागं खरं ‘राम’कारण आहे. शिंदेंनी उभं केलेलं आव्हान जिव्हारी लागल्यानेच विखे यांनी थेट मंत्रिमंडळाचा नेता असलेल्या फडणवीसांवर वार केला आहे. पण म्हणतात ना, ‘अब पछताये होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत?’

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

Post Comment

Design Studio

Fri , 10 March 2017

बाकी लेख आवडला.... फक्त विखे , थोरात , पिचड , काढून शिंदेंचाच उदो उदो केला असता तरी चालले असते कि राहिला विषय विखेंच्या राजकारणाचा तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे येणारेही त्यांचेच अन पडणारेही त्यांचेच मोदी लाट असूनही ७६००० मतांचे लीड होते....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......