अजूनकाही
अमोल उदगीरकरचं हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच फेसबुकावरचे त्यातले लेख मी अधूनमधून वाचत होतो. अशा विषयावरचं इतकं सीरियसली आणि तपशिलातलं, दाट लिखाण मी पहिल्यांदाच वाचत होतो. मला आधी वाटलं होतं की, लिहील हा थोडंफार. विषय इंटरेस्टिंग असला तरी एक बऱ्यापैकी पानांचं मध्यम जाडीची स्पाईन असलेलं पुस्तक वगैरे लिहिण्याएवढा तो ऐवज असेल, असं मात्र काही वाटलं नव्हतं.
पुढे माझ्या लक्षात आलं की, यार, आपल्याला स्वत:लाच अशा प्रकारच्या जरा साइडिंगला पडलेल्या किंवा साइडिंगला असलेल्या, आज ना उद्या मुख्य प्रवाहात मध्यभागी येण्याची मनीषा बाळगून असलेल्या फायटर माणसांबद्दल फार कुतूहल आहे. फक्त सिनेमा नाटक नव्हे, तर खरं तर इतरही क्षेत्रात अशा दुसऱ्या- तिसऱ्या- पाचव्या फळीतल्या, लांब, मागच्या बाकावर बसलेल्या, पण व्हीआयपी असं स्टिकर लावलेल्या पहिल्या रांगेत बसण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या माणसाच्या कहाणीमध्ये जबरदस्त इंटरेस्ट आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या ना त्या कारणांबद्दल नायकपदी न पोचलेल्या, करिअरच्या यशापयशाच्या तरंगत्या फळीवर सतत हेलकावे खात असलेली ही माणसं एका अर्थानं ‘खास’ असतात. फक्त इतर क्षेत्रात आणि नाटक सिनेमा या क्षेत्रात करिअर बांधू पाहणाऱ्या, कर्तृत्वाच्या शिड्या चढणाऱ्या या माणसांमध्ये एक फरक असतो. सिनेमा नाटकाच्या क्षेत्रात पडद्यावर दिसत असलेल्या माणसांच्या वयाला फार महत्त्व असतं. कारण तिथे तुमचं वय हे ‘दिसत’ असतं. झाकायचा प्रयत्न केला तरी जाणवत असतं. वयाच्या तरुण दिसण्याच्या मर्यादित कालखंडात तुम्ही काही करू शकला नाहीत, तर लोच्या होतो आणि स्पर्धा तर मजबूत. त्यामुळे खच्चीकरण होण्याचे चान्सेसही भरपूर, आणि भरपूर लवकरही!
टॅलेंट नावाचं नाणं लवकर वाजलं नाही, तर ते तुमच्या करिअरचं डिमॉनिटायझेशन फार लवकर होतं नि तुमच्या चेहऱ्यावर उजेड फेकणारा फोकस लॅम्प लगेच मुंडी इतरत्र फिरवतो. इतर क्षेत्रांत कामाच्या स्वरूपाप्रमाणे वय हा एलिमेंट तितका लगेच विचारार्थ येत नाही.
…तर, पुढे काही दिवसांनी प्रकाशक आणि स्वत: अमोल म्हणाला, “सर, चित्रं द्या ना काढून या पुस्तकाला, मुखपृष्ठासाठी!”
मला हे प्रकरण कधीतरी अंगावर (ड्रॉईंग पेपरावर!) घ्यावं लागणार आहे, याचा अगदी हलका अंदाज होताच! मी म्हटलं करतो मी, पण या पुस्तकाचा विषय आणि जॉनर जरा तापदायक आहे. लवकर आणि नेमका हातात नाही सापडला, तर कव्हर आणि पाठोपाठ आपण सगळे माती खाणार. काहीच्या काहीच कव्हर होऊन बसेल. तेव्हा मला आधी तुम्ही या पुस्तकाचं नाव काय ठेवणार, ते सांगा, म्हणजे मला फुष्कळ मदत होईल. पुष्कळदा पुस्तकाचं नाव मुखपृष्ठाच्या चित्रकाराला दिशा देतं. दिशा तरी देतं किंवा गंडवतं तरी.
‘न-नायक’ या नावानं मला गंडवलं होतं. मला काही पत्ताच लागेना की, आता करायचं काय!
‘न-नायक’ या फक्त नावाचं काय करणार तुम्ही मुखपृष्ठासाठी?
काहीही वाटू शकतं या नावाचं! कादंबरी, कथासंग्रह, कविता, उपेक्षितांबद्दलचं काहीतरी, पण कुठले उपेक्षित? बरं उपेक्षित हे तरी नक्की का? की दुर्लक्षित? की फायटर? कसली फाईट? कसले नायक? पुढारी की, रेडिओवर सैनिकांसाठी प्रसारित होत असलेल्या देशभक्तीपर कार्यक्रमात नेहमी ऐकू येत असलेल्या शब्दातले लान्स-नायक? आणि त्या लान्स नायकांच्या न-कथा? फार विचारात पाडलं मला या ‘न-नायक’ नावानं. नायकांची चित्रं काढणं सोपं असतं, नायक नसलेल्यांची पण नायक होण्याचं पोटेन्शियल असलेल्या माणसांची चित्रं अवघड.
बरं, कधी कधी लेखकाचं नावच लिखाणाचा प्रकार सांगतं. कविता असेल की, समीक्षा की ऐतिहासिक की, आणखी काही. म्हणजे कोणत्या जॉनरचं लिखाण असेल वगैरे. काम जरा हलकं होतं. लेखकाचंच इंट्रोडक्शन चित्रकाराला चित्रातून सजेस्ट करायची छुपी भानगड राहत नाही. इथे तो एक जास्तीचा उद्योग मला करावा लागणार होता. लेखकाची अशी ‘पदार्पणाची’ ओळख मला मुखपृष्ठासमवेतच करून द्यायची होती.
उदगीरकर महाराज पडले नवे कीर्तनकार! फेसबुक सोडलं तर फारसे कुणालाच माहीत नाहीत लेखक म्हणून, तेव्हा काय अंदाज असणार, की अमुकतमुक प्रकारचं लिखाण करतात हां, छान, वगैरे! आणखी एक नवीन पुस्तक का? वा, वगैरे! तेव्हा तोही माझा एक पत्ता कट झाला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाला प्रसिद्ध सिनेलेखक मुकेश माचकर यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6042
..................................................................................................................................................................
सरळ विषयालाच हात घालण्याची वेळ आली, तेव्हा परत एकदा ते सगळं वाचलं आणि खरंच थेट विषयच ठळक लक्षात येईल, पण लिखाणाच्या शैलीबरोबर जाईल अशा पद्धतीनं, म्हणजे थेट, पण भडक नाही, फिल्मी विषयाचं लेखकाला स्वत:च डोईजड होईल इतका येणारा भाबडेपणा टाळून लिहिलेल्या विषयाची हाताळणी मला करायची होती.
त्या त्या कलावंतांचे फोटो वापरण्याचा एक प्राथमिक विचारही आधी सहज म्हणून करून पाहिला, पण ही नावं जरी कानावरनं गेलेली असली तरी त्यांचे चेहरे पाहताक्षणीच ओळखू येतील इतके ग्लॅमरस अजून व्हायचे होते. म्हणून फोटो वगैरे कव्हरवर वापरून मोकळं होणं तसं चाललं नसतं. (पुस्तकाच्या आत, फिल्म्सच्या कापलेल्या तुकड्यांमध्ये फोटो बसवून वगैरे हे काम तद्दन बटबटीत स्वरूपात १६ रंगीत पानं छापून प्रकाशकांनी हे काम केलं आहे, हा भाग वेगळा!) कारण हा लेखकही तसं सपाट लिहून नुसता मोकळा झालेला नाही, उलट तो त्या विषयात वरवर न राहता आत गुंतला आहे, वाचकालाही तो लगेच बाहेर पडू देत नाही, स्वत:ही रेंगाळतो, वाचकालाही रेंगाळायला लावतो.
पुस्तक हातात घेणाऱ्याला मुखपृष्ठ पाहून क्षणात विषयाच्या गांभीर्याचं भान देऊन तिथं रेंगाळायला लावणं मला करायचं होतं. हे काही नुसतं फिल्मी मासिकातल्या लिखाणासारखं फक्त सिंथेटिक चमक असलेलं वरवरचं लिखाण नाही, पुस्तकात यातल्या एक एक मनुष्याच्या संघर्षाच्या चित्र-कादंबऱ्या आहेत, या गोष्टीचं सूचन मला द्यायचं होतं.
अशा अर्थानं कव्हरवर नटनट्यांचे नुसते फोटो छापून मला माझी आणि वाचकांची सुटका करायची नव्हती. त्यांची मान पकडायची होती, पुस्तक विकत घेऊन वाचायला लावायचं होतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
म्हणून लिखाणाचा पोत सांभाळत सांभाळत विचार करत करत ‘सोनेरी झगझगाटाच्या स्टारपदापर्यंत पोचण्यासाठी सामान्य, तुमच्या आमच्यासारख्या नॉन ग्लॅमरस माणसांची शिडीवर चाललेली कसरत, धडपड’ या व्हिज्युअलपर्यंत पोचलो. या सोनेरी चांदणीच्या वरच्या टोकापर्यंत चढत पडत असलेली माणसं कदकाठीनं तुमच्या आमच्यासारखीच आहेत, पण जरा फिल्मी जगतात वावरण्याची आणि बस्तान बसवण्याची तीव्र इच्छा असलेली, त्याचं आकर्षण असलेली किंचित लाऊड वाटणारे पेहराव असलेली आहेत. उद्याचं ‘स्टार’पण कपड्याच्या रूपानं का होईना, आजच अंगाखांद्यावर मिरवणारी आहेत.
शिडी चढवतेही, खालीही पाडते, फार वरवर गेलं की, आधार अशक्त करते. माणसं तुम्हाला शिडीसारखं वापरतात, वर चढवल्यासारखं भासवतात, ढकलतात. मुखपृष्ठावरच्या फिल्मी रंगीबेरंगी बॅकग्राऊंडच्या जगात सापशिडीतले साप अदृश्य आहेत, पुस्तक नीट वाचणाऱ्यानं ते तिथे इमॅजिन करायचे आहेत.
वाचणाऱ्याच्या कल्पनाशक्तीलासुद्धा कलाकृतीत जागा हवी असते. पुस्तकामध्ये, मजकुरांत, परिच्छेदांमध्ये तर हवीच असते, पण मुखपृष्ठातही जागा हवी असते.
मोकळ्या जागांमध्ये, रंगांच्या आणि रेषांमधे वाचकालाही स्पेस हवी असते.
‘न-नायक’ - अमोल उदगीरकर
इंद्रायणी साहित्य, पुणे
मूल्य - ३०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5397/N-Nayak
.................................................................................................................................................................
लेखक चंद्रमोहन कुलकर्णी मराठीतील प्रसिद्ध चित्रकार आणि मुखपृष्ठकार आहेत.
chandramohan.kulkarni@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment