प्राचीन काळापासून सर्जनशील प्रतिभेला अलौकिक मानले जाते. तसेच सर्जनशील निर्मितीला एखादी दैवी शक्ती प्रेरणा देते, असे मानले जाते. निर्मितीक्षमता किंवा सर्जन ही संकल्पना आज अनेक संशोधनांनंतरही आपल्याला तितकीच संभ्रमात टाकते. अनेक चिंतकांनी व स्वतः कलावंतांनी जिचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भुरळ पाडणारी ही गोष्ट आहे.
निर्मितीप्रक्रियेवर आगळा प्रकाश टाकणाऱ्या, इंग्रजी कवी एस. टी. कोलरिज यांची ‘कुब्ला खान’ (Kubla Khan) ही कविता आणि प्रख्यात मराठी लेखक प्रशान्त बागड यांच्या ‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ या कथासंग्रहातील ‘एक द्विज स्थळ’ ही कथा, या दोन साहित्यकृती मला समानधर्मी वाटतात. त्यांच्यात सर्जनात अंतर्भूत असलेली जाणीव-नेणिवेची क्रीडा पाहायला मिळते.
इंग्रजी साहित्यातील बहुचर्चित आणि बहुविश्लेषित अशी ‘कुब्ला खान’ ही कविता कवीच्या स्वप्नाच्या स्मृतीचा एक भाग आहे. ही कविता कवीच्या गूढ आणि न पाहिलेल्या गोष्टींवरील विचारमग्नतेची अभिव्यक्ती आहे. कवीच्या कल्पनेतील तरल अनुभवाचे ती चित्रण करते. या कवितेला उपशीर्षकामध्ये कवीने ‘स्वप्नातील दृश्य’ (Vision in a dream) असे म्हटले असून, ती कवीने पूर्ण जाणिवेच्या अवस्थेत नसताना लिहिली आहे असे दिसते. कोलरिजच्या काव्याचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या या कवितेला कवीच्या कल्पनाशक्ती आणि निर्मितीच्या सिद्धान्ताची कलात्मक मांडणी करणारी कलाकृती मानली जाते. ही कविता कवीच्या स्वप्नवत दृश्याचे विस्मयकारक तरीही शक्तीशाली चित्र दर्शवते. एक मानसशास्त्रीय कुतूहल म्हणून ती निर्मितीप्रक्रियेत शिरण्याचा प्रयत्न करते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
ही कविता आपल्याला शासक कुब्ला खान याच्या साम्राज्यात, त्याच्या सुंदर वर्णनातून त्याभोवतीच्या निसर्गरूपांत घेऊन जाते. तसेच कवीने काल्पनिक दृश्यात पाहिलेल्या एबिसिअन युवतीच्या संगीताचा आढावा येतो. यांद्वारे कवितेत निर्मितीप्रक्रिया, त्यामागची प्रेरक शक्ती उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
कवितेच्या पहिल्या भागात, तेराव्या शतकातील मंगोलियन कलाप्रेमी आणि शक्तीशाली शासक कुब्ला खानच्या महालाची आणि सभोवतीच्या प्रांताची स्वर्गाप्रमाणे सुंदर अशी निर्मिती दर्शवली आहे. कविता कुब्ला खानच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निर्मितीकडून निसर्गातल्या अधिक जादुई स्थानाकडे प्रवाहित होते
मोजमाप न करता येणाऱ्या गुहांपासून (measureless caverns) सूर्यरहित समुद्राकडे (sunless sea) वाहणारी पवित्र नदी (sacred river), अनेक सुवासिक फुलांची उद्याने, त्यातील नागमोडी वळणांचे झरे, अनेक हिरवीगार ठिकाणे असलेली जंगले, अद्भुत दरी, असे या स्थानाचे रम्य वर्णन कवितेत येते. मनोज्ञ प्रतिमांची पखरण करत जलद गतीने कविता पुढे जाते.
जीवन, चेतना आणि कलेच्या उत्पत्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या स्थानाचे नितांतसुदर चित्र कवी रेखाटतो. यातील नदीच्या प्रवाहाच्या तपशीलवार वर्णनातून तिला निर्मितीप्रक्रियेचे प्रतीक म्हणून दर्शवले गेले आहे. ही नदी कुब्ला खानच्या बगीच्यांजवळ उगम पावते. बगीचे निसर्गाचे संयोजित, नियंत्रित रूप मानले जातात. या अर्थाने निर्मितीची सुरुवात तर्कशुद्धतेत आणि मानवी मनाच्या जाणिवेच्या अवस्थेतील मानली गेली आहे. ही नदी पुढे अनियंत्रित, अज्ञात, नेणिवेचे प्रतीक असलेल्या, मानवाला मोजमाप न करता येणाऱ्या गुहेकडे जाते.
कवितेत प्रणयाच्या मध्ययुगीन कथेचाही संदर्भ येतो. कुब्ला खानला या नंदनवनात युद्धाविषयीची प्राचीन भविष्यवाणी ऐकायला येऊन पडझडीचा अंदाज येतो. नंतर कवी कुब्ला खानच्या सुखकारक महालाचे (pleasure dome) वर्णन करतो. कारंजे आणि गुहांच्या संगीतात लाटांच्या मध्यभागी तरंगणाऱ्या या महालाच्या सावलीचे विलोभनीय चित्र रेखाटतो.
दुसऱ्या भागामध्ये कविता एकाएकी तंतुवाद्य (dulcimer) वाजवणाऱ्या एबिसिअन युवतीच्या (Abyssian maiden) गाण्याकडे वळते. त्या संगीताला कवी प्रेरक शक्तीच्या रूपात पाहतो आणि त्याला विश्वास वाटतो की, त्या संगीतासह तो आश्चर्यकारक निर्मिती करू शकेल. कवी त्या दैवी संगीताच्या प्रेरणेसह सुखकारक घुमट (pleasure dome) पुनरुत्जीवीत करू इच्छितो. निर्मितीक्षमता साजरी करत त्याच वेळी तिच्या क्षणभंगूरतेची जाणीव ठेवून कवितेचा शेवट झाला आहे.
‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ या २०१० साली प्रकाशित झालेल्या अनोख्या कथासंग्रहातील सर्व अकरा कथांचं एक खास वैशिष्ट्य असं की, कथांमध्ये ठिकठिकाणी विणलेल्या संदिग्धतेच्या जाळ्यात वाचक विहरत राहतो. कथाकाराने वाचकाला त्याच्या नकळत कथेचाच भाग बनवले आहे. प्रत्येक कथेत कथारचनेतील अनेक शक्यता कायम ठेवून कमी शब्दांत अत्याधिक आंतरिक कल्लोळ उभा केला आहे. चिंतनपर असलेल्या या कथांना रुढार्थाने विषय नाहीत. आरंभ, शेवट, कथासूत्र यापैकी कशातच न गुंतलेल्या या कथा ‘गुंत्यातल्या एखाद्या धाग्यावरून सोडून दिलेल्या’ (कथा : ‘एक स्पष्ट गोष्ट’, पृष्ठ क्र.१२) आणि वाचकांना त्या गुंत्यात अडकवून ठेवणाऱ्या आहेत. त्या संपूर्ण व सुसंगत कथानक न रचता एक अनिश्चितता अधोरेखित करतात. लेखकाने साहित्य अकादमीच्या व्यासपीठावर आपले लेखनविषयक विचार मांडताना, आपल्या लेखनाचा विषय काय हे सांगताना म्हटल्याप्रमाणे या कथा ‘काही-नाही’विषयी आहेत. अस्फुट विधाने आणि तरल अनुभव नेमक्या आणि दाट शब्दांत पकडणाऱ्या काव्यात्म शैलीमुळे या कथांमधील भाषेला अनोखे सौंदर्य प्राप्त झाले आहे.
या कथासंग्रहातील ‘एक द्विज स्थळ’ ही कथा तिच्यातील सर्जनशीलतेच्या संकल्पनेमुळे, निर्मितीप्रक्रियेच्या तरल अनुभवामुळे लक्ष वेधून घेते. कथेत ‘शेखर’ या परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या युवकाच्या निर्मितीविषयीच्या अनुभवातून निर्मितीप्रक्रियेवर भाष्य येते. त्या अनुषंगाने, या युवकाच्या भावनांचा सूक्ष्म पदर, मनातले अंत:स्थ विचार उलगडून एक तीव्र परिणाम साधला आहे.
कथेतील शेखर परदेशी निघण्याच्या तयारीत परिचितांचा निरोप घेत आपल्या पूर्वीच्या जगण्याचे संदर्भ जणू खोक्यात बंद करून ठेवतो. ‘संदिग्धतेचा समारोप’ करण्याचा प्रयत्न करत असला तरी ‘संदिग्धतेमुळे बोलणं दाट होतं. बोलतानाही काहीतरी घडतं,’ हे शेखरला तीव्रतेनं जाणवतं. महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी विकत घेतलेलं एक खोकं त्याला ‘कपाटापेक्षाही जास्त कल्याणकारी’ वाटतं. ‘खोक्यातल्या वस्तूंचे वर्गीकरण’ न करणारा असा एकसंध जगणं असलेला शेखर आपल्याला दिसतो. ‘स्वप्नांची अनोखी दुनियाही मनाच्या तळामुळातून वर उगवते’ या विश्वासातून पलंगाखाली खोके ठेवून तो ‘उल्हासमासी’ राहताना चित्रित केला आहे. ‘शक्य असेल तर शेखरही खोक्यात राहणार आहे’, ‘शेखरमधला ‘ख’ही खोक्यात आहे’ - इतकं ते खोकं त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग दाखवलं आहे.
परंतु परदेशी जाताना न्यायच्या वस्तू काढताना ‘जवळजवळ सगळ्याच वस्तू पुन्हा खोक्याच्या दरीत’ विसावतात. जाताना ‘खोक्याचं दार’ बंद करण्यासाठी तो परत परिचिताच्या घरात येतो. पुढे परदेशातील अपरिचित वातावरणात ‘आशयाच्या हत्तीला तो सात अज्ञांच्या घोळक्यातला सभासद होऊन नुसता संवेदूही शकत’ नाही. पण तिथे राहण्याच्या ठिकाणी - ज्यास कथेत वाडा म्हणून संबोधले आहे - हळूहळू तो ‘निरर्थकावर मात’ करण्याचा प्रयत्न करतो. ‘वाड्यात आता नवं मन फुटणार’ असं त्याचं स्वप्नासारखं सत्य जवळ आलेलं असतं. पण अनेक पायऱ्या पार करून त्या ‘वाड्यात’ जाताना त्याला धाप लागते, तेव्हा आपण तरुण आहोत, असा निश्चय करूनच पुढे जातो. त्याला जो शीण येतो तो ‘अनुभवाची व्यवस्था लागत असतानाच हळूहळू कमी’ होतो. वाट्याला आलेल्या सुखसोयींबद्दल तो असंतुष्ट होतो, पण ‘आपल्याला आता वाड्याच्या चालीत विचार करता येतो’ याचा त्याला आनंद होतो. नंतर तेथील ‘कॅम्पस एक्सप्लोअर’ करताना तो ‘अनाकलन परतवून लावण्याचा प्रयत्न’ करतो. हळूहळू ‘अनोळखी अनोख्या वाड्या’चा ‘परिचित सुगंध नकळत हुंगत’ शेखर वाड्यात रमतो.
‘निर्मिती हा शब्द शेखरच्या कानावर पडत’ असतानाच कथेत शेखरचा स्थळ आणि काळ यांचा अनोखा सिद्धान्त आला आहे. ‘आपल्यातून झरणाऱ्या काळाला आपण आपल्या स्थळाचा आशय देतो म्हणून पर्यटनस्थळ आपल्या कक्षेत, आवाक्यात येतं’ असं मानणारा शेखर ‘वाड्यातलीच एखादी चीजवस्तू – मग ती निर्मिती का असेना – आत्यंतिक गौण’ मानतो. ‘आपण उत्सुकतेने निर्मिती बघायला गेलो तर आपण एकदम उथळ होऊन जाऊ असं त्याला मनोमन वाटतं.’ शेखरच्या युवागृहातल्या इतर जणांचे निर्मितीविषयीचे विभिन्न दृष्टीकोन त्या ओघात मांडले आहेत. ‘कित्येकांना निर्मिती ‘अनाकलनीय’ वाटलेली होती. कुणाला ती गंभीर गोष्ट वाटत होती. कित्येक थक्क झाले होते; कैक ‘अस्वस्थ’ झाले होते’. पण ‘वाड्यात आता नवं मन फुटणार’ असं मानणाऱ्या शेखरचं निर्मितीच्या ठिकाणी पोचल्यावर, ‘निर्मितीकडे जाणाऱ्या असंख्य वाटा’ पाहिल्यावर ‘निर्मिती म्हणजे वाड्याचा गाभाराच’ असं गाभ्यातूनच निर्मितीशी जिवंत आणि अतूट नातं जडतं.
‘संपृक्त, तंदुरुस्त मनाने निर्मितीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवून’ कथेच्या शेवटच्या भागात शेखर निर्मिती ही एखादी चीजवस्तू किंवा वास्तू असल्याप्रमाणे मूर्त स्वरूपात पाहायला जातो. त्या वास्तूपासून सर्जनशील निर्मितीकडे त्याचा प्रवास सुरू होतो. त्या वाटेवर त्याच्या स्तब्धतेच्या आणि गतिमानतेच्या लयीत वाचकांनाही घेऊन गडद रंग भरले आहेत. त्याच्याबरोबर ती निबिड काळोखी प्रदेशातील वाट चालायला वाचकही अधीर होतो. अंधाऱ्या धूसर वाटेवरून तरीही विश्वासाने आणि एका निश्चयाने तो पुढे जातो. झरोक्यातून उन्हाचा कवडसा यावा आणि हलकेच पसरावा, तसा वाटेत लागणाऱ्या एकेका प्रतिमेवर हलकासा प्रकाशझोत टाकत कथेचा निवेदक पुढे जातो. तोच प्रकाश दाट होऊन संवेदनांच्या साऱ्या खिडक्या आपोआप उघडतो, अशी योजना कथेतील शब्दघनतेतून झाली आहे.
‘कुब्ला खान’ आणि ‘एक द्विज स्थळ’ या दोन्ही कलाकृती भिन्न देशांतील, भाषेतील, काळातील, स्वरूपातील, तसेच भिन्न वाङ्मय प्रवाहातील असल्या तरीही निर्मितीसारख्या संकल्पना अभिव्यक्त करताना, त्यांच्या अंतःप्रवाहात समानता जाणवते. निर्मितीचे गहन अंतरंग उघडकीस आणणाऱ्या या दोन्ही कलाकृतींतून निर्मितीप्रक्रियेच्या खोल खोल गर्तेत फिरून, एका स्तब्ध टप्प्यावर स्तिमित होऊन परमोत्कर्ष गाठणाऱ्या मनोऱ्यासारखी उंची गाठून निःशब्द करणारी समान स्पंदने जाणवतात. या समरूपतेमुळे त्या दोहोंतील समांतर जागा आणि त्या अन्वयाने जाणवलेल्या परस्परसंबंधांचे तुलनात्मक अवलोकन करावेसे वाटते.
कुब्ला खान या कवितेत निर्मीतीचा मागोवा घेताना त्याला स्वप्नात दिसलेल्या एबिसिनिअन युवतीचा (Abyssinian maid) उल्लेख करून कवी सुचवतो की, एखाद्या अथांग विवरात निर्मितीचे जन्मस्थान असते. याच प्रकारे ‘एक द्विज स्थळ’ या कथेतील अंतःप्रवाहात निर्मितीची ‘अनाकलनीयता’, निर्मितीच्या प्रवासातला भुलभुलैया, त्या वाटेवरची अस्वस्थचित्तता आढळून येते. कथेतील शेखर या पात्राच्या ‘स्वभावाच्या साऱ्या एकांतिक लहरींना निर्मितीची ओढ’ (पृष्ठ क्र.५९) लागते. कलावंत जाणिवेच्या पातळीवर अज्ञात अशा स्थानात शोधत असतो, दुर्गम गोष्टींचा पाठपुरावा करत असतो आणि अगम्य अशा गोष्टींचा साक्षीदार होत असतो हे शेखरच्या ‘निर्मिती’च्या अनुभवामधून ध्वनित होते.
कवितेमध्ये, ज्याद्वारे कलाकाराकडून कलानिर्मिती घडते अशा प्रेरित कल्पनाशक्तीची भूमिका मांडली आहे. कवितेत ही प्रेरक शक्ती तंतुवाद्य वाजवणाऱ्या युवतीच्या (Damsel with a Dulcimer) रूपात येते. तर कथेत शेखरची निर्मितीविषयीची स्वयंप्रेरकता ‘झोपेच्या अधीन होताना शेखर ह्यावर विचार करत असे’ (पृष्ठ क्र. ५९), ‘त्याचा अथांग कोरा काळ लगेच निर्मितीच्या विवंचनेत बुडून जाई’ (पृष्ठ क्र. ५९) अशा अनेक वाक्यांतून दिसते. निर्मितीशिल्पाच्या कळसापर्यंत पोचण्याची त्याची आस दिसून येते. तसेच त्यासाठी अभिप्रेत असलेली आत्यंतिक एकतानता सूचित होते.
कवितेत कवीला निर्मितीसाठी आवश्यक वाटणारी प्रेरक शक्ती म्हणून दर्शवले गेलेले संगीत ही एक बाह्य गोष्ट आहे. ती प्रेरक शक्तीदेखील क्षणिक मानली गेलेली आहे. तर कथेत निर्मितीसाठी कल्पकता, उत्स्फूर्तता तसेच अंतःस्फूर्ती यांच्या पलीकडे जाऊन चिंतन, दीर्घकालीन सखोल विचार या गोष्टीदेखील निर्मितीस प्रेरक ठरतात असे दिसते. निर्मितीची शक्ती मुक्त, स्वतंत्र अशी दिसून येते. शेखर निर्मितीच्या ठिकाणी जातो तेव्हा आलेल्या ‘संपृक्त, तंदुरुस्त मनाने निर्मितीवर लक्ष केंद्रित करायचं तो ठरवून आला होता,’ (पृष्ठ क्र. ६०) अशा वाक्यांतून निर्मितीप्रक्रियेतील कलावंताने स्वतःहून केलेला सायास, निश्चय दिसून येतो.
कुब्ला खानच्या केवळ एका हुकूमाने कारंजे आणि नद्या, गुहा आणि उद्याने सामील असलेला असा भूभाग सचेतन रूप धारण करतो. यातून कवीने त्याची निर्मितीक्षमता सिद्ध केली आहे. कथेतही ‘निर्मितीकडे जाणाऱ्या असंख्य वाटा आहेत’ (पृष्ठ क्र. ६०) असे म्हटले आहे. तसेच दगडासारख्या नगण्य वाटणाऱ्या गोष्टीतून सा रे ग म प ध नि स्वर गुंजताना दाखवून, आणि गवताच्या अनेक प्रतिमांमधून, गवतासारख्या कुठेही उगवणाऱ्या अनलंकृत गोष्टीतूनही सर्जनशील उर्मी जिवंत होतात, असे सूचित झाले आहे.
पण त्याच वेळी या दोन्ही कलाकृतींत निर्मिती ही सहजसाध्य गोष्ट नाही, अनेकदा ती अप्राप्य होऊ शकते आणि तिचा मार्ग खडतर असू शकतो यावरही प्रकाश पडतो. हीच सावधानता दाखवत कवी म्हणतो, ‘And all should cry, Beware! Beware!’; तर कथेत ‘निर्मितीसारख्या वस्तू म्हणजे एक षडयंत्रच असतात.’ (पृष्ठ क्र. ५९) यातून निर्मितीतील गुंतागुंत दिसून येते आणि ती नेहमीच सुकर नसते, हे सूचित होते.
इंग्रजी कवी वर्डस्वर्थने म्हटल्याप्रमाणे, “of genius in the fine arts, the only infallible sign is the widening of the sphere of human sensibility,… the introduction of a new element into the intellectual universe”, कलानिर्मितीत असा घटक निदर्शित होतो. या दोन्ही कलाकृतींमध्ये निर्मिती ही अशाच प्रकारचा घटक घेऊन एक भव्यदिव्य शिल्प म्हणून समोर येते. कवीने निर्मितीला असा जादुई घुमट म्हणून पाहिले आहे. तर कथेतील दगडी शिळांची रचना, गाभारा, कळस, माथा, शिल्प अशा सर्व प्रतिमांमधून निर्मितीची अशीच भव्यता प्रतीत होते.
कलावंतांनी आपल्या कलेतून निर्माण केलेले साम्राज्य, त्यात त्यांना अभिप्रेत असलेली परिपूर्णता कवितेतून दिसून येते. अशा कलाकृतीमध्ये एक प्रकारची अद्भुतता अंतर्भूत असते. याचे वर्णन करताना कवी म्हणतो, “it was a miracle of rare device / a sunny pleasure dome wit caves of ice!”. परिपूर्णतेचे प्रतीक मानले जाणारा माउंट अबोरा आणि सुबक घुमट व उद्यान अशा दोन प्रकारच्या नंदनवनांच्या चित्रणातून कलाकृतीची परिपूर्णता आणि त्यात अंतर्भूत असलेली अद्भूतता कवी प्रकट करतो. तर कथेत ‘विविध कोनांतून प्रतीत होऊन शोभायमान होणारी निर्मिती’ (पृष्ठ क्र. ६०) अशा प्रकारे अनेक अंगांनी परिपूर्ण असे कलाकृतीचे वर्णन आढळते.
कलावंताने त्याच्या मनाच्या साम्राज्यात निर्मिलेली कलाकृती कलावंतालाही विलक्षण भासते. ‘That sunny dome! Those caves of ice!’ यातून कवी, बर्फची गुहा असूनही सूर्यप्रकाशात तेजाळणाऱ्या घुमटाची विस्मयकारकता दर्शवतो. तर कथेत ‘असा कोणता आभास उदय पावतो ह्या रचनेतून जो पुन्हा विसावतो दगडाच्या रखरखीत उन्हाळी अंगावर आणि खूप शोभून दिसतो’ (पृष्ठ क्र. ६१) यातून अशाच रखरखीत उन्हाळी अंगावर उदय पावणाऱ्या आभासाची विस्मयकारकता प्रकट झाली आहे.
कलाकारांना निसर्गातून अनेक अंगांनी आणि अनेक ढंगांनी सूक्ष्मदृष्टी प्राप्त होत असते. कवितेत कवीने सुस्पष्ट अशी रुपकात्मक नैसर्गिक प्रतिमासृष्टी साकारली आहे. ज्यात अनेक विरोधाभासी घटक आढळतात. कथेतदेखील अशाच चित्रमयी मनोहारी धूसर भासांसारख्या प्रतिमांसह जादुई वातावरणनिर्मिती झाली आहे. नियंत्रित आणि सुव्यवस्थित ‘pleasure dome’ आणि ‘दगडांनी साधलेली महिरप’, शीघ्र आवेग असलेले ‘mighty fountain’ आणि ‘उष्णतेचा वाफारा’, लाटांमध्ये ज्याची सावली तरंगते आहे असा, तसेच कारंज्यांच्या संगीतात एकरूप होणारा ‘floating dome’ आणि ‘सा रे ग म प ध नि होऊन लाल मातीच्या डोहात पाय सेडून बसलेले दगड’, अजस्र आणि अज्ञात असे निसर्गचित्र दर्शवणारे ‘caverns measureless to man’ आणि ‘अमूर्त आशय पोटाशी धरून बसलेलं दगडी श्वापद’, ‘दगडी गुहा’, दिलासादायक ‘enfolding sunny spots of greenery’ आणि ‘मुक्त पसरलेलं एकसारखं गवत’, ‘गवताचे मांडप’, ‘गवताचे उंचवटे’ असे शोभिवंत रूप, अशी या दोन्ही कलाकृतींमधील समानधर्मी, एकसदृश आणि समरूप प्रतिमासृष्टी निसर्गातील उत्पत्ती आणि विनाशाची लय आणि ताल सांगते; निसर्गचक्र आणि सर्जन यांतील एकरूप दृष्टी चितारते; आणि निर्मितीप्रक्रियेत आणि कलाकृतीत अंतर्भूत असलेल्या प्रेरकता, आवेग, गतिमानता, संतुलन, सखोलता, सुसंगतता, ताल, विलय यांसारख्या अनेक विधायक तसेच संहारक गुणधर्मांना चित्ररूप देते.
‘Every act of creation is, first of all, an act of destruction.’ या Pablo Picassoच्या म्हणण्याप्रमाणे कथेमध्ये ‘कधीतरी मंदिराच्या गार ओट्यावर बसून रानोमाळ धावणारा तो अंतर्धान पावण्याची वेळ आली होती.’ (पृष्ठ क्र. ६०) यातून निर्मितीच्या एका टप्प्यावर कलाकारातला ‘स्व’ अंतर्धान पावतो असे सूचित झाले आहे. निर्मितीच्या वेळी कलावंताला स्वतःचा विसर पडतो. ती निर्मिती, ती प्रेरकशक्ती कलावंत केवळ जाणीवेच्या पातळीवर पुनरुत्जीवित करू शकत नाहीत, हे व्यक्त करताना कवी म्हणतो- “Could I revive within me, Her symphony and song, To such a deep delight ’twould win me, That with music loud and long…”
तर कथेतील “निर्मिती ही काही आकळून घ्यायची गोष्ट नाही, आनंद, आस्वाद महत्त्वाचा” (पृष्ठ क्र. ५९) यासारख्या पात्रांच्या संवादातून, तसेच ‘स्पष्टीकरणांचे अर्घ्य वाहूनही आता कोणताच सूर्य उगवणार नव्हता.’ (पृष्ठ क्र.६१), ‘लाख वर्णनांवरची त्याची हुकूमत संपुष्टात आली होती.’ (पृष्ठ क्र. ६१) अशा वाक्यांतूनही निर्मितीच्या ह्या उत्कट गहिऱ्या अनुभवापुढे शब्दांच्या अशाच मर्यादांचा प्रत्यय येतो.
‘That sunny dome! those caves of ice!’ असे म्हणून कवी निर्मितीच्या अनुभवातून येणारी विस्मयचकितता कथित करतो. त्याचप्रमाणे कथेतील ‘त्याच्यापाशी आता एकच शब्द होता : निःशब्द. त्याच्या ठायी आता एकच भाषा उरली होती: जणू, गमे, भासे की.’ (पृष्ठ क्र. ६०) अशा वाक्यांतून, निर्मितीच्या अनुभवाच्या वर्णनातून आणि विरामचिन्हांतूनही लय बदलत सारी संवेदना व्यापून केवळ निःश्चल नीरव स्तब्धतेची निखळ नितळ जाणीव उरते.
यापुढ जाऊन कथेत मूर्त निर्मितीकडे नेणाऱ्या आरपार तरलतेचा अधिक खोल अनुभव येतो. निर्मितीशिल्पापर्यंत आलेल्या प्रवासातल्या सगळ्या हलचाली एकाएकी स्तब्ध होतात. संमोहित झाल्याप्रमाणे ‘सावलीसारखा शेखर एका बाकावर विसावत” तेव्हा ‘आवाजाच्या चिमण्या इकडेतिकडे उडत’ असतात. जाणीव-नेणीवेच्या ह्या विहंगम संवेदनांसह त्याला अनोळखी असणाऱ्या अज्ञात प्रदेशांचा शोध घेताना कितीतरी गोष्टी नव्याने उमगू लागतात हे जाणवते. सृजनशील निर्मितीच्या चौफेर आविष्काराचे अनोखे तरंग त्याच्या भावपटलावर उमटताना जाणवतात. कथेत पुढे निर्मितीला पूजनीय मानून पाचारण केल्याप्रमाणे ‘निर्मितीतल्या एका दगडावर कुणीतरी एक लाल फूल वाहिलं होतं. त्याचा रंग घवघवीत भासत होता.’ (पृष्ठ क्र. ६१) अशी गांभीर्याची गडद परिणामकारक छटा त्या वर्णनाला जणू पूर्णत्व देते.
शब्दाद्वारे प्रकट करता येणाऱ्या भावनेपेक्षा कितीतरी पटीने उत्कटपणे निर्मितीचा हा अनुभव त्याच्या मनात दडलेला दिसतो. त्याला ‘साऱ्या दगडांना असलेली त्यांच्या गुणधर्माची बुद्धी’ जाणवते. जणू तो त्या निर्मितीशिल्पातील प्रत्येक दगड, प्रत्येक घटक हळूवारपणे साऱ्या संवेदनशीलतेनिशी न्याहाळून पाहतो. आतल्या आत ते शिल्प उलगडत विस्तारत त्याच्या अंतरंगाच्या कानाकोपऱ्यात जातो. आणि त्या विलक्षण तन्मयतेमुळे अलगद येऊन त्याच्या ओंजळीत पडते ती मूर्त आणि अमूर्ताच्या एकत्रित परिणामाने साधलेली निःशब्दता. अबोध भावनांनी ओथंबलेल्या अबोल एकांतात ‘बुडणारा सूर्य बघत शेखर नुसताच बसून’ राहतो. (पृष्ठ क्र. ६१) त्याच्या भावनिक स्पंदनांशी निर्मितीशिल्पाची स्पंदने अजोडपणे गुंफली जातात. पिसाप्रमाणे हलकी तरी दगडाप्रमाणे ओझावलेली अशी निर्मितीच्या अनुभवातून येणारी त्याची अवस्था कथेतील वातावरणनिर्मितीतून संक्रमित होते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
कथेत असे निर्मितीप्रक्रियेत अंतर्भूत असलेले उत्कट व उत्तुंग मनोवस्थेचे क्षण वेचले आहेत. आणि ते क्षण पकडूनच सुश्लिष्ट कलाकृती तयार होते असे सूचित झाले आहे.“‘दगड दगड आणि दगडातून खेळणारं पाणी आणि त्या पाण्याचा खळखळाट आणि कुठे दगडांनी साधलेली महिरप आणि कुठे गुहा आणि कुठल्याशा दगडावर उगवलेली लव आणि कुठे उष्णतेचा वाफारा आणि अमूर्त आशय पोटाशी धरून बसलेलं दगडी श्वापद आणि वर वर आकाशगामी होत जाणाऱ्या दगडाचा खिन्न चौकोनी चेहरा आणि सा रे ग म प ध नि होऊन लाल मातीच्या डोहात पाय सोडून बसलेले दगड आणि कुठे एका दगडाच्या डोक्यावर दुसरा दगड आणि दगडांमधून उदय पावणारं अतिएकाकी अतिशय अस्फुट विधान” (पृष्ठ क्रं ६०) अशा वर्णनातून सर्वस्पर्शी निर्मितीशिल्पाचे अंतरंग व बाह्यांग, त्यात समाविष्ट असलेले तात्कालिक व चिरंतन गुणधर्म दिसून येतात. या सर्वांच्या मनोज्ञ मिलाफातूनच कलाकृती आपला खोल ठसा उमटवत असते याची प्रचिती येते.
“ह्या साऱ्या दगडांना बुद्धी आहे त्यांच्या गुणधर्माची. पण असा कोणता आभास उदय पावतो ह्या रचनेतून जो पुन्हा विसावतो दगडाच्या रखरखीत उन्हाळी अंगावर आणि खूप शोभून दिसतो?” (पृष्ठ क्र. ६१) असे म्हणत निर्मितीप्रक्रियेचे गूढ उलगडत असतानाच ती अधिक गूढरम्य केली आहे.
.................................................................................................................................................................
लेखिका वरदा सरदेशमुख अनुवादक म्हणून काम करतात.
varada.ss@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment