अजूनकाही
२०१४ला भारतात सत्ताबदल झाला पण त्याचे पडघम २०११ पासूनच म्हणजे अण्णा हजारे आंदोलन आणि व्हॉट्सअॅप तसेच अन्य समाजमाध्यमांतून अत्यंत जहरी, खोटा प्रचार यांच्यातूनच वाजू लागले होते. तसे या पूर्वीही एकदा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतेपदाखाली भाजपचे सरकार आले होते, परंतु स्वतः वाजपेयी यांनी स्वातंत्र्यापूर्वीचा आणि नंतर नेहरूंचा, इंदिराजींचा काळ पाहिलेला होता. त्याचमुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेल्या नव्या सरकारच्या अर्धीही आक्रमकता त्या मागच्या सरकारकडे नव्हती.
हे सरकार कट्टर उजवे आहे, धर्मांध वृत्तींना धग देऊन लागलेल्या आगीत स्वतःच्या सत्तेची पोळी भाजून घेणारे आहे, हे तर स्पष्टच दिसते आहे. असे सरकार तोंडदेखले जरी लोकशाही मार्गाने आलेले असले तरी, प्रत्यक्षात त्याची मनोवृत्ती हुकूमशाहीचीच असते. म्हणूनच मग सत्ताग्रहणानंतर आठ वर्षे झाली तरी पंतप्रधान मुक्त पत्रकार परिषद घेत नाहीत आणि संसदेतही ठराविक पत्रकार वगळता अन्य पत्रकारांना मज्जाव झालेला आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
वर्ण आणि वर्गद्वेषी मनोवृत्ती
अशा सरकारचे आमचे अंधभक्त नातेवाईक समर्थन करतात, तेव्हा सुरुवातीला कोड्यात पडल्यासारखे होत होते, पण आता होत नाही. ते एवढे सत्ताशरण का झाले असावेत, तर त्यामागचे कारण मला असे वाटते की, मुळात हे सरकार त्यांच्या पसंतीचे आहे, या सरकारचे छुपे अजेंडे ‘सर्वांना समान मानणाऱ्या’ संविधानाच्या विरोधात असून त्यात ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांना पूर्वीसारखेच सर्व फायदे मिळावेत, अशीच मनोवृत्ती त्यामागे आहे. हे आमच्या उच्चवर्णीय नातेवाईकांना खास करून पुरुष नातेवाईकांना फायद्याचे आहे. आश्चर्य म्हणजे, आमच्या स्त्रियाही हिरिरीने त्यांची ‘री’ ओढत असतात, तेव्हा त्या पुरुषसत्तेच्या वाहक म्हणूनच काम करत असतात. प्रत्यक्षात या सरकारचे पाश जेव्हा आवळले जातील, तेव्हा पहिला घाला स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरच पडणार आहे, पण आत्ता त्यांना याचे भान आलेले दिसत नाही. मुसलमानांची ‘जिरवण्यासाठी’ म्हणून हे सत्ताधारी कर्नाटकात ‘हिजाब बंदी’ करतात, पण दुसरीकडे हिंदू स्त्रियांनी जीन्स घालता कामा नये, असंही आंदोलन तिथली श्रीरामसेना करते. यातला आंतर्विरोध या बायकांच्या लक्षात येत नसावा.
आमचे काही नातेवाईक धार्मिक मनोवृत्तीचे आहेत, तर काही मुळीच धार्मिक नाहीत, परंतु तरीही ते या सरकारच्या मात्र पाठीशी आहेत. एक तर शेअर बाजार वगैरे तेजीत आहे. त्यामुळे यांचा त्यात फायदा होतो. दुसरे म्हणजे हे सरकार सगळ्या सरकारी कंपन्या विकते आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण संपेल आणि खालच्या जातींना प्रगतीची संधी मिळत होती, ती नाहीशी होऊन त्यांना त्यांची योग्य ‘जागा’ कळेल, असेही यांना आतून वाटत असते.
आणखी एक कारण म्हणजे हे सर्व लोक सुखवस्तू आहेत. काँग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण, नंतर आर्थिक उदारीकरण या सगळ्यांचे लाभ त्यांना मिळाले आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा लोकांची मुले परदेशी स्थायिक झालेली आहेत. त्यामुळे त्यांना इथली वाढती महागाई, व्याजाचे पडते दर, वाढती बेरोजगारी अशा समस्यांची व्यक्तिशः झळ लागणारच नाही. त्यामुळे काल्पनिक मुसलमान असुरांची चांगली ठासली जात आहे, यामुळेच ते खुश होत आहेत, आणि म्हणूनच सत्ताशरण आहेत.
सोशल मीडियावरचा उद्दामपणा
आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे सत्ताशरण लोक सत्तेचे गोडवे गाणारे मेसेजेस फॉरवर्ड करत असतात, पण त्यातले असत्य समजून घेण्याची तसदी घेत नाहीत. एवढे उच्चशिक्षित लोक असे का करत नसतील? तर त्यांना ते सगळे माहिती आहे, परंतु आपल्या मनासारखे घडत असल्यावर कशाला कोण विरोधात जाईल?
माझा एक उच्चवर्णीय मैत्रिणींचा ग्रुप आहे, तिथे एक ग्रंथपालाचे काम करणारी स्त्री आहे. ती या ग्रुपमध्ये हिरिरीने पोस्ट करायची. अधिकाधिक पोस्ट्स खोट्या, जहरी राजकीय प्रचार करणाऱ्या होत्या. ही ग्रंथालयात काम करते, वेगवेगळ्या पुस्तकांच्या सहवासात राहून ही एकांगी विचार कसा करू शकते, याचे मला भयंकर आश्चर्य सुरुवातीला वाटत असे. इतर जणी तिचे फॉरवर्ड वाचायच्या, पण काहीच मत व्यक्त करायच्या नाहीत. एकदा मला न राहवून मी तिच्या म्हणण्याचा प्रतिवाद केला, तर अॅडमिन मैत्रीण मलाच सांगायला आली की, इथे राजकारणावर चर्चा नको. पण त्याआधी तिला तिनं तसं कधीच सांगितलं नव्हतं. बाकी सगळ्या गप्प होत्या, कारण त्यांची मतंही तशीच होती. शेवटी मी तो ग्रुप सोडला.
अंधभक्तीला उधाण
सगळीकडे म्हणजे शाळेच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर, नातेवाईकांच्या गटांत हाच प्रकार आहे. माझा मोठा भाऊ मला अचानक काही सत्ताशरण पोस्ट्स पाठवू लागला, तेव्हा मी त्याचा प्रतिवाद केला आणि काही पोस्ट्स त्याला पाठवल्या, तर तो माझ्यावर भडकला. मग अशा पोस्ट्स पाठवायच्या नाहीत, असं आम्ही ठरवलं. पण एकदा तो नियम आम्हा दोघांकडून मोडला गेला, तर चक्क यानं मला धमकी दिली की, या गोष्टीचा आपल्या नात्यावर परिणाम होईल. तेव्हा मी आश्चर्यानं थक्कच झाले. सख्खा भाऊ असं आणि या कारणामुळे बहिणीला सांगू शकतो! खरं तर आम्ही एका घरात वाढलो, एका आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलो, आमच्यावर सारखेच संस्कार झाले. माझी आई राष्ट्र सेवादलात जायची, कसले उपासतापास करत नव्हती. ते दोघेही धार्मिक नव्हते. आपण ब्राह्मण आहोत, असं आम्हाला त्यांनी कधी मुद्दाम सांगितलं नाही किंवा घरी शाळेतून मित्रमैत्रिणी आल्या, तर त्यांची आडनावं विचारून नंतर घरात त्यांच्या जातीची वगैरे चर्चा कधी केली नाही. त्यांनी आमची मनं निकोप ठेवली, म्हणून मी माझ्या आई-वडिलांचे आणि देवाचेही आभारच मानते.
एके ठिकाणी लग्नाला गेले होते, तर तिथे नेहरूंनी पटेलांना डावललं, तेच पंतप्रधान व्हायला हवे होते, यावर चर्चा सुरू होती. मी फक्त एवढंच म्हटलं, ‘अहो, सरदार पटेल १५ डिसेंबर १९५० रोजी वारले आणि पहिल्या निवडणुका झाल्या १९५२मध्ये, तर मग ते पंतप्रधान कसे होऊ शकले असते?’ अशा वेळेस समोरची व्यक्ती निरुत्तर होते, परंतु हे लोक वेगळ्या गटासमोर हाच खोटा प्रचार करायला थकत नाहीत.
परधर्मद्वेषाची परिसीमा
हल्लीच माझ्या मावसभावाकडे गेले होते. तेव्हा कोविडमुळे लोक मास्क लावायचे. त्यामुळे भेट म्हणून दोन-चार मास्क नेले होते. त्यातला एक मास्क पिस्ता रंगाचा होता, तर हा पठ्ठ्या मला म्हणतो कसा की, ‘हा हिरवा मुसलमानी रंग मला नको’. मी ते ऐकून चाट झाले. खरं तर व्हायला नको, पण झाले. मग मला वाटलं की, झाडं, झाडांची पानं हिरवी असतात, मग तीही मुस्लीम का? अख्खा निसर्गच मुस्लीम का?
त्याच्या पत्नीने म्हणजे बिनिताने तर मला तिच्या लहानपणची गोष्टच सांगितली. ती जिथं राहायची तिथे तेव्हा मिश्र वस्ती होती. हिची शाळेतली मैत्रीण रेहाना मुसलमान होती. दोघी एकमेकींच्या घरी जायच्या- यायच्या. तिला यांच्याकडची साबुदाण्याची खिचडी आवडायची, हिलाही त्यांच्याकडली खीर, कुर्मा आवडायचा. एकमेकींच्या घरी जाऊन त्या एकमेकींच्या आयांशी गप्पा मारायच्या. मात्र पुढे लग्न झाल्यावर कोण कुठे गेलं? कोण कुठे गेलं? हे काहीच कळलं नाही. तिच्या आई-वडिलांनीही पुढे ती जागा सोडली. त्यामुळे संबंध राहिला नाही. परंतु जवळजवळ चाळीस वर्षांनी रेहानाने हिला शोधून काढलं, ती कॅनडाला राहत होती. भारतात आल्यावर हिला भेटायला आली. दोघी जणी प्रेमाने भेटल्या. तेव्हा रेहानाचा मुलगा हिला म्हणाला की, “ये बिनिता आंटी कौन है मुझे देखनी हैं. क्योंकि हमारी मम्मी सब पासवर्ड्स आपके नामसेही रखती हैं. इतना वह आप को याद करती है.” ते ऐकून मला खूप छान वाटलं, परंतु पुढे बिनिता जे म्हणाली, ते ऐकून मी गारच झाले. ती म्हणाली की, ‘रेहाना माझा फोटो मागत होती, मी देणारच होते तिला, पण नंतर वाटलं की, ही मुसलमान आहे, न जाणो माझ्या फोटोंचा काही गैरवापर करील की काय?’
मी अक्षरशः हतबुद्ध झाले. या संकुचित, विद्रूप विचारांनी भारताच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केलं आहे, हे जाणवून खूपच वाईट वाटू लागलं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
आणखी एक उदाहरण म्हणजे एक प्रथितयश, मान्यवर लेखिका- त्यांची पाकिस्तान, अफगाणिस्तानवरील पुस्तकं मराठीतील नावाजलेली, उत्कृष्ट पुस्तकं आहेत. माझी त्यांची बऱ्याच वर्षांपासूनची ओळख आणि वयात खूप अंतर असलं स्नेह. त्यामुळे त्यांची मतं अशी संकुचित आहेत, हे जेव्हा कळलं, तेव्हा खूप खूप धक्का बसला. हे असं कसं होऊ शकतं, हेच मला कळेना. आता तर वाटतं की, ही सगळी माणसं आधीपासूनच ‘त्या’ विचारांची होती, पण आता सत्ता मिळाल्यामुळे बिळातले उंदीर बाहेर यावेत, तसे ते बाहेर आले आहेत.
तरी पण तरीही मला अजूनही भाबडी म्हणा हवी तर, पण आशा वाटते की, हे लोक भानावर येतील, वास्तवाचे चटके बसले की, येतील किंवा यांच्यामागे जाणाऱ्या बहुजनांना तरी त्यांचा कावा कळेल आणि सारे काही सुरळीत होईल, पण त्यासाठीही वेळ द्यावा लागेल आणि मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन करावं लागेल.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ मे २०२२च्या अंकातून
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment