अजूनकाही
विसाव्या शतकातले नोबेल पुरस्कारप्राप्त जागतिक कीर्तीचे लेखक-पत्रकार-नाटककार आल्बेर काम्यू यांचा ‘रिफ्लेक्शन्स ऑन दी गिलोटिन’ हा जगप्रसिद्ध निबंध. या निबंधाचा ‘शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा’ हा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार शेखर देशमुख यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या अनुवादाला ‘देहदंड : पुराणकाळापासून… आधुनिक इतिहासापर्यंत’ आणि ‘देहदंड : भारतीय मानस आणि विधि आयोगाच्या शिफारशी’ या दोन स्वंतत्र प्रकरणांची जोडही दिली आहे. नुकत्याच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेल्या या अनुवादाला शेखर देशमुख यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
मानवी मनाइतकी दुसरी अनाकलनीय गोष्ट या जगात नाही. या अनाकलनीय मानवी मनावर (विज्ञानाच्या मते, मानवी मन आणि मेंदू हे भिन्न घटक नाहीतच. मन म्हणजे, मुळात वेशांतर केलेला मेंदूच असतो, असे मानसशास्त्रज्ञ मानतात. संदर्भ : ‘मार्क्स काय म्हणाला’ - उदय नारकर, लोकवाङ्मय गृह, २०१४.) जन्मापासूनच अनुभव, ज्ञान आणि स्मृतींचा थर साचत जातो. हा थर जसा वाढत जातो, एकीकडे अहंकाराची पुटेदेखील चढत जातात.
याचा परिणाम अहंमन्यता आणि वर्चस्वाची ईर्ष्या बळावण्यात होतो. यातूनच कधी तरी माणसाच्या मनाचा तोल बिघडतो. शासनसत्तेचा कायदा ज्याला गुन्हा मानतो, असे कृत्य त्याच्या हातून घडते. हा गुन्हा कधी सौम्य, तर कधी ‘दुर्मीळातला दुर्मीळ’ (rarest of the rare) म्हणता येईल, असा सामूहिक मानवी हत्येसमानही असतो. यात ज्या माणसाचा/माणसांचा बळी जातो, त्यांच्या आप्तस्वकीयांना स्वाभाविकपणे परिपूर्ण न्यायाची तीव्र अपेक्षा असते. अर्थात, ते बळी गेलेल्यांचे शोकमग्न स्वकीय असले तरीही त्या शोकमग्नतेत अहंकार आणि सुडाची भावना त्यांच्या मनातून लोपलेली नसते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
किंबहुना, अशा प्रसंगात ती अनेकदा अधिक तीव्रतेने उसळी मारून वर येते. तेव्हा ‘बळीच्या बदल्यात बळी’, ‘भर चौकात फाशी’ हाच या शोकमग्न मनाला यथायोग्य न्याय भासतो. गुन्हा वैयक्तिक स्तरावरचा असेल, तर या शोकमग्न अहंकाराला आणि त्याच्या प्रभावाला मर्यादा येते. मात्र जेव्हा गुन्हा सार्वजनिक स्तरावरचा असतो, तेव्हा आक्रोशयुक्त अहंकाराची व्याप्ती मोठी असते. त्यातूनच आरोपी गुन्हेगारास फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोवर बळी गेलेल्यास ‘न्याय’ मिळणार नाही, अशी भावना जनांमध्ये मूळ धरते. याला ‘जनभावना’ असेही नाव दिले जाते.
कायदा याच जनभावनेला आपल्या कलमांमध्ये सामावून घेतो. साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायव्यवस्था फाशीची शिक्षा सुनावते, तेव्हा कुठे बळी गेलेल्यांच्या आप्तांमध्ये खरोखरचा न्याय झाल्याची भावना दाटून येते. न्यायालयीन निवाड्याची परिपूर्ती करण्याची जबाबदारी शासनसत्तेकडे असते. ही शासनसत्ता त्या कलमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्वरेने पुढे येते. मात्र पीडितांचे निव्वळ मनाचे समाधान हेच यातले जाहीरपणे न उच्चारले गेलेले सत्य असते. म्हणजे, धार्मिक कर्मकांड जसे असुरक्षित मनाला समाधान देते, तसेच न्यायालयाने दिलेला देहदंडाचा निर्णय पीडित समाजाला क्षणिक मानसिक समाधान देत राहतो. हे तात्पुरते मानसिक समाधान व्यक्ती वा समूहाने शोकमग्न अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी, समाजाचे भावनिक संतुलन साधण्यासाठी एका पातळीवर उपयोगी ठरत असले, तरीही ते मिळण्याने वास्तव बदलत नाही.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी वैश्विक विचारविश्वावर प्रभाव राखून असलेला जर्मन तत्त्वज्ञ वॉल्टर बेंजामिन याने हिंसेचा सिद्धांत विकसित करताना ‘मिथक हिंसा’ (Mythical violence) आणि ‘अलौकिक हिंसा’ (Divine violence) असे दोन प्रकार सांगितले होते. त्यात मृत्युदंडाच्या, फाशीच्या शिक्षेला त्याने ‘मिथक हिंसेचे क्रूर उदाहरण’ मानले होते. त्याच्या म्हणण्यानुसार कायद्याच्या मुळाशी हिंसा असतेच असते. कायद्याचे राज्य हे हिंसेचा, बळाचा वापर करून प्रस्थापित केलेले असते. हिंसा हाच कायद्याचा आधार असतो. मानवी जीवनमरणाच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करताना, त्या हिंसेचा क्रूर आणि महत्तम आविष्कार वैधानिक व्यवस्थेतून (Legal system) प्रकट होत असतो.
चोरीसारख्या किरकोळ गुन्ह्यांसाठी दिली जाणारी फाशीची शिक्षा हा या वैधानिक व्यवस्थेत दडलेल्या हिंसेचा उघड आणि भीतिदायक असा सर्वोच्च आविष्कार असतो. फाशीची वा मृत्युदंडाची शिक्षा आणि त्यात दडलेली पराकोटीची हिंसा ही गुन्ह्यासाठीची शिक्षा नसते, तर ती नवीन कायदाही निर्माण करत असते. ही हिंसा प्रस्थापितांसाठी, भांडवलासाठी पोषक वातावरणही निर्माण करत असते. (संदर्भ : डॉ. ‘आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद : नवे आकलन’, नव्या दिशा - उद्धव कांबळे, पृष्ठसंख्या १४३-४४, लोकवाङ्मय गृह, २०१८)
त्याचमुळे पीडितांना न्याय मिळाल्याचा तो केवळ आभास ठरतो. कारण, गुन्हेगाराला कायदेसंमत मरण देऊन बळी गेलेला निरपराध माणूस परत येत नाही की, खून, दरोडेखोरी, बलात्कार, आत्मघाती दहशतवादी हल्ले आदी गुन्ह्यांनाही आळा बसत नाही. समतोल हरवलेले मानवी मन संस्कृती, संस्कार, परंपरा, कायदा कशालाही जुमानत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत, वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर अधिकाधिक क्रूर पद्धतीने गुन्हे घडतच राहतात.
खरे तर गुन्हेगाराचा शिरच्छेद घडवून आणल्याने किंवा त्याला फाशी दिल्याने न्याय दिल्याचा केवळ आभास निर्माण होतो, हे न्यायव्यवस्थाही जाणते आणि कायदे करणारी शासनसत्ताही जाणून असते. तरीसुद्धा देहदंडाची शिक्षा मुक्रर केली जाते. कारण, यात सामान्य जनतेच्या अहंकारयुक्त आक्रोशाला व्यवस्थित जोपासले जाते, जनभावनेचा आदर केल्याचे पुण्यही शासनसत्तेला पदरात पाडून घेता येते आणि याचमुळे बळी गेलेल्यांच्या स्वकीयांमध्ये न्याय मिळाल्याची भावनासुद्धा रुजते.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक सतीश कामत त्यांच्या फाशीच्या शिक्षेवरील निबंधात न्याय मिळाल्याच्या याच आभासी भावनेला प्रश्न करताना विचारतात, एरवी एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावतो, तेव्हा काय करत असतो? तर आपण आपल्यासमोर असलेल्या गुन्हेगाराचे अंतिम मूल्यमापन करत असतो. कसोट्याही आपणच ठरवतो. त्याआधारे आपणच ठरवून टाकत असतो की, हा गुन्हेगार माणूस ‘माणूस’ म्हणायच्या लायकीचा राहिलेला नाही. संधी दिली तरीही आयुष्यात हा सुधारणार नाही.
मुळात, आपल्याला एवढा आत्मविश्वास कोठून येतो? एखाद्याचे त्याच्या हयातीतच जिवंत ठेवायला नालायक, असे मूल्यमापन करण्याचा अधिकार आपल्याला कोण देते? ‘विदाउट अॅबसोल्युट इनोसन्स देअर इज नो सुप्रीम जज्ज!’ चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे हे जर माणसाचे गुणवैशिष्ट्य मानले तर तशी संधी मिळण्याचा हक्क, हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क मानला पाहिजे. फाशी देताना एक व्यवस्था म्हणून, समाज म्हणून आपण हा हक्क नाकारत असतो. त्यामुळे समाज वा जनता म्हणून फार तर आपण आपले सार्वभौमत्व सिद्ध करतो. पात्रता नव्हे. (संदर्भ : ‘जगण्याच्या हक्कासाठी’, ३ एप्रिल १९८३, साप्ताहिक दिनांक.)
सरतेशेवटी, याच जनतेच्या भरवशावर किंवा या जनतेला धाकात ठेवून शासनसत्ता आपले स्थान अधिकाधिक बळकट करत असते. आपल्या स्थानाला बळकटी येत राहावी, जनतेचा आपल्यावर विश्वास कायम राहावा, सत्तेची कार्यक्षमता आणि न्यायप्रियता जनतेच्या मनावर ठसत राहावी, यासाठी काही प्रसंगांत देहदंडाची शिक्षा अक्सिर इलाज ठरते. यात व्यक्ती वा समूहाचा अहंकार जोपासला जातो आणि त्याच वेळी दुसऱ्या एका व्यक्ती आणि समूहाचा अहंकार ठेचला जातो. यात जनतेची मानसिकता आणि शासनसत्तेची मानसिकता एकमेकांना पूरक ठरते, प्रसंगी कधी छेदही देते. परंतु अहंकार गोंजारण्याचा-अहंकार ठेचण्याचा खेळ अव्याहत सुरूच राहतो.
या खेळात सहभागी असलेल्या धर्म, समाज तसेच न्यायव्यवस्था आणि शासनसत्तेचे पूर्वापार असलेले परस्परसंबंध, प्रसंगी त्यांच्यातले उफाळून येणारे अंतर्विरोध, देहदंडाच्या शिक्षेकडे पाहण्याचा या घटकांचा दृष्टीकोन, त्यातून दृग्गोचर होत जाणारी हिंसक वृत्ती आणि या हिंसक वृत्तीने आधुनिक मानवी संस्कृतीपुढे उभे केलेले आव्हान या साऱ्यांचा सखोल वेध विसाव्या शतकातले नोबेल पुरस्कारप्राप्त जागतिक कीर्तीचे लेखक-पत्रकार-नाटककार आल्बेर काम्यू यांचा हा प्रस्तुत दीर्घ निबंध घेतो.
मानवी प्रज्ञा, क्षमता आणि सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करणारा हा निबंध विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिला आणि प्रकाशित झालेला आहे. अर्थात, या निबंधातले संदर्भ एकोणीस तसेच विसाव्या शतकातल्या फ्रान्स आणि युरोपशी संबंधित असले, मुद्द्यांनुरूप उद्धृत केलेली स्थळे, ओघात येत गेलेली व्यक्तींची नावे मुख्यत्वे फ्रान्स-इंग्लंडशी निगडित असली तरीही, या निबंधाचा आशय-विषय कालसुसंगत आहे. यातले विचार वैश्विक आणि कालातीत आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
या घडीला देशात आणि सर्व जगभर दरदिवशी हिंसा नव्या नव्या रूपात समोर येत असताना, मुख्य म्हणजे, कट्टरपंथी राजकीय नेत्यांकडून सार्वजनिक स्तरावर सुडाच्या भावनेस धग दिली जात असताना इतिहासात ठळक अक्षरांत नोंदले गेलेले, मुख्यत: माणसाच्या मन आणि बुद्धीस हात घालणारे हे काम्यूचे मुक्तचिंतन आजच्या समाजातल्या विवेकी स्त्री-पुरुषांपर्यंत पोहोचावे, पुढे जाऊन या विवेकी मंडळींनी काम्यूचा विचार इतरेजनांपर्यंत न्यावा, हा या अनुवादाचा हेतू आहे.
या निबंधाला असलेले साहित्यिक तसेच सामाजिक मूल्य अनन्यसाधारण आहेच, परंतु मानवी तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्राच्या अंगानेदेखील या निबंधाला असलेले जतनमूल्य खूप मोठे आहे. आजचा काळ जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने सर्व जग आकळल्याचा भ्रम निर्माण करणारा आहे. खुनशी शासनसत्तांनी नैतिकता आणि मूल्यांची चाड न बाळगता सामान्य जनांमध्ये विद्वद्जनांबद्दल आकस आणि तिरस्कार निर्माण करण्याचाही आहे. अशा या संकुचित, संभ्रमित आणि विचारांनी सर्दावलेल्या काळात आल्बेर काम्यूच्या वैचारिक सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या, महत्त्वाचे म्हणजे, मानवी प्रज्ञा आणि प्रगल्भतेवरचा विश्वास दृढ करणाऱ्या या पुस्तकाचे सुज्ञ वाचक मनापासून स्वागत करतील, ही खात्री आहे.
‘शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा’ - आल्बेर काम्यू
मराठी अनुवाद - शेखर देशमुख
लोकवाङ्मय गृह, मुंबई
मूल्य – २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment