आता फिलॉसॉफी लवकरच मानव केंद्रित होणार होती. मानवी जीवन, मन, भावना, न्याय, नीती, राजकारण, धर्मकारण वगैरे चर्चांनी बहरून जाणार होती...
सदर - फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
श्रीनिवास जोशी
  • अनॅक्सागोरस
  • Thu , 12 May 2022
  • सदर फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी श्रीनिवास जोशी Shriniwas Joshi फिलॉसॉफी Philosophy अनॅक्सागोरस Anaxagoras

एका बाजूला आपल्याला आपले मानवी आयुष्य अर्थहीन वाटत असते. परस्परविरोधी आकांक्षांचा पाठलाग करताना आणि परस्परविरोधी जबाबदाऱ्या पाळताना आपल्याला हे मानवी आयुष्य व्यर्थ आहे, असे वाटत राहिलेले असते. त्याच वेळी आपल्यात काहीतरी सुंदर आणि महत्त्वाचे आहे, असेही आपल्याला वाटत असते. एकदा मानवी आयुष्यातील अर्थावर पकड आली की, सारे श्रेय आपल्या हाती लागेल, असे आपल्याला वाटत असते. फिलॉसॉफीवरील गप्पांची ही मालिका म्हणजे त्या मानवी आयुष्यातील श्रेयाचा शोध आणि पाठलाग!

..................................................................................................................................................................

लेखांक पाचवा

फिलॉसॉफरची नोट खूप दिवसांनी आली. मिताली खुश झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये फिलॉसॉफर थोडा आजारी पडला होता. मोठे असे काही नाही, छोटी छोटी दुखणी एकामागून येत राहिली. मितालीला काळजी वाटत होती. तिने लिहिले की, एवढी दुखणी एकत्र कशी येऊ शकतात? त्याने हसण्याची स्मयली पाठवली आणि शेक्सपियरचे हॅम्लेटमधील वाक्य पाठवले- ‘When sorrows come, they come not single spies, but in battalions’. (दुःखे एकट्याने एकट्याने कधी येत नाहीत. त्यांची सेनाची सेना आपल्यावर चाल करून येते.)

आज त्याची नोट आली आणि त्या सगळ्याच प्रकरणावर पडदा पडला. त्याने लिहिले होते -

“आज आपण अनॅक्सागोरसला भेटणार आहोत. हे अतिशय इंटरेस्टिंग कॅरॅक्टर आहे. याचा जन्म इसपू ५०० ते ४८०च्या दरम्यान एशिया मायनर म्हणजे सध्याच्या तुर्कस्तानमध्ये झाला. त्याच्या जन्मगावाचे नाव होते क्लॅझोमिनाय. हे गाव एशिया मायनरमधील आयोनिया प्रांतात होते. अनॅक्सागोरसचा जन्म मोठ्या उमराव घराण्यात झाला. त्याच्या घराण्याकडे जमीनजुमलासुद्धा खूप होता. पण फिलॉसॉफीचा अभ्यास करण्यासाठी त्याने या सर्वांवर पाणी सोडले. वयाच्या चाळीशीमध्ये तो अथेन्सला आला.

अनॅक्सागोरसला खगोलशास्त्रात चांगलीच गती होती. ग्रहणे का घडतात, याचे योग्य कारण देणारा तो पहिला फिलॉसॉफर. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यामुळे सूर्यग्रहण होते आणि चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यामुळे चंद्रग्रहण होते, हे पाश्चात्य जगाला अनॅक्सागोरसने पहिल्यांदा सांगितले. चंद्र हा परप्रकाशित आहे, हेसुद्धा त्याने सांगितले. आकाशात चमकणारे ग्रह हे दगडा-मातीचेच बनलेले आहेत, हे त्याने आकाशातून पडलेल्या उल्केचा तुकडा पाहून सांगितले. सूर्य हा अतितप्त असा धातूचा गोळा आहे आणि तो पेलोपोनेसिया या द्वीपाएवढा आहे, हा आपला निष्कर्ष त्याने त्या काळी लोकांसमोर मांडला.

अशा या अनॅक्सागोरसच्या फिलॉसॉफीचा विचार आज आपण करणार आहोत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आपण आत्तापर्यंत थेलीस, अनक्सिमॅन्डर आणि आनाक्सिमिनीस या ग्रीकांच्या आयोनिया राज्यातील मायलिटस येथील तत्त्वज्ञांची ओळख करून घेतली. नंतर आपण हेराक्लिटस ऑफ एफिससला भेटलो. नंतर आपण पार्मेनिडीज ऑफ एलियाची फिलॉसॉफी बघितली. आणि शेवटी गेल्या वेळी आपण एम्पिडोक्लिस ऑफ एटनालाही भेटलो.

मिताली, या सगळ्यांना ‘नॅचरल फिलॉसॉफर’ म्हणतात येते, हे तुला माहीतच आहे. ‘नॅचरल फिलॉसॉफर’ म्हणजे या विश्वाबद्दल विचार करणारे. निसर्गाबद्दल विचार करणारे. हे जग कोठून आले? हे जग कशाचे बनले आहे? हे जग कसे चालते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे.

थेलीस वगैरे मायलिटस येथील फिलॉसॉफर्सचे म्हणणे होते की, हे सर्व जग कुठल्यातरी एका गोष्टीपासून बनलेले आहे. थेलीसने मत मांडले होते की, हे जग पाण्यापासून तयार झालेले आहे. अनाक्सिमॅन्डरच्या मते हे जग कुठल्यातरी अमर्याद तत्त्वापासून बनलेले आहे, तर अनाक्सिमिनीसच्या मते हे जग हवा या अमर्याद तत्त्वापासून बनलेले आहे.

यानंतर आपण हेराक्लिटस ऑफ एफिससचे मत पाहिले. त्याच्या मते हे जग एकाच तत्त्वाने भारलेले असते. या तत्त्वाला हेराक्लिट्स ‘लोगोस’ असे म्हणतो. हे तत्त्व समजून घ्यायचा प्रयत्न माणसाने केला, तर त्याला ते नक्की समजते. आणि एकदा हे तत्त्व कळले की, या जगातील सगळ्या गोष्टींची प्रकृती लक्षात येते, असे हेराक्लिटसचे म्हणणे होते. लोगोस ही या जगाची गुरुकिल्ली आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्याचा सर्वांत महत्त्वाचा विचार होता - या जगात बदलांचा प्रवाह सतत वाहत असतो. या जगात सतत काहीना काही उलथा-पालथ सुरू असते (Everything is in a flux).”

मितालीला ती सगळी चर्चा आठवली. तिने आधीच्या नोटस् उघडून सगळी चर्चा परत एकदा डोक्यात घेतली.

“हेराक्लिटस म्हणत होता की, हे जग वाहत्या नदीसारखे आहे. सतत बदलणारे आहे. वाहती नदी प्रत्येक क्षणी बदलत असते, त्याप्रमाणे हे जग सतत बदलत असते. त्याच नदीत आपण दोनदा पाय टाकू शकत नाही, त्याप्रमाणेच या क्षणीचे जग आपण पुन्हा अनुभवू शकत नाही. आपल्या डोळ्याला जे दिसले, आपल्या इंद्रियांना जे जाणवले, त्यावरून हेराक्लिटसने हे तत्त्व मांडले होते. त्याच्या या बदलाच्या तत्त्वाविरुद्ध उभी राहिली होती पार्मेनिडीजची ऑफ एलियाची तत्त्वे-

) शून्यातून काहीही तयार होऊ शकत नाही (Nothing can come out of nothing). आणि,

) जे अस्तित्वात आहे ते शून्यात लय पाऊ शकत नाही (Nothing that exists can become nothing).

थोडक्यात, पार्मेनिडीज म्हणत होता की, या विश्वात शून्यातून काहीही निर्माण होत नाही आणि जे अस्तित्वात आहे, ते शून्यात लय पाऊ शकत नाही. त्यामुळे या जगात कुठल्याही गोष्टीचा जन्म होऊ शकत नाही आणि कुठल्याही गोष्टीचा मृत्यू होऊ शकत नाही. त्यामुळे या जगात बदल नावाचा प्रकार असूच शकत नाही. या जगात जे जन्म होताना दिसतात, जे मृत्यू होताना दिसतात, जे बदल होताना आपल्याला दिसतात ते भ्रामक स्वरूपाचे आहेत.

एकीकडे हेराक्लिटस म्हणत होता की, हे जग सतत बदलणारे जग आहे आणि पार्मेनिडीज म्हणत होता की, या जगात बदल शक्य नाही. या दोघांची एकमेकांविरुद्धची तत्त्वे बघून मिताली गोंधळून गेली होती.

या जगातील बदल तर आपल्याला दिसत असतात. पण, या जगातील सगळ्याच गोष्टी जर सतत बदलत राहिल्या आणि नष्ट होत गेल्या तर जग नष्ट होऊन जायला पाहिजे. एखाद्या सूपमध्ये आपण सतत पाणी टाकत गेलो, तर ते सूप सतत डायल्यूट होत राहील आणि शेवटी सूप म्हणून त्याचे अस्तित्व संपून जाईल. त्याचप्रमाणे जगातील गोष्टी बदलत राहून नष्ट होत राहिल्या, तर जगाचीही अवस्था सतत डायल्यूट होणाऱ्या सूपसारखीच होईल. त्यामुळे या जगात कधीही न बदलणाऱ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. बदल तर इंद्रियांना जाणवतो आहे, पण स्थिरतासुद्धा या जगामध्ये असायलाच हवी, असे बुद्धी सांगते आहे, अशी अवस्था! कोण खरे? हेराक्लिटस का पार्मेनिडीज?

या दोघांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न एम्पिडोक्लिस ऑफ एटना याने केला. त्याने उत्तर काढले की, या जगात सत्याच्या दोन पातळ्या आहेत. एक कधीही न बदलणाऱ्या मूलतत्त्वांची पातळी आणि दुसरी ही मूलतत्त्वे एकत्र येऊन तयार झालेल्या गोष्टींची पातळी. मूलतत्त्वे कधीही बदलत नाहीत. पण ही तत्त्वे एकत्र येऊन ज्या गोष्टी तयार होतात त्या गोष्टी मात्र बदलत राहातात.

एम्पिडोक्लिसने सांगितले की, हे सर्व जग चार मूलतत्त्वांनी बनलेले आहे. पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी. या चार ‘रूट्स’पासून या जगातील सगळ्या गोष्टी तयार झाल्या आहेत. चित्रकार जसे मूळ रंग एकत्र करून अनेक रंग तयार करतो, त्याप्रमाणे ही चार रूट्स वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र करून या जगातील असंख्य गोष्टी बनतात. या जगात कधीही न बदलणारी चार मूलतत्त्वे आहेत आणि त्यांच्यापासून हे बदलणारे जग तयार झालेले आहे.

एम्पिडोक्लिसने दिलेले हाडाचे उदाहरण बघितले, तर त्याला काय म्हणायचे आहे, ते अजून स्पष्ट होईल. तो म्हणाला की, एखादे हाड तयार व्हायचे असेल तर चार भाग अग्नी, दोन भाग पाणी आणि दोन भाग पृथ्वी एकत्र यायला लागतात. ही मूलतत्त्वे या प्रमाणात एकत्र आली की, हाड तयार होते. हाड नष्ट पावले की ही कधीही न बदलणारी मूलतत्त्वे पुन्हा एकदा विश्वात विखुरली जातात. पुन्हा एकदा दुसरी कुठलीतरी ‘बदलणारी’ गोष्ट तयार करण्यासाठी.”

मितालीला वाटले होते की, एम्पिडोक्लिसने हेराक्लिटस आणि पार्मेनिडीजमधला तिढा कायमचा सोडवला आहे. पण तसे झाले नव्हते.

“हाडाचे उदाहरण बघितले तर त्यात पार्मेनिडीजचे या जगात बदल होत नाही, हे तत्त्व पाळले गेले होते, हेराक्लिटसच्या बदलाच्या तत्त्वालाही न्याय दिला गेला होता. पण ग्रीक तत्त्वज्ञानात त्या वेळी बहुतकरून स्वीकारले गेलेले अजून एक महत्त्वाचे तत्त्व होते – ‘X’ can not come from not ‘X’. ‘क्ष’ ही गोष्ट ‘क्ष’ नसलेल्या कुठल्याही गोष्टीपासून तयार होत नाही. याला फिलॉसॉफीमध्ये ‘लाईक लाईक प्रिन्सिपल’ म्हणतात. थोडक्यात, एक गोष्ट दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीपासून तयार होत नाही. सोपी उदाहरणे द्यायची तर माणसापासून घोडा कसा तयार होईल? घोड्यापासून चित्ता तयार होईल? आणि, याच धर्तीवर लोखंडापासून सोने कसे तयार होईल? पण, इथे तर एम्पिडोक्लिस म्हणत होता की, अग्नी, पाणी आणि पृथ्वी यांच्यापासून हाड तयार होते आहे.

एम्पिडोक्लिसच्या तत्त्वज्ञानामुळे अजून एक प्रश्न तयार होऊन उभा राहिला होता. या जगात इतक्या विविध गोष्टी आहेत, त्या सगळ्या अग्नी, पाणी, हवा आणि पृथ्वी या चारच गोष्टींपासून कशा तयार होतील?

येथे अनॅक्सागोरसने वादात उडी घेतली. अनॅक्सागोरसने विचार करायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यावर तीन जबाबदाऱ्या होत्या. एकीकडे त्याला पार्मेनिडीजचे शून्यातून काहीही जन्म घेत नाही, हे तत्त्व पाळायचे होते. दुसरीकडे एक गोष्ट दुसऱ्या प्रकारच्या कुठल्याही गोष्टीतून जन्म घेत नाही, हे तत्त्व पाळायचे होते आणि तिसरीकडे हेराक्लिटसच्या बदलत्या जगाच्या संकल्पनेला न्याय द्यायचा होता. या सगळ्याची सांगड घालण्यासाठी अनॅक्सागोरसने स्वतःचा मुख्य विचार मांडला – ‘एव्हरीथिंग इज इन एव्हरीथिंग’. आणि त्याचबरोबर त्याने आपली मूल-पदार्थांची कल्पना मांडली.

अनॅक्सागोरसचे मूलपदार्थ म्हणजे ज्या पदार्थांना भागांमध्ये विभागता येत नाही असे पदार्थ. त्यासाठी त्याने मांसाचे उदाहरण दिले. मांसाचा तुकडा आपण कितीही तोडत गेलो, तरी तो तुकडाच राहतो. म्हणजेच मांसाचा तुकडा हा मूलपदार्थ आहे, पण माणूस मूलपदार्थ नाही. कारण माणसाला मांस, हाडे, केस अशा अनेक भागांत विभागता येते. माणूस अनेक मूलपदार्थांनी बनलेला ‘नॅचरल कन्स्ट्रक्ट’.

एम्पिडोक्लिसची जशी ‘रूट्स’, तसे अनॅक्सागोरसचे ‘मूलपदार्थ’. कधीही न बदलणारी तत्त्वे. फिलॉसॉफीचे काही अभ्यासक अनॅक्सागोरसच्या या मूलपदार्थांना ‘होमिओमेरिक सबस्टन्सेस’ असे म्हणतात. म्हणजे ज्यांचे कुठल्याही भागात विभाजन करता येत नाही, असे पदार्थ. पण गंमत अशी आहे की, हा शब्दप्रयोग अनॅक्सागोरसनंतर एका शतकाने जन्माला आलेल्या अॅरिस्टॉटलने केलेला आहे. संकल्पना एकच असली तरी शब्द उशिरा तयार झालेला आहे. असो.

मूलपदार्थांचे कधीही न बदलणारे जग सांगून झाले. म्हणजे पार्मेनिडीजला न्याय दिला गेला. आता बदलाचा प्रश्न कसा सोडवायचा? हेराक्लिटसला न्याय कसा द्यायचा? जेव्हा माणूस एखादे सफरचंद खातो, तेव्हा त्या माणसाला पोषण कसे मिळते? सफरचंदातील पोषक गोष्टींनी मांस आणि रक्त आणि हाडे बनतात म्हटले, तर तो आपण मान्य केलेल्या एका तत्त्वाचा भंग होईल. कारण एका गोष्टीतून दुसरी गोष्ट तयार झाली, असे मानावे लागेल. पण सफरचंद तर स्नायू आणि रक्तामध्ये बदलताना दिसते. त्याचे काय करायचे? हा तिढा सोडवण्यासाठी अनॅक्सागोरसने निष्कर्ष काढला की, सफरचंदामध्ये मांसपेशी, रक्त आणि हाडे असे सगळे अत्यंत छोट्या कणांच्या स्वरूपात असणार. सफरचंद खाल्ले की, मांसाचे कण मोठे होतात आणि शरीराला मांस मिळते.”

मिताली मनात म्हणाली हा अजून एक क्रेझी माणूस. फिलॉसॉफरने पुढचे वाक्य लिहिले होते की,

‘‘अनॅक्सागोरस तुला क्रेझी वाटेल, पण आपण आपल्या बुद्धीला चिकटून बसलो की, जग कसे उलगडत जाते, हे तुला लवकरच कळेल. अनॅक्सागोरसला निष्कर्ष काढावा लागला होता की, या जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये या जगातील इतर सगळ्या गोष्टी समावलेल्या असतात. मग प्रश्न असा आला की, जर सोन्यामध्ये आणि हाडाच्या तुकड्यामध्ये या जगातील सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतील, तर ते एकमेकांपासून वेगळे कसे दिसतात? यावर अनॅक्सागोरसने उत्तर दिले की, सोन्यामध्ये सोन्याचे केंद्रीकरण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जास्त असते आणि या जगातील इतर सगळ्या गोष्टी अत्यंत छोट्या स्वरूपात असतात. या विचाराच्या पाठोपाठ अनॅक्सागोरसला ‘अनलिमिटेड डिव्हिजिबिलिटी’चे तत्त्व मान्य करावे लागले. या जगातील होमिओमेरिक पदार्थांचे सूक्ष्मातिसूक्ष्मातिसूक्ष्म तुकडे होऊ शकतात.

या बेसिक पदार्थांचे वर्णन करताना अनॅक्सागोरसने ‘सीड’ हा शब्दही काही वेळा वापरलेला आहे. सीडसाठीचा  ग्रीक शब्द आहे, स्पर्मेंटा (Spermata). अनॅक्सागोरसने सीडसची यादी दिलेली आहे ती बघितली तर त्याच्या मनातील सीड्सच्या संकल्पनेवर थोडा प्रकाश पडतो. पृथ्वी, पाणी, अग्नी, गरमपणा, थंडपणा, कडूपणा, अंधार, हाडे, मांस, दगड आणि लाकूड.

या यादीमध्ये पदार्थ आहेत आणि अंधार, अग्नी, गरमपणा आणि थंडपणा अशा गोष्टीसुद्धा आहे. यामुळे अनॅक्सागोरसच्या अभ्यासकांमध्ये ‘सीड्स’ या संकल्पनेविषयी खूप गोंधळ उडालेला आपल्याला दिसतो.

तत्त्वज्ञानाच्या काही अभ्यासकांच्या मते हे कणच असतात. तर, टॅनरी, बर्नेट आणि शोफील्ड सारखे अभ्यासक म्हणतात की, ही सीड्स म्हणजे गरमपणा आणि गारपणा किंवा अंधार आणि प्रकाशासारखी विरोधी तत्त्वे आहेत. या जगात दिसणारी ‘ऑपोझिट्स’ आहेत. बाकी पदार्थांची जी यादी अनॅक्सागोरसने दिली आहे, ती अशा विरोधी तत्त्वांमध्ये ‘रिड्यूस’ करता येते. सगळे जग एखाद्या गोष्टीत विरोधी तत्त्वांच्या रूपाने अस्तित्वात असते, असे म्हणणे या अभ्यासकांना जास्त योग्य वाटले.

या विरुद्ध, गूथ्री, बार्नेस आणि फर्थ यांच्यासारख्या अभ्यासकांचे म्हणणे असे की, सीड्समध्ये विरोधी तत्त्वे, अग्नी, माती, लोखंड या सारख्या गोष्टी आणि प्राणी व वनस्पती अशा सगळ्या गोष्टी आहेत.

डेव्हिड फर्लीसारखे अभ्यासक म्हणतात की, अनॅक्सागोरसची सीड्स म्हणजे या विश्वातील सगळ्या पदार्थांच्या बीजे आहेत आणि त्यातून या विश्वातील सगळ्या गोष्टी तयार होतात. सीड्स ही खरंच सीड्स आहेत. वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी सीड्स! झाड आणि त्याचे बी, म्हटले तर एक असतात कारण सगळे झाड त्याच्या बी मध्ये सामावलेले असते; आणि म्हटले तर हे दोन्ही वेगळेही असतात कारण झाड आणि बी वेगवेगळे दिसतात.”

मितालीला या विचारांची फार मजा वाटली. ती विचार करत राहिली. त्या काळी रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शरीरशास्त्र असं काहीच तयार झालं नव्हतं. ज्ञानाची फार बेसिक धडपड होती ती. फक्त बुद्धीवर विश्वास ठेवून या जगाचे ज्ञान घेण्याची धडपड होती ती! फिलॉसॉफरने लिहिले,

“अनॅक्सागोरसचा विचार क्रेझी वाटला तरी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की, डीएनएच्या शोधानंतर आपल्याला अनॅक्सागोरसचा विचार तेवढा क्रेझी वाटत नाही. अनॅक्सागोरसला वाटत होते की, या जगातल्या प्रत्येक गोष्टीत बाकीचे सगळे विश्व सामावलेले आहे, त्याच धर्तीवर आज आपल्याला कळले आहे की, डीएनएमध्ये सगळा माणूस समावलेला असतो. मितालीच्या त्वचेच्या एका पेशीमधल्या डीएनएपासून संपूर्ण मिताली तयार करता येते. मितालीच्या एका पेशीत संपूर्ण मिताली सामावलेली असते. मितालीचा ब्लू-प्रिंट तिच्या प्रत्येक पेशीत असतो. मितालीचे ‘सीड’ तिच्या कुठल्याही पेशीतील डीएनएमध्ये लपलेले असते असे म्हणता येईल. असा सगळा विचार केला, तर निसर्ग कसे काम करत असेल याचा थोडासा अंदाज अनॅक्सागोरसला आला होता, असे म्हणावे लागेल.

पण, तसं बघायला गेलं तर अनॅक्सागोरस आज त्याच्या ‘एव्हरीथिंग इज इन एव्हरीथिंग’ या विचारासाठी ओळखला जात नाही. त्याला आज तत्त्वज्ञानाच्या इतिहासात मान आहे, तो त्याच्या ‘वैश्विक मनाच्या’ संकल्पनेसाठी. या जगातील जड वस्तूंपेक्षा मन हा प्रकार वेगळा असतो, हे संगणारा पाश्चत्य जगातील अनॅक्सागोरसला हा पहिला फिलॉसॉफर.

आपण पाहिले आहे की, एम्पिडोक्लिस ‘लव्ह’ आणि ‘स्ट्राइफ’बद्दल बोलला आहे. पण त्याचे हे प्रेम आणि हा संघर्ष या जगातील पदार्थांना इतर पदार्थांबद्दल वाटतो आहे. एम्पिडोक्लिसचे प्रेम आणि त्याचा संघर्ष या कुठल्या मनात उमटणाऱ्या भावना नाहीत.

या विश्वाची संकल्पना मांडताना अनॅक्सागोरस त्याची मनाची संकल्पना मांडतो. सुरुवातीला हे जग म्हणजे या जगातील सगळ्या सीड्सचे एक मिक्स्चर होते. सगळे सगळ्यात मिसळलेले होते. वैश्विक मन या सगळ्यात स्तब्ध मिक्स्चरमध्ये हालचाल निर्माण करते. त्यात हालचालीला प्रेरणा देते. त्यामुळे त्या मिक्स्चरमध्ये वर्तुळाकृती हालचाली तयार होतात. भोवरे तयार होतात. या वर्तुळाकृती चलनामुळे एकात एक मिसळलेली सीडस् एकमेकांपासून वेगळी होतात आणि या विश्वातील विविध गोष्टी विविध रूपात साकारू लागतात.

आपल्या या वैश्विक मनासाठी अनॅक्सागोरस ‘नूज’ हा ग्रीक शब्द वापरतो. तो म्हणतो की, माणसाचे मन हे या वैश्विक मनाचेच प्रतिबिंब असते. इतर सगळ्या सीड्सपेक्षा हे वैश्विक मन फार ‘स्पेशल’ असते. ‘एव्हरीथिंग इज इन एव्हरीथिंग’ हा नियम नूजला लागू होत नाही.

अनॅक्सागोरस लिहितो - “In everything there is a share of everything except nous, but there are some things in which nous, too, is present.”

या जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये या जगातील इतर सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतात, पण मन या प्रत्येक गोष्टीमध्ये नसते. अर्थात, या जगातल्या काही गोष्टींमध्ये मन सामावलेले असते ही गोष्ट वेगळी.

तो पुढे लिहितो – “The other things have a share of everything, but nous is unlimited and self-ruling and has been mixed with no thing, but is alone itself by itself. For if it were not by itself, but had been mixed with anything else…it would control none of the things in the way that it in fact does, being alone by itself. For it is the finest of all things and the purest, and indeed it maintains all discernment about everything and has the greatest strength.”

बाकी सगळ्या गोष्टीत इतर सगळ्या गोष्टी असतात पण, मन हे अमर्याद असते. स्वतःच स्वतःमध्ये सिद्ध असते. कारण, ते जर स्वयंसिद्ध नसेल, इतर गोष्टींमध्ये मिसळलेले असेल तर ते ज्या प्रमाणे इतर सगळ्या गोष्टींना नियंत्रित करते तसे ते करू शकणार नाही. ते सर्व गोष्टींमध्ये सर्वोत्तम असते, शुद्ध असते, ते सर्व गोष्टींबद्दल सारासार विचार करू शकते आणि ते या जगात सर्वात सामर्थ्यवान असते.

हे वैश्विक मन म्हणा, नूज म्हणा, या विश्वामध्ये अनेक भूमिका वठवते. हे जग आपण पाहतो आहे, त्या अवस्थेत अवतीर्ण होण्याचे ते पहिले कारण असते. कारण ते या जगातील पहिले वर्तुळाकार चलन तयार करते. त्यानंतर ते वैश्विक मन त्या चलनावर नियंत्रण ठेवते. हे जे मुख्य वर्तुळाकार चलन असते त्याच्या आत असंख्य वर्तुळाकार चलने या विश्वात सुरू असतात. त्या सर्व छोट्या छोट्या चलनांवरसुद्धा वैश्विक मन नियंत्रण ठेवते. ते वैश्विक मन हे विश्व सुनियंत्रित ठेवते. ते या विश्वातील सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणते.

आपण जसे आपल्या विचारांद्वारे आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतो, त्याप्रमाणेच हे वैश्विक मन विश्वावर नियंत्रण ठेवते. वैश्विक मन हे सगळे कसे करते, याविषयी काही विवरण अनॅक्सागोरसने केलेले नाही. पण एक गोष्ट निश्चित की वैश्विक मनाची संकल्पना ही तत्त्वज्ञानातील फार मोठी झेप होती.”

मिताली विचार करत राहिली. मितालीच्या डोळ्यासमोर नेटवर पाहिलेल्या असंख्य वर्तुळाकार आकाशगंगांची चित्रे आली. हे सर्व ब्रह्मांड स्वतःसुद्धा, वर्तुळाकार भ्रमणात आहे, हेसुद्धा तिने वाचले होते.

कुठून सुचले असेल अनॅक्सागोरसला वर्तुळाकार चलनाचे तत्त्व? त्याने वादळे निश्चित पाहिली असतील, पाण्यातले भोवरे पाहिले असतील, सूर्य, पृथ्वी, चंद्र, ग्रह आणि तारे गोलाकार भ्रमण करतात हे त्याने पाहिले असेल. त्यातून हा सगळा विचार आला असे.

त्याच्या वैश्विक मनाचा विचार करताना तिला सर्व सामर्थ्यवान परमेश्वराच्या संकल्पनेची आठवण झाली. वैश्विक मन परमेश्वरापेक्षा वेगळे कसे म्हणता येईल? वैश्विक मन जसे या जगाचे पहिले कारण आहे, तसेच परमेश्वरसुद्धा या जगाचे पहिले कारण आहे. तसे तिने फिलॉसॉफरला लिहिले. त्याने लिहिले की,

“परमेश्वराला या विश्वाचा निर्माता मानले जाते. अनॅक्सागोरसचे वैश्विक मन विश्व निर्माण नाही करत. आधी अस्तित्वात असलेल्या विश्वातील पाहिल्या चलनाचे ते कारण आहे. या विश्वाचा पुढचा मेन्टेनन्ससुद्धा ते बघते.

फिलॉसॉफीच्या पुढच्या प्रवासात अनॅक्सागोरसच्या या वैश्विक मनाच्या संकल्पनेला खूप महत्त्व येणार होते. पुढे सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल पासून मानवी जीवन कसे आहे? मानवी मन कसे आहे? चांगले जीवन जगणे म्हणजे काय? नीतीने जगणे आवश्यक आहे काय? नीतीने जगणे मानवाच्या हिताचे आहे काय? अशा सगळ्या प्रश्नांना खूप महत्त्व आले. हा सगळा विचार करताना वैश्विक मनाची संकल्पना खूप उपयुक्त ठरणार होती.

वैश्विक मनासारखी एखादी गोष्ट या विश्वाला ‘गाईड’ करण्यासाठी अस्तित्वात असेल, तर या वैश्विक मनाला काय मान्य आणि काय अमान्य आहे, याचा विचार करून मानवी जीवन कसे जगावे, याबद्दल अनेक निष्कर्ष काढता येण्यासारखे होते. न्याय आणि नीती या सारख्या गोष्टींवर विचार करायला एक संदर्भ मिळणार होता. या जगाला, या मानवी जीवनाला काही निश्चित उद्देश आहे का, का हे सारे जीवन अर्थहीन आहे, हा प्रश्न वैश्विक मन आहे, असे मानले तर सोपा होतो. वैश्विक मनाचा संदर्भ नसेल तर मानवी जीवन ही फार गोंधळाची गोष्ट ठरते. बलवान व्यक्ती जे करेल तो न्याय, ताकदवान माणूस जी ठरवेल ती नीती, अशी सगळी अवस्था होऊन जाते.

परंतु, अनॅक्सागोरसचे वैश्विक मन या विश्वातील वर्तुळाकार चलने सुरू करून पुढे काहीच करताना दिसत नाही. या जगाला एक किल्ली देऊन ते गप्प बसलेले दिसते. सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल हे तिघेही पुढच्या काळात अनॅक्सागोरसच्या या वैश्विक मनाच्या संकल्पनेमुळे अतिशय एक्साइट झाले आणि या मनाची संकल्पना अनॅक्सागोरसने पुढे नेली नाही, यामुळे निराशही झाले. पण, सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल या तिघांनी मात्र आपापल्या पद्धतीने या विषयीचा विचार पुढे नेला. आतापर्यंत फिलॉसॉफी जास्त करून या जगाच्या नैसर्गिक बांधणीबद्दल बोलत होती. ती आता यापुढे मानवी जीवनाविषयी बोलणार होती. आणि, त्यासाठी अनॅक्सागोरसच्या वैश्विक मनाची संकल्पना उपयुक्त ठरणार होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

तर असा हा अनॅक्सागोरस. त्याचा अजून एक विशेष म्हणजे तो स्वतःला या संपूर्ण विश्वाचा नागरिक समजत असे. त्या काळी फिलॉसॉफर्स आपल्या नावापुढे आपल्या गावाचे नाव अभिमानाने लावत असत. उदाहरणार्थ, हेराक्लिटस ऑफ एफिसस, एम्पिडोक्लिस ऑफ एटना वगैरे. अनॅक्सागोरस असे गावाचे नाव लिहीत नसे. त्यावरून, तुला तुझ्या जन्मभूमीविषयी काही वाटत नाही का? असे विचारले गेले, तेव्हा त्याने आकाशाकडे बोट दाखवले आणि म्हणाला, ‘माझी जन्मभूमी ती आहे, आणि मला तिचा अभिमान आहे’.

अनॅक्सागोरसला राजकारणात फार रस होता. पेरिक्लिस हे त्या काळच्या अथेन्समधील राजकारणातील मोठे नाव. या पेरिक्लिसचा तो मित्र आणि सल्लागार होता. पुढे पेरीक्लिसचे दिवस फिरल्यानंतर अनॅक्सागोरसचेही दिवस फिरले. त्यात त्याची सूर्य हा केवळ धातूचा गोळा आहे, आकाशतील ग्रह-तारे वगैरे दगडा-मातीचेच बनलेले आहेत ही मते. त्याच्यावर धर्मद्रोहाचा खटला झाला. प्राणच जायचे, परंतु पेरिक्लिसच्या मध्यस्तीमुळे देशांतर करावे लागण्यावर प्रकरण मिटले. अनॅक्सागोरस अथेन्स सोडून लॅम्पसॅकस या गावी गेला. लॅम्पसॅकसमध्ये तो आपल्या आयुष्याची शेवटची दहा वर्षे होता. येथे मात्र त्याचा एक फिलॉसॉफर म्हणून मोठा आदर केला गेला. इसपू ४२८मध्ये अनॅक्सागोरस मृत्यू पावला. लॅम्पसॅकसवासीय त्याच्या मृत्यूनंतरही त्याला विसरले नाहीत.”

मितालीने नोट खाली ठेवली. अनॅक्सागोरसचे विचार तिच्या डोक्यातून खूप वेळ हटले नाहीत. तिला एक आनंद झाला होता. आता फिलॉसॉफी लवकरच मानव केंद्रित होणार होती. मानवी जीवन, मन, भावना, न्याय, नीती, राजकारण, धर्मकारण वगैरे चर्चांनी बहरून जाणार होती. याचसाठी तर तिने फिलॉसॉफीमध्ये रस घेतला होता.

..................................................................................................................................................................

या सदरात आतापर्यंत प्रकाशित झालेले लेख -

खूप वाचून ‘फिलॉसॉफी’ शिकता येत नाही. त्यापेक्षा थोडी फिलॉसॉफी मनापासून वाचावी आणि त्यातून ‘फिलॉसॉफिकली’ विचार करायला शिकावे...

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

फिलॉसॉफीमध्ये सखोल ‘इन्साइट’ तर आहेतच, पण जीवनातून अर्थ काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे! ती आपल्याला जीवनाच्या जवळ नेते!!

Philo म्हणजे प्रेम आणि Sophos म्हणजे श्रूडनेस. शहाणपणाविषयीचे प्रेम म्हणजे फिलॉसॉफी!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......