‘धांडोळा’ हा प्रदीप कर्णिक यांचा नवा लेखसंग्रह नुकताच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकात अरुण टिकेकर, निखिल वागळे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, पु.ल. देशपांडे, भाऊ पाध्ये, चंद्रकांत काकोडकर, मधु मंगेश कर्णिक, म. वा. धोंड, अ. का. प्रियोळकर, दादोबा पांडुरंग, साने गुरुजी, कुष्णाबाई मोटे, ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील इत्यादी विषयींच्या १८ लेखांचा समावेश आहे. त्यातील हा ज्येष्ठ पत्रकार-संपादक निखिल वागळे यांच्याविषयीचा लेख… (नुकतंच म्हणजे ९ मे २०२२ रोजी सातारा इथं वागळे यांना ‘फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कारा’नं गौरवण्यात आलं.)
..................................................................................................................................................................
लेखक, विचारवंत, साहित्यिक इत्यादी प्रसिद्ध व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करण्याची परंपरा मराठीत खूपच आहे. गेला बाजार संपादकांचाही अभ्यास झाला आहे. राजकीय नेतृत्व किंवा सामाजिक कार्य ग्रंथकार, साहित्यिक, भाष्यकार इत्यादींच्या बिरुदांमुळे खरे तर अधिक अभ्यास ‘संपादक’ या वर्गाचा आपल्याकडे झाला आहे. चित्रकार, व्यंगचित्रकार, अभिनेता गायक अशा कलावंतांचेही अभ्यास झालेले सापडतात. पण ‘पत्रकारा’चा अथवा त्याच्या कार्याचा अभ्यास अजून कोणी फारसा मनावर घेतलेला नाही. त्यातही ज्या पत्रकाराने पत्रकारितेच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांत काहीएक कर्तबगारी नोंदवलेली नाही, त्या पत्रकाराच्या पत्रकारितेचा अभ्यास आम्ही केव्हा करणार? कोण करणार? का करणार? व कशासाठी करणार? असे प्रश्न विचारावेत हेच खरे तर योग्य नाही. कारण इतके गुणी पत्रकार समोर येतात की, त्यांचे पत्रकारितेतील कौशल्य, बातम्या काढण्याची पद्धत, मांडणीची शैली, पाठपुरावा करण्याची वृत्ती, त्यांचा निर्भीडपणा, रोखठोक शैली, बातम्यांच्या विषयाचा त्यांनी केलेला अभ्यास, या सर्वच बाबी विस्ताराने लक्षात घेण्याची आवश्यकता इतर लेखक-विचारवंतांना का वाटू नये? पत्रकारांच्या कार्याचा पारितोषिके देऊनबिऊन आम्ही जरूर त्यांचा गौरव करतो, पण त्यापलीकडे काय?
निखिल वागळेंचा विचार करताना मला नेहमीच अनके पत्रकारांचे चेहरे आठवतात. त्यांचे कार्यही आठवते आणि वर उपस्थित केलेले मुद्दे प्रकर्षाने आठवतात. खरं तर, समकालीनांचीच ही जबाबदारी असते. त्यांनीच अशा अभ्यासाला हात घालायला हवा. वर्तमानपत्रे/साप्ताहिके पुढच्या पिढीपर्यंत टिकतील वा टिकवली जातील याचा भरवसा नाही. पत्रकारांच्या लेखनाचे छापील कागद नष्ट व्हायच्या आत त्यांच्याबरोबर वावरणाऱ्या लेखक-विचारवंतांनी हे काम करायला हवे. त्यातही आता छापील माध्यमातून आपण वेगाने ई-माध्यमात वाहत जात आहोत. संरक्षणाची साधने आज उत्तम जरी असली तरीही वेगाने, गतीने आणि नवनव्या ज्ञान/माहितीचे पुरावे, आपण क्षणाक्षणाला मरून पुन्हा अवतरतो आहोत. जुने पुसून रोज नव्याने निर्माण करतो आहोत. या वेगात जुन्याचे काय होते आहे, होणार आहे, याचा विचार करायला आपल्याला सवडच नाही आणि सवय तर नाहीच नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
निखिलला जेव्हा मी दूरदर्शनवर रोज पाहतो, तेव्हा मला हा विचार अस्वस्थ करतो. पत्रकाराच्या शब्दांचे चिरंतनत्व सोडा, पण साध्या अभ्यासाचे तरी साधन काय? उद्याच्या इतिहासात आम्ही काय ठेवणार आहोत? उद्याची पिढी काय वाचेल/पाहील? निखिल कसा समजून घेईल? निखिल अभ्यास कसा करेल? मग आठवते ते ‘दिनांक साप्ताहिक’, ‘माणूस’मधली त्याची मालिका, ‘अक्षर’ दिवाळी अंकाचा धडाका, ‘महानगर’चा अनोखा प्रयोग, शनिवारची पुरवणी, ‘षट्कार’चा रंगात आलेला अंक, संदीप पाटील यांच्या गॅरेजमध्ये प्रारंभीच्या पत्रकारितेचा मांडलेला संसार, मग तेथून पांडुरंग निवासात जाऊन (दादर) सिटी लाईम लाईटमध्ये आणण्याचे गाजवलेले कर्तृत्व इतके की, एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला असणारे दादर आणि त्यात असणारी सत्ता प्रथम निखिलने पोखरून काढली. धडका दिल्या. मार खाल्ला, पेपर जाळला गेला, विकूही दिला जात नव्हता, कचेरी तोडली-फोडली-मोडली, त्याला आणि त्याच्या पत्रकारांना मारझोड झाली, पण निखिल डगमगला नाही. त्याच्यासाठी दिल्लीतून पत्रकार आले, मोर्चे निघाले. नॅशनल पेपरने त्यांच्या पहिल्या पानावर त्याची दखल घेतली. निखिल स्वत:सह आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एका छोट्या सांज दैनिकाबरोबर हिरो झाला आणि आजही तो हिरोच आहे.
उद्याच्या अभ्यासकांना हे ‘छापील युग’ सापडणार आहे. वाचताही येणार आहे. हा इतिहास आठवला की, मी थोडा शांत होतो. मग मी अधिक शांततेने विचार करू लागतो. निखिलने नंतर हिंदी दैनिक सुरू केले. ही चूक होती का? त्याने मराठीचे प्रयोगच करायला हवे होते. ‘शनिवार-रविवार’ पुरवणी, घणाघाती अग्रलेख, सल्लागार असणारे विजय तेंडुलकर आणि ‘रमणा’चा विषय आल्यानंतर त्यांच्यावर तोफ डागणारा बेधडक निखिल. ‘बिझी बी’च्या धर्तीवरचा मराठीत रूढ केलेला ‘वडा-पाव’ आणि इतर सदरे, मेधा पाटकर आणि सर्वच सामाजिक-सांस्कृतिक-वाङ्मयीन चळवळींना दिलेले स्थान, व्यासपीठ, ही निखिलची केवढी मोठी जमेची बाजू आहे.
‘व्यासपीठ’ देणारी आणि त्याचा अभिमानही बाळगणारी वर्तमानपत्रे आणि त्यांचे संपादक कमी नाहीत. पण निखिल त्यांच्यातला नाही. निखिल त्यांच्याहून दशांगुळे अधिक उरतोच. त्याची चळवळीबद्दलची समज, त्याची आस्था, पोटातून लेखणीत उतरलेली चीड, संताप, राग, त्वेष आणि त्यातून आलेली शैलीदार आक्रमकता ही जास्त तजेलदार, चमकदार आणि आपलेपणाच्या जिव्हाळ्यात बुडवून काढलेली असते. निखिलने आपल्या लेखणीचा आधार दिलेली चळवळ मग त्याचमुळे सर्वतोमुखी होते. लोक त्याबद्दल विचार करायला लागतात. आपले आपणाला तपासायला, जोखायलाही लागतात. निखिलच्या लेखणीपूर्व असणारी चळवळ आणि लेखणी लाभलेली चळवळ असा अभ्यास व्हायला हवा का, असा मी विचार करत असे. पण कोण करणार असा अभ्यास?
निखिल तेव्हा फक्त लिहीत नव्हता. तो बोलतही होता. नुसता बोलत होता का? नाही, त्याच्या शब्दाला बुलंद ताकदीची शक्ती लाभत असे. ही ‘निखिल नावाच्या शब्दांची आग’ जेव्हा व्यासपीठावरून बाहेर पडे, तेव्हा सर्वच अस्वस्थ होत असत. ज्यांच्याविरुद्ध हा आगडोंब असे ते त्याला मारायला धावत, कार्यक्रम बंद पाडत, बोलू देत नसत... पण काय होत असे? शेवटी तो आगीशी खेळ होता ना? भाजूनच घेणार ते आपला हात. मग हात चोळत बसण्याखेरीज त्याच्यापाशी इलाज नसे. निखिल तरीही बोलायचाच. बोलू दिले नाही यावरही बोलायचा. सगळ्यांची बोलती बंद करण्याची कला निखिलकडे होती/आहे.
निखिल सरळसरळ समाजवादी होता व आहेही. डावा आहे, हे तर उघडच आहे. त्यामुळे तो अनेकांना मित्र वाटतो. पण त्याहीपेक्षा जास्त याच शिक्क्यामुळे तो अनेकांना शत्रू वाटतो. उजव्यांची ही ढोंगबाजी लपून राहिली नसली तरीही निखिल त्याच्या या बिरुदापेक्षाही सर्वस्वी निराळाच असतो. तो दलित-शोषित-कष्टकऱ्यांचा कैवारी अधिक असतो. तो धर्मांध शक्तीचा विरोधक ठरतो. तो परंपरावाद्यांचा शत्रू नि पुरोगाम्यांचा मित्र बनतो. तो अंधश्रद्धेचा टीकाकार होतो नि जुलूम, अत्याचार, भ्रष्टाचारावर हातोडा मारणारा बळकट भाष्यकार होतो. तो स्त्रियांचा कैवारी, गरिबांचा साध्वी, अन्यायग्रस्तांचा सारथी होतो आणि आपल्या लेखणीतले ठेवणीतले ‘वाग्बाण’ असे काही सोडतो की, भली भली अस्त्रे गळून पडावीत. युद्ध तर तो जिंकणारच असतो. जिंकतोही, काही वेळा लौकिकार्थाने हरूनही. पण त्याच वेळी त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे हेरूनच ठेवलेले असते की, अंतिम मुसंडी निखिलच मारणार आहे. मग बंद पडायला आलेले ‘महानगर‘ असो व बंदी घातलेले एखादे चॅनल असो.
पत्रकार-संपादक निखिल वागळे यांना ९ मे २०२२ रोजी साताऱ्यात ‘फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार’ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
.................................................................................................................................................................
निखिलने अक्षर पुस्तक प्रकाशनसंस्था काढली. पुस्तके प्रकाशित करणे ही त्याची गरज होती का? त्याच्या संस्थेची असेल कदाचित पण त्याची, त्याची स्वत:ची गरज होती का? तर ती अजिबात नसावी असेच मला वाटते. ग्रंथप्रकाशक निखिल नाही रुचत, पटत. तो पत्रकारच हवा. संपादकच हवा. वक्ता हवा. पण प्रकाशक नको का? ते रूपडे मूलत:च मिळमिळीत, गुळगुळीत, साधक-बाधक रूपाचे. दीर्घकालीन जन्माचे. छे, विचार जन्मायला इतका वेळ? तो मांडायला इतका काळ? तो पसरायला इतकी मंदगती? गळी उतरायला इतकी शुष्कता? छे, छे निखिल नकोच होता कुणाला अशा रूपात, स्वरूपात. अगदी मीना कर्णिकलाही कदाचित. मग तो सारा भार तिनेच माथी मारून घेतला. आता तर म्हणे तिनेही तो भार डोक्यावरून उतरवला आहे. बरे झाले.
सगळ्या मराठी माणसांचे किंबहुना मराठी नियतकालिक/वर्तमानपत्रवाल्यांचे होते तेच ‘महानगर’च्याही नशिबी आले. पैशाचा तुटवडा, चणचण, मग त्यामागची वणवण, कागदाचे बिल, प्रेसची देणी, तगादे, सेल्स टॅक्स, अमका टॅक्स, लेखक मानधनाच्या मनधरण्या, एक ना अनेक. पण निखिल याही पातळीवर लढत होता. त्याचे मित्र, साथीदर त्याला म्हणत होते, आम्हीही येतो तुझ्या या लढाईत. काही आलेही. कार्यक्रम झाले, आवाहने झाली. काहींनी सढळ व लगेच मदतही केली, पण वर्तमानपत्र म्हणजे बकासुराचे खाणे-पिणे, कोणाला परवडणार? रोजच्या रोज गाडाभर अन्न पुरवणार कोण? मुळात रांधणार कोण? काही काळ जरा बरा गेलाही असेल. पण मुसंडी मारण्याची सवय असणाऱ्याला ‘स्लो मोशन’चा शॉट काय रुचणार? मग म्हणे त्याने हळूहळू हा संसार गुंडाळला. विकलासुद्धा नि त्यातून मुक्त होऊन नवा अवतार धारण केला.
निखिल दूरदर्शनच्या वाहिनीवर दिसायला लागला. सुटाबुटात. मुळात गोरागोमटा, नाकीडोळी उत्तम असणारा निखिल वाहिनीवर रोज येऊ लागला. पण वेगळ्या रूपात. इतर जण जातात त्या वाटेने निखिल जाईल का? शक्यच नाही. त्याला ‘ट्रेण्ड सेटर’ म्हणतात ते का उगाच? वर्तमानपत्राचा बाज बदलणारा निखिल, दिवाळी अंकांची घडी मोडणारा निखिल, रविवारच्या पुरवण्यांची मक्तेदारी मोडून-खोडूनही काढणारा निखिल, नवनव्या लेखक-पत्रकारांना घडवणारा निखिल, नवनवे विषय घारीच्या नजरेने टिपणारा निखिल, इतरांना दिसणारही नाहीत अशा जागा, स्थानं, माणसं व त्यांचे प्रश्न हुडकून काढून पाठपुरावा करणारा निखिल, खोट्या माणसांच्या मागे लागणारा निखिल, कोणावरही झडप घालण्याच्या पावित्र्यात असणारा नि न डगमगणारा निखिल, ‘ट्रेण्ड सेटर’ची विविध रूपं घेणारा निखिल... नव्या माध्यमात काय टिकणार? असा मिश्कील, छद्मी प्रश्न करून त्याच्या कोसळत्या रूपाची अधीरतेने वाट पाहणारे, त्याच्या त्या रूपातल्याही शैलीकडे थक्क होऊन पाहतच राहिले. मग भान वगैरे आल्यावर त्याच्या शैलीच्या मागे फरफटत गेले. त्यांना जावेच लागले. एके काळी ‘महानगर’च्या मागे सर्वाधिक खप वाल्यांपासून ‘मित्र’ शत्रू, अनेकानेक गेले होते, तसेच.
हे का झाले होते? आताही का होत आहे? त्याचे आग ओकणारे शब्द? त्याची आक्रमकता? त्याचे विचार? की काय? निखिल शब्दभ्रम वाटतो कोणाला, तर त्याची आक्रमकता त्याला यश देणारी वाटते, तर कोणाला त्याचा निडरपणा यशाच्या मागे आहे असे वाटते. निखिलकडे हे तर सर्व आहेच. हिंमत आहे, करामत आहे, कसब आहे, करण्याची धडाडी आहे, विश्वास-आत्मविश्वास आहे, सारे सारे आहेच, पण त्याहीपेक्षा आणखी एक बाब आहे, ती म्हणजे ‘महान कल्पकता’.
निखिल विलक्षण कल्पक आहे. त्याला काय सुचेल त्याचा नेम नाही. त्याला जे सुचते, ते तो इतक्या प्रभावीपणे मांडतो आणि ते गाजते. गाजतच राहते.
वाहिन्यांवरची चर्चा ही चर्चेत आणण्याची ‘प्रज्ञा’ कोणाची? प्रज्ञावंत निखिलची. चर्चेचा विचार करत ठेवण्याचे कसब कोणाचे? किमयागार निखिलचं चर्चेत गुंतुन ठेवणारा असतो तो निखिल, चर्चेला कलाटणी देऊन वेगळ्याच उंचीवर नेणारा असतो निखिलच. मागे लागून लागून चर्चेतूनही ‘बातमी’ काढणारा पत्रकार असतो निखिलच. बोलू देणारा, न बोलू देणाराही असतो निखिलच. स्वत:ची छाप, स्वत:चा दरारा, स्वत:ची हुकूमत प्रस्थापित करणारा चर्चेतला खरा ‘नायक’ असतो निखिल. तो लक्षात राहतोच, पण लक्षात ठेवायला लावतो तो त्याचा त्या दिवशीचा विषय, त्या चर्चेचा प्रश्न आणि त्या प्रश्नामागची त्याची भूमिका, तळमळ, कळवळ. ती खरी ‘त्याचीच’ असते. तीच त्याची शिदोरी असते. तीच त्याच्या आत्तापर्यंतची कमाईही असते. मग तो दाभोलकर-पानसरेंचा खून असो, किंवा निर्भया केस असो, खैरलांजीचा प्रश्न असो, दलितांवरचा अत्याचार, आंबेडकर भवनाची मोडतोड असो, मराठा आरक्षण असो की, रोहित वेमुलाची केस असो, पुस्तकावरची, सिनेमावरची बंदी असो की लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न, राजकीय पक्षांची अरेरावी, दादागिरी असो किंवा लोकशाहीचा गळा घोटणारी कृती... निखिल चर्चा अशी दणाणून सोडतो की, सर्वांचे लक्ष त्याच्याकडे लागायलाच हवे. मग भले त्याच्यावर हक्कभंगाची कारवाई का होईना. तो ती शिक्षा भोगतो, पण जामीन देत नाही.
कोर्टाच्या लढायाही तो लढतो. लढणे त्याच्या रक्तातच असते म्हणून विचार-कृतीत उतरते. इतर चर्चेत शब्द असतात. जीव नसतो. उच्चार असतो, पण आश्वासकता नसते. सभ्यता, असेल इतरांच्या चर्चेत, पण याच्या चर्चेला दाहकता असते. गोंडस असतील इतरांच्या चर्चेतील विचार, पण निखिलच्या चर्चेत विचार करायला लावणारी ताकद असते. निखिल चर्चेतून कृती करायला भाग पाडतो का? त्याची चर्चा कृतिप्रवण होते का? की नुसताच तो वैचारिक संभोग ठरतो? रोजचा रोज केलेला ठरावीक वेळेचा? कृती करण्याची उबळ येते ते काही करतात, ते कोण असतात? कार्यकर्ते, राजकारणी, समाजसेवक, पोलीस, सरकारी कर्मचारी. तो त्यांच्या प्रत्यक्ष कृती करायच्या संवेदनशीलतेलाच हात घालतो. नि त्याचे काम होते. हेच त्याचे फलित. हल्ली तो एकाच विषयाचे एकामागोमाग पाच-दहा चर्चांचे रोज कार्यक्रम घेतो. ते का? सलगता सांधण्याचा इतका प्रभावी प्रकार इतरांनी केला नाही? रोज दोन प्रश्न हे त्याचे फॅड नाही. ती त्याची त्याच्या विचारात न मावणारी कृती असते. वांझोट्या चर्चेला त्याने प्रसववेदनेच्या कळा बहाल केल्यात. विझणाऱ्या मनाला त्याच्या चर्चेने जिवंत केले आहे. घाबरणार्या जिवाला आधार, विचार हरवून बसलेल्या समाजाला झटका, प्रतिगाम्यांना दणका, लोकशाही पायदळी तुडवणाऱ्यांचा सामना करायची शक्ती देणारी त्याची चर्चा म्हणून लोकप्रिय ठरते. दमूनभागून, प्रवासात चिपाड होऊन घरी येणारा विचारी माणूस अकरा-साडेअकरापर्यंत कानात जीव ओतून चर्चा ऐकतो. प्रथम दमल्यामुळे आलेली झोप उडवणारा प्रेक्षक... नंतर त्याची झोपच उडते. निखिलच्या चर्चेची ही ताकद आहे. दुसऱ्या दिवशी त्या चर्चेची ‘चर्चा’ होणारी ही चर्चा म्हणूनच मराठीत तरी एकमेव!
निखिल ज्या चॅनेलवरून दिसत होता, तेथून त्याला जायला लागले, पण तो पुन्हा एका चॅनेलवर उगवलाच. तिथून पुन्हा एका हक्काच्या चॅनेलवर तो आला. घालवणारे थकती, पण निखिल थकणार नाही. त्याचा ‘आवाज’ दाबून टाकणारे दमतील, आणि म्हणूनही कदाचित ते त्याला धमकावतील, पण तो घाबरणार नाही. धमकावणारे थकतील नि मग त्याचा दाभोलकर-पानसरे करतील नि भ्याडासारखे लपतील, पण त्याची निखिलला पर्वा नाही. निखिल आग ओकतच राहील.
निखिल रोज भेटतो, पण शनिवारची त्याची भेट ‘ग्रेट’च ठरते. विषय बदलला की, चर्चेचा आवाज बदलतो, चर्चेची माणसं बदलली की वातावरणाला मुलायमता येते. कधी कधी ती ‘आजचा सवाल’ करतानाही येते, पण शनिवारच्या भेटीतली त्याची प्रतिमा मोहक ठरते. मग ते विनय सहस्त्रबुद्धे असोत की बाळासाहेब असोत. निखिल ‘ग्रेट’ वाटतो. कदाचित त्यांनाही. कोणाला हा निखिल आवडतो. ‘सवाल’मध्ये त्याचे हे रूप का दिसत नाही. अशा शंकेने प्रेक्षक स्वत:लाच ‘सवाल’ करतो नि पुन्हा सोमवारी निखिलच्या मूळ रूपात अडकतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
................................................................................................................................................................
निखिल अथक परिश्रम घेतो. निवडणुकांचे निकाल, त्याचे विश्लेषण आपल्याला त्याची साक्ष देतात. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या प्रक्षेपणात त्याची साक्ष पटते. एकामागोमाग एका कार्यक्रमांच्या धडाक्यात ते दिसून येते.
इतक्या गुणसंपन्न निखिलला दुसरी बाजू नाही का? त्याला कोणी विरोधक नाहीतच का? तो कधी चुकतच नाही का? तो नेहमीच बरोबर असतो का? असे तर नक्कीच नसणार. माणूस म्हटला की, विकार हे आलेच. भडका, त्रागा आलाच. एका संस्थेचा प्रमुख म्हटल्यावर खटके उडणे, वादविवाद होणे, पटणे न पटणे आलेच. अडचणींतून मार्ग काढत प्रवास करणारा म्हटले की पैशाची अडचण, देणे-घेणे, कमी-अधिकपणाही आलाच, मालक म्हटले की नोकरांचे रुसवे-फुगवेही येणारच, साहेब म्हटले की, ओरडा आलाच. असे बरेच काही असणारच. त्याची जाण मला नाही. मी त्याचा अभ्यासकही नाही. म्हणूनच त्याचा त्याच्या पत्रकारितेचा अभ्यास व्हायला हवा. साधनं आहेत, अभ्यासक हवा.
मग मी कोण? मी त्याचा कोण? त्याचे तमाम प्रेक्षक त्याचे कोण? त्याचे-माझे-आमचे नाते काय?
मी त्याचा मित्र तर आहेच, पण तरीही त्याचे नि माझे त्याहीपेक्षा काही वेगळे नाते आहे. किंवा त्याचे नि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यां प्रेक्षकांचेही तेच नाते आहे ते कोणते?
निखिल माझा नि कदाचित आमच्या सर्वांचा ‘आतला’ आवाज आहे. मला वाटते, ते तो बोलतो. मी विचार करतो किंवा करावा असे मला वाटते, ते तो विचार करून सांगतो. मला जे घडावे असे वाटते, ते तो चर्चेतून सांगू पाहतो. मला भांडावे, वाद घालावा, अगदी सळो की पळो करून सोडावे, आक्रमक व्हावे, आवाज लावावा इत्यादी इत्यादी वाटत असते. पण मी जे करत नाही, ते निखिल करू शकतो. माझ्या किंवा कदाचित आमच्या सर्वांच्या बोटचेपेपणाच्या वृत्तीचा ‘आतला’ उद्रेक म्हणजे निखिल. ‘आतला’ विखार म्हणजे निखिल. ‘आतली’ खदखद म्हणजे निखिल.
माझ्या ‘आतली’ म्हणजे माझी सद्सद्विवेकबुद्धी, जी वांझोट्या चर्चा नि अग्रलेखात शूरत्व शोधते. ती शक्ती म्हणजे निखिल.
निखिल ‘आतला’ आवाज. केवळ त्याच्यामुळेच माझा किंवा आमचा, ‘आतला’ आवाज शाबूत आहे. हे श्रेय केवळ नि केवळ निखिललाच आहे.
‘धांडोळा’ - प्रदीप कर्णिक
अक्षर प्रकाशन, मुंबई | मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment