टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मुकेश अंबानी, सीआयए, नीतिन गडकरी, कार्ती चिदंबरम आणि मुंबई महानगरपालिका
  • Wed , 08 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या मुकेश अंबानी Mukesh Ambani मुंबई महानगरपालिका Mumbai Mahanagar Palika कार्ती चिदंबरम Karti Chidambaram नीतिन गडकरी Nitin Gadkari सीआयए CIA

१. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला कसलाही फटका बसलेला नाही, असा केंद्र सरकारचा दावा असला तरी गोरगरिंबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच तिचा फटका बसला आहे. एका अहवालानुसार नोटाबंदीमुळे देशातील अब्जाधीशांची संख्या घटली आहे. हुरन ग्लोबल रिच या आंतरराष्ट्रीय संस्थेने देशातील अब्जाधीशांची यादी तयार केली आहे. नोटाबंदीमुळे संपत्तीत घट झाल्याने आधीच्या यादीतील ११ अब्जाधीशांना यंदा अब्जाधीशांचा यादीत स्थान मिळवता आलेले नाही. मात्र, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे अव्वल स्थान कायम आहे.

अहो, ११ जणांचं काय घेऊन बसलात, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुकेसभाय पहिल्या नंबरवर आहेत ना, मग झालं… सगळी त्यांची दुकानं आहेत… त्यांना धक्का लागला तर ते हे दुकान बंद करून नवीन उघडतील, 'जिओ और जीने दो' असं काही नाहीये त्यांच्याकडे.

……………………………………….……………………………………….

२. अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज हॅक करते, असा खळबळजनक गौप्यस्फोट विकिलीक्सने केला आहे. विकिलीक्सने यासंदर्भातील काही कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. सीआयए एका अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीच्या स्मार्टफोनमधील माहिती चोरत असल्याचे म्हटले आहे. एखाद्याचा स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, संगणक किंवा राऊटर इंटरनेटला जोडलेला असल्यास सीआयए त्यांच्याकडे असलेल्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने यामधील माहिती पाहू शकते.

सीआयएने खरं तर हा उपक्रम भारतात राबवायला पाहिजे. कोणीतरी आपल्या मजकुरावर लक्ष ठेवून आहे म्हटल्यावर अनेक ट्रोलभैरवांचा आचरटपणा आटोक्यात येईल. अर्थात, ‘जे1 झालं का’, छापाच्या विचारणा, ‘गुडमॉर्निंग, गुडनाइट’चे बावळट मेसेज आणि नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील यांच्यापासून आइनस्टाइन, ओबामापर्यंत विविध नामवंतांच्या नावावर खपवलेले सखाराम गटणे छापाचे सुविचार वाचून सीआयएचे अधिकारी वेडे होतील, असा जो धोका आहे, तो पत्करायला हवा.

……………………………………….……………………………………….

३. केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी धडाकेबाज काम करतात. त्यांच्या धाडसी निर्णयक्षमतेने देश दिवसाला २२ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधतो आहे, अशी स्तुतिसुमने उधळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाले, ‘घोषणा मी करतो, पण त्याचे श्रेय गडकरींचे असते.’ गुजरातमधील एका पुलाच्या लोकार्पणाच्या वेळी मोदी म्हणाले, नितीनजी ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळेच हे भव्य दिव्य काम होऊ शकले. मनमोहनसिंग सरकारच्या काळामध्ये दिवसाला फक्त दोन किलोमीटरचे महामार्ग बांधले जायचे. पण गडकरींनी धक्के देऊन ते प्रमाण प्रतिदिन २२ किलोमीटरवर आणले आहे. त्यांची कल्पकता अचाट आहे. कारण ते तुकड्यातुकड्यांमध्ये विचार करीत नाहीत.

क्षणभर नितीन गडकरी स्वत:च थापी घेऊन सिमेंट थापतायत किंवा रोड रोलर चालवतायत (रस्ता चपटा झाल्याशिवाय राहील का), असं चित्र डोळ्यांसमोर आलं ना? यानिमित्ताने मोदी यांना अमित शाह यांच्यापलीकडे फार फार तर दोनचार चेहरे लक्षात आहेत आपल्या पक्षातले, असं जे वाटत होतं, ते खोटं निघालं याचा आनंद आहे. त्यांना आपला प्रतिस्पर्धी ठरू शकेल असा एक अख्खा मंत्री ठाऊक आहे, त्याचं खातंही ठाऊक आहे आणि तोही काही काम करतो, याची कल्पना आहे, हे समजल्याने नितीनभौंनीही हरखून संत्राबर्फीचे दोन तुकडे जास्त टाकले असतील तोंडात.

……………………………………….……………………………………….

४. मुंबईच्या महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा विजय पक्का समजून भाजपपुढे शक्तिप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने ‘मातोश्री’ने तयारी केली आहे. पालिका मुख्यालयात येणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसैनिक आणि युवासैनिकांना पारंपरिक भगव्या वेशात गाड्यांमधून येण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

फार भयंकर भव्यदिव्य विजय मिळवला असता, तरीही असली गावंढळ शक्तिप्रदर्शनं करण्याऐवजी काही कामाच्या गोष्टी करायला हव्या होत्या. इथे तर भाजपने तोंडाला फेस आणून नंतर हा तुकडा फेकला आहे. त्याच भाजपपुढे बेटकुळ्या काढून दाखवायच्या म्हणजे रुग्णात काडीमात्र सुधारणा नसल्याचंच लक्षण. पण, तशी अपेक्षा ठेवणंच व्यर्थ होतं, नाही का?

……………………………………….……………………………………….

५. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी काँग्रेस म्हणजे ‘फॅमिली पॉपर्टी’ (कौटुंबिक मालमत्ता) असल्याचे वक्तव्य केले आहे. फक्त काँग्रेसच नव्हे तर देशातील बहुतांश सर्वच पक्षात घराणेशाहीचे वर्चस्व असल्याचे त्यांनी म्हटले. या घराणेशाहीमुळे नव्या पिढीतील नेत्यांना दरवाजेच बंद झाल्याचे सांगत देशात सध्या नव्या राजकीय पक्षाला मोठा वाव असल्याचेही ते म्हणाले. ‘जनरेशन ६७’ नावाच्या संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कार्ती यांनी आपली भूमिका मांडली. कार्ती हेच या संघटनेचे संस्थापक आहेत.

फारच नमुनेदार बातमी आहे ही. कार्ती यांची स्वत:ची ओळख काय, तर पी. चिदंबरम यांचा मुलगा, ही. तुम्ही घराणेशाहीच्या गप्पा कशा काय मारू शकता? पक्षस्थापनेपासून तुम्हाला कोणी अडवलंय का? फक्त तो पक्षही चिदंबरम यांच्या मुलाचा पक्ष म्हणून ओळखला जाणार, याचं भान ठेवा.

………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......