अजूनकाही
दारू की बॉटल में
साहब पानी डालता हैं
फिर ना कहना मायकल
दारू पिके दंगा करता हैं
हांव गोयेंचो सायबा
लला लला ला
हांव गोयंचो सायबा
लल्ला लल्ला ला
‘मजबूर’ या चित्रपटात प्राण यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे आठवते? सत्तर-ऐंशीच्या दशकांत हे गाणे खूप गाजले होते.
कोकणी भाषेतली वाक्ये घेऊन हिंदी चित्रपटातले हे एक दुसरे महत्त्वाचे गाणे. त्याआधी ‘बॉबी’ या' चित्रपटात ‘ना मांगू सोना चांदी, घे घे घे रे घेरे सायबा, माका नाका गो, माका नाका गो’ हे ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडियावर चित्रित झालेले गाणे खूप गाजले होते.
‘हांव गोयंचो सायबा’ हे गाणे जुन्या पिढीतल्या लोकांना चांगले आठवत असेल. गाणे रेडिओवर आणि रस्त्यावरच्या लग्नाच्या आणि इतर मिरवणुकीत नेहमी ऐकायला मिळते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
असो. तर मुद्द्यावर येतो… तर ‘गोयंचो सायबा’ या संज्ञेवरून गेल्या दिवसांपासून गोयांत म्हणजे गोव्यात रणकंदन माजले आहे, जसे भोंगा आणि ‘हनुमान चालिसा’वरून महाराष्ट्रात माजले आहे, काहीसे तसेच. ‘गोयंचो सायबा’ ही उपाधी नक्की कुणाला सार्थ ठरते यावरून वाद निर्माण झाला आहे.
पारंपरिकरित्या ‘गोयंचो सायबा’ म्हणजे सेन्ट फ्रान्सिस झेव्हियर. ओल्ड गोवा येथे त्याच्या शरीराचे अवशेष (Relics) जपवून ठेवण्यात आले आहेत. सतराव्या शतकातील हा स्पॅनिश जेसुईट धर्मगुरू. सोसायटी ऑफ जिझस किंवा येशूसंघ ही कॅथॉलिक धर्मगुरूंची संस्था त्याने सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला यांच्याबरोबर स्थापन केली. गोव्यात आणि भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यात त्याचे मोठे योगदान आहे. चीनकडे जाण्यासाठी जहाजाची वाट पाहत असताना त्याचे निधन झाले. नंतर त्याचा मृतदेह गोव्यात आणला गेला.
तीन डिसेंबर हा सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा सण. या दिवशी ओल्ड गोव्यात मोठी यात्रा भरते, राज्यात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. गेली दहा वर्षे गोव्यात भाजप सत्तेवर असला तरी ही सार्वजनिक सुट्टी कायम राहिली आहे.
त्याशिवाय दहा वर्षांतून एकदा या संताचे अवशेष ओल्ड गोवा येथल्या बॉम जेसू बॅसिलिकातून रस्त्यापलीकडच्या सफेद रंगातल्या भव्य सी कॅथेड्रलमध्ये हलवले जातात आणि एक-दोन महिने भारतातील व जगभरातील भाविकांसाठी या अवशेषांचे राज्य सरकारतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते.
कॅथोलिक चर्च संत फ्रान्सिस झेव्हियरच्या या अवशेषाला शरीर मानत नाही, तर केवळ अवशेष मानते हे महत्त्वाचे. काचेच्या पेटीत हाडांचा सापळा आणि कवटी असलेल्या या अवशेषावर धर्मगुरूचे रंगीत, चमकीदार झगे घातलेले असतात एवढेच. त्याचे फार अवडंबर माजवले जात नाही, ते बॅसिलिकाच्या मुख्य वेदीवर नाही, तर डाव्या बाजूच्या उंच चौथऱ्यावर ठेवलेले असतात. वेदीवर मुख्य सन्मान अर्थातच येशू ख्रिस्तालाच असतो. राज्य शासनाच्या पर्यटन खात्यासाठी संताच्या अवशेषाचे दशकातून एकदा भरणारे हे प्रदर्शन म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असल्याने सत्तारूढ भाजपसुद्धा यासाठी पुढाकार घेत असतो.
मध्ययुगीन काळातल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियरला त्याच्या काळाचे काही गुण आणि अवगुण चिकटलेले आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू असल्याने त्या काळच्या रितीरिवाजानुसार धर्मप्रसार करणे हेच फ्रान्सिस झेव्हियरच्या आयुष्याचे मुख्य मिशन होते आणि त्यात त्याला बऱ्यापैकी यश आले. ख्रिस्ती धर्मातील पाखंडी लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी युरोपाप्रमाणेच गोव्यातसुद्धा इन्क्विझिशन बोर्ड स्थापन करावे, असा या संताचा आग्रह होता.
फ्रान्सिस झेव्हियरला कॅथोलिक चर्चने गोव्याचा आश्रयदाता म्हणजे ‘Patron Saint’ हा दर्जा दिला आहे. प्रत्येक कॅथोलिक धर्मप्रांताचा स्वतःचा पॅट्रन सेंट असतो. गोव्यात आणि भारतात सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या नावाने अनेक चर्चेस आणि शाळा-कॉलेजेस आहेत.
तर या युरोपियन व्यक्तीला ‘गोयंचो सायबा’ ही उपाधी का द्यावी, असा सवाल मागच्या आठवड्यात सुभाष वेलिंगकर यांनी उपस्थित करून वादाला सुरुवात केली. ते गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी गोव्यातल्या २०१७च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात सरकारी अनुदान असलेल्या शाळांतल्या इंग्रजी माध्यमाविरुद्ध दंड थोपटले होते, मात्र त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही.
वेलिंगकर यांच्या मते सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याऐवजी भगवान परशुराम यांना ‘गोयंचो सायबा’ ही उपाधी सार्थ ठरते. कारण २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केल्यावर समुद्रात बाण फेकून परशुरामांनी जमीन निर्माण केली. ते ठिकाण म्हणजे गोवा. जिथे बाण पडला ते गाव म्हणजे दक्षिण गोव्यातले बाणावली, असे मानले जाते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक असलेल्या भगवान परशुरामांनी सागरातून निर्माण केलेले गोवा पुढच्या काळात सारस्वत ब्राह्मणांचे एक माहेरघर बनले. अर्थात यामध्ये कॅथोलिक धर्मातील सारस्वतांचाही समावेश होतो.
महाराष्ट्रात या आठवड्यात अनेक दैनिकांनी भोंगा, ‘हनुमान चालीसा’ आणि राज ठाकरे यांच्यावर पाने आणि सदरे खर्ची केली, त्याप्रमाणे गोव्यातल्या दैनिकांत ‘गोयंचो सायबा’वर भरपूर लिहिले गेले. या वादात उडी घेण्यास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट नकार दिला आहे. समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी आणखी एक नवा विषय असे या वादाकडे पाहता येईल.
पण मूळ प्रश्न असा आहे की, संत फ्रान्सिस झेव्हियरला ‘गोयंचो सायबा’ हा उपाधी कुणी दिली? चर्चने तरी अशी काही उपाधी दिलेली नाही. त्यामुळे ही उपाधी मागे घ्यायची, तर मग आदेश किंवा फतवा काढायचा कुणी?
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment